‘माथेरान’ व्हाया ‘धोदाणी’ ते किल्ले ‘पेब’ उर्फ ‘विकटगड’
‘माथेरान’ व्हाया ‘धोदाणी’ ते किल्ले ‘पेब’ उर्फ ‘विकटगड’ हा ट्रेक खरेतर चार वर्षांपूर्वी केला. पण परवा अचानक मायबोलीकर सह्यमित्र यो रॉक्स (योगेश कानडे ) शी या ट्रेक विषयी बोलताना या आठवणी जाग्या झाल्या, तेच थोडेफार आठवत जुने फोटो पहात लिहिण्याच्या प्रयत्न केला आहे.
आमच्या घरात काही महिन्यांपूर्वीच छोट्या परीचे आगमन झाले होते, सर्व दिवस तिच्यासमवेतच आनंदात, मजेत भराभर निघून जात होते. सहाजिकच त्यामुळे सह्याद्रीतले ट्रेक बंदच होते.
तारिख २९-०९-२०१२ बहुतेक अनंत चतुर्दशी चा सुट्टीचा दिवस होता. मग पुन्हा जोमाने सुरूवात करायला एक दिवसाची सवड मिळवली. पण एक दिवसाचा ट्रेक ही तेवढाच हटके हवा, तिच तिच बघितलेली ठिकाणं नको होती. लागलीच नारायण अंकल ने पंधरा वर्षापूर्वी केलेला ‘धोदाणी’ ते ‘माथेरान’ हा रूट सुचवला. मग काय मी तर त्याला जोडून ‘पेब’ किल्ला पण करू हे जाहिर करून टाकले तसे या आधी ही ‘पेब’ ला दोन वेळा जाणे झाले होते तरीही, कारण सह्याद्रीत पुनरागमनासाठी दमदार तंगडतोड एक दिवसाचा जवळचा ट्रेक हवा होता. या ट्रेक ला आमच्यासोबत विनायक पण सामील झाला.
सकाळीच पनवेल एस टी स्थानकात उतरून ‘धोदाणी’ एस टी ची वाट पहात चहा नाश्ता उरकला. आठ वाजेच्या सुमारास एस टी लागली. गर्दीतले पनवेल मागे टाकून एस टी ने माथेरान रोड पकडला. नेरे, वाजे पुढे गाढेश्वर तलाव मागे टाकत पाऊण तासात धोदाणीत उतरलो. समोरच माथेरानचा भव्य डोंगर तसेच डावीकडे ‘पेब’ व त्याला जोडणारी खिंड दिसली.
फोटोत उजवीकडे माथेरानचा डोंगर आणि मध्यभागी पेब किल्ला. गावातली बहुतांश मंडळी कामाकरता पनवेल तळोजा रसायनीला स्थायिक झाली तर काही थोड्याफार प्रमाणात शेतीला हातभार. सप्टेंबर अखेर असल्यामुळे अर्थातच सर्वत्र हिरवळच पण पाऊसाने उघडीप दिल्याने सकाळच्या कोवळ्या वातावरणातही सुर्यराव चांगलेच शेकून काढत होते. अंदाजे ७००-८०० मीटर उंचीच्या माथेरान या जगातल्या सर्वात छोट्या अशा गिरीस्थानकला जाण्याची प्रचलित वाट पूर्वेकडून नेरळहून गाडी रस्त्याने अथवा माथेरानची राणी छोटी ट्रेन आहेच. माथेरान बद्दल भरपूर माहिती पुस्तकात आणि आंतरजालावर आहेच त्या बद्दल काही जास्त लिहीत नाही. पण या व्यतिरिक्त माथेरानला काही स्थानिक गावकरी, कातकरी-ठाकरं-धनगर, गुराखी क्वचित आमच्यासारखे डोंगरवेड्यांच्या वाटा आहेत. त्या प्रामुख्याने अशा, वन ट्री हिल ची वाट, पिसारनाथ मंदिराकडील शिडीची वाट, रामबाग पॉईंट, गारबेट पॉईंट, तसेच धोदाणी गावातून सनसेट पॉईंट आणि मंकी पॉईंट.
आम्ही गावातून निघून मंकी पॉईंटकडे नेणारी वाट पकडली. गावतल्या शेतातल्या बांधावरून चालत हळूहळू वाट चढणीला लागली.
