एक ओपन व्यथा १ : http://www.maayboli.com/node/58699
..........................................
एखादं अत्यंत गूढ घर असावं. त्या घराबद्दल खूप मतमतांतरे असावीत. बर्याच जणांची त्या घराबद्दल वेगवेगळी धारणा असावी. ह्या अश्या कुतुहुलमिश्रीत वातावरणात त्या घराकडे सगळे शंकित नजरेने बघत असावेत. त्या घराबद्दल, त्या घरामध्ये राहणार्या माणसांबद्दल नक्की आणि खात्रीलायक माहिती कोणालाच नसावी. आणि त्याचवेळेस त्या घरामध्ये जायचीही तयारी कोणाची नसावी. अश्यावेळेस एकानं धाडस करून त्या घरामध्येच जाऊन चौकशी करण्याचे ठरवावे. गेट उघडून आत जावे. आणि आता दार ठोठावण्याचा विचार करावा. दार ठोठवायला हात वर करावा आणि नेमकं त्याचवेळेस त्या घरामधल्या कर्त्याने किंवा कर्तीने अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने दार उघडून त्याचे स्वागत करावं. असं स्वागत झाल्यावर त्या माणसाच्या मनात ज्या लहरी उमटत असतील अगदी तश्याच लहरी, "नमस्कार…. मी अज्ञातआडनावे…." ही ओळ वाचल्यावर पाटलांच्या मनामध्ये उमटल्या.
ते पुढे वाचू लागले…
"मला माहित नाही हे पत्र कोण वाचत असेल. (मुळात कोणी वाचत असेलच ह्याबद्दलही मला शंका आहे… असो). कदाचित आई वाचत असेल. कदाचित बाबा वाचतअसतील. कोणी माझा मित्रही वाचत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित कोणी पोलीसांमधलंही वाचत असेल. जे मला ओळखत नाहीत (मला ओळखायला मी काही सेलिब्रिटी आहे होय?), असे खूप जणं आहेत ज्यांना मी माहित नाही. त्या सर्वांना माझं नाव प्रचंड चमत्कारीत वाटत असेल. 'अज्ञात आडनावे?? 'हे असलं कधी नाव असतं का?. उगा मूर्खपणा काहीतरी… हाSSSSSड' असंही वाटेल त्यांना हे नाव ऐकल्यावर. मुळात अस्वस्थता होते ती ह्या कारणानं कि आम्हाला आडनावावरून जात चिटकवायची सवय लागलीये. कुलकर्णी, देशपांडे, जोशी, लिमये म्हटलं कि, 'अच्छा ब्राह्मण वाटतात आपण' चा सूर निघतो. जाधव, देशमुख, पाटील म्हटलं कि 'मराठ्यांचा शिक्का बसतो. लिंगायत वाण्यांची आडनावंही ठरलेली जशी कि, मनगिरे, गुडे, डोंबे वगैरे. सोनावणे, कांबळे, डोईफोडे म्हटलं कि निळा रंग आठवतो. आडनावे हे आडनाव असू शकतं? हे पटायला जरा अवघड आहे कारण ह्या नावावरून जात नाही ना ठरवता येत. अगदीच पोस्टमार्टेम करायचं म्हटलं तर माझ्या आईबाबांवरून माझी जात काढणं अजिबात अवघड नाही. पण प्रथमदर्शनी असलं आडनाव पचायला जरा जड वाटतं ना…. असो…
तर मी अज्ञात आडनावे… आजच्या बरोब्बर तीस वर्षे एक दिवस आधी हा देह पृथ्वीतलावर आला, एका मध्यमवर्गीय सद्गृहस्थाच्या घरात. आई म्हणायची बाळंतपणात आणि नंतरपण मी फारसा त्रास नाही दिला. (कदाचित ती कसर नंतर भरून निघायची होती). अगदी बारसे वगैरे थाटात झाले. रुढीप्रमाणे ते कानात कुर्रर्र करून नाव ठेवलं गेलं. साधारण माणसांना जे नाव असतं ते नाव मला चिटकवलं गेलं. माझी असंख्य टोपणनावेही ठेवली गेली, झम्प्या, शोन्या, पिंट्या, टकल्या, नागड्या, शेंबड्या, हागर्या… वगैरे वगैरे. साधारणपणे जशी प्रगती असते त्या अनुषंगाने माझीही