सूड

Submitted by पायस on 14 July, 2016 - 00:42

प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात असते. अनेकदा बटरफ्लाय इफेक्टनुसार ती पूर्णतया अकल्पित असते. या गोष्टीची सुरुवातही अशीच काहीशी आहे.
त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस आला कि दिवे गेलेच पाहिजेत या नियमाचे पालन अगदी काटेकोरपणे होत असल्याने तो संपूर्ण भाग अंधारलेला होता. मधूनच एखादी वीज चमकली तर तेवढाच काय तो प्रकाशाचा स्त्रोत. अशा वेळी तो एकटाच धावत होता. त्याच्यामागे जे कोणी होते त्यांच्या तावडीत सापडता तर ... त्याला आपले काय हाल होतील याची कल्पनाही करवत नव्हती. डोक्यात एकीकडे विचारचक्र - आज परत प्रकाशचे पाय धरावे लागणार. लहानपणचा पक्या असता तर गपचूप आत घेतलं असतं पण आज साला कुठल्याशा मोठ्या कंपनीत आहे. खाऊ बोलणी आता थोडी काय त्यात एवढं? ही खिडकी उघडी ठेवतो ना तो, येस्स, चलो अंदर!
आत घुसताच त्याने चपळाईने खिडकी लावली आणि तो बाहेरच्या माणसाला दिसणार नाही अशा बेताने खिडकीच्या बाजूला उभा राहिला. कानोसा घेत तो अंदाज लावत होता कि आता हे लोक काय करणार? थोड्या वेळात त्यांचे विरुद्ध दिशेला पळण्याचे आवाज आले आणि त्याने निश्वास सोडला. खिशातून गोल्ड फ्लेक काढत त्याने शिलगावली. लोडशेडिंगच्या नावाने शिवी हासडत त्याने मोबाईलमधला टॉर्च लावला. त्यानंतर त्याने जे काही पाहिले ते पाहून त्याच्या तोंडातून सिगारेट खाली पडली आणि आ वासून तो बघतच राहिला. प्रकाश पंख्याला लटकत होता.

~*~*~*~*~*~

अथांग पसरलेला नद, हो नदी कसली नदच तो. मध्येच आलेली ती ढगाची चादर वगळ्यास स्वच्छ निळे आकाश. नदीचे रुपडेही देखणे, किंचित लाली आलेला तिचा प्रवाह ज्यातले मासे दिसत आहेत. आणि या सर्वांमध्ये ती उभी. गडद निळा स्लीव्हलेस टॉप व निळ्या-पिवळ्या रंगाच्या अनेक छटा दाखविणारा स्कर्ट व त्याने खुलून दिसणारा तिचा गोरा रंग. काठावरून ती हलकेच नदीत पाय घालून जणू माशांशी खेळत आहे. आणि सर्वांवर कडी तिच्या बटांना हिंदोळे देणारा अदृश्य वारा!
हे व अशी अनेक चित्रे प्रदर्शनाची शोभा वाढवत होती. या सर्वांचा निर्माता मंदार दिलखुलासपणे हसत सर्वांचे स्वागत करत होता. त्यांच्या प्रतिक्रिया आजमावत होता. प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद चांगला होताच पण तो अपेक्षितही होता. मंदारच्या नावाला आज थोडी फार का होईना, किंमत निश्चित होती.
"मग पुढे काय मंदार?"
"निश्चित असं ठरवलं नाही अजून. पण काही प्रयोग करून पाहायचे मनात आहेत. नवरसांपैकी अजून भय रस मी एक्सप्लोर केला नाही. त्यात काही कल्पना नुकत्याच सुचल्यात. बघू कसं जमतं ते कारण काही इतर असाईनमेंट्स पण आहेत."
"ते ठीक आहे हो, पण आमच्या वहिनी कुठे आहेत?"
मंदारला क्षणभरच श्वास कोंडल्यासारखे झाले व सवयीने त्याचा हात खिशात चाचपडू लागला. पण त्याची गरज पडली नाही, तो लगेच सावरला व त्याच्या डोळ्यांसमोरून कालचा प्रसंग तरळला.

......
......

खूप पूर्वीची गोष्ट! अनेक जण आपले आयुष्य कोणतीही विशेष घटना न अनुभवता, सामान्य पद्धतीने पण सुखात जगत असतात तसाच आणखी एक जण होता. बर्‍यापैकी नोकरी होती व एकंदरीत चांगलं चाललं होतं. एके दिवशी त्याच्यात आणि मालकात काही तरी वाद झाला. रातोरात होत्याचं नव्हतं झालं आणि तो रस्त्यावर आला. मनात एकाच वेळी दु:ख व संताप या भावना एकत्र आल्या कि त्याची परिणिती सूड नामक सैतानात होते. त्यालाही तो भेटलाच. सैतानाला जणू त्याच्या मनातले भाव वाचता येत असावेत. सैतान हसला, समोरचा पुरता भेदरून जाईपर्यंत भेसूर हसला. म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण होईल. हे ऐकून त्याने आपले प्राण सोडले. पण हाय रे दैवा, त्याची रवानगी नरकात झालेली आणि बघतो तर समोर सैतान हसत स्वागताला उभा! त्याला बुचकळ्यात पडलेला पाहून सैतानाने त्याला एक दृश्य दाखवले - त्याच्या मालकात सैतानाने प्रवेश केलेला. त्याने आपल्याच बायका पोरांना खोलीत कोंडून आग लावून दिली व स्वतः गळफास लावून घेतला. सर्व काही जळून खाक!
"हे... हे काय होतं? माझी इच्छा अशी तर नव्हती?"
सैतानाने छद्मी हास्य केले "सूड हा असा वणवा आहे जो एकदा पेटला कि सगळं जंगल जाळूनच थांबतो."

