सल्ला

Submitted by अनाहुत on 28 May, 2016 - 10:23

" हे बघ चंदू "

" चंदू ? "

" बर बंडू "

" बंडू ? "

" अरे काय चंदू आणि बंडू मध्ये अडकून पडलाय ? पुढे काय सांगतो आहे ते ऐक ना . "

" बर बर सांगा "

" मग काय ते चंदू का बंडू "

" ते राहूद्या हो काय सांगणार होता ते सांगा . "

" तर बायकोला अगदी धाकात ठेवायच . उठ म्हटलं की उठली पाहीजे बस म्हटलं की बसली पाहिजे . ते प्रेम प्रेम म्हणून तुम्ही फार जपायला जाता पण तस नाही तो जो काय कंट्रोल आहे तो सुरूवातीपासून ठेवायचा मग बघ बायको कशी रहाते धाकात . आपल किती प्रेम आहे ते कधी दाखवायच नाही , दाखवल म्हणजे अगदी सारख सिद्ध कराव लागत . आणि आपली कमाई किती तेही कधी सांगायच नाही . नाहीतर त्याच्यावरच्या सीमेवर आणि त्याच्याही बाहेर खर्च सुरू झाला म्हणून समज . "

" अहो कस शक्य आहे ते ? "

" कस म्हणजे ? काय अवघड आहे त्यात ? हे जमलच पाहिजे ? "

" अहो आपल्याच बायकोसमोर प्रेम व्यक्त करायच नाही , मग कुणापुढे व्यक्त करायचं ? "

" अरे अगदी तस नाही प्रेम ही आपली कमजोरी वाटू द्यायची नाही . "

" अहो पण ... "

" अहो पण काय अहो पण हीच खरी पुरूषाची निशाणी , हाच खरा पुरूषार्थ . "

" म्हणजे बायकोसमोर दादागिरी , हा पुरूषार्थ ? "

" दादागिरी काय दादागिरी ? बायकोच्या बाबतीत हा शब्द येतोच कसा ? "

" नाही म्हणजे ते आपल तिच्या पुढे कशाला ना अशी दमदाटी ? "

" दमदाटी कसली ? तुझी बायको आहे ती आणि हा तुझा हक्क आहे आणि याला धाकात ठेवण म्हणतात . "

" बर आणि नाही ऐकल तिने तर ? "

" नाही ऐकत ? कशी नाही ऐकत ? नाही ऐकलं की इकडच मुस्काट तिकडं करायचं अगदी . "

" म्हणजे मारायचं ? "

" मग काय तर ? "

" छे हो जीव नाही होणार तिला मारायला . आता कुठे ' तु माझी आणि मी तुझा ' चे दिवस सुरू आहेत . आणि अस काही म्हणजे अती होईल . "

" इथेच इथेच मार खातात पुरूष . आधी गुंततात आणि मग काहीच करता येत नाही . "

" हो गुंततो आहे मी तिच्यात . "

" सावध हो " ते जोरात ओरडले तसे डोळ्यातले बदाम क्षणभर पळालेच पण लगेच फिरून परतून आले . ते बोलत होते पण मला फारस काही ऐकू येत नव्हत मी माझ्याच विचारात होतो . तेव्हढ्यात एक आवाज जोरदार कडाडला ,

" अहो काय करताय तिकडे इकडे या . "

त्या आवाजासरशी मघापासून तावातावाने बोलणारे आजोबा ताडकन उठून उभे राहिले आणि
" आलो आलो " म्हणत निघालेही . जाताजाता क्षणभर थांबले आणि माग वळून म्हणाले

" आणि मी सांगत होतो तस नाही केल की मग हे अस होत . "
.
.
.
.
.
.
" एकतर अस होणार नाही आणि झालच तरी चालेल पण तुम्ही सांगत आहात त्याला बिग नो . "

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users