एक होते कारतुस......एका योद्धयाची गाथा

Submitted by सोन्याबापू on 5 August, 2016 - 01:38

"कारतुस" साहेबांची गाथा
स्वतःच्या अपंगत्वावर मात करत आयुष्यात हुकुमी एक्के होणारी माणसे मला तुफान आवडतात, कारण त्यांच्यात ठासून भरलेले असते एक रसायन, त्याचे नाव म्हणजे "फायटिंग स्पिरिट", स्टीफन हॉकिंग ते ऑस्कर पिस्टोरीअस, ते अनाम असे भारतीय पॅराऑलिम्पिक खेळाडू, हे योद्धे चहूबाजूला दिसतात, पण आज आपण एका वेगळ्याच क्षेत्रात चमकलेल्या हिऱ्याची गाथा पाहणार आहोत, क्षेत्रही साधेसुधे नाही, तर भयानक जास्त शारीरिक कष्ट ही गरज असलेले, म्हणजेच आपले थलसैन्य उर्फ इंडियन आर्मी. समजा जर तुम्हाला म्हणले की एक पाय नसलेला माणूस आर्मी मध्ये होता अन मोठ्या हुद्यावर होता तर आपली प्रतिक्रिया काय असेल? साहजिक रित्या प्रथम विचार हाच येईल की हा अधिकारी फायटिंग फोर्स किंवा स्ट्राईक कोरला नसून आर्मी सर्विस कोर किंवा ईएमइ (इंजिनीरिंग कोर) ला असेल, पण नाही आपला कथा नायक नुसता फायटिंग कोर मध्ये अधिकारीच नव्हता, तर चक्क पायदळ उर्फ इनफंट्रीच्या एका ब्रिगेडचा कमांडर होता, अस्सल मराठमोळ्या अन कमालीचे फायटिंग स्पिरिट असलेल्या ह्या मुंबईकर अधिकाऱ्याचे नाव म्हणजे मेजर जनरल (RETD) इयान कॉर्डोझ,AVSM,SM.
आजपासून 45 वर्षे अगोदर, तेव्हा एक तरुण धडधाकट मेजर असलेले कॉर्डोझ साहेब, वेलिंग्टन तामिळनाडू मध्ये डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजला पोस्टेड होते, त्याचवेळी त्यांची प्यारी 4/5 गोरखा बटालियन बांगलादेश युद्ध लढत होती, बटालियनचा 2IC (सेकंड इन कमांड) हुतात्मा झाला होता, अन एक दिवस तरण्याबांड इयानला बटालियन ने साद घातली, गडबडीत दिल्लीला जाताना त्यांना आपल्या परिवाराला (पत्नी अन तीन मुलगे) घरी सोडायची खास परवानगी मिळाली होती, ह्यातला एक मुलगा पुढे आर्मी मधेच कमीशंड झाला होता अन त्याच्या लग्नाच्या अगोदर तो कारगिल/सियाचीन मध्ये आहे हे सांगताना इयान सरांचे डोळे खासे लकाकत असत. तर, 3 डिसेंबर 1971ला इयान सर दिल्लीला पोचताच त्यांना पूर्वोत्तर आघाडीला कूच करायचे आदेश मिळाले, पण नेमका तेव्हा दिल्लीत ब्लॅकआऊट होता, कुठलेही विमान उडू शकत नव्हते, उडलेच असते तर ते सहज आसामच्या बाजूला टार्गेट झाले असते. धावत पळत इयान सर रेल्वे स्टेशनला पोचले अन अक्षरशः चेनपुलिंग करून कसेबसे रेल्वेत चढले, वाटेत त्यांना त्यांच्यासमोरील चॅलेंजची कल्पना तेव्हा आली जेव्हा त्यांनी फ्रंटहुन परतणारी हॉस्पिटल ट्रेन पाहिली. पहाटे 3ला इयान सरांनी आपल्या बटालियनसोबत लिंकअप केले, एकदाचे मेजर साहेब आपल्या लाडक्या जॉनी (गोरखा) लोकांत पोचले होते, तेव्हाच त्यांना सांगितले गेले की त्यांना दुपारी 1430ला ऑपेशनवर जायचे आहे, भारतीय सैन्य आपल्या इतिहासात प्रथमच एक हेलीबॉर्न ऑपेशन करणार होती, सहसा असे ऑपेशन करायला ऐरफोर्स अन आर्मीची अधिकारी मंडळी तासंतास वेळ घालवून छोट्यात छोटे डिटेल्स ठरवत असतात पण ही वेळ निकडीची होती, टास्क कठीण होता, एका बटालियन ने दुसऱ्या बटालियनला