(कायदा येण्याअगोदरचा लेख) गर्भाशय भाड्याने देणे आहे

Submitted by बेफ़िकीर on 28 August, 2016 - 14:35

(सरोगसीसंदर्भातील कायदा येण्याअगोदर बर्‍याच पूर्वी लिहिलेला हा लेख आहे. हा लेख एका वेगळ्या उपक्रमाअंतर्गत लिहिलेला होता. त्यामुळे, अनेक समजुती, गृहीतके, गैर वाटू शकतात किंवा असूही शकतात. ह्या विषयाबाबत माझे स्वतःचे विचार नंतर नेमके कसे झाले आहेत हे खरे तर मलाही आज ठरवता येत नाही. पण तेव्हाचे माझे अंडरस्टँडिंग असे होते. चु भु द्या घ्या. चर्चा अवश्य व्हावी)
===================

गर्भाशय भाड्याने देणे आहे:
===================

मानवी संस्कृतीने बुद्धीच्या बळावर केलेले प्रयत्न आणि संशोधने अवाक करणारी आहेत. एकेकाळी जे ऐकून असे वाटले असते की हे नुसतेच स्वप्न आहे, काल्पनिक आहे, असंभव आहे ते आता दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेले आहे.

इतर अनेक क्षेत्रातील नवनव्या संशोधनांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातही अफाट संशोधन होत असून 'सरोगसी किंवा सरोगेट मदर' हा त्याचाच एक असा भाग आहे जो आता दैनंदिन जीवनात रुळलेला आहे.

प्रजननक्रिया ही निसर्गाने स्वतःच्याच पुनर्निर्मीतीसाठी केलेली रचना असते. ह्यात नर व मादी ह्यांच्या संबंधांमधून नवीन सजीव जन्माला येतो. मात्र जगात अशी अनेक दांपत्ये असतात ज्यांच्या नशीबात हे भाग्य नसते. ह्याची कारणेही अनंत असतात व त्यावर उपायही अनंत असतात.

आज असा काळ आलेला आहे की अपत्यहीन राहण्याच्या जवळपास सर्वच वैद्यकीय कारणांवर शास्त्राने मात केलेली आहे. आता जोडप्याला अपत्यहीन राहण्याचे कारणही शास्त्राने ठेवलेले नाही. शास्त्र निसर्गापासून फटकून राहात नाही तर निसर्गाला आपले काम सुरळीत पार पाडू देण्यास अधिक सहकार्य करू पाहते. पण काही उणिवांमुळे जर निसर्ग ते कार्य करू शकत नसेल तर शास्त्र आपल्या आधीच्या भूमिकेतून बाहेर पडून अधिक प्रभावी भूमिका स्वीकारते.

प्रजनन किंवा नवीन जीव जन्माला घालण्याची मानवाकडे अनेक कारणे असू शकतात. मातृत्वाचा अनुभव प्रत्येक स्त्रीला हवा असतो. बाळाचा जन्म, त्याचे संगोपन ह्यात अवर्णनीय आनंद मिळतो. बाप होण्याची भावनाही तितकीच हवीहवीशी असते. ह्याशिवाय आपल्या कुटुंबाला पूर्णत्व यावे, आपल्याला वारस असावा, आपल्यासाठी भविष्यात एखादा आधार असावा असे अनेक हेतू असू शकतात. भारतासारख्या ठिकाणी तर अजूनही कित्येक अपत्यांचे जन्म हे केवळ घरातल्या इतरांनी भावनिक दबाव आणल्यामुळे होत असतात हे एक वास्तव आहे. मूल न होणे किंवा मुलगा न होणे हे आपल्यासारख्या संस्कृतीने खूप वर्षे कमीपणाचे मानले व अजूनही अनेक ठिकाणी ते तसे मानले जाते हे दुर्दैवी आहे.

मात्र अपत्य न होण्याची अनेक कारणे असू शकतात. ही कारणे बहुतांशी वैद्यकीय असतात व त्यावर उपचार देखील शक्य असतात. लाखो अपत्यहीन दांपत्ये अश्या उपचारांमार्फत अपत्यप्राप्ती करून घेत आहेत.

