आम्ही पावसात भिजताना रायगड पाहिला...

Submitted by शुभम एडेकर on 2 July, 2016 - 10:28

महाड पासुन 25 किमी वर 400 वर्षापूर्वी बांधलेला अवाढव्य गड म्हणजे रायगड. रायगड वर असलेल्या पायऱ्या व रोपवे यांमुळे रायगडावर आरामात कधीतरी जाऊ अाशी आम्हा चार पोरांत चर्चा व्हायची. ट्रेकिंगला जायच तर होतच पण चर्चा चालुच होती. इथे नको तिथे नको अस करत करत सगळ्यांच्या तोंडातुन रायगड आले. याला योगायोग म्हणवा की स्वतः रायगडाचे आम्हाला बोलवण ; सांगणे कठीणच. तारिख ठरली, वेळ ठरली, गाडी ठरली परंतु सगळे भटके रायगडासाठी नविनच. काही गोष्टींचा उलगडा रायगडावर पोहचल्यावरच होणार होता. निघालो. खडवली वरून सकाळची पहिली गाडी 5.15 ची म्हणजे लवकर झोपाव लागणार, पण उद्या आपण रायगडावर असणार ; महाराजांच्या रायगडावर असणार हे चित्र डोळ्यासमोर रंगवण्यातच 2 वाजले आणि तशी 4 वाजता जागही आली. तयारी झाली, शिदोरी झाली, बॅगा भरल्या आणि सगळे आपापल्या घरातुन देवबाप्पाला नमस्कार करून निघालो. आपण बऱ्याच दिवसांपासुन ज्याच्या आगमनाची वाट पाहत होतो तो आम्हाला पवित्र करण्यासाठी (धुऊन काढायला) सगळ्यांच्या दारात हजर होता. भर पावसात आम्ही सगळे तिकीट घराजवळ पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे आमच्यात गोंधळ घालणारा गोधळ्या अजुन आलाच नव्हता. 5.10 झाले तरी त्याचा पत्ता नाही, आता तिकीटाचे 45 रूपये फुकट जाणार होते...!!! शेवटी त्याने धावती गाडी पकडत ते पैसे वाचवले. गोंधळ्या आला, चैघांच्या चार शिव्या खाल्या, चौघांचे पाच झालो. टिटवाळ्यातला शाळेतला जुना मित्र ही आमच्यात विलीन होणार होता आणि पुढच्या स्टेशनला तोही आला, पाचचे सहा झालो. खडवली ते दिवा हा महत्त्वाचा पहिला टप्पा आम्ही पार केला होता. महत्त्वाचा का ते मुंबईकरांना चांगल महित असेलच. दिवा-सावंतवाडी उभी होतीच. आम्ही थेट पुढच्या डब्यात गेलो बर कां आणि तेही रिजर्वेशनच्या डब्यात, म्हंटल बघु अजुन आपल नशिब किती चांगल आहे ते आणि खरच तिथे कोणीच नाय आल.

DSC02081.JPG

दिवा-सावंतवाडीचा प्रावास 1.30 तास उशिरा सुरू झाला. मध्ये मामाच्या मुलाला पण उचलला. 4 तासाच्या प्रवासाला 6 तास लागले पण महत्त्वाच म्हणजे सुखरूप वीर स्टेशनला पोहचलो.
DSC02084.JPG_.jpeg

विर स्टेशनवर सेल्फीचा कार्यकम ही आवरता घेतला आणि टाईम शाॅट वर लक्ष केंद्रीत केले. वातारण खुपच प्रसन्न होते.

DSC02091.JPG

पुढचा प्रवास बसने करत आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोहचलो.

श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय करत चढायला सुरूवात केली. पाचच मिनीटात खुबलढा बुरुज लागला आणि तिथेच पोटपुजा करायला बसलो पण आमच्या गोंधळ्याला काय स्वस्थ बसवत नव्हत. त्याने आपला भ्रमणध्वनी एवढ्या वरून खाली पाडला होता. वरून मोबाईलचे पार्ट इतरत्र पसरलेले दिसत होते. गोंधळ्या खाली गेला, बॅटरी भेटली, कवर भेटले, बॅक कवर भेटले पण डिस्प्ले काही मिळत नव्हता. एव्हाना आमची पोटपुजा झाली होती. नाईलाजाने आम्हालाही मोबाईल शोधायला जाव लागणार होत. सगळे जण गेलो, 10 मिनीटे मोबाईल शोधला पण मोबाईल काही भेटत नव्हता त्यात भर म्हणजे वरूण राजा प्रसन्न झाला. 10 ते 15 मिनीटे चांगली कसर काढली त्याने, आम्हाला त्याने परत एकदा धुऊन काढले होते. फार अथक प्रयत्नांनी शेवटी मोबाईल मिळाला.

