बावनकशी- जिद्दीचा कैलास पर्वत!

Submitted by झुलेलाल on 28 May, 2016 - 12:24

या कथेतील पात्रे, प्रसंग काल्पनिक नाहीत. त्यामुळे या कथेतील जे काही आहे ते वास्तवच आहे. दोन दशकांच्या एका कालखंडाचे वास्तव. या वास्तवाने एका जगण्याला विस्तवाहूनही अधिक दाहक चटके दिले, पण ते जगणे डगमगले नाही. जिद्दीने वास्तवाशी झुंजत राहिले. जणू हे विधीलिखित कपाळावर लिहूनच आपल्याला देवाने इथे पाठवले आहे, या भावनेने ते जगणे आता आयुष्याचा अर्थ जगाला समजावण्यासाठी सज्ज झाले आहे.
या कथेच्या नायकाचे नाव- कैलास! वय ३४ वर्षे. सध्या मुक्काम- अमरावती. मूळ गाव- कराडशेजारचे एक खेडे. तिथे एका कुडाच्या झोपडीत त्याचा जन्म झाला; तेव्हा आईच्या पदरात नवऱ्याची दोन मुले होती. आईचं लग्न वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी झालं. ती शेतात मजुरी करत होती तेव्हा कुणीतरी ओळखीच्यानं लांबूनच एक तरुण मुलगा तिला दाखवला. ‘याच्याशी तुझं लग्न ठरवतोय’ असं सांगितलं. तिचं मत विचारायचा प्रश्नच नव्हता. कारण- गरिबी! कुणीतरी लग्नाची बोलणी केली, लग्न ठरलं, आणि ती बोहल्यावर चढली. अंतरपाट बाजूला झाला तेव्हा समोर पन्नाशी उलटलेला एक बाप्या ‘नवरा’ म्हणून उभा होता. तिनं त्याच्या गळ्यात माळ घातली आणि तिचं नवं आयुष्य सुरू झालं.. हळूहळू तिला बाहेरच्या जगाची ओळखही होऊ लागली. नवरा मुंबईत कुठल्याशा मिलमध्ये कामाला होता. पण व्यसनात बुडालेला. त्यामुळे तो घरी पैसे पाठवायचा नाही. पहिल्या बायकोची दोन मुलंही तिच्याच गळ्यात पडलेली. त्यात कैलासचा जन्म झाला. पाठीवर आणखीही एक मुलगा जन्मला आणि कैलासच्या आईचं जगण्याशी झुंजणं सुरू झालं. पोरांच्या पोटासाठी संघर्ष सुरू झाला. कुडाच्या झोपडीतलं ते युद्ध भिंतीबाहेर येऊ नये यासाठी ती काबाडकष्ट करू लागली. मोलमजुरी करूनही चार-पाच पोरांना वेळेला चार घास मिळवणे मुश्किल व्हायचे तेव्हा गावातल्या बंगलेवाल्यांच्या दरवाजाशी ती हात पसरू लागली. त्यांच्याकडचं उष्टं-खरकटं खाऊन पोरं दिवस ढकलत होती. कधी रात्री दिवा लावण्यापुरतंही रॉकेल घरात नसायचं. त्या अंधारात ती मनसोक्त रडून घ्यायची आणि मुलंही भूक मारून पाय पोटाशी घेऊन झोपून जायची. त्यातच एकदा ती मजुरीवर गेलेली असताना अचानक कैलासच्या धाकटय़ा भावाचं पोट फुगलं. तो तापानं फणफणला. आई धावत घरी आली आणि मुलाला मांडीवर घेऊन हताशपणे त्याच्याकडे बघत राहिली. समोर कैलास बसून होता. उपचारासाठी दहा रुपये हवेत म्हणून कैलासची बहीण गावात हात पसरत हिंडत होती. कसेबसे दहा रुपये गोळा झाले. ते घेऊन बहिणीनं घरात पाऊल टाकलं आणि मांडीवरच्या सहा महिन्यांच्या त्या अशक्त, खंगलेल्या मुलानं डोळे मिटले.
