लहानपणचे दिवस
मला आज माझ्या लहान पणच्या आठवणीना उजाळा द्यायची लहर आलीये.
आमच्या वाशीमची किंवा महाडची पहाट साडे चार पाचलाच व्हायची .आजूबाजूच्या अन माझ्या घरी ही विहिरीवरून पाणी आणायला घरात हालचाल सुरू व्हायची.विहिरीतून वर येणार्या घागरींचे, रहाटगाडग्यांचे, पाणी ओतल्याचे , कळशीत घुमत बाहेर येणार्या हवेचे आवाज येत. समोरच्या देवळात काकड आरतीची लगबग असायची.तिथे निनादणार्या घंटा व टाळ ऐकू यायचे. पंधरवड्यात एकदा सनई वाजायची. चवदार तळ्यात दिवे सोडले जायचे अन ते पहाटेच्या अंधुक प्रकाशास भेदून तळ्याच्या काठाना झळाळून जायचे. सकाळ कशी उत्साहित ,प्रफुल्ल अन दिवसाच्या आगमनास आतुर असायची.ही आवाजाची दुनिया असायची. पण यात माणसांचा आवाज फारसा नसे.
या नंतरच्या आवाजाच्या अनेक तऱ्हा असायच्या.ताईचे रडणारेबाळ,बम्बातून घंगाळात ओतले जाणारे पाणी,वडीलांच्या पूजेचे मंत्र,दारावर आलेल्या चिचा भाइची हाळी,शेजार्याच्या वासराचा तृप्त हंबरडा ,देवळातून अंधूक ऐकू येणारी आरती , थरथरत्या आवाजात ओव्या,भजने गाणारी आज्जी-असे अनेक.
मग हळू हळू सूर्य वर यायचा .शाळेची लगबग ,दूधवाला चिचा भाई मग घरच्या बाळन्तीण असलेल्या ताईला मालीश अन तिच्या बाळाला न्हाउ घालायला आलेली दाई असा सर्व गोतावळा असायचा . मग आई लगबगीने स्वैपाकाला लागलेली असायची-चुलीच्या धुराचा वास डोळ्यात पाणी आणायचा. बरोबरच बाळंतिणीच्या खोलीतील ऊद घरबर तरंगत असायचा. पूजेसाठी आणलेल्या फुलांचा गंध, उगाळलेल्या चंदनाचा गंध अशी ही गंधाची दुनिया असायची.
मग दिवस हळू हळू निसटायचा .उन्हाळ्याच्या दिवसात घरी विजेचे पंखे नव्हते -पण कधी कासावीस झाल्याचे आठवत नाही .कदाचित पंख्याच्या सुखाची जाणीवच नव्हती म्हणूनही असेल . आमच्या गावच्या पोस्ट मास्तर, न्यायाधिश इत्यादि सरकारी चाकरमान्यांकडे वाळ्याच्या ताट्यांचे पडदे असायचे. तिथे आम्ही उन्हाळ्याच्या सुटीत कॅरम किंवा पत्ते खेळायला जात असू. तिथल्या त्या वाळ्याच्या ताट्यातून येणारी हवा अन तो आतला ब्रिटिश वजा घरातील मोठ्ठा हालणारा पंखा ही मोठी चैन अन किमया वाटायची.