2016624160448.jpg

आमच्या गोंधळ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. हसत-खेळत, महाराजांच्या गोष्टी एकमेकांना सांगत आम्ही केव्हा वर पोचलो ते समजलच नाही. जि.प. च्या शेडमध्ये बॅगा ठेवल्या, सगळे भिजलो होतो, अंगातुन धुर निघत होता, थंडीने सगळे कुडकुडत होतो आणि त्यात रात्री लादीवर झोपायचय ह्या कल्पनेनेच अंगावार काटा उभा रहात होता. बॅगा तिथेच ठेऊन गड फिरण्यासाठी निघालो.

DSC02115.JPG

बाजारपेठ आणि नंतर थेट टकमक टोेकावर पोहचलो. धुक बऱ्यापैकी होता, फारस काही बघायलाही मिळत नव्हत आणि फोटोग्राफीला तर चान्सच नव्हता पण थोडी थोडकी करतच होतो.

DSC02119.JPGDSC02124.JPG

टकमक टोकावरून आम्हाला चारी बाजुला फक्त पांढरे शुभ्र ढग पहायला मिळत हाते. वरूण राजा आमच्या वर आणखी एकदा प्रसन्न झाला होता. आमच्या छत्र्यांवरही तो दयामया करत नव्हता. पाऊस थांबल्यावर आम्ही निघालो महाराजांच्या समाधीकडे.

PicsArt_07-02-03.03.00.jpgPicsArt_06-30-10.06.37.jpgPicsArt_06-30-10.04.10.jpgPicsArt_06-30-09.55.45.jpgWhatsApp-Image-20160702.jpegDSC02153.JPG

समधिच दर्शन घेण्याआधी जगदिश्वराच दर्शन घेतल. मंदिराचे बांधकाम खुपच प्रशस्त आहे.

DSC02190.JPG

समाधिच्या पाठच्या बाजुला तिथल्या रहिवाशांच्या तीन चार झोपड्या आहेत. तिथल्या एका बाबांशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि तिथुन निघालो. अार्ध्या वाटेत गेल्यावर लक्षात आले की आपण त्यांना तिथे राहायची सोय होईल की नाही हे विचारलेच नाही. मग आम्ही दोन जण परत गेलो. बाबांना विचारल राहायची जेवणाची सोय होईल का तर बाबा हो म्हणाले. मग बाबांशी डील साईन केली आणि बॅगा आणायला निघालो.

DSC02165.JPGDSC02176.JPG

बॅगा घेतल्या आणि थेट बाबांच्या चुलीपाशी. जाणीव झाली असेलच आम्ही थंडीत किती कुडकुडत होतो. नवखे असल्याने कुठे काय न्ह्यायच याच पुर्ण ज्ञान नव्हत पण तरिही आम्ही आम्हाला जसे जमेल तसे ट्रेक करायची सुरवात केली आहे. ते म्हणतात ना, चुकल्या शिवाय माणुस शिकत नाय. असो; आम्ही चुलीवर शेकत होतो, अगदी अंगावरचे कपडे सुखेपर्यंत. तिथल्या आजींना आम्ही पिठल आणि भात बनवायला सांगीतल, बाकी चपात्या आमच्याकडे होत्याच. एव्हाना सगळ्यांच्याच पोटात उंदिर घसरगुंडी खेळत होते. कधी एकदाच पिठल-भात होतय आणि कधी आम्ही जेवतोय अस झाल होत.

2016624194324.jpg

पिठल भात तयार झाल आणि आम्ही जेवायला बसलो. मस्त आजी, लय झ्याक आजी, आजी पिठल म्हणजे पिठल झालय, आजींही आमच्यावर खुश झाल्या आणि त्यांनी आम्हाला त्यांच्यासाठी बनवलेली रानातली भाजीही आम्हाला दिली. मी तर म्हणतो अशी भाजी ताज हाॅटेलमध्येही खायला भेटणार नाही.

WhatsApp-Image-20160702 (1).jpeg.jpg

जेवल्यानंतर मके भाजायला काढाले. एवढ्या थंडीत मके भाजुन खाण्याची मजा काही वेगळीच होती. जेवण झालं, मके झाले, अंथरूण टाकल आणि अस ताणुन दिल की थेट सकाळीच जाग आली. बेड टी आत्तापर्यंत ऐकुन होतो पण आम्हाला रायगडावर बेडटी मिळाली. तेव्हा लक्षात आल की बेड टी म्हणजे दात घासायचा आधी जी टी घेतात त्याला बेड टी म्हणतात. टी पिल्यावर तोंड धुतल आणि मग लागलाे स्वयंपाकाला. सकाळचा नाश्ता तर झालाच पाहिजे ना, मग काय जगातील सगळ्यात कठीण डीश करायला घेतली आम्ही. कोथिंबीर चिरली, पाणी उकळत ठेवल आणि मग काय, त्याच्यात मॅगी टाकलीना राव. मॅगी तयार झाली आणि पोटात पण गेली. सगळ आवरून आजींना आणि बाबांना रामराम करत आम्ही निघालो, वरूण राजा बरसत होताच. पाउस खुपच असल्याने निट काही बघताही येत नव्हत. निघता निघता पुन्हा एकदा समाधी आणि जगदिश्वराचे दर्शन घ्यायला निघालो. तिथे काही खास छायाचित्र काढायला मिळाले.
2016625091518.jpg2016625092419.jpg2016625092451.jpg2016625092708.jpg2016625093528.jpgDSC02140.JPGDSC02141.JPG

