चिंच गुळाची आमटी

Submitted by दक्षिणा on 20 June, 2016 - 06:16
chinchagulachi aamti
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तुरीची डाळ, कढिलिंबाची पाने, गोडा मसाला, गुळ, चिंचेचा कोळ, तिखट, कोथिंबिर, ओलं खोबरं (ऐच्छिक), फोडणीचं साहित्य (तेल, मोहरी, हिंग, हळद)

क्रमवार पाककृती: 

प्रथम (छोटी) अर्धी वाटी तुरीची डाळ हिंग, हळद आणि तेल घालून शिजवून घ्यावी. एकिकडे चिंच गरम पाण्यात घालून कोळून घ्यावी व, चोथा टाकून द्यावा. काही लोक कोळासकट चिंच घालतात पण मग ती जेवताना घासात मध्ये मध्ये येते म्हणून मी फक्त कोळ घालते.
1_1.jpg

यातच गुळ, तिखट, मीठ, गोडा मसाला घालून घ्यावा.
2_0.jpg

दुसरीकडे कढणीमध्ये तेल घालून, मोहरी तडतडली की हिंग, हळद आणि कढिलिंबाची पाने घालून चरचरीत फोडणी करावी.
3_0.jpg

ही फोडणी डाळिवर ओतावी आणि कोथिंबीर घालावी, व थोडे पाणी घालून खळखळ उकळावी.
4_0.jpg

फायनल आमटी. वरून ओलं खोबरं घालून घ्यावं ते ऐच्छिक असल्याने मी घातलेलं नाही.
5.jpg6.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी, एका वेळी.
अधिक टिपा: 

चिंचेचा कोळ घातल्याने आमटी काळपट लाल दिसते. मंद आचेवर उकळल्याने छान मिळून येते. सकाळची आमटी संध्याकाळी, किंवा संध्याकाळची दुसर्‍या दिवशी सकाळी जास्त छान लागते. आधी फोडणी करून मग वरून डाळ ओतून आमटी केली तरी चालते, मी मोस्टली वरूनच फोडणी घालते.

माहितीचा स्रोत: 
माझेच प्रयोग. तुमच्याकडे हिच आमटी अधिक चांगल्या प्रकारे करण्याची कृती असेल तर जरूर सांगा.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी! आधी फोडणी करुन मग मी आमटी करते Happy
साबा स्पेशल आंबट आमटीचा मसाला करतात .. तो तिखटाऐवजी वापरता येतो.. मोस्टली वरणफळं

अहाहा काय आठवण काढली. मला खुप आवडते ही आमटी. मी पण चनस सारखेच आधी फोडणी देते.

आणि चिंच कोळून टाकली नाही तर नंतर जास्त आंबट होते. तेव्हा चिंच कोळूनच टाकावी या मताची मी Happy

वा मस्त दक्षिणा तो.पा.सु.
मी अशीच थोड्या फार फरकाने करते. पण ही घरातली फेव्हरेट आमटी असते.

माझी पण सर्वात आवडती आमटी. मोस्टली मी भात खातच नाही, पण सुट्टिदिवशी भात खावा वाटला तर सोबत खायला ही आमटीच करते. मग दुपारी पडी Wink

दक्षु सुपर्ब रेसिपी.. आई पण अशीच करायची.. मस्तं लागते.. भात आमटी आणी वरून थोडं दही मिसळून Happy

( ता.क. बेत्ताचा गूळ टाकलास तर तुझ्या हातचीपण खाईन Wink )

चिंच-गुळ नसेल तर आमटीला आमटी म्हणु नये.>>> अगदी खरय आमच्या नांदेडात चिंच गुळ घातला असेल तरच ती आमटी ... बाकी सगळे वर्रण... ट्माट्याचं..कांद्याचं..मेथीचं..पालकाचं Happy

चिचेच्या एवजी आमसूल ग्लालता येतो... पित्त नाही होत.

बाहेर धोधो पाऊस अन घरात आपण एक sliding खिडकी उघडावी त्या अगोदर ताटात भाताचा बारका डोंगर रचावा त्यात भरपूर आमटी म्हणजे धावता पातळ होईल इतपत आमटी वरतून डाएट गेला खड्डयात म्हणत ओतलेली तुपाची धार अन चवीनुसार मीठ ,

जगात अजून काय हवं असतं आनंदी राहायला?

चिंगु आमटी,भात्,तुप,आणि सोबत कैरीचं ताजं लोणचं.......स्वर्ग...आणि परत दुसर्यंदा भात,आमटी, साईचं दही घेउन कालवायचा....मी बरेच्दा सुट्टीदिवशी दुपारी एवढच जेवते...नो पोळी-बिळी.... Wink
दक्षु मस्तच ग....

