आज सकाळपासूनच वाड्यात एक जीवघेणी शांतता पसरली होती. खरंतर आज वाड्यात सरसकट सगळे हजर होते. निमूटपणे आवराआवर चालू होती. जरूरीपुरत्या एखाद दोन शब्दांची देवाणघेवाण होत होती. भराभर हालचाली चालू होत्या पण त्यात कुठेही उत्साहाचा लवलेश नव्हता की नेहमीसारखी गडबड नव्हती. वाड्यातले बिर्हाडकरु आपापल्या सामानाची बांधाबांध करत होते. घशात येणारे आवंढे घशातच मिटवून टाकताना तसं जड जात होतं. परवाच सगळ्यांनी मिळून चांदण्या रात्री अंगणात केलेल्या सहभोजनाचा प्रसंग डोळ्यांपुढून हलत नव्हता. ते हास्याचे फवारे वाड्याच्या भिंतींवरुन प्रतिध्वनींसारखे कानात घुमत होते.
पुण्यातल्या कसबा पेठेतला हा पेशवेकालीन वाडा. वाड्याचे दरवाजे वाड्यापेक्षाही भरभक्कम. पितळी कड्या असलेले, नक्षीसाठी वेगवेगळी नाणी ठोकलेले. वाडा अगदी चौसोपी वगैरे नाही, तरी बाहेर ओसरी, मग आत येणारा एक अरुंद अंधारा बोळ, त्यानंतर फरशांचे तुकडे टाकून तयार केलेलं चौकोनी अंगण, अंगणात डाव्या हाताला कपडे-भांडी धुवायला सार्वजनिक छोटीशी मोरी , पुढे चार पायर्या चढून गेलं की दोन्ही हातांना असलेल्या बिर्हाडकरुंच्या दोन दोन खोल्या, उजवीकडे वळून पुन्हा एक उभट असा रुंद पण उंच पायर्यांचा जिना चढून गेलं की डाव्या हाताला मालकांचं घर, त्या शेजारी व वरच्या मजल्यावर अजून दोन चार बिर्हाडकरु .. मालकांच्या घराच्या मागच्या बाजूने एक जिना मागच्या परसात उतरायचा जिथं चाफा, पेरु सदाफुली, झेंडू ,मोगरा, रातराणी अशी झाडे... असा तो वाडा गेली कित्येक वर्ष जसाच्या तसा होता. दादांचा हा वडिलोपार्जित वाडा. वडिल लहानपणीच वारल्याने वाडा हाच एकुलत्या एका दादांचे वडिल आणि वाडा हाच सवंगडी. त्यामुळे वाड्यात कुठेकाही तोडमोड झाली की दादा हातातलं काम टाकून त्याची दुरुस्ती करत .माईंनी त्यात छान फुलांची झाडे लावून सुशोभित केलेला. सतत माईचा हात तिथल्या कोपर्याकोपर्यातून फिरल्याने आणि प्रत्येक डागडुजीकडे दादांच्या बारकाईने लक्ष देण्याने अगदी लखलखीत आणि दिमाखदार दिसायचा. मालक-मालकीणबाई ज्यांना सगळे दादा-माई म्हणायचे त्यांचं नवीन लग्न झालं तेव्हा या वाड्यात चिटपाखरु नव्हतं. दादा कामावर गेले की माईला एवढ्या मोठ्या वाड्यात एकटीला भीती वाटायची म्हणून मग तिने ओळखीतून, देवळात जाता येता चौकशी करुन हे चार पाच भाडेकरु मिळवले तेव्हा कुठे वाडा गजबजला.
