घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कुंभार्ली घाट (भाग १)

Submitted by मनोज. on 21 August, 2016 - 06:01

घाटवाटांची पहिली सायकल राईड मी वरंध्यात अर्धी सोडली असली तरी तशी बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाली होती. त्यावेळी अनेकांनी सुचवल्या प्रमाणे आणि आमच्या एक एक घाट सर करत जाण्याच्या नियोजना प्रमाणे पुढील घाटवाटांची ट्रीप काढण्याचे ठरले. १५ ऑगस्टची जोडून सुट्टी आणि पावसाळा यांमुळे फारसा वेळ न जाता प्लॅन ठरला.

यावेळी अजेंड्यावर होता कोयना-चिपळूणला जोडणारा कुंभार्ली घाट. मात्र कुंभार्ली घाटाचा प्लॅन ३ दिवसात बसत नव्हता. पुण्यापासून कोयनानगरचे अंतर साधारणपणे २०० / २१० किमी आहे. म्हणजे इथेच दीड किंवा दोन दिवस गेले असते आणि चिपळूण ते पुणे पुन्हा २ दिवस म्हणजे एकूण चार दिवस झाले. आंम्हाला हा प्लॅन ३ दिवसात बसवायचा होता. शेवटी बरेच विचारमंथन करून आमचा सवयीचा 'पुणे ते उंब्रज हा NH-4 चा टप्पा गाडीने पार करायचा आणि उंब्रजहून सायकल चालवायला सुरूवात' असे ठरले.

उंब्रजला सोडायला कोण येणार हा पुढचा मुद्दा होता. अमितला शनिवारी एक कौटुंबिक कार्यक्रम असल्याने शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी आमची राईड पुण्यातून सुरू करणे शक्य होणार होते. केदार दिक्षितने पुढाकार घेवून त्याच्या ट्रक ने आंम्हाला उंब्रजला सोडायचे ठरवले. (केदारच्या 'सफारी' चा आमच्या ग्रूपमध्ये "ट्रक" म्हणूनच उल्लेख होतो)

शेवटी शनिवारी रात्री निघायचे ठरले.

मनिषसोबत शनिवारी एका प्रॅक्टीस राईडसाठी जाण्याचे आधीच ठरले होते. त्यामुळे दिवसभरात एक बाईक ट्रीप आणि रात्री उंब्रजला प्रवास अशी धावपळ होणार असेही चित्र स्पष्ट झाले.

ठरल्याप्रमाणे सकाळी मनिषला चांदणी चौकात भेटलो.. ताम्हिणी घाट उतरून माणगांव आणि पुढे इंदापूर असा बाईक राईडचा प्लॅन ठरला होता.

ताम्हिणी घाटात झक्कास वातावरण होते. भरपूर धुके आणि हलक्या पावसाच्या सरी..

ही घ्या ताम्हिणी घाटाची झलक..

..

मी संध्याकाळी ५ वाजता पुण्यात परतलो..

दिवसभरात अमितने पतंजलीचे दुकान आणि अग्रज फूड्सला भेट देवून भरपूर खाद्यपदार्थ आणि पतंजलीचे एनर्जी बार घेतले. त्यानंतर दुपारी त्याची सायकल आणि बॅग केदारकडे नेवून ठेवली होती.

रात्री ९:३० वाजता मी आणि किरण केदारच्या घरी पोहोचलो..

सायकल स्टँड ट्रकला लावताना किरण आणि केदार..

.

स्टँड गाडीला लावला, त्याला सायकली लटकवल्या, स्टँडचे सगळे पट्टे यथाशक्ती करकचून आवळले आणि आंम्ही निघालो..

.

पेट्रोल पंपावर..

.

थोड्याच वेळात अमितला हायवेला उचलले आणि उंब्रजकडे १०:३० च्या दरम्यान कुच केले.

रात्री साडेबारा - आणेवाडी टोल नाक्यावर..

.

यथावकाश दिड-पाऊणे दोन वाजता उंब्रजला पोहोचलो. हॉटेल बुकींग झाले होतेच.

सायकली उतरवल्या, चाके जोडली, तेथेच एक राऊंड मारून सगळे नीट आहे याची खात्री केली आणि सायकली हॉटेलच्या इमारतीतच लावून झोपलो..
केदार आंम्हाला सोडून लगेचच परत फिरला. तो पहाटे ४ वाजता पुण्याला पोहोचला.