सनसेट पॉईंटला उजवीकडे ठेवत वळसा अगदी मळलेल्या वाटेने दिड तासातच वाटेतले नव्याने बांधलेले छोटेसे शिवमंदिर लागले.
इथूनच उत्तरेकडे चंदेरी, म्हैसमाळ नजरेत आले. पुढे एक दोन ठिकाणी अतिवृष्टीमुळे वाट ढासळली होती, पण गावकरींनी पर्यायी मार्ग तयार केला होता.
दोन तासातच मंकी पॉईंटवर दाखल झालो, समोरच काही अमराठी भाषिक पर्यटक पहातच राहिले हे कसे आणि कुठून वर आले. आमच्या घामाने भिजलेल्या अवताराकडे पाहून त्यांच्यातला काहींनी आमच्यावर प्रश्नावली सुरू केली, थोडक्यात आटोपते घेत तिथून सटकलो.
माथेरान अगदी नावाप्रमाणेच माथ्यावर गर्द रान असलेले सुंदर गिरीस्थान, वर पोहचल्यावर हवेत त्या गर्द झाडींच्या सावलीत खुपच गार वाटले. चढाईचा घामटा कुठच्याकुठे निघून गेला. पावसाळाअखेर किंवा अनंत चतुर्दशीचा दिवस असल्यामुळे असेल कदाचित पण इथे वर काहीच गर्दी नव्हती. दुपारच्या जेवणासाठी बाजारपेठेतले छोटेखानी हॉटेल गाठले. नाव आत्ता आठवत नाही पण अत्यंत स्वादिष्ट आणि रूचकर अशी पुरी भाजी खाऊन आत्मा जामच सुखावला. मी आत्ता पर्यंत अनेक वेळा माथेरानला तिन्ही ऋतूत भरपूर हिंडलो आहे पण खाण्याच्या जेवणाच्या कुठल्याही बाबतीत मला माथेरान ने कधीच निराश केले नाही. बाजारपेठेतून वाट काढत ‘अमन लॉज’ थांबा पर्यत आलो.
इथून पुढे मात्र थेट छोटी ट्रेनचे रूळ पकडले ते थेट पेब किल्ला जवळ येईपर्यंत, पुढे हिच ट्रेन माथेरानच्या पेनॉरमा पॉईंटच्या खालून वळसा घालून पलीकडे नेरळच्या दिशेने जाते.
पलीकडच्या बाजूला टांगावाल्यांचे घोडे आरामात खाद्यभ्रमंती करत होते.
उजवीकडे माथेरानचा कडा आणि डावीकडे दरी मध्ये तो रूळ मार्ग अश्या तासाभर रमणीय चालीनंतर पेब किल्ला आणि माथेरानचा डोंगर यांच्या खिंडीजवळ आलो.
वाटेत या कड्यावरच्या गणपती बाप्पाने लक्ष वेधले.
समोर पेब किल्ला त्याच्या माथेरानच्या दिशेला असलेला बुरूज, पाठिमागे पांढरा ठिपका हल्ली काही वर्षापूर्वी कल्याणचाच कुणी साधक त्याचा आश्रम आणि वर टोकावर गुरू दत्तात्रयांचे स्थान ज्याला हल्ली प्रति गिरीनार म्हणतात.
बुरूजाच्या खालच्या बाजूला उजवीकडे पाऊल वाट स्पष्ट दिसत होती तिच वाट पुढे उजवीकडच्या घळीतून शिडीने वर चढते. आधीही पेब ते माथेरान असा ट्रेक पहिल्यांदा जून २००२ साली केला असल्याने माहित होतेच.
इथेच थांबून आम्ही आलो त्या वाटेचा नजारा बघितला, उजवीकडे सनसेट पॉईंट ज्याच्या अलीकडून आम्ही चढाईला सुरूवात केली, पायथ्याला धोदाणी गाव, गाढेश्वर तलाव, छोट्या वाड्या व पाडे.
लोखंडी कमान त्यावर काही छोट्या घंटा टांगलेल्या डावीकडची अचूक वाट हेरली, वाटेत काही ठिकाणी कंबरेएवढे गवत वाढलेले होते.
त्यातून मार्ग काढत शिडीने खालच्या बाजूला उतरलो किल्ला समोर ठेवून आडवी ट्रेव्हर्सी मारून मुख्य खिंडीत आलो.
मागे वळून पाहिले तर आम्ही आलो ती वाट आणि वर माथेरानचा पेनॉरमा पॉईंट.
