“गडावरची साळु”
चारी बाजूनी बदाबदा पाऊस कोसळत असतो. बाइक एका स्टॅंड वर तिर्की लाऊन रेन कोट मधे स्वता:ला लपवत सिंहगडच्या 'कोंढणपूर' ला बाहेर निघणार्या फाट्या जवळ निळ्या रंगाच्या नायलॉन च्या ताडपत्रिने झाकलेल्या झोपडी वजा टपरी मधल्या 'हाटीला'तली भजी प्लेट आणि ‘च्या’ साठी थांबलो. चारी बाजूने वार माजलेल. ते आजूबाजूच वारं भसभस पिस्टन ने स्टोव च्या टाकीत भरत बिचारा 'बिरोबा' मोठ्या कष्टाने पेटलेली ज्योत विझु नये म्हणून शिकस्त करत होता. तिकडे ह्या तिशीतल्या बिरोबाची ऐन पंचविशितली साळू पटापटा पीठ मीठ तिखट योग्य प्रमाणात काल्वून भज्यांचा पुढचा घाणा तळण्यासाठी बिरोबाला द्यायच्या लगबगीत. आधीच पंधरा मिनिट थांबुनही भज्यांची प्लेट न मिळालेला एक कोथरूडचा नुकताच दहावी संपवून अकरावीत कॉलेज ला गेलेला आणि बहुदा पहिल्यांदाच आई बाबांना न जुमानता ट्रिपला पावसात बाहेर पडलेला मुला मुलींचा एकत्र आलेला कंपू 'बिरोबाला' त्याची भजी प्लेट लवकर डिलिवर करण्यासाठी प्रेशराईज करत उभा.
“देतो ‘बाजीराव’ देतो तुमास्नि बी...दमा वाईच...ही घ्या तुमि तवर तुमची गोल्ड फिलिक”
बिरोबाला एव्हाना माहीत असत. कुणी गोल्डफ्लेक मागीतलीय आणि कुणी कांदाभजी ऐवजी बटाटा भजि मागितली आहे ते. तो तेवढ्यात मनातून कोणत्या ग्रूप ने किती ‘कटिंग’ घेतल्या त्याचा हिशेबही बांधत असतो. बिरोबा कामाच्या टेन्षन मुळे भल्या पावसताही अक्शर्श: जरा कमी घामाने थब्थबत असतो. कारण...कांदा आणायला सांगितला असतो खालून गावातून भावड्याला पण तेवढ्यात 'आवss राकेल बी संपत आलय' अशी ब्रेकिंग न्यूज़ साळु ने दिलेली असते...खाली गावातून रॉकेल आणेस्तो पर्यंत प्यायच्या पाण्याने भरलेला ड्रम निम्या पेक्षा कमी झालेला असतो. तिकडे बिस्लरि बाटल्या संपत आलेल्या असतात. नोटा भिजू नयेत म्हणून त्या पॉलीथिन च्या एवढ्याश्या पिशवीतून सुट्यापैशा साठी नाणी आणि नोटा काढताना त्यात पाणी शिरलेल असते...ती भीजलेली नोट घ्यायला गिर्हाईक तयार नसते. त्याला गीर्हाईकाला पटवायच असते. चीड चीड होत असते पण बिचारा बिरोबा ती चिडचिड जिभेवर आजिबात न आणता...हसत मुखान पुढच्या गिर्हाकच्या ऑर्डरी स्वीकारत असतो. साळु मधेच ओरडते....”आssव आता बटाटा भज्या संपल्या म्हणून सांगा...! “
साळु आणि बिरोबा यांचा 'सिम्बिओसिस' हा काही निराळाच. लग्न होऊन किती वर्ष उलटली असावित यांची? दोन तीन की चार...कुणास ठाऊक?. माझ्या मनात उगाचच ऐन पावसाळ्यात एक खट्याळ प्रश्न उमटून जातो. साळू दिसायला तशी बिरोबाच्या मानान उजवी. सडपातळ. चेहृयावर छान पैकी तीन चार ठिकाणी गोंदण. भालजी पेंढारकरच्या काळात जन्मली असती तर ‘साधी माणस’ किंवा 'शाब्बास सुनबाई’ असल्या ब्लॅक अँड व्हाईट मराठी चित्रपटात जयश्री गडकरची धाकटी बहीण शोभली असती. बिरोबा मात्र सूर्यकांत सारखा जराही नव्हता. साधा सामान्य. मधेच कोपर्यात जायचा आणि हळूच तंबाखूचा बार भरायचा तळहातावर मळून. त्याच हाताने मग पुढच्या भज्या उकळत्या तेलात सोडायचा. त्याला आजूबाजूला आपली साळु पावसात किती सुंदर दिसतेय ह्याच बिलकुलही भान नाही. पुण्यातल्या औंध पासून ते कॅंप मधून आलेल्या तरुणाईच्या झुंडी मात्र आपला सगळा रोमंटिसीझम एकाच सीझन मधे संपवायच्या तयारीने बाइक वर एकमेकांना चिकटून गारठ्याचा फायदा उपटत होत्या. अवती भवती पाहील तर एकीलाही बिरोबाच्या साळुच्या साध्या करंगळीची ही सर नव्हती.
