‘टर्नर क्लासिक मूवीज (टीसीएम)’ ने भरभरुन आनंद दिला

Submitted by रवींद्र दत्तात्... on 28 July, 2016 - 10:42

त्या मंतरलेल्या रात्री होत्या...

काय सांगता राव...!

हो, त्या मंतरलेल्या रात्री होत्या.

कारण रात्रभर समोर हालीवुडचा भूतकाळ आपल्या शाही लवाजम्यासह घरातील ड्राइंगरूम मधे थाटामाटात अवतरित होत असे. चित्रपट देखील कसे...

तर गेल्या शतकातील हालीवुडच्या सुवर्णकाळातील सर्वश्रेष्ठ श्वेत/श्याम चित्रपट.

कलाकार कोणते...तर क्लार्क गेबल, हंफ्री बोगार्ट, एरॉल फ्लिन, फ्रेड एस्टेअर, जूडी गारलैंड, जीन केली, बेटी डेविस, स्पेंसर ट्रेसी, फ्रैंक सिनात्रा, ग्रेटा गार्बो, कैथरीन हेपबर्न, जोन क्राफोर्ड, राबर्ट टेलर, फ्रैंक मोर्गन, वालेस बेरी, मिकी रुनी...किती नावे सांगू...!

वर्ष 2001 सालच्या जुलै महिन्याचा पहिला दिवस होता रविवार. त्या दिवशी रात्री कामावरून परतलो, तेव्हां पहाटेचे 4 वाजून गेले होते. घरी आल्यावर सवयीप्रमाणे रिमोट घेऊन ‘टीसीएम’ लावला...समोर स्क्रीन वर कार्टून नेटवर्क सुरू होता...त्यावर कार्टून्स येत होते...अन् डोक्यांत लक्ख प्रकाश पडला...अरे...! टीसीएम वाहिनी तर ऑफ एयर झाली, त्याऐवजी कार्टून नेटवर्क चोवीस तास सतत प्रसारित होऊं लागलंय. मी पार नर्वस झालो. इतर कुठल्याच चैनल वर मन रमेना. शेवटी स्टार गोल्ड वर चाललेल्या ‘मुनीमजी’ मधे रमायचा प्रयत्न केला. पण छे...समोर देव आनंद-नलिनी जयवंत होते, तरी मन कुठेतरी दूर भरकटत होतं. रिमोट वरील बोटे फिरून-फिरून टीसीएम चा शोध घेत होती. एकाच दिवसापूर्वी (30 जून 2001 ला) पहाटे घरी परतलो, तर ‘मिसेस मिनीवर’ सुरू होता. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्व भूमीवर आधारित या चित्रपटांत वाल्टर पिजन आणि ग्रीर गारसन ही जोडी होती. हाच टीसीएम चा शेवटचा चित्रपट होता.

‘टीसीएम’ म्हणजेच टर्नर क्लासिक मूवी. पूर्वी हीच टीएनटी वाहिनी होती. या वाहिनीवर पहाटे पाच ते रात्री नौ पर्यंत कार्टून नेटवर्क आणि रात्री नौ ते पहाटे पाच वाजे पर्यंत हालीवुडचे क्लासिक चित्रपट दाखविले जायचे. एक जुलै-2001 पासून टीसीएम वाहिनी आफ एयर झाली, याचा कुठेच उल्लेख नव्हता...तिच्याशी जणूं कुणालाच काही कर्तव्य नव्हतं...

खरंय...‘चढ़ते सूरज को सारी दुनिया सलाम करती है...!’

पण, टीसीएम वर हालीवुडचा भूतकाळ आपल्या शाही लवाजम्यासह थाटात वावरायचा.

