हरवलेले दिवस ...

Submitted by अजातशत्रू on 6 July, 2016 - 02:25

बालपणीच्या अनेक आठवणी असतात… काही सुखद तरी काही दुखद… आठवणींचा हा अमोल ठेवा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनामिक प्रेरणा देत राहतो.……

लहान असताना शेतातली मोठी जनावरे फिरायला घेऊन जाण्याचा वसा थोरांकडे असायचा. "तुम्ही अजुक नेणते हायसा, थोडं थोरलं व्हायचं मग जित्राबाला हात लावायचा." हे वाक्य ठरलेले.

गायी म्हशी जवळ तासंतास उभे राहिले तरी कंटाळा येत नसे. गोठा ही शेतातल्या आवडत्या जागांपैकी एक असायची.

गायी म्हशी चरायला नेण्याची स्वतंत्र जबाबदारी मोठ्याना असायची. गायी सकाळी अन सांजेलाच गोठ्यात असत, दुपारी त्या चरायला जात. फिरून आल्या की त्या थकलेल्या असत, त्यामुळे गोठ्यात निवांत बसून रवंथ करताना त्यांच्याशेजारी बसून निरखताना खूप शांतता असे, आपला मोठाला जबडा सावकाश एक सुरात हलवून त्यांची रवंथ चालत असे. मध्येच शेपटी हलवून अंगावर बसलेली गोमाशी गोचीड दूर करताना देखील ही सगळी जनावरे डोळे झाकून बसलेली बघून काळीज हरखून जाई…

गायीच्या पुढ्यात आमुण्याची पाटी ठेवून तिची धार काढतानाची दृष्ये मनाच्या पटलावर अशी कोरली गेली आहेत की त्याला शब्द नाहीत. धारा काढताना पितळी चरवीत चुळूक चूळूक आवाज करत त्या धारोष्ण धवल दुधाचा फेस वाढतच जायचा, पोरे त्यावर फुकत अन मग फेस निवळून खाली जाई, पुन्हा धारा सुरु.... असे करून चरवी भरून जायची. गाईच्या ह्या ताज्या दुधाला जो गंध अन चव असते तशा प्रकारची चव अन गंध असणारे कोणतेही पेय जगात कुठेच नसेल…

ह्या गाई म्हशींच्या पासून दूर एका कोपरयात शेळ्या असत. ह्या शेळ्या फिरायला न्यायची मुभा सर्वाना असे. गायींचे जसे अनेक नक्षीदार रंग तसे शेळ्यांचे नसायचे, शिवाय त्यांचे ओरडणे कसेसेच वाटायचे. गायींचे अंग मऊशार तर शेळ्या राठ केसाळ , शिवाय त्यांच्या अंगाला सदानकदा येणारा उग्र वास ! त्यामुळे थोडा वेळ जरी शेळ्याजवळ बसून आलो तरी आजूबाजूचे ओळखायचे की, "प्वार शेरडात बसून राहते !'… शेळ्यांचा आणखी ताप महणजे त्यांच्या लेंड्या ! गोलाकार उग्र वासाच्या या लेंड्या कधी कधी दप्तराला वा कपड्याला नकळत चिटकून आल्या की मोठी फजिती व्हायची…

गायी म्हशी चरायला न्यायची परवानगी नसल्याने शेळ्यावर हौस भागवून घ्यावी लागे. मग त्यांची भावंडात वाटणी केली जाई, दोघा तिघात किंवा चौघात एक शेळी वाट्याला येई. मग ती काळी किंवा करड्या रंगाची आहे का यावरून वाद होई. काळ्या शेळ्या संख्यने जास्त, अन करड्या तपकिरी तांबूस रंगाच्या त्या मानाने खूप कमी.....

