चिपळूणमध्ये सकाळी उठलो तेच देशभक्तीपर गाण्यांच्या आवाजाने. आंम्ही मुक्काम ठोकलेल्या हॉटेलच्या शेजारीच एक शाळा + कॉलेज होते त्यामुळे सकाळी अलार्मची गरज भासलीच नाही.
गाणी ऐकत ऐकत आवरले.. सहज म्हणून टीव्ही लावला तर बोल्टची १०० मीटरची रेस थोड्या वेळात सुरू होणार होती. मग त्या रेसमुळे आमचे वेळापत्रक कोलमडले..
बोल्टचे सुवर्णपदक बघून आंम्ही हॉटेलच्या डायनींग हॉलकडे मोर्चा वळवला आणि पोहे चहा अशी दिवसाची सुरूवात झाली. या हॉटेलमध्ये बहुदा नाश्ता लिमीटेड होता. आम्ही पहिल्यांदा एक एक प्लेट पोहे खाल्ल्यानंतर पुन्हा दुसरी प्लेट मागवली तर निम्मी प्लेट भरून पोहे आले. दुसर्यांदा चहा मागवला तर अर्धा कप चहा आला.
हॉटेलच्या दारात आमचे फोटो काढून बाहेर पडलो. आजचे टारगेट होते कशेडी घाट आणि शक्य झाल्यास माणगांव. माणगांव जमले नाही तर महाडला मुक्काम.
१५ ऑगस्टमुळे पांढर्या कपड्यांनी सजलेले लोक्स, विद्यार्थी आजुबाजूने आम्हाला "हे कोण आहेत??" टाईप नजरा देवून जात होते. अनेकदा गाडीतूनच हात करून जात होते. अगदी तीन चार किमी अंतर कापले असेल नसेल तोच ही पाटी समोर आली..
ती परशुराम घाटाची पाटी होती. आता सिंहगड किंवा पसरणीच्या तुलनेत तसा लहान असलेला परशुराम घाट पार करायचा होता.
परशुराम घाटात - अमित
अजून पाऊस आला नव्हता..
हा असा हिरवाईने ओथंबलेला घाट होता..
परशुराम मंदिराचे पहिले प्रवेशद्वार..
वशिष्टी नदीचा झकास व्हू दिसत होता..
परशुराम मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार (घाटमाथ्याजवळ आहे)
घाटमाथ्यावर आंम्ही किरकोळ खादाडी केली, पाणी भरून घेतले..
तेथे हे मजेदार दृष्य दिसले.. आधिच सिंगल लेन असलेला तो घाट रस्ता, वाहनांची बर्यापैकी गर्दी आणि रस्त्यावर कळपाने बसलेल्या या गाईम्हशी..
परशुराम घाट चढल्यानंतर लोटेची औद्योगिक वसाहत लागली.. नंतर थोडे थोडे चढ, थोडे उतार असे बराच वेळ सुरू राहिले. लोकांच्या कौतुकाच्या नजरा झेलत आमचा प्रवास सुरू होता.
येथे लक्षात राहिले ते दोन जण,
एक लहान मुलगा अगदी चौथी पाचवीत असावा इतका लहान.. भारताचा झेंडा हातात घेवून रस्त्याच्या कडेला उभा होता, मी त्याच्या जवळून पार होताना एकदम मला म्हणाला.. "All the best.. टाळी दे..." त्याला टाळी देवून पुढे गेलो.
दुसरी एक चिमूरडी शेअर रिक्शात मागे बसली होती. रिक्शाने मला मागे टाकल्यावर अचानक मला सायकल चालवताना बघून तिने आ वासला आणि डोळे विस्फारले.. तिची प्रतिक्रिया इतकी मजेदार होती की मलाच हसू आवरले नाही.. मी हसत हसत टाटा केला तर तिनेही जोरजोरात हात हलवून टाटा केला.
NH17 वर गाड्यांच्या गर्दीत अमित..
थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता..
वाटेत एका ठिकाणी अमित परत जाताना दिसला म्हणून मी थांबलो व हाक मारून किरणला परत बोलावले. त्यावेळी हा झकास फोटो मिळाला..
खेड १५ किमी..
