१२ महिन्यांनी आज म्यागी नामक प्रकार पुन्हा करायला (आणि खायला) घेतला. म्हणून म्हटलं दोन मिनिटातच का खेळ खल्लास करा. घेऊया की चांगली १२ मिनिटे.
स्थळ - किचनकट्टा, दक्षिण-मध्य मुंबई
काळ - मध्यरात्रीचा
आचारी - मी स्वत:
मदतनीस - शेजारच्या पिंट्या
मदतीचे स्वरूप - भांडी धुवून देणे.
साहित्य - पॉर्न
जोक होता हं
साहित्य - कॉर्न , कोंबडीचे अंडे, वाटाण्याची भाजी, मटकीची डाळ (बहुतेक हं, मला डाळी स्वत:हून ओळखता येत नाहीत), म्यागी आणि म्यागीचे मसाले, म्यागीचाच टमाटर सॉस, एव्हरेस्टचे नको नको ते मसाले, कांदा आणि कोणचे तर लिंबाचे लोणचे.
अप्रकाशित साहित्य (म्हणजे जे ऊपलब्ध नव्हते, नाहीतर वापरायला आवडले असते) - फरसाण आणि घरगुती लाल ठेचा.
डायलॉग - जिथे लोकांचे पदार्थ बनवून संपतात तिथे माझे सुरू होतात..
तर वरच्या डायलॉगला अनुसरून डाळ आणि उसळ घरात तयार होती. मात्र त्यात कोलसवायला भात नव्हता. ताजा करून द्यायला आई नव्हती. सोबतीला शेजारच्या पिंट्यालाही काहीतरी खाऊ घालायचे होते. त्यांच्याच घरात पडलेली, एक्स्पायरी डेट संपत आलेली आणि त्यानेच हुडकून आणलेली, एक वेज म्यागीचे, एक चिकन म्यागीचे, तर एक येप्पी म्यागीचे पाकीट हाताशी होते. त्यांचीच मारामारी करून काहीतरी बनवायचे ठरवले.
आमचा फ्रिज कधीही उघडा, त्याचा एक कप्पा जणू खुराडाच असल्यासारखी आठ-दहा अंडी सहज हाताला गावतात. भाताचा प्रकार असता तर मोजून चार वापरली असती पण म्यागीच्या मूळ चवीवर कुठेही अत्याचार करायचे नसल्याने एकच उचलले. तसेही शाकाहारी लोकांचा पत्ता कट करायला एकच पुरेसे होते.
एका टोपात मीठ मसाला कांदा लसून कसलेही संस्कार न करता एवढासा तो अंड्याचा जीव फेटून तळून घेतला. याला आपण प्लेन भुर्जी म्हणू शकतो. त्यात वाटाण्याची भाजी आणि हॉट कॉर्न टाकले. कॉर्न मोजून सातच होते. काजू बदाम सारखे नेमक्या सात घासांना लागू नयेत म्हणून चमच्याने चेचून टाकले.
एकंदरीत पहिल्या टप्प्यानंतरचे चित्र असे दिसायला लागले.
त्यावर कांदा आणि म्यागीचा सॉस सोडल्यावर ते असे झाले.
आता म्यागीच्या नूडल्स बनवायची माझी पद्धत, पुढीलप्रमाणे -
एका मोठ्या टोपात पाणी ऊकळवून त्यात सर्व नूडल्स न मोडता टाका, त्या स्वच्छ धुवून घ्या आणि पाणी गाळून फेकून द्या.
मग नवीन टोपात त्या धुतल्या नूडल्स घेऊन त्यात खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे थोडेसे पाणी सोडून त्याला पटकन एक उकळी द्या.
अधनामधना एकेक नूडल चिमटीत पकडून, उचलून पटकन तोंडात टाकत खाऊन बघा. कचकच कमी होत नरम पडायला सुरुवात होताच गॅस काढून टाका.
आता अडमतडम मसाले टाकायची वेळ झाली समजा.
आयत्या वेळी काय टाकावे आणि काय नाय अशी धांदल उडायला नको आणि त्या दिरंगाईत नूडल्स नरम पडायला नकोत म्हणून सारे मसाले असे किचनकट्ट्यावर मांडून घ्या.
मसाल्यांचा गालिचा जेव्हा नूडल्सवर असा पसरतो बस्स तेव्हाच, तोंडाला पाणी सुटायला सुरुवात होते
गॅस चालू न करताच वाफाळलेल्या नूडल्ससोबत ते मसाले छानपैकी ढवळून घ्या. मसाले जितके कमी जाळाल तितके चांगले.