तेवढ्यात साळुन आणखी एक ब्रेकिंग न्यूज़ दिली...”पीठ बी” संपल्याची बातमी.
“तुला सांगत हुतू की न्हाई....फळी वरल बार्दान भरून्श्यान घे आख म्हणून...ऐक्लिस तर तू कसली...” बिरोबा पीठ संपल्याची बातमी ऐकताच साळुवर करवादला. सकाळी साडेसात पावणे आठला सुरू केलेला स्टोव शेवटी दुपारी दीड पावणे दोन ला धाप लागल्या सारखा शांत झाला.
बिरोबान मग उसन हसू तोंडावर आणत समोरच्या पल्सर वर एकमेकांना चिकटलेल्या जोडीला 'वाईच थांबा...ताज पीठ मागाव्तु...जरा सर कमी हुन्य्द्या...तवर या गडावर जौन...कणस देऊ का भाजून खात जावा वार्याला?
स्टॉव्ह भरभरायचा थांबला तशी साळुन पांढर्या दस्तीत बांधून आणलेली भाकरी सोडली. वर्ष सहा महिन्याच तान्हूल नुक्तच आईच दूध पिऊन शांत झोपल होत...त्याला ना वार्या ची चाहूल न पावसाची चुणूक. साळुन हेक्सो ब्लेड च्या धार लावून बनवलेल्या सुरिने भज्यांसाठी झरा झरा कापलेला परातीतला कांदा बिरोबाच्या पानात वाढला. बिरोबा तोपर्यंत तंबाखूचा बार संपवून प्लास्टिकच्या मगान चूळ भरून येतो न येतो, तोच हक्सो न बारीक कापलेला कांदा परत परातीत सारून दूरडितला एक कांदा उचलला आणि एका बुक्कित फोडला. बुक्कीने फोडलेला. कांदा भाकरीआणि चटणी सोबत तोंडाला लावला.
दोन घास खाल्ले. आणि मनात काय आल काय माहीत. लाकडाच्या फळी खाली स्टोवच्या बाजूला पैसे ठेवलेली पॉलीथिन ची पिशवी काढून सकाळ पासून गोळा झालेले पैसे मोजू लागला..."आव...आता...जेवा की गुमान" साळु ने बिरोबाला हाटकल.
अर्धवट ओल्या भिजलेल्या नोटा सरळ करत बिरोबा न नोटा मोजल्या. सगळ्या नोटा मोजून झाल्यावर समाधानाची एक लहर तोंडावर पसरली. एक भाकरी चा तुकडा मोडला आणि चटणी कांदा लावून साळु ला भरवला...साळु ला अचानक ह्या बिरोबाच्या वागण्यान लाजून चूर झाल. साळु कावरी बावारी होऊन आजूबाजूला पाहु लागली...
साळु आणि बिरोबाच्या प्रणयात व्यत्यय यायच्या आत मी बाइकला किक मारली आणि बुरूजाच्या दिशेने भन्नाट निघालो...!
पाच दहा मिनिटात ढगातून सोनेरी उन्ह गडाच्या हिरवळीवर उतरली...पाऊस थांबला, वार्याचा माजोरही ओसरला पण स्टोव भोवती एकमेकांना घास भरवणारी साळु आणि बिरोबा ची लाजाळू जोडी मात्र काय मनातून जाईना...!
चारूदत्त रामतीर्थकर.
३० मे २०१६
पुणे.
सुरेख! असाधारण 'साधी माणसं'
सुरेख!
असाधारण 'साधी माणसं' डोळ्यासमोर मस्त उभी केलीत.
Pages