बहरून जात आहे (हादगा ६, समाप्ती)

Submitted by Arnika on 14 August, 2016 - 18:38

जवळपास आठ महिन्यांपूर्वी थायलंडच्या हत्तींच्या अभयारण्याबद्दल 'हादगा' नावाची मालिका लिहिली होती. त्या मालिकेचा शेवटचा भाग खूप महिने लांबला, तो शेवटी आज मायबोलीवर लावते आहे. आधीच्या भागांची लिंक सुद्धा इथेच देत्ये, म्हणजे गुलमोहराचं इतकं उत्खनन करायला नको!

http://www.maayboli.com/node/56604
http://www.maayboli.com/node/56618
http://www.maayboli.com/node/56642
http://www.maayboli.com/node/56669
http://www.maayboli.com/node/56783

थायलंडहून आल्यापासून सतत हत्तींच्या गोष्टी सांगणं, तिथले फोटो बघत बसणं चालू होतं. अजूनही आहे. गेल्या दहा महिन्यात नेचर पार्कात नव्याने सोडवून आणलेल्या दोन हत्तींची आणि एका म्हशीची भर पडली. जोकीयाची खास मैत्रीण, मे पर्म, वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी गेली. डॉक-राक नावाच्या नवीन पिल्लाचा जन्म झाला. नवानला चांगलेच सुळे फुटले. काही हत्तिणींची आपापसातली मैत्री घट्ट झाली आणि काहींनी पापड मोडून नवीन कळपात घर केलं. जन्म-मरणाचं सगळं चक्र तिकडे नेमाने फिरत असताना किंवा ते लांबून दररोज बघतानाही मला या ‘हादग्याचा’ लेखी शेवट करावासाच वाटत नव्हता. किंचित आळसामुळे, किंचित चालढकल केली म्हणून, पण ही गोष्ट लिहून ‘संपवावी’ असं वाटंत नव्हतं म्हणूनही.

रोज सकाळी दार उघडल्यावर डोळ्यासमोर इतकं अवाढव्य जनावर दिसतं याची सवय होताना, त्यांच्याशी ओळख होताना आणि त्यांच्या कलाकलाने वागायला शिकतानाच ते दोन आठवडे संपले. निघायच्या दिवशी झावळ्यांनी शाकारलेल्या एका तंबूत गर्दी करून आम्ही हत्तिणींची शेवटची अंघोळ बघितली. आमच्याकडे पाठ करून एक हत्तीण तिच्या पिल्लाबरोबर गेली आणि सावलीला उभी राहिली. पाण्यावरून म्हशी परत आल्या, कुत्रीही आब राखून आपपल्या कोपऱ्यात सावरून बसली. आमच्या भरलेल्या बॅगांसारखं सगळं जंगलसुद्धा आता आवरलेलं दिसायला लागलं. आम्ही दिशांना तोंडं करून चार बाजूंना उंच चढलेले डोंगर बघत तसेच थांबलो. बसमधे बसायला म्हणून वळलो तेव्हा आठही डोळे डबडबलेले होते...

एक जाडजूड अमेरिकन बाई निघताना जान-पेंग नावाच्या हत्तिणीला पायाशी मिठी मारून ओक्शाबोक्षी रडत होती. ती बाई आणि जान-पेंगचा पाय शेजारी शेजारी बघून मला “दोन ओंडक्यांची होते सागरात भेट” आठवलं ते उगाच नव्हे! जान-पेंगने असे कितीच विरह सहन केले असतील! ती पूर्ण विरक्तीच्या जवळपास असलेल्या समजूतदार साध्वीसारखी शांत उभी होती, आणि हिचं रडू थांबायचं नाव घेईना. जान-पेंगला तसेही फार वेळ पाश सहन होत नाहीत; तिने जरा पाय झटकल्यासारखं केलं आणि ही बाई एकदम दोन फुटावर जाऊन पडली.

वरच्या गॅलरीतल्या बायकांना हसू आवरेना! बघितलं तर त्यांनी “आनीका, यू गो?” असं म्हणून हात केला, आणि केळीच्या पानात बांधून चार फुलं हातात टाकली. आजुबाजूच्या गावातून या बायका पाहुणे मंडळींना मालिश करून द्यायला रोज दुपारी यायच्या. खाली जेवणाच्या मांडवावर एक माडी बांधलेली होती, तिथे त्या मालिश करून द्यायच्या आणि त्यातली एक, मिउ, रोज मला सागरवेणी घालून घ्यायला बोलवायची. फार इंग्लिश येत नव्हतं त्यांना, पण मुद्द्याचं कसं बरोब्बर बोलून जायच्या! एकदा मला बघून मिउ म्हणाली, “बूयिफुल इंडियन आइज़. बिग हेअर.” मला फार खूश व्हायची संधी मिळालीच नाही, कारण पुढच्या सेकंदाला तिने, “बट्‍ यूअर नोज़, थाइ नोज़” असंही ऐकवलं. माझ्या नकट्या नाकाबद्दल प्रत्येक देशात एकदातरी बोललं गेलंच पाहिजे असं जगाने ठरवलेलंच दिसतंय.

