मायबोली वर्षाविहार आणि मी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्‍यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
खास करून पुण्याहून येणार्‍यांची संख्या एका वर्षाविहारालाच मला वाटतंय ३०-३२ होती बाकी वेळेला त्यापेक्षा कमीच. त्याविरूद्ध मुंबईची लोकसंख्या बर्‍यापैकी असते.

वर्षाविहाराला येणं आणि तिथे येण्यातली मजा ह्या फक्त अनुभवायच्या गोष्टी आहेत. काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. मला नेहमी वाटते की आंतरजालावर आम्ही म्हणजे कट्टेकर, कोपुकर आणि मिक्स असे जेव्हा वविला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. एका दिवसात भरलेलं हे पेट्रोल वर्षभर पुरतं. मी माझ्यापुरती तरी निदान ववीची वाट आतुरतेने पहात असते.

पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत?

मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात कॉमन अडचण मी ऐकली आहे ती म्हणजे "मी कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटले/लो नाहिये, ओळख नसताना कसं येणार?
सर्वात पहिला ववी जो मी अटेंड केला होता त्याचं नाव अंबा (इंग्रजीत AMBA) अखिल मायबोली... पुढे काय होतं विसरले. २ सुमो भरून लोक सिंहगडावर गेलो होतो. त्यातले काही लोक मला आठवतायत मयुरेश, दिनेश, अजय गल्लेवाले, संपदा (डॅफोडिल), सत्यजित इ. माझी सुद्धा कुण्णाशी ओळख नव्हती. आणि मला एक अनामिक भिती सुद्धा होती की बाप रे आपण जातोय खरे...
पण अनुभव प्रचंड वेगळा आणि सुरेख होता. वविच असं नाही पण इथे सुद्धा आंतरजालावर विविध लोकांबरोबर पहिल्यांदा बोलताना कधीच मला परकेपणाची भावना झाली नाही.
असे अनेक लोक आहेत ज्यांना मी अजून भेटले नाहीये, पण त्यांच्याशी रेग्युलर टच मध्ये असते फोन किंवा ईमेल (पैकी एक वेका) कट्टेकर तर माझे जन्माचे सोबती झालेत आता.

एका व्यक्तीचं खास कौतुक करीन इथे - लिंबू.... हा माणूस कितीही अडचणी असल्या तरिही प्रत्येक ववीला हजेरी लावतोच ते ही स्वतः ड्राईव्ह करत.

मनात कोणतीही शंका असेल तर इथे मोकळेपणी बोला, मला तुमची अडचण जाणून घ्यायला आवडेल. ववीला रेग्युलर येणार्‍या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे मनापासून वाटते. पण घोड्याला पाण्यापर्यंत आणणे आपले काम, पिणे पिणे हे त्याचे ....

तेव्हा घोडे हो... आपलं लोकहो, जरा पाऊल पुढे टाका, अडचणी सांगा, आमच्या ताकदीत असेल तर त्यांचं निवारण करून आपल्याला ववी मध्ये सहभागी करून घ्यायला अत्यंत आनंद होईल.

विषय: 
प्रकार: 

आपण असलेल्या शहरातून कोणीच येत नाही तर एकटेच कसे जायचे हा प्रश्न असल्यामुळे टाळले जात आहे गेली अनेक वर्षे.

वॉव.. सह्हीच दक्षिणा.
खुप छान.. माझा पण असाच काहिसा अनुभव. पहिल्या वविला भीती.. कुणी ओळखिचं नाही. कस जायच अ‍ॅन्ड ऑल... पण फक्त बस चालु होईपर्यंत ती भिती टिकते. नंतर जो कल्ला होतो तो एक नंबर. संध्याकाळ पर्यंत तर आपण नक्की यांना पहिल्यांदा भेटलोय अशीच शंका मनात राहते. कारण मायबोलीकर सर्वांना खुप लवकर सामील करुन घेतात.
मी ही सर्वांना हेच सांगेन. की शक्यतो हा सोहळा चुकवु नका.