प्रगती होत होती. म्हणजे पालथे पडणे… पहिले पाउल आधाराने टाकणे… मग आधार नसताना प्रयत्न करणे… तो प्रयत्न यशस्वी होणे… बोबड्या बोबड्या आवाजात यायी, भाभ्भा, दद्दा , खख्खा, अब्भाबा हे असलं काहीतरी बोलणे… मग आईने खूप लाडाने जवळ घेणे… मग आईच्या डोळ्यात पाणी येणे… आईच्या डोळ्याची कड पदराने पुसली जाणे… घरामध्यॆ माझा अगदी मुक्त वावर असणे… सगळ्यांकडून माझे कौतुक होणे… रोज संध्याकाळी बाबांनी मला बाहेर घेऊन जाणे …बुढढी के बाल मला खूप आवडायचे म्हणे त्यासोबत मग दारावरचा गोळा, कोपर्यावरचा उसाचा रस, चाराण्याच्या त्या गोळ्या, बोरकुट पण असायचंच सोबतीला… कोणीतरी फुगे आणून देणे… कार्टूनवाले टी-शर्ट घालणे… शिशुविहारमध्यॆ जाताना भोकाड पसरणे… जबरदस्तीने शिशुविहारला पाठवले कि चड्डीत संडास करणे… सायकल शिकताना गुडघे फुटणे… गोट्या खेळून खेळून खिसे फाटणे… क्रिकेटचा बॉल लागून शेजारच्याची काच तडकणे, कधी कधी फुटणे पण… लपाछपी, सूरपाट्या, लंगडी, चूळचूळ मुंगळा पळीपळी तेल, विट्टीदांडू सारखे खेळ खेळणे… लुटूपुटू ची भांडणे असतील… ती विसरून लगेच तूच माझा सगळ्यात जवळचा मित्र असे त्यालाच म्हणणे… शाळेत जायचे म्हटले कि कधीकधी पोट खूप दुखतंय म्हणून कळवळंणे.... त्यावरची ऒषधे घेणे…
हे असलं माझ्याही बाबतीत झालं सगळ्यांसारखं… असं साधारण बालपण गेलं माझं. कधी वर्गात पहिला आलोय, कुठली स्पर्धा जिंकून पळत पळत घरी आलोय आणि आईने कॉम्प्लॅन दिलंयअसं कधीच नाही झालं. कधी कोणाशी घडघडून बोललोय, मन मोकळं केलंय, खूप मित्र आहेत बाबा.. असंही नव्हतं माझ्याबाबतीत… एका विचित्र अश्या न्यूनगंडात होतो.. कदाचित सततच्या आजारपणामुळेही असेल म्हणा… आई दाताच्या कण्या करून म्हणायची, बोलत जा मोकळा होत जा… पण मी कधी मोकळा झालो नाही. अभ्यासाच्या संदर्भात म्हणायचे झाले तर, साधारण पास होत गेलो. नापास कधी नाही झालो एव्हढं मात्र बरं. आई-बाबा कधी मला फारसे बोललेही नाहीत त्याबाबतीत. आईची अपेक्षा असायची माझ्याबाबतीत. ती तळमळून म्हणायची, "अरे सोन्या… देवानं खरंच बुद्धी दिलीये रे तुला… वापर कर त्याचा". पण मला आजतागायत त्याचा साक्षात्कार झाला नाही. आणि ह्यापुढे होण्याची सुतरामही शक्यता नाही.
दहावीमध्ये जेमतेम फर्स्ट क्लास घेऊन पास झालो. अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला… इंजिनियर व्हायचं होतं मला… बक्कळ पैसे कमवायचे होते… ए ग्रूप घेतला… अकरावीतून बारावीत… मग त्या ट्युशन्स, दिवसभर धावपळ… त्यात कसे दिवस जात होते काहीच कळत नव्हते.
अकरावीत असतानाचा एक प्रसंग आठवतोय मला… माझ्या जातीची जाणीव करून देणारा…
मला एन सी सी बद्दल खूप आकर्षण होतं. त्या परेड्स, ती शिस्त, त्या ऑर्डर्स, त्यात प्रतीत होणारी देशभक्ती… खूप आवडायचं. मी तब्येतीनं खूप म्हणजे खूपच खराब होतो. ह्या कागदपत्रांसोबत एक फोटो जोडलाय. तो बघा.…"
पाटलांनी साधारणपणे अंदाज लावून त्याचा पहिला फोटो बाहेर काढला. अठराविश्वे दारिद्र्य घरात असेल तर कशी असेल त्या पोराची तब्येत? तशी तोळामासा दिसली.