"बुलशिट!!" छाया उद्गारली. "काहीही वाचतोस तू सध्या मंदार. ओढून ताणून काहीतरी लिहिलंय आपलं आणि वर मला ऐकवतो आहेस. माझ्या वेळेची किंमत कळते का नाही तुला?" छायाच्या चेहर्‍याकडे बघून कोणीही सांगू शकलं असतं कि मंदारची आज काही धडगत नव्हती.
"अगं पण छाया तू कथेच्या पलीकडे जाऊन विचार करून ...." एवढं बोलण्याइतका श्वास त्याला कसाबसा पुरला पण तसंही मंदार पुढे काही बोलू शकला नसता कारण अंगावर भिरकवलेला कंगवा जो चुकवायचा होता. त्यानंतरचे दोन्ही हात जोडत छायाचे आलेले शब्द मात्र झेलणे भाग होते
"चूक झाली माझी! जा पांढर्‍या कागदावर फराटे मार आपल्या स्टुडिओत जाऊन. तेवढंच जमतं तुला. मला ऑफिसला उशीर होतोय."
मंदार खिडकीतून छायाच्या गाडीकडे बघत होता. हवेत त्याचा हात फिरत होता. तर्जनी व अंगठा जुळवून तो एक अदृश्य कुंचला फिरवत जणू ते दृश्य चितारत होता. अर्थात त्याच्या हावभावावरून स्पष्ट कळत होते कि ती एक छाया मात्र होती.

.........
.........

"अरे बघत काय राहिला नुसता? येणार आहेत ना?"
मंदार सावरला. "अं हो तिला काही कामे होती त्यामुळे उशीर होईल असं म्हणालेली ती. निघाली असणार ती ऑफिसवरून, येतच असेल. ही काय आलीच" असे म्हणत गॅलरीच्या आत शिरत असलेल्या छायाला रिसिव्ह करायला प्रसन्न हसत मंदार तिच्या दिशेने गेला. छाया देखील सॉरी डार्लिंग करत पुढे झाली आणि दोघेही शांतपणे आलेल्या पाहुण्यांबरोबर गप्पागोष्टी करण्यात मग्न झाले.

~*~*~*~*~*~

छाया आणि मंदार; समाजाच्या दृष्टीने एक यशस्वी जोडपे. मंदार नावाजलेला चित्रकार तर छाया यशस्वी व्यवसायिक. मंदारला विचाराल तर त्याला तो दिवस पूर्णपणे लक्षात आहे. तिच्या वडलांना आधी खरं वाटेना कि आपली मुलगी प्रेमात पडली आहे. मंदारची परिस्थिती चांगली असली तरी छायाच्या श्रीमंतीपुढे ती काहीच नव्हती. तिचे वडील मुकुंदराव फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतले मोठे प्रस्थ होते. त्यांच्या नजरेला नजर द्यायचं धाडसच मंदारमध्ये नव्हतं. पण हा काही बॉलिवूडचा सिनेमा नव्हता - अमीर बाप क्लिशे - त्यांनी अगदी सहज होकार दिला आणि लग्न पण झाले. अर्थात तेव्हा मंदारला त्या दिवशी झालेले बोलणे नीट समजले नव्हते. त्या रात्री सेलिब्रेशन म्हणून दोघे प्यायला बसले. मंदार अजूनही थोडासा बिचकलेलाच होता.
"मंदार, एक महत्त्वाचं बोलतो. त्याला तू जे काही उत्तर देशील त्याचा माझ्या तुमच्या लग्नाला दिलेल्या होकारावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे खरं बोल, बिनधास्त बोल."
तो अजूनच गोंधळला. "काय बोलायचंय तुम्हाला?"
मुकुंदराव हसले. "छाया माझी मुलगी आहे, त्यात एकुलती एक. माझ्यानंतर माझा हा बिझिनेस तिला सांभाळायची, पुढे चालवायची इच्छा आहे याची तुला कल्पना आहे का?"
"हो. मी पुन्हा एकदा सांगतो मला या सर्वात काही रस नाही, मला फक्त छाया आणि माझी कला एवढंच ..."
मुकुंदरावांनी त्याला थांबवले. "छाया महत्त्वकांक्षी आहे, बोल्ड आहे. अशा व्यक्तींना अधिकार गाजवायला आवडतो. ती उत्तम व्यवसायिक होईल यात वाद नाही. पण एक बायको म्हणून ती आणि नवरा म्हणून तू कितपत जुळवून घ्याल ... आय डोन्ट नो. तू मला पुरेसा समजूतदार वाटतोस. झाकली मूठ झाकलेली ठेव म्हणजे झालं." असे म्हणत त्यांनी नवीन पेग भरला.

..........
..........
..........

पेन्सिल खाली ठेवत त्या ग्लासकडे पुन्हा एकदा बघितले. बीअरच्या स्केचमधले बुडबुडे व्यवस्थित दिसत होते. रोखून पाहिल्यावर जणू ते फुटल्याचा भास होत होता. मंदार स्वतःशीच हसला.

