'सैनिक समाचार' हे संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणारे पाक्षिक प्रकाशन आहे. आज शंभर वर्षे पूर्ण होऊन गेलेले हे पाक्षिक इंग्रजीबरोबरच १२ भारतीय भाषांमधून नियमित प्रकाशित होत आहे. भारतीय लष्कराच्या चारही दलांमध्ये (भूदल, नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दल) होणाऱ्या विविध घडामोडींचा गोषवारा त्यातून प्रकाशित होत असतो. अर्थातच संरक्षणासारखा संवेदनशील विषय असल्याने अत्यंत गोपनीय, गोपनीय, संवेदनशील अशा विविध वर्गांमधील बाबी त्यात प्रकाशित केल्या जात नसतात. पण जी काही सामग्री प्रकाशित होत असते, तीही या विषयात रस असणाऱ्याच्या पसंतीला उतरू शकते. म्हणूनच गेल्या ११ वर्षांपासून मी या प्रकाशनाचा नियमित वर्गणीदार आणि वाचक आहे आणि हे नाते असेच कायम राहणार आहे, हे निश्चित.
२ जानेवारी १९०९ रोजी फौजी अखबार या नावाने हे साप्ताहिक अलाहाबाद येथे पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. त्यावेळी १६ पानांचे असलेले ते साप्ताहिक फक्त उर्दू भाषेतून प्रकाशित होत असे. त्यावेळी या साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत होती एक आणा. कालांतराने इंग्रजीबरोबरच विविध भारतीय भाषांमधून फौजी अखबारचे प्रकाशन सुरू झाले. मात्र त्या काळात फौजी अखबारचे मुख्य कार्यालय सिमला येथे होते. त्यानंतर काही काळ लाहोरहून, नंतर पुन्हा सिमल्याहून आणि अखेरीस दिल्लीहून ते प्रकाशित होऊ लागले. त्यावेळी फौजी अखबारमधील शेवटच्या दोन पानांवर रोमन लिपीमधून उर्दू भाषेतील काही सदरेही प्रकाशित केली जात असत. कदाचित उर्दूची जाण नसलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यातून काय मजकूर प्रकाशित होत आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी ही उपाययोजना केलेली असावी.
पहिल्या महायुद्धाच्यावेळी प्रसिद्ध होणाऱ्या युद्धभूमीवरील बातम्यांमुळे फौजी अखबारची लोकप्रियता अतिशय वाढल्यामुळे फौजी अखबारची पृष्ठसंख्याही वाढवावी लागली होती. तसेच संपूर्ण महायुद्धाच्या काळात एक विशेष दैनिक पुरवणीही प्रकाशित केली जात होती. १९२३ पासून फौजी अखबारमध्ये लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांची छायाचित्रे छापण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फौजी अखबारची लोकप्रियता पुन्हा वाढली आणि विविध देशांमध्ये लढत असलेल्या भारतीय जवानांसाठी इजिप्तची राजधानी कैरो येथून याची आंतरराष्ट्रीय आवृत्ती प्रकाशित होऊ लागली होती. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाबाबतची माहिती देणारी जंग की खबरे ही विशेष पाक्षिक पुरवणीही काढली जात होती.
स्वातंत्र्यानंतर फाळणी झाल्यावर फौजी अखबारमध्ये काम करत असलेल्या अनेक मुस्लिम कर्मचाऱ्यांनी पाकिस्तानात स्थलांतर केल्यामुळे बेद पडलेले फौजी अखबारचे प्रकाशन काही कालावधीतच पुन्हा सुरू झाले. पुढे चार एप्रिल १९५४ पासून फौजी अखबारचे नामांतर सैनिक समाचार असे झाले. १९९७ पासून हे साप्ताहिक पाक्षिक बनले.
या पाक्षिकाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने सोल्जरिंग ऑन या शीर्षकाचा एक खास विशेषांक (कॉफी टेबल बुक) प्रकाशित करण्यात आला होता. त्यात फौजी अखबार/ सैनिक समाचारच्या गेल्या १०० वर्षामधील वाटचालीचा चित्रमय आढावा घेतानाच त्यामध्ये आजपर्यंत प्रकाशित झालेल्या महत्त्वपूर्ण लेखांचा संग्रह तसेच दुर्मिळ छायाचित्रेही एकत्रितपणे प्रकाशित करण्यात आली होती. भारताची राजधानी कोलकत्याहून नवी दिल्लीला स्थानांतरित झालेला प्रसंग, किंग जॉर्ज यांची भारत भेट इत्यादी ऐतिहासिक प्रसंगांच्या छायाचित्रे आणि लेखांचेही पुनःप्रकाशन त्या विशेषांकात होते. त्यातीलच निवडक भाग एकत्रित करून सैनिक समाचारचाही विशेषांक त्यावेळी प्रकाशित करण्यात आला होता. तो अनमोल ठेवा असल्याने तो अंक मी जपून ठेवला आहे.