सकाळची न्याहरी हा प्रकार क्वचितच असायचा. सात आठच्या सुमारास वडिलांची पूजा उरकायची अन मग ते धार्मिक ग्रंथ वाचत , त्यांचे इंग्रजी आणि संस्कृतवर प्रभुत्व होते त्या मुळे ते वर्ड्स्वर्थ, मिल्टन, शेली, पॉल गॅलिको, सॉमरसेट मॉम इ. वाचत, अनेकदा मला बोलावत आणि त्या सर्वांबद्दल, कालिदास,भवभूती या सर्वांच्या साहित्याबद्दल सोदाहरण समजावत. त्यातील बरचसे मला कळत नसे पण तरीही ते काहीतरी उत्तम आहे हे मला कळायचे. उच्चारावर त्यांची पारंगतता होती. र्ह्स्व, दीर्घ आकार ऊकार इ. तंतोतंत असायचे. ते शिक्षक अधिक अन मुख्याध्यापक कमी होते. वर्गात इंग्रजी आणि संस्कृत शिकवतांना रंगून जायचे. ते कविता गावून दाखवायचे. त्यांचा आवाज खूप मधुर होता. घनश्याम सुंदरा .... ही तर त्यांच्याच आवाजात ऐकायला हवे असायचे. त्यांनी ’देवमाणूस’ या नाटकात काम केले होते. मायाळू निळेशार डोळे, उंच शरीरयष्टी अन गोरापान वर्ण या मुळे मी पुढे इंग्रजी चित्रपट पाहू लागलो तेव्हा ते पॉल न्यूमनसारखे होते असे वाटायचे.
नऊ साडेनऊच्या सुमारास पाने वाढली जायची. मी, माझी बहिण आणि वडील बसायचो कारण आम्हास शाळा असायची. मला आठवते ते साधे रुचकर अन कधी ही कंटाळा न येणारे सकस जेवण. वडिल सायकलवर शाळेला जायचे. शुभ्र धोतर व सदरा , धोतराला सायकल क्लिपा वर कोट टोपी असा त्यांचा वेष असायचा. कालंतराने त्यांनी पॅंट –बुशकोट वापरण्यास सुरुवात केली.
मग मी आणि माझे मित्र शाळेस पायी जात असू. वाटेत टिवल्याबावल्या करत असू. वाटेत मित्र जॉइन होत. मुली आणि मुले मात्र वेगवेगळ्या गटात जात.
शाळेत प्रार्थना असे... बलशाली भारत होवो.... ही माझी आवडती प्रार्थना होती. मग सुविचार होत असे. बातम्या... राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय वाचल्या जात असत. त्या वेळेस चिनी आक्रमणाच्या आणि वियेतनाम युध्दाच्या बातम्या मी वाचून दाखवल्याचे मला आठवते. त्या तील चिनी युध्दाच्या बातम्या वाचतांना मला वाईट वाटायचे कारण भारताची त्यात नामुष्की झाली होती. वियेतनाम युध्दाबद्दल मात्र काहीच कल्पना नसल्याने त्या यंत्रवत वाचल्या जायच्या. पुढे तरुणपणी त्याचा इतिहास वाचल्यावर अंगावर शहारे आले होते.शाळेत व्हॉल्व्हचा रेडियो होता. त्यात एम डब्ल्यु म्हणजे मिडियम वेव्ह आणि शॉर्ट वेव्ह होते. त्यावर मी भारत –पाकिस्तान मधील ऑलिंपिक हॉकी मॅचचे धावते वर्णन ऐकले होते. दुपारची वेळ होती. बहुतेक ते टोकियो ऑलिंपिक होते. भारत जिंकला होता आणि आम्हा मुलांना पटांगणावर बोलवून पेढे वाटले गेले होते.
सायंकाळी ४ च्या सुमारास परत यायचो. मधल्या सुट्टीच्या डब्यात पोळी भाजी , फोडणीचा भात असे काही बाही असायचे. मग ताराबाई कन्याशाळेत क्रिकेट, हुतुतू खेळायचो अन त्या नंतर शाखेत जात असे. तिथली “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...” ही प्रार्थना मला फार आवडत असे.
