लाल भोपळा, १०० ग्रॅम
गाजर, २ मध्यम हुन थोड्या छोट्या आकाराची
बीट, १ जरा लहानसं
कांदा, १ पिटुकला
लसुण, ४-५ छोट्याशा पाकळ्या
ऑऑ, १ टे स्पू
मीठ
मीरपूड
चिली फ्लेक्स
पास्ता सिझनिंग / मिक्स ड्राईड हर्ब्स
लिंबु
कोथिंबीर
गेले बरेच दिवस पोटानी असहकार आंदोलन पुकारलेलं असल्यामुळे ताक, भात, पाण्याची कॉफी, गरम पाणी इत्यादी गोष्टींवर जगायचा प्रयत्न करतेय. जमेल असं वाटंत नाहीये, आणि त्यात भरीस भर म्हणून मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचं व्यसन! ह्या torturous कार्यक्रमामुळे माझ्या उपाशी हॄदयाला किती भोकं पडलीत देव जाणे!
गेले अनेक दिवस त्या तोंपासु डिशेस नुसत्याच बघत्येय. कदाचित त्याचाच बदला घ्यायला म्हणून पोटानी माझ्याशी हे असलं वागायचं ठरवलं असणारे. म्हटलं पोटाला मनवता येतंय का ते बघावं. पचायला हलकं आणि नुसत्याच उकडलेल्या मुग डाळ - भातापेक्षा थोडं जास्ती चवीचं काहबघावंम्हणून सूप करायचं ठरवलं.
इतरवेळी मी लाल भोपळा, बीट ह्या भाज्या फार उत्साहानी घरात आणतेच असं काही नाही (आणत नाही). पण काल केला मनाचा हिय्या. घेतला १०० ग्रॅम लाल भोपळा आणि एक पिटुकलं बीट सुद्धा. (उगाच नंतर मूड नाही झाला आणि वाया गेलं तर त्यातल्या त्यात कमी वाईट वाटेल म्हणून. भाज्या महागच आहेत अजूनही!) गाजर माझं लाडकं, त्यामुळे त्याचा तसा काही प्रॉब्लेम नाही. असो, फार लांबण लावली.
पाकृ:
OTG 180 डिग्री ला प्रिहिटला लावून ठेवा.
लाल भोपळा, बीट आणि गाजर धुवुन, सालं काढून घ्या आणि त्याचे साधारण १.५ सें.मी चे चौकोनी तुकडे करून घ्या.
कांद्याचे ६ तुकडे करा. लसूण सोलून घ्या. (लसूण आपण सबंधच वापरणार आहोत, चिरायची किंवा ठेचायची गरज नाही.)
ओव्हन मधे जो ट्रे वापरणार असाल तो धुवून, पुसून घ्या आणि सगळ्या भाज्या त्यावर पसरा. वरून ऑऑ आणि मीठ घालून हातानी भाज्यांना नीट चोळा. भा़या परत एकदा ट्रेवर नीट पसरून घ्या, जेणेकरून सगळीकडे आच नीट लागेल.
ट्रे ओव्हनमधे सरकवा, १८०-२०० डिग्री सेल्सियल वर साधारण ३० मिनिटंसाठी. (प्रत्येक ओव्हनचं हीट सेटिंग वेगवेगळं असतं, त्यामुळे अधूनमधून चेक करत राहिलेलं बरं.)
भाज्या चमच्यानी सहज मॅश होत असतील तर ट्रे बाहेर काढा आणि थोडं गार होऊ द्या.
रूम टेंपरेचर्ला आल्यावर पाणी घालून मिक्सर मधून अगदी एकजीव (प्युरे) होईपर्यंत फिरवून घ्या. आता ह्या मिश्रणात तुम्हाला हव्या असणार्या consistency प्रमाणे पाणी घाला, चवीनुसार मीठ, मिरपुड, चिली फ्लेक्स, पास्ता सिझनिंग / मिक्स्ड हर्ब्स घाला आणि एक मस्त उकळी आणा.
वरून मस्तपैकी लिंबू पिळा, हवी असल्यास (जबरदस्ती नाही. लागणार्या जिनसात घेतलीय म्हणून घालायचीच असा काही नियम नाही) कोथिंबीर भुरभुरवा.
गरमा गरम सर्व्ह करा आणि गिळायच्या आधी एक फोटो नक्की काढा (माझा राहिलाय काढायचा).
१. ट्रेला वरून अॅल्युमिनियम फॉईल लावली तर भाज्या जास्त मॉईस्ट राहातील. माझा जरा कोरड्या झाल्या होत्या.
२. एखादं तमालपत्र पण मस्तं स्वाद आणेल असं वाटतंय. करून बघितलं नाहीये.
३. ह्यात क्रीम-बीम ओतून अनहेल्दी कराय्चं का ते तुम्ही ठरवा.
४. स्वीट कॉर्न वगैरेही घालता येईल. (मी चवीची गॅरेंटी घेत नाही.)
५. सुचलं की संपादित करेन पोस्ट.
मी पण केले. थोड्या चुका
मी पण केले. थोड्या चुका केल्या. जरासे बीट जास्त झाले, सुप थोडे घट्ट ठेवले, भाज्या अजुन थोड्यावेळ बेक करायला हव्या होत्या. पण तरीही आवडलेच.
मला तर वाटलं पडवळ, तोंडली,
मला तर वाटलं पडवळ, तोंडली, घोसाळं असल्या भाज्यांचं आहे
Pages