उंब्रजला सकाळी उठलो.. आवरले.. चहा वगैरे सोपस्कार झाले आणि निघालो.

आजचे टारगेट होते चिपळूण..

.

उंब्रज-मल्हारपेठ रस्ता हा आमच्या आवडत्या सुरूर-वाई रस्त्याची कॉपी असावा असा रस्ता होता. सिंगल लेन रस्ता.. झाडांची कमान, हिरवीगार शेते आणि सिंगल लेन रस्ता असला तरी त्रास न देता जाणारे लोक...

...

वाटेत अचानक "घाट सुरू" अशी पाटी लागली. हा घाट कोणता ते कळाले नाही आणि बाकी तयारीमध्ये या घाटाचा उल्लेख कोठेही वाचला नव्हता. मी अमितला म्हणालो. "बहुदा एखादा उताराचा घाट असेल.." आणि खरंच थोड्या चढानंतर वळणावळणांचा एकसलग उतार सुरू झाला.

.

बहुदा याच गाडीचा चालक अमित आणि किरणला उगाचच सॅल्यूट करून गेला. Wink

.

त्या घाटातून दिसणारा एक बंधारा..

.

थोड्यावेळाने शेजारी गुणवंतगड आणि दातेगड दिसू लागले..

.

यथावकाश पाटणला पोहोचलो. पोटातून कावळे हाका मारू लागले होते. एका ठिकाणी पोहे, वडा वगैरे प्रकार + सोबतच्या स्टॉकवर हल्लाबोल केला.

रिमझिम पाऊस सुरू झाला होता..

.

भुभु..

.

पाटण सोडल्यानंतर डाव्या बाजुने कोयना नदीने दर्शन दिले आणि आता सतत ती सोबत राहणार होती.

.

येथे एक जुने पंप हाऊस दिसले.. किरण थोडा पुढे गेला होता. अमितसोबत मी त्या पंप हाऊसवर जाऊन क्लिकक्लिकाट केला.

.

तेथून थोडे पुढे गेलो व बाजुच्या डोंगरावर दिसणार्‍या एका धबधब्याचे फोटो काढत असताना अचानक एक झायलो आमच्या मागे येवून थांबली.. असतील कोणीतरी टूरीस्ट म्हणून आंम्ही दुर्लक्ष केले आणि फोटोसेशन सुरू ठेवले तर अचानक त्यांच्यातला एक जण उतरून आमच्याकडे आला. राजकीय नेत्याच्या थाटात हात जोडून नमस्कार करतच चालत आला.

नमस्कार.. नमस्कार.. कुठून आलात...?

अमितने त्यांना पुणे ते उंब्रज आणि उंब्रज ते चिपळूण प्रवासाबद्दल सांगितले.

"वा वा.. अभिनंदन हा तुमचे.."

आंम्ही : बर्र..

लगेचच दुसरा भिडू गाडीतून उतरून आला..

"कुठून आलात..?"

आता उत्तरे द्यायचा माझा टर्न होता. मी कॅसेट वाजवली.

ती संपते न संपते तोच तिसरा कार्यकर्ता तोल सावरत उतरला..

"कुठून आलात..?"

असे तीन चार वेळा झाल्यानंतर मी तेथून निघायच्या तयारीला लागलो.. तोच त्यांच्यातला एक (बहुदा तरंगणारा) भिडू वदला..

ते साहेब आहेत ना... ते अमुक अमुक साहेबांचे PA आहेत.
("ते साहेब" म्हणजे पहिला हात जोडून आंम्हाला सामोरे आलेले साहेब.. आणि "अमुक अमुक साहेब" म्हणून त्यांनी महाराष्ट्रातल्या फार मोठ्या राजकीय नेत्याचे नांव घेतले.)

आंम्ही : अरे वा..!! भारी आहे की.

तो भिडू : चला तीस तीस घ्यायला.

आंम्ही : ??? (काय तीस तीस घ्यायचे आहे ते आंम्हाला कळेना..)

तो भिडू : चला की.. मॅकडॉवेल आहे.. रॉयल स्टॅग आहे.. चला चला..

मग आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की हे दारूपार्टीचे आमंत्रण आहे..

अमित : नाही हो.. आंम्ही दारू पीत नाही.

तो भिडू : बर मग दहा दहा घ्या..

मी : (वैतागून...!!) नाही हो.. सायकल चालवायला आलो आहे.. दारू प्यायला नाही...