आम्ही होळीच्या माळाजवळ असलेल्या महाराजांच्या मुर्तीजवळ आलो.
DSC02201.JPGWhatsApp-Image-20160702 (2).jpeg
आतापर्यंत तिकडे बरीच गर्दी झाली होती त्यात असंख्य वृध्द माणसं देखिल होती. त्यांचा गड पाहण्याचा उत्साह पाहुन तर सगळे थक्कच झालो. महाराजांच दर्शन घेउन पुढे राजवाडा, सचिवालय, मनोरे, राणिमहाल, धान्याची कोठारे बघीतली.
DSC02211.JPGDSC02216.JPGDSC02225.JPGDSC02245.JPGDSC02248.JPG2016625111524.jpg
आमचा वेळ संपला होता, पाउसाने खुपच जोर पकडला होता. आम्ही गडावर आल्यापासुन त्याने एक मिनीट देखिल विश्रांती घेतली नव्हती. एवढ्या लांब येउन धुक्यामुळे गड पहायला मिळत नव्हता याचीच खंत होती. पण तरिही परत कधितरी येण होईलच अस मनात धरून आम्ही गड उतरायला सुरवात केली. दुपारी 12 वाजता आम्ही खाली उतरलो. बस 2 ची होती, आणि आम्हाला काही करून 1.30 च्या आत महाडला पोचायच होत. कोणाच्यातरी पुण्याईने आम्हाला मॅक्सीमो भेटली आणि आम्ही 1.30 वाजता महाडला माझ्या मावशीकडे पोचलो. मावशीकडे पोटभर जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. कोकण रेल्वे 1 ते 2 तास उशिरा असेल हे माहितच होत पण तरिही आमची घाई गडबड चालुच होती. महाड वरून पकडलेल्या टमटमच्या ड्रायवरलाही आम्ही टाॅप स्पीड वर पळवायला लावली. वीर स्टेशनला पोचलो, आमच्या शंकेप्रमाणे गाडी 1 तास उशिरा होती, मग बसलो रवंथ करत.
2016625154414.jpg
आम्ही इंटरनेटवर पहिलेला रायगड आम्हाला पहायला मिळालाच नाही. सहयाद्रीच रौद्र रूप काय असु शकत एवढ बाकी आम्हाला पाहायला मिळाल. पावसामुळे फोटो काढायला न भेटल्यामुळे आहेत त्या फोटोतच आम्ही समाधानी झालो. मुंबई लोकलची गर्दी तर अगदी आमची वाटच पाहत असावी बहुतेक. असो आम्ही सुखरूप घरी पोचलो.
- शुभम एडेकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

chan.

Dhnyavaad

मस्त ट्रिप केलीत.:स्मित: असे अनूभव खूप छान वाटतात. आता मायबोलीवरचे बाकी ट्रेकिंगचे अनूभव पण वाचा, म्हणजे आणखीन भर पडेल. आणी आम्हालाही असे छान अनूभव वाचायला आणी फोटो पहायला मिळतील.

शुभम ,
लेख छान , काही फोटोंचे फ्रेमिन्ग ही...
पुढच्यावेळी रायगड्वर जाल तेव्हा सांगा... नक्की काही डीटेल्स देता येतील..
welcome to सह्याद्री.. आणि रायगड

काही काही फोटोंचे फ्रेमींग खूप मस्त केलय. <<< +१

किल्ला तपशिलवार पहायला जायचे तर ते उन्हाळ्यात फेब. मार्च मधे

पुढील ट्रेक साठी शुभेच्छा !!

छान लिहीलय, फोटोपण मस्त.
पावसात भिजत पहाण्यात मस्त मजा आहे खरच.

वा छान लिहीलय.

ट्रेकिंगची सुरुवात आणि लिखाणाची सुरुवात चांगलीच आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

अगदी मनापासून लिहील आहे...

बॅटरी भेटली, कवर भेटले, बॅक कवर भेटले, मॅक्सीमो भेटली

वस्तु सापडतात, वा मिळतात,

व्यक्ती भेटतात..

दुरुस्त करा प्लीज.

ट्रेकिंगची सुरुवात आणि लिखाणाची सुरुवात चांगलीच आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. >> +१