आईचा तो हंबरडा कैलासच्या कानात अजूनही घुमतोय. अजूनही कधी कधी आईच्या मांडीवरच्या त्या मलूल मुलानं मरता मरता फिरवलेले डोळे कैलासला स्वप्नात दिसतात आणि तो जागा होतो. आणि मग मरण इतकं स्वस्त होऊ द्यायचं नाही, असा निर्धार करत तो मुठी वळतो. उरलेली रात्र जागून काढतो आणि नव्या दिवसाला सामोरं जायला तयार होतो.. आईच्या मजुरीच्या कमाईवर दारिद्य्राशी झगडत त्या खेडेगावात कैलासची शाळा सुरू होती. पाटीला पैसे नव्हते. घराशेजारच्या उकिरडय़ावरचा एक पत्र्याचा तुकडा फाटक्या पिशवीत घालून ते दप्तर काखोटीला मारत कैलास शाळेला जायचा. मधल्या सुट्टीत लपूनछपून भाकरीची चतकोर फडक्यातल्या चटणीला लावून खायचा आणि वर पोटभर पाणी पिऊन भूक भागवायचा. शिकणाऱ्या या पोराला दोन घास मिळावेत म्हणून आई कधी कधी उपाशीच कामावर जायची. बाकीच्या मुलांसाठी शेजारपाजाऱ्यांकडचं उरलंसुरलं अन्न येताना घरी घेऊन यायची. कधी मिळालं नाही तर सामूहिक उपवास ठरलेला.
कैलासचं असं शिक्षण सुरू असतानाच एकदा खेळता खेळता तो तोल जाऊन पडला. पायातलं त्राण गेल्यासारखं क्षणभर वाटलं. पोटात काही नसेल म्हणून असं झालं असेल असा विचार करून जिद्दीनं तो उभा राहिला आणि धावण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा ते जमलं. पण पुढे कितीतरी वेळा चालता चालता उभ्या उभ्या पायांतलं त्राण जायला लागलं. अचानक कोसळायला होऊ लागलं. तेव्हा काळजीनं खंगलेल्या आईनं उधार-उसनवार केलेले पैसे काखोटीला मारून पोराला डॉक्टरकडे नेलं. कैलासला मस्क्युलर डिस्ऑर्डर नावाचा असाध्य आजार झाल्याचं निदान झालं. तेव्हा कैलास तेरा-चौदा वर्षांचा होता. या आजारावर उपाय नाही. पाच-सहा वर्षांत पोरगं पुरतं लोळागोळा होईल आणि पंचविसाव्या वर्षी मरून जाईल, असं डॉक्टरांनी सांगितल्यावर काळवंडलेल्या आईनं पोराला आधार देत घरी आणलं आणि कैलासचं नवं जगणं सुरू झालं. आता काही वर्षांतच आपण मरणार, एवढंच त्याला दिसत होतं. अभ्यासावरचं लक्ष उडालं. शाळेत जायला मन धजेना. चांगले गुण मिळवून पास होणारा हा पोरगा अचानक असा का झाला, हे कुणालाच कळत नव्हतं. कैलासच्या वर्गातल्या एका मुलीनं त्याला विश्वासात घेतलं. ‘असं का?’ असं विचारलं. तेव्हा कैलासनं आपल्या आजाराबद्दल तिला सांगून टाकलं. ‘‘आता लवकरच मी मरणार आहे. मग अभ्यास करून, शिकून काय करू?’’ असा अगतिक सवाल त्यानं त्या मुलीला केला. आणि त्याच्याच वयाच्या त्या मुलीला अचानक मोठेपण आलं. ‘मरायचंच आहे, तर चांगले मार्कस् मिळवून, शिकून तरी मर. अर्धवट शिकून, नापास होऊन मरण्यापेक्षा ते बरं!’ असा सल्ला तिनं दिला आणि जगण्याची एक लहानशी ऊर्मी त्याच्यात कुठेतरी जागी झाली.
