कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.
मंडळी, उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही आणि मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो आणि कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन तो बहुतेक वेळा हुश्श.. करतो. पण मंडळी, या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो याचा आपल्याला विसर पडतो.
कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अॅसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, अॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक अॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच.
शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, व्यक्ती जर सातत्याने शीतपेयाचे सेवन करीत असेल तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. कोणतेही ३५० मिलीलिटर (ज्यामध्ये ३१.५ ग्रॅम साखर असते. ) शीतपेय एकावेळी घेतल्यास Diabetes-2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता २०% बळावते. शीतपेय माणसाच्या यकृताला आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचविते आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण देते. इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडनमधील प्रो. नीक वेअरहॅम यांच्या अभ्यासानुसार शीतपेयांच्या सततच्या सेवनाने वजन तर वाढतेच, पण शरीरातील इन्शुलिनचे कार्य कमी होते. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील प्रो. बेरी पॉपकीन यांनी तर आपल्या अन्नपदार्थातील साखर हा पदार्थ तंबाखूसारखा शरीरावर दुष्परिणाम करतो असे निष्कर्ष काढले आहेत.
या शीतपेयांच्या बाबतीत केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली त्यावेळी न्यायालयाने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले आणि अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला असे आदेश दिले की शीतपेयांचे सेवन हे प्रत्यक्षपणे नागरिकांच्या जीवनाशी निगडित असल्यामुळे या कार्बोनेटेड शीतपेयांची वेळोवेळी योग्य ती तपासणी करण्यात यावी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे जे दुर्दैवाने केले गेलेले नाही.
याबाबतीतील सेंटर फॉर सायन्स इन दी पब्लिक इंटरेस्ट (सीएसपीआय) या केंद्राने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक आहे.
कोकाकोला आणि पेप्सीसारख्या शीतपेयांच्या उत्पादन कंपन्या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक करीत आहोत. कारण या देशांतील अफाट लोकसंख्येमुळे प्रचंड बाजारपेठ आहे आणि शीतपेयांच्या दुष्परिणामांची गंभीरताही लोकांकडून दुर्लक्षित केली जाते. याचा फायदा उत्पादक उठवित आहेत. या केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मेक्सिकोमध्ये १२.४ अब्ज डॉलर्स (२०१६ ते २०२०) इतकी, ब्राझील मध्ये ७.६ अब्ज डॉलर्स (२०१२ ते २०१६), भारतामध्ये १२.४ अब्ज डॉलर्स (२०१२ ते २०२०) तर चीनमध्ये ५ अब्ज डॉलर्स (२०१४ ते २०१७) इतकी प्रचंड गुंतवणूक या कंपन्यांची आहे. याचाच अर्थ या कंपन्या मधुमेह, स्थूलत्व, दातांची हानी, हृदयरोग या आजारांना जणू खतपाणीच घालत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
भारतातील शीतपेयांची बाजारपेठ १० अब्ज डॉलर्स आहे. ती प्रतिवर्षी सहा ते सात टक्क्यांनी वाढते आहे. ‘कोक’ या कंपनीने विकत घेतलेले पेप्सी हे शीतपेय भारतात प्रथम क्रमांकाचे आवडते शीतपेय आहे. भारतातील ५१ दशलक्ष जनता आधीच मधुमेहग्रस्त आहे आणि डायबेटिक फाऊंडेशनने अशी भीती व्यक्त केली आहे की ही परिस्थिती अशीच राहिली तर २०२५ सालापर्यंत मधुमेहींची संख्या ८० दशलक्षावर पोहोचेल.
मेक्सिकोसारख्या देशातील २०१३ सालातील शीतपेयाचे दरडोई सेवन १३५ लिटर इतके प्रचंड होते. स्थूलत्वामध्ये जगात मेक्सिको सर्वात वर आहे तर Diabets-2 मधुमेहामध्ये पहिल्या नंबरवर तर लहान मुलांच्या स्थूलतेमध्ये जगात चौथ्या क्रमांकावर आहे, अशी शोचनीय स्थिती असलेल्या देशातच आपली पाळेमुळे खोलवर रुजविणा-या या अमेरिकाबेस शीतपेयांचे त्यांच्या देशातील दरडोई सेवन १९९८ ते २०१४ या काळात २५ टक्क्यांनी घटले आहे. ही तूट भरून काढण्यासाठी त्यांनी या विकसनशील देशात मोर्चा वळवला आहे. या कंपन्यांनी जरी असे जाहीर केले असले की लहान मुलांना लक्ष्य केले जाणार नाही तरीसुद्धा या शीतपेयांच्या जाहिराती प्रामुख्याने मुलांवरच चित्रित केलेल्या दिसतात. भारतामध्ये तर कोकाकोलातर्फे १२ ते १६ वयोगटाच्या मुलांसाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले जाते.
