सेरेंगेटी नॅशनल पार्क म्हणजे एरवी मागास असणार्या आफ्रिकेच्या भूमीवरचं अमूल्य जंगलवैभवच. आपल्या नैसर्गिक अधिवासात स्वच्छंदीपणे वावरणारणार्या इथल्या जंगली प्राण्यांनी स्थानिकांचं आणि पर्यटकांचं सहअस्तित्व निर्धोकपणे स्वीकारलं आहे. त्यामुळे सेरेंगेटीची सफारी हा एक अस्सल, जातीवंत अनुभव ठरतो.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
जंगल भटकंती आणि फोटोग्राफी या माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टी; आणि जोडीला अॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफी या चॅनेल्सवरून दाखवल्या जाणार्याा जंगली प्राण्यांसंबंधीच्या डॉक्युमेंटरीज्! या सगळ्यांच्या मिश्रणातून खूप पूर्वीच मनाशी पक्कं झालं होतं, की आयुष्यात एकदा तरी सेरेंगेटीला भेट द्यायचीच. ते ‘एकदा तरी’ अखेर गेल्या वर्षी उगवलं आणि टांझानियातल्या त्या विस्तीर्ण जंगलातल्या एका आटोपशीर ट्रीपसाठी आमचा छोटेखानी ग्रूप आफ्रिकेच्या वाटेवर निघाला. माझ्यासारखेच जंगलप्रेमी असलेले अजून पाच पर्यटक आणि आमच्या सहलकंपनीचा एक प्रतिनिधी असे आम्ही सहाजण आता पुढला आठवडाभर गोरोंगोरो क्रेटर, सेरेंगेटी आणि लेक मन्यारा या परिसरांत फिरणार होतो.
आमची टांझानियाची वाट नैरोबीमार्गे जाणार होती. केनया एअरवेजची मुंबई-नैरोबी अशी फ्लाईट होती. पुढे तासाभरानं नैरोबी-किलिमांजारो फ्लाईट होती. त्या प्रवासात वाटेत विमानाच्या खिडकीतून माऊंट किलिमांजारोचं डोळे भरून दर्शन घेतलं. सकाळी १० वाजता किलिमांजारोला उतरलो. विमानतळाबाहेरच्या लाऊंजमध्ये आमचा लोकल गाईड-कम-ड्रायव्हर वुल्फगाँग हजर होता. साधारण तिशीचा तरूण; व्यवस्थित इंग्रजी बोलणारा, पण बोलण्याची पद्धत तद्दन आफ्रिकन. तो गेली दहा वर्षं सेरेंगेटी, मारा(केनिया) या जंगलांत पर्यटकांचे छोटे ग्रूप्स घेऊन फिरतोय. त्यानं दाखवलेल्या जीपमध्ये पटापट सामान ठेवून आम्ही ‘गोरोंगोरो क्रेटर’च्या दिशेने निघालो.
किलिमांजारो ते गोरोंगोरो हे अंतर साधारण २५० किमी.चं आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत गोरोंगोरो क्रेटरच्या गेटमधून दुपारी तीन वाजायच्या आत प्रवेश करणं आवश्यक होतं. त्यामुळे जेवणासाठी वेळ न दवडता आम्ही वाटेत आरुषा नामक एका बर्यापैकी मोठ्या शहरातून लंच बॉक्सेस सोबत घेतले. आरुषा हे शहर उत्तर टांझानियाची सफारी कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. वुल्ङ्गगाँगचं घर याच शहरात होतं. आरुषाहून निघाल्यावर त्याने जीप अशी काही हाणली, की आम्ही पुढल्या चार तासांतच गोरोंगोरो क्रेटरच्या गेटजवळ पोहोचलो! क्रेटरमध्ये फिरण्यासाठी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशी वेळ नेमून दिलेली असते. त्यामुळे आम्ही आधी आमच्या जंगल-रिसॉर्टवर न जाता संध्याकाळ होईपर्यंत क्रेटरमध्येच फिरणार होतो. क्रेटरच्या गेटजवळ वुल्ङ्गगाँग परमिट सादर करायला गेला. इकडे आम्ही कॅमेरा, लेन्स वगैरे बाहेर काढून ‘ऑन युअर मार्क’च्या थाटात तयार झालो.
