शिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

Submitted by मी_आर्या on 19 July, 2016 - 08:15

मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात.
अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय . यातही ८ पैकी पहिल्या ५ बहिरंग योगावरच इथे सांगणार आहे.

नुसता प्राणायाम किंवा धारणा, ध्यान, समाधी हे इतके स्वतंत्र , विस्तृत विषय आहेत की ते त्या त्या वक्त्यांकडून ऐकणे हीच एक मोठी पर्वणी ठरेल!
*****

पातंजलयोगसुत्रात- १९५ सुत्रे आहेत.
सुत्र- सुत्र म्हणजे सायंटीफीक फॉर्म्युला. कमित कमी अक्षरात जास्तीत जास्त ज्ञान

अष्टांग योग- या ८ योगाच्या पायर्या नसुन ही योगाची अंगे आहेत.
महर्षी पातांजलीच्या अष्टांग योगातल्या ८ सुत्रांपैकी
१)यम
२)नियम
३) आसन
४) प्राणायाम
५) प्रत्याहार
हा बहिरंग योग आहे. जो अ‍ॅक्शन पार्ट म्हणजे साधना आहे. यातले महत्वाचे अंग म्हणजे प्राणायाम.

६) धारणा
७) ध्यान
८) समाधी
हे ३ अंतरंग योग असुन यातील 'ध्यान' हे महत्वाचे अंग आहे.

बहिरंग योगसाधनेची फलश्रुती अंतरंग योग असे म्हणता येईल.

पहिले ५ यम नियम सामाजिक स्तरावर व्यवहार कसा असावा हे सांगतात. आणि नंतरचे ३ नियम वैयक्तिक स्तरावर काय करावे हे सांगतात.
योगसाधना करायची असेल तर यम-नियमांचे महाव्र्ताने पालन केले पाहिजे, अनुव्रताने नाही- असे पातंजल मुनी म्हणतात.
महाव्रत- म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नियमपालन तंतोतंत करणे.

"जाति देश काल समयावच्छिन्ना, सार्वभौम महाव्रतम | "

उदाहरणादाखल आपण हिंसा हा विषय घेतला तर
जाति- मनुष्याला मारणार नाही पण प्राण्यांना मारेन ,अशी हिंसा नसावी
देश- माझ्या देशातल्या माणसांना मारणार नाही पण परदेशातल्या लोकांना मारेन अशी हिंसा नसावी
काल- चातुर्मासापुरते अभक्ष्य भक्षण करणार नाही. पण इतर वेळी करेन अशी हिंसा
समय- सकाळी सकाळी खोटे बोलणार नाही, दिवेलागणीला खोटे बोलणार नाही. असा प्रकार नसावा.

जो अस जाती, देश, काल, समयाला अनुसरुन महाव्रताच पालन करतो तो खरा योगी होउ शकतो.

प्रत्येक यम-नियमासोबत एक शक्ति जोडली आहे. आणि महाव्रताने ते पालन केले तरच त्या शक्तीचे प्रकटीकरण होते.
योगत्व म्हणजे प्रत्येक जीवामधे ''शिव' आहे. प्रत्येक मनुष्यात सुप्त अध्यात्मिक शक्तीचा स्रोत (पॉवरहाउस्) आहे. योगसाधनेत या शक्तीचे जागरण आहे.

१) यम- सामाजिक स्तरावर पाळावयाची साधना. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह
*अहिंसा- एक विशेष म्हणजे मानसिक स्तरावर केलेली हिंसा जास्त प्रभावी असते. "अहिंसा प्रतिष्ठायां तत् सन्निधौ वैरत्याग: "
जो योगी महाव्रताने अहिंसेचे पालन करतो त्याच्या स्वतःकडून तर हिंसा होणार नाहीच पण त्याच्या तपस्येच्या प्रभावात/ आभामंडलात, त्याच्या संपर्कात जो कोणी येईल तो माणूस असो की प्राणी तोसुद्धा वैरभाव विसरेल . अश्या ठिकाणी कट्टर वैर असणारे प्राणी सुद्धा गुण्यागोविंदाने नांदतात. या बाबतीत भगवान बुद्धांची एक कथा सांगितली जाते.
भगवान बुद्ध जिथे जंगलात तपश्चर्या करत होते, त्याच्या १६ किमी पर्यंतच्या परिसरात त्यांच्या तपस्येचे प्रभावक्षेत्र होते. अंगुलीमाल राक्षस जेव्हा त्यांना मारायला आला, तेव्हा टप्याटप्प्यावर त्याच्या मानसिकतेत बदल होत गेला आणि सर्वात शेवटी बुद्धापर्यंत पोहोचता पोहोचता त्याला उपरती झाली आणि तो भगवान बुद्धाना शरण गेला. (या वर आम्ही स्कीट सादर केले होते)
याबाबतीत मला श्रीवासुदेवानंद सरस्वतींचे ( टेंबे स्वामी) शिष्य नारेश्वर चे रंगावधूत स्वामी (दत्तबावनीकार) यांची कथा आठवली. ते साधनेसाठी जागा शोधात नर्मदातटावर फिरत होते. फिरता फिरता त्यांना एका ठिकाणी साप-मुंगूस, वाघ आणि इतर शाकाहारी प्राणी एकत्र खेळत आहेत असे दिसले. तीच जागा त्यांनी नक्की केली ती जागा म्हणजे नारेश्वर.

* सत्य- सत्याचा महाव्रती म्हणजे राजा हरिशचंद्र
"सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम "
असा मनुष्य मृत्यू जरी आला तरी सत्याची कास सोडत नाही. असे महाव्रताने सत्याचे पालन केले तर त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. तो जे बोलेल ते सत्य होते.
श्री रामकृष्ण परमहंसाची कथा इथे सांगितली होती. की एकदा त्यांचा एक शिष्य अगदी इरेला पेटला की जो योगी नेहमी सत्य बोलतो त्याला वाचासिद्धी प्राप्त होते, तो बोलतो ते सत्य होते, हे खरे आहे का हे समजावून सांगाच गुरुजी! या शिष्याकडे रोज बागेतील फुले गोळा करून, त्यांचे हार करून कालीमातेला अर्पण करायचे काम होते. तो शिष्य तिन्ही त्रिकाळ गुरुजींची पाठ सोडेना. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, अरे हो बाबा, असे खरेच असते.
तेव्हा त्याने विचारले, की आता जर कुणी एका योग्याने ही इथली अनंताची पांढरीशुभ्र फुले लाल होतील असे म्हटले तर खरंच होतील का?श्रीरामकृष्ण ही वैतागून म्हणाले हो, होतील!
आणि हा शिष्य दुसर्या दिवशी पहाटे अनंताची फुले तोडण्यास गेला ते ओरडतच परत आला की अनंताला लाल फुले आली आहेत.