चित्रपटांबद्दल माझ्या मनांत लहानपणापासूनच आकर्षण होतं. कारण माझे वडील देखील चित्रपटांचे चाहते होते. हिंदी चित्रपट सृष्टिच्या सुवर्णकाळातले बरेचसे चित्रपट मी त्यांच्या सोबतच बघितले. पुढे वाढत्या वयाबरोबर चित्रपट विषयक लेखन शोधून वाचायचा छंद जडला. आईचं माहेर नागपूरचं असल्यामुळे लहानपणी वर्षातून नागपूरचा एक चक्कर तरी व्हायचाच. असाच एकदा नागपूरला मुक्काम असतांना मामे भाऊ (मिलिंद पात्रीकर) चित्रपट बघायला घेऊन गेला. धरमपेठहून साइकलीवर आम्ही डबल सीट निघालो, ते थेट लिबर्टी टाकीज पुढे थांबलो. समोरच्या पोस्टर वर चार्ली चैपलिन ग्लोब नाचवीत होता. चित्रपट होता-‘दि ग्रेट डिक्टेटर.’ हे मला अनपेक्षित होतं. मी हिंदी मीडियम वाला असल्यामुळे चित्रपटांतील इंग्रजी पार डोक्यावरून गेलं, पण चार्ली चैपलिनच्या अभिनयाने मनांत घर केलं ते कायमचं, त्या अभिनयाला शब्दांची गरजच नव्हती. (मी बघितलेला हा पहिला इंग्रजी चित्रपट). पुढे ‘कोनॉन: दि डिस्ट्रायर’, ‘1941’ व ‘मूनरेकर’ मुळे इंग्रजी चित्रपटांची गोडी लागली.

1989 साली मी मराठीचा नियमित वाचक झालो. त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टी सोबतच हालीवुडचा देखील माझा परिचय झाला. मी मराठी नियमित वाचायला सुरवात केली ती महाराष्ट्र टाइम्स पासून. या काळात बेटी डेविस, इनग्रिड बर्गमेन, ग्रेटा गार्बो, आड्री हेपबर्न, चार्ली चैपलिन, ल्यूसी बॉल, सर जेम्स स्टुअर्ट, सर लारेंस आलिव्हिए सारखे हालीवुडचे नामवंत नट काळाच्या पडद्याआड गेले. या कलाकारांवरील अग्रलेख आणि इतर मान्यवरांचे लेख वाचून मी हालीवुडच्या प्रेमात पडलो. 1988-89 साली हे सगळं वाचतांना मनांत विचार यायचा कि या कलाकारांचे चित्रपट कधी तरी बघायला मिळतील कां...!

म्हणूनच 1998 साली जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात छोट्या पडद्यावरील ‘टीएनटी’ वाहिनीवर रोनाल्ड कोलमन-ग्रीर गारसन चा ‘रेंडम हार्वेस्ट’ व ‘दि प्रिजनर आफ झेंडा’, तसेच फ्रेड एस्टेअर चा ‘ब्राडवे मेलोडी आफ 1940’ व ‘दि बैंड वैगन’ बघतांना माझी झोप पार उडाली. एका आठवड्यातच लक्षात आलं की ‘टीएनटी’ वाहिनी चा भर प्रामुख्याने श्वेत/श्याम चित्रपटांवरच आहे व ते सगळे चित्रपट 1930 ते 1970 च्या दरम्यान चे आहेत...मी या वाहिनीचा भक्तच बनलो. मुख्य म्हणजे माझ्या या छंदपूर्तीच्या मार्गात माझी नोकरी देखील नकळत सहायक ठरली. कायम रात्रपाळी असल्यामुळे रात्री अडीच-तीन वाजतां, सगळं जग ढाराढूर झोपलेलं असतांना, घरी परतल्यावर देखील एक चित्रपट सहज बघतां येई. तसंच रोज पहाटे-पहाटे झोपायची सवय झाल्यामुळे साप्ताहिक सुटीच्या दिवशी (म्हणजेच शुक्रवारी) देखील दोन-तीन चित्रपट सलग बघणं जड जात नसे.