~*~*~*~*~*~

छायाने स्मित करत क्लायंटला निरोप दिला. सर्वजण बाहेर गेल्यानंतर तिने समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला; सावकाश एक एक घोट घेत ती विचार करत होती. गेले काही महिने हेक्टिक जात होते. मध्ये बोर्ड मेंबर्सशी तिचा खटका उडाला होता. त्यातही खासकरून एकजण - कोण होता तो? छे आठवत नाही आता. म्हणा सगळ्या लोकांना कोण लक्षात ठेवतं? - बराच वैताग आणला होता. मुकुंदरावांनी व्यवसायात लक्ष घालणं जवळपास बंद केलं असलं तरी न राहवून त्यांनीही जरा नरमाईने घेण्याचा सल्ला दिला होता. पण छाया शेवटपर्यंत बधली नाही आणि तिने तिला हव्या असलेल्या पद्धतीनेच आणि हव्या त्या अटींवरच प्रकरण मिटवलं होतं. सगळं जरी तिच्या मनासारखं घडलं तरी ते सगळं शेवटी तिच्या मनासारखं घडलं. या शेवटीला खूप महत्त्व आहे. या मनस्तापानंतर तिला थोडी शांतता मिळत होती. नशीब तरी मंदार सारखा मला काही तब्येतीचा त्रास नाही. ओह मंदार, ओह मंदार ....... न राहवून तिची नजर त्या फोटोकडे जात होती. नेहाचा चेहरा जणू छायाकडेच बघत हसत होता.

~*~*~*~*~*~

"इतकं नको हसू. सिचुएशनला सूट नाही होणार. असं ते कादंबर्‍यांमध्ये लिहितात ना, गूढ हास्य. ते पाहिजे इथे."
"मंदार! आता गूढ हसायचं म्हणजे काय करायचं रे बाबा? खोखो हसू नको किंवा स्मित हास्य पाहिजे वगैरे ठीक आहे पण ओढून ताणून मी गूढ वगैरे हसू शकत नाही."
नेहा मंदारकडे आज पहिल्यांदाच मॉडेल म्हणून येत नव्हती पण यावेळी मंदार त्याच्या शैलीबरोबर जरा जास्तच प्रयोग करत असल्याचं तिचं प्रामाणिक मत होते. इकडे मंदार कॅनव्हासमध्ये अडकला होता. थोड्या अंतरावर उभा राहून तो आत्तापर्यंत झालेले काम बघत होता. तेवढ्यात त्याला दोन नाजूक हातांनी घातलेला विळखा जाणवला. नेहाच्या परफ्युमचा मंदसा सुगंध त्याच्या नाकाला जाणवला तर खांद्याला तिच्या हनुवटीचा स्पर्श!
"आज तुला विश्रांती. चल जाऊ बाहेर कुठेतरी."
त्याने हातातला ब्रश खाली ठेवला व हलकेच स्वतःला तिच्या बाहुपाशातून सोडवले. शेजारीच असलेल्या टेबलावर पडलेले फडके उचलत त्याने हात पुसले. मग तो नेहाकडे वळत म्हणाला,
"ओके. पण फार वेळ नाही. नंतर आज मला छायाबरोबर कसलं तरी फंक्शन अटेंड करावं लागणार आहे. सो कॉफी आणि सँडविचेस घेऊन मग मी निघेन. नेहमीसारख्या गप्पा रंगवता येणार नाहीत. चालेल?"
नेहाने तोंड वाकडे केले. खांदे उडवून तिने 'काही दुसरा ऑप्शन तरी आहे का' छाप प्रतिक्रिया दिली.
.....
.....
कॉफीचा घुटका घेत ती म्हणाली, "बाकी तुझी बायको एक अतीच आहे. काम काम तर करत असतेच पण तिचे मूड स्विंग्ज तू कसे काय सांभाळतो मला कळत नाही बुवा!"
"जसे तुझे सांभाळतो तसे" मंदार हसत हसत उत्तरला.
"ओ हॅल्लो, माझा मूड इतक्या भरभर खराब होत नाही. आणि तिच्या जशा विचित्र अपेक्षा असतात, कि असाच राहा आणि आत्ताच माझ्याबरोबर चल आणि माझ्या वेळापेक्षा दुसरं काही जास्त महत्त्वाचं नाही अ‍ॅन्ड ...."
"ओके ओके. कळलं!! अगदी मान्य तुझे मुद्दे. इन फॅक्ट .." तो थोडा अडखळला.
"इन फॅक्ट व्हॉट?"
त्याला शब्दांची जुळवाजुळव करायला थोडा वेळ लागला. त्याची चलबिचल त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. मनाशीच काही एक ठरवून तो बोलला.
"पूर्वी मी छायाला फक्त हट्टी किंवा स्वतःच्या विश्वाला अतिरेकी महत्त्व देणारी समजायचो. तशी पझेसिव्ह आहेच ती. पण आता मला जरा वेगळीच शंका येते. मध्ये तिच्या आग्रहाखातर एका विचित्र इन्शुरन्स स्कीम मध्ये आम्ही नाव नोंदवलं."
"विचित्र इन्शुरन्स स्कीम?"
"हो. म्हणजे काहीतरी ऑडच आहे, आय डोन्ट नो हाऊ टू डिस्क्राईब इट प्रॉपरली. वर वर बघता तशी नॉर्मल इन्शुरन्स स्कीम वाटली मला पण काही गोष्टी खटकत होत्या. एक म्हणजे वी ऑलरेडी हॅव अदर इन्शुरन्सेस, एकदम अचानक नवीन इन्शुरन्स घ्यायची गरज नव्हती. दोन ती कंपनी वेल नोन नाही. छायाच्या ओळखीतल्या कोणीतरी नवीनच काहीतरी सुरु केलंय आणि त्याला मदत म्हणून छायाने हे केलं. अ‍ॅज फार अ‍ॅज आय नो छाया, तिचा काहीतरी फायदा असल्याशिवाय ती असं काही करणार नाही, वर एवढी मोठी रक्कम गुंतवणं केवळ गुडविल साठी इज सो अनलाईक हर. आणि तीन म्हणजे त्यात एक क्लॉज पार्टनरला अपघाती मरण आलं तर काय याविषयी आहे. छाया कितीतरी वेळ त्या क्लॉजबद्दल आमच्याकडे कागदपत्रे घेऊन आलेल्या माणसाला खोदून खोदून विचारत होती."
नेहाला मंदारच्या चेहर्‍यावर आलेला घाम स्पष्ट दिसत होता. तो पॅनिक मोड मध्ये नसला तरी त्याला नक्कीच चिंतेने घेरले होते.
"मंदार डोन्ट टेल मी दॅट यू थिंक ...."
मंदारने मान हलवली. त्याच्या खिशातला रिकामा पंप त्याच्या संशयाला पुष्टी देण्यास पुरेसा होता.