*अस्तेय - म्हणजे चोरी न करणे. मग ती वाड्मयचौर्य ही असु शकते. दुसर्याचे श्रेय लाटणे ही असु शकते.

* ब्रम्हचर्य- कोणताही इंद्रियोपभोग न घेणे हे ब्रम्हचर्य

*अपरिग्रह- म्हणजे बराच संग्रह न करणे, भेटवस्तूंचा स्विकार न करणे

२) नियम- शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान

*शौच- म्हणजे शुद्धता, पवित्रता मग ती शारिरीक, मानसिक दोन्हीही असेल.

* संतोष - समाधानीवृत्ती. आहे त्यात समाधान

*तपस- शरीर, मन यांचेसुद्धा तप असते. 'कार्येंद्रिय शुद्धी तपसः" ज्या साधनेने काया, इंद्रियांची शुद्धी होते ते तप.
"प्राणायामः परम तपः" - सर्व तपात प्राणायाम हे उत्कृष्ट तप आहे. कारण यात प्राणवायुचे नियमन आहे.
उपास करणे म्हणजे पोटाचे तप. प्रदक्षिणा घालणे हे पायाचे तप

*स्वाध्याय- मी कोण याचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया. भगवद्गिता, उपनिषदे यांचा अभ्यास, या प्रकारच्या विषयांची चर्चा, व्याख्यान ऐकणे हा स्वाध्याय

*ईश्वरप्रणिधान- ईश्वराप्रती समर्पणाचा भाव. अर्थार्थी, जिज्ञासु, आर्त, समर्पण. सर्वात मोठे समर्पण हे अहंकाराचे समर्पण. परब्रम्ह व आपल्यात सर्वात मोठी भिंत अहंकाराची आहे. अहंकाराच्या आवरणाखाली 'आतला' इश्वर झाकोळुन गेला आहे.
आवृत्तचक्षु- 'आत' बघण्याचा यत्न
योग्याचा डोळा अंतर्चक्षूं असतो. चेतना अंतर्मुखी करतो.

शारिरीक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक सर्वच स्तरावर यम-नियम पाळावयाचे असतात.

३)आसन- योगासने
पतंजलीने पतंजलीयोगसूत्रात फक्त ३ सूत्रात 'आसने' हा संपूर्ण विषय संपवला आहे. ज्यात पहिले सूत्र व्याख्या, दुसरे त्याची पद्धती आणि तिसरे त्याचा परिणाम दर्शवते

व्याख्या: 'स्थिरं सुखम् आसनं "
पद्धती: 'प्रयत्नशैथिल्य अनंतसमाप्तिभ्याम"
परिणाम : "ततो द्वंद्वानाभिघात: "

१) व्याख्या- पहिल्या सूत्रात 'आसने म्हणजे काय' ही व्याख्या आहे. आसनात स्थिरता हवी आणि सुखाचा अनुभव आला पाहिजे.
आसनात आणि व्यायामात हा मूलभूत फरक आहे.

*योगासने ही मुख्यत्वे मनोनियंत्रणासाठी प्रक्रिया आहे. ज्यात स्थिरता नाही, दु:ख आहे, बल वापरणे आहे, स्पर्धा आहे, त्याला पतंजली 'आसन' म्हणत नाही.

*योगासने एका वेळी एकदाच करायची असतात.

* अंतिम स्थितीत जास्तीत जास्त वेळ टिकून राहणे याला महत्व आहे.

*व्यायामाचा परिणाम फक्त शरीरासाठी होतो. तर आसनाचा परिणाम शरीरसौष्ठवासाठी आहेच, आणि मनाच्या शांतीसाठी पण आहे.

*शरीराची लवचिकता वाढणे, वजन कमी होणे ही आरोग्याची लक्षणे आहेत.

“Man is as old as his spine”
माणसाचे वय त्याच्या मेरुदंडाच्या लवचिकतेवर अवलंबून असते "असे आजचे मेडिकल सायन्स सांगते.
शारीरिक स्तरावर अस्थिसंस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था अशा विविध संस्थांना जोडण्याचे, त्यांच्यात सुसंगती घडवून आणण्याचे कार्य योगासने करतात.

२) पद्धती: 'प्रयत्नशैथिल्य अनंतसमाप्तिभ्याम"
शारीरिक स्थितीत प्रयत्नाची शिथिलता हवी. सहजपणे एफर्टलेस आसने करावीत.मानसिक स्तरावर अनंताचे (अनंत आकाश, अनंत सागर ) ध्यान करावे. अंतिम स्थितीत सहजपणा हवा. अवयवांवर कुठल्याही प्रकारचा अवास्तव ताण नको. ज्या स्थित्तीत सुखाची अनुभूती आहे ती आपल्याकरता अंतिम स्थिती आहे.

आसनांच्या अंतिम स्थितीत मन शरीरापासून विलग करून अनंतात विलीन करणे म्हणजे 'आसनसिद्धी' झाली.
एखाद्या आसनात अंतिम, सुखदायी स्थितीत तुम्ही कमीत कमी ४ तास २० मिनिटे राहू शकतात तेव्हा ते असं सिद्ध झाले, असे योगशास्त्रग्रंथात म्हटले आहे.

३) परिणाम : जेव्हा अंतसमाप्तीभ्याम स्थिती येते तेव्हा योग्याचे जीवनातील द्वंद्व नाहीसे होते. द्वंद्वाने मन असंतुलित होते. आसनांच्या सिद्धतेमुळे मनुष्य द्वंद्वातीत होतो. शीत- उष्ण, मान-अपमान ,सुख-दु:ख ही काही द्वंद्वाची उदाहरणे.

||समत्वं योग उच्चते|| या उक्तीप्रमाणे याचा अर्थ कोणत्याची परिस्थतीत मनाचे समत्व टिकले पाहिजे,तर मनुष्य योगी होतो. आणि आसनांनी हे साधते. हिमालयातल्या अतिथन्ड तापमानात अंगावर फक्त लंगोटी लावून काही योगिजन तपसाधना करतात ती योगामुळे शक्य होत असेल का?
गीतेत कृष्णाचे एक नाव 'योगेश्वर कृष्ण' असे आहे. त्याच्या चेहर्यावरचे स्मित कधीही ढळले नाही. कुरुक्षेत्रावर अतिशय तणावपूर्ण स्थितीत त्याने अर्जुनाला गीतोपदेश केला.