अशा प्रमाणे 1998 ते 2001 या कालखंडा दरम्यान ‘टीएनटी/ टीसीएम’ या वाहिनी ने मला पुरेपूर आनंद दिला. स्पेंसर ट्रेसी चा कैमरया समोर सहज वावर होता. ‘फादर आफ दि ब्राइड’ मधील त्याची स्वगते व अभिनय बहारदार होता. त्याचे ‘बूम टाऊन’ (1940) ‘केस टिंबरलेन’(1947), ‘वूमन आफ दी इयर’ (1942), ‘डा. जेकाल एंड मिस्टर हाईड’ (1941), ‘नार्थ वेस्ट पैसेज’ (1940), ‘कैप्टन्स करेजियस’ (1937), एकापेक्षा एक सरस चित्रपट होते.

मिकी रूनी बाल कलाकार असलेले ‘एंडी हार्डी’ सीरिज चे चित्रपट तर निखळ, स्वस्थ मनोरंजन करणारे होते. जूडी गारलैंड, लाना टर्नर सोबत असलेेले मिकी रूनी चे म्युझिकल्स तर या बाल कलाकारांच्या निरागस अभिनयाचा सुंदर आविष्कारच होते.

क्लार्क गेबल राजबिंडा होता. कुठल्याहि भूमिकेत तो चपखल बसायचा. एरॉल फ्लिन ची एक्शन, त्याची तलवारबाजी वाखाण्याजागी होती. पोषाखी चित्रपटांमधे तो शोभून दिसायचा. 1937 सालचा ‘दि प्रिंस एंड दी पायपर’, 1940 सालचा ‘दि सी हॉक’, 1949 सालचा ‘दि एडवेंचर्स ऑफ डान जुआन’ त्याच्या उत्कृष्ट अभिनयाची जणूं पावतीच होते.

हडकुळा, गंभीर आवाज असलेला हंफ्री बोगार्ट, ऊंचपुरा गैरी कूपर, पॉल हेनरिड, जार्ज ब्रेनेट, पॉल लुकास, राबर्ट टेलर, राबर्ट यंग...या सर्वांचीच अभिनयाची आपली स्वतंत्र शैली होती, तिथे नक्कल करण्याचा प्रश्नच नव्हता?

मला एक मार्गदर्शक आणखी लाभला-‘दि टेलिग्राफ’. कोलकाताहून येणारया या इंग्रजी वर्तमान पत्रांत छोट्या पडद्यावरील इतर माहिती सोबतच ‘एडिटर्स च्वाइस’ मधे त्या दिवशीच्या प्रमुख चित्रपटांबद्दल माहिती दिलेली असे. बरेचदा ही माहिती वाचून तो चित्रपट बघण्याची इच्छा होत असे.

1951 सालचा जीन केली चा ‘एन अमरीकन इन पेरिस’ बघतांना (पहाटे तीन-साडे तीन वाजतां) जाणवत होतं की यातील शेवटचं स्वप्न दृश्य खूपच लांबलेलं आहे. टेलिग्राफ वाचून कळलं की ‘ते’ शेवटचं बैले नृत्य सलग 17 मिनिटांचं असून त्याची नायिका लेस्ली कैरॉन चा हा पहिलाच चित्रपट होता.

फ्रेड एस्टेअर-जेन पावेल चा 1951 सालचा चित्रपट होता-’रायल वेडिंग’. या चित्रपटामुळे प्रिंस फिलिप व राणी एलिझाबेथच्या लग्नानिमित्त झालेल्या परेडचं, त्याकाळच्या लंडनचं दर्शन घडलं.

हालीवुडचे जुने चित्रपट बघतांना सर्वात मोठा अडथळा होता तो कलाकारांच्या नावाचा. माझ्यापुरता तो टेलीग्राफमुळे अगदी गळून पडला. शनिवार ते गुरुवार, सलग सहा दिवस दाखवल्या जाणारया चित्रपटांची यादी, त्यातील प्रमुख कलाकारांसोबत मला उपलब्ध असल्यामुळेच चित्रपट बघतांना एक आपुलकी निर्माण व्हायची, म्हणूनच या चित्रपटांचा आस्वाद मला घेतां आला.