पाटलांनी पुन्हा वाचायला सुरुवात केली.
"बघितलात ना? कुठल्या आईला वाटेल असलं पोरगं जावं त्या एनसीसीत. पण हट्ट करून मी गेलो. अर्ज केला. एका दिवशी सर्वांना आमच्या कॉलेजच्या मैदानावर बोलवलं. दर रविवारी सकाळी ८ ते १२ यावं लागेल असं सांगितलं. आम्ही माना डोलावल्या. आम्हाला, त्यातल्या त्यात मला ड्रेस बद्दल खूप उत्सुकता होती. त्याबद्द्दल मी विचारलं. ते म्हणाले पुढच्या रविवारी ड्रेस दिला जाईल…
आम्ही सगळे त्या रविवारी जमलो. सुरुवात झाली. आधी ड्रेस कसा घालायचा ह्याचं प्रशिक्षण झालं. मग ड्रेस वितरण चालू झालं. पूर्ण ड्रेस. त्यासोबत मला चामड्याचे बूट मिळाले होते. मला खूप आवडायचे. ज्यांना ज्यांना तसे शूज मिळाले होते ते खूप खुश झाले होते. काही जणांना पीटीचे शूज मिळाले होते. मी ते शूज आनंदाने खाली वर करून बघत होतो. आयुष्यात पहिल्यांदा मला शूज मिळाले होते, वर्षभर वापरायला. आणि तेही फुकट… !!!. ते सगळं घेऊन मी घरी आलो. आईला घालून दाखवलं… माझी एवढीशी कंबर त्या ड्रेसमध्ये बघून आईच्या पोटात खड्डा पडला असेल पण तिने तो नाही दाखवला. छान म्हणाली.
मी दररोज तो ड्रेस घेऊन बसत असे. ब्रास ने पितळी क्लिप्स साफ करत असे आणि केलेनडरमधला तो रविवार कधी येतो ते बघत असे.
ज्यादिवशी मला ड्रेस मिळाला त्याचा दुसरा रविवार असावा. आमची परेड चालू होती. मध्ये अर्ध्या तासाचा ब्रेक होता. मी झाडाच्या सावलीत माझ्या सायकलवर बसलो होतो, मैदानाकडे बघत. तेंव्हा काही कॅडेट्स माझ्या दिशेने येताना दिसले. ते आले. त्यातल्या एकाने कुचेष्टेने माझ्याकडे बघितले आणि नंतर माझ्या शूजकडे. आणि मग तो चित्रपटात जसं हं करतात तसं करून बाजूला गेला. ते मला थोडं खटकलं.
तेंव्हा मला समाजमान्य जात होती आणि नाव पण. तर त्या माझ्या नावाचा उल्लेख करून मला त्यांच्या जवळ बोलावण्यात आलं. मी गेलो
"ए XXXXXX (माझं नाव)"
"काय रं"
"तू गेल्या रविवारी आला होता का रं"
"आल्तो कि"
"नंतर थांबला व्हता का?"
"कधी?"
"बारानंतर बे"
"कोण कशाला थांबंल?"
त्यातला एक जण उठला. सोन्या नाव त्याचं. गावातलं एक बडं प्रस्थ. त्याचे काका बिका राजकारणात होते, प्रॉपर्टी वगैरे भरपूर, कॉलेजमध्ये पण फुल्ल हवा होती. मित्रपरिवार दांडगा होता त्याचा. तर तो माझ्या जवळ आला.
"आम्ही थांबलो व्हतो"
"बरं… मग"
"पुढच्या आठवड्यात एक कॅंपे… त्यात माझं सिलेक्शन झालंय"
"चांगलंय कि… काँग्रॅट्स… मी हात पुढे केला.