दक्षे, छान लिहीलय...
पण मी सगळे ववी हजर नव्हतो हं..... वेगवेगळ्या प्रासंगिक अडचणींमुळे बरेच ववि हुकवलेत. अन मी येतो त्यात कौतुक कसले?
त्यापेक्षा मला आठवतोय २००५ की सहा सात चा ववि २६ जुलैचा धुंवाधार पाऊस, ढगफुटी, तेव्हा मुंबैची लोक ट्रेनने आलेली. अन संध्याकाळी परत जात होते तेव्हा नेमका मोठ्ठा पाऊस झाला, अन परत जाताना त्यांची कसोटीच लागली.... अन तरीही मुंबैचि लोक पुढच्या वविला उत्साहाने हजर होतीच, कुणाचीच तक्रार नाही... ! ते खरे स्पिरीट... पण तसेही एकुणातच मुंबैची लोक सहज "अ‍ॅडजस्ट" होऊन जातात, उगा बारीक सारीक गोष्टींबद्दल तक्रारी करत बसण्यापेक्षा वाट्याला आलेला क्षण आनंदात कसा जाईल हे बघणे ही मुंबैकरांचीच खास वृत्ती आहे असे मला वाटते.
मी खास करुन मुम्बैकर माबोकरांना भेटायला म्हणून वविला जातो.... Proud जरा त्यांच्यात वावरले की उत्साह संचारतो.... !

दक्षे छान लिहीलयस ग.
मी पण तुला कधी भेटले नाही पण मला तू परकी आजीबात वाटत नाहीस. असे खुप रोजच्या वावरातले माबोकर आहेत ज्यांना प्रत्यक्ष न भेटताही कधी त्यांच्याबद्दल परकेपणा जाणवत नाही.

मला नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम्स पुढे आलेत जे छोटे नसून महत्वाचे होते. जसे मुली लहान असण, कधी त्यांना बर नसण. कधी वेगळे फॅमिली प्रॉब्लेम्स जस की नेमकी त्याच दिवशी फॅमिलीत काही प्रोग्राम वगैरे असण.

दक्षिणा, खूप छान लिहिलं आहे. मी पावसाळ्यात भारतात येणे टाळतो. पण मागच्या वेळी मला यावे लागले आणि वविला जायला मिळेल म्हणून मला वेड लागले होते आणि सोबत आपल्याला कोण कसे ट्रीट करेल.. कुठल्या नजरेनी आपल्याकडे बघेन ही भितीही होती. मी माझा रमतगमत निर्भेळ आनंद लुटला. काही जण माझ्याशी मनमोकळेपणाने बोलले आणि काहींनी मात्र माझ्याशी बोलणे टाळले.

पण ववि सर्वासाठी खुला असतो ह्याचे फार कौतुक वाटते. हा अनुभव अमेरिकेत नाही आला Sad सॉरी!!!

त्यापेक्षा मला आठवतोय २००५ की सहा सात चा ववि २६ जुलैचा धुंवाधार पाऊस >>२००५ चा. तेव्हा ट्रेननेच यायचे मुंबईकर. त्याच्या पुढल्यावर्षापासुन मग बसने येऊ लागले.

जागु तुझ्या अडचणी रास्त आणि मान्य आहेत, लहान मुलं घरात म्हणजे अडचणी असणारच. पण वविला असं कुठे ८ दिवस जायचं आहे? या वर्षी जमवून बघ. अडचणींपेक्षा जरा या वर्षी आनंदाला प्राधान्य देऊन पहा. आय अ‍ॅम शुअर तु नंतर मला आवर्जुन सांगशील की तुला मजा आली.

जाग्याव पलटी तुम्ही कोणत्या गावाला असता? तुमचं पुण्या मुंबईत कुणी नाहिये का?
मागे एकदा नाशिक च्या लोकांना सहभागी होता यावं म्हणून त्यांना जवळ पडेल असा स्पॉट पाहिला होता पण कोणीही आले नाही. Sad

अरे वा, दक्षे अजून आठवण ठेवली आहेस.. नीधप पण होती त्यावेळी. तिचा बाल्या नाच आणि तूझे मुर्गी चे गाणे अजून आठवतेय.
नंतर मीच देशाबाहेर होतो म्हणून नाही जमले.