या बायकांची मुखत्यार चांगली गलेलठ्ठ होती. रोज माझ्याकडे बघत बसायची, आणि एक दिवस मला विचारलं, “यू मॅरी? माय् सन, गुड बॉय. ही कम् टुमॉरो.” बाप रे! थाइ स्थळ. इथे तसाही खाली मांडव होता, उद्या मुलगाही येणार होता म्हणे, शिवाय मालिश करून देणारी ढालगज सासू. मी घाबरून माझं लग्नं झालंय असं सांगून टाकलं.
“फोटो बघू बरं?” अरे? हे काय, नवरा दाखव नाहीतर लग्न कर?
म्हंटलं फोन बंद पडलाय. दुसऱ्या दिवशी मला गाठून पुन्हा तेच! कुठला फोटो तिला दाखवायचा ते मी पक्कं केलं (शेवटी कोणाचा दाखवला ही गोष्ट तिच्या-माझ्यातच असू देऊया) आणि माझा ‘नवरा’ तिच्या मुलापेक्षा उंच असल्याने तिने विषय आटोपता घेतला. ‘खाय’ नावाची अजून एक बाई तिच्या बागेतली फुलं आणून माझ्या सागरवेणीत घालायची. निघायच्या दिवशी तिने आठवणीने ती फुलं मला आणून दिली, आणि मला एकदम जाणवलं की इथल्या माणसांनी दोन आठवड्यात किती जीव लावलाय...त्यांचीही किती आठवण येणारे...

माझा माहुत मित्र छायरात बसपाशी आला. त्याने माझं सामान आत ठेवलं आणि आम्ही एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. जवळच्या गावातले काही शेतकरीही आले होते. दुपारच्या कामानंतर वेळ असला की आम्ही नदीत टायर टाकून प्रवाहाबरोबर तरंगत शेतावरून जंगलापर्यंत यायचो. पाणी उथळ असलं तरी जोर बऱ्यापैकी असायचा, आणि हव्या त्या काठाला थांबण्यासाठी हातपाय मारत टायर चालवायला लागायचा. चुकून इकडच्या-तिकडच्या काठाला टेकलो, तर हे शेतकरी भेटायचे. त्यांना एकदा विचारलं, “आमचं पार्क नदीतून कसं ओळखायचं? वाहता टायर थांबवायचा कुठे?”
तर त्यांनी फारसं मनावर न घेता “यू सी एलेफांत, यू स्टॉप.” एवढं म्हणून आम्हाला टायरसकट पुन्हा नदीत ढकलून दिलं. वाहत वाहत आम्ही कुठल्या हत्तीच्या वाटेत येणार नाही ना अशा भीतीने आम्ही जीव मुठीत धरून हातपाय मारत होतो आणि काठावरून यांची पोरंबाळं दात काढून हसत होती...शहरातल्या आडाणी माणसांना!

एक दिवस माझा टायर नदीत उलटला, आणि चपला कुठेतरी वाहत गेल्या. स्वस्तातल्या फालतू चपलांचा जोड तो; जाऊ दे गेला तर, म्हणून मी तेव्हा तशीच पोहत पुढे आले. मी पार्कातून निघताना एका शेतकऱ्याच्या मुलीने कागदात माझ्या दोन्ही चपला बांधून आणल्या होत्या. आज त्या जोडीइतक्या किमती दुसऱ्या कुठल्याच चपला माझ्याकडे नाहीयेत...

इथल्या प्राण्यांच्या डॉक्टरना भेटून यायचं म्हणून मी त्यांच्या दवाखान्यात चक्कर मारली. प्रत्येक हत्तीला झालेली इजा, त्यावरचं औषध, मात्रा, ती कुणाकरवी घ्यायला हत्ती राजी होतात, अशी सगळी माहिती तिथे एका बोर्डावर लिहिलेली होती. डॉक्टर नेहमी जंगलभर फिरत असायचे. आदल्या रात्री कमला आजारी होती म्हणून तिचं औषधपाणी करत ते जागले होते, आणि तिथूनच येत होते. “माझ्याआधी आसामचे डॉक्टर रिंकु गोहेन पार्काचं काम बघायचे. असंच पार्क आसामलाही सुरू करायचंय म्हणून त्यांचे प्रयत्न चालू आहेत. कधी जमलं तर बघ संपर्क होतोय का!” असं म्हणत डॉक्टर औषधाची बादली घेऊन गेलेसुद्धा!

