क्लिक!

Submitted by जव्हेरगंज on 19 June, 2016 - 08:05

आधी हे चॉकलेट खाल्लं तरी चालेल !

==========================================================

हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय?
मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्.
मग लाल बटन दाबलं

क्लिक

पक्यानं आणि मी ती सुटकेस खोलायची जाम खटपट केली. मग तशीच घेऊन आलो खोलीवर. जिथं ड्रेनेजचं भोक उघडतं तिथंच आमची खोली. गढूळ पाण्याचे झरे वाहतात चोहीकडे. अर्थात गटारे.

दाराला कडी घालून आत बसलो. मांडीवर ब्याग घेतली. पकडीनं लॉक उचकाटलं. पण हे मटरेलंच वेगळं. तोडताच येईना.
पक्या कोरी मारुन आडवा पडलेला. मातीचा कुड एका लाथीत ढासळला असता. सुटकेस उचलून व्यवस्थित ठेवली. मग झोपलो.

काय असेल आत? काहीही असो. माल मिळाल्याशी मतलब.

सकाळी जाग आली तेव्हा पक्या अगोदरच उठून खटपट करत बसला होता. सुटकेस जवळपास उघडलीच होती त्याने. कानशीनं घासली होती कडेनं. मग लॉकच्या बाजूनं कातरत सुटला होता.
मी म्हटलं, सर बाजूला, मी बघतो.
एका हातानं लॉक वाकवून फिरवलं. मग पिळलं. शेवटी तुटलंच.
सुटकेस उघडून आत बघतो तो काय, नुसती कापडं. बर्मुडे आणि लेंगे. छोटा बॉक्स दिसला, टाकला खिशात. खाली वायरी आणि लहानश्या ब्याटऱ्या. बरंच बारीक बारीक चिपळ्या टाईप मटरेल. त्याच्या खाली पुन्हा कापडं. ह्याट!
पक्या म्हणाला, "वायरमेनची ब्याग दिसतीय. ह्यात तर झ्याx काय नाय"

श्या!

मग नाष्टा करायला आम्ही हॉटेलात गेलो. भजीपाव वगैरे हाणले. तसंच फिरत फिरत बसस्टँडवर आलो. आधीपण इथं एकदोन पाकीटं मस्त मारली होती. आता मोठा हात मारुन हे गाव सोडायचा विचार होता. पण काल माती खाल्यानं संभाळून राहावं लागणार होतं. पक्या सावज हेरत बाकड्यावर बसला होता. मी त्याच्या समोर बसून पाठीमागे लक्ष ठेऊन होतो. तेवढ्यात मला तो खिशातला बारीक बॉक्स आठवला. लगेच हातात घेऊन उघडला. सिगारेटच्या पाकीटाऐवढी वस्तू त्यात दिसली.

हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय?
मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्.
मग लाल बटन दाबलं

क्लिक

पक्यानं आणि मी ती सुटकेस खोलायची जाम खटपट केली. मग तशीच घेऊन आलो खोलीवर. जिथं ड्रेनेजचं भोक उघडतं तिथंच आमची खोली. गढूळ पाण्याचे झरे वाहतात चोहीकडे. अर्थात गटारे.

दाराला कडी घालून आत बसलो..
.
सकाळी जाग आली तेव्हा...
.
नाष्टा करायला आम्ही हॉटेलात गेलो...
.
तेवढ्यात मला तो खिशातला बारीक बॉक्स आठवला. लगेच हातात घेऊन उघडला.
सिगारेटच्या पाकीटाऐवढी वस्तू त्यात होती.

हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय?
मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्.
मग लाल बटन ??????

बापरे!!!!
नको दाबायला.
पुन्हा ती सुटकेस खोलायची खटपट करावी लागेल. आतापर्यंत हे चाळीसवेळा तरी झालं असेल.
फेकून द्यावं का हे?
भुताटकीच की!!
साल्या टकलूचा बेक्कार खेळ दिसतोय हा!
फेकतोच!
नाहीतर नको.

जरा विचार केला.
हुशारीने वापरायला हवे.
नॉबवर कंट्रोल हवे. योग्य टायमर सेट केला की झालं.

मग एक प्रयोग केला. नॉब व्यवस्थित सेट केला. पाच मिनटाचा. अन उठून पक्याला जोरदार कानफटात लावली.
"येडा झाला का बे?" म्हणून जरा खवळलाच!
मग त्याच्या पेकाटात लाथ घातली. मग मात्र आऊट ऑफ कंट्रोल होत तो चालूनच आला. झटक्यात लाल बटन दाबलं.

क्लिक

मग एक प्रयोग केला. नॉब व्यवस्थित सेट केला. पाच मिनटाचा. अन उठून पक्याला???

ग्रेट!!!
हे घडतंय!

आता मोठा हात मारायला पायजे. मजा येईल. पण कुठे?
कुठे, कुठे?

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईंग्रजीतील चित्रपट "सोर्स कोड" आठवला.
नायक.. ट्रेन.... मैत्रिण... टीसी.... ब्लास्ट..... नायक.... ट्रेन... टीसी... सायकल... ब्लास्ट.... नायक.... ट्रेन.... सायकल.. मैत्रिण... विदुषक.... आरोपी..... ब्लास्ट....