त्यावेळी तो माझ्यासाठी ओव्हर नाईट व वि होता, कारण आदल्या दिवशी सईकडे राहिलो होतो. ती पण गैरसोय असेल काही लोकांची. एकाच दिवसात अप डाऊन हा प्रवास थोडा त्रासाचा होऊ शकतो.

पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत? >>
माझ्या आंतर्जालीय वावरात ज्यांना ओळखते त्यांच्याशी वैयक्तिक आयुष्यात प्रत्यक्ष मैत्री कराय्ला फारशी उत्साही नसते. याला अपवाद आहेत, काही जवळचे मित्रमैत्रीणी अशा ओळखींतून झाले आहेत. पण तेवढेच. आणि मी फारशी ओळखपाळख नसलेल्या लोकांबरोबर तेही मोठ्या गटामधे दंगा करणे, हँग आउट करणे, दिवसभर पिकनिक करणे असले प्रकार करू शकत नाहीत. माझ्या स्वभावाची मर्यादा!! Happy

वविला येण्याची खुप खूप इच्छा आहे पण कुणाशी ओळख नसल्याने टेन्शन येत
त्यातून माझा स्वभाव भिडस्त
इच्छा असूनही लोकांमधे मिसळण ,स्वतः हून ओळख करून घेण जमत नाही
अनोळखी लोकांमधे वावरताना मनावर उगाचच दडपण येत ......:( Sad Sad
त्यामुळे गेल्या वर्षी इच्छा असूनही आले नाही , पण मनात दिवसभर वविचेच विचार चालू होते , अगदी सकाळी बस निघायच्या वेळी तिथ जाऊन दुरून पाहून सुद्धा आले मायबोलीकरांना ....

_मनाली_ अवश्य या! टेन्शन घ्यायची गरजच नाही. ववि एंजॉय करण्यासाठी अगोदर कोणा माबोकरांशी ओळख हवीच असे नाही. परफेक्ट अनोळखी लोकही या मेळाव्यात छान सामील होतात व धमाल करतात. :) 

वविला येण्याची खुप खूप इच्छा आहे पण कुणाशी ओळख नसल्याने टेन्शन येत>>>>>>>> हे असं ज्यांना वाटतं त्यांनी जुन्या ववि चे व्रुत्तांत वाचा आणि फोटोज पहा.
त्यातुन थोडा अंदाज येईल, पण खरी मजा ते सगळं अनुभवण्यात आहे. अगदि बस मधल्या दंगामस्ती पासुन ते पाण्यात डुंबणे, सांस चे खेळ, त्यात वेळो वेळी घडणारे (अजरामर) विनोद हे सगळं फक्त अनुभवायचंच असतं आणि हे सगळं घडत असताना आपण नविन आहोत आणि कोणाला ओळखत नाहि वगैरे कुठच्या कुठे गेलेलं असतं

मनाली,वविचा मूळ उद्देशच तो आहे की ओळख असलेल्या आणि नसलेल्या अश्या सगळ्या मायबोलीकरांनी वर्षातून एकदा एकत्र येऊन धमाल करावी. तिथे येणारे ओळखीचे लोक सुद्धा कधीतरी एकमेकांना अनोळखी होतेच की. तेही वर्षाविहाराला येऊन एकमेकांना ओळखीचे झाले. तश्या तुम्हीदेखील व्हाल.२४ला बालगंधर्वला आलात की संयोजकांशी तर ओळख होईलच तुमची..तेव्हा वविला याच... Happy

वरदा >>> +१
अगदी जवळचे असे मित्र मैत्रीणी नाहीतच. ओळखी खुप आहेत. मला मैत्रीण म्हणवणारे ही खुप आहेत. माणसं ही खुप जोडलीयेत पण ...जे काही मोजके मि - मै आहेत ते काही अंतरावरच असतात. जिवलग नाहीच होत. स्वभावच असा आहे. इलाज नाही. Happy जवळचा जिवलग मित्र माझा नवरा आणि जिवलग मैत्रीण माझी बहीण. पिकनीकचे सोबती माझे दोन्ही घरचे, भाचेकंपनी, कझिन्स वैगेरे. एकत्र निघालो तर वरात होइल Happy
माबोवर असतात/ लिहितात ह्या एवढ्या ओळखीवर(?) त्यांच्याबरोबर दंगा बिंगा करणं जमेल का? ही शंकाच आहे.