चढाईने थोडा दम काढलाच पुढे तिरकी चढाई करत घळीतल्या शिडींच्या आधारे माथ्यावर पोहचलो.
पुर्वेला सह्याद्रीच्या मुख्य रांगेतले राजमाची भीमाशंकर नजरेत आले. बुरूज वगैरे पहाणीकरत आश्रमाजवळ आलो.
आजुबाजूचा परिसर खुपच सुंदर आणि रमणीय,स्वच्छ आंगण, होमहवन कुंड ,बाजूला गायी गुरांचा मुक्त वावर होता. कुणी जोशी ? नामक साधक पंधरा वर्षापासून स्वामी समर्थांची साधना करतोय. साधकाने त्याचे भलेबुरे अनुभव कथन केले, पुढे अंकल आणि विनायकच्या अध्यात्मक गप्पा चांगल्याच रंगत गेल्या अर्ध्या पाऊण तासात भानावर येऊन आवरते घेत निघालो. खऱतर तिथून निघावेसे वाटत नव्हते पण मुक्काम करता येणे शक्य नव्हते. मला तर ही जागा पाहून मी आणि अंकल ने ऑक्टोबर २००६ मध्ये केलेल्या सिध्दगड- साखरमाची -गायदरा घाट- भट्टीचे रान -कोंढवळ-भीमाशंकर ट्रेकच्या वेळी भीमाशंकर ला नागफणी वाटेत हनुमान मंदिराच्या जवळ केलेल्या साधूंच्या कुटीतला मुक्काम आठवला. सुरूवातीला नकार देणार्या त्या साधूने नंतर असे काही आदरतिथ्य केले.. असो तो एका वेगळाच लेखाचा विषय होईल.
आश्रमाच्या मागून पलीकडे पूर्वेला मुख्य वाटेला लागलो, उजवीकडच्या कड्यात पेब ची मुख्य गुहा दिसली.
डावीकडच्या कड्यात पाण्याने भरलेले टाके, जुजबी तटबंदी आणि आजूबाजूला सोनकीची पिवळी धम्मक फुले.
कातळवरच्या पावठ्याने पुढे सरकत पुन्हा शिडीने उतरून गुहेत आलो.
उजवीकडे समोरच किल्ले चंदेरी.
क्षणभर विश्रांती घेऊन परतीच्या वाटेला लागलो, घड्याळात पाहिले तर सहा वाजत आले होते. तसाही नेरळ स्टेशन गाठे पर्यंत अंधार होणारच होता.
पण तरीही जितके शक्य होईल तेवढे मुख्य खिंडीतले आणि जंगलातले अतंर काळोख व्हायच्या आत पार करायचे ठरले. छोटासा कातळकडा उतरून मुख्य वाटेने खिंडीत आलो इथे नेहमीप्रमाणे विजेच्या उच्च दाबाच्या तारांची सोबत होतीच. अचानक काही क्षणातच वातावरण बद्लले गेले. सुर्यास्ताच्या वेळीस ढगांचा गडगडाट आणि विजा चमाकायला सुरूवात, त्यामुळे आणखी आणि लवकरच अंधारूण आले. काही वेळातच पावसाला सुरूवात झाली दिवसभर चांगले उन आणि आत्ता सायंकाळी पाऊस. सावकाशपणे मळलेल्या पायवाटेने खिंडीतून निघाल्यापासून तासाभरात उतरलो. नेमके खाली उतरल्यावर पाऊस गायब, समोर पलीकडे कुठल्यातरी आश्रमातून भजनाचे सूर स्पीकर मुळे ऐकू येत होते. अंधारात वाटेतल्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्या,पोल्ट्री फार्म पार करत एकदाचे नेरळ स्टेशनला पोहचलो, तिकीट काढेपर्यंत समोरून लोकल गेली. मग काय पुढे तासभर निवांत आमच्या तिघांच्या गप्पा सुरू ते पुढचा ट्रेक कोणता या विषयावर. खऱच घरी आलो ते प्रचंड समाधानी मनाने एक दिवसाचा सुंदर असा तंगडतोड ट्रेक करूनच.अर्थात नंतर पुढे भटकंतीला ग्रीन सिग्नल हा मिळतच गेला.
योगेश चंद्रकांत आहिरे.
छान लिहीलयं.
छान लिहीलयं.