काबीज करायचे होते, हीच ती सुप्रसिद्ध अतग्रामची लढाई होय, रात्रभर माजलेल्या रणकंदना नंतर अतग्राम आपल्या बहाद्दर जॉनीज ने काबीज केले, अन सकाळी परत बेसला येताच त्यांना नवी ऑर्डर मिळाली, गाझीपुरला जायची, बटालियनच्या सीओ ने त्याचा मुद्दा मांडला की त्याचे जवान थकलेले आहेत, पण त्यांना कळले की तिथे आधी 2 बटालियन फेल गेल्यात अन आता 4/5 गोरखालाच ते काम फत्ते करावे लागणार आहे, कारण प्लॅन चेंज झाला होता, आता भारताने थेट ढाका पर्यंत मुसंडी मारायचा चंग बांधला होता. गाझीपुरकडे टेहळणी उर्फ रेकी करायला गेलेल्या हेलिकॉप्टरला विशेष विरोध झाला नाही अन मुक्तीबाहिनीनुसार तिकडे फक्त 300-400 रझाकार मात्र होते. अश्यातच जेव्हा आपल्या जवानांची मोव्हमेंट सुरु झाली तेव्हा मात्र पलीकडून आगीचा भडीमार सुरु झाला , नंतर कळले की पाकिस्तानी आर्मी ने मुक्तीबाहिनीला फसवले होते, तिथे रझाकार सोडा, बटालियन सोडा, पाक आर्मीची अख्खी ब्रिगेड होती, आता लढा विषम होता, 480 लोकांची आधीच थकलेली गोरखा बटालियन विरुद्ध आराम खाऊन तयार असलेली पाकिस्तानी ब्रिगेड,पण पाकिस्तानी ब्रिगेडला तरी कुठे कल्पना होती की भारतीय हेलिकॉप्टर्स मधून अर्धीमुर्धी 480 लोकांची गोरखा बटालियन उतरली आहे रेजिमेंट नाही ;). त्याकाळी बीबीसी कडे खूप कार्यक्षम असे युद्ध वार्ताहर असत अन आकाशवाणी सोबत ते सुद्धा युद्ध कव्हर करत असत, साहजिक पाकिस्तानी जनरल्स आकाशवाणीवर तर विश्वास ठेवणार नव्हते, त्यामुळे पाकिस्तानकडे काय मानसिकता असेल हे लक्षात घ्यायला आपले लोक सुद्धा लक्ष देऊन बीबीसी ऐकत असत. अश्यातच बीबीसी न बातमी दिली की गाझीपुरकडे एक पूर्ण गोरखा रेजिमेंट उतरली आहे Lol . इकडे हेलिकॉप्टर मधून उतरलेले कॉर्डोझ साहेब बघूनच त्यांची भोळी गोरखा पोरे जल्लोष करू लागली होती, प्रत्येकाच्या मुखी एकच वाक्य, "कारतुस साहिब आ गये है, अब हमको कोई डर नही है" Happy
आता 5व्या गोरखा समोर एक बिलंदर प्लॅन होता, तो म्हणजे आपली अर्धी बटालियन एक ब्रिगेड म्हणून प्रेसेंट करणे, पहिल्याच दिवशी आपल्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून एक किमी बाय दीड किमीचा एक पट्टा हस्तगत केला होता, आता त्याच पट्ट्यात 480 लोक अश्या खुबीने पसरले गेले की ती पूर्ण फळी एका ब्रिगेडची वाटावी, त्याच दिवशी रात्री एक पाकिस्तानी पॅट्रोल पार्टी ambush करून गोरखा जवानांनी त्यांना अक्षरशः नुसत्या खुकुरीनेच सद्गती नजर केली. पण ह्याच्यामुळे एक नुकसान झाले,ते म्हणजे पाकिस्तानी बाजू इरेला पेटली, अन काय होईल ते पाहू म्हणून त्यांनी आपली एक पुरी नफरी बटालियन (जवळपास 750 माणसे) थेट आपल्या विरळ फळीच्या मधोमध घुसवली, त्याकाळी सेक्रेसी maintain करायला भारतीय आर्मी रेडिओवरील संभाषण अस्खलित तामिळ भाषेत करत असे, तेव्हा 5व्या गोरखाच्या सीओ ने आपली उरलेली माणसे (480) एकत्र गोळा केली अन काय होईल ते होवो म्हणून थेट पाकिस्तानी फॉर्मशनच्या उरावर घातली, एकच हलकल्लोळ उडाला अन नंतर शांतता प्रास्थापित झाली, दोन दिवस अशीच लठ्ठालठ्ठी