ग्रेप्स ऑफ रॅथ - जॉन स्टाईनबेक

Submitted by केदार on 7 April, 2016 - 13:42

कॉलेज मध्ये असताना इकॉनॉमिक्स मध्ये कधीतरी अमेरिकन मंदी बद्दल वाचले होते. पुढे जागतीक अर्थव्यवस्था समजावून घेताना अमेरिकन मंदीचा वारंवार उल्लेख व्हायचा आणि त्याबद्दल वाचले जायचे. पण ते होते भरभरून बेरोजगारी आणि आकडेवारी असलेले. पण त्यात काही तरी नव्हते. जे मला ग्रेप्स ऑफ रॅथ नावाच्या पुस्तकाने दिले. "ऑफ माईस अ‍ॅन्ड मेन" वाचल्यावर मला जॉन स्टाईनबेक आवडायला लागला. कॅनरी रो वाचल्यावर तर मी त्याच्या लिखानाच्या प्रेमातच पडलो. त्याचे ग्रेप्स ऑफ रॅथ पुस्तक वाचायचे वाचायचे असे म्हणून गेले कित्येक वर्षे राहून गेले. लायब्ररीत एका पुस्तकासाठी गेलो, तिथे ते नव्हते त्यामुळे आता काहीतरी वाचावे लागणार, त्यातच जॉर्ज आर आर मार्टिनच्या "अ नाईट ऑफ सेव्हन किंगडम" ने माझी इतकी निराशा केली की त्या विमान प्रवासात, विमानाला खिडकी असती तर मी ते पुस्तक फेकून दिले असते. त्यामुळे हवे ते पुस्तक नाही मिळाले की थोडे निराश होणारच. मग उगाच आपले फिक्शन मध्ये चक्कर मारताना "STE" पाशी आल्यावर मला जॉन स्टाईनबॅक आठवला आणि मी ग्रेप्स ऑफ रॅथ शोधून ते वाचायला घेतले.

१९३० च्या दशकात टेक्सास, ओक्लाहोमा, कॅनसास, अर्कान्सा ह्या एरिया मध्ये खूप सारीए कोरडी वादळं ( डस्ट बाउल) आली होती. जमिनीची धूप होऊन त्यावरून माती उडायची आणि दुसरीकडे जाऊन पडायची, त्यातच पाउस नाही. दुश्काळ. त्यामुळे सगळीकडे खाण्याची मारामार. अश्यातच जे जमीनधारक ( मालक व बटाईने शेती करणारे) होते त्यांनी जमीनीवर कर्ज घेऊन काही वर्षे गुजरान केली. पण ती कर्जे त्यांना काही फेडता आली नाहीत. मग बॅंकेनी त्यांच्या जमिनीची जप्ती केली व साधारण ३००,००० लोकांना त्यांची जमिन, घर सोडून बेघर केले. ह्या बँका ती जमिन घेऊन त्यावर कापसाची लागवड करू लागल्या. २० एकर, ३० एकर, ४० एकर असे आधी जमिनीचे मालक व बटाईवाले होते. त्यांच्याकडून जमिन घेतल्यावर बँका ह्या ५०,००० एकर, एक लाख एकर अश्या प्रचंड मोठ्या स्केल मध्ये शेती करू लागल्या. ज्यांना जमिनीवरून हाकलून दिले त्यांना "ट्रॅक्टर्ड" असे संबोधन प्राप्त झाले. हजारो माणसे बेघर झाली. अश्यातच कॅलिफोर्निया मधून काही लोकांनी " वी हॅव जॉब्स" अशी हॅन्डबिलं ह्या बेघर लोकात वाटली. " ऑरेंज पिकिंग साठी ८०० माणसं हवी आहेत, भरपूर पगार, ग्रीन कॅलिफोर्निया" असे मजकूर त्यावर होते. इकडे घर नाही, तर तिकडे निदान शेतमजूरी करून पोट भरू म्हणून लोकं २००० मैल दुर जायला तयार झाली. त्यांच्याकडे पैसे अजिबात नव्हते. अजून विभक्त कुटूंब पद्धती अस्तित्वात आली नव्हती. टिपिकल अमेरिकन सदर्न कुटुंब म्हणजे साधारण ८-१० लोकं घरात असायची.

रूट ६६ वर हजारो कार अश्या कुटूंबाना घेऊन निघाल्या. जणूकाही टेक्सास, ओक्लाहोमाच नाही तर पूर्ण साऊथ ही वेस्टला मायग्रेट होत आहे असे चित्र निर्माण झाले. साधारण ३-४००,००० लोकं ह्या काळात कॅलिफोर्नियाला स्थलांतरीत झाली. हे सर्व लोकं "जलॉपी" म्हणजे जुन्या, गंजलेल्या कार घेऊन २००० मैल प्रवासाला निघाली. हातात ४० डॉलर ते २०० डॉलर. ५ माणसं बसू शकणार्‍या गाडीत १० ते १२ लोकं बसायची. ही सर्व लोकं वेस्ट मध्ये पोट भरेल ह्या आशेवर कॅलिफोर्नियाला जायला निघाली.

ह्या पार्श्वभूमीवर जॉनने एक फिक्शन लिहायला घेतले. त्याचे नाव "ग्रेप्स ऑफ रॅथ"

ही कथा आहे जोड फॅमिलीची. खरे तर त्यांची नाहीच. पूर्ण मानवजातीची.

कथानायक टॉम जोड नुकताच परोलवर जेल मधून बाहेर आला आहे. (एका मारामारीत त्याच्या हातून एकाचा खून होतो. ) आणि टिपिकल सदर्न माणसासारखा परत घरी निघाला आहे. मुख्य रस्ता सोडल्यावर त्याला केसी भेटतो. केसी हा काही वर्षांपूर्वी रेव्हरंड होता. प्रिचर. केसीला टॉम ओळखतो. पण केसी त्याला म्हणतो, मी आता "प्रिचर" नाही. टॉम विचारतो का नाही? तर केसी म्हणतो, प्रिचर असण्यासाठी सर्व उत्तर माहिती हवीत. पण मला प्रश्न पडले आहेत". आणि ह्या वाक्यावरच आपण केसीच्या प्रेमात पडतो. या दोघांचे संभाषण इतके फिलॉसॉफिकल आहे की ज्याचे नाव ते. उदाहरणादाखल एक नमुना देतो.

“Before I knowed it, I was sayin' out loud, 'The hell with it! There ain't no sin and there ain't no virtue. There's just stuff people do. It's all part of the same thing.' . . . . I says, 'What's this call, this sperit?' An' I says, 'It's love. I love people so much I'm fit to bust, sometimes.' . . . . I figgered, 'Why do we got to hang it on God or Jesus? Maybe,' I figgered, 'maybe it's all men an' all women we love; maybe that's the Holy Sperit-the human sperit-the whole shebang. Maybe all men got one big soul ever'body's a part of.' Now I sat there thinkin' it, an' all of a suddent-I knew it. I knew it so deep down that it was true, and I still know it.”

टॉम आपल्या घराकडे जातो, तिथे त्याला कोणीही दिसत नाही. तो घाबरतो. मा अन पा ला काय झाले? मुलं कुठं गेली ह्यावर तो विचार करत असतानाच तिथे म्युले नावाचा माणूस येतो. म्युले त्याला सांगतो " दे आर ट्रॅक्टर्ड आउट" पण ते अजून कॅलिफोर्नियाला गेले नाहीत. तर तुझ्या काकांकडे, जॉन कडे आहेत. मलाही माझ्या जमीनीवरून हाकलले. माझी फॅमिलीही गेली. पण मी जाणार नाही.

"“Sure, cried the tenant men,but it’s our land…We were born on it, and we got killed on it, died on it. Even if it’s no good, it’s still ours….That’s what makes ownership, not a paper with numbers on it."

रात्र झालेली असते. तितक्यात एका कारचा आवाज येतो. म्युले म्हणतो, पटकन लपा, नाहीतर ती लोकं आपल्याला पकडतील. टॉम उतरतो, माझ्याच घरात मला का पकडतील? त्यावर म्युले म्हणतो, हे तुझे घर नाही, तू ट्रेसपासिंग करत आहेस. ही बँकेची जागा आहे.

दुसरे दिवशी टॉम जॉन काकांकडे जातो, तिथे जॉनला पण नोटिस आलेली असते. ती लोकं एक दोन दिवसात कॅलिफोर्नियाला जायच्या तयारीतच असतात. टॉम सर्वांना भेटतो. आईवर त्याचे भयंकर प्रेम ! आई त्याला समजावून सांगते. टॉम परोल वर आहे. म्हणजे त्याला ओक्लाहोमा सोडता येणार नाही, पण तो म्हणतो, मी तुझ्यासोबतच येणार आई. मग पकडला गेलो तरी बेहतर.

टॉमची आई, बाबा, चार भाऊ-बहिण, आजोबा, आजी आणि केसी असे सर्व, असलेले नसलेले विकून, त्यात मिळालेले १५० डॉलर घेऊन कॅलिफोर्नियाला जायला निघातात. त्यातच टॉमची बहिण रोझ ऑफ शॅरोन ही प्रेग्नंट असते. तिचा नवरा कॉनि, तो देखील ह्या फॅमिलीसोबत निघतो.

त्यांना वाटेत आलेले अनुभव, रस्त्यात झालेले आजी अन आजोबाचे मृत्यू, आणखी एका फॅमिली सोबत झालेला त्यांचा प्रवास हे सगळं वाचन्यासारखं आहे. ही लोकं २००० मैल पार करून कॅलिफोर्नियाला पोचतात. आणि पोचल्यावर लगेच त्यांना, त्यांनी वाटते जी स्वप्न पाहिलेली होती, ती नाहीशी होताना दिसतात. कॅलिफोर्निया मध्ये गेल्यावर, मजूरी करून जी बचत होईल त्यातून शेतजमीन घ्यायची व आपली शेती परत करायची हे त्यांचे स्वप्न उधळते. जिथे ३० सेंट प्रती तास मजूरी मिळायला हवी, तिथे अनेक जण बेरोजगार असल्यामुळे व मुलांना खाऊ घालायला वाटेल्या त्या किमतीवर काम करायला तयार असल्यामुले ५ सेंट प्रतितास मजूरी मिळते. कामही सर्वांना मिळेलच, असे नाही. अनेक दिवस कामाशिवाय तिथे लोकं आहेत. काही लोकं कंटाळून परत त्यांच्या जुन्या राज्यात वापस जात आहेत.

एका कॅम्प मध्ये ते उतरतात, तिथे मा सूप करायला घेते, तर अचानक १५-२० लहान मुलं येऊन उभी राहतात. त्यांना काही तरी मिळेल ह्या आशेने. अनेक जण कित्येक दिवस जेवलेली नाहीत. भूकेमुळे पोट फुगून काही मुलं वारली असेही त्यांना कळते. अश्या अवस्थेत आपण खावे की आहे ते इतरांना द्यावे, हा प्रश्न मा ला पडतो. जो खरे तर आपल्याला पडतो.

हे सर्व मा अतिशय घिराने घेत असते. पा ( सिनियर टॉम) आणि टॉम जेंव्हा हताश होत असतात, तेंव्हा ती फॅमिली हेड म्हणून निर्णय घेत असते. "“She seemed to know, to accept, to welcome her position, the citadel of the family, the strong place that could not be taken. And since old Tom and the children could not know hurt or fear unless she acknowledged hurt or fear, she had practiced denying them in herself. And since, when a joyful thing happened, they looked to see whether joy was on her, it was her habit to build laughter out of inadequate materials....She seemed to know that if she swayed the family shook, and if she ever deeply wavered or despaired the family would fall.” "

ह्या सर्व घडामोडीत टॉम आणि केसीचा संवाद नेहमीच वाचायला मजा येत राहते. केसी त्याचे तत्वज्ञान सोप्या शब्दात वेळोवेळी मांडत असतो. "Muscles aching to work, minds aching to create - this is man"

टॉम देखील जेल मध्ये राहून आला आहे. एकट्याने लहानवयात भरपुर पाहिल्यामुळे (तो खून त्याने स्वसंरक्षनासाठी केलेला आहे) त्याचात देखील एक फिलॉसॉफर आहे.

एकदा पंपावर पेट्रोल भरायला थांबलेले असताना, तेथील मालक आधी त्यांना बम्स अशी हाक मारून " I jus don't know what the country's coming to" असे सारखे सारखे विचारत राहतो. त्यावर उत्तर देताना केसी म्हणतो, " I been walkin' aroun' the country. Everybody's askin that. What we coming to? Seems to me we don't never come to nothing" Always on the way. Always goin' and goin'. Why don't folks think about that? They's movement now. People moving. we know why, an' we know how. Movin' cause they go to. That's why folks always move. Movin cause they want somepin better'n what they got. An' that's the one way to git it. Its bein hurt that makes folks mad to fightin.

ह्यावर परत तो मालक दोनदा तोच प्रश्न विचारतो. आणि टॉम ने दिलेले उत्तर मनाला भिडते. "well, you ain't never gonna know. Casy tries to tell ya an you jest ast the same thing over. I seen fellas like you before. You ain't askin' notin; you are just singin a kind song 'what we comin to'

आज आपल्यासमोरही भारतात असेच कित्येक जण विचारत असतात, काय होणार? खरे तर त्यांना जाणून घ्यायची इच्छाच नाही, त्यापेक्षा काय होणारचं गाणंच त्यांना आवडंत.

ही लोकं जेंव्हा मूव्ह होत असतात, तेंव्हा त्यांना कॅलिफोर्नियन लोकं "ओकिज" अशी हाक मारतात. ज्यात तुम्ही इथले नाही, आमच्यापेक्षा खालचे आहात, बम्ज आहात असा "ओकिज"चा अर्थ आहे. तिथेही खायची मारामार होते. केसी एक छोटेसेच का होईना पण एक "रिव्होल्युशन" घडवून आणतो. पण त्याने सर्व आलबेल होते का? पुढे टॉमचे अन माचे काय होते? त्यांना भरपूर खायला मिळते का? हे सर्व तुम्हीच वाचायलाच हवे.

पुस्तकातील प्रकरण समांतर आहेत. एका प्रकरणात जॉन स्टाईनबेक स्वगत बोलल्यासारखे लिहितो, तर पुढच्या प्रकरणात जोड फॅमिलीची कहाणी आहे. बरेचदा जॉनही स्वगत प्रकरणं ही "सोशल" , "फिलॉसॉफिकल" किंवा साम्यवादी वाटू शकतात. पण त्यातून बाउन्स होणारे विचार आज २०१६ मध्येही उपयोगी आहेत.

“The Western States nervous under the beginning change.Texas and Oklahoma, Kansas and Arkansas, New Mexico, Arizona, California. A single family moved from the land.Pa borrowed money from the bank, and now the bank wants the land. The land company--that's the bank when it has land --wants tractors, not families on the land. Is a tractor bad? Is the power that turns the long furrows wrong? If this tractor were ours it would be good--not mine, but ours. If our tractor turned the long furrows of our land, it would be good.Not my land, but ours. We could love that tractor then as we have loved this land when it was ours. But the tractor does two things--it turns the land and turns us off the land. There is little difference between this tractor and a tank.The people are driven, intimidated, hurt by both. We must think about this.

One man, one family driven from the land; this rusty car creaking along the highway to the west. I lost my land, a single tractor took my land. I am alone and bewildered. And in the night one family camps in a ditch and another family pulls in and the tents come out. The two men squat on their hams and the women and children listen. Here is the node, you who hate change and fear revolution. Keep these two squatting men apart; make them hate, fear, suspect each other. Here is the anlarge of the thing you fear. This is the zygote. For here "I lost my land" is changed; a cell is split and from its splitting grows the thing you hate--"We lost our
land." The danger is here, for two men are not as lonely and perplexed as one.

जॉनने इतक्या खूबीने उतरविले आहे की त्याच्यामुळे आपल्या " पिपली लाईव्ह" किंवा विदर्भ-मराठवाडा येथे गेले काही वर्ष होत असलेल्या आत्महत्या आठवत राहतात आणि डिप्रेशन येते. पण त्याच बरोबर जॉनच्या भाषेमुळे पुस्तक काही सोडवत नाही. ह्या पुस्तकावर वर पिक्चरही आला होता. हे पुस्तक फिक्शन असले तरी त्याला सत्याचा आधार आहे.

डस्ट बाऊल "dust bowl" मायग्रेशन असे गुगल मध्ये शोधले तर अनेक खरी चित्र पाहायला मिळतील व ह्या अनोख्या इनलँड मायग्रेशन मध्ये दुसरे अमेरिकन लोकं ह्या सो कॉल्ड "ओकिज" सोबत कसे वागले त्याच्या कथाही वाचायला मिळतील.

जॉन स्टाईनबेकने "ग्रेप्स ऑफ रॅथ" लिहून इतिहासाला एका क्लासिक मध्ये रुपांतरीत करून ह्या "ओकिज"ना जिंवत ठेवले आहे.

जाता जाता मा जसे म्हणते तसे,

" I ain't scared no more ! It was tough, for a while, it looked though we was beat. Good and beat. Looked like we didn' have nobody in the world but enemies, like nobody was friendly no more. It feel kinda bad and scared too.

त्यावर पा म्हणतात, मला भिती वाटत होती. आता आपले घर पाहायला मिळणार नाही, पण मी मधून खंगत चाललो होतो. तू होतीस म्हणूनच फॅमिली टिकून राहिली. कसे करू शकलीस तू हे?

त्यावर मा म्हणते, “Women can change better’n a man,” Ma said soothingly. “Woman got all her life in her arms. Man got it all in his head.” “Man, he lives in jerks-baby born an’ a man dies, an’ that’s a jerk-gets a farm and looses his farm, an’ that’s a jerk. Woman, its all one flow, like a stream, little eddies, little waterfalls, but the river, it goes right on. Woman looks at it like that. We ain’t gonna die out. People is goin’ on-changin’ a little, maybe, but goin’ right on.”

--

सकाळी, रात्री, दिवसभर, कामात असताना, पळताना, सायकल चालवताना सारखे ओकिज, केसी, टॉम,मा हे डोळ्यासमोर येत आहेत. विचारात येत आहेत. विचार करून थकलो. माणसं कुठल्याही देशात अशी का वागतात ते कळत नाही. पुस्तक वाचून एक अस्वस्थता आली आहे. ती बहुतेक काही काळात जाईलही. पण त्या अस्वस्थतेतूनच हे लिहिले . पण एकच म्हणावे वाटते, I ain't scared no more !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदारजी, छान गोषवारा दिलात एका वैश्विक अनुभूतिला प्रभावीपणे साकार करणार्‍या असामान्य साहित्यकृतिचा ! धन्यवाद.
'ग्रेप्स ऑफ रॅथ' सिनेमा पाहून दशकं लोटलीं. <<रूट ६६ वर हजारो कार अश्या कुटूंबाना घेऊन निघाल्या. जणूकाही टेक्सास, ओक्लाहोमाच नाही तर पूर्ण साऊथ ही वेस्टला मायग्रेट होत आहे असे चित्र निर्माण झाले. साधारण ३-४००००० लोकं ह्या काळात कॅलिफोर्नियाला स्थलांतरीत झाली. हे सर्व लोकं "जलॉपी" म्हणजे जुन्या, गंजलेल्या कार घेऊन २००० मैल प्रवासाला निघाली. हातात ४० डॉलर ते २०० डॉलर. ५ माणसं बसू शकणार्‍या गाडीत १० ते १२ लोकं बसायची. ही सर्व लोकं वेस्ट मध्ये पोट भरेल ह्या आशेवर कॅलिफोर्नियाला जायला निघाली.>> त्या सिनेमातला हा हेलावून टाकणारा प्रवास आठवला कीं अजूनही काळीज पिळवटून निघतं. सिनेमातही टॉम [ हेन्री फोंडा] व त्याच्या आईच्या व्यक्तिरेखाही मूळ कादंबरीतल्या व्यक्तीरेखेएवढ्याच प्रभावी व अविस्मरणीय !
[ अर्थात, कादंबरी व सिनेमा यांत कांहींसा फरकही आहे, विशेषतः शेवटच्या भागात ]

भाऊ जी नको हो. Happy

हो भाऊ. मी लिखान पिक्चर संपतो तिथे संपवले पण त्यापुढे बरचं आहे. कादंबरी आणि सिनेमात फरक आहे. सिनेमा, ती लोकं तो चांगला कॅम्प सोडून पुढे जातात ती संपतो. पण पुस्तकात त्या पुढे जाऊन जिथे रोझला मुलगा होतो तिथे कादंबरी संपते.

पुस्तक वाचताना मी मा ची एक वेगळीच प्रतिमा तयार करून घेतली. आणि पुस्तक संपता संपता मला राहवेना म्हणून पिक्चर बघायला सुरू केले अन संपवला. मी तयार केलेल्या प्रतिमेत आणि पिक्चर मध्ये असलेल्या मा मध्ये खूप फरक आहे. माझी प्रतिमा बरीचशी "आत्मविश्वास" सारखी आई टाईप होती. पण मला पिक्चर मधील आईही आवडली. टॉम मात्र एकदम हुबेहुब प्रतिमेसारखाच.

मी हे पुस्तक घेऊन २ वर्ष होत आली पण सुरवातीच्या काही पानांपुढे मजल गेली नाही अजून.
आता कदाचित मुहूर्त लागेल. चांगली ओळख करुन दिलीस. धन्यवाद. Happy

मला काही असलं पुस्तक झेपेल असं वाटत नाही पण तू करून दिलेला परिचय आवडला.

ही भाषा वाचून (आपण बोलत असलेल्या /आपल्याला सवयीच्या इंग्लीश पेक्षा) वेगळी असल्याने अपेक्षीत तो अर्थ लागेल की नाही असं वाटतं.

पण एक कळलं नाही. ह्या गोष्टीतल्या परिस्थितीला माणूस जबाबदार कसा (की हे फक्त माझं इकॉनॉमिक्स चं अज्ञान आहे?)

सशल, साउथ मध्ये आणि मिड वेस्ट मध्ये बोली भाषेचा लहेजा असाच होता. म्हणून पुस्तकात पण तशीच भाषा आहे.

या गोष्टीतल्या परिस्थितीला माणूस जबाबदार कसा >>

हा वरवर सोपा वाटणारा प्रश्न खूप गहन आहे. माणसाची ग्रीड, हाव ही जास्त जबाबदार आहे. त्यामुळे इकॉनॉमी घडतात व बिघडतात. त्या काळी मास शेतीची सुरूवात होती. आणि १९३० च्या दरम्यान अमेरिकन एम्लॉयमेंट मोस्टली शेती मध्येच जास्त होती. अचानक ट्रॅक्टर व इतर टुल्सच्या वापराने सर्व सोपे जाऊ लागले. ज्यांच्या जमिनी बॅंकेकडे गहान होत्या त्यांना जमिनी सोडाव्या लागल्या कारण बँकेने लँड कंपनी अश्या सिस्टर कंपन्या स्थापून त्याद्वारे मास शेतीचे प्रयोग गेले ज्यामुळे त्या बँकाना प्रंचड नफा झाला. हे बँक मालक बहुतांश खाजगी होते. मोस्टली इस्टर्न अमेरिकन. न्यू यॉक / न्यु इंग्लंड वगैरे मधले.

टोटल भांडवलशाही मध्ये माणसाकडे देखील एक साधन म्हणूनच बघितले जाते. त्या माणसाची यूटिलिटी संपली की त्याचे कामही संपले. ह्या रुल प्रमाने जेंव्हा ही लोकं पैसे परत करू शकली नाहीत, तेंव्हा बँकेने जप्ती आणली. त्यात भावनांचा विचार केला जात नाही. म्हणून म्युले म्हणतो, मी जाणार नाही, ही माझी जागा आहे. ७० वर्षांपुर्वी माझ्या पा च्या पाने ही जागा घेतली, माझे पा इथे जन्मले, मी इथे जन्मलो आणि कित्येक लोकं इथे मेले. "“Sure, cried the tenant men,but it’s our land…We were born on it, and we got killed on it, died on it. Even if it’s no good, it’s still ours….That’s what makes ownership, not a paper with numbers on it."

ही जी वरची मानवी भावना आहे ती टोटल भांडवलशाही मध्ये उपयोगी नाही. म्हणून बँक आणि पर्यायाने बँकेचे मालक जबाबदार.

बरं कॅलिफोर्नियामध्ये तरी काय घडले. ती जमीन मेक्सिकोची होती. जी अमेरिकेने बळकावली. तिथे देखील अल्पभूधारक नाहीशे झाले. नाहीशे केले गेले. आणि जे मालक होते (मेक्सिकन लोकं) ते मजूर झाले. मजूर कमी पडले म्हणून जपान आणि चीन मधून लोकं कॅलिफोर्निया मध्ये आणन्यात आले.

जोड फॅमिलीला वाटतं की ते जमीन घेतील, पण तिथे जमीन ऑलरेडी मोठ्या आणि आधुनिक शेती मध्ये रुपांतरीत झाली होती. शिवाय कामाला हवे असणारे लोकं काही हजार आणि मायग्रेट झालेले लोकं ३ ते ४ लाख. त्यामुळे डिमांड अ‍ॅन्ड सप्लाय हा इकॉनॉमीचा बेसिक रुल राज्य करू लागला. जिथे ३० सेंट प्रतितास मिळायचे, तिथे अनेक लोकं भुके मरण्यापेक्षा ५ सेंट तरी मिळतील, तर का नको? असा विचार करून काम करू लागले, ज्यातून त्या जागा मालकांचा नफाच झाला.

भांडवलशाही वाईट आहे का? हो पण आणि नाही पण. उत्तर हे त्या त्या क्षणावरच अवलंबून आहे. प्रत्येक देशामध्ये स्थित्यंतर येत राहतात. भारत आज अगदी ह्यातूनच जात आहे. फक्त ते आपल्याला जाणवत नाही. पण खोलवर विचार केला तर शेती करायला लोकं तयार नाहीत कारण रोजगारच चांगला नाही. आपल्याकडे अजून मोठ मोठ्या शेती कंपन्या नाहीत, नाहीतर शेतकर्‍यांचे इनलँड मायग्रेशन भारतातही खूप मोठ्या प्रमाणावर झाले असते. जमीनदारी पद्धत भारतात होती. पण कुळ कायद्यामुळे कुळांनाच जमीन मिळाली. त्यामुळे सरकारनेच एक प्रकारे हे रोखून धरले. पण तो जमाना १९५०चा होता.

अश्यात २००८ मध्ये जेंव्हा परत एकदा इकॉनॉमी कोसळली, तेंव्हा ओबामाने रेस्क्यु ऑपरेशन करून मोठ्या कंपन्याना पैसे दिले, जेणे करून लोकं कामावर राहू शकली. हा सरकारच्या माणूसकीचा भाग आहे. ग्रीनस्पॅन सारखे लोकं विरोधात होते. ( ग्रीनस्पॅन जे उच्चारतो त्यावरून २०१० च्या दशकात जगाची इकॉनॉमी चालायची. ) आणि "सोशॅलिस्ट" शिक्का लागला तरी ओबामाने ते पैसे दिले. अन्यथा आपल्या डोळ्यासमोरच अमेरिकेची वाताहत बघायला मिळाली असती. हे अगदी लेटेस्ट उदाहरण.

जॉन हा स्वतः थोड्या डाव्या विचारांचा होता. त्याने स्वगतात " The land company--that's the bank when it has land --wants tractors, not families on the land. Is a tractor bad? Is the power that turns the long furrows wrong? If this tractor were ours it would be good--not mine, but ours. If our tractor turned the long furrows of our land, it would be good.Not my land, but ours." असे लिहिले आहे. ( तो पूर्ण प्यारा मी वर दिला आहे.)

मग ह्यावर उत्तर साम्यवाद आहे का?

खोलवर विचार न करता, सगळं आयडियलिस्टिक दृष्ट्याबघितलं तर साम्यवाद ह्यावर उत्तर वाटते त्यामुळे जॉन ने "आवर" हा शब्द वापरला आहे. पुस्तक लिहिले तेंव्हा ३०'ज मध्ये साम्यवादाचा एक युटोपिया होता. सगळ्यानाच तो चांगला वाटत होता. आज पाहिले तर रशियामध्येच लेनिनचा पुतळा रशियन लोकांनीच तोडला आहे. साम्यवादीची फळ शेवटी आंबटच निघाली, फक्त खूप वेळ लागला. इतकेच.

नक्की काय चांगले? हा प्रश्न त्यामुळे खूप गहन आहे. काळ किंवा पांढर असे उत्तर नाही. ग्रे एरिया आहे हा सर्व. त्यामुळे होणार्‍या सगळ्या गोष्टींना माणूसच जबाबदार आहे.

पोस्ट मोठी झाली. Happy

फा धन्यवाद.

बुवा, असामी - वाचायला सुरूवात करा. Happy

सुरेख पुस्तक परिचय केदार! ह्या inland migration बद्दल काही माहिती नव्हती. आता हे आणि जॉन स्टाईनबेकची इतर पुस्तकं मिळवून वाचेन.
सध्या पुन्हा एकदा गॉन विथ द विंड वाचत्येय. सवयीने ही सदर्न भाषा गोड वाटते! पहिल्यांदा गॉन विथ द विंड वाचताना अचानक साऊथ कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला होता. तोपर्यंत सिव्हिल वॉरविषयीची सर्व माहिती ही नॉर्थ च्या दृष्टीकोनातून मिळाली होती. तेव्हा कॅंपसवर फिरताना एका पुतळ्याचे नाव ज. रॉबर्ट ली असे वाचल्यावर फिक्शन आणि इतिहास एक झाल्याचे एक वेगळेच फिलिंग आले होते! ( ह्या वर्षी civil war शी संबंधित सर्व पुतळे कॅंपसवरुन हलवले गेले तेव्हा वाटलं history Never leaves us!) सॉरी! बरंच विषयांतर झालं!

केदार.....

केवळ "ग्रेप्स ऑफ रॅथ" साठी नव्हे तर ज्या उत्तुंग भावनेतून तुम्ही हे लिखाण केले आहे (जे दीर्घच असायला हवे होते आणि आहेच आहे....त्या प्रवासासारखेच) त्यासाठी मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. कादंबरी त्या "ग्रेट डीप्रेशन" काळातील अमेरिकन जीवनाचे वा स्थितीचेच वर्णन करत नाही तर प्रत्यक्षात जीवन म्हणजे झगडा आणि ज्याला समर्थपणे कसे तोंड द्यायचे हे जोड्स कुटुंब जे दाखविते ते स्मरणीय होते. प्रत्यक्षात त्या काळातील सर्वसामान्य अमेरिकन नागरिकाचीच भूमिका स्टाईनबेकने प्रभावीरित्या मांडली असल्याने "ग्रेप्स ऑफ रॅथ" निर्विवादपणे अमेरिकनच नव्हे तर जागतिक साहित्यातील मानाचे पान बनून राहिली आहे.

कादंबरी लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी जॉन स्टाईनबेक अस्वस्थ होताच इतक्या त्या मंदीच्या झळांनी त्याच्यासोबत अनेकांना ग्रासले होते. हजारो "ओकीज" काम, जागा, दर्जा आणि भविष्य (जे काळवंडूनच गेले होते) याबाबतीत तहानलेले होते. आजच्या संगणकीय युगात आपण वारंवार "टॅग" ची भाषा करतो तर स्टाईनबेकने कादंबरी लेखनापूर्वीच आपल्या एका मुलाखतीत ती विषयी म्हटले होते. "I want to put a tag of shame on the greedy bastards who are responsible for this [the Great Depression & its effects]." ~ हेच पुरेपूर उतरले आहे कादंबरीत.

"साम्यवादा"ची भूल सर्वांनाच पडली होती....आणि त्यात काही गैर नसेलही. फक्त वाद कोणताही असो तो एकदा स्वीकारला की त्याची फळे किती गोड आणि किती कडवट हे पुन्हा काळच ठरवितो. तुम्ही रशियाचे उदाहरण घेतले आहेच. लेनिनचा पुतळा तोडण्यासाठी जिथे खुद्द रशियन्सच पुढे आले तिथे वादावरील डाव्याउजव्या मिळकतीचेच उत्तर मिळते. अर्थात एका ठिकाणी चुकलेले गणित अन्यत्र बरोबर निघाले म्हणजे नेमके वादाचे सार काय असेल ? यावर खल सतत होत असतोच. स्टाईनबेकच्या लेखणीने अनेक विषय कादंबरीत खुलविले आहेत त्याचा अतिशय सुंदर असा मागोवा तुम्ही घेतला आहे.

"पुलित्झर प्राईझ विनर" कादंबरीवरील तुमच्या या लेखाने पुन्हा एकदा जोड्स कुटुंबासमवेतचा प्रवास केल्यासारखे झाले. टॉम जोड म्हटला होता..."..I'll be all around in the dark. I'll be everywhere...." ~ तीच भावना मनी दाटली. थॅन्क्स.

केदार, मोठ्या पोस्ट बद्दल थँक्यू. Happy

तशी भाषा पिक्च र्स मधून बघितली आहे, फक्त अजून खूप परिचयाची वाटत नसल्यामुळे एखाद्या वाक्यातून व्यक्त झालेली भावना, विचार तसाच्या तसा कळेलच अशी खात्री वाटत नाही इतकंच.

केदार, खूपच मस्त लिहीले आहे. पुन्हा एकदा वाचून मग सविस्तर प्रतिसाद देतो. Happy पुस्तक विशलिस्टवर टाकलंय!

<< या गोष्टीतल्या परिस्थितीला माणूस जबाबदार कसा >> केदार यांच्या उत्तरात आणखी थोडी भर घालण वावगं ठरणार नाहीं -
जेंव्हां जमीनी ताब्यांत घ्यायला बँकेच्या अधिकार्‍यांचे ताफे येतात , तेंव्हां तिथल्या कोणालाही अशा आपत्तिची पुसटशीही कल्पना नसते. It's just a bolt from the blue ! पिढ्यान पिढ्या आपल्या असणार्‍या जमीनी जावून आपण बेघर होणार, हा अचानक झालेला आघात माणसाच्या सुरक्षिततेच्या मूलभूत भावनेलाच सुरूंग लावतो. आपल्या इथं सावकारीचे असे पिळवणूकीचे किस्से पाहून/ऐकून आपण हादरतो. तिथं तर निकडीच्या वेळीं घेतलेलीं कर्जं मुद्दाम तशींच उबवत ठेवून, बँकानी सुनियोजित कारस्थान करून लाखो एकर्सचा प्रचंड मोठा परिसरच तिथल्या हजारों कुटूंबाना उध्वस्त करत घशात घातला. स्वार्थासाठी कायद्याचा इतका अमानुष , नियोजित व इतक्या प्रचंड प्रमाणात दुरुपयोग क्वचितच झाला असावा. << म्हणून बँक आणि पर्यायाने बँकेचे मालक जबाबदार.>> हें केदारांचं स्पष्टीकरण अर्थपूर्ण व निर्णायक ठरतं.

[ थोडं विषयांतर पण विषयावर प्रकाश टाकणारं - आपल्या इथं रायगड जिल्ह्यात अनेक शेतजमीनी उद्योग उभे करण्याकरतां घेतल्या /दिल्या आहेत. तिथलेच एक मोठे उद्योगपति ऑफिसच्या कामानिमित्त झालेल्या भेटीत एकदां मला म्हणाले कीं भरपूर मोबदला देवून यांच्या जमीनी घेतल्या तरीही हे शेतकरी इथंच घुटमळतात, कटकटी करतात, प्रदूषणाच्या तक्रारी करतात इ,इ. याच व इतर अनेक उद्योगपतींनीं अलिबाग जवळच किहीमच्या परिसरात अलिशान बंगले बांधले आहेत , मुंबईहून ये-जा करायला स्वतःच्या सुसज्ज लाँचीसही ठेवल्या आहेत. मीं मुद्दामच त्याना डिंवचायला म्हटलं, " किहीमजवळ खत कारखाना टाकायचा शासनाचा प्रस्ताव आहे, असं ऐकीवात आहे.". एकदम खवळून उठून ते माझ्यावर खेंकसले, " On our dead bodies ! Leave alone a fertilizer project, we will not allow even a bakery unit to come up there !!" मीं हंसून त्याना म्हटलं, " अहो आठ-दहा वर्षं नाही झालीं तुम्हीं तिथं घर बांधल्याला, तर तुमची ही भडक प्रतिक्रिया, तर पिढ्यान पिढ्या त्या जमिनींशीं नाळ जुळलेल्या शेतकर्‍यानी केली थोडी कुरबूर तर काय बिघडलं !!". माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत , " हे पांढरपेशे नाहीं कधीं सुधरायचे !" हें न बोलतांच त्यानी माझ्यापर्यंत पोचवलं.]

भास्कराचार्य - जिज्ञासा, हो वाचाच. मस्ट रीड आहे.

I'll be all around in the dark. I'll be everywhere. >> अशोकराव, अगदी अगदी.

केसीचे तत्वज्ञान हे गीतेच्या शिकवनीसारखे आहे. एकच आत्मा आणि आपण सर्वच तो. अंह ब्रह्मास्मि - तत्वमसि चा पुनरउच्चार केसी त्याच्या पहिल्याच, व्हॉट इज व्हर्च्यू मध्ये करतो. टॉम त्याने भारावून जातो. शेवटी शेवटी तो म्हणतो, केसी हा दिव्यासारखा होता. त्याने मला प्रकाश दाखविला. आणि माला जाता जाता तो हे वरील वाक्य म्हणतो. त्याच्या आजूबाजूचा भाग जॉनने खूपच खुलविला आहे. असं वाटतं की, तो टॉम म्हणजे आपल्यातलाच एक भाग, अन ती मा म्हणजे पण आपणच. अंह ब्रह्मास्मि - तत्वमसि !

भाऊ - विषयांतर म्हणत सोप्या शब्दात तुम्ही गोषवाराचा मांडला आहे. धन्यवाद.

केदार, छान लिहीलं आहेस.

मागच्या डिसेंबरात "Route 66" (Arizona) वरच एका हॉटेलात राहिलो होतो. ग्रँड कॅनियनला जाताना 'विल्यम्स' नावाचं गाव लागतं , तिथून हा रस्ता जातो. त्या हॉटेलच्या समोरच "Route 66 नावाचं रेस्टॉरंट आहे. तिथे तू वर्णन केलेस तशी अनेक लोकांच्या मायग्रेशन जर्नीची वगैरे चित्रं कुणीतरी भिंतीवर पेंट केलेली होती. तेव्हा आणि त्या आधी केलेल्या अनेक ग्रँड कॅनियन ट्रीप्समधे या रस्त्यावरुन प्रवास झाला आहे. या सगळ्यामागे एवढा मोठा इतिहास आहे याचा पत्ताच नव्हता.

आता लगेचच लायब्ररीतून हे पुस्तक आणते. तू दिलेल्या माहितीचा वाचताना नक्कीच उपयोग होईल.

सशल म्हणते त्याप्रमाणे यातली भाषा झेपण्याबद्दल मीही साशंक आहेच, पण प्रयत्न जरुर करणार.

खूप धन्यवाद याविषयावरच्या ह्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल.

अशोकजी, भाऊ तुमचेही प्रतिसाद आवडले.

मी पण हे पुस्तक वाचायला लायब्ररीमधून आणले खरे पण पहिले १-२ चॅप्टर्सच वाचले. ती धुळीच्या वादळाची पानच्या पानं भरून वर्णनं मला फार कंटाळवाणी वाटली. फार संथ आणि रटाळपणा जाणवला.

पण आता परत पुस्तक आणून जरा नेट लावून वाचीन कारण हे इतकं नावाजलेलं पुस्तक आहे की नाही वाचलं तर चुटपूट लागून राहील आणि आवडलं तर छानच पण नाही आवडलं तरी वाचायलाच हवं ही कॅटेगरी आहे या पुस्तकाची

पानं भरून वर्णनं मला फार कंटाळवाणी वाटली. फार संथ आणि रटाळपणा जाणवला.>>> +१ म्हणूनच खरं मी पण सोडून दिलं ते पुस्तक. ही पुस्तकं वाचताना थोडा पेशन्स हवा. सतत काहीतरी हॅपनिंग किंवा फास्ट मुविंग कथानकांची फार सवय झालीये आजकाल. नॉट दॅट इट्स बॅड ऑर एनिथिंग पण अशा खुपच सावकाशपणे फुलत नेलेल्या दर्जेदार कथा वाचल्या जात नाहीत ह्या सवयीमुळे. ते पट्टीचे गायक नाही का एक एक स्वर बदलत तीच तीच ओळ गात अत्यंत सावकाश पुढे सरकतात त्यासारखं काहीसं.

ते पट्टीचे गायक नाही का एक एक स्वर बदलत तीच तीच ओळ गात अत्यंत सावकाश पुढे सरकतात त्यासारखं काहीसं>> दॅट एक्स्प्लेन्स मला शास्त्रीय संगीत का ऐकायला फार्सं आवडत नाही Happy

उत्तम लेख व पुस्तक परिचय. केदार, प्रतिसाद पण छानच आहे . विवेचनात्मक.

It is really hard being totally displaced and to have nothing to fall back on. But like ma says it toughens us up. What she says is so spot on. about every thing being a flow for a woman. We do face things differently. I am going to read the book to understand her character. First conversation that you have quoted does remind one of Gita and Atma being one.

Bhau pratisad also spot on.

लोल शुम्पी. Happy
ह्या दोन्हींची आवड "डेवलप" करावी लागते बहुतेक पण ती करायची आहे की नाही तो निर्णय सर्वस्वी आपला वैयक्तिक असतो.

ती धुळीच्या वादळाची पानच्या पानं भरून वर्णनं मला फार कंटाळवाणी वाटली. फार संथ आणि रटाळपणा जाणवला. >> हो वाटू शकतात. पण तो भाग पुस्तकाच्या प्रस्तावने सारखा एक भाग आहे.

ते पट्टीचे गायक नाही का एक एक स्वर बदलत तीच तीच ओळ गात अत्यंत सावकाश पुढे सरकतात त्यासारखं काहीसं. >> लोल. विलंबीत तालाची उपमा Happy

दॅट एक्स्प्लेन्स मला शास्त्रीय संगीत का ऐकायला फार्सं आवडत नाही स्मित >>. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी - अरे शिंच्या तीज पोर पण झाले असेल हे आठवले.

But like ma says it toughens us up. What she says is so spot on. about every thing being a flow for a woman. >>. कुडन्ट अ‍ॅग्री मोअर.

Route 66 >> शुगोल, अमेरिकेत आल्यावर मलाही ही खूप उत्कंठा होती राउट ६६ ची. कुठून कुठे जातो वगैरे वगैरे. पुढे अनेकदा मी त्यावरून गेलो हा भाग वेगळा. पण अमेरिकेत यायच्या आधीच द ग्रेट ६६ माहिती होता.

छान परिचय करुन दिला आहे. हा लेख वाचून पुस्तक वाचावसं वाटलं...लिस्टमध्ये टाकलं आहे!

प्रतिक्रिया व एकूण सगळी इथली चर्चाही वाचनीय आहे.

"“She seemed to know... the family would fall.” " हा पूर्ण पॅरा ग्रेट आहे. _/\_

छान परिचय करुन दिला आहे. हा लेख वाचून पुस्तक वाचावसं वाटलं...लिस्टमध्ये टाकलं आहे!

प्रतिक्रिया व एकूण सगळी इथली चर्चाही वाचनीय आहे.>>>> +१०००

मला I ain't scared no more ! आणि तो वुमनचा पॅरा फार आवडला

अतिशय सुरेख परिचय करुन दिलाय.... त्याकरता मनापासून धन्यवाद केदार...

प्रतिक्रिया व एकूण सगळी इथली चर्चाही वाचनीय आहे.>>>> +१०००

या अशा अप्रतिम, अंतर्मुख करायला लावणार्‍या लेखांकरता मायबोलीला जितके धन्स देऊ तितके कमीच असे वाटते.... Happy

केदार, खुपच सुरेख परिचय. तो शेवटचा माचा पॅरा आणि ज्या नोटवर लेख संपवलास, दोन्ही प्रभावी. खालचा प्रतिसादही वाचनीय.
वाचायला पाहिजे आता.
भाऊ, तुमची अ‍ॅडिशन खुप परिणामकारक.

<< पानं भरून वर्णनं मला फार कंटाळवाणी वाटली. फार संथ आणि रटाळपणा जाणवला.>>>>> ह्या पुस्तकांत मुद्दामच स्टाईनबेकने अत्यावश्यक अशा त्या कालखंडाच्या वातावरण निर्मितीसाठी तशी शैली वापरली असण्याचीही दाट शक्यता आहे. ' ऑफ माईस अँड मेन' नाही लिहीलं त्याने तसं !

धन्यवाद, केदार! सुंदर ओळख.

सिनेमा पाहिला आहे. समहाउ पुस्तक वाचायचे राहूनच गेले. आता नक्की वाचणार.

छानच परि चय अन विषय... येवढेच वाचुन प्रचंड अस्वस्थ व्हायला झाले, आख्खे पुस्तक वाचले तर काय होईल?

>>>> भारत आज अगदी ह्यातूनच जात आहे. फक्त ते आपल्याला जाणवत नाही. पण खोलवर विचार केला तर शेती करायला लोकं तयार नाहीत कारण रोजगारच चांगला नाही. आपल्याकडे अजून मोठ मोठ्या शेती कंपन्या नाहीत, नाहीतर शेतकर्‍यांचे इनलँड मायग्रेशन भारतातही खूप मोठ्या प्रमाणावर झाले असते. <<<<
याच्याशी पूर्णपणे सहमत

.>>>>> जमीनदारी पद्धत भारतात होती. पण कुळ कायद्यामुळे कुळांनाच जमीन मिळाली. त्यामुळे सरकारनेच एक प्रकारे हे रोखून धरले. पण तो जमाना १९५०चा होता. <<<<< हे सपशेल अमान्य पण या धाग्याचा तो विशय नाही, सबब कुळकायद्याचे फायदेतोटे म्हणण्यापेक्षा तोटेच काय जास्त झाले ते कधीतरी स्वतंत्रपणे मांडेन, पण थोडक्यात माझ्या मते, वर आधी जे मायग्रेशन म्हणतो आहेस, त्याचे मूळच कूळकायद्यामधे व नंतर क्रमाने इतर परिस्थितीत दडलेले आहे असे माझे मत.

केदार, उत्तम परीक्षणाबद्दल आभार. मी पुस्तक वाचलेले नाही पण, त्याबद्दल कुठेकुठे वाचले होते. माझ्या काही शंका :
१. त्याचा मराठी अनुवाद आहे का ?
२. पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल उत्सुकता वाटल्याने 'विकी' वर वाचन केले. तरीही त्याचा नीटसा भावार्थ कळला नाही. एकुणच grape, grapes, vine, winepress, wrath of God (Biblical meaning) अशा भडिमारातून नीटसे समजले नाही. जरा सांगणार का ?
३. कादंबरीतील एका प्रसंगाचे वर्णनावरून कादंबरीवर बंदी घालायची मागणी झाली होती असे कुठे वाचल्याचे स्मरते(चु.भु.दे.घे.) त्याबद द्ल लिहीणार का?