~*~*~*~*~*~

नेहा आणि मंदारची मैत्री तशी जुनीच. म्हणजे कॉलेजला ती त्याला दोन वर्ष ज्युनिअर आणि तिच्या बॅचच्या इतर अनेक मुलींप्रमाणे ती मंदारवर फिदा होती. ती इव्हन एक दोनदा त्याच्यासोबत डेटवर पण गेली आणि सगळं नीट जुळेल असं तिला वाटत असतानाच मंदारच्या आयुष्यात छाया आली. नेहा भलेही रुपाने उजवी असली तरी छायाच्या अ‍ॅग्रेसिव्ह व्यक्तिमत्वाने बाजी मारली. तिच्या फ्लॅटच्या गच्चीत उभी राहून फोनमध्ये मंदारची फेसबुक प्रोफाईल पाहणं हा तिचा नेहमीचा उद्योग होता. तिच्या स्क्रीनवर आत्ता तिचा आणि मंदारचा फोटो होता जो ती कितीतरी वेळ बघत होती. अचानक तो फोटो बदलून तिथे फक्त मंदार दिसू लागला. ओह्ह त्याचा फोन येतोय, धत्त मी पण वेडी कुठली!
"हाय मंदार, बोल काय म्हणतोस?"
"नेहा." मंदारच्या आवाजावरून त्याला नुकताच अ‍ॅटॅक आल्यासारखा वाटत होता. चांगलीच धाप लागली होती त्याला.
"हॅलो मंदार. इज एव्हरीथिंग ऑल राईट?"
"तू इकडे येऊ शकतेस आत्ता? प्लीज."
"मी लगेच निघते. पण काय झालंय सांगशील? एनीथिंग सीरियस?"
"तू इथे आलीस कि सांगतो. आत्ता मला काहीच सुचत नाहीये नीट. तू ये आधी. यू आर नॉट गोईंग टू बिलीव्ह व्हॉट हॅज हॅपन्ड!"

.......
.......

"व्हॉट?" नेहाच्या चेहर्‍यावर भूत पाहिल्याचे भाव होते. मंदार इतका का घाबरला याचं कारण तिला कळून चुकलं. ही शक्यता कोणाच्या स्वप्नातही आली नसती. छायाचं अपहरण झालं होतं.

~*~*~*~*~*~

"ओह्ह! नाही नाही विशेष काही नाही घरी यायला जरा उशीर झाला ना आज तिला मग म्हटलं मीटिंग वगैरे तर नाही ना. हाहा काळजी नाही हो तशी, काय माझा आवाज... छे छे ते आपलं नेहमी एवढा उशीर होत नाही म्हणून. हां मी पण तेच म्हणत होतो कि ट्रॅफिकमध्ये अडकली असणार अजून काय! बघा ना आता ट्रॅफिक ... अं ...असो नंतर बोलू आपण. हो हो निवांत. अच्छा ठेवू? ओके बाय!"
नेहाचे गोल गोल डोळे मोठे झालेले बघताच मंदारने विषय आवरता घेतला. तिच्या नजरेत तरीही बदल न झालेला बघून त्याला उत्तर सुचले, "ऑफिसमधून तर कधीच निघाली म्हणत होते. आता?"
"आता काय आता? रस्त्यात केली असणार किडनॅप! तुला फोन करणारा काय म्हणाला?"
"आज रात्री फोन करून पैसे कुठे आणि कधी द्यायचे ते सांगणार म्हणालाय. आणि ..... आणि"
"आणि पोलिसांना इन्व्हॉल्व्ह केलं तर छायाचं काहीतरी बरं वाईट करायची धमकी दिली असेल त्याने."
"तिचे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना खायला घालेल म्हणालाय."
ओह्ह सो बॉलिवूड स्टाईल, नेहा मनातल्या मनात म्हणाली. मंदार मात्र पुरता हादरला होता. त्याने नकळत आपले डोके नेहाच्या मांडीवर टेकवले. नेहा हळूच त्याचे केस कुरवाळू लागली. त्याच्या मानाने ती वरकरणी पुष्कळच शांत दिसत होती पण मनात खळबळ माजली होती. अशी संधी पुन्हा येणार नाही नेहा, आता आणखी विचार नको.
"मंदार, ए राजा इकडे बघ. शांत हो. बस असा जरा नीट. हां युज युवर पंप. गुड, नाऊ लिसन!"