तो भिडू : असं कधी असते का..? चला चला..
...आणि यानंतर तो भिडू अमितच्या पायाला धरून सायकलवरून त्याला उतरवायला लागला. मी लांब उभा होतो त्यामुळे माझ्यापर्यंत कोणी आले नाही.

मग आंम्ही श्रावण आहे, श्रावणात दारू घेत नाही.. देवाधर्माचे काम असते.. अशा गोष्टी सांगून सुटका करून घेतली.

धुम हसत आमचा प्रवास सुरू झाला... ही टीम नंतर दोन तीनदा आमच्या पुढेमागे होती. आंम्ही हात दाखवत पण आजिबात न थांबता सायकल चालवत होतो.
पुढे थोड्याच अंतरावर एका अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या छोट्या पुलाच्या पाईपमध्ये खाली उतरून यांची "बसायची" तयारी दिसू लागली. मी मुद्दाम त्यांना उचकवायला हाक मारून टाटा केला तर मागून मोठ्याने हाक ऐकू आली.

"रूक जाव..!!!!!"

आंंम्ही "न रूकता" सुसाट पुढे गेलो. Lol

पुढे गेल्यावर दोन मुले टायर फिरवत चालली होती... मग सायकल थांबवुन त्यांच्याकडून टायर घेतले व अमित आणि मी टायरची एक एक फेरी मारून आलो. Wink

..

हीच ती टायरवाली जोडगोळी..

.

असा झकास दंगा करत प्रवास सुरू होता. अधुन मधून पावसाच्या सरी येत होत्या. जोरात पाऊस आला तरच रेनकोट घालणे अन्यथा भिजत भिजत सायकल चालवणे सुरू होते.

अचानक याने दर्शन दिले.

.

हे सापाचे पिल्लू रस्ता पार करत होते. पण याचा रंग, लहान आकार आणि वाहनांची वर्दळ यामुळे त्याला जिवंतपणी रस्ता पार करता आला असता याची खात्री वाटली नाही..

मी लगेचच सायकल रस्त्यावर आडवी लावली आणि त्या सापाला कव्हर करत त्याच्यासोबत रस्ता पार करू लागलो.. अमित थोडाच पुढे होता.. माझी हाक ऐकून परत आला आणि काठी शोधू लागला..
मी यादरम्यान समोरून येणार्‍या वाहनांना वेग कमी करण्याचे इशारे करत होतो आणि सुरक्षितपणे आमच्या बाजूने जावू देत होतो.

अमित एक लांब काठी घेवून आला आणि त्या सापाला काठीने उचलून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला सोडून दिले.

.

थोड्या वेळात कोयनेचा बायपास आला.. तेथे किरण अशाच एका ग्रूपसोबत गप्पा मारत बसला होता.

पाऊस, हिरवी शेते, चिंब भिजलेला रस्ता आणि त्यावर निवांत चाललेलो आंम्ही...

......

येथे एका ठिकाणी जेवणाची वेळ बघून आंम्ही दोन दोन आम्लेट पाव आणि चहा घेतला..

जेवणानंतर कुंभार्ली घाटाचे वेध लागले होते.. तुफान पाऊस सुरू झाला होता.

.

आता कुंभार्ली घाट सुरू..

....

तीन चार किमीवर घाटमाथा होता.. पावसामुळे फार त्रास होत नव्हता. लगेचच घाटमाथ्याजवळ पोहोचलो..

घाट चढवताना... अमित.

.

घाटमाथ्याच्या अलिकडे.. अमित आणि किरण..

.

सायकलचा पण फटू पायजे की वो...

..

घाटमाथ्यावर आणि एकंदर घाटात "ज ह ब ह र ह द ह स्त" वातावरण होते....

घाटमाथा..

.

धुके..

.

अक्षरशः कांही फुटांवर असलेला आणि धुक्यात हरवलेला अमित.. (चुकून फोटोच्या बाहेर गेलेला किरण..)

..

धुके निवळल्यानंतर..

..

घाट उतरताना एका ठिकाणी किरणची सायकल पंक्चर झाली. आंम्ही चुकून इलेक्ट्रॉलच्या पाण्यानेच पंक्चर काढले. एका दुचाकीस्वाराकडून पुढे गेलेल्या अमितला निरोप पाठवला.. तो बिचारा दोन एक किमी अंतर पुन्हा चढवून परत आला.