मग हळूहळू वाड्याला घरपण येऊ लागलं. सणवार, लग्नकार्य, बाळंतपणं, दुखणीखुपणी, पूर भूकंप सगळं सार्यांनी वाड्यासोबतच आपलं मानलं. मालक - भाडेकरु असा भेद दादा माईनीही कधी केला नाही अन त्यांच्या शब्दाबाहेर वाड्यातलेही कुणी कधी गेले नाहीत. न मागता भाड्याचे पैसे दादांच्या हाती देऊन टाकल्याशिवाय महिना सुरु होत नव्हता आणि एकदा तरी अंगणात सहभोजन केल्याशिवाय महिना संपत नव्हता.सकाळी उठल्यावर नळाचं पाणी जायच्या आत अंगणात धुणं भांड्यासाठी उडालेली गडबड, मग चहा नाष्ता करुन पुरुष मंडळी कामकाजाला निघून गेली की मुलांना शाळेत सोडवायची तयारी... बारा नंतर वाड्याला थोडी उसंत मिळायची.. मग सार्याजणी मिळून दारावर आलेल्या फळ-भाजीवाल्याशी घासाघीस कर, कुठं एकमेकींकडून नवीन पदार्थ बनवायला शिक, नाहीतर भरतकामातला अमूक टाका कसा घालायचा ते सांग.. जेवणं झाली की ओसरीवर गप्पांना रंग चढायचे.. कुल्फीवाल्याकडून कुल्फी घेताना खुसूखुसू हसू फुटायचे.. संध्याकाळी वाड्यातल्या सगळ्या मुलांनी दादांबरोबर शुभंकरोति आणि पाढे म्हणायचा आता नियमच झाला होता. मग माई सगळ्यांच्या हातावर खडीसाखरेच एकेक खडा ठेवायची.. घरात स्वयंपाक आणि मुलांचा अभ्यास होईतोवर अंगणातल्या बाजेवर राजकारण, शिक्षणपद्धती, नोकरदारी असल्या सदैव ज्वलंत विषयांवर अक्षरशः रणकंदन व्हायचे.. मग दादांनी काही मिष्किल कोटी केली की हास्याची कारंजी वाड्याला चिंब करुन जायची. ब्राम्हणाच्या वाड्यात मांसाहार चालणार नाही ही माईची अट आजतागायत मोडली गेली नाही.प्रत्येक समस्येचं उत्तर माई दादांकडे आहे अशी सार्यांची समजूत माई दादांनीही कधी खोटी ठरवली नाही. नोकरीतले तणाव असो, वा आंतरजातीय प्रेमविवाह प्रत्येक वेळेस माई दादांपैकी कुणीतरी एक तरी पाठीशी खंबीरपणे उभं असायचं. वाडा म्हणजे एक कुटुंबच झाला होता. हळूहळू पसारा वाढत गेला. दादांच्या थोरल्या लेकानं वाड्याची डागडुजी केली. शेणानं सारवलेली जमीन जाऊन फरशा आल्या.. घराघरात कॉर्पोरेशनचे नळ आणले.. प्रत्येकाला स्वतंत्र विजेचे मीटर बसवून दिले.. दादांच्या या लेकाने आणि सुनेने माई दादांचं नाव राखलं असंच सगळेजण कौतुक करत. लेकी सासरी गेल्या, सुना नांदायला आल्या.. नातवंडं खेळू लागली..वाड्याची वीण घट्टच होत राहिली.. पण माणसं वाढत गेली तशी जागा अपुरी पडू लागली. नव्या जोडप्यांना स्वतंत्र, प्रशस्त घरांची स्वप्ने खुणावत होती. काही जण दुसरीकडे राहायल गेले सुध्दा.. पण मुळं इथंच ठेवून! आठवड्यातून एकदा तरी वाड्यात चक्कर मारल्याशिवाय चैन पडायचं नाही.
पण मागच्या.वर्षी जेव्हा लेकाने तो विषय काढला तेव्हा माई दादांच्या पायाखालची जमीनच सरकली. आज दादा माई दोघं ऐंशीच्या घरात गेली होती. आपल्या वैवाहिक जीवनाची उणीपुरी
साठ वर्ष माईंच्या डोळ्यापुढून झर्रकन सरकत गेली. खरंच? इतकी वर्ष झाली ?? अगदी काल परवा घडल्यासारखं आठवतंय सारं.. लग्न झाल्यावर वाड्याच्या त्या शिसवी दारात माप ओलांडून आत येणारी नऊवारी शालू आणि दागिन्यांनी दबून गेलेली जेमतेम सतरा वर्षांची मी..आम्हा दोघांना ओवाळताना सासूबाईंच्या डोळ्यांत न मावणारा आनंद.. मग ते नव्या नवलाईचे दिवस.. दादांनी मिष्कीलपणाने काढलेल्या खोड्या वाड्याच्या कोपर्याकोपर्यातून अजूनही खुणावतायत.. खुदकन हसवतायत.. सासूबाईंचं जाणं..थोरल्याचा जन्म.. त्याचं दादांच्या हट्टापायी वाड्यातच केलेलं बारसं.. सबंध वाडा फुलांनी नटला होता.. धाकटीच्या लग्नात तर...असेच कितीक दिवाळ्या, सणसोहळे...