~*~*~*~*~*~

ट्रिंग ट्रिंग! मंदार या फोनची वाटच बघत होता. हातातला ग्लास खाली ठेवून तो फोनपाशी गेला व स्पीकर ऑन केला.
"हॅलो, मी मंदार बोलतोय"
"हॅलो मंदार. मी कोण ते सांगायची गरज नसावी." दुसर्‍या बाजूने खोल आणि काहीसा अस्पष्ट असा तो आवाज मंदारने ऐकला. तो इतकाच अस्पष्ट होता कि त्या आवाजाची कोणतीही वैशिष्ट्ये ओळखू न यावीत पण तरीही तो जे काही बोलतोय ते सर्व दुसर्‍या बाजूला कळावे. नक्कीच व्हॉईस मॉड्युलेटर वगैरे वापरला असावा.
"हो. माझ्या बायकोला ......"
"काही झालेलं नाहीये. हां आता तिला मी फोन नाही देऊ शकत. फार पचर पचर करते रे ही. कसं काय सांभाळतोस तू? दी फिर एक कान के नीचे!"
मंदारने आवंढा गिळला. त्याने वळून नेहाकडे पाहिले. तिने कंटिन्यूचा इशारा केला पण त्याची गरज पडली नाही.
"तर एक कोटी रुपये तयार असतीलच! तुला एवढंच करायचंय कि ..."
"त्याबद्दलच बोलायचंय!" मंदारच्या आवाजाला एक वजन आलं होतं. आता तो मागे हटणार नव्हता.
समोरचा हसला. "काय? त्याबद्दल बोलायचंय? हीहीही! काय बोलायचंय?"
"मी एक ऐवजी दोन कोटी देईन."
"काय?" किडनॅपर दिसत नसला तरी त्याचा आ वासला असणार याची मंदारला खात्री होती.
"हो! दोन कोटी! पण एका अटीवर."
समोर पाव मिनिट शांतता होती. "अट?"
येस्स मासा गळाला लागला. नेहाच्या चेहर्‍यावरची स्मिताची लकेर रुंदावली. मंदारने एक दीर्घ श्वास घेतला.
"हो. तू माझ्या बायकोचा खून करायचास. पण तो खून न वाटता अपघाती मृत्यु वाटला पाहिजे. जर मान्य असेल तर मी तुला दोन कोटी देईन. नाहीतर तू तिच्याबरोबर काय वाट्टेल ते करायला मोकळा आहेस."

~*~*~*~*~*~

मंदार आरशात बघून आपले अस्ताव्यस्त वाढलेले केस जरा जागेवर बसवण्याचा प्रयत्न करत होता. जवळच त्याचा फोन मेसेज बॉक्स दाखवत होता - फ्रॉम नेहा : ऑल द बेस्ट! किडनॅपरला पैसे द्यायला एकट्यानेच जावं लागणार होतं. अर्थात अपघाती मृत्यु हे दोन शब्द त्याच्या समोर नाचत होते. कमीत कमी ती इन्शुरन्सची रक्कम आणि कदाचित छायाच्या नावे असलेली सगळी मालमत्ता! पुन्हा नेहाबरोबर उजळमाथ्याने वावरण्याची संधी. फक्त पुढचे काही महिने जरा जपून राहावं लागेल. थापा पण ठरवून ठेवल्यात नेहाने, जणू तिच्या डोक्यात हा प्लॅन वर्षानुवर्षे होता. असो, आता निघायला हवे.
नखशिखांत काळ्या रंगाचा वेश घातलेला मंदार हातात एक ब्रीफकेस घेऊन बाहेर पडला. पावसाची हलकी सर आली होती. मंदारने गाडी चालू केली आणि आकाशात वीज कडाडली.
.........
.........
ठरलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत पावसाचा जोर बराच वाढला होता. शहरापासून लांब, निर्जन जंगलातली ही जागा सापडणे पण एक परीक्षाच होती. मंदार हायवे पासून ज्या कच्च्या रस्त्याला वळला होता तो इथे एका कड्याशी येऊन संपत होता. तिथे पोचताच त्याला सगळा प्लॅन लक्षात आला. समोरच छायाची लक्झरी सेडन उभी होती. डोक्यावरून हूड घेत मंदार गाडीबाहेर उतरला. त्याने नजर फिरवली आणि झाडाशी बाईकला टेकून उभा असलेला तो त्याला दिसला. तसा अगदी काळोख नसला तरी पावसात त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. त्यानेही हूड ओढलेले असल्यामुळे तसेही त्याला संपूर्ण चेहरा दिसत नव्हता. तो बहुधा च्युईंग गम चघळत होता का अजून काही होते कोणास ठाऊक, पण जे काही तोंडात होते ते पचकन थुंकून तो मंदारकडे चालू लागला. मंदारही प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा काही पावले पुढे झाला.
"मंदार?"
"होय. छाया?" अपेक्षेप्रमाणेच त्याने त्या सेडनकडे बोट दाखवले. मंदारने हलकेच ब्रीफकेस उघडून त्याची खात्री पटवली.
"हम्म, गुड! कम विथ मी." दोघेही त्या गाडीकडे चालू लागले. धक्का दिल्यावर गाडी दगडांवर आपटत कधी तळाशी पोचली ते कळले पण नाही. मंदारला आता चांगलीच धाप लागली होती. त्याने पंप काढून श्वास घेतला आणि त्याला थोडे बरे वाटले. तेवढ्यात त्याला पाठीवर पिस्तुलाच्या नळीचा स्पर्श जाणवला.
"रेस्क्यु इनहेलर? अ‍ॅस्थ्मा आहे तुला? एनीवे घाबरू नकोस. धिस इज जस्ट अ प्रिकॉशन! तुझ्या बायकोला मुद्दाम स्टिअरिंगवर डोकं आपटून आपटून मारलंय, सो अपघाताला सपोर्ट करणारा भक्कम पुरावा तयार होईल. पोलिसांनी ही इथे कशाला कडमडली हे विचारलं तर काहीतरी उत्तर तयार ठेव. आता इथून तू आधी परत जाशील. मी तुला परत कधी भेटणार नाही, तू मला शोधायचा विचारही करू नकोस. पळ आता."