हळूहळू म्यागी आपला रंग पकडायला सुरुवात करते आणि तोंडातल्या पाण्याची पातळी वाढत जाते.
आता शेजारच्या चुलीवरील अंड्याच्या टोपात डाळीचे पाणी टाका. फक्त पाणीच टाका. डाळीचे अतिरीक्त कण टाकाल तर रोजच्यासारखा घरचा डाळभात खाल्यासारखे वाटेल.
त्या मिश्रणाला पटकन एक छानशी उकळी देत त्यात दुसर्या टोपातील नूडल्स सोडा.
जास्त ढवळाढवळ न करता फटकन एक चमचा फिरवून गॅस काढून टाका. वेळ लावाल तर एव्हाना धोक्याची पातळी ओलांडलेले तुमच्या तोंडाला सुटलेले पाणी त्यात पडायला सुरुवात होईल आणि आयुष्यभर ढवळतच राहाल.
म्यागी तयार झाली आहे.
पण ताटात घेतल्याशिवाय मजा नाही.
नूडल्स कमीतकमी तुटतील याची काळजी घेतली असेलच. त्यामुळे खायला काटा द फोर्कच वापराल.
(तसेही चमच्याने म्यागी खाणे म्हणजे हाताने वडासांबार खाण्यासारखे झाले)
गर्रमा गरमच खायाची असल्याने त्यावर गार्निशिंग करत त्याचे फोटो टिपायच्या भानगडीत पडलो नाही. वरच्या चित्रातील ताट किचनकट्ट्यावरून बेडरूममपर्यंत जाईस्तोवर, त्यावर एक लिंबू लोणच्याची फोड येऊन बसली होती.
विशेष टीप -- काय नाय. खायला या
- ऋन्मेष
तेवढे अंडे बाहेर
तेवढे अंडे बाहेर काढशील
<<
शेजारच्या संस्थळावर असता का हो तुम्ही? तिकडे पाक्रू आली, की "ही अंडी घालून करता येईल का?" हा अती फेमस व घिसापिटा प्रश्न झालेला आ।ए.
चिकन चे तुकडे टाकले असतेस आणि
चिकन चे तुकडे टाकले असतेस आणि थोडा वेळ अजुन थांबला असतास तर वेगळी पाककृती तयार झाली असती
चिकन असतं आणि बनवता येत असतं
चिकन असतं आणि बनवता येत असतं तर म्यागीच्या नादाला कोण लागले असते.
बाकी म्यागीचा मसाला होता त्यात. आता तो कोंबडीच्या मांसापासून बनवतात की नेहमीच्या मसाल्यातून कोंबडीचे पीस फिरवून काढतात कल्पना नाही. म्हणूनच अंडे झिंदाबाद.
सगळे यॅक वाटत असतानाही
सगळे यॅक वाटत असतानाही लेखनशैली झक्कास.
आघाडी सरकार सारखे इतके सारे
आघाडी सरकार सारखे इतके सारे असंबद्ध पदार्थ एकत्र केलेच आहेत तर सर्व्ह करताना वर एक स्कूप श्रीखंड व थोडे ड्राय फ्रूट्स घालून सजावट करायला हवी..
ऋन्मेऽऽष,, चांगली रेसिपी आहे.
ऋन्मेऽऽष,,
चांगली रेसिपी आहे. यात जर एव्हरेस्ट चे मसाले न टाकता कोबी - गाजर टाकले असते तर मी- गोरांग (mie goreng) म्हणुन खपले असते.
mie goreng हे सिंगापुर, मलेशिया मधिल प्रमुख खाद्य पदार्थ आहे.
तिबेटीयन सुप थुकप्पा आणि
तिबेटीयन सुप थुकप्पा आणि सिंगापूर मलेशियाचे मई गोरांग ... जर लोकांना आठवत असेल तर माझी रेसिपी इंटरनॅशनल आहे बोलायला हरकत नाही
गॅस काढून टाकायच म्हणजे नेमके
गॅस काढून टाकायच म्हणजे नेमके काय करायचे??सिलेंडेर काढून टाकू की फक्त रेग्युलेटर काढला तरी चालेल की आख्खी शेगडिच काढून टाकू
बाकी पाकृ द रेसीपी एकदम भारी..भाज्या/अंडी कधी नै ट्राय केल्या पण अडम तडम मसाले वापरते बऱ्याचदा .अजुन न सुप चोप्सि चे मसाले पण ट्राय कर कधी तरी ...एकदम बेस्ट
कधीच करणार नाही ते जावूदे पण
कधीच करणार नाही
ते जावूदे पण शेगडीचा लाल रंग मस्त आहे
Everest चे मसाले आणि Maggie
Everest चे मसाले आणि Maggie sauce नाही वापरले तर जास्त चांगले लागेल.