एका मोठ्या ज्वालामुखीमुळे बनलेलं हे क्रेटर म्हणजे डोंगरांनी वेढलेलं प्रचंड मोठं आणि मोकळं रान आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा बर्यापैकी ऊन होतं. आमच्यासारख्याच अजूनही काही जीप्स फिरताना दिसत होत्या. आपल्याकडच्या जंगलात सफारीसाठी ज्याप्रमाणे ओपन जिप्सीज वापरतात, तशा इथे नाहीत. इथल्या जीप्स बंदिस्त असतात. मात्र त्यांचं छप्पर उंच करून घ्यायची सोय केलेली असते. क्रेटरवर पोचण्यापूर्वी वुल्फगाँगने आमच्याही जीपचं छप्पर थोडंसं वर उचलून छत्रीप्रमाणे केलं. इतकावेळ आम्ही बंदिस्त जीपमध्ये बसलेले प्रवासी होतो. आता उभं राहून बाहेरचं दृश्य पाहण्याची, फोटो काढण्याची सोय झालेली होती. किलीमांजारोहून येताना वाटेत आम्हाला विविध जातीचे पक्षी दिसले होते. आम्हाला ते पाहण्यासाठी, त्यांच्या फोटोसाठी थांबायची खूप इच्छा होती. पण वुल्ङ्गगाँगने जीप कुठेही न थांबवता सरळ गोरोंगोरोला आणली होती. पण आता पक्षी वगैरे सगळं विसरायला झालं. कारण आता आमची नजर सिंहांचा कळप शोधायला लागली होती.
वुल्फगाँगला आम्ही आधीच बजावून ठेवलं होतं, की ‘आफ्रिकन बिग-५ ला प्राधान्य द्यायचं!’ बिग-५ म्हणजे सिंह, हत्ती, गेंडा, पाणघोडा आणि जंगली म्हशी हे प्राणी. आपल्याकडच्या जंगलांमधले अनुभव पाहता तिथे टळटळीत ऊन्हात सिंह दिसतील का याची मला जरा शंकाच होती. पण क्रेटरमध्ये झाडी अशी जवळपास नाहीच. जी काही थोडीफार झाडं आहेत, ती दूरवर दिसणार्या डोंगरांवर आणि त्यांच्या पायथ्याशी. त्यामुळे इथे सिंहाचे कळप उघड्यावरच फिरत असतात. अचानक दृष्टीस पडतात. तसंच झालं. काही कळायच्या आत वुल्फगाँगने एका सिंहांच्या कळपासमोरच जीप नेऊन उभी केली. १-२ क्षण डोळ्यांवर विश्वावसच बसेना. आजपर्यंत कायम टी.व्ही.चॅनेल्सवरच पाहिलेलं ते दृष्य साक्षात समोर ठाकलं होतं. आपल्या हातात कॅमेरा आहे याचाही मला विसर पडला. बघताबघता ४-५ सिंहिणींनी येऊन आमच्या जीपच्या सावलीतच बसकण मारली. काही क्षण थरारून जायला झालं. पण आमची जीप स्टेशन-वॅगनप्रमाणे उंच होती; काचा बंद केलेल्या होत्या; त्यामुळे तशी भीती नव्हती. शिवाय कुठल्याच प्राण्यांना हात लावायला जायचं नाही हा प्रोटोकॉल होताच. त्या श्वापदांनाही अश्या सफारींची सवय असावी. त्यांच्या दृष्टीनं काही काळ सावलीत बसायला मिळणं अधिक महत्त्वाचं होतं. कदाचित आम्ही जसे फोटोंसाठी त्यांना शोधत होतो, तसेच ते सावलीसाठी आमच्या जीप्सना शोधत होते.
त्यांना ती सावली मिळाली, पण आम्हाला त्यांचे फोटो काढणं जिकीरीचं होऊन गेलं. वुल्फगाँगला सवयीनं ते लक्षात आलं असणार. त्यानं जीप अलगद पुढे काढली. तेव्हा मनासारखे फोटो मिळाले.दरम्यान अजून २-३ जीप्स आमच्या मागे येऊन उभ्या राहिल्या. एक-एक करून सिंहांचा अख्खा कळपच आता सगळ्या जीप्सच्या सावलीत येऊन विसावला. सगळ्या चालकांनी इंजिन्स बंद केली. जंगलातल्या शांततेत फक्त वार्याची झुळूक आणि कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट एवढाच काय तो आवाज येत होता. मला आपल्याकडच्या जंगलसफारी आठवल्या. प्रचंड गोंधळ आणि तारस्वरात चाललेल्या गप्पा या आपल्या प्रमुख सवयी. आपण प्राण्यांच्या राज्यात गेलोय आणि आपल्या आवाजाने प्राणी विचलित होऊ शकतात ही मुख्य गोष्ट आपण समजून घ्यायच्या फंदात पडत नाही! हा फरक तिथे फार प्रकर्षानं लक्षात आला.