अलीकडेच १९६५च्या भारत-पाक युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचीही माहिती वेळोवेळी सैनिक समाचारमध्ये प्रकाशित होत राहिली होती. इतकेच नाही तर एखाद्या रेजिमेंट, युनिट, स्क्वाड्रनच्या ऐतिहासिक प्रसंगावेळी जसे, स्थापना दिवस, एखादा विशेष लेखही यात असतोच. दरवर्षी संरक्षण मंत्रालयाच्या नियोजनाखाली नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडत असतो. त्या सोहळ्याचीही सचित्र माहिती फेब्रुवारीच्या अंकात येत असतेच.
सैन्यदलांमध्ये घडणाऱ्या घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांमधील जवानांबरोबरच सामान्य जनताही या पाक्षिकाचा आधार घेत असते. भारतीय सैन्यदलांमध्येच घडलेल्या महत्त्वाच्या घटनांबरोबरच देशाच्या दृष्टीने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावरील महत्त्वाच्या प्रत्येक घटनेची दखल सैनिक समाचारमध्ये घेण्यात येते. मग ते पूर, भूकंप, त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी सैन्यदलांनी केलेले मदतकार्य असो वा पोखरणच्या अणुचाचण्या असोत. स्वातंत्र्याआधी भारताची स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्यप्राप्ती व फाळणी तसेच स्वातंत्र्यानंतर भारताची चीन, पाकिस्तानशी झालेली युद्धे यांचाही आढावा यातून प्रकाशित होत असे. एकूणच देशाच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या प्रत्येक घडामोडीला सैनिक समाचारमध्ये स्थान मिळाले आहे. शीतयुद्धाची समाप्ती आणि ११ सप्टेंबर २००१ च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर बदललेली आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या घटनांचाही यात समावेश होत असतो. आज भारताच्या परराष्ट्र धोरणाला अनुकूल बदल स्वतःमध्ये करत भारतीय सैन्यदलांनी आपले कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. भारताचे महत्त्वही आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत आहे. म्हणूनच अशा परिस्थितीत भारतीय सैन्यदलांबरोबर विविध देश संयुक्त युद्धसराव करण्यात रस घेत आहेत. अशा युद्धसरावांची सचित्र माहितीही सैनिक समाचारमधून प्रकाशित होत असते.
उत्तराखंडमध्ये २०१३ मध्ये आलेला महाप्रलय, २००४ची त्सुनामी, चेन्नईतील महापूर अशा नैसर्गिक आपत्तींच्यावेळी भारतीय सैन्यदलांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा आढावाही सैनिक समाचारमधून घेतला जात असतो. उत्तराखंडमधील भारतीय सैन्यदलांच्या कार्याचा आढावा खास विशेषांक काढून सैनिक समाचारने प्रकाशित केला होता. तोही संग्राह्य वाटल्याने जपून ठेवला आहे.
सचित्र आणि पूर्णपणे ग्लॉसी पेपरवर छपाई होणारे सैनिक समाचार वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आणि आकर्षक मुखपृष्ठामुळे लक्ष वेधून घेत असते. काळानुरुप नव्या तंत्राचा समावेश करून घेत सैनिक समाचारने स्वतःमध्ये अनेक बदल करून घेतले आहेत. सैनिक समाचार असे नाव असले तरी हे पाक्षिक एखाद्या समाचारपत्राप्रमाणे (वृत्तपत्राप्रमाणे) नाही, तर साधारणपणे ४० पानी पुस्तकरुपात प्रकाशित होत असते. त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे ते इतर मराठी साप्ताहिके, पाक्षिकांमध्येही उठून दिसेल असेच आहे. मराठीमध्ये सध्या साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिकांमध्ये स्त्रियांशी संबंधित, आरोग्यविषयक आणि सनसनाटी, झगमगाटी आणि तत्सम विषयच हाताळले जात असतात. त्यामुळेच त्यांच्या ढिगात सैनिक समाचारचा मराठीतील अंक लपवून ठेवला तरी तो आपल्या वेगळेपणामुळे सर्वांमध्ये ठळकपणे कोणाच्याही नजरेत भरेल, असा विश्वास वाटतो. एका अंकाची केवळ ५ रुपये किंमत असलेले सैनिक समाचार अनमोल वाटतो तो त्यामुळेच.