सेंटर फॉर सायन्स इन पब्लिक इंटेरेस्ट (CSPI) ने अतिशय चांगल्या शिफारशी केल्या आहेत. शासनाने शीतपेयातील साखरेच्या प्रमाणावर निर्बंध घातले पाहिजेत आणि त्याची कठोर अंमलबजावणी होते ना? याबाबतही वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजेत. साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या या शीतपेयांवर काही कर आकारायला हवेत आणि या करापोटी मिळणा-या उत्पन्नातून आरोग्यविषयक आणि संतुलित आहार विषय उपक्रम राबवायला हवेत. (मेक्सिको देशाने या पेयावर २०१४ मध्ये पहिल्यांदा कर आकारला.) तसेच या साखरमिश्रित शीतपेयांवर धोक्याची जाणीव करून देणारे लेबल लावणे बंधनकारक करणे तसेच शाळांमधून शीतपेयांच्या विक्रीस बंदी असणे अशी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनने राष्ट्रीय आरोग्य यंत्रणांना तांत्रिक मदत द्यावी जेणेकरून शीतपेयांचे सेवन कमी करण्याविषयी धोरणे प्रभावीपणे आखणे व लोकांना शीतपेयांचे सेवन करण्यापासून परावृत्त करणे देशांना शक्य होईल.
भारतासारख्या विकसनशील देशात जाहिरातींचे प्राबल्य तर खूप जास्त प्रमाणात आहे आणि आरोग्यास हानिकारक अशा शीतपेयांच्या जाहिराती तर लोकप्रिय कलाकारांच्या अवास्तव स्टंटबाजीने पुरेपूर असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जीवघेणे साहस करून मग शीतपेयाची बाटली एका दमात रिचविली जाते आणि आमची तरुण पिढी आणि लहान मुले यांना हे पेय पिण्यास भुरळ पाडते.
देशातील ही सद्य परिस्थिती बदलण्यासाठी या लोकप्रिय कलाकारांच्या तोंडूनच आरोग्यास हानिकारक शीतपेयांची योग्य माहिती लोकांसमोर आणावयास हवी. लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी आदी नैसर्गिक पेयांचे महत्त्व वारंवार त्यांच्यासमोर आणले गेले पाहिजे. एकंदरीतच लोकांच्या हिताचे आणि आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर आणि सातत्याने जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.
ज्योती मोडक, मुंबई ग्राहक पंचायत
दैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित.
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
‘कोक’ या कंपनीने विकत घेतलेले
‘कोक’ या कंपनीने विकत घेतलेले पेप्सी हे शीतपेय भारतात प्रथम क्रमांकाचे आवडते शीतपेय आहे.
>>> थम्स अप म्हणायचं आहे का???
कोक अन पेप्सी भिन्न कंपन्या आहेत.
याचाच अर्थ या कंपन्या मधुमेह,
याचाच अर्थ या कंपन्या मधुमेह, स्थूलत्व, दातांची हानी, हृदयरोग या आजारांना जणू खतपाणीच घालत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
<<
आता अशी शितपेय एकादा व्यक्ती हावरटा सारखा प्रमाणाबाहेर पित असेल तर त्याला अश्या आजारांना बळी पडावेच लागेल, ह्यात शितपेय बनविणार्या कंपन्या दोशी कश्या? शितपेयात जे घटक आसतात त्याची यादी रितसर शितपेयाच्या बॉटल/कॅन वर दिलेली असते आणि कोणत्याही पदार्थाचे सेवन प्रमाणा बाहेर केल्यास त्याचे दुष्परिणाम हे होणारच. उद्या एकाद्या मिठाईच्या दुकानात मी चौविस तास गुलाबजामून खात बसलो आणि नंतर आजारी पडलो तर तो मिठाईवाला दोषी असेल का माझा हावरट स्वभाव?
त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.
<<
देशी शीतपेये म्हणजे नक्की कोणती शीतपेये? गल्लोगली/रस्त्यावर मिळणारी लिंबू सरबत, कोकम सरबत, लस्सी ह्यात जे साखरेचे प्रमाण असते त्या बद्दल तर न बोललेच बरे.
This thread is for what,
This thread is for what, promoting Desi Drinks or for consumer complaints?
लेखात विस्ताराने माहिती
लेखात विस्ताराने माहिती द्यायला हवी होती ? या लेखाने बरेच प्रश्न निर्माण होताहेत.
या पेयातील खाखरेवरच सर्व रोख दिसतो आहे. साखर या पेयातलीच काय, कुठल्याही स्वरुपातली वाईटच.
मग ती अंजीर, खजूर वापरून केलेल्या मिठाईतलीही ( जी सर्रास शुगर फ्री म्हणून विकतात ) वाईटच.
या पेयातील इतर घटक, उदाहरणार्थ कोला नटचा अर्क.. हा देखील अत्यंत घातक आहे. त्याबद्दल कुणीही बोलताना दिसत नाही.