चालली, अन 15 डिसेंबरला फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ ह्यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला, "शरण या नाहीतर धुळीत मिळवू" त्याच्या दुसऱ्या दिवशी जवळपास 1500 पाकिस्तानी जवान शरणागती पत्कारायला 5व्या गोरखाकडे आले. आता गोरखाचा सीओ पेचात पडला, शरणागती घ्यावी अन ह्यांना कळले की आपण फक्त अर्धी बटालियन आहोत तर बिलामत यायची, म्हणून त्याने शरणागती पत्कारायला साफ नकार दिला अन सांगितले की आम्हाला शरणागती घ्यायच्या ऑर्डर्स नाहीत, पण पाकिस्तानी आर्मीचं मानसिक खच्चीकरण इतके झाले होते की ते शरणागती घेण्यावर अडून होते, शेवटी 5 गोरखाच्या सीओ त्यांना "उद्या या सोय करून ठेवतो" म्हणून बोळवण केली त्यांची, इकडे रेडिओ वर खबर गेली (अर्थातच तामिळ मध्ये) की लगेच एक ब्रिगेड कमांडर पाठवा शरणागती घ्यायला, दुसऱ्या दिवशी 5व्या गोरखाकडे एक ब्रिगेड कमांडर लगेच धाडण्यात आले, त्यांना अन 5व्या च्या सीओला वाटत होते की 1500 च्या आसपास जवान असतील, पण त्यांच्या विस्मयला पुरून उरतील अश्या 2 पाकिस्तानी ब्रिगेड म्हणजेच
तीन ब्रिगेडियर, एक कर्नल, 107 अधिकारी, 219 जेसीओ, and 7,000 जवान, अशी सणसणीत शरणागती आली होती. अन हे सगळे करणारे 480 जवान अर्धपोटी, खायला प्रत्येकी 2 मुठी शंकरपाळी, पायाला धड बूट नाहीत, झोपायला फक्त एक ताडपत्रीची बरसाती, इतका ऐवज असणारी होती. ह्या शरणगातीच्या वेळचा एक किस्सा खूप जबरी आहे, शरणागती घेऊन 7000 जवान अन अधिकाऱ्यांची सोय लावल्यावर इयान सरांनी एका पाकिस्तानी जेसीओला पाचारण केले, त्यांनी त्याला विचारले
"साहेब, आपके स्टोअर्स मे कंबल है क्या? अगर है तो हमारे जवानों मे बटवा देना, मै आपको रसीद दे दूंगा"
"सर आप बिना कंबल के आ गये?"
"जनाब हम सोने नही आपको बरबाद करने आये थे"
हे तो पाकिस्तानी जेसीओ पचवत असतानाच सर पुढे म्हणाले
"अगर कंबल बच जाते है तो हमारे अफसरो को भी दे देना"
"अफसर लोग भी बिना कंबल के?"
"अब अगर जवानों के पास कंबल नही है तो अफसरो के पास कैसे हो सकते है जनाब?"
हैराण झालेला तो पाकी जेसीओ इयान सरांना कडक सॅल्यूट करून म्हणाला
"आपके जैसे कुछ अफसर हमारे होते तो ये दिन ना देखना पडता हमे"
शरणागती पुढे सुरु होती तेव्हा बीएसएफच्या एका कमांडरचा शरणागतीत मदत करायला म्हणून मॅसेज आला, त्याला उत्तर द्यायला निघाले असता ती वेळ आली अन अनावधानाने इयानसरांनी एका भूसुरुंगावर पाय दिला, त्या स्फोटात त्यांचा पाय दुरुस्ती पलीकडे जायबंदी झाला, त्यांच्या सोबत असलेल्या मुक्तीबाहिनीच्या कार्यकर्त्याने त्यांना लगबगीने परत बटालियन हेडक्वार्टरला परत आणले, तिथे डॉक्टर ने त्यांना मॉर्फिन नसल्याची माहिती दिली तसे त्यांनी एका गोरखा जवानाला आपला पोटरीपासून खालचा पाय कापून टाकायला सांगितले, भोळ्या अन प्रेमळ अश्या त्या गोरखा जवानाने साहजिकच त्याला नकार दिला, तेव्हा त्यांनी स्वतःच स्वतःच्या खुकुरीने तो पाय छाटून टाकला अन तो मोडका पाय दूर कुठेतरी नेऊन पुरायला सांगितला. त्यांना पहायला आलेल्या बटालियनच्या सीओ ने त्यांना शरणागतीत आलेल्या मंडळीत एक पाकिस्तानी सर्जन असून त्याच्याकडून इलाज करवून घ्यायला सुचवले असता इयान सरांनी त्यास खासा नकार दिलाच. शेवटी सीओला त्यांनी 2 विनंत्या केल्या