"माई, अगं ऐकतीयेस ना?" लेकानं हलवलं. "अं.." माईंनी दादांकडे पाहिलं.. सहा फूट उंचीचे तालमीत जाऊन शरीर कमावलेले दादा आज पहिल्यांदाच माईला खचल्यासारखे दिसले. अगदी सासूबाई गेल्या तेव्हाही किती खंबीर राहिले होते..आणि आज त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलसर वाटतायत का? का आपल्याच डोळ्यात उभं राहिलेल्या पाण्यानं असं दिसतंय? "माई!" लेकाने एकदम खांदे धरल्याने डोळ्यातून मोत्यांची लड खळकन ओघळली. पाहते तो लेकाच्याही डोळ्यात पाणी उभं. आपलाच लेक तो.. त्यालाही वाटणारच की ..मग का सांगतोय हा हे सारं..?
"हे पाहा दादा, तुमच्यासारखा मीही वाड्यात लहानाचा मोठा झालोय.. माझ्याही बालपणीच्या तरुणवयातल्या आठवणी इथल्या मातीला चिकटल्यात... माझी तर नाळच जोडलीय वाड्याशी.. 'वाड्याचा आप्पा' म्हणून हाक मारताना माझ्या अस्तित्वाशीच वाडा जोडला गेलाय..पण म्हणून आपल्याला व्यवहाराकडे पाठ फिरवून चालेल का? दोन महिने झालेत कॉर्पोरेशनचं पत्र येऊन. मी तरी काय करु? आज सांगेन उद्या सांगेन करुन टाळत होतो.. पण वेळ वाया घालवून आपलंच नुकसान आहे.."
".... कसलं पत्र?" माई थिजलेलीच. "हे वाचा. त्यात लिहिलंय की, सुमारे १०० वर्षापूर्वीचा तुमचा वाडा असल्याने त्याची डागडूजी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा रहिवाशांच्या जीवाला धोका आहे. .."
दादांची नजर झरझर पत्रावरुन फिरली. एक हताश सुस्कारा सोडून त्यांनी त्या पत्राची घडी घालून ते पुन्हा लिफफ्यात बंद केलं. पलंगावरुन पाय खाली सोडून धोतर सारखं केलं..आणि दोन्ही हात गादीवर रेलून किंचित पुढे झुकले.. बाहेर पोरांचा गलका चालू होता..खण्णकन आवाज आला.. काय झालं पाहायला आप्पा बाहेर गेला.. परत आला तो हातात पितळी कडी होती. जिन्याच्या दरवाजाला क्रिकेटचा बॉल जोरात आदळल्याने ती निसटली होती. "आण ती इकडे." ती कडी खणात ठेवून दादा पाठीशी हात बांधून येरझार्या घालू लागले.
"मग काय करायचं म्हणतोस आप्पा?"
"मी काय सांगणार दादा? तुम्हाला तर सगळी परिस्थिती माहितीच आहे. माझी बँकेतली नोकरी.. हिची खासगीतली.. दोन मुलांची अजून शिक्षणं बाकी आहेत..सबंध वाड्याची डागडुजी करायची तर पाच सहा लाखांशिवाय पर्याय नाही. बरं एवढं करुनही ते सारं पक्कं होईल याची काय खात्री? कितीही झालं तरी दगड मातीचं बांधकाम ते.. सिमेंटचं थोडी आहे..वरती कुणी जोरात चाललं तरी खाली माती पडतीय.."
माई उठली. झाडांना पाणी द्यायची वेळ झाली होती..
"हं.. तू म्हणतोयस त्यात चूक नाही काही." दादा आता परिस्थितीचा विचार करत होते.
"आणि दादा, उद्या जर या कॉर्पोरेशन वाल्यांनी आपल्या वाड्यावर 'ऐतिहासिक वास्तू' म्हणून सील ठोकलं तर?"
"तर काय?"
"दादा! अहो आता आपण जर वाडा कंत्राटदाराला दिला तर निदान आपली जागा आपल्या ताब्यात राहिल्..शिवाय नवनवीन सोयी करुन घेता येतील"
"म्हणजे? तू वाडा पाडून इमारत बांधायचं म्हणतोयस?"