थोड्या वेळाने भोस्ते घाट सुरू झाला.. हा घाट बहुदा उतार असणारा होता कारण आधी काढलेल्या एलेव्हेशननुसार परशुराम घाट आणि कशेडी घाट असे दोनच चढ आजच्या रूटवर होते.
भोस्ते घाट उताराचाच निघाला.. अशाच एका उतारावर..
काय यमक जुळवले आहे..!!
महाडला पडलेल्या पुलामुळे वाहतुकीत काही बदल आहे का याची माहिती खेड मध्ये काढणे आवश्यक होते. ती माहिती एका बसवाल्याला विचारत असताना मागून "कुठे जायचे आहे तुम्हाला?" अशी विचारणा करत एक जण आला. किरण नामक एक ट्रेकर होता. त्याने सगळी माहिती दिली. कुठून कसे जायचे वगैरे डिट्टेल सांगितले, आगत्याने चहासाठी आग्रह करू लागला. त्याला थॅंक्स म्हणून आंम्ही बाहेर पडलो. किरणनेच जेवणासाठी एक हॉटेल सुचवले होते. तिकडे मोर्चा वळवला. आमटी-भात असा साधा बेत पोटात ढकलला. वर एक एक कोकम सरबतही घेतले.
आता आव्हान होते कशेडी घाटाचे..
थोड्या वेळाने कशेडी घाटाच्या डोंगररांगा आणि पाऊस दिसू लागला..
कशेडी घाट सुरू..
नो कमेंट्स..
पाऊस सुरू झाला होता..
आमच्या सायकली. कंटेनर आणि पाऊस..
तेच वळण.. फक्त पावसासोबत..
तसेच पावसात पुढे निघालो... एक दोन वळणे पार केली.. पावसाचा जोर भरपूर वाढला होता.
वाटेतले एक सरस्वती मंदिर
वळणावळणाचा रस्ता..
वाटेत एका धबधब्यावर तिघांनी मिळून क्लिकक्लिकाट करत वेळ घालवला..
आंम्ही येथून आलो होतो..
..आणि इकडे चाललो होतो.
कशेडी घाटात - किरण.
अमित.
मी..
घाटातच कुठेतरी..
घाटमाथा जवळ आल्यावर सहज मागे वळून पाहिले..
घाटमाथ्यावर आम्ही एका ठिकाणी कॉफी पीत होतो. तेथे आम्ही बसलो असतानाच एक इनोव्हा येवून थांबली. दार उघडण्याच्या आधीच खिडकीतून रिकामी पाण्याची बाटली बाहेर पडली. नंतर दोन हिरो बाहेर आले. लगेच एक गुड-डे चा पुडा घेवून भटक्या कुत्र्यांना घातला. पुन्हा ते पुड्याचे प्लॅस्टीक इकडेतिकडे फेकले. मग माझा संयम संपला. त्याला हाकारून म्हणालो.
"भाईसाब वो रॅपर यहाँ लाके दो. मैं डाल देता हूं डस्टबीनमें"
मग तो हिरो ओशाळून सॉरी म्हणाला आणि चिखलातले रॅपर उचलून डस्टबीनमध्ये टाकले.
आता पोलादपूरपर्यंत उतार होता..
पोलादपूर लगेचच पार पडले... पोलादपूर ते महाड हा रस्ता आंम्ही पूर्वी आंबेनळी घाट उतरल्यानंतर एकदा पार केला होता. लगेचच पुढे डावीकडचा रस्ता बंद केलेले बॅरीकेड्स लागले. तो दुर्दैवी पूल समोर आला.
शिल्लक राहिलेल्या पुलावर पोझ देवून सेल्फी काढणारे पब्लीक..
पुलाच्या दुसर्या बाजुला..
या पुलावरही व्यवस्थीत खड्डे पडले होते.
महाडला एके ठिकाणी डोसा, चहा वगैरे खाऊन थोडी विश्रांती घेतली.. आज माणगांव गाठणे सहज शक्य होते.
NH-17
गांधारपाळ्याची लेणी.
रस्त्याच्या बाजुला झकास हिरवळ होती
संध्याकाळी ७ च्या दरम्यान माणगांवला पोहोचलो..