दोन आठवडे आम्हाला सगळीकडे फिरवणाऱ्या म्होरक्याने इंजिन सुरू केल्यावर दहा कुत्री गाडीमागून धावत आली. यातलं काहीच उद्यापासून दिसणार नव्हतं. यातलं कोणीच इतक्यात भेटणार नव्हतं. इतकं दमवणारं काम उद्यापासून असणार नव्हतं आणि अशी सपाटून भूकही लागणार नव्हती. खिडकीतून वाकून डोळ्यात मावणारं सगळं पार्क पुन्हा एकदा बघून घेतलं... साडेअकराच्या ठोक्याला मांडलेली जेवणाची पानं, सरपणासाठी गोळा केलेली लाकडं, गवताचे भारे, कामगारांचे हाकारे-पुकारे, कुदळ-फावडं ठेवायची शेड, आमच्या रहायच्या खोल्या, त्यामागचे उंच पीलखाने, मोकळ्या फिरणाऱ्या म्हशी, टनाने शिजवलेला भात, चुलीमागे दिसणारी नागमोडी नदी...किती आणि काय!

इतक्या वर्षांचा स्वतःचा हट्ट पुरवायला मिळायला होता. मला फक्त हत्ती बघायचे होते, पण परत येताना माझ्या गाठीला त्याहूनही किती पट गोष्टी होत्या! माणसांचे कळावेत तसे हत्तींचे स्वभाव कळायला लागले होते. त्यांच्यासाठी आयुष्य वाहिलेल्या दोन माणसांना आणि त्यांच्या मावळ्यांना तसूभर का होईना, मदत करता आली होती. एका हत्तीला सांभाळणं पैशाने, कष्टाने आणि चिकाटीनेही किती जोखमीचं काम आहे ते शिकायला मिळालं होतं. जिच्याबद्दल फक्त पेपरात वाचून वेडी झाले असते अशा लेक ला भेटून तिच्याशी मनसोक्त गप्पा मारायला मिळाल्या होत्या. कदाचित पुन्हा कधीच भेटणार नाहीत अशा जगभरातल्या माणसांशी एकत्र अनुभवलेल्या त्या दोन आठवड्यांमुळे घट्ट मैत्री झाली होती.

या सगळ्याच्या सोबतीला लहानपणी कधीतरी हत्तीला सर्कशीत पाहिल्याचा, हत्तीच्या पाठीवरून फेरी मारून आल्याचा अपराधीपणाही खूप वाटत होता. पण प्राण्याचं प्राणीपण दुरून बघणं, ते जपणं, त्यांच्या आसपास त्यांनी राखलेली आब सांभाळून वावरणं या सगळ्याचं महत्त्व त्यांच्या पाठीवर बसून फेरी मारण्यापेक्षा, त्यांची चित्र असलेले कपडे घालण्यापेक्षा आणि त्यांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढण्यापेक्षा कितीतरी जास्त आहे हे खूप जणांपर्यंत पोचवायला बोटं शिवशिवत होती... एक अस्वस्थ समाधान वाटत होतं!

लेक चा नवरा आला. वेळात वेळ काढून तो त्याच्या दोन-पायी कळपालाही कडकडून भेटला! लेक एका झाडाखाली बसली होती. तिचं काय करावं समजेना... मिठी मारू, की नमस्कार करू? नुसती जाऊन हात करून येऊ की हाक मारून बोलू? आणि बोलले तरी सांगू काय? दरवर्षी हजारो लोक तिच्याकडे येऊन असेच भारावून आणि वेडावून जात असतात. इतक्याच भरल्या डोळ्यांनी नेचर पार्क सोडून हिरव्या जगातून पुन्हा राखाडी जगात जात असतात. त्या प्रत्येकासाठी इथला रोजचा दिवस अद्भुत असला तरी गेली वीस वर्ष नेचर पार्कांतला प्रत्येक चांगला-वाईट क्षण, प्रत्येक सुंदर किंवा सामान्य घटना तिच्यासाठी श्वासाइतकी नित्याची असताना माझ्याकडे तिला सांगण्यासारखंही वेगळं काही उरलं नव्हतं. निरोप घ्यायला तिच्यापर्यंत गेले आणि नुसती हसून गेल्या पावली परत वळले.

"परवा पाहिलं तुला हिंदीत काहीतरी लिहिताना, पण ते हिंदी नव्हतं म्हणालीस ना? नवऱ्याने सांगितलं मला. मला वाटलंच तू भारतातली आहेस." झाडाखालून तिचा आवाज आला, आणि मी वाटेत थांबले.
"हो हो!"
"मी जाते बरेचदा... तिथे चांगलं काम चालू आहे; मी बघून येते अधूनमधून”
“अच्छा! भारतात कुठे?” मला बोलायला सुचतच नव्हतं!
“सगळीकडे. भाषांचा अडथळा असतो जरा... तुला आवडेल कधीतरी माझ्या मदतीला यायला?”

