एक गोंधळ - टिप कोणाला? किती द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2016 - 11:51

आजच्या तारखेला !

जेव्हा मी एकटाच नाक्यावरच्या हॉटेलात जातो आणि हलकाफुलका नाश्ता करतो तेव्हा एकही पैसा टिप देत नाही.

जेव्हा मी एकटाच जातो आणि जेवल्यासारखे हादडतो तेव्हा पाच रुपये फक्त/- टिप ठेवतो.

जेव्हा मी मित्राला घेऊन नाश्ता करायला जातो तेव्हा दोघांचे मिळून एक जेवण असा हिशोब करत पाच रुपये टीप ठेवतो.

जेव्हा मित्राला घेऊन जेवण करायला जातो तेव्हा एकूण दहा रुपये टीप ठेवतो.
अर्थात पाच मी देतो. पाच मित्राला द्यायला लावतो.

आता गर्लफ्रेंड Happy

गर्लफ्रेंडबरोबर जेव्हा केव्हा एखाद्या साध्या हॉटेलात जातो, आणि साधी चहा पिऊन बाहेर येतो (जे आजवर कधीच झाले नाही ती गोष्ट वेगळी) तरीही टिपची किमान मर्यादा पाचची दहा मध्ये बदलते.

जेव्हा तिच्याबरोबर जेवण करायला जातो, तेव्हा टिपची किमान मर्यादा दहाची वीस मध्ये बदलते.
(आता कळलं गर्लफ्रेंड असली की पैसे कसे खर्च होतात)

जेव्हा मी गर्लफ्रेंडबरोबर एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो, म्हणजे जिथे जेवायला बसल्यावर मांडीवर पांघरायला फडके आणि जेवण झाल्यावर हातपाय बुचकळायला गरमागरम लिंबूपाणी आणून देतात, जिथे पिण्याचे पाणीही ‘साधा की मिनरल वॉटर?’ असे अदबीने विचारतात, आणि आपण निर्लज्जासारखे ‘साधा’ म्हटले तरी काचेच्या वळणदार ग्लासातून थंडगार पाणीच आणून देतात, जिथे समोरच्याला ईंग्रजी ‘ई तरी येतो की नाही याचा जराही तपास न घेता ‘काय जेवणार?’ सारखे क्षुल्लक प्रश्नही ईंग्रजी भाषेत विचारतात, जिथे जेवणात एखादा केस आला तरी दिसू नये ईतपत अंधारमय वातावरण करतात आणि फोकस ताटावर नाही तर खाणार्‍यांच्या तोंडावरच राहील याची दक्षता घेतात, ईत्यादी सोयीसुविधा न मागता पुरवणार्‍या मोठ्या हॉटेलात जेव्हा जातो, तेव्हा हा किमान दहाचा आकडा किमान वीस ते तीस मध्ये बदलतो. कारण बिलाचा आकडा फुगवत त्या तुलनेत दहा वीस रुपयांची टिप ठेवायला आपल्यालाच लाज वाटावी याची काळजी हॉटेलवाल्यांनी स्वत:च घेतलेली असते.

जेव्हा आम्ही एखाद्या स्पेशल ओकेजनसाठी सेलिब्रेट करायला जातो तेव्हा टिपचा आकडा गर्लफ्रेंड स्वत:च ठरवते. तो दरवेळी चढत्या क्रमाने वेगवेगळा असतो.

आजकाल तर मी तिला किती ओळखू लागलोय याची परीक्षा घ्यायला जेवण झाल्यावर तीच मला लाडात विचारते, "रुनम्या, आज किती टिप ठेवशील?"
आणि जर मी तिच्या मनातला आकडा बरोबर ओळखला तर ती खुश होत मला आलिंगन देते.

हल्ली खरेच मी वरचेवर तिच्या मनातला आकडा ओळखू लागलोय हे आलिंगनाच्या वाढलेल्या संख्येवरून (आताच हे वाक्य लिहिता लिहिता) मला जाणवले आहे.

असो, तर बिल छोटे की मोठे त्यानुसार टिपही छोटी की मोठी ही मेंटेलिटी आम्हा दोघांचीही आहे. भले आमची छोट्यामोठ्याची व्याख्या भिन्न का असेना.
पण बेकार सर्विस दिली तर टीप कमी द्या किंवा देऊच नका हे माझे मत आहे. जे तिला कधीच पटत नाही.
तिच्यामते टीप आपण आपली शान जपायला देतो. सर्विस कशीही असो, आपली शान तर कायम तीच असते ना. मग झालं, टीप सुद्धा त्याला साजेशीच द्यावी.

होम डिलीव्हरीबाबत बोलायचे झाल्यास, दहा रुपये हा आजच्या तारखेला माझा फिक्सड् आकडा आहे. त्याला टिप न समजता संबंधित व्यक्तीला आपल्या घरापर्यंत एक फेरी मागावी लागते त्याचा मेहनताना म्हणून मी ते देतो.

