सोबत

Submitted by विद्या भुतकर on 28 June, 2016 - 10:06

आपण दोघे एकत्र जाऊ या का रेसला? एकत्र पळू, मजा येईल ना? करतो तसंच हेही. काय म्हणतोस?
तो मान डोलावतो.
.....

ती, "आपण दोघेही यावेळी रेसमध्ये भाग घेऊ बघ. तू यावेळी जरा जास्त प्रॅक्टिस कर. आपण आपापल्या परीने जोरात जाऊ. जो आधी पोहोचेल तो वाट पाहील दुसऱ्याची. चालेल ना?"
तो, "होय, उगाच जोरात पळणाऱ्याची कुचंबणा आणि हळू पळणाऱ्याची ओढाताण. त्यापेक्षा आपल्याला जमेल तसं पळू, शिवाय मी जवळपास राहीनच. "
ती,"हो चालेल."
........

तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करू चालत चालत पूर्ण करू का?"
ती, " करायचं का तसं? बघ जमेल का? असंही एकट्याने करायचं म्हणजे बोअरचं होतं."
पुन्हा विचार करत, "नाहीतर राहू दे, आपण दोघेही जायला नको. पुढच्या वेळी पुन्हा एकदा भाग घेऊ पण सोबतच जाऊ."

.......

तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करू चालत चालत पूर्ण करू का?"
ती, " करायचं का तसं? बघ जमेल का? असंही एकट्याने करायचं म्हणजे बोअरचं होतं."
पुन्हा विचार करत, "नाहीतर राहू दे, यावेळी नको करुस. मी करते पूर्ण एकटीच. पुढच्या वेळी पुन्हा एकदा भाग घेऊ पण सोबतच जाऊ."
तो,"हो चालेल. यावेळी राहू देतो. तू जोरात पळ. मी असेनच सोबत तुझ्या, दुसऱ्या टोकाला."
ती,"हो चालेल."
........

तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करूया?"
ती,"हे बघ मी जाईन तर तुझ्या सोबतच जाईन. पण रेस पूर्ण करणार हेही नक्की. एक काम करू, तू व्हीलचेअर मध्ये बस. मी तुला ढकलत घेऊन जाते."
तो,'अगं कशाला? मी आहेच तुझ्या सोबत."
ती, निर्धाराने,"मी काही ऐकणार नाहीये. जायचे तर सोबतच जायचं. "
तो,नमतं घेत,"बरं सोबत जाऊ. मी व्हीलचेअर मध्ये येतो. चालेल? Happy "
........

तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करू चालत चालत पूर्ण करू का?"
ती, "नको उगाच त्रास नको. यावेळी राहू दे. पुढच्या वेळी नीट झाला की परत घेऊ. "
तो,"चालेल. मग असं करू, तू जा रेसला. मी घरी राहतो. मुलांना सांभाळतो. तू आलीस की मस्तपैकी खा, पी, आराम कर."
ती, खुशीत,"चालेल. Happy "

........

सोबत असण्याच्या किती तरी व्याख्या असू शकतात, असतातही. कुणाला एक चुकीची वाटते, कुठली बरोबर. कुणी मागे थांबून साथ देतं, कुणी धावपळ, ओढाताण करून सोबत राहण्याचा प्रयत्न करते. कुणी हट्टाने बरोबरच जायचे म्हणून दुसऱ्याला ढकलत नेते. तर कुणी माझं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून तू तरी कर असा विचार करतं. कुणी मागचे सर्व सांभाळून समर्थन करतो. तर अशी ही सोबत आयुष्याच्या धावपळीत जमेल तशी देतो.

या सर्वातली माझी कुठली? Happy

तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करू चालत चालत पूर्ण करू का?"
ती, "नको उगाच त्रास नको. यावेळी राहू दे. पुढच्या वेळी नीट झाला की परत घेऊ. "
तो,"चालेल. Happy "
तो आला माझ्यासोबत रेसला. आणि हो, मुलांनाही घेऊन. त्या शेवटच्या रेषेपलीकडे ते तिघेही माझी वाट पहात होते. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users