सिंहांचं फोटोसेशन उरकल्यावर आमची जीप पुढे सरकली. लांबवर जंगली म्हशींचा एक कळप चरत होता. कुठेतरी वाचल्याचं मला आठवलं, की आफ्रिकेतल्या सगळ्या वन्य प्राण्यांत जंगली म्हशी अतिशय बेभरवश्याचे प्राणी म्हणून गणल्या जातात; वाघ-सिंहांच्या गुरगुरण्यावरून, त्यांच्या देहबोलीवरून माहितगारांना त्यांच्या मूडचा अंदाज बांधता येतो, पण जंगली म्हशींच्या बाबतीत ते शक्य होत नाही; त्या कधीही आक्रमक होण्याचा धोका असतो. वुल्ङ्गगाँगनंही तशीच माहिती दिली. त्याला एकंदरच पशु-पक्ष्यांबद्दल अगदी तपशीलात जाऊन माहिती देण्याची आवड होती. तो सतत जवळ एक दुर्बिण घेऊन असायचा. आमचं फोटो काढायचं वेड पाहून आम्हाला जास्तीत जास्त प्राणी-पक्षी दाखवण्यासाठी धडपड करायचा. पण त्यानं जीप त्या म्हशींच्या दिशेला न नेता दुसरीकडेच वळवल्याचं बघून मी न राहवून त्याला विचारलं, ‘‘जीप तिकडे का नेत नाहीयेस?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘जंगली म्हशी सेरेंगेटीमध्ये पण दिसतील. आपण सफेद गेंडा कुठे दिसतोय का ते आधी पाहू.’’ बर्याच भटकंतीनंतर एका पाणथळ जागी तसा एक गेंडा चरताना दिसला. पण ती जागा बरीच लांब होती, जीपने तिथपर्यंत जाण्यायोग्य रस्ताही दिसत नव्हता. शेवटी आम्ही दुर्बिणीतूनच त्या गेंड्याला न्याहाळलं.
आजूबाजूला बरेचसे झेब्रा, विल्डबीस्ट, इंपाला, गॅझेल चरताना दिसत होते. ‘अॅनिमल प्लॅनेट’ साक्षात पुढ्यात अवतरल्यासारखं वाटत होतं. मध्येच कोल्ह्याची एक जोडीही दिसली. जीपसमोरून एक तरस उड्या मारत गेलं. शक्य होईल तिथे वुल्फगाँगला विनंती करून जीप थांबवत आम्ही फोटो काढत होतो. एव्हाना संध्याकाळचे ५ वाजले होते. आमचं रिसॉर्ट क्रेटरपासून जरा दूर होतं. पोचेस्तोवर सहज तासभर गेला असता. त्यामुळे तिथून निघालो. प्राण्यांचा त्यादिवसापुरता निरोप घ्यायचा ठरल्यावर मग वाटेतल्या विविध पक्ष्यांकडे लक्ष गेलं. आपल्याकडे फार क्वचित दिसणारे टोनी ईगल, फिश ईगल दिसले; गिधाडं दिसली; इतर आपल्याकडे दिसणारे रोलर, स्टर्लिंगही होते.
रिसॉर्टवर पोहोचलो. चेक-इन करून खोल्या ताब्यात घेतल्या. सकाळपासून जीपच्या प्रवासाने अंग अगदी आंबून गेलं होतं. गरम पाण्यानं आंघोळ केल्यावर जरा ताजंतवानं वाटलं. आठ वाजता तिथल्याच रेस्टॉरंटमध्ये जेवण होतं. तिथे स्थानिक लोकांचा नृत्याचा कार्यक्रमही चालू होता. जेवता जेवता तोही बघत होतो. जेवणानंतर बॅग वगैरे तयार करूनच बिछान्यावर टेकलो. डोक्यात ‘पुढचे ३ दिवस सेरेंगेटीमध्ये फिरायचंय’ हा विचार; डोळ्यांसमोर आज दिवसभरात दिसलेल्या प्राण्यांचं संमेलन भरलेलं... त्या नादात झोप कधी लागली कळलंच नाही.