आसनांमध्ये 'जाणिवेचा विस्तार' कसा करता येईल याचा अभ्यास केला तर ती 'साधना' होईल. जाणिवपुर्वक आसने कशी करावीत हा शिबीरात गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचा प्रकार आहे. यावर सम्पुर्ण २ लेख होउ शकतात इतका हा विषय व्यापक आहे.

१) आसने ही जाणीवपूर्वक करावीत. यांत्रिकी पद्धतीने नाही. म्हणून असणे करतांना डोळे मिटलेले असावेत. आणि शरीरात होणारे बदल जाणीवपूर्वक बघावेत.

आवर्ती ध्यानात आम्ही उभ्याने ३, बसून ३ आणि पोटावर झोपून आसने करायचो.सर्वात शेवटी शवासन. ही सगळी आसने करतांना डोळे मिटलेले असायचे. लोक गम्मतीत म्हणतात, शवासन म्हणजे आमचे आवडते आसन! पण शवासन हे सर्वात अवघड आसन. आवर्ती ध्यानात ही शवासनातली ही स्थिती आमच्या ताई इतक्या सुंदर रीतीने सांगायच्या की आईच्या कुशीत आपण झोपलो आहोत असा फील यायचा. खरोखर काही लोकांना झोप ही लागायची.

२) स्नायूंची जाणीव- काही आसनात स्नायू ताणले जातात तर काहींमध्ये आकुंचित होतात ही पहिली जाणीव. जे स्नायू आसनांमध्ये भाग घेत नाही, ज्यांचा आसनांशी संबंध नाही ते स्नायू शिथिल असावेत.

३)पोट आणि छातीमधील दबावाची जाणीव. उदा. शशांकासन

४) रक्ताभिसरणातील बदल- अंतिम स्थितीत स्थिरत्व आणि शांती अनुभवली तर काही आसनात रक्तदाबात बदल होतो हा सूक्ष्म फरक ही लक्षात येतो. पादहस्तासन मध्ये रक्तप्रवाह मेंदूकडून चेहर्याकडे येत असल्याची जाणीव होते. याला स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाणे म्हणतात.

५) मज्जारज्जूमधील संवेदनांची जाणीव- ही सुद्धा सूक्ष्म जाणीव आहे. पश्चिमोत्तानासनात स्थिरत्व आले तर मेरुदंडातून सूक्ष्म करंट गेल्याची जाणीव होते.

६) ध्वनीस्पंदनांची जाणीव- शवासनात 'अ' 'उ' 'म' कार जप करतांना अनुक्रमे नाभीजवळ, छातीजवळ, आणि मस्तकात स्पंदनाची जाणीव होते. भ्रामरी प्राणायामात टाळूवर हात ठेवला तर स्पंदनांची जाणीव होते.

७) शरीरापासून विलग होणे- शवासन हे सर्वात कठीण आसन मानले जाते. आपल्या शरीरातून विलग होऊन आपणच आपल्या शरीराचे अवलोकन करत आहोत असा अनुभव योग्यांना येतो. याने देहबुद्धी नाहीशी होते. यात आपल्या शरीरात चेतना फिरवावी लागते. संपूर्ण शरीरातले तणाव शोधून ते बाहेर काढावे लागतात.
शरीरात सर्वात जास्त तणाव चेहर्यावर असतात. चेहर्यातही दाताच्या मुळाशी तणाव असतो.

८) अनंतसमापत्ती - आपल्या शरीरारापासून आपण वेगळे झालो की अनंतात विलीन होतो. म्हणजे अनंताशी एकरूप होणे. उदा. अनंत आकाश, अनंत सागराशी एकरूप होणे तीच अनंतसमापत्ती होय. यासाठीच डोळे बंद करून आसने करतात.

रोज किती आसने करावीत?
मागच्या बाजुस, पुढील बाजुस, डावीकडे, उजवीकडे मेरुदंड वाकेल अशी कॉम्प्लीमेंटरी आसने करावीत.
मेरुदंडाला पीळ (ट्वीस्ट होईल) तसेच मेरुदंड उलटा होईल असे कमीत कमी एक आसन तरी करावे.

३ प्रकारची योगासने आहेत.
१.ध्यानासन- पद्मासन, सिद्धासन, वज्रासन
२. स्वास्थ्यकर आसन- भुजंगासन, सर्वांगासन, शलभासन
३. आराम आसन- शवासन, मकरासन

पातंजलयोगसूत्रांचा मुख्यतः ध्यानासाठी उपयोग होतो.

४) प्राणायामः
प्राण म्हणजे जीवशक्ती. 'प्राण' आहे म्हणुन 'प्राणी' म्हणतात."प्राणस्य आयामः प्राणायमः" विश्वातल्या जितक्या शक्ती आहेत उदा. विद्युत शक्ती, चुम्बकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती या सर्वांचा स्रोत प्राणशक्ती आहे. आणि या जीवशक्तीचे नियंत्रण करणे हा प्राणायामाचा उद्देश.
शरीरातल्या जेवढ्या क्रिया आहेत, संस्था आहेत, त्यांना प्राणशक्ती लागते. विचारशक्तीचे कार्यही प्राणशक्तीमुळेच चालते. या शक्तीचे संयमन करणे म्हणजे प्राणायाम.
प्राणशक्ती ५ प्रकारे काम करते. प्राण, अपान , उदान, समान, व्यान
प्राण- शरीराच्या वरच्या भागात( उदा. डोळे, कान, नाक) काम करते.
अपान - शरीराच्या खालच्या भागात (उदा. मलोत्सर्जन, ) काम करते
समान - प्राण व अपान मध्ये समन्वयन करते. पचनसंस्थेचे कार्य यांच्यामुळे चालते.
व्यान- स्पर्श, रक्ताभिसरण क्रिया
उदान - हा वायू सुप्त स्थितीत असतो. सर्वसामान्यपणे असं म्हणतात की उदान वायू मृत्यूच्या वेळी स्थूल शरीरापासून मुक्त होऊन सूक्ष्म शरीराला घेऊन हा देह सोडतो.
पूरक - संथ गतीने घेतलेला श्वास
रेचक - त्याहीपेक्षा संथ गतीने सोडलेला प्रश्वास
कुंभक - रोखलेला श्वास
१:४:२ हे श्वासोच्छवासाचे प्रमाण आहे.
शरीरातल्या ९ संस्थानापैकी काही ऐच्छिक तर काही अनैच्छिक असतात.
चालणे, बोलणे, काम करणे - ऐच्छिक संस्था
हृदयाभिसरण, पचनसंस्था- अनैच्छिक संस्था
श्वसनसंस्था ही थोडी वेगळी आहे. ती थोडी ऐच्छिक तर काही प्रमाणात अनैच्छिक आहे. म्हणून प्राणशक्तीचे नियमन करण्यासाठी श्वसनसंस्थेचा आधार घेतला जातो.