~*~*~*~*~*~

मंदारने सरळ संपूर्ण पाण्याची बाटली डोक्यावर ओतली. काहीच न सुचल्याने सरळ झाडाचे एक पान तोडून त्याने तोंड पुसले आणि तो गाडीकडे परत आला. आता मळमळ थोडी कमी असली तरी उलटी झाल्यावर जो अशक्तपणा येतो तो जाणवू लागला होता. तेवढ्यात त्याला ब्रेक लावल्याचा आवाज आला. समोर एक गाडी उभी होती. तिच्यातून एक तरुण उतरला.
"काय हो गाडी खराब झाली कि काय?" त्याने हसत हसत विचारले.
मंदारला काय बोलावे ते पटकन सुचेना. तो कसनुसं हसला आणि त्याचे लक्ष त्या तरुणाच्या गाडीकडे गेले. ड्रायव्हर सीटशेजारील सीटवरून ती त्याला हात करत होती. हो छायाच ती! त्याला दरदरून घाम फुटला.
"ओ हॅलो, अंकल! मी काय विचारतोय? गाडी खराब झाली असेल तर सांगा. इथे रात्रीची मदत मिळणं अवघड आहे. या चला मी तुम्हाला गॅरेजपर्यंत लिफ्ट देतो."
"नको!!" मंदार जवळ जवळ ओरडलाच. "नको. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय. आणि गाडीला काही झालेलं नाही. मी जातो आता. हो बाय गुड नाईट अच्छा थॅक यू, अजून काय असतं ते आपलं, हां टाटा स्वीट ड्रीम्स हॅपी जर्नी....सी यू ........" असंबद्ध बडबडत, त्या तरुणाच्या हाकांकडे अजिबात लक्ष न देता मंदारने गाडी स्टार्ट केली आणि तो थेट घरी पोचूनच थांबला.

******

"द नंबर यू आर ट्रायिंग टू रीच इज करंटली स्विच्ड ऑफ. प्लीज ट्राय अगेन लेटर."
शिट!! मंदारने फोन सोफ्यावर फेकला. बर्‍याच वेळापासून नेहाला फोन लावण्याचा प्रयत्न चालू होता पण नेहाच्या आवाजाऐवजी तो यांत्रिकी आवाज ऐकून तो वैतागला होता. गेल्या २ दिवसांत तो प्रचंड तणावपूर्ण परिस्थितीतून गेला होता. आता त्याला शांत होण्यासाठी नेहाचा सहवास हवा होता पण ..... अनपेक्षित काही घडलं कि नकळत मानवी मनाला असुरक्षित वाटतं, नसत्या शंकाकुशंका येतात. त्यात त्याचा अ‍ॅस्थ्मा सतत डोके वर काढत होता. तो प्रयत्नपूर्वक दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता. पण घरात पसरलेल्या स्मशान शांततेत तो आवाजही अंगावर येत होता. आता त्याला नोकरांना सुट्टी द्यायचा विचार मूर्खपणाचा वाटू लागला होता. वैतागून त्याने जिनटॉनिकचा पेग बनवला. एक घोट घेतल्यावर त्याला थोडी हुशारी आली. तसाचा ग्लास त्याने कपाळाला लावला. वाह किती बरं वाटतंय.
"डोकं दुखतंय का तुझं मंदार? ये चेपून देते मग जरा बरं वाटेल."
नेहा? नाही हा आवाज........... हा आवाज छायाचा आहे. मंदारसाठी काळ जणू थिजला. तो हळू हळू उठून उभा राहिला. थरथर कापत तो वळला. हो, ती छायाच होती. तिच्या ऑफिसच्या कपड्यात, हसत, एकटक त्याच्याचकडे बघत! डोक्यावर एक खोक तेवढी दिसत होती. केसही विस्कटलेले होते आणि तिचा नेहमीचा गोरा रंग आता पांढरा गोरा दिसत होता. मंदारला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. छ छ छाया, त्याच्या तोंडातून कसा बसा तेवढा एक शब्द बाहेर पडला.
"तू मला तिथे, त्या दरीत एकटीला सोडून कसा येऊ शकतो मंदार? आपल्या दोघांत वाद असले तरी आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत. तूच म्हणायचास ना हे! मग मी तिथे एकटी कशी राहणार मंदार? किती थंडी वाजतेय मला आणि तू इथे खुशाल पेग रिचवतोयस. मग म्हटलं येऊ तुला घ्यायला. येणार ना माझ्याबरोबर मंदार?"
मंदारच्या घसा कोरडा ठणठणीत पडला. त्याला अजिबात श्वास घेता येईना. छाया एक एक करत त्याच्या दिशेने पावले टाकू लागली. मंदार तसा तसा मागे सरकायला लागला. त्याच्या हातातला ग्लास केव्हाच खाली पडून फुटला होता.तो कशाला तरी अडखळून पडला. तरीही न थांबता सरपटत सरपटत तो छायापासून दूर, त्याच्या डेस्कच्या दिशेने जाऊ लागला. तसाच चाचपडत त्याने ड्रॉवरमधून त्याचा इनहेलर पंप काढला. त्याच्या मदतीने तो श्वास घ्यायचा प्रयत्न करू लागला. पण हाय रे दैवा, तो रिकामा होता, इट वॉज ऑल एम्प्टी! त्याने तो तसाच जमिनीवर आपटला.
"काय झालं मंदार? हा खराब झालाय का? कदाचित वापरून वापरून संपला असेल. बेडरूम मध्ये आणखी एक आहे बहुतेक. देऊ आणून? आता शेवटची इच्छा म्हणून एवढं करूच शकते मी." छाया त्याच्या पासून जेमतेम २ फूटांवरून मान किंचित वाकडी करून विचारत होती. त्याही अवस्थेत मंदार जिवाच्या आकांताने किंचाळला आणि सर्व शक्ती एकवटून तो बेडरूम कडे धावत सुटला. त्याने तो पंप शोधला आणि ...
तोही रिकामा होता. मंदार आता धक्का लागण्याच्याही पलीकडे गेला होता. त्याच्या छातीत एक जीवघेणी कळ आली.
"मंदार. ओह यू नॉटी सिली फेलो. तुला काय वाटलं कि मी तुला आणि त्या नेहाला इतक्या सहजासहजी हवं ते करू देईन. तुला या जगात आता नाही राहता येणार मंदार. तुझी जागा तिथे आहे जिथे तू मला सोडून आलास. चल मंदार"
मंदार छायाकडे बघतच राहिला. कपाटाला पाठ घासत तो खाली बसला. छायाने शांतपणे जवळच पडलेल्या टिश्यू बॉक्स मधून एक टिश्यू घेत आपला मेकअप पुसला. ती चवड्यांवर बसली आणि हाताने तिने मंदारचे डोळे मिटले. आता घरात फक्त छायाच्या हसण्याचा आवाज येत होता.

