तुम्हाला नक्की काय वाचायला आवडतं?
हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का? माझ्या मते नसेलच विचारला. कारण मी सुध्दा कधी असा प्रश्न स्वतःला विचारला नाही. आपल्या आवडीनिवडी नेहमी दुसरीच माणसं आपल्याला विचारत असतात. खरं आहे ना?
अगदी लहान पणा पासुन म्हणजे जेव्हा आपण बाराखडी शिकत होतो तेव्हा पासुनच आपलं एक नातं शब्दांशी जोडलं गेलं आहे. काय लपलेलं असतं ह्या शब्दांमधे ? विचार, ज्ञान, गोष्टी, कविता असं बरंच काही… पण काही गोष्टी नुसत्या गोष्टी नसतात. मग त्या खोट्या असो वा खऱ्या. त्यात लपलेल्या असतात भावना. ज्या आपल्याला त्या शब्दात असलेल्या भावाशी जोडत असतात.
असे म्हणतात कि, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. प्रत्येक माणसाचे विचार वेगळे, वागणं वेगळं, स्वभावही वेगळा. पण भावना…त्या तर सगळ्यां मध्ये सारख्याच असतात ना. कदाचित हेच ते एक मुळ कारण आहे. जे आपल्याला माणुस म्हणून एकमेकांशी जोडते. भावना ही अनेक प्रकारच्या असतात.
राग, द्वेष, मत्सर, प्रेम, लोभ वैगरे वैगरे. ह्या सर्व प्रकारच्या भावना सर्वांमधेच आहेत. मग आता मला एक सांगा. कागदावर लिहिलेल्या आणि शब्दांद्वारे प्रकट झालेल्या भावना तुम्हाला कधी भावल्या आहेत का?
कारण मला एक प्रश्न नेहमी पडतो. जादु त्या शब्दांची कि त्या भावनेची? लेखक लिहितो पण वाचनारे आपण असतो. त्या लेखकाची लेखनी त्याचे विचार शब्दात नोंदवत असते. त्यात त्याला जे काही सांगायचे असते त्या सर्व कल्पना तो शब्दात उतरवत असतो. ते वाचल्यावर त्याने मांडलेल्या विश्वात आपण सामिल होतो पण फक्त प्रेक्षक म्हणुन. ह्या कथा कधी खऱ्या घटनेच्या असतात तर कधी काल्पनिक. पण वाचता क्षणी आपण त्या लेखकाच्या जगात वावरत असतो. त्याने टाकलेले भाव, मनोरे, नजारे, व्यक्ती इत्यादी अनेक गोष्टी आपण मेंदुच्या एका कोपऱ्यात अनुभवत असतो. हे कनेक्शनच वेगळ्या प्रकारचे आहे.
कथा कादंबरीतल्या गोष्टी जास्त करुन काल्पनिक असतात. याचा अर्थ असा कि खरं तर ते सर्व खोटं लिहलेलं असतं. त्यात लेखकाने लिहलेली प्रत्येक गोष्ट एक भलं मोठं असत्य असतं. पण शब्द आपल्यावर असा काही जादु करतात कि आपण वाचत वाचत त्या कल्पनेच्या जगात शिरतो आणि लेखकाने लिहलेली खोटी गोष्ट घडताना पाहु लागतो. अस्सल कमाल तर लेखकाची असते कारण गोष्ट लिहताना तो खोट्या कल्पना खऱ्या शब्दात लिहुन भावना ही त्यात ओतत असतो. अन त्याच भावना आपल्याला त्या काल्पनिक जगाशी जोडायला कारणीभुत असतात. आता ज्या लेखकाला हे जमलं त्याने आपल काम साध्य केलं…म्हणजे त्याचं लिहलेलं धडधडीत असत्य आपल्याला पटलं.
पण आपण कधी विचार केलाय का ह्या सर्व गोष्टींचा…..केला असेल तर…
तुम्हाला नक्की काय वाचायला आवडतं ???