प्राणायामाच्या २ शाखा आहेत .
* हठयोग शाखा (हठयोगप्रदीपिका ग्रंथ): पूरक-कुंभक- रेचक, यात नाडीशुद्धी आवश्यक आहे. कुंभकावर जास्त भर दिला आहे.
* वसिष्ठ शाखा (योगावसिष्ठ ग्रंथ) : पूरक-रेचक. इथे 'केवल कुंभका'वर(आपोआप येणारी स्थिती) जास्त भर दिला आहे.
सर्वसामान्यांसाठी वसिष्ठ शाखा जास्त उपयुक्त आहे. खरा प्राणायाम म्हणजे कुंभक. कुंभक अश्या ठिकाणी करावे जिथे शुद्ध हवा आहे, आहार सात्विक आहे, आहार, विहारावर नियंत्रण आहे, तसेच गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करतात . हे शहरात शक्य नाही. कुंभक करण्यासाठी नाडीशुद्धी झालीच पाहिजे असे हठयोगप्रदीपिकेत वारंवार उल्लेख येतो.

नाडीशुद्धी म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे असे मानतात की आपल्या अन्नमयकोषांच्या बाहेरून प्राणमय शरीरकोष आहे. त्यात ७२००० नाडया आहेत ज्यातून आपल्या शरीराला प्राणशक्तीचा पुरवठा होतो. या नाड्या जर कुठे कुंठित झाल्या तर त्या ठिकाणी व्याधी होतात.

नाडीशुद्धी झाली हे कसे ओळखावे?
वपुपुषत्वम - सडपातळ, लवचिक शरीर
वदनेप्रसन्नता- चेहरा नेहमी प्रसन्न
नादेस्फुटत्वम - स्वर मधुर असतो
नयनेसुनिर्मले - डोळ्यात तेज असते
अरोगतम - कुठल्याही प्रकारचा रोग नाही
बिंदूजयम- वीर्यावर नियंत्रण
अग्निदीपम - जठर, पचनसंस्थेवर संपूर्ण नियंत्रण

ही सगळी लक्षणे ज्याच्या शरीरात प्रकट झाली तोच कुंभक करण्यास पात्र आहे असे हठयोगप्रदीपिकेत म्हटले आहे.
कुंभक जर नीट जमलां नाही तर योग साधण्याऐवजी रोग होतो.

त्या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे- उचकी लागणे , धाप लागणे, दम कोंडल्यासारखा वाटणे, डोके दुखणे, कानात दुखणे ही चुकीच्या प्राणायामाची लक्षणे आहेत.

वसिष्ठ शाखेत म्हटलेय की सर्वसामान्य मनुष्याला पूरक रेचक संथ गतीने १:२ या प्रमाणात केले की 'केवल कुंभक' ही स्थिती आपोआप अगदी विनासायास येते. आणि ती सर्वात चांगली स्थिती आहे. जेव्हा शारीरिक मानसिक स्तरावर अतिरिक्त शक्तीची गरज असते, तेव्हा आपोआप श्वास रोखला जातो, म्हणजे 'केवल कुंभक' स्थिती येते.

४) प्रत्याहार- स्वम स्व विषयाप्रमोशे चित्तस्वरूपानुकाराइव इंद्रियाणाम प्रत्याहार:। इंद्रिये जेव्हा आपापल्या विषयातून असंलग्न होऊन चित्तात लीन होतात तेव्हा प्रत्याहाराची स्थिती येते.

पंचेंद्रियांना त्यांच्या विषयांपासून अलग ठेवणे, तोडणे. ते केले की बाह्यविश्वाची अनुभुती येत नाही. व योगी अंतर्विश्वाकडे वळतो.
इंद्रिये तत्व विषय
नाक- पृथ्वी - गंध
जिव्हा - आप - रस
नेत्र - तेज - रूप
त्वचा - वायू - स्पर्श
कान - आकाश - शब्द
आपले मन या पंचेंद्रियांच्या माध्यमातून विषयाशी संपर्क साधत असते.
बाह्यजगताची जाणीव आपल्याला पंचेंद्रियांमुळे होते. या इंद्रियांनी असहकार केला तर ती स्थिती प्रत्याहाराची आहे.
गाढ निद्रा म्हणजे प्रत्याहार नव्हे. कारण त्यात जाणीव नाही. इंद्रिये जाणीवपूर्वक असंलग्न झाली तर ती स्थिती प्रत्याहाराची.
****

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! मस्त! योगाची व्यापकता व गहनता इतकी अथांग आहे आपल्यालाही दहा दिवसाचा काही अंशच मिळाला आणि तो एका लेखात समाविष्ट करणे खरोखरीच अवघड काम होत ते तु उत्कृष्टपणे पार पाडलंय....

किती छान समजावून सांगितले आहे. असे लेख वाचले की दरवेळी काहीनाकाही वेगळे कळते.

आर्या खूप छान लिहिते आहेस.

सुंदरच!

योगात केवळ 'इश्वरप्रणिधान' एवढाच इश्वराचा संबंध येतो. तो उल्लेख नसता तर योग हे पूर्णपणे निरीश्वरवादी दर्शन झाले असते. केवळ एका नियमाच्या तत्वाकरता एक नविन entity (जीला इतर काही दर्शनात खूप महत्व आहे) आणण्यामागचा नक्की उद्देश काय असावा ? नुसताच समर्पणभाव पुरेसा नाहीये का?