हालीवुडच्या ऐतिहासिक चित्रपटांचा थाट देखील निराळाच. 1951 सालचा राबर्ट टेेलर-डेब्रोह केर चा ‘क्यो वेडिस’, राबर्ट टेलर-एलिझाबेथ टेलर चा ‘आईवेन्हो’, चार्लटन हेस्टनचा ‘बेन-हर’, 1933 सालचा ग्रेटा गार्बोचा ‘क्वीन क्रिस्टीना’, मेक्सिकन वीर पंचो विला च्या जीवनावर आधारित व वालेस बेरी ने साकारलेला ‘विवा विला’, हावर्ड कील-आयशर विलियम्स अभिनीत ‘जुपिटर्स डार्लिंग’ एकापेक्षा एक सरस चित्रपट होते.

आयशर विलियम्स स्वीमिंग चैंपियन होती. ‘जुपिटर्स डार्लिंग’ जरी ऐतिहासिक चित्रपट होता, तरी त्यांत विलियम्सच्या गुणांचा पुरेपूर उपयोग करण्यांत आला होता. विलियम्स साक्षात जलपरीच होती. या चित्रपटांतील स्वप्न दृश्य आणि नायिकेचा पाठलाग...ही दोन्हीं दृश्ये अंडरवाटर फोटोग्राफी चा उत्कृष्ट नमूना होती. लाना टर्नर-रोजर मूर चा ‘डियाने’ असाच एक ऐतिहासिक चित्रपट होता. 1956 सालच्या या चित्रपटांत रोजर मूर (जेम्स बांड) अगदीच नवखा गडी होता.

या शिवाय फ्रैंक मोर्गन, वालेस बेरी, लायनाल बेरीमोर, सर डोनाल्ड क्रिस्प...हे चरित्र नायकाच्या पठडीतले कलाकार. पैकी फ्रैंक मोर्गनचा ‘दि ह्यूमन कामेडी’, वालेस बेरीचा 1935 सालचा ‘वेस्ट पाइंट आफ दी इयर’ व 1931 सालचा ‘दि चैम्प’ (यात बेरी सोबत जैकी कूपर होता), लायनाल बेरीमोरचा ‘डा. फिडलर गोज होम’ व 1936 सालचा ‘दि डेव्हिल डॉल’ सारखे चित्रपट आठवणीत कायम घर करुन आहेत. ‘दि डेव्हिल डॉल’ मधे ट्रिक फोटोग्राफीचा बेमालूमपणे सुंदर वापर करण्यांत आला होता. या चित्रपटात सहा इंची बाहुल्या चोरी करतात, मुडदे पाडतात...हे सगळं 1936 सालचा निकष लावून बघणं गमतीशीर होतं.

1930 ते 1970 च्या दरम्यान विख्यात साहित्य कृतींवर निघालेले हालीवुडचे बरेचसे चित्रपट या वाहिनीमुळे बघतां आले. त्यांत शेक्सपियरचा ‘रोमियो एंड जूलियट’, जूलियस सीझर, अलेक्झेंडर ड्यूमाच्या कृतीवरील ‘दि थ्री मस्केटियर्स’ (जीन केली-लाना टर्नर), आरएल स्टीवेंसन च्या कादंबरीवरील ‘डाॅ. जेकॉल एंड मिस्टर हाइड’ (स्पेंसर ट्रेसी-इनग्रिड बर्गमेन-लाना टर्नर), चार्ल्स डिकिन्सच्या प्रख्यात कृतीवरील ‘ए टेल आफ टू सिटीज’ (रोनाल्ड कोलमन), सामरसेट मॉमच्या कहाणीवरील ‘दि लैटर’ (बेटी डेविस), जनरल लॉ वैलेसच्या ‘टेल आफ दि ख्राइस्ट’ वरील ‘बेन-हर’ (चार्लटन हेस्टन), लिलियन होलमनच्या पुस्तका वरील ‘वाच इट ऑन दि राइन’ (बेटी डेविस), मार्क ट्वेनच्या कृतीवरील ‘दि प्रिंस एंड दि पायपर’ (एरॉल फ्लिन), एलेन ग्लासगोच्या पुलित्झर पुरस्कार प्राप्त कृतीवरील ‘इन दिस अवर लाइफ’ (बेटी डेविस), एच.जी. वेल्स ची ‘टाइम मशीन’ (राड टेलर), अगाथा क्रिस्टी च्या पुस्तकावरील ‘मर्डर शी सेड’ सारखे चित्रपट प्रमुख होते.