प्रत्यक्ष अपत्यप्राप्तीतील प्रक्रियेमध्ये माता म्हणून स्त्रीची भूमिका पुरुषाच्या भूमिकेच्या तुलनेत प्रचंड असते हे आपण सगळे जाणतोच. स्त्री तिच्या उदरात नऊ महिने त्या गर्भाचे पालन पोषण करत असते. ह्याच कारणामुळे अनेकदा अपत्यप्राप्तीत अडथळा येण्याचे प्रमुख कारण स्त्रीशीही निगडीत असते, मात्र ते पुरुषाशीही निगडीत असू शकतेच.

कोणत्याही कारणास्तव जेव्हा जोडपे अपत्यप्राप्तीस अक्षम ठरते व वैद्यकीय उपचारांनीही अपत्यप्राप्ती होऊ शकत नसते, थोडक्यात जेव्हा सर्व उपाय अयशस्वी ठरतात तेव्हा 'सरोगसी' हा उपाय योजता येतो.

सरोगसीचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात 'इन व्हिट्रो फर्टिलायझेशन' ह्या आधुनिक प्रक्रियेमार्फत एक जीव निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेले स्त्री पुरुषांमधील घटक एकमेकांच्या संपर्कात परंतु स्त्रीच्या उदराबाहेर एका द्रवात जोपासले जातात व विशिष्ट कालावधीत योग्यायोग्यता तपासून ते दुसर्‍या सक्षम स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केले जातात. ही सक्षम स्त्री म्हणजे सरोगेट आई! जेव्हा असे केले जाते तेव्हा जन्माला येणारे अपत्य हे जेनेटिकली किंवा डी एन ए च्या निकषांनुसार 'सरोगेट आईशी' अजिबात संबंधीत नसते तर त्याच्या स्वतःच्याच आई वडिलांशी संबंधीत असते. मात्र पारंपारीक पद्धतीत पुरुषाचा इतर सक्षम स्त्रीशी संबंध येऊ देऊन त्यांना होणारे अपत्य पुरुषाने व त्याच्या पत्नीने आपले अपत्य म्हणून स्वीकारणे असा भाग येतो. ह्यात अर्थातच झालेले मूल हे त्याच्या प्रत्यक्ष जन्मदात्र्या आईशी डी एन ए च्या परिभाषेनुसार संबंधीत असते व पुरुषाच्या पत्नीशी तसे अजिबात संबंधीत नसते.

पहिल्या प्रकारची प्रक्रिया आज मोठ्या प्रमाणावर अवलंबली जात आहे. ह्या प्रक्रियेमध्ये मूल हे पूर्णतः कायदेशीररीत्या जे विवाहीत जोडपे असते त्यांचेच असते मात्र ते वाढते वेगळ्या मातेच्या उदरात! ह्यामुळे मुलाच्या कायदेशीर मातापित्यांना ते मूल स्वीकारताना मनात कोणत्याही प्रकारचे शल्यही नसते. तसेच, ह्यात चारित्र्यविषयक इतर घटकांचा समावेश होऊ शकत नाही. शिवाय, आवश्यक ती गुप्तताही पाळली जाऊ शकते.

एक प्रकारे सरोगसी हे वरदानच आहे. तसेच, सरोगसी हा स्त्रीच्या जीवनाशी अत्यंत घट्टपणे निगडीत असा विषय आहे. स्त्री आणि पुरुषांना निसर्गाने वेगळी शरीरे, वेगळ्या जबाबदार्‍या दिलेल्या आहेत. स्त्रीला मातृत्वाची जबाबदारी दिलेली आहे. हे स्त्रीचे सर्वात पहिले नैसर्गीक वेगळेपण म्हणता येईल.

वर म्हंटल्याप्रमाणे सरोगसी हा एक अंतिम उपाय आहे. उपलब्ध असलेले बहुतांशी वैद्यकीय उपाय निरुपयोगी ठरल्यास ह्या उपायाचा मार्ग स्वीकारला जातो.

सरोगेट मदर हा उपाय कोणासाठी?