काही वर्षांपूर्वी जवळच राहणाऱ्या आजोबांशी (वय ९०च्या पुढे) ओळख झाली होती. त्यांनीही लष्करात अधिकारी म्हणून सेवा केली होती. एकदा त्यांना मी सैनिक समाचारची माझ्याकडची प्रत वाचायला दिली. ती पाहिल्यावर नव्वदीतील त्या आजोबांचा चेहराही अतिशय प्रफुल्लित झाला होता. नंतर ते मला म्हणालेही, तू खूप छान प्रकाशन दाखविले आहेस मला. मग मी माझ्याकडे आलेला अंक त्यांना देऊ लागलो. ते आजोबा प्रत्येकवेळी सैनिक समाचारचा अंक तितक्याच प्रेमाने आणि तन्मयतेने वाचत असत. अगदी त्यात एकरुप होऊन जात असत.
---०००---
रोचक ! धन्यवाद पराग
रोचक !
धन्यवाद पराग !
सोल्जरिंग ऑन कसं मागवता येईल ?
खरच मस्त माहिती. पराग, या
खरच मस्त माहिती. पराग, या विषयी पत्ता व नेट डिटेल्स देता आले तर बघा.
सुंदर ओळख.. एकाद्या व्यक्तीला
सुंदर ओळख.. एकाद्या व्यक्तीला आवड असेल, तर असे वेगळे काहितरी, किती सहज सापडू शकते !!! खुप कौतूक वाटते, पराग.
माझ्यामते पराग भाऊ हे सरकारी
माझ्यामते पराग भाऊ हे सरकारी स्तरावर जितके काही सकारात्मक होते आहे त्याचा स्वतःसुद्धा अत्यंत सूक्ष्म अभ्यास करतात अन आपल्या सर्वजणांस उत्तम ओळखी करुन देतात
परागभाऊ ह्यांना भरपुर धन्यवाद!
मस्त माहिती, पराग !
मस्त माहिती, पराग !
मस्त माहिती धन्यवाद इथे शेअर
मस्त माहिती धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल
पराग.... ~ तुम्हाला या
पराग....
~ तुम्हाला या लेखाबद्दल खूप धन्यवाद. राज्य असो वा केन्द्र सरकार असो त्यांच्या माहिती विभागातर्फे दरमहा न चुकता प्रकाशित होत असलेल्या "सैनिक समाचार" सारख्या नियतकालिकांतून आज शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांना (आणि हल्ली तर मुलीही संरक्षण दलाकडे वळत असल्याचे जे सुखद दृश्य दिसते आहे त्याचा विचार करता मुलींनाही...) अत्यंत उपयुक्त अशा सचित्र माहितीने पुरेपूर मार्गदर्शन केले जाते. तुम्ही अत्यंत आपुलकीने समाचार पत्रिकेची माहिती दिली आहे. राज्य शासनातर्फे "लोकराज्य" प्रकाशित होत असते, तेही असेच देखणे आणि सरकारच्या विविध उपक्रमांच्या माहितीने वाचकांपर्यंत येते.
अत्यल्प अशा किंमतीत सरकारने हे नियतकालिक सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहे.
सैनिक समाचार
सैनिक समाचार मागविण्यासंबंधीची सर्व माहिती www.sainiksamachar.nic.in यावर उपलब्ध आहे.
खूपच मस्त लेख.... माझ्यामते
खूपच मस्त लेख....
माझ्यामते पराग भाऊ हे सरकारी स्तरावर जितके काही सकारात्मक होते आहे त्याचा स्वतःसुद्धा अत्यंत सूक्ष्म अभ्यास करतात अन आपल्या सर्वजणांस उत्तम ओळखी करुन देतात
परागभाऊ ह्यांना भरपुर धन्यवाद! >>>>> सोन्याबापूंना अनुमोदन....
.
.
अतिशय उत्तम माहिती! धन्यवाद!
अतिशय उत्तम माहिती! धन्यवाद!
उत्तम माहिती !
उत्तम माहिती !
उत्तम माहिती पराग भाऊ.
उत्तम माहिती पराग भाऊ.
सर्वांनाच प्रतिक्रियेबद्दल
सर्वांनाच प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पराग, हा ही लेख छान . तुमचे
पराग, हा ही लेख छान . तुमचे लेख अनोखे आणि वेगळेच असतात.आवडतात वाचायला
सोन्याबापूना अनुमोदन
या शिवाय अजय शुक्ल हे
या शिवाय अजय शुक्ल हे business standard मधे नियमित भारतीय सैन्य् दलासाठी खरेदि व्यवहाराची माहिती, टीका लेखन करत असतात ते देखिल वाचनीय असते.