गावातल्या संध्याकाळी तसे पाहू गेले तर एकाकी असायच्या . रस्त्यावरचा अंधुक प्रकाश,त्या आधी कंदिलाच्या काचा राखेने स्वच्छ व्हायच्या, छोटी छोटी घरं, काही घरातून येणारा भाकरीचा आणि तिखटाच्या फोडणीचा वास, त्यात सातपासूनच मिसळलेला रातकिड्यांचा आवाज. मग पर्वचा व्हायच्या. आम्ही देवघराभोवती कोंडाळे घालून शुभंकरोति म्हणायचो. आणखी एक गंमत म्हणजे कोजागिरीच्या आधीच्या पंधरवड्यात आम्ही मुले मुली एकत्र जाऊन भोंडल्याची गाणी म्हणत दिलेली खिरापत वजा झाऊ हादडायचो.
आमच्या घरी पावणेआठच्या सुमाराला गाद्यांच्या वळकट्या सुटायच्या अन पसरल्या जायच्या. काही वीज असणार्या घरात आकाशवाणी वरील बातम्या सुरू व्हायच्या. आईची स्वयंपाकाची लगबग सुरू व्हायची. रस्त्यावर फकीर हिंडायचा. त्याच्या हातात ऊदाचे कमंडलू वजा भांडे आणि मोरपीसांचा पंखा असायचा अन तो खूप गूढ वाटायचा. कधी कधी माझ्या बाल मनातसुद्धा कुठल्यातरी अनामिक भीतीचा सूर ती संध्याकाळ लावून जायची .पुढे बंगलोरला स्थित्यंतर झाल्यावर “ताट्टे....निंगू” अशी कानडी हाळी घालणारा ताडगोळे विकत यायचा. कधी कधी शेजारच्या काकू किंवा ताई आईला काहीबाही विचारायला नाहीतर डब्यातील एखादा पदार्थ द्यायला यायच्या. मग काही वेळाने वडिलांची रामरक्षा अन विष्णु सहस्त्रनाम पठण संपायचे. आई मला ताट पाट करायला सांगायची. आठ साडेआठ पर्यंत जेवणे व्हायची. त्यामुळे मी जेवणानंतर आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिला गोष्टी सांगायला लावायचो. घरी कोणी पाहुणे असले की मग ते , आई आणि बाबा पुढच्या खोलीत गप्पा मारत बसायचे. आमच्या आईचे मामा एकदा दिल्लीहून आले होते , त्यांच्या हिंदी मिश्रित मराठीतील गप्पा अजूनही आठवतात.कधी कधी आमच्या बाजूच्या आळीतील शेजार्यांकडे आम्ही त्यांच्या वीज असलेल्या घरात आपली आवाड ऐकायला जायचो. वडील अधून मधून त्यांच्याकडे आकाशवाणीवरील साप्ताहिक संगीत सभा ऐकण्यास शनिवारी रात्री साडेनऊ वाजता जात असत
असे हे साधे दिवस! समृध्दी पैशाची नव्हती. किंबहुना चणचणच होती. समृध्दी होती वाचनाची, नात्यांची , संगीताची अन आपुलकीची.
मला वाटत हे सगळं खूप खरं अन प्रामाणिक असतं. शहरात संध्याकाळ नेहमी मालिकांमध्ये आणि मुबलक विजेच्या दिमाखात झाकोळलेली असते मन मात्र बहुधा खिन्न असत . त्यामुळे थकलेला दिवस त्याचं जग रात्रीच्या स्वाधीन करून निद्रिस्त जाताना कुणाला दिसत नाही. आणि म्हणूनच पण अनेक दशकांनंतरही त्या अंधूक आठवणी मला अस्वस्थ त्याचबरोबर गतस्मृतीविव्हल आणि काहीसे स्वप्नील बनवतात. ते स्वप्नातील दिवस सुखद होते की ही आजची अनायास सुखे बरी हा प्रश्न सतावू लागतो.