"त्याशिवाय दुसरा चांगला पर्याय मला तरी दिसत नाही. यामध्येही मान्य आहे आपले थोडे पैसे जातील पण निदान ते वाया जाणार नाहीत याची खात्री असेल. शिवाय आपण आपल्याच जागेत राहत असू. उद्या जर खरंच दुर्दैवाने वाड्याचा काही भाग कोसळला आणि कुणाला दुखापत झाली तर सगळा ठपका मालक म्हणून आपल्यावर येईल. खटले सुरु होतील..त्याची टांगती तलवार कशाला हवी डोक्यावर? आणि एकदा का आपल्या वाड्यावर 'ऐतिहासिक वास्तू' म्हणून सील लागलं की आपल्याला हा पर्याय पण कायमचा बंद होईल. वाड्याची जबाबदारी पुरातत्व खात्याकडे जाईल. म्हणजे आपल्याच घरात आपण पाहुण्यासारखं राहायचं.. काहीही दुरुस्ती करायची झाली तर आधी त्यांची परवानगी मागावी लागेल... आणि तुम्हाला तर माहितीच आहे सरकारी कारभार.."
व्यावहारिकदृष्ट्या आप्पाचा विचार चुकीचा अजिबात नव्हता. दादांनी प्रत्येक गोष्टीचा सखोल, चारी बाजूंने विचार करायचे संस्कारच केले होते तसे. त्यामुळे दादांना त्याच्या मुद्यांमध्ये शोधूनही चूक सापडेना.
"मला जरा विचार करु दे. उद्या बोलू." असं म्हणून दादा झोपायला निघून गेले.
रात्रभर माई दादांच्या डोळ्याला डोळा नाही. माई तर खूप रडली. दादांनी तिला थोपटलं. भावनेच्या भरात जाऊन त्यांना आपल्या लेकाचं नुकसान करायचं नव्हतं. आता आपलं राहिलंय काय? जेमतेम दहा वर्षांचं आयुष्य!आपण आपलं आयुष्य हवं तसं आखून जगलो. पण त्याला त्याचं आयुष्य आहे, भविष्य आहे, संसार आहे. आजकालची मुलं पाहता अभिमान वाटावा असाच लेक आहे आपला. आपला शब्द कधीही खाली पडू दिला नाही. सून सुध्दा आली तशी विरघळून गेली. इतर पोरींसारखं तिलाही वाटत असेलच की सुसज्ज फ्लॅटमध्ये राहावं.. त्या दोघांची परिस्थिती आहे तरी आजवर आपल्याला सोडून वेगळं राहण्याचा विचारही केला नाही.. अजून तरी कुठे तसं म्हणतायत ती दोघं.. कुटुंबाची घडी मोडणार नाही.. जागा आपलीच असेल..चार भिंतींची मांडणी बदलली तरी वास्तू तर त्याच स्थानावर असणार आहे... एकामागून एक विचार दादांच्या डोक्यात घोळत होते.
दुसर्यादिवशी मुलं शाळेत गेल्यावर दादांनी आप्पाला बोलावलं.
"आप्पा, तुझं म्हणणं मला पटतंय.. फक्त माझं एकच मागणं आहे."
"सांगा ना दादा!"
"नवीन वास्तूतही आपल्या सार्या भाडेकरुंना किमान ते आत्ता राहत आहेत तेवढी जागा मालकी हक्कानं दिली पाहिजे. मी त्यांना वार्यावर सोडू शकत नाही."
"दादा! आणि मी सोडेन असं वाटतंय का तुम्हाला? त्यांच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा झालोय मी!सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल. काहीही काळजी करु नका. पुढचं सारं मी पाहून घेतो." हे म्हणताना सुध्दा आप्पाला हुंदका अनावर झाला.. आणि दादांच्या खांद्यावर डोकं ठेवून अक्षरशः ढसढसा रडला. स्वयंपाकघराच्या दारात उभी असलेली सूनही हातातलं पदराचं टोक तोंडाशी धरुन मागे फिरली तर माई डोळेच पुसत होत्या.. त्यांच्या कुशीत शिरुन तिनंही अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
वर्षभरात पुढची चक्र भराभर फिरली. आप्पाच्या एका कंत्राटदार मित्राने वाड्याचे कंत्राट घेतले. मोजणी झाली. वाटण्या झाल्या. हिशोब झाले. काळजावर दगड ठेवून कागदपत्रावर सह्या झाल्या. हे सारं चालू असताना माईच्या चेहर्यावरची उदासी लपत नव्हती की डोळ्यातलं पाणी डोळ्यातच जिरवताना लाल होणारे दादांचे डोळे कुणाच्या नजरेतून सुटत नव्हते. इमारतीचा प्लॅन तयार झाला. प्रत्येकाचं नवं घरं निश्चित झालं. आता वाडा उतरवावा लागणार होता. कंत्राटदाराने पर्यायी जागांची सोय केलीच होती. आजचा दिवस ठरला होता वाडा सोडून जाण्याचा.