त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या खांद्यावर हात ठेवला. माझी फाटली. मला माहित नाही काय व्हायचं,,, कोणी मोठ्या आणि दादागिरीच्या आवाजात माझ्याशी बोललं कि माझी फाटायची. माझी चूक नसली तरी… तर… माझी फाटली.… चांगली हातभर…
"मला तुझा शूज हवाय…"
"देतो कि…" नाही म्हणायची हिम्मत कोणामध्ये होती, मुळात तो पर्यायंच नव्हता.
"वाट कशाची बघतोय… आत्ताच दे. कॅंप झाला कि देतो."
आम्ही घाबरलो होतोच. लगेच काढून दिला. त्याने त्याचा पीटीचा शूज काढूनच ठेवला होता. पडलेल्या तोंडाने मी तो त्याचा शूज घातला. आणि खाली मान घालून घरी आलो. आईनं शूजवरून विचारलं तेंव्हा मी सांगितलं कि मित्राला गरज होती म्हणून मीच आपण होऊन दिला. आई छान म्हणाली. मी बेडवर जाऊन झोपलो. आईला वाटलं असेल कि मी दमलो म्हणून झोपलो. खूप अस्वस्थ झालो होतो कारण मला माहित होतं कि तसा कुठलाच कॅंप नव्हता.
काही रविवार गेले. एके दिवशी मी धाडस करून सोन्याजवळ गेलो.
"सोन्या…"
"काय रं…" माझ्याकडे नं बघताच तो म्हणाला.
"आरं ते शूजचं…"
"कसल्या शूजचं?"
"आरं… माझा शूज तू घेतलास नव्हं…" मी चाचरतंच बोललो.
"तुझा शूज?"त्याने दरडावत विचारले.
"व्हंय कि रं… माझ्या नावावर हाय कि रं तो" आता त्यानं त्याचा मोर्चा माझ्याकडं वळवला… माझी फाटली.…. पुन्हा
एकदा…
" तुझ्या आयचा XXXXXXX (माझ्या जातीचा उद्धार)… कसला तुझा शूज रं… काय दिवं लावणारेस?"
मी लटपटलटपट….
"तुला काय करायचं ती कर…. नाय देत… तुला जी शूज मी दिलाय नं…. उपकार समज…. निघ" असं बोलणं हा त्याचा अधिकारच होता बहुतेक. त्याच्या जातीने दिलेला.
.
.
माझ्या चड्डीत थोडी लघवी पण झाली होती बहुतेक. खूप घाबरलो होतो. काहीच नं बोलता घराकडे धूम ठोकली.
.
.
.
.
तो शूज मला त्या वर्षाच्या सगळ्यात शेवटच्या रविवारी मिळाला…. अत्यंत दयनीय अवस्थेत.… पाच सहा ठिकाणी फाटलेला.… त्या दिवशी सगळं साहित्य जमा करायचं होतं. तो शूज माझ्या नावावर होता मलाच जमा करावा लागणार होता. मी, अगदी व्यवस्थित वापरलेला आणि चांगल्या अवस्थेतला, त्याचा पीटीचा शूज त्याला घाबरत घाबरत दिला. जशी काही मीच फार मोठी चूक केली होती. त्याने तो हसत हसत घेतला आणि म्हणाला, चांगला ठेवलास कि लेका…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला...
क्रमशः
चेतन, दोन्ही भाग वाचले. खरच
चेतन, दोन्ही भाग वाचले. खरच चांगलं लिहिता आहात. पुढले भाग वाचण्याचू उत्सुकता वाढलीये.
शुभेच्छा. लवकर लवकर येऊद्यात.
दाद खूप आभारी आहे.... लवकरंच
दाद खूप आभारी आहे.... लवकरंच टाकतो…
हाही भाग छान
हाही भाग छान
छान लिहिता पुढिल भाग लवकर
छान लिहिता पुढिल भाग लवकर टाका
काहीतरी हटके वाचायला मिळ्णार
काहीतरी हटके वाचायला मिळ्णार अस वाटतय. पुढिल भाग लवकर टाका. पु. ले. शु
छान लिहिलयं.........
छान लिहिलयं.........
छान लिहिलय. पुढच्या भागाच्या
छान लिहिलय.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
छान लिहिलय... पु.ले.शु
छान लिहिलय... पु.ले.शु
छान आहे . पुलेशु . पुभाप्र
छान आहे . पुलेशु . पुभाप्र
मस्त.... शुभेच्छा.....
मस्त.... शुभेच्छा.....