वाट असे जी म्हणते तीसुद्धा का सलते

Submitted by बेफ़िकीर on 9 September, 2016 - 11:03

वाट असे जी म्हणते तीसुद्धा का सलते
"ऐसा भी मिलजाये कोई चलते चलते"

बरीच वर्षे झाली आता त्या घटनेला
तिथून जाताना मन अजूनही गलबलते

दशके दशके जगत राहणारे बघतो मी
कोणाचीही विचारशैली कुठे बदलते

तुझा चेहरा उमलावा हा प्रयत्न माझा
नुसता प्रयत्न बघुनी भलते कुणी उमलते

खरे बोलण्यामध्ये इतकी जादू होती
भलते झाले अपुले, अपुले झाले भलते

नसती तर मी खूप यशस्वी झालो असतो
ती का होती जगात हे कोडे न उकलते

गंध आणतो तिचा तरीही हल्ली हल्ली
वाऱ्याच्या आवाजानेसुद्धा कलकलते

सध्याची माणसे कशी हे शीक जरा तू
गणपतीतले बघून ये देखावे हलते

पृथ्वीच्या आसाशी काही नाते नाही
'बेफिकीर' लोकांची सांज कुठेही कलते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users