मनीमोहोर ..यात मी फोडणीमध्ये थोडे मेथी दाणे घालते. खूप सुंदर चव येते.>>>> मी पण मेथीदाणे घालते, छान चव येते.

माझी पध्दत थोडी वेगळी आहे, मी पातेल्यात फोडणी करते, त्यात मोहरी, जीरं, मेथीदाणे, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढिलिंबाची पाने, मग त्यातचं ओलं खोबरं ते परतुन वर गोडा मसाला, मग पाव वाटी पाणी, चिंच-कोळ, गुळ, हे सगळं उकळलं की मग वरुन घोटलेली डाळ, मीठ, पाणी. डाळ शिजवताना थोडं हिंग, हळद असतचं आणि आमटी उकळल्यावर आच बंद करुन मग वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर.
यात कधीतरी शेवग्याच्या शेंगा, मुळ्याच्या चकत्या, बारीक मेथी चिरुन, वांग्याच्या फोडी अस पण वेरिएशन असतं पण आमटी रोज हवीचं.

दक्षिणा मस्त आमटी.....
मी फोड्णीत मेथीदाण्यांची पूड घालते. तसंही मी शक्यतो बर्‍याच फोड्ण्यांमधे मेथीदाणे पूड वापरते. छान खमंग चव येते.
आणि हो.....ममो ला मम. :स्मितः

वॉव मस्तच, फोटोपण भारी.

मला हवीच होती ही रेसिपी, आम्ही कोकम-गुळ आमटी करतोना. थँक्यु दक्षे.

मी सगळ्यातच चार मेथीदाणे टाकते, आमटी, रस्सा भाजी, परतलेली भाजी, कढी, पिठलं सर्वात.

अरे वा ! आमच्याक्डे करत नाहीत पण मला आवडते. आता नक्की करते. Happy साबा वरण बट्टी करतात तेन्व्हा असे वरण (आमटी) करतात. Happy स्वतः पण केले पाहीजे आता.

विद्या.

वा! मी फोडणी करून त्यात बाकीचे घटक पदार्थ ढकलते. सध्या तुरीऐवजी मूगडाळ वापरते आमटीला. तुरीची चव नाही येत, परंतु तरीही आमटी स्वादिष्ट होते.

नेहमीचीच रेसिपी असली तरी गरम गरम भात, त्यावर आमटी, तूप म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. फोटो मस्त.

>>जगात अजून काय हवं असतं आनंदी राहायला?>> अर्र, लोणचं नको का हो साईडला? Wink

मस्त... कितीतरी प्रकारे आमट्या केल्यात पण काय माहीत अशी बरेचदा खाल्ली असली तरी, खुप आवडते असली तरी कधीच केली नाही. धन्यवाद दक्षिणा.

आधी डाळ उकडवून घेताना त्यात हळद, जरासे तूप, एखादी उभी कापलेली मिरची व मीठ. उकडलेली डाळच खमंग वास येतो.
आम्ही लसूण सुद्धा चरचरवतो फोडणीत, आणि मेथीचे दाणे सुद्धा घालतो. आई त्यात गोडा का काळा मसाला घालती फोडणीत परतून. उकळी आली की वरून ओले खोबरं आणि बहुत सारी कटी हुइ धनिया.

खाताना वाफाळता भात, आमटी मध्येच खळगी करून त्यावर साजूक तूप, लिंबाचं तिखट लोणचं आणि तळून ज्वारीचे पापड.
दुपारी झोपायला एक कोपरा आणि आंथरायला आणि पांघरायला चादर.
आम्हाला जगायला एवढं पुरेसे आहे. Wink

माझी पण लै फेवरिट. माझे लग्न टिकून राहण्यात हया आमटीचा मोठा हातभार होता. नवर्‍याला भारी आवडायची. व टूर वरून दमून भागून घरी आल्यावर आमटी पोळी, भात खाउन साहेब तृप्त व्हायचे.
हे सांगली कर असल्याने आमटी बरोबर ज्वारीचे थालिपीट ही खात आवडीने.

माझी शाळा १२ ची असायची त्यामुळे सकाळी गरम गरम भात व तूप आमटी खाउन शाळेत जायचो. व
सुट्टीला दही भाताबरोबर आमटी व पोह्याचा तळलेला पापड!!! ह्यात फ्रेश चिरलेली हिरवी कोथिंबीर मस्ट आहे.

वॉव!!! एकदम मस्त....... आत्ताच ती वाटीतली आमटी ओरपावीशी वाटतेय.

Pages