सस्मित, मनाली,

http://www.maayboli.com/node/9491 - हे वाचा.

मी २००९ साली प्रथमच वविला गेले त्यानंतर मी लिहिलेलं मनोगत आहे (वृत्तांत नाही). तुम्हाला यातून स्फूर्ती, प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. Happy

नमस्कार...

दक्षिणा... सर्वप्रथम तुझं अभिनंदन... आणि तुझे आभार देखिल... हा चांगाला बाफ/ धागा सुरु केल्या बद्दल (च्यामारी... इतकी वर्षं झाली, पण अजुन बा-फ आणि धागा यांतला फरक कळत नाहीय... :राग:)

मायबोलिकर मित्र-मैत्रिणींनो...
पुण्यात राहून देखिल मी भिडस्त स्वभावाचा माणुस, मायबोलिवर वविचे (फक्त) वृत्तांत वाचणारा मी... काही ठराविक माबोकरच माझ्या ओळखिचे होते ... बागुलबुवा, किरु, आनंदमैत्री, जाई-जुई, शैलजा, दक्षिणा, निलु... अनपेक्षितपणे भेटलेला मायबोली कर कौतूक शिरोडकर... इतकेच. मयुरेश आणि हिम्या यांच्या सोबत फक्त तोंड-ओळख(च) होती. वविची वर्णनं वाचून 'सहभागी' व्हायची ईच्छा व्हायची, पण... बहुतेकां सारखी माझी कारणं देखिल समोर ऊभी रहायची...
> एवढ्या मोठ्या गर्दीत आपण एकटे पडणार
> सहभागी होणारे आपल्याला कितपत सामावून घेतील?
> त्यांचं आपलं ट्यूनिंग कसं जमेल?
> एक सुट्टी वाया घालवली पाहिजे... (कारण माझी आठवडा सुट्टी गुरुवारी असायची)
> पावसात भिजायला एवढं लांब कशासाठी जायचं?
...
...
इ.इ. मध्यंतरी एकदा मोठ्या भावाला (परदेसाई ऊर्फ गोष्टी गावाचे ऊर्फ गो-गा) या ववि बद्दल विचारलं. सवयी प्रमाणे त्याने मला अगोदर मूर्खातच काढलं (माझ्या वरच्या शंका ऐकून) आणि सगळ्यात शेवटी मला सांगितलं 'जायची ईच्छा आहे ना?... मग न घाबरता, न लाजता वविला एकटा जा, आणि अनुभव घे...'... निर्णय घ्यायला तरी देखिल पुढचे २ ववि खर्च पडले. शेवटी मनाचा हिय्या करुन २०१२च्या वविला नाव-नोंदणी केली (मनात हिशेब केलेला होताच - बहुतेक हा(च) पहिला आणि शेवटचा ववि... वगैरे...), कारण मधल्या काळात हिम्या आणि मयुरेश सोबत संवाद करेपर्यन्त मजल मारलेली होती (थोडक्यात माझा स्वतःचा Comfort Zone तयार झालेला होता...). त्या वर्षीच्या यु.केज. वविला सहभागी झालो आणि... आता तर 'ववि संयोजन समिती' मध्ये देखिल सहभागी होऊ लागलोय (खरं तर संयोजन समिती मधे सहभागी होऊन मी नेमकं काय करतोय?, तेच मला कळत नाही...). इथल्या एका-एका नगाला भेटल्यावर पुढ्चा ववि चुकवायचा नाही, हे दरवर्षी ठरवतो.
"काय त्या वविला जाऊन फक्त हा-हा ही-ही हू-हू करता, दुपारी जेवता, संध्याकाळी परत येता... दिवस फुकट का घालवता?, कळत नाही...", म्हणणारी माझी बायको, एका वर्षी कुतुहल म्हणुन (शारीरीक दुखणं सांभाळत) माझ्या सोबत (Safe Comfort Zone बघुन) वविला आली... गेली दोन वर्षं, जून १५ तारीख ऊलटुन गेली की 'वविची तारीख जाहीर केली का रे?', म्हणून चौकशी करते... अर्थात या वर्षी देखिल तिनेच 'वेळेत बुकिंग करुन टाक... आपण वविला जायचंय...' सांगत बुकिंग करायला लावलं...