मस्त. किल्ल्यावर अतिक्रमण
मस्त. किल्ल्यावर अतिक्रमण झालेल्यांपैकी हा एक किल्ला. देवाधर्माच्या नावाखाली आपल्या बापजाद्याची मालमत्ता असल्यासारख तिथल्या वास्तूंचा वापर केला जातो. गुहा बंद करून कातळावरा रंगरंगोटी करून स्वतःची खाजगी मालमत्ता आसल्याप्रमाणे वापरणे. ईतिहास विसरून तिथे चमत्कार/यात्रा/जत्रा चालू करण्याचा मानस आहे त्या मंडळींचा. तूच लिहील्याप्रमाणे त्याला हे लोक प्रतीगिरनार म्हणायला लागले आहेत. त्यावरूनच यांना तिथे काय अभिप्रेत आहे ते कळून येते. कड्यावरचा गणपती हे आणखी एक उदाहरण.
छान!!! लेख आणि फोटो दोन्ही.
छान!!! लेख आणि फोटो दोन्ही.
छान आहेत पिक
छान आहेत पिक ..............एक्दा तरि जावे लागेल
छान वर्णन, आवडले.
छान वर्णन, आवडले.
वाचन नाही केले अजून पण चित्र
वाचन नाही केले अजून पण चित्र बघून काय ते कळले. माथेरान अजून पाहिले नाही. तुम्ही एकदा चिखलदरा पण करा.
वृत्तांत आणि फोटो आवडले.
वृत्तांत आणि फोटो आवडले.
छान लेख आणि फोटो. माझा भाऊ
छान लेख आणि फोटो. माझा भाऊ आणि वहिनी नेहमी या वाटेने जात असत.
स्वरा, नरेश, विश्या, प्रसाद,
स्वरा, नरेश, विश्या, प्रसाद, इंद्रा आणि दिनेशदा खुप खुप धन्यवाद _/\_
हर्ट- चिखलदरा.... लवकरच भेट द्यायचा इरादा आहे.
सतिश- भावना पोहचल्या.
वाह, मस्त लेख... फोटोही
वाह, मस्त लेख... फोटोही सुंदरच ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धोधाणीकडून वर येताना डावीकडे
धोधाणीकडून वर येताना डावीकडे गेल्यास एको पॅाइंट कसा येईल?मंकी अथवा मालडुंगा येईल.अंकाइ ( मनमाड)च्या गुहासुद्धा साधुलोकांनी बळकावल्या आहेत.
मस्त रे योगेश, छान वर्णन,
मस्त रे योगेश,
छान वर्णन, आवडले. मी आणी आका गेलोय पेब ला याच रस्त्याने पण धोदाणी आता आठ्वत नाहीये
होय srd अगदी बरोबर तो मंकी
होय srd अगदी बरोबर तो मंकी पॉईंटच आहे.
ट्रेक खुप आधी केला असल्याने आत्ता लेख लिहीत असताना चूक झाली, त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
तुमची प्रतिक्रिया दुपारी बघितली तसेच मी त्यावेळी सोबत असलेल्या नारायण अंकल यांना हि विचारले, त्यांनी क्षणात सांगितले Its monkey point.
व्वा... मस्त लिहिलय, अन फोटो
व्वा... मस्त लिहिलय, अन फोटो इथे दिल्याबद्दल धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधकाचे लिहिलेस ते ही छान , आवडले.... अजुनही इकडे "सुधारक" महाराष्ट्रात असे एकाकी जाऊन रहाणारे साधक आहेत हे पाहुन आश्चर्यही वाटले.
मस्त लिहिलंयस योगेश फोटोपण
मस्त लिहिलंयस योगेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटोपण खासचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योगेश, छान माहिती... उपयुक्त
योगेश,
छान माहिती... उपयुक्त फोटू!
पेब मस्त आहेच... गर्दी टाळून जावे लागते.
ओव्हरऑल, गडावरचे साधूलोक हा प्रकार कधी कधी आपल्याला आणि गडाला त्रासदायक होऊ शकतो.
चंदेरी काय दिसतो - वाह!!!
लिहीत राहा...
त्यात दिलगिरी कशाला हवी? नाव
त्यात दिलगिरी कशाला हवी? नाव विसरायला होतं. सिद्धगडावरच्या गुहेतही एक म्हारळ ( कल्याण जवळचे)चा माणूस राहात होता साधू बनून.त्याने माझे छान स्वागत केले होते.तिथे राहिलोही होतो.