शेवटी मग फिलॉसॉफिकल होत म्हणावे लागते.......कालाय तस्मै नमः किंवा
The only thing constant is CHANGE
लहानपणचे दिवस
Submitted by रेव्यु on 28 May, 2016 - 01:24
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असे हे साधे दिवस! समृध्दी
असे हे साधे दिवस! समृध्दी पैशाची नव्हती. किंबहुना चणचणच होती. समृध्दी होती वाचनाची, नात्यांची , संगीताची अन आपुलकीची. >>>>> किती छान, साधे-सरळ पण समृद्ध जीवन होते...
ओघवती आणि चित्रदर्शी लेखनशैली - खूप सुरेख ...
छान लिहीलय. आवडल. माझे
छान लिहीलय. आवडल.
माझे लहानपण पण वीजेसकट पण टीव्ही विना थोड्याफार फरकाने लहान गावात राहिल्याने असेच गेले. ७५-९० असा काळ होता तो. संथ आयुष्य अन ताणविरहीत जीवन आता खेड्यांमधे सुध्दा नसणार. काळ बदलला आता खेड्यांसाठी सुध्दा.
मनाच्या कप्प्यात कस्तुरी
मनाच्या कप्प्यात कस्तुरी सारख्या जपून ठेवलेल्या सुंदर, सुवासिक आहेत तुमच्या लहानपणी च्या आठवणी.. खूपच गोड..
"त्या' काळातले , कष्ट्/क्लेश कारी प्रसंग आपसूकच विस्मरणात गेलेले असतात.
काळाबरोबर चालत राहताना, होणारे बदल आत्मसात करताना ,मिळणार्या सुखसुविधांचा उपभोग घेताना
गतकाळातील फक्त चांगल्याच आठवणींची शिदोरी आपल्याबरोबर असते.. ते किती छान आहे.
आज ही आपल्या स्वतःच्याच विश्वासावर,भरवश्यावर संगीत्,वाचन्,आपुलकी,नाती,प्रामाणिक पणा हे सर्व टिकूनच राहतील!!!! वॅनिश नाही होणार!!
छान लेख. वर्षु, प्रतिसाद खूप
छान लेख.
वर्षु, प्रतिसाद खूप आवडला.
छानच उजाळा दिलाय
छानच उजाळा दिलाय भावविश्वाच्या एका हृद्य भागाला !
ही शिदोरीच आयुष्यभर कळत नकळत जगण्यासाठीची उर्जा देत असावी प्रत्येकाला !
फारच छान
फारच छान
सर्व कौतुकास्पद
सर्व कौतुकास्पद प्रतिसादांबद्दल धन्यवाद
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
किती सुंदर! मी चित्र रंगवले
किती सुंदर! मी चित्र रंगवले डोळ्यासमोर.
वर्षूचा प्रतिसाद आवडला.
छानच. मी मुलांना म्हणते, माझं
छानच.
मी मुलांना म्हणते, माझं बालपण तुमच्या बालपणाशी अदलाबदल करायला मला नाही आवडणार आणि माझी आई मला तेच म्हणायची. बालपणात सुखसोईंपेक्षा आजूबाजुला मिळणार्या प्रेमाला महत्व असतं. त्यामुळे असेल वर्षू, गतकाळची चांगल्या आठवणींची शिदोरीच जवळ रहाते.
अगदी डोळ्यासमोर उभं राहीलं
अगदी डोळ्यासमोर उभं राहीलं तुमचं बालपण.
सुंदर लिहीलं आहे.
सुरेख लिहीलं आहे.
सुरेख लिहीलं आहे.
रेव्यु खूप सुरेख होत तुमच
रेव्यु खूप सुरेख होत तुमच बालपण. आमचही थोड्याफार फरकाने असच होतं! समृद्ध नात्यांमुळे सुखी असलेलं!