सांगायचा मुद्दा... इछुकांनी जरुर सहभागी व्हा. भले तुमचा स्वतःचा योग्य तो Comfort Zone उपलब्ध नसेल... पण सहभागी झाल्यावर तुमच्या नक्कीच लक्षात येईल - आपण उगाच Comfort Zone चा बाऊ करत होतो, आज पासुन आपण खर्‍या Comfort Zone मधे सहभागी झालेलो आहोत...

तर मग... करा वविचं बुकिंग आणि या हक्काच्या Comfort Zone मधे...
Happy

विवेक Happy

वविची एक खासियत आहे व माबोकरांचीही! तुम्ही भिडस्त, लाजाळू, अबोल, एकटे राहाणे पसंत करणारे असाल तर उगाच कोणी गळेपडूपणा करत नाही वा आगंतुकपणे चिकटायला जात नाही. कोणाला गर्दी आवडत नाही, कोणाला हल्लागुल्ला आवडत नाही. कोणाला स्ट्रक्चर्ड पिकनिक आवडतो, कोणाला कसलेच नियम नको असतात. ववि व माबोकर या सर्व तऱ्हांना सामावणारे आहेत. मुद्दाम होऊन तुमचा कंफर्ट झोन कोणी डिस्टर्ब करायला जात नाही. मला हे फार आवडते. लेट मी बी मायसेल्फ. यामुळेच नवा कंफर्ट झोन निर्माण होत जातो व मैत्र जुळत जाते.

">>पण खरी मजा ते सगळं अनुभवण्यात आहे. अगदि बस मधल्या दंगामस्ती पासुन ते पाण्यात डुंबणे, सांस चे खेळ, त्यात वेळो वेळी घडणारे (अजरामर) विनोद हे सगळं फक्त अनुभवायचंच असतं ">>

हे सगळं मला आवडत नाही.कम्फर्ट झोन- रिजॅार्ट आवडत नाहीत.झाडाखाली शांत बसायला आवडतं.म्हणून वविला येत नाही.

विवेक मस्तच आहे मनोगत.
असे अनेक असतील जे एकटे पडू या भिती पोटी आले नसतील वविला, त्यांच्यासाठी प्रेरणा ठरेल अशी पोस्ट आहे तुझी. आवडलीच.

किती तळमळीने लिहिलंयस दक्षु.. सुंदर आठवणींना उजाळा मिळाला आणी ववि अटेंड करण्याकरता मोटिवेशन देखील!!! Happy

आत्तापर्यन्त एकच ववि अटेंड केलाय तो ही तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याच्या खास ओढीने, मुद्दाम जुलै मधे

भारत वारी प्लॅन करून.. नंतर पुढे कधी जमलंच नाही..

यावर्षी नक्कीच जमवण्याचा प्रयत्न करेन..

दक्षे लय भारी...जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पहिलाच वर्षा विहार होता तो.
आधी अंबा मग जीटीजी... मग वर्षा विहाराची प्रथा रुढ झाली म्हणायला हरकत नाही. पहिल्या व.वि.च आयोजन अंबर, डॅफो आणि मस्तानी (सुखदा) यांनी केले होते. फार धामल आली होती सिंहगडला अनेक ओळखी झाल्या, आणि बराच काही झालं. किती मस्करी चेष्टा.. दिनेशदा आणि आम्ही एकाच सुमोत होतो, जाम छळलं होत त्यांना. ☺
त्या ओळखी आज नाती बनली आहेत.
सुरवातीला बुजलेली तू आणि नंतर रुळलेली तू अजून आठवतेस. त्या नंतरच्या मुळाशीच्या एक ववी ला गेलो होतो मग मुंबई बाहेर पडलो ... मग जाता नाही आलं ह्याची हळहळ अजूनही वाटते. मित्रान्नो गेला नसाल तर एकदा तरी नक्कीच जा..

Pages