~*~*~*~*~*~

"खूप वाईट झालं. हे वय नव्हतं हो!" छायाच्या घरात या छापाच्या प्रतिक्रिया ऐकू येत होत्या. छाया पांढर्‍या साडीत वरकरणी रडका चेहरा घेऊन वावरत होती पण या टिपिकल कमेंट्स पुन्हा पुन्हा ऐकून आता तिला कंटाळा येऊ लागला होता. पण काय करणार? सिव्हीअर अ‍ॅस्थ्मा अ‍ॅटॅकने माणूस दगावू शकतो हे आतापर्यंत लोकांनी नुसतं ऐकलंच होतं. छायाला मनात मात्र हसू येत होतं. सिव्हीअर अ‍ॅस्थ्मा अ‍ॅटॅक! केवढी सोयीस्कर पद्धत आहे खून करायची. जणू मंदारसाठीच बनली होती. वठवलेल्या सोंगाचा फारच नॉशिआ आल्याने ती आपल्या स्टडीत आली. तिने दार लावून घेतलं व दिलखुलासपणे ती हसली. मान गये पार्टनर, मान गये.

*****

जेव्हा तिला कळलं कि डॅडींनी मृत्युपत्र बदलून मंदारला वारस केलंय तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला होता. नीट वाचल्यावर कळत होतं कि भलेही अ‍ॅक्टिंग ऑथोरिटी आणि सीईओ तीच राहणार असली तरी कागदोपत्री मंदार मालक दिसणार होता. तो तिला कधीही हाकलून देऊ शकत होता. मुकुंदरावांचा हेतु बहुधा छायावर अंकुश ठेवायचा असावा. पण छायासारखी मुलगी हे सहन करणं कदापि शक्य नव्हते. अशातच तिला एके दिवशी तो भेटला. कसा, कुठे हे गौण प्रश्न आहेत. छाया तर मंदारच्या मृत्युच्या दुसर्‍याच दिवशी हे डिटेल्स विसरूनही गेली. त्याच्याकडे यावर एक मास्टर प्लॅन होता. ती बोगस इन्शुअरन्स स्कीम घेऊन त्या दिवशी त्यांच्याकडे तोच आला होता. छायाला खात्री होती कि मंदार हे नेहाच्या कानावर नक्की घालणार. मंदारबद्दल ऑब्सेस्ड असलेली नेहाच्या डोक्यात या स्कीमचा फायदा घेण्याचं येईल ही थोडी रिस्क होती पण समहाऊ त्याला खात्री होती. तसंच झालं. बाकी नेहा आपल्या कर्माने मेली. या हाताने तिच्या झिंज्या पकडून तिचे डोके फुटेपर्यंत आपटू दिल्याबद्दल विशेष आभार! आणि आता तो.... छाया आता नकळत स्वतःशीच बोलत होती. त्या रात्री मिळालेल्या दोन कोटींशिवाय त्याला मी अजून तीन कोटी घ्यायला बोलावलंय. तसा तो नको नको करत होता पण त्याला यावंच लागेल. मी भविष्यात एक जिवंत ब्लॅकमेलर ठेवू नाही शकत. तीन कोटी नाही पण तीन गोळ्या नक्की मिळतील. ड्रॉवरमधल्या पिस्तुलावरून ती हात फिरवत असतानाच दारावर टकटक झाली. तिने ड्रॉवर बंद केला.
"कम इन." तो नोकर आत आला.
"मॅडम तुम्हाला काही जण भेटायला आलेत. एकजण पोलिस इन्स्पेक्टर आहेत."
मला? छायाला थोडे आश्चर्य वाटलं. रुटिन चौकशी तर नसावी? पण डॉक्टरचं सर्टिफिकिट तर .. कदाचित नेहाची बॉडी मिळाली असेल आणि मंदार जवळचा मित्र म्हणून इथे आले असतील. हां तेच असेल. तेवढ्यात तिचा फोन खणखणला. "त्यांना बसायला सांग, मी आलेच" असे म्हणून तिने फोन घेतला.
"हॅलो?"
"हॅलो छाया मॅडम. ओळखलं असेलंच!"
"तू? आता कशाला फोन केला आहेस? तुझे उरलेले पैसे मी आपल्या ठरलेल्या वेळी देणार म्हणजे देणार. परत परत फोन करू नकोस."