कैलास पुन्हा अभ्यासाला लागला. अवघ्या घराची दारिद्य्राशी झुंज तर सुरूच होती. एक बरं होतं- या आजाराला औषधपाणी नसल्याने उपचारांचा खर्च नव्हता. एका बाजूने एकेक अवयव अपंग होण्यास सुरुवात झाली होती. कसंबसं दहावीची परीक्षा पार पडली. बारावीही झाली. पण मग शिक्षण थांबवावं लागलं. हुशार, जिद्दी कैलास घरी बसून आईचे काबाडकष्ट पाहत अधिकच अस्वस्थ होत होता. त्याच दरम्यान गावातल्या कुणा श्रीमंताचं पोरगं दहावीला नापास झालं. त्याचा बाप कैलासकडे आला आणि ‘माझ्या मुलाच्या नावावर दहावीची परीक्षा दे’ असं सांगून काही पैसे हातावर ठेवून गेला. मन खात असतानाही कैलासनं परीक्षा दिली. पेपर लिहिताना सारखं अपराधी वाटत होतं. अध्र्या तासातच पेपर टाकून तो बाहेर पडला. निकालाच्या दिवशी त्या मुलाच्या नावावर ३५ मार्क दिसत होते. एका पोराला कैलासनं पास करून दिलं म्हटल्यावर दुसऱ्याच्या नावावर पेपर देण्यासाठी कैलासची मागणी वाढत गेली. कैलासच्या जिवावर एक बनावट रॅकेटच तयार झालं. हा गुन्हा आहे हे कळत असूनही पैशाच्या गरजेपायी, आई-भावंडांच्या भुकेपायी कैलास इतरांच्या नावावर परीक्षा देत होता आणि मुलांना पास करून देत होता. आज त्यातली कितीतरी मुलं मोठमोठय़ा हुद्दय़ावर आहेत, असं कैलास सांगतो. पण त्याचा सूर अपराधीच असतो. पुढे आपल्या या अपराधाची खंत त्याला अधिकच अस्वस्थ करू लागली, तेव्हा तो स्वत:च सातारा पोलीस ठाण्यात गेला. सगळी कबुली दिली आणि बनावट मार्क मिळवून देणारं ते रॅकेट पोलिसांनी उद्ध्वत केलं. नको त्या कचाटय़ातून सुटल्याच्या समाधानाचा सुस्कारा टाकून कैलास पुन्हा दारिद्य्राशी झगडू लागला..
... कैलासच्या कहाणीचा हा पूर्वरंग! दरम्यान, कैलासनं कॅसेट्स-सीडीचं दुकान टाकलं होतं. धंदा बऱ्यापैकी सुरू होता. उधार-उसनवार, मोलमजुरी करून कैलासच्या आईनं लहानसं छप्परही डोक्यावर उभं केलं होतं. तशात कैलासचं लग्न झालं. सून घरी आल्याने कैलासची आई सुखावली. दिवसातल्या निवांत वेळात टीव्हीसमोर बसू लागली. सुनांच्या सीरियल्स पाहताना आपली सूनही तसंच वागणारी असावी असं तिचं अशिक्षित मन उसळी घेऊ लागलं. सुनेला त्याचा त्रास होऊ लागला. तिने माहेरी तक्रारी सुरू केल्या. तेव्हा सासऱ्यानं कैलाससमोर वेगळं व्हायचा पर्याय ठेवला. जिनं आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, उपास सोसले, आपल्याला उभं ठेवण्यासाठी जी सतत राबत राहिली, त्या आईला बायकोसाठी सोडणार नाही, असं कैलासनं बजावलं तेव्हा बायकोनं घर सोडलं. पुन्हा मरणाबद्दलचे विचार मनात येऊ लागले. नाही तरी आपण पंचविसाव्या वर्षी मरणारच आहोत, हा विचार मनात थैमान घालू लागला. त्याआधीच मरावं यासाठी त्यानं दारू-सिग्रेटच्या व्यसनांत स्वत:ला गुरफटवून घेतलं. तोवर पायांतला अधूपणा वाढला होता. परावलंबित्वही वाढलं. मोलमजुरी करून घरी परतल्यावर आधीच कष्टांनी वाकलेली आई कैलासची सेवा करू लागली. आणि कैलासची जिद्द जागी झाली. त्यानं घर सोडलं. स्वत:च्या