.....निमूटपणे आवराआवर चालू होती. जरूरीपुरत्या एखाद दोन शब्दांची देवाणघेवाण होत होती. भराभर हालचाली चालू होत्या पण त्यात कुठेही उत्साहाचा लवलेश नव्हता की नेहमीसारखी गडबड नव्हती. वाड्यातले बिर्हाडकरु आपापल्या सामानाची बांधाबांध करत होते. घशात येणारे आवंढे घशातच मिटवून टाकताना तसं जड जात होतं. परवाच सगळ्यांनी मिळून चांदण्या रात्री अंगणात केलेल्या सहभोजनाचा प्रसंग डोळ्यांपुढून हलत नव्हता. ते हास्याचे फवारे वाड्याच्या भिंतींवरुन प्रतिध्वनींसारखे कानात घुमत होते... बाहेर टेम्पो ट्रक आले होते मोठंमोठं अवजड सामान आधी त्यात चढवलं जात होतं.. लहानमुलांचा किलकिलाट चालूच होता. दादामाईंना नमस्कार करुन सगळे खाली आले होते. बायका एकमेकींच्या घरी जाऊन हळदीकुंकू आणि ओटी भरताना अक्षरश: गळ्यात पडून रडत होत्या. पुरुष मंडळी एकमेकांना सावरत उगीच उसनं अवसान आणून भराभर सामान हलवत होते. हळूहळू वाड्यातलं एकूण एक सामान बाहेर निघालं. पोरं तर बाहेरच होती.. कधी नव्हे ते वाडा भकास अन भेसूर दिसत होता.. जणू तोही स्फुंदून स्फुंदून रडत होता.. सगळं सामान, मुलंबाळं, अन मोठी माणसं बाहेर आल्याची खात्री करुन घेत आप्पा दादा माईंना बोलवायला आत गेला. त्या उजाड वाड्यात पाऊल ठेवतानाच त्याच्या काळजात चर्र झालं.. आपल्य आईवडलांना वृध्दाश्रमात सोडून जातोय की काय अशी भावना त्याच्या मनात आली. तोच त्याला ठॉक ठॉक असा आवाज ऐकू आला. त्या दिशेने त्याने पाहिलं तर आवाज जिन्याच्या दिशेनं येत होता.. तो धावतच तिथे पोचला अन स्तब्धच झाला.. पंच्याऐंशी वर्षांचे दादा, एका हाताने काठीवर तोल सावरत, हातात हातोडी घेऊन जिन्याच्या दरवाजाची निसटलेली पितळी कडी बसवत होते! आप्पाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.. तिथे फार काळ थांबणे अशक्य होऊन तो माईला पाहायला परसात गेला आणि त्याचा अंदाज बरोब्बर निघाला! माई तांब्यानं मोगर्याला पाणी घालत होती..!!
"माई गं........." जोरात हाक मारुन माईच्या पोटाशी मिठी मारुन आप्पा ढसढसा रडला. इतक्या वेळ घालून ठेवलेले बांध फुटले.. मोगरा चिंब न्हाऊन निघाला....
छान
छान आहे...छोटीशी, आटोपशीर अन मस्त.
छानच
छानच लिहिली आहेस. आवडली मला.
प्राची....
आशु.. डोळे
आशु.. डोळे पाणावले.. मोगरा चिंब न्हावुन निघाला!!
छान. आवडली.
छान. आवडली.
खूपच छान..
खूपच छान.. डोळ्यासमोर ऊभं राहतात प्रसंग अन माणसे..
आशू तू फार
आशू तू फार रडवलस आज
आमचाही (माझ्या पणजोबांचा) वाडा होता मी खुप लहान होतो तेंव्हा... म्हणून काही बोलू शकलो नाही पण.. त्यांना थांबवूही शकलो नाही! (ही सत्यकथाच आहे नं?)... जुन्या झालेल्या वस्तू अश्याच कश्या टाकू किंवा मोडू शकतो आपण? एवढ्या निष्ठुरपणे... असं सारख मनात येत होत पण त्यावेळी काहीही बोलू शकलो नाही अन् आज बोलून काहीही फायदा नाही!
अन् मग केवळ व्यवहार उरतो...