योगाचे अंतिम लक्ष इश्वरप्राप्ती असे नाहीये. त्यामुळे इश्वर ही साधनेच्या काळात उपयोगी पडणारी दुय्यम entity ठरते. मग योगाला / पतंजलींना अभिप्रेत असलेला इश्वर म्हणजे नक्की काय ?

खूपच अभ्यासपूर्ण लेख.... पुन्हा पुन्हा वाचणे आलेच..

माधव -
योगात केवळ 'इश्वरप्रणिधान' एवढाच इश्वराचा संबंध येतो. तो उल्लेख नसता तर योग हे पूर्णपणे निरीश्वरवादी दर्शन झाले असते. >>>>> श्रीरामकृष्ण वचनामृतात श्रीठाकूरांना निर्गुण समाधीचा अनुभव घ्यायला शिकवणारे तोतापुरी/न्यांग्टा यांचा उल्लेख आहे - हे तोतापुरी नागा साधू होते व ईश्वर अजिबात मानीत नसत, ठाकूर भजन करायचे तर काय भाकरी बडवतोस म्हणून थट्टाही करीत असत.
पण वचनामृतात पुढे असाही उल्लेख आहे कि हेच तोतापुरी ठाकूरांना विनवतात - तुझ्या कालीला/आईला सांग मला या देहयातनेतून मुक्त कर म्हणून.

तुकोबा, माऊली हे सारे योग जाणणारे (निर्गुणाचा बोध प्राप्त करुन घेणारे) असले तरी मुक्तिवरील भक्तिचीच श्रेष्ठता (ज्ञानोत्तर भक्ति) गाताना दिसतात. Happy
यावर अजून संवाद आवडेलच. Happy

अवांतर - "अहिंसा प्रतिष्ठायां तत् सन्निधौ वैरत्याग: " - दुरुस्ती आवश्यक.
*अस्तेय - म्हणजे चोरी न करणे. मग ती वाङ्मयचौर्य ही असु शकते. दुसर्याचे श्रेय लाटणे ही असु शकते.

शशांक,
तोतापुरींबद्दल माहिती नाहीये मला. पण जर का ते योगमार्गाचे वाटसरू असतील आणि इश्वरप्रणिधान हे योगातले एक न टाळता येणारे तत्व असेल तर मग तोतापुरीदेखील ते अनुसरतच असतील. मग त्यांनी ठाकुरांच्या भजनाला हसायलाच नको होते.

म्हणूनच भक्तीमार्गातला इश्वर आणि योगमार्गातला इश्वर मला खूप वेगळे वाटतात. योगातली इश्वर ही संकल्पना नक्की काय आहे हे जाणून घ्यायचय.

भक्तीमार्गातला इश्वर आणि योगमार्गातला इश्वर मला खूप वेगळे वाटतात.>>>>>

संतांच्या मते सगुण व निर्गुण एकच - तुज सगुण म्हणो कि निर्गुण रे...

निर्गुण म्हटल्यावर त्याला मानले काय किंवा न मानले काय (आहे किंवा नाही) - त्याने निर्गुणात काहीच फरक पडत नाही. गौतम बुद्धाचा अज्ञेय वाद हा - 'नाही' स्वरुपाचा. पण अद्वैतवाद 'आहे' वाला.

पण संतांनी सर्वसामान्यांकरता सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे अशी युक्ति काढली.

यात एकाच तत्वाला वेगवेगळी नावे, वेगवेगळे गुणधर्म लावले गेले.

उपनिषदात कुठल्याही देवाचे, देवतेचे वर्णन नाही - ना तत्संबंधी काही पुराण कथा. केवळ सत् तत्व म्हणून संबोधले आहे. बाकी त्यात पर्जन्य, पृथ्वी, वृक्ष, इतकेच काय गवताचेही सूक्त आहे - पण त्याला ते सत् तत्वाहून वेगळेच समजतात. इंद्र म्हणजे पावसाची देवता पण त्याचे रुप सांगताना इं द्र हेच त्याचे रुप म्हणतात - बाकी काही आकार नाही वा इतर काही कथा नाहीत.
कालांतराने सर्वसामान्य समाजाला बहुधा हे डायजेस्ट करणे अवघड गेल्याने अनेक अवतार, देवी देवता यांचा उगम झाला असावा.

मात्र संतांनी कायम या सगुण उपासनेचा रोख त्या निर्गुणाकडेच लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

परमहंस रामकृष्णांनी छान उपमा दिलीये - गंगेच्या विविध बाजूंनी पाणी पहाणारे वा पिणारे - कोणी जल म्हणतात, तर कोणी नीर, तर कोणी अ‍ॅक्वा तर कोणी अजून काही... पण आहे तर सारे गंगाजलच...

सत् तत्व जाणणारे म्हणतात - ते एकच आहे - एकं सत विप्रा बहुधा वदन्ति - सत् तत्व एकच पण ज्ञानी (त्याला जाणणारे) त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात.

धन्यवाद, बीएस, दिनेशदा, बी, मन्जुताई, हर्पेन, उदय, माधव, गमभन, सृ, शशान्कजी!
शशान्कजी, खुप चुका होत्या लेखात.त्याच सकाळपासुन नीट करत होते. थॅन्क्स!

शशान्कजी, माधव छान विवेचन! तुमच्यामुळे आमचेही प्रबोधन होत आहे. Happy

<< योग हे पूर्णपणे निरीश्वरवादी दर्शन झाले असते. केवळ एका नियमाच्या तत्वाकरता एक नविन entity (जीला इतर काही दर्शनात खूप महत्व आहे) आणण्यामागचा नक्की उद्देश काय असावा ? नुसताच समर्पणभाव पुरेसा नाहीये का? <<
माधव, योगाला निरीश्वरवादी करण्याचा अट्टाहास का धरावा? मला समजले नाही. कदाचित निरीश्वरवाद, एकेश्वरवाद यावर माझे वाचन नाहीये,कदाचीत माझी बुद्धी तोकडी पडते. म्हणुन विचारतेय.