शार्लोटलेक- पिसरनाथ येथून एक वाट प्रबळगडाच्या दरीत उतरते तिथून कोणी ट्रेक केलाय का?
धन्यवाद जिप्सी साई, अगदी
धन्यवाद जिप्सी
साई, अगदी बरोबर या दिवसात तरी शनिवार रविवार पेब नकोच. गडावरचे साधु हा एक वेगळाच चर्चेचा विषय होऊ शकतो पण असो.
SRD, _/\_ सिद्धगडावरच्या गुहेतही एक म्हारळ ( कल्याण जवळचे)चा माणूस राहात होता साधू बनून.त्याने माझे छान स्वागत केले होते.तिथे राहिलोही होतो. >>> खऱय. या साधुचे नाव शिवा भोईर. हे शहाड येथील IDI कंपनीत कामाला होते. नंतर सर्व घर दार सोडून दासबोध अभ्यासाला ? लागले होते.
हेच माझ्या सोबतचे नारायण अंकल तिथे गेले होते तेव्हा या साधु महाराजांनी त्याच्या काही खास लोकांसाठी रानडुक्कराचे मटणचा बेत केला होता. दासबोध अध्यात्म आणि असला प्रकार यावरून अंकलची आणि साधुची चांगलीच जुंपली होती.
नंतर तर मला असेही कळाले आमच्या कल्याण मधील काही खास ट्रेकर तिथे हिच मेजवानी झोडायला जात असत. पण साधु भारीच प्रसिध्द होते.
पिसरनाथ ते प्रबळगड ट्रेक रूट आहेच.
माझ्या माहितीतले मधुकर धुरी यांनी हा रूट केलेला आहे.
हि त्याची लिंक
http://oikosnatura.blogspot.in/2014/03/blog-post.html
Srd पट्टा किल्ल्याचा सातबारा
Srd
पट्टा किल्ल्याचा सातबारा पण साधूने बळकावलाय.
सातमाळा रांगेतील संपुर्ण विभाग तंत्र मंत्र वगैरे मध्ये जास्तच गुरफटलेला आहे अस वाटत. चारपाच महीन्यापूर्वी धोडपला गेलो होतो. हत्ती गावातच एक आश्रम आहे. सकाळीसकाळी तिथे पोहोचलो तेंव्हा साधू आणि गावकरी यांच सामुदायिक गांजापान चालू होते. गावातीलच गाडीतून प्रवास केलेला. गाडीच्या ड्रावयरने शेजारील सप्तशृंगीकडे बोट दाखवून सांगितलं की बघा तिकडे किती पैसा येतोय आणि आमच्याकडे कोणी येतच नाही. त्याचा रोख ईखारा सुळक्याखालील आश्रमाकडे होता. त्याला याचं खुप दुःख होतं. मी त्याला धीर दिला कि बाबा रे काळृजी करू नकोस, भगवान के घर देर है अंधेर नही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गावकर्यांनी सिद्धगडाची एक मजेशीर हकीकत सांगितलेली. तो जो भोईरबाबा होता ना त्याची. तो ज्या गुहेत राहायचा त्या गुहेवरूनच एक मुलगा खाली पडलेला, तो थेट त्या गुहेच्या तोंडावरच आणि मरण पावलेला. त्या घटनेनंतर त्या बाबाने घाबरून गुहेचा त्याग करून परत खाली "सामान्य माणसात" आला.
सिद्धगड ( इर्शाळप्रमाणेच )
सिद्धगड ( इर्शाळप्रमाणेच ) घातकी आहे.मी सिद्धगडावर राहाण्याच्या तयारीनेच गेलेलो होतो.अगोदर गुहेत त्याची भेट झाली.साधू म्हणाला "वर जाऊ नका धोका आहे आणि आसरा काहीच नाही. इकडचे वाटेचे धोंडे निखळतात.त्यावरून एकजण घसरून पडलाय. वरती एक गट गेलेला पण त्यांच्यांतला एकजण रात्रीच्या गारठ्याने अर्धमेला झाला.सकाळी मुलं खाली आली सांगायला मग मी त्याला उचलून खाली आणून गरम पाण्याने शेकले. शुद्धिवर आला." मी म्हटलं "इतका आलोय तर वर काय आहे ते बघतो." "ठीक आहे, पाहून परत इकडेच या जेवण करून ठेवतो.उद्या मीपण कल्याणला जाणार आहे दोघे एकदमच निघू."