पंक्चर काढले आणि आंम्ही निघालो..

धबधबे, धुके आणि सगळीकडे हिरवेगार वातावरण....

....

इथून पुढचा अप्रतीम नजारा वर्णन करणे शक्य नाही.. तुम्हीच बघा फोटोतून...

..

यष्टी...

....

येथे मध्यभागी अंधूक पांढरा ठिपका दिसत आहे ते घाटमाथ्यावरचे हॉटेल आणि डाव्या बाजुने कुंभार्ली घाट..

...

पोफळी, सय्यदवाडी, शिरगांव, आलोरे वगैरे गावे मागे पडत होती. फारसा चढ नसल्याने आरामात संध्याकाळी सहाच्या दरम्यान चिपळूणात पोहोचलो.

.

रात्री चिपळूणमधल्या तीन चार अभिषेक हॉटेलपैकी ओरिजिनल अभिषेक मध्ये पापलेट आणि शिंपल्यांवर ताव मारला..

कोकण राईडचा पहिला दिवस संपला होता...

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त लेख आणि फोटो.
आवडले.

कोकणात जातेवेळी कोणत्याही घाटात ''सावधान! घाट सुरु. वेडी वाकडी वळणे, वाहने हळू चालवा' अशी अक्षरे लिहिलेली पाटी दिसते. ती पाटी वाचताना एक प्रश्न नेहमी मला पडतो तो म्हणजे घाटातील वळणे वाकडी असू शकतात पण ती 'वेडी' कशीकाय असू शकतात?

अरे क्या बात है मनोज भाऊ.... तुम्ही तर आमच्या आजोळच्या गावाला गेलेलात.... तो रस्ता, तो घाट अहाहा, कितीवेळा त्यावरुन टूव्हिलर ने गेलो आलोय.
हॅट्स ऑफ टू यू, अन तुमच्या त्या केदारलाही, रात्रीतुन तुम्हाला उंब्रजला पोहोचवुन परतही आला.. Happy फोरव्हिलर ड्राईव्ह करताही स्टॅमिना लागतोच बर का. Happy
उंब्रज नंतर बारका फक्त उतारचा घाट लागला तो मल्हारपेठचा(?) घाट. घाट उतरल्यावर पुढील तिठ्ठ्यावरुन तुम्ही उजवीकडे वळलात, डावीकडे वळला असतात, तर तळबीडचा वसंतगड डाव्या हाताला ठेवुन कराडला पोहोचला असतात.
मधेच शक्य असते तर चाफळला जाता आले असते, पण मलाही नेमके ठिकाण ठाऊक नाहीये.
कुंभार्ली घाट अफलातुन आहे. इकडुन जाताना अ‍ॅक्च्युअल घाट खूप कमी आहे, पलिकडे उतरायलाच खूप आहे.
तरीही कोयनेपर्यंत पोहोचेस्तोवर तसा चढ आहेच, जाणवत नाही इतकेच.
तसा तो घाट उतरवायला अवघड आहे, अगदी महाबळेश्वरहुन कोकणात उतरणार्‍या आंबेनळी घाटाप्रमाणेच.
फोटोंमुळे मजा आली..
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

कित्येक वर्षांपूर्वी (१९७८-७९) थोरला भाऊ २४" सायकल घेऊन सातारहून चिपळूणास एकटाच गेला होता त्याची आठवण झाली. त्यावेळेस त्याला सोडायला सातारपासुन पुढे पाचसहा किमी गेलो होतो, तर तिथेच त्याचे चाक पंक्चर झाले, तर पंक्चर काढण्या ऐवजी, रस्त्यातच माझ्या सायकलचे मागचे चाक बदलुन त्याला दिले होते, व मी पायी पायी परत येऊन गोडोलीत पंक्चर काढल्याचे स्मरते.
तुमचा "हेवा" वाटतो.

चिपळुणला माझी मावशी रहाते ,त्यामुळे नेहमी जाणे येणे होत असते,कुंभार्ली घाटमाथ्याहून मी व मावसभाऊ बरेचदा मोटारसायकल बंद करुन थेट पायथ्यापर्यंत घाट उतरतो.परतीचा प्रवास वाचायला उत्सुक कारंण थेट १००० मीटरचा चढ आहे आलोर्या पासुन कोयनेपर्यंत ,बाकी फोटो झकास.पुढील भागाच्या प्रतिक्षेत व पुढीला राईडसाठी शुभेच्छा.