समर्पणभाव म्हणता! पण ते कुणाला? मानवाला समर्पण करणार ?
ज्याला सर्वस्व समर्पण करावे अशी कुणी एक पराशक्ती, एक परातत्व असावे ना? केलेले कर्म अर्पण करता येइल असा कुणीतरी हवा. नाही केले तर त्या कर्माचा अहं होतो. एकदा हा आत शिरला की लोकेषणा, वित्तेषणा,अधिकारेषणा वाढु लागतात. आणि योगात मुळात तोच कमी करायचा आहे. खरी कर्मयोगी व्यक्ती नैष्कर्म्य अवस्थेत असते,ज्यात कर्माचा लोप होतो आणि फक्त आत्मसंकल्पात मग्न रहाण्याची स्थिती असते. त्यामुळे ते आत्मदर्शन करुन देते. एकवेळ तिथे अहंकाराला थारा नसतो. पण हे सर्वांनाच जमते असे नाही. मनातली अशुद्धी दुर करण्यासाठी दुसर्याची सेवा करणे यासारखा दुसरा सर्वोत्तम उपाय नाही. शेवटी या सर्वांचा दृष्टीकोन फिरून फिरुन मानवतेकडे येतो.

व्वा... काय छान माहिती दिली आहेत तुम्ही. Happy इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
(आता दोन तिनदा वाचून काढेन, तेव्हा थोडे थोडे कळू लागेल).

कितीही योग करा, कितीही सत्य/अहिंसा वगैरेंचे पालन करा, पण मनात सूक्ष्मरूपाने एक अहंभाव वसतच असतो. अगदी द्वैत भावनेने इश्वर पूजला तरी "तो मी पूजतो" आहे हा अहंभाव असतोच, व तोच नाहिसा करण्याकरता, द्वैतातुन अद्वैतात शिरण्याकरता "भक्ति/श्रद्धा" यांचा अपरिमित उपयोग होतो.
तसे नसेल, तर मात्र आम्ही "चांगदेवासारखे" घडतो.....

मी अजुनही "भक्ति व श्रद्धेचा" स्पर्ष होण्याची वाट बघतो आहे.

<< द्वैतातुन अद्वैतात शिरण्याकरता "भक्ति/श्रद्धा" यांचा अपरिमित उपयोग होतो.<< अगदी लिंटी !
अत्युच्च प्रेम ज्यात त्याग आहे, सेवा आहे. यात समर्पणाची भावना आली की ती 'भक्ती' होते. "तु माझ्या जीवनाच जे करशील ते मला मान्य आहे, माझा त्याला काही आक्षेप नाही' ही झाली भक्ती!

>>> "तु माझ्या जीवनाच जे करशील ते मला मान्य आहे, माझा त्याला काही आक्षेप नाही' ही झाली भक्ती! <<<
बरोबर, पण अगदी सूक्ष्मात जायचे झाले तर , "मला मान्य आहे" मधिल "मी" देखिल विसरला जातो, तेव्हा भक्ति परिपूर्ण होते.
अर्थातच, मला याचा अनुभवही नाही वा अनुभुतिही नाही, यातिल काहीही एक जरी असते, तर मग मी इथे खरडत बसलो नसतो.... Lol

<<पण अगदी सूक्ष्मात जायचे झाले तर , "मला मान्य आहे" मधिल "मी" देखिल विसरला जातो, तेव्हा भक्ति परिपूर्ण होते.<< करेक्टे! 'मी पुजतो', मी नामस्मरण करतो. यातला 'मी', 'माझा', 'मला' ही सर्वनामे विसरायची असतात! सम्पुर्ण शरणागती.. टोटल डिव्होशन!

>>> यातला 'मी', 'माझा', 'मला' ही सर्वनामे विसरायची असतात! सम्पुर्ण शरणागती.. टोटल डिव्होशन! <<<
अन याकरताच परत मदतीला येऊ शकतात ती "कर्मकांडेच"
एखादा कसलेला चित्रकार, चित्र काढताना जितक्या रितीने देहभान विसरेल, तितक्या रितीने इश्वरास पूजताना देहभान विसरवण्याची क्षमता मंत्रतंत्रादिक सूक्ते पठण/श्रवण, भजन, कीर्तनात असते. तितकीच क्षमता एखादे गीत ऐकण्यातही असू शकते, तितकीच क्षमता एखादे निसर्गदृष्य पहातानाही कळू शकते. पण हे अनुभव अत्यंत अल्पजिवी असतात, व बरेचदा (बहुतेकवेळेस) भानावर आल्यावर "हा हा अनुभव घेताना मी माझा राहिला नव्हतो" अशी गत झाल्याचे जाणवले जरि, तरी ती गत पुढे चालवित नेता येत नाहि. तो अनुभव क्षणीक असतो. अगदी याच "भावनेचा/अनुभुतीचा" विचार करुन रजनीशांचे "संभोगातुन समाधी" हे तत्वज्ञान उगम पावले असे मी मानतो. (ते तत्वज्ञान/गृहितक मला अमान्य आहे, पण त्यामागिल विचारधारा अशा स्वरुपात उल्लेख केला आहे). असो.

शेवटी हे सगळे मार्ग 'एकाच तत्वा'कडे नेणारे आहेत लिन्टी! || एकोहं बहुस्याम ||

स्वामी विवेकानन्दान्चीच वाक्ये आहेत," “Each soul is potentially divine. The goal is to manifest this divinity by controlling nature, external and internal. Do this either by work, or worship, or psychic control, or philosophy - by one, or more, or all of these - and be free. This is the whole of religion. Doctrines, or dogmas, or rituals, or books, or temples, or forms, are but secondary details.”

आर्या, शशांक,

परमेश्वर भक्तीला विरोध वगैरे करायचा विचारही नाहीये. आणि योगाला कोणत्या साच्यात बसवायचे नाहीये. पण योग हे एक दर्शन आहे. म्हणजे त्या मार्गावरून जाणार्‍या (दुसर्‍या कोणत्याही मार्गाचा अभ्यास न करता) साधकाला मुक्तीची वाट दिसायला हवी ना?