1 काहीही झाले तरी मला पाकिस्तानी रक्त द्यायचे नाही
2 ऑपेशन होताना खुद्द सीओ तिथे हजर असावेत (टॉर्चरची शक्यता टाळायला)
हे सगळे मान्य झाले अन शेवटी पाकिस्तानी सर्जन मेजर मोहम्मद बशीर ह्यांनी मेजर साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली, ह्या सर्जरी नंतर आपल्याला मेजर बशीर ह्यांना थँक्स म्हणायचा चान्सच मिळाला नाही ह्याची सल मात्र इयान सरांना जाणवत असे.
पाय गमवल्यावर आता इयान सर अजून एका युद्धाकरता सज्ज झाले, ते युद्ध होते व्यवस्थे विरुद्ध, एक पाय नसलेला अधिकारी "पायदळात" कसा चालणार? त्यामुळे साहिजकच मेजर इयान कॉर्डोझ ह्यांना वॉर्ड ऑफ करायचे जवळपास नक्की झाले होते, पण शिपाईगिरी सोडून इतरकाही स्वप्नातही न पाहिलेल्या मेजर साहेबांना ते कसे रुचावे? त्यांनी पूर्ण रीहॅब घेऊनही परत वार्षिक तंदुरुस्ती चाचणीला हजेरी लावलीच, चाचणी घेणार अधिकारी त्यांना नकार देऊन म्हणाला की जर तुम्ही जबरदस्ती टेस्ट दिलीत तर मी एमपीज ना बोलवून तुम्हाला अटक करेल सर, तेव्हा मेजर साहेब उत्तरले "अटक गुन्हा केल्यावरच करणार ना?" त्या टेस्ट मध्ये कृत्रिम पाय लावलेले मेजर इयान कॉर्डोझ नुसते पासच झाले नाहीत तर धडधाकट अश्या 7 इतर अधिकाऱ्यांना पछाडून आले, पुढे आर्मी हेडक्वार्टरचे खेटे घालणे सुरु झाले, ह्यांची मागणी एकच, मला माझ्या बटालियनची कमांड द्या,शेवटी प्रकरण पोचले व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ समोर, ते म्हणाले "कॉर्डोझ मी जरा कामाने जम्मूला जातोय, चला माझ्या सोबत" जम्मूला व्हाईसचीफ ज्या हेलिपॅडवरून परतणार होते तिथवर इयानसर डोंगर तुडवून अगदी वेळेत पोचले!, परत वरात दिल्लीला आली, आता थेट चीफ ऑफ आर्मी स्टाफ टी एन रैना साहेबांसमोर, त्यांनीही म्हणले "कॉर्डोझ जरा कामाने लद्दाखला जातोय, चला माझ्या सोबत" मग काय? परत एकदा लद्दाख मध्ये मजेत धावणे चालणे चढणे झाले, ह्यावेळी मात्र परत आल्याबरोबर चीफ ऑफ आर्मी स्टाफ ने थेट एक आदेश काढला,
"मेजर कॉर्डोझ अन त्यांच्या सारखे आपल्या जखमांच्यामागे न लपणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना सन्मानाने काम अन कमांड द्या"
पुढे चालून चक्क 2 पाय गमावलेले लेफ्टनंट जनरल ओबेरॉय व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पर्यंत पोचले होते, पुढे ब्रिगेड कमांडर पद भूषवून मेजर जनरल इयान कॉर्डोझ सन्मानाने रिटायर झाले , सध्या बहुदा इयान सर अन मिसेस प्रिसिला इयान हे दिल्लीत स्थाईक असून सध्या त्यांची तीनही मुले आर्मी मध्ये आहेत, निवृत्त जीवनात मे. ज. (री) इयान कॉर्डोझ, एव्हीएसएम, एसएम सध्या दिल्लीतच एका युद्धात जखमी झालेल्या फौजी लोकांसाठी काम करणाऱ्या "वॉर वुनडेड फौंडेशन ऑफ इंडिया" नामक गैर सरकारी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात.