"हे हे बेबी काम डाऊन! आता तू फक्त ऐक. जवळच तुझा टॅब आहे. त्याच्यावर एक ईमेल आली असेल ती उघड."
छायाने ती मेल उघडली आणि तिच्या अ‍ॅटॅचमेंट्स बघून तिचा आ वासला. तिचे नेहाचा खून करतानाचे फोटोग्राफ्स आणि एक व्हिडिओ होता.
"मंदार मेल्यानंतर जी स्टाईल मारलीस ती सगळी आहे त्या व्हिडिओत. तुला अडकवण्यासाठी पुरेसा पुरावा आहे."
छायाच्या कानांच्या पाळ्या तापल्या.
"किती पैसे पाहिजेत तुला?" आवाज चढू न देण्याचा शक्य तितका प्रयत्न तिने केला.
"पैसे?" तो खदाखदा हसू लागला. "हे पैशांसाठी करत असतो तर तुला खरोखरंच किडनॅप करून हवे तितके पैसे काढलेच असते कि मी. हा सगळा प्लॅन माझा आहे. नेहाच्या डोक्यात ती आयडिया कोणी भरवली? त्या मूर्ख मुलीला इतकी अक्कल असेल असं वाटतं तुला? या नाट्याचा कर्ता करविता मी आहे आणि सॉरी टू से बट सगळं काही माझ्या मर्जीनुसार घडलंय ना कि तुझ्या. हां तुझा नवरा आणि ती छोकरी फुकट मेले पण काय करणार? सूडही वणव्याप्रमाणे कोणाला जाळतोय हे पाहत नाही. छाया मॅडम हे सूडचक्र आहे. माझ्या मित्राचा, प्रकाशचा सूड आहे हा!"
"प्रकाश?"
"मध्ये तुझा बोर्ड मेंबर्सशी खटका उडाला होता. त्यातही एकजण तुझ्या पूर्ण विरोधात होता. तू ते प्रकरण तुझ्या पद्धतीने हाताळलं, नाही दडपलं. तुला हवं ते मिळालं पण तुझा विरोधक आयुष्यातून उठला, नव्हे तू त्याला संपवलंस. त्याची केवळ नोकरीच नाही गेली, त्याला नैराश्याचा तीव्र झटका आला. तो माझा मित्र प्रकाश होता. मला कदाचित हे सगळं कळलंही नसतं पण योगायोगाने त्याने ज्या रात्री आत्महत्या केली त्या रात्री मी त्याच्या घरी गेलो होतो. एनीवे दोज डिटेल्स आर नॉट फॉर यू. किंबहुना तुला त्या डिटेल्सशी काही घेणं देणंच नाहीये. तुला फक्त तुझी मर्जी चालवायची आहे, सगळीकडे, सगळ्याच बाबतीत. इतके दिवस प्रकाशने माझी नेहमीच साथ दिली आणि त्याला पंख्याला लटकताना पाहून मी समजलो कि आता माझी पाळी आहे."
"हे लिसन डोन्ट बी मॅड नाऊ! इमोशनल होऊन उगाच आयुष्य बनवायची संधी सोडू नकोस. मी तुला मालामाल करून टाकेन. अ‍ॅन्ड डोन्ट मिसअंडरस्टॅंड तुझ्या मित्राबद्दल मला खूप वाईट वाटतंय पण ...."
"त्याला फार उशीर झालाय मॅडम! माझी नजर आहे तुमच्या घरावर. तुम्हाला काय वाटतं पोलिस का आलेत तुम्हाला भेटायला? यू आर फिनिश्ड छाया, यू आर फिनिश्ड!" त्याने फोन ठेवला होता.
छाया मटकन खुर्चीत बसली. तिला पुढचा संपूर्ण दिवस काहीच सुधरलं नाही. अंधुकसे फक्त ४ शब्द तिला आठवतात जे थोड्या वेळाने आत घुसलेल्या इन्स्पेक्टरने उच्चारले,
"यू आर अंडर अरेस्ट!"

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवेगळ्या पॅरेग्राफ्सची वेगवेगळी सुरूवात वाचून जरा गोंधळायला झालं
पण नंतर नीट समजली.>>>मलाही

भारी जमलीये !

छान Happy

Pages