क्रमशः
त.टी. - हा लेख मुशाफिरी दिवाळी २०१५ अंकात प्रसिद्ध झाला होता.
मस्त फोटोज आणि वर्णन रे तोशा
मस्त फोटोज आणि वर्णन रे तोशा !
सगळे फोटो मस्तच
सगळे फोटो मस्तच
पहिले ४ फोटो खतरनाक!! बाकीचे
पहिले ४ फोटो खतरनाक!!
बाकीचे फोटो अफलातुन...त्यातल्या त्यात शेवटचा!
आणि या सर्वाला साजेसे वर्णन!
मस्त! मुशाफिरीमध्ये वाचलंच
मस्त! मुशाफिरीमध्ये वाचलंच होतं.
त्या सिंहांच्या नाकातोंडावर आणि अंगावर गोचिड आहेत का?
मस्त फोटो आनि वर्णन.
मस्त फोटो आनि वर्णन.
अतिशय सुंदर लिखाण आणि
अतिशय सुंदर लिखाण आणि फोटो.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
माश्या असतील त्या
माश्या असतील त्या
सगळेच फोटो मस्त आशुतोष !
सगळेच फोटो मस्त आशुतोष !
क्रमशः... पहिल्या पॅरानंतर
क्रमशः...
पहिल्या पॅरानंतर छोटीशी लाईन नाहीतर स्टार (------ / *******) टाक.
मस्त फोटो आणि वर्णन.
मस्त फोटो आणि वर्णन.
मस्त!
मस्त!
लली कल्हईवाली वैभ्या,
लली कल्हईवाली
वैभ्या, जंगलच्या राजाच्या नाकावर माश्या म्हणजे कसंसंच वाटलं... म्हणून गोचिड विचारलं
. जंगलातल्या शांततेत फक्त
. जंगलातल्या शांततेत फक्त वार्याची झुळूक आणि कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट एवढाच काय तो आवाज येत होता. मला आपल्याकडच्या जंगलसफारी आठवल्या. प्रचंड गोंधळ आणि तारस्वरात चाललेल्या गप्पा या आपल्या प्रमुख सवयी. आपण प्राण्यांच्या राज्यात गेलोय आणि आपल्या आवाजाने प्राणी विचलित होऊ शकतात ही मुख्य गोष्ट आपण समजून घ्यायच्या फंदात पडत नाही! हा फरक तिथे फार प्रकर्षानं लक्षात आला.>>>> यही तो मेन बात है!
मस्त आलेत फोटो. आता मनभरुन पहा आणी आम्हालाही दर्शन घडवा.
तोशा मस्त फोटोस आणि वर्णन.
तोशा मस्त फोटोस आणि वर्णन.
क्या बात है!!!! अतिशय सुंदर
क्या बात है!!!!
अतिशय सुंदर लिखाण आणि फोटो>>>>>+१०००
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
लले, सुचनेची दखल घेउन योग्य
लले,
सुचनेची दखल घेउन योग्य तो बदल केला आहे.
अर्रे व्वा!!! मस्तंफोटो आहेत
अर्रे व्वा!!! मस्तंफोटो आहेत आशु. माझ्या लिस्ट वरचंएक ठिकाण हे ही आहे!!!
कोणत्या महिन्यात ही ट्रिप करणं advisable आहे??
वर्षुताई, जुन ते ऑक्टोबर हा
वर्षुताई,
जुन ते ऑक्टोबर हा बेस्ट सीझन. ड्राय सीझन असल्यामुळे प्राणी पाणथळ जागेच्या आसपास प्रचंड संख्येने दिसतात.
मार्च ते मे पाऊस असतो. जुन-जुलै मध्ये विल्डेबीस्ट मायग्रेशन ( ग्रुमेटी नदी क्रॉस करुन मारा-सेरेंगेटी) असते. ते बघायला प्रचंड गर्दी असते.
वोक्के.. नोटेड!!! थांकु!!
वोक्के.. नोटेड!!! थांकु!!
क्या बात है!!!! अतिशय सुंदर
क्या बात है!!!!
अतिशय सुंदर लिखाण आणि फोटो>>>>>+१११११११११११
तोषा फोटो भारी. वर्णन वाचतो
तोषा फोटो भारी. वर्णन वाचतो नंतर.
अप्रतिम.
अप्रतिम.