उत्तम प्रतीची देशी पेये, सहज उपलब्ध आहेत का ( आधी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध आहे का ) ? भारतातील उन्हाळ्यात आणि खास करुन समुद्रकिनारी जिथे जास्त घाम येतो, तिथे वारंवार पाणी पिणे गरजेचे असते आणि सध्या तरी हिच पेये सर्वत्र उपलब्ध असतात.
लोकप्रिय कलाकारांनी केलेल्या जाहिरातीचा निषेध करावा तेवढा थोडाच !
आणि इथे सुद्धा त्याच पेयांचे
आणि इथे सुद्धा त्याच पेयांचे फोटो दिले आहेत. या कंपन्यांना तेच तर हवे असते. एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी.
शीतपेयांबाबत सातत्याने
शीतपेयांबाबत सातत्याने विरोधात बातम्या येतच आहेत. लेखात दिलेली घातक द्रव्ये यात खरोख्रच असतील तर चिंतेची बाब आहे. पण पाश्चात्त्य देशात अजून बंदी कशी नाही इतक्या घातक पेयांवर ?
देशी पेये म्हणजे पतंजली यात उतरणार आहे का ?
अनेक वर्षांपूर्वी मनमाड
अनेक वर्षांपूर्वी मनमाड स्टेशन वर गोल्ड स्पॉट आणी थम्स-अप विकायला आलेल्या एका विक्रेत्याला 'क्या डुप्लिकेट माल बेचते हो' असं भरपूर छेडल्यावर वैतागून त्याने, 'डुप्लिकेट नही है, अभी अभी बनाया है' अशी अनावधानाने दिलेली कबुली आठवली. तेव्हा मनसोक्त हसलो होतो. अर्थात असलं धाडस करताना आक्ख्या बोगीत मिळून असलेली ५०-५५ मुलं-मुलींचा ट्रेकिंग च्या ग्रूप चं पाठबळ होतं हे देखील खरं.
एकेकाळी मी पाण्यासारखे ही
एकेकाळी मी पाण्यासारखे ही असली फसफसणारी शीतपेय प्यायचो. दिवसाला किमान एक लीटर !
रोज संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर तसेच झोपायच्या आधी शेव, फरसाण, चिवडा, वेफर ईत्यादी चखना सारखे सोबत खात प्यायचो.
हा काळ जवळपास तीन वर्षे चालला. मग बोअर झाले आणि पुढची काही वर्षे थेंबही प्यायलो नाही.
हल्ली पार्टीमूडमध्येच कधीतरी महिन्याला अर्धा एक लीटर पोटात जाते.
हे सांगायचा हेतू हा की मला या पेयांमुळे विशेष म्हणावा असा त्रास कधी झाला नाही.
पण यावरून ही पेये घातक नाहीत असा निष्कर्श काढायचा नाही.
पण मॅगीवर बंदी आणनारी आपली सरकार या पेयांवर बंदी आणत नसेल तर यात तितकेही घातक पदार्थ नसावेत. एका प्रमाणापर्यंत एंजॉय केल्यास हरकत नसावी.
काही लोकं दारूला जितकी नावं
काही लोकं दारूला जितकी नावं ठेवत नाहीत तितकी या फसफसणार्या शीतपेयांना ठेवतात हे बघून मात्र कधी कधी मौज वाटते.
मला वाटलं लेख मोठा असेल.
मला वाटलं लेख मोठा असेल. अर्धा पेग संपण्यास अजुन अवधी होता तर तितक्यातच लेख वाचून ही झाला
असो. चालायचंच.
चिअर्स!!!
नमस्कार, सर्व प्रतिसाद
नमस्कार,
सर्व प्रतिसाद देणाऱ्या वाचकांचे धन्यवाद.
आपल्या आलेल्या सर्व प्रतिक्रीया या लेख लिहिणाऱ्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांकडे ई-मेल द्वारे पोहोचविलेल्या आहेत. त्यांच्या उत्तरादाखल प्रतिक्रीया आल्यानंतर त्या येथे पोस्ट करु. तसेच हा लेख लिहिणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या संकेतस्थळाचे संकेतनाम व परवलीचा शब्द पाठविण्यात आलेला आहे जेणेकरुन लेखिकेला परस्पर या संकेतस्थळावर उत्तर द्यायचे असेल तर देता यावे.
या संकेतस्थळावरील तसेच इतर संकेत स्थळावरील मुबई ग्राहक पंचायातीचे हे लेख पुणे विभागाच्या अनुदिनी गटाकडून (Blog Team) कडून त्या त्या संकेत स्थळावर दिले जात असल्याने वेगवेगळ्या संकेतस्थळाकरीता वेगवेगळे स्वयंसेवी कार्यकर्ते काम करतात. सबब या कार्यकर्त्यांना अशा प्रतिक्रीया येथे देणे शक्य होणार नाही. परंतू आपणांस pune.mgp@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल