बर्याच दिवसांपासुन करुणाची चाललेली धावपळ आता कुठे मंदावली होती. एकदाची तेजसची परीक्षा संपली होती. गेल्या महिनाभरात हेच क्राफ्टवर्क, ते ड्रॉईंग, सायन्सच्या प्रोजेक्टवर्कसाठी हे बनव,ते कर, एक ना बारा भानगडी. हल्ली मुलांची परीक्षा असली की, त्याच्या कितीतरी दिवस आगोदर पालकांची पण परीक्षा असते. एवढ्याश्या चिमुरड्यांकडुन काय काय करुन घेतात आभ्यासाचा भाग म्हणुन. आणी मग सगळं टेन्शन पालकांचं. पण एकदाचं झालं ह्याचं तिसरीचं वर्ष पुर्ण. आणी परीक्षा संपल्यावर दरवर्षी सारखं यावर्षीही तेजसला घेऊन गावी जायचं ठरवलं होतं त्यांनी.
तेजसही फार खुश होता गावी जायचं म्हणुन. तिथल्या मित्रांसोबत अमराईत, मळ्यात, शेतांत मनसोक्त हिंडायला, खेळायला मिळायचं ना. त्याच्या राजु मामाकडुन त्याने रानात घेऊन जाऊन तिथे वेगवेगळे प्राणी दाखवण्याचं प्रॉमीस करुन घेतलं होतं. आणी आजीचा नातु तर काय, दुधावरची साय! तिला नुसतं काय करू आणी काय नको असं व्हायचं त्याच्यासाठी. बाबा पण गावाच्या बाजारात घेऊन जायचे शनीवारी. मग तिथल्या मस्का पावावर तो मस्त ताव मारे. आणी तिथुन, भवरे, लाईटचे पेन वगरे खुडुक-मुडुक खेळणी घेई. पण करुणाला नेहमी एक जाणवायचं. ईथे गावी भवरा फिरवताना, गोट्या खेळताना, आणी वीटी-दांडु खेळताना तेजसच्या चेहऱ्यावर जो आनंद असायचा तो घरी रीमोटवाल्या कार आणी रोबोट सोबत खेळताना नाही दिसायचा. मग तीही फार काही बोलायची ओरडायची नाही त्याला. नाहीतरी सुट्टीच होती म्हणा.
गाडीतुन उतरल्यावर प्रथम तेजस धावत वरच्या माडीवर गेला. तिथल्या कोनाड्यात मागच्या वर्षी जमवलेल्या गोट्या, बारीक-सारीक खेळायच्या वस्तु त्याने एका पिशवीत भरुन ठेवल्या होत्या. कोनाड्यात पिशवी तशीच होती. ती घेऊनच तो खाली आला.
"राजु मामा, हे बघ मी काय काय जमवलं होतं मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा. ह्या बघ, किती गोट्या आहेत. आणी ही बेचकी. हीने आम्ही ना त्या शेतातल्या बहुल्यावर दगड मारुन त्याचं मटक्याचं तोंड फोडायचो. असली मज्जा येते ना. ए मामा, मी तुला दाखवीन हा, बेचकीनं मटकं फोडुन एकदा." तेजसशी कॅसेट सुरू झाली होती. गावाला आला की त्याला रान मोकळं असायचं.
"हो रे बाळा, मी तुझ्या खेळण्यांची पिशवी मागच्या वर्षीपासुन जपुन ठेवली होती. मला ठाऊक होतं तू आल्यावर पहीले तीच शोधशील.चल आता आत" राजु मामा त्याच्या डोक्यावरुन मायेनं हात फिरवत म्हणाला.
"तेजस, तुझी ती मटकी वगरे नंतर बघ. आल्या आल्या सरळ वर गेलास ना? हात-पाय नाही धुवायचे? आणी आजीला भेटलास का?" करूणाने दम भरला त्याला. तसा पिशवी बाजुला ठेऊन तो पुन्हा धावत आत गेला.
"आजी, ए आजी....कुठे आहेस तू?" त्याने मधल्या अंगणात जाऊन आरडाओरड करायला सुरूवात केली.
" अरे, आला माझा तेजु. " आजी पटापट पावलं उचलत स्वयंपाकघरातुन बाहेर आली. तिने तेजसजवळ जाऊन त्याचा मुका घेतला. वर्षातुन एकदा त्याला भेटल्यावर तिला असा काही हुरूप यायचा की अख्खं वर्ष ती उत्साहात घालवुन पुन्हा अतुरतेने त्याची वाट पहायची.
"कशी आहेस आई? तब्येत बरी आहे ना आता?" करुणाने आत आल्या आल्या आईला विचारलं
"मी ठीक आहे गं. तेजु आलाय आता. आता माझी तब्येत ठणठणीत नसायला काही कारणच नाही." आई हसुन म्हणाली
"तुला सांगु करुणा, ह्या पोराकडं बघुन सगळी आजारपणं,दुखणी, वेदना कुठच्या कुठच्या निघुन जातात. महीनाभर अगदी घर भरल्या भरल्यासारखं वाटतं. फार लळा लावणारा आहे माझा नातू."
करुणा पण हसु लागली." ते सर्व ठीक आहे. पण ह्या वेळी आम्हाला महीनाभर वगरे राहता नाही येणार गं." तिचा चेहरा गंभीर झाला.
" का? काय झालंय? आणी जावई कुठे आहेत? ते पण येणार होते ना तुमच्या बरोबर?"
"हो गं. श्रीकांत म्हणाला होता आधी येतो म्हणुन. पण त्याच्या कामाचा व्याप हल्ली खुप वाढलाय. रोज उशीरापर्यंत काम चालु असतं साहेबांचं. आणी कसली आय.टी.आय.एल ची परीक्षा देतोय ना, मग अभ्यासाला पण वेळ द्यावा लागतो त्याला. म्हणुन ह्यावर्षी जास्त दिवस ईथे राहता येणार नाही मला. पण तो आम्हा दोघांना परत न्यायला येणार आहे. तेव्हा दोन दिवस राहायलाच ये म्हणुन सांगितलंय मी त्याला" करुणाने पाय धुवता धुवता न्हाणीघरातुन आईला सगळं सांगितलं.
"चांगलं केलंस. चल आता, आल्या आल्या परत जायच्या गोष्टी करु नकोस. हा चहा घे." आईने गरम गरम चहाचा कप तिच्या हातात देत म्हटलं.एव्हाना तेजुची त्याच्या गावातल्या सवंगड्यांसोबत गोट्यांची बाजी रंगली देखील होती.
गावाला येऊन त्यांना दहा दिवस होऊन गेले होते. एका संध्याकाळी आईशी बोलता बोलता करुणाला जानकी मावशी विषयी समजलं. जानकी मावशी म्हणजे आईची चुलत बहीण. शेजारच्याच गावात रहायची. नवरा जाऊन बरीच वर्षे झाली होती. दोन मुलगे आहेत पण दोघे परदेशी स्थायिक झालेले. तिला गेल्या महीन्यात लखवा झाल्याचं आईने करुणाला सांगितलं. तिच्या शेजारची कमळ तिची देखरेख करत होती. कसे दिवस आले होते बिचारीवर म्हातारपणी. मुलं असुन नसल्यासारखी, स्वतः पुर्ण परावलंबी, तेही परक्या माणसांवर आणी त्यात हे आजारपण. करुणाच्या लहानपणी जानकी मावशीच तिला सांभाळायची. तिचे खुप लाड करायची ती. करुणाचे घर सोडुन दोन घरं पलीकडे तर राहायची. करुणामुळे तिला मुलगी नसल्याची कधी जाणीव झाली नव्हती. तेजसही अगदी लहानपणी तिच्या अंगा खांद्यावर खेळला होता. मग वाढत्या वयाने तिचे शरीर हळु हळु तिला त्रास देऊ लागले होते. आजारपणातच बराच काळ जायचा तिचा. काही वर्षांनी तिच्या मुलांनी शेजारच्या गावात जागा घेऊन घर बांधलं होतं. त्यामुळे आता तर फार कमी झालं होतं दोन्ही घरांमधलं येणं-जाणं.
करुणाने मुंबईला परत जाण्याआधी तिला भेटुन यायचं ठरवलं. दोन दिवसांनी ती तेजसला घेऊन जानकी मावशीच्या घरी गेली. तिची अवस्था फार वाईट होती. ती निपचीत पडुनच होती कॉटवर. तेजस आणी करुणाला पाहुन तिच्या ओठांवर लहानशी स्मितरेषा झळकली. तिच्या ओठुन शब्द फुटत नव्हते. पण तिचे डोळे अजुनही बोलके होते. तेजस तिच्या डोळ्यांकडेच पाहत होता. करुणा शेजारच्या कमळशी मावशीविषयी बोलत होती. तेजस बराच वेळ मावशीच्या डोळ्यात पाहत होता. अचानक त्याला काय झालं कुणास ठाऊक. तो थरथर कापु लागला. करुणाचं लक्ष गेलं त्याच्याकडे तेव्हा तो मावशी कडे बोट दाखवून म्हणत होता " ३ मे,१९९५" अचानक तो जोरजोरात ओरडू लागला " ३ मे, १९९५........"
"तेजस..." करुणाने त्याला हाक मारली. तसा तो धावत जाऊन तिला बिळगला. अजुनही त्याचं अंग थरथरत होतं. तिने त्याला धरुन खुर्चीत बसवलं. सगळं शरीर थंड पडलं होतं त्याचं. आणी तिची नजर त्याच्या डोळ्यांकडे गेली. तिच्या काळजात धस्स झालं एकदम. त्याचे डोळे लालबुंद झाले होते, जणु काही रक्तच उतरलं होतं त्यांच्यात. तिला भितीही वाटली आणी अश्चर्यही. काय झालं असेल ह्याला अचानक?
" काय झालं रे? डोळ्यात काही गेलं का? आणी तू काय म्हणत होतास आजी कडे बोट दाखवुन, काय आहे ३ मे ला?" करुणाने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला.
"माहीत नाही. चल ना, आपण जाऊया आता" म्हणत तो खुर्चीवरुन खाली उतरला आणी घराबाहेर निघालासुद्धा.करुणाही मावशीचा निरोप घेऊन त्याच्या मागे निघाली.
करुणा आणी तेजस घरी आले तेव्हा श्रीकांत अंगणात बसुन आईशी गप्पा मारत होता.तेजस मात्र बाबांना पाहुन फार खुश झाला. जाऊन लगेच त्याला मिठी मारली .
"बाबा, तुम्ही कधी आलात? मी ना खुप मज्जा केली इथे. रोज नदीवर जाऊन अंघोळ करतो. आणी तुम्हाला माहीत आहे, मी ना राजु मामाबरोबर रानात पण गेलो होतो." तेजस बाबांशी बडबड करु लागला. करुणाने कोणाला सांगितले असतं तर पटलंच नसतं की थोड्या वेळापुर्वी ह्या मुलाची किती विचीत्र परीस्थिती होती. ती बघतच राहीली त्याच्याकडे.
" काय रे, तू एक तारकेला येणार होतास ना? आता कशी सुट्टी मिळाली?" करुणा चपला काढता काढता श्रीकांतला म्हणाली.
" उद्या रवीवारची आणी परवा एक मे ला सुट्टीच आहे ना. म्हणुन म्हटलं एक दिवस सुट्टी काढुन गेलो तर चांगले दोन दिवस राहता येईल गावाला. आणी आज बाजार पण असेल ना? तेजु जायचं ना बाजारात? " तेजसला विचारलं त्याने. बाजार म्हणाल्यावर काय तेजस एका पायावर तयार.
मग दोघे बाजारात गेली. तेजस नेहमीसारखा श्रीकांतला गावातल्या गोष्टी सांगत, बाजारात हवं ते घेत फिरत होता.
सोमवारी श्रीकांत त्या दोघांना मुंबईला परत घेऊन जायला निघाला तेव्हा आजी खुप उदास झाली होती. आजीला फार वाटत होतं तेजुनं आणखी रहावं. पण करुणाला सोडुन तो याआधी एकटा कधीच राहीला नव्हता.तिच्या आठवणीने रडु लागला तर मामा आणी आजीला उगाच त्रास. म्हणुन तिने आईला कसंतरी समजावलं, "दिवाळीच्या सुट्टीत त्याला पुन्हा नक्की घेऊन येईन" असं सांगुन तिने आईचा निरोप घेतला.
मंगळवारपासुन श्रीकांत पुन्हा ऑफिसला जाऊ लागला.त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी तेजस जेवून झोपला होता. करुणा काम आटपुन थोडी विश्रांती घ्यावी म्हणुन बेडरूम मध्ये जात होती. तेवढ्यात फोन वाजला.
" ताई, मी राजु बोलतोय. एक वाईट बातमी आहे गं. आज सकाळी जानकी मावशी गेली. आई आणी मी आताच तिथुन आलोय."
करुणाने फोन ठेवला. तिचे डोळे नकळत भरुन आले.
जानकी मावशीच्या दहाव्याला करुणा गावाला गेली होती. खुप रडली तिच्या आठवणीने. जानकी मावशीच्या घरात एकदम सुन्न वाटत होतं. सगळी माणसं होती, पण भयाण शांतता पसरली होती. दुःखाच्या घरातली हवा म्हणजे अगदी गुदमरुन टाकणारी असते. करुणाने जानकी मावशीच्या फोटोकडे पाहीले. मावशीच्या डोळ्यातले तेज अजुनही फोटोतही लक्ष वेधुन घेत होतं.
फोटोच्या खाली लिहीलं होतं " जानकी लिंबवडे----१३ जुन १९२७-३ मे १९९५"
(क्रमशः)
सुमेधा,
सुमेधा, सॉलिड जमतेय कथा. एकदम खिळवून ठेवणारी... (ए, लवकर लवकर पुरी कर गं). पुढच्या भागाची वाट बघते
सही. एकदम
सही. एकदम इंट्रेस्टींग वाटतेय गोष्ट.
फारच छान..
फारच छान.. पुढचा भाग लौकरच येउ देत....
सॉल्लीड
सॉल्लीड एकदम
मस्त,
मस्त, निकोलस केजच्या 'नेक्स्ट' ची आठवण झाली. त्याला पुढच्या दोन मिनीटात काय होणार ते दिसत असतं.
पण हे मस्तच आहे, तुझ्या तेजसला बहुदा समोरच्याच्या मृत्युची तारीख दिसतेय. ह्म्म्म , मजा येइल. लवकर येवु दे पुढचा भाग. वाट पाहातोय.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
http://maagevalunpahataana.blogspot.com
सर्वांचे
सर्वांचे आभार !! विशाल, तू म्हणतोस तोच बेस आहे ह्या कथेचा.अशा प्रकाराची कथा मी पहिल्यांदाच लिहितीये. बघुया कितपत जमतंय. पुढच्या भागाचे लिखाण चालु आहे. लवकरच पोस्टेन
*****************
सुमेधा पुनकर
*****************
ह्म्म झी
ह्म्म झी टी. व्ही. ला एका सिरीयलमधे असा भाग होता, त्या मुलाला कोणाची बर्थडेट समजली की त्याला त्याच्या मरणाची तारीख समजत असे...
पण वर्णन खुप सुरेख केले आहे, मन अलगद मामाच्या गावाला जाउन पोहोचलं आज्जीच्या सुरकुतलेल्या उबदार कुशीत्...(दुर्दैवाने हट्ट पुर्ण करणारा मामाही नाही आणि आजीची उबदार कुशीही हरवली, उरल्या आहेत त्या फक्त आठवणी...) मनापासून धन्यवाद आजोळच्या हळव्या आठवणी पुन्हा जागवल्याबद्दल...
लवकर टाका पुढचा भाग...
मस्त आहे
मस्त आहे लवकर टाक पुढचा भाग
विशाल.... आई गं तो नेक्ट समजायला मला जरा जड गेला सुरवातिला
रिमझिम,
रिमझिम, माझंही तसंच झालं होतं सुरुवातीला, आधीच आमचं इंग्रजी उच्च दर्जाचं (?)
दुसर्यांदा पाहीला तेव्हा समजला !!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
http://maagevalunpahataana.blogspot.com
सुमेधाबाई,
सुमेधाबाई, तारीख मिळतेय की नाही? की आम्हाला कोर्टाच्या तारखेसारखी पुढच्या तारखेची वाट पहावी लागणार?
जाईजुई, .
जाईजुई, . हल्ली काम खुप जास्त असल्यामुळे वेळ लागतोय पण लिखाणाचं काम चालु आहे .आता लवकरच तारीखच्या पुढच्या भागाच्या प्रकाशानाची तारीख मिळेल
*****************
सुमेधा पुनकर
*****************
छान
छान