छान
छान लिहिलय.
शरद
आशू,
आशू, छान,साधी, सुटसुटीत गोष्ट.
छान गोष्ट.
छान गोष्ट. फ्लॅशबॅकनंतर जिथे सुरुवात केली तेथेच परत येण्याची पद्धत आवडली.
क्या बात
क्या बात है!
आशू, सुरेख
आशू, सुरेख गोष्टं. किती छोटं कथानक आहे. पण कसल्या तताकदीनं फुलवलयस. त्यातली पात्रं (अगदी वाड्यासकट), इतकी सशक्तं आहेत. खूप बारकावे टिपलेयस. संवादही अप्रतिम.
खूप आवडली गोष्टं.
कथा
कथा चांगलीच आहे पण..
>>आज दादा माई दोघं ऐंशीच्या घरात गेली होती. आपल्या वैवाहिक जीवनाची उणीपुरी चाळीस वर्ष माईंच्या डोळ्यापुढून झर्रकन सरकत गेली. दागिन्यांनी दबून गेलेली जेमतेम सतरा वर्षांची मी..<<
माफ कर पण गणित चुकलंय. जरी minor detail असले तरी कथेच्या ओघातसुद्धा हे खटकतं. किंवा लेखकाने लिहिताना लक्षच दिलं नाहीये तेवढं असं वाटून रसभंग होतो.
इतर बारकाव्यांबरोबर हे पण बारकावे बरोबर आले तर बरं वाटेल.
परत एकदा, कथा चांगली आहे म्हणूनच सांगतेय.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
छान कथा...
छान कथा... वाड्याचं वर्णन वगैरे मस्त केलंय. शेवटचा पितळी कडी बसवण्याचा प्रसंग आवडला...
छान
छान लिहिलय.:)
****
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.
धन्यवाद
धन्यवाद सर्वांचे!
नी, तू सांगितलेला बदल केला आहे. खरंतर कालच माझ्या लक्षात आलं होतं पण ऑनलाईन येता न आल्याने ते करता आले नाही. तुझ्या बारीक निरीक्षणाबद्दल धन्यवाद.
----------------------
एवढंच ना!
आशु ! छान
आशु ! छान लिहिलयस पुन्हा एकदा!
पुलेशु
-----------------------------------------
सह्हीच !
छान आहे
छान आहे कथा.
पितळेची
पितळेची कडी... सूचक आणि अर्थपूर्ण !
***
जय हो !
प्रामाणिक
प्रामाणिक लिहिलं आहेस.
मलाही आमचा वाडा आठवला, आणि नॉस्टॅलजिक झाले..
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!
छान आहे.
छान आहे.
शेवट मस्त टचींग.
चांगली
चांगली झालीये कथा.. मला आमच्या कॉलेजनी फिरोदियाला ९-१० वर्षांपूर्वी केलेली एकांकिका आठवली..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
वाड्याचं
वाड्याचं वर्णन अन वेदना. दोन्ही प्रातिनिधिक.
सही..
--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?
आशू, छान
आशू,
छान लिहिली आहेस कथा..
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
आशू, छान
आशू, छान आहे कथा... पण मला असं वाटतं की वाड्यातल्या भाडेकरूंच्या पण वेदना दाखवायला हव्या होत्या. ही समस्या/प्रश्न हल्ली अगदी प्रातिनिधीक झाला आहे.
खुपच छान...
खुपच छान... दादा आणि माई खुप भावलेत...
आशु,
आशु, शेवटाला अक्षरश: डोळ्यात पाणी आलं वाचताना!
अशक्य लिहीलंयस...
-योगेश
सगळ्यांचे
सगळ्यांचे खूप धन्यवाद.
या कथेचा मग खूपच पसारा झाला असता..आणि मग जो गाभा आहे त्याचा तितका परिणाम नसता झाला. म्हणून मग मी ती दादा माई आणि आप्पा यांच्यापुरतीच ठेवली.

पण मला असं वाटतं की वाड्यातल्या भाडेकरूंच्या पण वेदना दाखवायला हव्या होत्या. >> मंजू, त्या साठी वेगळी कथा लिहावी लागेल..
----------------------
एवढंच ना!
छान
छान लिहिलयंस आशू .. माई अगदी नजरेसमोर आली. एकदम नॉस्टॅल्जिक..
आशू... कथा
आशू... कथा आवडली मस्तच
आशू, आवडली
आशू, आवडली कथा ... शेवट खुपच छान.
Pages