याशिवाय इतर चित्रपट असे देखील होते, ज्यांना व्यावसायिक दृष्टया जरी यश मिळालं नसलं तरी ते बघण्या सारखे होते. वर उल्लेखिलेले चित्रपट अविस्मरणीय आहेत. इंग्रजी चित्रपट मुळातच लहान. (दीड-दोन तासांत आटोपणारे.) म्हणून असेल कदाचित, पण त्या चित्रपटांमधे उगाच ओढून ताणून समेवर येण्याची धड़पड़ दिसत नसे. बहुतेक चित्रपटांमधे (म्युझिकल्सचा अपवाद वगळतां) गाणी नाही, म्हणून उगाच धांगडधिंगा नाही... स्वस्थ, निखळ मनोरंजन हाच त्यांचा उद्देश्य. (म्हणूनच मला रात्रीच्या शांततेत या चित्रपटांचा आस्वाद घेतां आला.)

भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातले बरेचसे चित्रपट आज घरातील छोट्या पडद्यावरील निरनिराळ्या चैनल्सवर उपलब्ध आहेत. पण हालीवुडच्या सुवर्ण काळातले, गेल्या शतकाच्या पूर्वार्धाचे चित्रपट छोट्या पडद्यावर क्वचितच बघायला मिळतात. स्टार मूवी, एचबीओ, जीएमजीएम, एएसएन या वाहिन्यांवर जुने चित्रपट कधी-कधी दाखवले जातात, पण टीसीएम वाहिनी पूर्णपणे हालीवुडचे जुने चित्रपटच दाखवत असे. असं म्हणतात की कुठला हि चित्रपट तत्कालीन समाज मनाचा आरसा असतो. त्या दृष्टीने हे चित्रपट खूपच मूल्यवान होते...पण 30 जून-2001 रोजी टीसीएम वाहिनी (टर्नर क्लासिक मूवी) ऑफ एयर झाली व नव्या शतकाच्या पहिल्या सहा महिन्यांतच चित्रपट रसिकांना गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ चित्रपटांशी जोडणारा हा धागा कायमचा तुटला.

एकाच कलाकाराचे सलग चार चित्रपट...