हे झाले हॉटेलचे,
आता थोडक्यात ईतर

टॅक्सीवाला भला माणूस वाटला तर त्याचे बिल राऊंड अप करत चार-आठ रुपयांची शिल्लक न घेणे हे टीपसदृश्य काम मी करतो.

रिक्षावाल्यांना मी कधीच टिप देत नाही. किंबहुना एक सुट्टा रुपयाही सोडत नाही.
कदाचित दक्षिण मुंबईकर असल्याने टॅक्सीवाल्यांबद्दल एक आत्मीयता वाटत असावी जी रिक्षावाल्यांबद्दल वाटत नसावी. बाकी विशेष काही कारण नाही.

सलूनमध्ये आयुष्यात एकदाच टीप दिली आहे.
का? केव्हा? कशाला उगाच ..
ते या लेखात तुम्ही वाचू शकता. - http://www.maayboli.com/node/53197
हिला माझी रिक्षा ऐवजी टॅक्सी म्हणालात तर जास्त आवडेल.

बाकी चायपाणी हा वेगळा विषय आहे. ते कोणाला किती द्यायचे हे ना मला समजत, ना माझ्या गर्लफ्रेंडला. घरी असलो तर मी माझ्या आईच्या किंवा वडिलांच्या तोंडाकडे बघतो. तेच काय ते ठरवून देतात.

असो, तर ही झाली प्रस्तावना,

आता एक ताजा अनुभव ज्यामुळे हा धागा सुचला.

पुन्हा शीर्षक लिहितो,
एक गोंधळ - टिप कोणाला? किती द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे?

ऑनलाईन शॉपिंगच्या फंदात मी हल्लीच पडू लागलोय. बरेचसे पार्सल कामाच्या दिवसांमध्येच येतात जेव्हा मी ऑफिसला असतो. ते आई कलेक्ट करते. गेल्या रविवारी मात्र मी एकटाच घरी होतो. पार्सल आले. मी स्वत: साईन करून घेतले. खरेदी करताना कॅश ऑन डिलीव्हरी सिलेक्ट केले होते. तर त्याचे ३९५ रुपये फक्त झालेले. मी चारशे रुपये, शंभरच्या चार नोटा त्या कुरीअरबॉयच्या हातात सरकावल्या आणि राहू दे म्हणालो. तरी तो पाकिटात पाच रुपये चिल्लर शोधू लागला. मला वाटले, त्याला माझे ऐकू आले नसावे. म्हणून मी त्याला पुन्हा मोठ्याने म्हणालो, अरे राहू दे. तसे तो आणखी त्वेषाने पाकिट शोधू लागला आणि कुठल्याश्या कोपर्‍यातून त्याने पाच रुपयांचे नाणे शोधून काढलेच. बस्स त्याच त्वेषात मग त्याने ते माझ्या हातात कोंबले. अगदी माझ्या भावी सासर्‍याने माझ्या गर्लफ्रेंडचा हात माझ्या हातात द्यावे तसे अगदी माझा हात आपल्या हातात घेत त्यावर टाळी मारल्यासारखे ते चिकटवले. अर्थ साफ होता. त्याला माझे हुशारी मारत टिप देणे आवडले नव्हते आणि त्याला मला हे आपल्या कृतीतून दाखवून द्यायचे होते. माझा त्याला दुखवायचा हेतू नक्कीच नव्हता, पण तरीही तो दुखावला होता आणि त्याचा बदला म्हणून त्याने मला दुखावले होते. आय मीन माझा हात दुखावला होता.

एकंदरीत वाईट वाटले. अश्यावेळी सॉरी तरी काय आणि कसे बोलावे हे समजले नाही. माझे नेमके चुकले म्हणावे तर पुढच्यावेळी एखादा गरजू खरेच अश्या सर्विसच्या बदल्यात टिपची अपेक्षा ठेऊन असेल आणि मी याच भितीने त्याला दिली नाही, तर त्या बिचार्‍याचे उगाच नुकसान व्हायचे. तर उलटपक्षी पुन्हा असा प्रकार करताच आणखी एखादा दुखावला जायचा. बस्स म्हणूनच नेमकेपणा ठरवायला हा धागा काढलाय. टिप कोणाला? किती द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे?

आयुष्यात कधीतरी कोणालातरी टीप दिली असेल, वा कोणाकडून घेतली असेल तर ईथे जरूर प्रतिसाद द्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस म्हणायच नव्हत. मदत म्हणू शकता हव तर. पण सध्या खूप गरज आहे याची. रुन्मेश यान्नी क्रुपया मार्गदर्शन करावे, अशी नम्र विनती.

<<का आमच्यासारख्या छोट्यामोठ्या लेखकांच्या पोटावर पाय देतोयस ? कधीच्या काळी आमच्या एका धाग्याला थोडेफार प्रतिसाद मिळाले तर डोळ्यात खुपलं व्हय रे तुमच्या.>> अंतरंगी Lol

Pages