मी पाच वाजता वर गेलो आणि वाटेचे धोंडे हलवून पाहिले ते निखळत होते. मग खाली आलो तेव्हा साधू म्हणाला "तुम्ही वर होता तेव्हा धोंडे पडत होते इथे.बरं झालं परत आलात." संध्याकाळी त्याने पेटी वाजवून भजन म्हटले मग जेवणं केली.मजा वाटली.सकाळी त्याच्याबरोबर वाडीत आलो,म्हशाला आलो तेव्हा गाववाले त्याचे फारच आदरातिथ्य करत होते.
तुमच्या लेखात थोडं अवांतर
तुमच्या लेखात थोडं अवांतर झालं पण सुचलं म्हणून लिहिलं. उप्रदेशातून एक साधु लोकांची ग्यान्गच फिरत असते. जिथे देवळं वगैरे बळकावता येतील तिथे चिवटपणे राहातात आणि हळूहळू बस्तान बसवतात.असाच एकजण चौल ( रेवदंडा)च्या दत्तमंदिराकडे हिंगुळजा वाट आहे तिकडे चिकाटीने आठदहा वर्षं राहातो आहे.हळूहळू आश्रम बांधेल. बोरिवलीच्या कान्हेरी लेण्याजवळचे मोठे आश्रम होऊन चाळीसपन्नास वर्षं झाली.
उप्रदेशातून एक साधु लोकांची
उप्रदेशातून एक साधु लोकांची ग्यान्गच फिरत असते. जिथे देवळं वगैरे बळकावता येतील तिथे चिवटपणे राहातात आणि हळूहळू बस्तान बसवतात.>>>> +१
सिद्धगडाच्या बालेकिल्ल्याचा कातळ धोकादायकच आहे. त्यात लोक गुहेच्या इथेच गंडतात. वास्तविक गुहेच्या शेजारील टाक्याला वळसा घातल्यानंतर तुटलेल्या पायर्या आहेत, ज्या लगेच दिसत नाहीत. पण लोक इथेच फसतात आणि टाक्यावरुनच चढाई करतात. हा टप्पा घातकी आहे, तो मुलगा इथूनच खाली पडलेला.
उप्रदेशातून एक साधु लोकांची
उप्रदेशातून एक साधु लोकांची ग्यान्गच फिरत असते. जिथे देवळं वगैरे बळकावता येतील तिथे चिवटपणे राहातात आणि हळूहळू बस्तान बसवतात.>>>> +१११
बहुतेक गुन्हेगार प्रव्रुत्ती आणि ठग असतात.
सतिश सिद्धगडाबद्दल अगदी सहमत, बहुतेक ट्रेकर माथ्यावर जात ही नाहीत.
अगदी गुन्हेगारी प्रवृत्ती
अगदी गुन्हेगारी प्रवृत्ती नाही म्हणता येणार परंतू जागा बळकावयची मग स्थानिक लोकांचा कल कुठल्या दैवताकडे आहे ते पाहून त्या देवाचं मंदिर बांधून वार्षिक उत्सव करवायचा.आश्रम बांधून राहाण्याची व्यवस्था चखोट करायची असा कार्यक्रम असतो.
गेल्या पावसाळ्यात मी ही
गेल्या पावसाळ्यात मी ही माझ्या मित्रांसोबत सिद्धगड केला. खरच पावसाळ्यात सिद्धगड करणे अगदी रमणीय आहे. मात्र हे फक्त सिद्धगड माची पर्यंतच, त्यापुढे गुहे पर्यंत ही जाणे ठीक आहे. मात्र त्या पुढील वाट बहुतेक आपण चुकतोच. गुहेच्या पुढे एक वाट जाताना दिसते मात्र ती थोड्या पुढे जाऊन संपते . सिद्धगड माथा गाठण्यासाठी गुहेच्या उजव्या बाजूने वरती जावे लागते. वाट अशी काही दिसतच नाही. पण उजव्या बाजूने दगडी कपारी शोधत शोधत वर चढायचे. आम्ही भर पावसात सिद्धगड सर केला होता. वाट खूपच निसरडी आहे. पण ही वाट मला सापडली कारण सिद्धगड ट्रेक करण्या पूर्वी मी सुंटुन्याशी चर्चा करून वाट नीट विचारून घेतली होती. अन्यथा मी ही सिद्धगड सर करू शकलो नसतो. धन्यवाद सूनटून्या....