ज्या जोडप्यांना काही कारणामुळे अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा शक्य ते सर्व वैद्यकीय उपचार करूनही अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा जोडपे समलिंगी असल्यामुळे अपत्यप्राप्ती होत नसेल व अपत्यप्राप्तीची तीव्र इच्छा असेल त्यांच्यासाठी हा उपाय उपलब्ध आहे.

सरोगसी म्हणजे नेमके काय?

पारंपारीक सरोगसीचा येथे विचार केलेला नाही. आधुनिक सरोगसी तंत्रामध्ये विवाहीत पती-पत्नींचा एम्ब्रायो मातेच्या उदराबाहेर विशिष्ट द्रवात विशिष्ट कालावधीपर्यंत ठेवून नंतर योग्यायोग्यतेनुसार इतर सक्षम स्त्रीच्या गर्भात स्थापित केला जातो. ह्यामुळे होणार्‍या बाळाची अनुवंशिकता ही त्याच्या कायदेशीर आई वडिलांशीच मिळतीजुळती राहते. ज्या मातेच्या उदरात त्याचे गर्भ म्हणून संगोपन होते त्या मातेशी त्याचे वांशिक किंवा जनुकीय संबंध काहीच नसतो. हे पूर्णपणे आपल्याच कायदेशीर माता-पित्यांचे बाळ केवळ गर्भावस्थेत वेगळ्या मातेच्या उदरात वाढते.

सरोगसीची गरज काय?

कोणत्याही कारणाने किंवा सर्व वैद्यकीय उपचार करून थकल्यानंतरही जर दांपत्याला अपत्य होत नसेल, काही कारणाने कायदेशीर माता तिच्या गर्भाशयात गर्भधारणा करण्यास वैद्यकीयदृष्ट्या पात्र नसेल किंवा जर जोडपे समलिंगी असल्यामुळे त्यांना अपत्य होत नसेल अश्या जोडप्यांना सरोगेट मदरची आवश्यकता भासते.

सरोगसीचे भारतातील स्वरूप कसे आहे?

भारत ह्या देशाने सरोगसीबाबत इतर अनेक विकसित राष्ट्रांच्या तुलनेत बरीच पुरोगामी भूमिका स्वीकारल्याचे दिसते. भारतात सरोगेट मदर होणार्‍या आईला सरोगेट मदर होण्याबद्दल उत्पन्न मिळू शकते व त्यात कायदा आड येत नाही. तसेच, झालेले अपत्य त्याच्या कायदेशीर मातापित्यांचे झाल्यानंतर त्या अपत्याला आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या कायद्याच्या आडकाठीला सामोरे जावे लागत नाही. ह्याशिवाय, भारतातील डॉक्टर्स हे अत्यंत तज्ञ व कुशल असतात. शिवाय हे डॉक्टर्स जगभरात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी इंग्लिश भाषा बोलू शकतात. भारतामध्ये सरोगसीमार्फत अपत्यप्राप्ती करून देण्याची प्रक्रिया अमेरिकेतील त्याच प्रक्रियेसाठी येणार्‍या खर्चाच्या एक तृतियांशाहूनही कमी खर्चाची आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतात प्रचंड लोकसंख्या असून येथील प्रजननाचे प्रमाण, प्रजननास सक्षम असणार्‍या स्त्रियांचे प्रमाण व सरोगसीमार्फत आर्थिक उत्पन्न मिळवू पाहणार्‍या स्त्रियांचे प्रमाणही प्रचंड आहे. भारतात सरोगसीला एक व्यवसाय म्हणून मान्यता असून दरवर्षी सुमारे २००० कोटींची उलाढाल ह्या व्यवसायात होत आहे.

सरोगसीचे ब्रिटन किंवा अमेरिकेतील स्वरूप कसे आहे?

ह्या दोन्ही देशांमध्ये सरोगसीबाबत कडक कायदे आहेत. काही ठिकाणी सरोगेट मदरला आर्थिक लाभ मागता येत नाही. तसेच अपत्याला कायदेशीर बाबींचा सामना करावा लागतो. ह्याशिवाय सरोगसीसाठी येणारा खर्च प्रचंड म्हणजे सुमारे सत्तर हजार डॉलर्स इतका आहे जो भारतात फार तर वीस हजार डॉलर्स किंवा सुमारे बारा लाख रुपये इतका येतो.