खरंतर मला वरणाच्या पाण्याचं additionच interesting वाटलं.
प्राचीस एव्हरेस्टचे मसाले
प्राचीस एव्हरेस्टचे मसाले अगदीच अत्यल्प प्रमाणात होते. कारण म्यागीचे मूळ मसाले होतेच. एकूण मसाल्यांचे प्रमाण जास्त झाले तर भडक होते.
डाळीचे पाणी नंतर पुढच्यावेळी अंड्याच्या कालवणाला सुटलेले पाण्याने ट्राय करायचा विचार आहे.
तसेच मसाल्यांना बाजूलाच ठेवून खोबर्याचे दूध, गूळ-साखर टाकून गोड म्यागी केली तर कसे लागेल हा देखील एक विचार मनात दरवळतोय..
भयानक विचार आहे .लवकर काढुन
भयानक विचार आहे .लवकर काढुन टाकावा.
इतक्या गोष्टी टाकल्याच आहेत
इतक्या गोष्टी टाकल्याच आहेत तर त्यात थोडं खसखस खोबरं आणि मध होऊन जाऊदे त...
साधासोपा विचार आहे. जे आपण
साधासोपा विचार आहे. जे आपण तांदळाच्या भाताबरोबर करतो तेच म्यागी नूडल्ससोबत ट्राय करून बघायचे. एखादी भाजी आपण चपातीबरोबर खातो तिच भाकरीबरोबर खातो असे काहीसे आहे हे. कोणती भाजी चपातीबरोबर चांगली लागेल किंवा कोणती भाकरीबरोबर याचा मनोमन कितीही अंदाज बांधला तरी प्रत्यक्ष खाल्याशिवाय चव समजत नाही. जोपर्यंत माझ्या शेजारी पिंट्यासारखी पोरे आहेत जे मी केलेला पदार्थ खाऊन पचवून त्याबद्दलचे आपले प्रामाणिक मत प्रदर्शित करायची हिम्मत ठेवतात, तो पर्यंत या प्रयोगांना मरण नाही
काय अन्नाला यक्क यक्क करताय
काय अन्नाला यक्क यक्क करताय सगळे? तिकडे चीनी मार्केटातले खाण्यात येणारे जिवंत प्राण्यांचे न बघवणारे फोटो पाहताना 'ते त्यांचे अन्न आहे म्हणुन नावे ठेवु नका' असं म्हणायचं आणि इकडे मॅगीत दोन मसाले जास्त टाकलेत तर यक्क म्हणायचं? कमाल आहे.
ऋन्मेष भाज्या पण घाला म्हणजे ते 'वन डीश मील' म्हणतात ते तसे होईल.
सुनिधी,
सुनिधी,
काय अन्नाला यक्क यक्क करताय
काय अन्नाला यक्क यक्क करताय सगळे? तिकडे चीनी मार्केटातले खाण्यात येणारे जिवंत प्राण्यांचे न बघवणारे फोटो पाहताना 'ते त्यांचे अन्न आहे म्हणुन नावे ठेवु नका' असं म्हणायचं आणि इकडे मॅगीत दोन मसाले जास्त टाकलेत तर यक्क म्हणायचं? कमाल आहे.>> ++++++++++++ १०००००००००००००००००
पिंट्याच्या आईचा विश्वास आहे
पिंट्याच्या आईचा विश्वास आहे माझ्यावर..>>>>> पण आमचा या रेसेपीवर नाहीये नां!:फिदी::दिवा:
मसाल्यांना बाजूलाच ठेवून
मसाल्यांना बाजूलाच ठेवून खोबर्याचे दूध, गूळ-साखर टाकून गोड म्यागी केली तर कसे लागेल हा देखील एक विचार मनात दरवळतोय>>>>
तू वर केलीयेस तशीच बॉइल्ड मॅगी करून त्याच्यावर क्रश्ड कॅरामल कँडीज, ड्रायफ्रूट्स अन कंडेन्स्ड मिल्क (मिल्कमेड) घालून खाल्लंय.