कालच आम्ही घरी या विषयी बोलत होतो. खूपच कमी गरजा असूनही सुखी आणी महत्वाच म्हणजे समाधानी होतो. *ते स्वप्नातील दिवस सुखद होते की ही आजची अनायास सुखे बरी हा प्रश्न सतावू लागतो.* असं मात्र मला कधीच वाटत नाही. ते दिवस नि:संशय सुखाचेच होते! आजचेही दिवस सुखाचे असतील पण ती निरागसता मात्र कायमचीच आठवणीत असेल! एका सुन्दर लेखाबद्दल अभिनंदन
धन्यवाद!!
धन्यवाद!!
छान लेख.
छान लेख.
हल्ली असे दिवस असतात का?
हल्ली असे दिवस असतात का?
खूप छान लिहिलंय!
खूप छान लिहिलंय!
खुप छान अनुभव. माझं बालपण असं
खुप छान अनुभव. माझं बालपण असं नाही गेलं पण माझ्या लेका पेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजते. भावंड एकमेकांकडे राहायला जायचो सुट्टीत . तर कधी कोकणात जायचो देवरूख ला , तेव्हा हे अनुभवलय थोड्याफार प्रमाणात.
छान लिहिलंय. बालपणीचा काळ
छान लिहिलंय. बालपणीचा काळ सुखाचा! पूर्वीचं आता काहीच नाही राहिलं. असं म्हणायला लागलीय म्हणजे मी हळूहळू जास्त प्रौढ होत चाललेय बहुतेक. मोठ्या सुट्ट्यात महिनाभर गावी जाणे , सगळ्या भावंडाना भेटणे, रोज घाटावर जाणे , संगमावर जाऊन वाळूत भरपूर खेळणे, नदीत डुंबणे, रात्री रातराणीचा सुगंध घेत पत्र्यावर गाद्या टाकून झोपणे. दुपारी पुस्तकात रमणे , रात्री सगळ्यां मुलांचा स्तोत्रे म्हणतानाचा घुमणारा आवाज हे सगळं खूप छान होतं.
असे हे साधे दिवस! समृध्दी पैशाची नव्हती. किंबहुना चणचणच होती. समृध्दी होती वाचनाची, नात्यांची , संगीताची अन आपुलकीची. >>> अगदी खरं आहे.
छान लिहीलय. आवडले
छान लिहीलय. आवडले
छान, खूप आवडलं
छान, खूप आवडलं
खूपच छान, आवडले.
खूपच छान, आवडले.
आपल्याला आपले बालपण स्मरणरम्य
आपल्याला आपले बालपण स्मरणरम्य आणि रंजक वाटते तसे आपल्या मुलांनाही कदाचित त्यांच्या मोठेपणी त्यांच्या बालपणाविषयी वाटू शकेल. आणि त्यांच्या मुलांनाही...त्यांच्यांच्या त्यांच्या मुलांनाही....
निर्मळ मनाने लेख लिहीला
निर्मळ मनाने लेख लिहीला की तो वाचणार्याच्या कोडग्या मनाला ही लागून जातो...
@रेव्यु हा लेख वाचायला फारच उशीर झाला... 'वीज असलेल्या घरात' हे त्या काळी किती कुतुहलाच असेल ना?!!
मी तरी निदान यापुढे प्रयत्न करेन की चुकूनही रिकाम्या खोलीतील विजेची उपकरणे चालू रहाणार नाहीत.
तुम्ही हा लेख लिहीला नाहीये... कोरलाय!!
खूप सुंदर लिहिलंय तुम्ही.
खूप सुंदर लिहिलंय तुम्ही..किती सुंदर आणि समृद्ध गेलंय तुमचे बालपण....time machine ने मागे जाऊन तुमचे बालपण जगायला आवडेल मला..