आमच्या वाट्याला जी शेळी येई, तिचे नाव सगुणा. ती काळी कुट्ट, बुटकी अन शिडशिडीत अंगाची होती पण तिच्या पायाशी अन डोक्यावर पांढरे ठिपके होते. त्यामुळे ती उठून दिसायची. तिला धुवून स्वच्छ अंघोळ घालण्यापासून ते बाभळीच्या झाडाखाली हिरव्या शेंगा खाऊ घालायसाठी घेऊन जाणे अन संध्याकाळी विहिरीच्या काठाने फिरवून आणणे, मग दुसऱ्या शेळीबरोबर टक्कर लावून तिच्या शिगांची मालिश करणे… गायींच्या धारा काढून झाल्यावर, जर्मनच्या ग्लासात शेळीची धार काढली जाई, तिच्या दुधाची धार काढताना गायीच्या धारा काढतानाचे सर्व अनुकरण असे. कोणाच्या ग्लासात जास्त दुध जमा झाले हा एक वादाचा विषय असे, मग ज्याच्या ग्लासात जास्त दुध असे त्याने पाणी घातले की नाही यावर 'धार'दार चर्चा होई.. दुध कितीही निघालेले असो सर्वच जण विजेते असत. शेळीच्या दुधाचा चहा अन गायीम्हशीच्या दुधाचा चहा ण पिता नुसत्या वासावरून ओळखता येतो, इतका वास शेळीच्या दुधाचा येई !

एका दुपारी बाभळीला न्हेलेली सगुणा नजर चुकवून चरत चरत कुठे तरी लांब निघून गेली, दुपारभर तिची शोधाशोध केली पण तिचा पत्ता काही लागला नाही. दुपारी कोणीच जेवले नाही. दिवस कलायला लागला तसे भीती वाटू लागली अन डोळ्यात पाणी दाटू लागले. तिला शोधता शोधता गावाची शीव ओलांडली तरी कळाले नाही. अंधाराची चाहूल लागायला अन तिचा आवाज कानावर पडायला एकच गाठ पडली. ती करवंदाच्या जाळीत अडकली होती. तिच्या गळ्यातले दावे झुडपात गुरफटले होते. ती बरयाच वेळेपासून ओरडत असावी, आवाज बारीक झाला होता. आमची चाहूल लागली अन तिचा आवाज वाढला. ती पुढचे पाय उचलुन आंनंद व्यक्त करू लागली. तिच्या जवळ जाऊन तिचे दावे सोडवले अन ती मोकळी होऊन उड्या मारू लागली. तिच्या जवळ तोंड न्हेल्याबरोबर तिने तिच्या काटेरी जिभेने गाल चाटले. तिच्या डोळ्यात आलेले पाणी बघून आमच्या डोळ्यानाही धारा लागल्या. इकडे गोठ्यावर आमची शोधाशोध चालू झाली होती. सगळी वस्ती अन शिवार शोधून झाले होते, पण सगळे निश्चीन्त होते कारण सगुणा देखील तिथे नव्हती म्हणजे पोरे तिच्या मागोमाग गेले हे नक्की . पोरे रस्ता विसरतील पण सगुणा नाही हे मळ्यात सर्वाना ठाऊक होते. अन झालेही तसेच, सगुणेच्या मागोमाग आम्ही भावंडे आभाळ काळं झाल्यावर पोहोचलो अन सगळ्यांच्या जीवात जीव आला…

साखरझोपेत असताना आजदेखील सगुणेचे ओरडणे कधीकधी कानी पडते, ती धूसर तांबडी संध्याकाळ अन करवंदाच्या जाळीत अडकलेला तो मुका जीव. तिचे ते चाटणे अन सगळ्यांच्या डोळ्याला लागलेल्या धारा, हे सारे अजूनही जसेच्या तसे डोळ्यापुढे तरळून जाते.

सध्याच्या जगात भोवताली घडत असलेल्या अत्यंत कृत्रिम अन कोरड्या जीवनशैलीकडे पाहिले की त्या सुखावह काळाचे अगणित ऋण उमजते ज्याच्यामुळे जीवनातल्या अनेक भल्या बुरया प्रसंगाना तोंड देण्याची जगावेगळी उर्जा अजूनही मिळते आहे .…

- समीरबापू गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2015/07/blog-post_30.html

GANU.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार सुंदर लिहिलंय........ Happy

गाईच्या ह्या ताज्या दुधाला जो गंध अन चव असते तशा प्रकारची चव अन गंध असणारे कोणतेही पेय जगात कुठेच नसेल…>>>> अग्दी अग्दी.... धारोष्ण दूध प्यायलो आहे - अमृतदेखील एवढे मधुर नसणार ... Happy Wink

सगुणाची आठवण तर अतिशय सुंदर ...

मनापासून धन्यवाद ... Happy