इतर दर्शनांचा माझा अभ्यास नाही पण वरवर पाहता असे दिसते की सहाही दर्शनात ज्ञानाचा संबंध येतो. म्हणजे काही माहिती मिळवावी लागते आणि ती विवेकाच्या कसोटीवर पारखून घ्यावी लागते. त्याकरता दर्शनातली प्रत्येक संकल्पना ही सुस्पष्ट व्हावी लागते. जर का एखादा इश्वर न मानणारी व्यक्ती योगसाधक बनली तर ती गंतव्यापर्यंत पोहचू शकेल का? 'इश्वरप्रणिधान' हे तत्व तिला पाळता येणार नाही. मग केवळ एकाच तत्वावाचून बाकीची साधना व्यर्थ जावी का?

बरं बाकीच्या मार्गात जिथे इश्वर आहे तिथे त्याचे स्वरुप (सगुण आणि निर्गुण दोन्ही) सांगणारी अनेक वर्णने आहेत. त्याची भक्ती केल्याने काय होते हे सांगणार्‍या अमाप रचना आहेत. एखाद्या नास्तिकाला ( इश्वर न मानणारी व्यक्ती) वाटलेच तर तो त्या साहित्याचा अभ्यास करून इश्वर काय हे समजावून घेऊ शकतो. आणि कदाचीत त्यानंतर त्याचा इश्वरावर विश्वास बसूही शकतो. पण असे इश्वराचे वर्णन, त्याच्या भक्तीचे वर्णन योगात कुठेच नाहीये. मग नास्तिकाला इश्वर ही संकल्पना समजायची कशी ? आणि त्याच्याकडून इश्वरप्रणिधान घडायचे कसे? नास्तिकाचा जरी इश्वरावर विश्वास नसेल तरी बर्‍याचदा गुरुवर विश्वास असतो. योगातही गुरुला महत्व आहेच. मग 'गुरुप्रणिधान' असेही म्हणता आले असते (नावात काय आहे असे म्हणू नका Happy ). पण तसे न म्हणता इश्वरप्रणिधान असेच म्हटले आहे. इश्वर या संकल्पनेशिवायही समर्पण स्मजून घेता आणि करता येतेच (देशासाठी लढणारा सैनी़क).

भक्तीमार्गासारखे इश्वरात विलीन होणे हे योगाचे गंतव्य पण नाहीये. In fact योगात इश्वर इतर कुठेच भेटत नाही. मग या एकाच तत्वापुरती इश्वर ही संकल्पना का वापरली आहे?

मी या योगिक्/अध्यात्मिक विषयावर भाष्य करण्यास सुयोग्य व्यक्ति नाही, पण सामान्य वाचक म्हणुन एकंदरीत चर्चा वाचल्यावर जे सुचते ते मांडतोय.

>>> जर का एखादा इश्वर न मानणारी व्यक्ती योगसाधक बनली तर ती गंतव्यापर्यंत पोहचू शकेल का? 'इश्वरप्रणिधान' हे तत्व तिला पाळता येणार नाही. मग केवळ एकाच तत्वावाचून बाकीची साधना व्यर्थ जावी का? <<<
अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. (अर्थात नास्तिक लोक योगासही "थोतांड" मानित असल्याने मुळात ते योगाभ्यास करण्यास जातिल वा नाही याचीच खात्री नसते तो भाग निराळा ... Wink )

>>>> १) जर का एखादा इश्वर न मानणारी व्यक्ती योगसाधक बनली तर ती गंतव्यापर्यंत पोहचू शकेल का? <<<
तात्विक दृष्ट्या, जर सुयोग्य गुरु भेटलेला असेल, तर तो योगाभ्यासाद्वारे इश्वराचे अस्तित्व व्यक्तिच्या आंतरीक जाणिवेतही आहे हे दिसण्यापर्यंत नेऊ शकेल. किंबहुना, योगातील विशिष्ट "देहाधारीत" कृती अचूक करीत गेल्यास "इश्वराचे अस्तित्व" जाणवु शकतेच शकते, भले ती व्यक्ति नास्तिक असेल. मात्र यात एक गोची अशी की, नास्तिक व्यक्ति "जाणवलेल्या अनुभव/अनुभुतीसही" नाकारण्याचे वा "प्रयोगशाळेत" सिद्ध करुन घेण्याचे हट्टास पेटली असेल, तर तिची प्रगती तिथेच खुंटेल, भले गुरू कितीही का चांगला असेना, वा व्यक्तिच्या योगकृति कितीही बरोबर असोत.

>>> २) 'इश्वरप्रणिधान' हे तत्व तिला पाळता येणार नाही. मग केवळ एकाच तत्वावाचून बाकीची साधना व्यर्थ जावी का? <<<
योगशास्त्रातील "इश्वरप्रणिधान" हे तत्व चिरस्थायी असेल याची निश्चिती असल्यास, अर्थातच कोण आस्तिक वा नास्तिक व्यक्ति ते तत्व मानते मा न मानते यास महत्व न उरता, जर व्यक्तिकडुन नेमक्या कृति होत गेल्या तर "इश्वरतत्व" त्यास जाणवेलच जाणवेल. (इथे वाल्या कोळ्याचे उदाहरण घेता येईल का?)
इथे ते तत्व त्या त्या व्यक्तिने योगकृति करण्याचे आधीच्या "अज्ञानी" अवस्थेत मानले वा न मानले याचा फरकच पडत नाही. जर व्यक्ति मानत नसेल, तर मुळात ती योगकृति करायला जाणार नाही. जर योग्य गुरु नसेल, तर योगकृतितुन इशदर्शन होणे अशक्य, किंवा अचुक कृति मुळे जरी ईशदर्शन झाले तरी ते त्या व्यक्तिला आकळणे अशक्य. अन मुळात ईश्वराचे अस्तित्वच अमान्य असणार्‍यास ते कळले वा न कळले तरी फरक पडणार नाही, मात्र योगकृतिमुळे होणारे दैहिक /अध्यात्मिक फायदे मात्र त्यास जरुर मिळतील.
मुळात इश्वरप्रणिधान हे तत्व पाळता येणार नाही हे म्हणणे अशागत होते की मला "प्रवासास तर निघायचे आहे, पण कुठे जायचे ते गंतव्य स्थानच निश्चित नाही/मला मान्य नाही/मला माहित नाही" Proud
योगसाधना तर करायची आहे, पण तिचे अंतिम उद्दिष्टावरच माझा काडीचाही विश्वास नाही... Lol
तर मग काय होईल, वर कुणीतरी व्यायाम व योग यातिल फरक जसा सांगितला आहे तस्सेच, की मी जिम मधे जाऊन जोरबैठकाडंबेल्स वगैरे प्रकार करतो, ते अन इश्वरप्रणिधान तत्व न पाळता केलेला योग यात काहिच फरक असणार नाही.
यापुढे जाऊन असेही म्हणता येईल, की जर इश्वरप्रणिधान हे तत्व मान्य असेल, तर मात्र जोरबैठकाडंबेल्स या कृतितही तुम्हाला ते जाणवत जाईल (मला जाणवते - तपशील कधीतरी). किंबहुना केवळ योगच नव्हे तर आयुष्यातिल कोणत्याही कृतित जर इश्वरप्रणिधानतेची जाणिव जरी ठेवली तरी ती ती कृती व्यक्तिस कृतीच्या यशस्वितेच्या/परिणांमांच्या दृष्टीने वेगळ्याच उच्च पातळीवर घेऊन जाईल.
त्याहीपुढे जाउन मी असेही म्हणेन की की आयुष्यातील कोणत्याही कृतित इश्वरप्रणिधानतेची जाणिव ठेवुन ती ती कृति करणे म्हणजे देखिल एकप्रकारची "योगसाधनाच" होय. Happy
अन याच साधनेचा परिष्कृत अविष्कार म्हणजे पातंजल योगसाधना.