जोरजोरात मान हलवत मी माझा पत्ता आणि फोन लिहून दिला. पुढचे खूप महिने आठवणींमध्ये जाणार होतेच, पण आता स्वप्न रंगवण्यातही! हादग्याचा पूर्णविराम अचानक अर्धविराम झाला होता...

------- समाप्त -------

http://www.elephantnaturepark.org/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मान गए उस्ताद _/\_
इतक्या कालावधीनंतर लेख येऊनसुद्धा तो उघडावासा वाटत नव्हता, शेवटचा म्हणून.
तरी उघडला. अपेक्षेप्रमाणं जे काय व्हायचं ते झालं.
आता आम्हालाही तुझे हे सगेसोयरे दीर्घकाळ आठवत राहतील.

सुरेख मालिकेची सुंदर सांगता! पण ह्या लेखातून असं जाणवलं की ही तुझ्यासाठी तर फक्त सुरुवात आहे.. काय माहित उद्या लेक ची सहकारी म्हणून भारतात येशील आणि मग आम्हाला आणखी एक सुंदर मालिका वाचायला मिळेल! तसंही हादगा दरवर्षी येतो Happy

धन्यवाद मायबोली ☺
हो मला तरी कुठेतरी वाटतंय की पुन्हा या सगळ्यांशी संबंध येणारे या ना त्या मार्गाने. ही मालिका जगायला, आणि पर्यायाने ती लिहायला खूप मजा आली!

आता आम्हालाही तुझे हे सगेसोयरे दीर्घकाळ आठवत राहतील>> +१
खूप सुंदर झाली लेखमालिका.

नितांतसुंदर लेखमालिका!
खूप आवडली.

पण ह्या लेखातून असं जाणवलं की ही तुझ्यासाठी तर फक्त सुरुवात आहे.. काय माहित उद्या लेक ची सहकारी म्हणून भारतात येशील आणि मग आम्हाला आणखी एक सुंदर मालिका वाचायला मिळेल! तसंही हादगा दरवर्षी येतो +१

नितांत सुंदर अनुभव आणी अत्यंत लाघवी लिखाण. आवड्ले. लेकसारख्या असंख्य निसर्गप्रेमींना साष्टांग नमस्कार. _/\_

नितांत सुंदर अनुभव आणी अत्यंत लाघवी लिखाण. आवड्ले. लेकसारख्या असंख्य निसर्गप्रेमींना साष्टांग नमस्कार. _/\_ >>>>>>> + 1111111

पुन्हा एकदा मनापासून आभार इतक्या प्रेमाने वाचणाऱ्या सगळ्यांचे Happy
तुम्हाला कोणाला तेव्हाचे फोटो बघायचे असतील तर ही लिंक: https://m.facebook.com/ArnikaP/albums/10153250868275927/

सुंदर झाली लेखमालिका.

तुझ्या लिखाणाचं कौतुक करायला शब्द नाहीत. असेच नवनवीन अनुभव घेत रहा आणि इकडे लिहून आमच्यापर्यंत पोचवत रहा. तुला भरपूर शुभेच्छा! Happy

सुरेख लिहिले आहेत सगळेच भाग.

तुझ्या लिखाणाचं कौतुक करायला शब्द नाहीत. असेच नवनवीन अनुभव घेत रहा आणि इकडे लिहून आमच्यापर्यंत पोचवत रहा. तुला भरपूर शुभेच्छा >>>>> +१.

नजरेतून सुटलच होतं हे.
प्रभाव्शाली झालेत सगळेच भाग.

--- सुरेख मालिकेची सुंदर सांगता! पण ह्या लेखातून असं जाणवलं की ही तुझ्यासाठी तर फक्त सुरुवात आहे.. काय माहित उद्या लेक ची सहकारी म्हणून भारतात येशील आणि मग आम्हाला आणखी एक सुंदर मालिका वाचायला मिळेल! तसंही हादगा दरवर्षी येतो --- +१११

पहिल्या लेखापासूनच्या प्रतिक्रिया बघत होते मी आज. इतक्या महिन्यांनी लिहिलं तरीही आवर्जून शेवटपर्यंत वाचून कळवणाऱ्या सगळ्यांचे अगणित आभार! खूप गोड वाटतं इथे लिहिताना...

हादग्यात नेहमी हत्तीच केंद्रस्थानी असतो पण हादगा खेळणार्‍यांचे सारे लक्ष खिरापतींकडे लागलेले असते. खर्‍याखुर्‍या हत्तींना केंद्रस्थानी ठेऊन केलेला हा तुमचा हादगा खूप आवडला.