तसंच मॅगी करून वरून दही / ताक, कच्चा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, अन चवीपुरती चिंच-गूळ चटणी घालून मॅगी भेळही केलीये.
अंडं घातलेल्या मॅगीला ताटात थापून, त्याच्या चकत्या काढून गार्लिक बटरवर शॅलो फ्राय करून घेऊन अन बर्गर बन्स मधे कांद्याची चटणी अन मेयो सोबत टाकून मॅगी बर्गर खाल्लाय.
(No subject)
मॅगी पॅटिस केलीत का
मॅगी पॅटिस केलीत का कोणी..
)
घट्टसं मॅगी करायचं, मग उकडलेल्या बटाट्याच्या मसालेदार पारीत सारण म्हणून भरायचं आणि चप्पट गोलसर करुन कॉर्नफ्लॉअर च्या द्रवात बुडवून रव्यात घोळवून तळायचं(किंवा चप्पट करुन तव्यावर कमी तेलात परतायचं.)
माय इन्व्हेंशन(असं मला तरी वाटतं
मॅगी ला किती वाईट ते बघा जरा
मॅगी ला किती वाईट ते बघा जरा
निळी पडलीय ती , तुमचे एक एक प्रयोग वाचून
मॅगी, उगी उगी !
मॅगी, उगी उगी !
बघा म्यागीची एक नूडल खेचताच
बघा म्यागीची एक नूडल खेचताच कसे आयडियांचे बंडल उलगडू लागले. ते बंडल काल वडाच्या फांदीला गुंडाळून त्यासकट तळले असते तर म्यागी वडे नावाचा एक पारंपारीक पदार्थ तयार झाला असता.
सुनिधी
खरंय एवढी वर्षे आपण विषारी म्यागी खाल्ली तर दोन जास्तीचे मसाले आपल्या प्रतिकारशक्तीचे काही वाकडे करू नये.
@ भाज्या येस्स.. म्यागीमुळे आणि म्यागीबरोबर मी आवडत नसलेल्या भाज्याही थोड्याफार खातो.
भाज्या हा तर म्यागीचा अविभाज्य भाग आहे. म्यागीवाले पाकिटाबरोबर भाज्या देत नाही म्हणून भाज्यांशिवाय नुसते मसाले टाकून म्यागी खाणे म्हणजे शर्टपीसवाले बटणं देत नाही म्हणून बटणांशिवाय शर्ट शिवणे. चार गोष्टी आपल्या घातल्याशिवाय फालूदा रंगत नाही.
@ मायबोली आयडी मॅगी, तुमच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी मी मॅगीचे म्यागी, एवढेच करू शकलो. बाकी क्षमस्व
. म्यागीवाले पाकिटाबरोबर
. म्यागीवाले पाकिटाबरोबर भाज्या देत नाही म्हणून भाज्यांशिवाय नुसते मसाले टाकून म्यागी खाणे म्हणजे शर्टपीसवाले बटणं देत नाही म्हणून बटणांशिवाय शर्ट शिवणे>>>>>>>>

पुढच्या वेळेस थोडासा साम्बार मसाला नि चिकन मसाला पण घाल.मी अजिबात चेष्टा करत नाहिये खुप छान टेस्ट येते..really
सांबर मसाला येस्स. कोणे एके
सांबर मसाला येस्स. कोणे एके काळी ट्राय करून झाला आहे. चिकन मसाला करेन नक्की ट्राय. टॉमेटो सार सुद्धा मस्त लागते. मागे कधीतरी म्यागीनेच बहुधा अश्या चवीची म्यागी आणलेली की सारभात खातोय अशी चव लागावी. पण त्यात आमच्या घरच्या सारभाताची सर नसल्याने तितकेसे रुचले नव्हते.
भारी लिहीलय.
परवाच मी मॅगी ग्रील्ड
परवाच मी मॅगी ग्रील्ड सॅन्ड्विच खाल्ले घरी मुलीने केलेले. सुकी मॅगी ब्रेड्मधे भरून तिने केलेले.. वाईट नाही लागले.
त्यात बेसील लिव्ह किन्वा तुळस
त्यात बेसील लिव्ह किन्वा तुळस अ॓ड कर, तेवढीच पवित्र होइल म्यागी
अजुन शतक कसे नाही झाले
अजुन शतक कसे नाही झाले धाग्याचे..
Pages