(कुणीतरी "इश्वरप्रणिधान" याचा मेचक्या शब्दात नेमका अपेक्षित अर्थ उलगडुन देईल काय? )

>>> भक्तीमार्गासारखे इश्वरात विलीन होणे हे योगाचे गंतव्य पण नाहीये. In fact योगात इश्वर इतर कुठेच भेटत नाही. मग या एकाच तत्वापुरती इश्वर ही संकल्पना का वापरली आहे? <<<,

माझ्यामते, योगक्रियेत, देहाचे मृत्यु येईपर्यंतचे अस्तित्व 'अमान्य" न करता, त्या देहाचाच वापर सुयोग्य रितीने करणे अपेक्षित आहे. योगात "इश्वर" भेटत नाही किंवा योगविचार इश्वरास अमान्य करतो हा भ्रमस्वरुप विचार आहे असे वाटते. जर भक्तिमार्गासारखी वा निसर्गात इश्वर शोधण्याची सगुण साधना करायची असल्यास "त्या त्या इश्वराची असंख्य वर्णने" येतिल, आली असती, पण योगाभ्यासाद्वारे "निर्गुण" इश्वरतत्वाशी ओळख होत असल्याने अर्थातच इश्वराचे सगुण वर्णन्/अस्तित्व सांगण्याचे/दाखविण्याचे/वर्णिण्याचे प्रयोजनच उरत नाही. उचित पद्धतीने योग्य गुरुचे मार्गदर्शन (नशिबात असल्यास) वापरुन सुयोग्य कृति करित गेल्यास जे जाणवेल ते निव्वळ निर्गुण स्वरुपातील असेल, अन जर ते निर्गुणच आहे, तर त्याचे वेगळे वर्णन काय करणार?
देहाधारीत समाधी साधन हे इश्वराशी एकरुप होण्याचीच कृति आहे असे मला वाटते. निर्गुण इश्वराशी यौगिक क्रियांद्वारे एकरुप होणे शक्य झाल्यास, बाकी "सामान्य" जनांस सांगण्याकरता "निर्गुणाचे' कोणते वर्णन करता येणार आहे? असो.

>>पूरक - संथ गतीने घेतलेला श्वास
रेचक - त्याहीपेक्षा संथ गतीने सोडलेला प्रश्वास
कुंभक - रोखलेला श्वास
१:४:२ हे श्वासोच्छवासाचे प्रमाण आहे.<<
थोड विस्ताराने सांगाल का?

प्रकाशराव, अचूक पकडलेत बर्का... Lol
तो सिक्वेन्स (क्रम) पूरक, कुंभक व रेचक असा हवा ना?
आम्ही करतो तो असा की एक गायत्री मंत्र मनात म्हणेस्तोवर/पुटपुटेस्तोवर श्वास एका गतिने घ्यायचा.
चार वेळा गायत्री मंत्र म्हणेस्तोवर रोखुन धरायचा अन
दोन वेळा गायत्री मंत्र म्हणेस्तोवर हलके एका गतिने सोडायचा.
(इथे आधी दोन व चार असा क्रम लिहिला होता, माधव यांनी निदर्शनास आणल्यावर दुरुस्त करुन लिहिला असे.)
आता ज्यांच्या मंत्रतंत्रवगैरेवर विश्वास नसेल त्यांनी १-४-२ या प्रमाणाकरता आकडे/वेळ वगैरे काहीही वापरावे, एखादि हिंदी गाण्याची धुन्/ओळ्/सैराटची गाणी वापरली तरी चालतील. Proud काळजी इतकीच घ्यायची की एकच एक ओळ वगैरे ठरवुन घ्यायची, तंद्रीत पुढचे आख्खे गाणे म्हणू लागायचे नाही... Lol

लिंबू, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. काही पटले काही नाही पटले / समजले. नंतर सविस्तर लिहीन त्याबद्दल. Happy

@प्रकाश,
१ भाग पुरक (श्वास घेणे) : ४ भाग कुंभक (श्वास रोखणे) : २ भाग रेचक (श्वास सोडणे) हे बहुमान्य प्रमाण आहे. (बहुतेक घेरंड संहितेतील गुणोत्तर वेगळे आहे). पण फक्त हे वाचून प्राणायाम अजिबात करू नका. योग्य खबरदारी नाही घेतलीत तर अपरीमीत नुकसानच होईल (थोडे आर्याने लिहीले आहेच). त्यामुळे जाणकाराकडूनच शिकून घ्या. आणि बर्‍याचदा आपल्याला शुल्ल्लक वाटणारी सुचनाही महत्वाची असते हे ध्यानात ठेऊन सूचनांचे काटेकोर पालन करा. एक चटकन आठवणारा श्लोक देतो त्यावरून कल्पना येईलः

यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेत्वश्यः शनै शनै
तथैव सेवितोर्वायु: अन्यथा हन्ति साधकम् ||

श्वास प्रश्वास हे जंगली श्वापदांइतके भयंकर असू शकतात.

@लिंबू, १-२-४ असे प्रमाण मी तरी ऐकले नाहीये. नक्की खात्री करून सांगाल का ?

Pages