अपंग पायांवर उभं राहून आईचे हाल कमी करायचेच असं ठरवून तो मुंबईला आला. कुणीतरी त्याला कोल्हापूरच्या नसीमा हुरजूक यांच्या संस्थेचा पत्ता दिला आणि कैलासनं त्यांची भेट घेतली. हात-पाय चालताहेत, काम शक्य आहे तोवर राहीन, अशी हमी देऊन कैलासनं तिथे प्रवेश मिळवला. काही दिवसांनंतर फक्त जगण्यासाठी तेथे राहणं योग्य नाही, त्यापेक्षा अपंग असलेले हात-पाय हलवून काहीतरी केलं पाहिजे, या जिद्दीनं त्याने आनंदवन गाठलं, आणि कैलासला आयुष्यातल्या हरवलेल्या क्षणांची ओळख झाली. आनंदवनाच्या वाद्यवृंदात निवेदक म्हणून काम करताना आपल्याकडे वक्तृत्वाची कला आहे हे त्याला जाणवू लागलं. त्यावेळी देणग्यांच्या पावत्या लिहिण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. पण आपण लिहिलेली अक्षरं कागदावर उमटत असली तरी त्या अक्षरांना कार्बनखालच्या कागदापर्यंत पोहोचवण्याचा जोर आपल्या बोटांत नाही, हे त्याच्या लक्षात येत होतं. हळूहळू अपंगत्व वाढू लागलं.
नेमक्या याच क्षणी कैलासला अमरावतीच्या ‘प्रयास’ संस्थेचा पत्ता मिळाला. ‘प्रयास’चे डॉ. अविनाश सावजी तरुणांची जीवनशिक्षण शिबिरे घेतात. ‘सेवांकुर’ नावाने चालणाऱ्या या शिबिरांमध्ये तरुणाईला विधायक दिशा देण्यासाठी डॉ. सावजी गेल्या काही वर्षांपासून अक्षरश: अहोरात्र काम करत आहेत. कैलासने अविनाश सावजींशी संपर्क साधला. व एके दिवशी व्हीलचेअरवर बसून कराडजवळच्या गावाहून तो अमरावतीला एकटा दाखलही झाला.. गेल्या वर्षभरापासून कैलास प्रयासमध्ये वास्तव्याला आहे. त्याला व्हीलचेअरमध्ये किंवा व्हीलचेअरमधून उचलून बेडवर बसवावे लागते. एकदा व्हीलचेअरवर बसला, की चौदा तास त्याला कशाचीही गरज वाटत नाही. लहानपणी उपाशी राहिल्याने बारा-चौदा तास अन्नपाण्याविना राहायची सवय आता कामाला येते, असं तो सांगतो. प्रयासच्या एका शिबिरात तो तीन दिवस राहिला तेव्हा शौचालय-बाथरूमला जाण्यासाठी इतर कुणाची मदत घ्यायला नको म्हणून तीन दिवस त्यानं अन्नपाणी घेतलं नाही. वर्षभरात कैलासनं भरपूर वाचन केलं. शेकडो पुस्तकांचा फडशा पाडला. शिबिरांमध्ये तरुणांसमोर भाषणं देताना, तसंच आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये जगण्याची उमेद जागवणारी व्याख्यानं तो देतो. गेल्या वर्षभरात जवळपास पन्नास शाळा-महाविद्यालयांत कैलासनं व्याख्यानं दिली. त्यासाठी कुठूनही कुठेही प्रवास करण्याची हिंमत त्याच्यात आहे. शरीर गलितगात्र होत असताना जिद्द मात्र दुप्पट जोमानं जागी झाली आहे. कदाचित कोणत्याही परिस्थितीशी झुंजून त्यावर मात करून जगता येतं, याचं उदाहरण जगासमोर ठेवण्यासाठीच देवानं आपल्याला असं अपंग जगणं दिलं असावं असं कैलास गमतीनं सांगतो. पुनर्जन्म असेलच, तर पुढच्या जन्मी याहूनही खडतर अपंगत्व मला देवानं द्यावं, म्हणजे मरणाला कवटाळणाऱ्या, नाउमेद होऊन आत्महत्या करणाऱ्यांना जगण्याच्या जिद्दीचं अधिक चांगलं उदाहरण मी समोर ठेवेन, असा विश्वास कैलास बोलून दाखवतो.