लहानपणचे दिवस आठवले.. आमचे
लहानपणचे दिवस आठवले.. आमचे आबासाहेब ग्रंथपाल असल्याने उन्हाळा/ दिवाळीच्या सुट्ट्यातल्या सगळ्या दुपारी वाचनातच निघून जायच्या..वाड्यातल्या सगळ्या मुलांना (१०)पुरतील अश्या हिशोबाने २०, २५ पुस्तके आणली जायची. वीज असली तरी फक्त दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनी असल्याने रविवार सकाळचे कार्यक्रम म्हणजे महाभारत/ रामायण आणि शक्तिमान सोडले तर बाकी काही पाहण्यात फारसा इंटरेस्ट नव्हताच. रेडिओ सकाळी ५.३० पासून सुरु व्हायचा तो ८ पर्यंत. वाड्यात दिवसा क्रिकेट आणि नंतर लपाछपीचा/ विष अमृत/ आंधळी कोशिंबीर/ नदी कि पहाड असे खेळ रंगायचे. संध्याकाळी पाच पासून वीज जायची ती आठ साडेआठ पर्यंत.. मग खेळून झाल्यावर अंगणात सगळे बसून पाढे वगैरे म्हणत असू, गावांच्या- गाण्यांच्या भेंड्या, मामाचं पत्र हरवलं वगैरे.. नव्वदीतले बालपण.. धन्यवाद, तुमच्या लेखामुळे परत लहान होऊन हे आठवता आलं..
सर्वांचे मनः पूर्वक आभार.
सर्वांचे मनः पूर्वक आभार.
आणखी अनेक आठ्वणी साठ्वणीत आहेत, वडिल हेडमास्तर ( आजच्या भाषेत प्रिन्सिपॉल ) असल्याने वाचनालयाच्या चाव्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्याकडे असायच्या त्या मुळे टारझन पासून गोट्या पर्यंत सर्व वाचून झालेले असयाचे. आणखी गंमत म्हणजे एवढ्या लहान गावात- तेव्हा जिल्हा नव्हता झालेला, एवढी लहान शाळा असूनही २ फूटबॉलची मैदाने, एक व्यायामशाला अन २ सुसज्ज प्रयोगशाळा होत्या... शनिवारी प्रोजेक्टर वर सिनेमा दाखवायचे. सर्व शिक्षक अत्यंत वाहून घेतेलेले असायचे....
अजिंक्यराव पाटील, नव्वदीतले
अजिंक्यराव पाटील, नव्वदीतले बालपण.. >> सेम पिंच
आम्ही रद्दी च्या दुकानातून पुस्तकं विकत घ्यायचो . २-३ रुपये किलो भावाने.
कमी पैशात खूप पुस्तकं मिळायची. चंपक, चांदोबा, किशोर,ठकठक चे जुने अंक ... बहुतेक पुस्तकांचं फक्त कव्हरच फाटलेलं असायचं.
खुप सुरेख बालपण होते तुमचे.
खुप सुरेख बालपण होते तुमचे.
वर्णन तर इतके छान केलयं कि डोळ्यासमोर उभे राहिले.
किती छान असेल ना त्यावेळेस,पॉप्युलेशन नसणार, वाहनांची गर्दी नसणार... मोबाईल नाही... आताच्यासारखे भरमसाठ चैनल्स असणारे टिव्ही नाही...
संध्याकाळचे वर्णन तर छान च केले आहे....
खासकरून........
त्यात सातपासूनच मिसळलेला रातकिड्यांचा आवाज...
लहानपणी मावशीच्या गावी गेल्यावर रात्री असा आवाज ऐकायला मिळायचा.....
वा !किती सुंदर लिहिलेय तुम्ही
वा !किती सुंदर लिहिलेय तुम्ही !लेखनशैली एवढी चित्रमय आहे, की सगळे डोळ्यांसमोर उभे राहते. तुम्ही जे वेगवेगळे गंध वर्णन केलेत ना, ते केवळ अप्रतिम !आमच्या बालपणी वीज आलेली होती. तुमच्यासारखे बालपण नाही अनुभवता आले, पण कल्पनेने तेव्हाचे निर्व्याज सुख अनुभवू शकते मी. एका छान लेखाच्या मेजवानीबद्दल थँक्स तुम्हाला.