भारतात सरोगसीसाठी प्रख्यात केंद्र कोणते?

भारतातील गुजरात राज्यातील आणंद ह्या शहरात डॉ. नयना पटेल ह्या नामांकित महिला डॉक्टरने चालवलेले आकांक्षा हे सरोगसीचे फार मोठे केंद्र असून त्यांच्या वेटिंग लिस्टवर शेकड्याने जोडपी आहेत. ह्या केंद्रात गरीब कुटुंबातील पण आरोग्यवान असलेल्या अनेक स्त्रिया सरोगेट मदर होण्यासाठी येतात. त्यांची पूर्ण तपासणी केली जाते. तसेच सरोगेट मदर होण्याची त्यांची स्वतःची इच्छा आहे ना हे तपासले जाते. अन्यथा उत्पन्नासाठी आपल्या सुनेला जबरदस्तीने सरोगेट मदर व्हायला लावणारेही महाभाग निघू शकतात. शिवाय, सरोगेट मदर होणार्‍या मातेची सर्व शुश्रुषा ज्या जोडप्याला मूल हवे आहे त्या जोडप्याकडून प्रायोजीत होईल हे ठरवले जाते. दोन्ही आयांची भेट घालून दिली जाते. विशिष्ट वैद्यकीय उपचारसरणी अवलंबून मग ह्या गरीब स्त्रीच्या गर्भाशयात बीजारोपण केले जाते. ह्या केंद्रामध्ये आरोग्य, विश्वासार्हता, देखभाल, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता ह्या सर्वांबाबत अत्यंत दक्ष राहिले जाते. मात्र भारतात हे एकच केंद्र आहे असे नव्हे.

भारतीय स्त्रीला सरोगेट मदर बनवण्यासाठी लोक कोठून व का येतात?

भारतीय वातावरण हे प्रजननासाठी उचित आहे. भारतीय स्त्रीची सरासरी आरोग्यपातळी चांगली म्हणता येईल अशी असते. भारतामध्ये सरोगसीला मान्यता आहे व त्यातून होणारी उलाढाल व इतर घटक ह्या सर्वांना कायद्याचे अभय आहे, जसे ते इतर देशांत नाही. भारतीय सरोगेट स्त्री सरोगेट होण्यातून मुबलक उत्पन्न मिळवू शकते. सुमारे वीस लाख रुपयांच्या ह्या उपचारप्रक्रियेपैकी सुमारे तीन ते सात लाख रुपये इतकी रक्कम सरोगेट आईला मिळू शकते. ह्याशिवाय, गरोदर अवस्थेत असतानाची संपूर्ण देखभाल व सर्व खर्चही तिला मिळतो. इतर देशांमध्ये सरोगेट मदर मिळणे तर दुरापास्तच असते पण मिळाली तरी तिला द्यावी लागणारी रक्कम परवडेनाशी असते. शिवाय तेथे इतर कायदेशीर अडचणी असतात त्या वेगळ्याच! एकुण काय तर भारतात सरोगसीला मुळातच कायदेशीर स्वरूप असल्यामुळे, येथे तज्ञ व इंग्लिश बोलणारे डॉक्टर्स असल्यामुळे, येथील प्रक्रियेचा खर्च एक तृतियांशाहूनही कमी येत असल्यामुळे आणि कमी आर्थिक लाभासाठी सरोगेट मदर होण्यास इच्छुक स्त्रियांची मोठी संख्या असल्यामुळे भारतात ह्या प्रक्रियेसाठी परदेशातून अधिक जोडपी येतात. तसेच, परदेशात राहणारे अनिवासी भारतीयही येतात. इतकेच नव्हे तर भारतातील अशी जोडपीसुद्धा येथे येतातच.

भारतीय स्त्री व तिचे कुटुंबीय हा व्यवसाय का स्वीकारतात?