... कैलासशी बोलताना त्याच्या डोळ्यांत तरळणारं एक स्वप्न आपल्यालाही दिसतं.. आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आईसाठी छानसं घर गावाला बांधायचं स्वप्न! त्यासाठी एक लाख लोकांना भेटून प्रत्येकी एक रुपया मागणार, असं त्यानं एकदा अविनाश सावजींना सांगितलं, आणि ‘असं एकटय़ापुरतं स्वप्न पाहू नकोस..’ असा सल्ला डॉ. सावजींनी त्याला दिला. कैलासची जिद्द आता दुणावली आहे.. ..कॅनडामध्ये टेरी फॉक्स नावाच्या एका खेळाडूला ऐन उमेदीत कॅन्सरनं गाठलं. त्याचा एक पाय कापावा लागला. पण तो जिद्द हरला नव्हता. कॅन्सरसारख्या असाध्य आजारावर मात करण्याकरता संशोधन व्हावे, गरीबांना उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी टेरी फॉक्सनं आपलं उरलेलं आयुष्य अर्पण केलं आणि त्यासाठी निधी उभा करण्याचा चंग बांधला. ‘मॅरेथॉन ऑफ होप’ नावानं क्रॉस कंट्री शर्यत सुरू केली आणि नकली पायाच्या जोरावर १४३ दिवस धावून या पठ्ठय़ाने तीन हजार ३३९ मैल पार केले. यात त्याचा आजार बळावला. परंतु त्याच्या या जिद्दीची प्रेरणा जगभर पोहोचली. त्या आजारातच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या नावाने लाखो डॉलर्सचा निधी तोवर जमा झाला होता. आज ‘टेरी फॉक्स फाऊंडेशन’ ही त्याची संस्था जगभरातील अनेक कॅन्सरग्रस्तांचा आधार बनली आहे. कैलासच्या निधी-संकलनाचे स्वप्न विस्तारले तेव्हा डॉ. सावजी यांनी त्याच्यासमोर ठेवलेला टेरी फॉक्सचा आदर्श अधिक ठळक झाला होता. आता त्याला आपल्या व्याख्यानांची क्षितिजं आणखी विस्तारायची आहेत. ‘जगण्यात आनंद असतो!’ हा संदेश त्याला मनामनांत रुजवायचा आहे. त्यासाठी प्रसंगी स्वखर्चाने, उपाशी राहून प्रवास करायची त्याची तयारी आहे.
कराडजवळच्या एका खेडेगावात पंचविसाव्या वर्षी आपण मरणार, या भयाने खचून कुडाच्या झोपडीत कुढत बसलेला कैलास पानसकर नावाचा हा तरुण आज पस्तिशीच्या उंबरठय़ावर आहे. एकेक अवयव निकामी होत जाईल तसतसं त्यानंतरच्या जगण्याशी जुळवून घेणं शिकत आपण शंभरी गाठणार आहोत, असं तो हसत हसत सांगतो.. आणि व्हीलचेअरला झोकदार वळण देऊन टेबलापाशी जाऊन कामाला लागतो.. -

http://www.loksatta.com/bavankashi-news/inspiring-story-of-disabled-kail...

Group content visibility: 
Public - accessible to all site users