२००८ सालची सुरुवात होती, मी तेव्हा BAMS च्या अंतिम वर्षाला होतो. मराठवाड्यातील लातूरला आयुर्वेद व्यासपीठने कसल्यातरी परिसंवादाचे आयोजन केले होते. अंतिम वर्ष असल्याने व संपूर्ण BAMS मध्ये अश्या निमित्ताने कधीही जाणे झाले नसल्यामुळे परिसंवादाला जाण्याची खूप उत्सुकता होती. नागपूर ते लातूर सुमारे १०-११ तासांचे अंतर आहे आणि मात्र त्या वेळी कोणतीही थेट ट्रेन नसल्याने (आता १-२ तरी जातात) बसचा चार दिवसांचा पास काढून आदल्या दिवशीच तिकडे पोहोचुया असा विचार मनाशी ठरवून प्रवासाला सुरुवात केली. प्रवास उत्तम झाला आणि हाती बराच वेळ असल्याने ऐन वेळी लातूर ऐवजी पंढरपूरला जावून परिसंवादाआधी परतावे असे ठरले. शिवाय बसच्या पासवर चार दिवसांत महाराष्ट्रात कुठेही प्रवास करण्याची मुभा असल्याने वेळेचा सदुपयोगच होणार होता. पण वाटेत, एका मित्राने सुचवल्याप्रमाणे सोलापूरला उतरुन आणि त्याच्या एका मित्राला भेटून मग पंढरपूरला निघालो. ह्यामुळे रात्री तेथून लातूरला येण्यास थेट बस पकडून परत येता होणार होते.
मात्र, ह्या धावपळीत पंढरपूरला पोहोचायला जरा उशीरच झाला. रात्रीचे ८-९ तरी वाजलेले होते. शिवाय विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे म्हणजे सगळे आवरून जाणे भागच होते. घरून निघाल्यापासून प्रवासामुळे आंघोळही करता आली नव्हती आणि प्रवासाचा शिणवा जाणवत होताच. मग सर्वांनी चंद्रभागेच्या शीतल व स्वच्छ पाण्यात आंघोळ केली. यात्रा नसल्याने नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. तसेच रात्रीची वेळ असल्याने नीरव शांतता होती. सगळ उरकून आणि बॅगा घेवून देवळाकडे प्रस्थान केले. विठ्ठल दर्शनासाठी रांगेत बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते असे ऐकून असल्याने मनात जरा धाकधूकच होती. तेवढ्यातच आम्ही देवळापुढे पोहोचलो देखील. समान बरेच असल्याने आणि आजूबाजूची सगळी दुकाने बंद होत असल्याने आमच्या पैकी एका मित्राला बॅगा व चपला राखत बाहेरच थांबायला आणि आम्ही सगळे दर्शन घेवून आल्यावर त्याला आत जायला सांगितले. पण मग, एका दुकानदाराने आम्हाला मदत करायची तयारी दर्शवून, आमचे सर्व समान स्वतःकडे ठेवून घेतले आणि आम्हाला रांगेत उभे रहायला सांगीतले.
ह्या गडबडीत १०-१०.३० कधी वाजले काहीच कळले नाही. खरं तर रांगेत लागायची वेळ संपलीच होती आणि रांगेत उभे राहणे तर भागच होते. नाहीतर दुसरया दिवशी सकाळी ६ वाजता रांगेत लागावे लागले. शिवाय, हे सगळे आटोपून लातूरला परत जायचे होते. त्यात पहारेकरी आत जाऊच देत नव्हते, आता मात्र सगळ्यांचाच हिरमोड झाला होता. कशीबशी विनंती केल्यानंतर शेवटी पहारेकर्यांनी रांगेत उभे राहू दिले आणि मुख्य प्रवेशद्वार बंद केले. माझ्यामागे कुणीही नसल्याने रांगेत मी शेवटचा होतो. फारशी गर्दी नसल्याने रांग भराभर सरकत होती, तथापि मी प्रवासाचा शिण घालवायला क्षणभरासाठी डोळे मिटले आणि ह्या दरम्यान मी विठ्ठलाच्या मूर्तीसमोर कधी येवून ठेपलो ते कळलेच नाही. अचानक माझ्या खांद्यावर कुणीतरी थाप मारल्याचा भास झाला आणि मी डोळे उघडले. बघतो तर काय, माझ्यासमोर होती ती फक्त विठूरायाची काळीभोर मूर्ती! मग क्षणभरासाठी मला सगळ्या जगाचा विसरच पडला. ज्याच्या दर्शनासाठी जीवाचा जो आटापिटा केला होता त्याला यश आले होते. माझी खरं तर पंढरपूरला ही पहिलीच भेट होती पण सगळ्या जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले. एरवी मूर्तीसमोर अर्धा मिनिटही थांबण्याची मुभा नसते, मला मात्र विठूरायापुढे १०-१२ मिनिटे राहण्याची संधी मिळाली. कदाचित कोणतीही इच्छा मनात न ठेवता केवळ निरिक्त भावनेने दर्शन गेलो असल्याने विठ्ठलाने अगदी भरभरून दर्शन दिले. त्यानंतर गेल्या ७-८ वर्षांत पंढरपूरला जाणे झाले नाही आणि असा प्रसंग परत कधी येणार माहीत नाही पण विठूरायाशी झालेली भेट सदैव आठवणीत असेल.
छान आठवण...
छान आठवण...
माझाही पंढरपूरचा अनुभव असाच
माझाही पंढरपूरचा अनुभव असाच अनोखा होता. तिथे मूर्तीसमोरून लगेच पुढे जावे लागते असे ऐकून होतो, मी तसाच पुढे सरकलो तर तिथल्या पुजार्यानेच मला सांगितले कि विठ्ठलाला भेटायचेय तूम्हाला.. त्याच्या पायावर डोके ठेवा... मलाही मनसोक्त दर्शन झाले !
+ १ माझी ही अनुभव असाच आहे.
+ १ माझी ही अनुभव असाच आहे. गर्दीमुळे पांडूरंगाच्या मुर्तीसमोरून लगेचच पुढे जायला सांगतात. त्यामुळे मी फक्त हात जोडून काही सेकंद दर्शन घेऊन पुढे जाउ लागले. पण पुजा-यांनी - इतक्या लांबून आलात पायावर डोके ठेवून दर्शन घ्या असे सांगितले - आणि मला खूप भरून आले.