भारतात मोठ्या प्रमाणावर गरीबी आहे. अक्षरशः हाता-तोंडाची गाठ न पडणारी लक्षावधी कुटुंबे भारतात आहेत. त्यांना स्वतःची मुलेबाळे आहेत पण त्यांना खायला घालायला पैसे नाहीत आणि शिकवण्यासाठीही पैसे नाहीत. त्यांना दिसत आहे की शिक्षणामुळे इतर नागरीक कसे पुढे गेलेले आहेत. त्यांनाही पुढे जायचे आहे पण पैश्याअभावी ते अशक्य होत आहे. अश्यापैकी अनेकांनी आजवर असा निर्णय घेतला आहे की निसर्गाने दिलेल्या मातृत्वाच्या वरदानाचा उपयोग आपल्या चरितार्थासाठी करायचा. अश्या कुटुंबामधील स्त्रिया कुटुंबियांच्या संमतीने सरोगसी केंद्रात नांव नोंदवतात. शारीरिक सक्षमतेनुसार त्यांना परवानगी मिळाल्यास त्या एखाद्या अनोळखी दांपत्याचे मूल आपल्या गर्भाशयात वाढवतात. मुलाच्या जन्मानंतर ते मूल त्या दांपत्याला परत देताना अर्थातच त्यांना खूप वाईट वाटते. पण आधीच लिखापढी झालेली असते की ते मूल परत देताना सरोगेट मदर आडकाठी करणार नाही. ह्या कालावधीतील सरोगेट मदरचा सर्व खर्च, तिची देखभाल हे त्या दांपत्यातर्फे केले जाते. शिवाय सरोगेट मदरला एक घसघशीत रक्कमही दिली जाते जी कदाचित ती आणि तिचा पती मिळून पुढील वीस वर्षांतही कमवू शकले नसते. एवढे करून त्या मुलाशी त्या सरोगेट मदरचा जनुकीय संबंध काहीच नसतो. म्हणजे, ते मूल तिच्या शरीराचा भाग नसते तर केवळ तिच्या गर्भाशयात 'पेयिंग गेस्ट' म्हणून काही महिने राहते. ह्या सर्व कारणांसाठी भारतीय स्त्री व तिचे कुटुंबीय हा व्यवसाय स्वीकारतात.

एकंदरीत, एक प्रकारे सरोगसी सेवा पुरवणे हा सुद्धा 'मागणी-पुरवठा' ह्यातील तफावतीवरच आधारीत व्यवसाय आहे. ही गोष्ट विशेष मानायला हवी की ज्या मातृत्वावर आपल्याकडे इभ्रत, इज्जत, संस्कृती, लज्जा, चारित्र्य अश्या अनेक बाबींचे डोलारे उभे राहिलेले आहेत ते मातृत्व आता भाड्याने घेता येते व चारित्र्यावर ओरखडाही उठत नाही हे समजल्यानंतर त्याचा एक मोठा व्यवसाय झालेला आहे.

=======================

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्लिश बोलणारे डॉक्टर्स व इतर खोचक उल्लेख कळले नाहीत.

हे इतकं रामायण लिहिण्याचे तेव्हाचे संदर्भ निश्चित वेगळे असतील मग थोडा हात फिरवून सफाई न करता लेख टाकायची घाई का बरे?

'अड्ड्या'चा उल्लेखही बिनकामीच वाटतो.

त्या ऋ ला नावे ठेवण्याधी स्वतःकडे बघायचे विसरत नको जाउस बरे.

नवा कायंदा आलाय असे शीर्षकात आहे तर नवा कायदा काय म्हणतो तेही लिहा ना. मी कायदा नीट वाचला नाहीय पण सरोगसी जवळजवळ बंद होईल या कायद्याने असे काहीसे वाचलेले.

भारतात सरोगसीसाठी लोक यायचे मुख्य कारण खर्च कमी हे होते असे बरेच ठिकाणी वाचलेले. आणि आणंदकेंद्रात घेत होते तशी काळजी फारसे कुणी घेत नव्हते, काही एजेन्ट्स स्वतःच जास्त पैसे खाऊन आईला फारसे हाती लागू देत नव्हते, तिची योग्य काळजी घेतली जात नव्हती इत्यादी बऱ्याच भानगडी होत्या असे वेगवेगळ्या ठिकाणी वाचलंय.