अमित आणि किरण...
आजचा प्रवास..
येथे पहिला चढ दिसत आहे तो परशुराम घाट, उतरतानाचा भोस्ते घाट.. नंतर कशेडी घाट.
माणगांवला एक हॉटेल शोधले व मुक्काम ठोकला.
(क्रमशः)
छान सफर व फोटो.लेखात स्टार्ट
छान सफर व फोटो.लेखात स्टार्ट पॉईंट ते एन्ड पॉईंट्ची माहीती दिलीत तर बरे होईल.म्हणजे उंब्रजपासून कुठपर्यंत जात आहात त्याची माहीती द्या.पुभाप्र.
फोटो दिसत नाहीत
फोटो दिसत नाहीत
लय भारी! सगळेच फोटु मस्त.
लय भारी! सगळेच फोटु मस्त.
प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे
प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे आभार.
>>.
छान सफर व फोटो.लेखात स्टार्ट पॉईंट ते एन्ड पॉईंट्ची माहीती दिलीत तर बरे होईल.म्हणजे उंब्रजपासून कुठपर्यंत जात आहात त्याची माहीती द्या.पुभाप्र.
हे कळाले नाही. म्हणजे एकूण ट्रीपचा आराखडा की त्या त्या दिवसाचे मुक्काम..?
मस्त राईड.. मनोज..
मस्त राईड.. मनोज..
हा ही भाग मस्त !
हा ही भाग मस्त !
__/\__ भर पावसात कशेडी कारने
__/\__
भर पावसात कशेडी कारने जायचे झाल्याससुद्धा मला एक दीर्घ श्वास घ्यावा लागेल. तुम्ही तर सायकलने गेला होतात. त्या चिमुरडीसारखा माझाही आ वासला गेलाय
आता दोन्ही मालिका एकदमच चालू आहेत म्हणून - तिथे मेडीटेशन (ध्यान) होते मग इथे प्रत्याहार का समाधी? हिमालय आणि सह्याद्री दोन्ही अगदी भिन्न आहेत त्यामुळे तुलना अशक्य आहे पण तरी तुझ्याच शब्दात दोन्ही प्रवासांचे तुला आवडलेले peaks नक्की लिही. दोन्ही मालिका एकदम सुरू केल्याबद्दल हा जास्तीचा गृहपाठ.
छानच. मस्त फोटो आणि वर्णन ! .
छानच. मस्त फोटो आणि वर्णन !
. कधीकाळी मुंबई ते गोवा असा प्रवास महिन्यातून दोनदा होत असे माझा... त्यावेळी ठरवले होते कि हे सर्व अंतर पायी जायचे.. बघू या या जन्मी शक्य होते का ते.
सुंदर फोटो... कोकणातील
सुंदर फोटो...
कोकणातील प्रत्येक घाटाचे सौंदर्यच निराळे... परशुराम घाटातून दिसणार वशिष्टी नदीच विहंगम दृष्य.. पुढे भोस्ते घाट उतरताना जगबुडी नदी शेजारील खेड स्टेशनचा सुंदर नजारा आणि त्यानंतर पुर्वे कडील सह्य रांगाना आव्हान देणारा घाटांचा राजा कशेडी घाट.. ग्रेट!
nice
nice
>>>तुझ्याच शब्दात दोन्ही
>>>तुझ्याच शब्दात दोन्ही प्रवासांचे तुला आवडलेले peaks नक्की लिही. दोन्ही मालिका एकदम सुरू केल्याबद्दल हा जास्तीचा गृहपाठ.
धन्यवाद.. दोन्ही आपआपल्या जागी श्रेष्ठ आहेत आणि ही तुलना करताना एकालाही कमीपणा न येणे ही तारेवरची कसरत आहे. प्रयत्न करतो..
एकदम मस्त प्रवास झाला !!!!
एकदम मस्त प्रवास झाला !!!!
कडक रे, दोन्ही घाट आरामात पार
कडक रे, दोन्ही घाट आरामात पार केले दिसतंय, कशेडीचा इलिव्हेशन ग्राफ कसला जबरी आहे.
एकसे एक फोटो, लई च भारी