download (1)

(व्रुद्ध असला तरी सिंह सिंहच असतो नाही का ?)

images (29)

(पत्नी मिसेस प्रिसिला इयान ह्यांच्यासह इयान सर)

images (30)

(तरणाबांड मेजर रुपात इयान सर)

2016-08-05_10-17-25

(तुम्ही शिपायाला सैन्यातुन निवृत्त करु शकालही पण सैन्याला शिपायातुन निवृत्त करणे निव्वळ अश्क्य असते)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन्याबापू,

काय अप्रतिम लेख आहे..वाचताना ईयान साहेबांचे अस्सल, खंबीर व्यक्तिमत्व समोर आले.
धन्यवाद हा लेख इथे उपलब्ध करुन दिल्या बद्दल.
सॅल्युट !!

- प्रसन्न

भारतीय जवानांच्या अश्या विजुगिषी वृत्तीमुळेच तर भारतीय सेना संपुर्ण जगात एक सर्वोत्तम सेना मानली जाते. सलाम त्या सर्व जवानांना.

इयान सरांची ओळख करून दिल्याबद्दल सोन्याबापु तुमचे धन्यवाद!
सॅल्युट !!!

"आपके जैसे कुछ अफसर हमारे होते तो ये दिन ना देखना पडता हमे" >> ज्जे ब्बात.

ईयान साहेबांना,लेफ्टनंट जनरल ओबेरॉय साहेबांना एक कडक सल्युट.

मस्त लेख बापु. ते फोटोचं जमवाचं.

अतिशय सुंदर लेख. असल्या व्यक्तीमत्त्वांबद्दल नुस्तं वाचून देखील मनामध्ये अभिमान दाटून येतो.

सोन्याबापू, तुम्हाला आणि तुमच्यासारख्या प्रत्येक सैनिकाला धन्यवाद!!

ईयान साहेबांना आणि लेफ्टनंट जनरल ओबेरॉय साहेबांना एक कडक सल्युट _/\_

सोन्याबापू, तुम्हाला आणि तुमच्यासारख्या प्रत्येक सैनिकाला धन्यवाद!!

सुंदर लेख..

लेखातलं <<<< साहेब, आपके स्टोअर्स मे कंबल है क्या? अगर है तो हमारे जवानों मे बटवा देना, मै आपको रसीद दे दूंगा"
"सर आप बिना कंबल के आ गये?"
"जनाब हम सोने नही आपको बरबाद करने आये थे"
हे तो पाकिस्तानी जेसीओ पचवत असतानाच सर पुढे म्हणाले
"अगर कंबल बच जाते है तो हमारे अफसरो को भी दे देना"
"अफसर लोग भी बिना कंबल के?"
"अब अगर जवानों के पास कंबल नही है तो अफसरो के पास कैसे हो सकते है जनाब?"
हैराण झालेला तो पाकी जेसीओ इयान सरांना कडक सॅल्यूट करून म्हणाला
"आपके जैसे कुछ अफसर हमारे होते तो ये दिन ना देखना पडता हमे>>> हा परिच्छेद खूप आवडला.

फार सुंदर सोन्याबापू. ब्रिगेड - बटालियन चं गणित सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केला मी. कारण लढा विषम होता हे पोहोचल्यावर, त्याच्या मॅग्निट्यूड ने फरक पडत नव्हता. तुम्ही जे ओघवतं वर्णन केलय, त्याला तोड नाही.

बापूसाहेब, लेख छान असतात तुमचे, आवर्जून वाचतो.
कार्डोज साहेब, तुम्ही आणि तुमच्या सारखे अनेक आहेत म्हणून आम्ही आहोत.
अजून काही लिहायची गरज नाही.

सुंदर परिचय!!!
इयान सरांना कडक सॅल्यूट!!!
तुमच्याकडून अश्याच अजून येऊ द्या वीरांच्या समरकथा!!!

ईयान साहेबांना आणि लेफ्टनंट जनरल ओबेरॉय साहेबांना एक कडक सल्युट _/\_

2 पाकिस्तानी ब्रिगेड म्हणजेच
तीन ब्रिगेडियर, एक कर्नल, 107 अधिकारी, 219 जेसीओ, and 7,000 जवान, अशी सणसणीत शरणागती आली होती. अन हे सगळे करणारे 480 जवान अर्धपोटी, खायला प्रत्येकी 2 मुठी शंकरपाळी, पायाला धड बूट नाहीत, झोपायला फक्त एक ताडपत्रीची बरसाती, इतका ऐवज असणारी होती>>> _/\_

म्हणूनच अश्यांना रीअल हिरो म्हणतात. स्वताच्या दुखदर्द वैयक्तिक अडचणींवर मात करून देशवासीयांसाठी देशाच्या सेवेस तत्पर.. सॅल्यूट !!

लिखते रहो बापू..

Pages