चोवीस तास चित्रपट दाखविणारया कुठल्याहि वाहिनीवर (मग ती हिंदी असो की इंग्रजी) एकाच कलाकाराचे सलग दोन पेक्षा जास्त चित्रपट कधीच दाखवले गेले नाही. ही किमया ‘टीसीएम’ वाहिनी ने केली. वर्ष 2000 साली प्रत्येक महिन्याचा ‘स्टार आफ दि मंथ’ निराळा होता. त्या स्टार चे चित्रपट त्या महिन्याचा दर शुक्रवारी रात्रभर दाखवले जायचे. एका रात्रभरात 4 चित्रपट, म्हणजे महिन्यात 16 चित्रपट. कलाकार कुठले तर हंफ्री बोगार्ट (मे), एलिझाबेथ टेलर (जून), ग्रेटा गार्बो (जुलै), जीन केली (आॅगस्ट), बेटी डेविस (सप्टेंबर), जेम्स कगोनी (आॅक्टोबर), क्लार्क गेबल (नोव्हेंबर), लाना टर्नर (डिसेंबर), तसंच 2001 साली रोनाल्ड रीगन (जानेवारी), डोरिस डे (फेब्रुवारी), मार्च महिना ऑस्करचा असतो. म्हणून असेल कदाचित या महिन्यांत रोज रात्री 9 वाजता आस्कर विजेता एक चित्रपट, एप्रिल मधे आइडा ल्युपिनो, मे मधे जेम्स स्टुअर्ट व जून मधे जून एलायसन सारखे एकापेक्षा एक मातब्बर कलाकारांचे चित्रपट दाखवले गेेले. तिचे चित्रपट जास्त होते म्हणून असेल कदाचित, पण ज्या महिन्यांत बेटी डेविस ‘स्टार आफ दि मंथ’ होती, त्या महिन्यांत दर मंगळवार व शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस तिचेच चित्रपट दाखवले गेले. या शिवाय रोज दाखविले जाणारे इतर चित्रपट होतेच की. या शिवाय या वाहिनीवर डाक्यूमेंट्री सुद्धा देखण्या होत्या. एमजीएम (मेट्रो गोल्डविन मेयर) ची यशोगाथा सांगणारी ‘वेन दि लायन रोर्स’ अप्रतिम अशीच होती. या वाहिनीचा भर प्रामुख्याने एमजीएम (मेट्रो गोल्डविन मेयर) च्या चित्रपटांवरच होता, पण यावर वार्नर बदर्स सोबतच इतर चित्रपट देखील उपलब्ध होते.
--------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिसीएम नवर्‍याची आवडती वाहिनी. कारण सगळे वेस्टर्न सिनेमे यावर लागायचे, बाकी तर होतेच. छान लिहीलत. नवीन माहिती पण मिळाली.

नक्की...

Wow! माझा सर्वात आवडता channel. एकेकाळी मी फक्त हाच channel पाहायचो. आता तेव्हढा पाहात नाही. Hollywood का ग्रेट मानल जायचे, ते इथले चित्रपट पाहिल्यावर पक्के समजले.

Robert Osborne हा कलाकार, लेखक आणि चित्रपटविषयक इतिहासकार कधी कधी थोडी background देऊन चित्रपट दाखवायचा. आणि संपल्यानंतर बघितलेल्या सीनमधले बारकावे किवा माहिती सांगण्याचा. ते तर सर्वात भारी होते. अल्फ्रेड हिचकाॅक, billy wilder, Elia Kazan अशा अनेक दिग्गज सेलिब्रिटीच्या तो मुलाखती घ्यायचा. It was Feast. Oscar Month म्हणजे पंचपक्वान्नांचा buffet असल्याचा. त्या प्रत्येक सिनेमावर Robert Osborne ची टिप्पणी what else you want!! सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व जुने चित्रपट, clippings उत्तम quality मध्ये जतन करून ठेवल आहे.

TCM मुळे माहिती नसलेले पण अत्यंत Classic movies बघायला मिळाले. Some of them are...blue angle (1930), wuthering heights (1936), Lilies of the Field (1963), A street car named desire (1951), the story of Louis Pastuer (1936), the good earth (1937), the Defiant once (1958), Boomerang (1947), Witness for the Prosecution (1947), अगदी अलिकडचा Taxi Driver (1976) तसेच बरीचशे jack lemon, sidney poiter यांचे सिनेमा. हे सर्व बघताना वाटण्याचे आपल्याकडे नवीन दिग्दर्शकांची पिढी येई पर्यंत कसले बाळबोध सिनेमे बनवले. Hollywood चे सिनेमे कॉपी पण नीट करत नव्हते.

हे सर्व लिहावेसे वाटले कारण TCM. त्याने माझं चित्रपट बघण्याची दृष्टी बदलली. आजही कधी वाटले तर तो channel on करून काही चांगले आहे का बघतो. My Most Favorite Channel.

*** भरकटले आहे. त्यामुळे sorry.

James Stewart चा "Harvey" बघितला आहे का कुणी. जरूर बघा.