अजितला लहानपणापासून प्रवासाचं वेड. १६-१७ वर्षाचा झाला तसा त्याने मित्राची चार चाकी शिकून घेतली. लवकरच तो गावातल्या एका ट्राव्हल्स बरोबर काम करू लागला. छोटाच गाव तो, कधी एखादा मोठा माणूस पुण्या-मुंबईला जाताना गाडीने घेऊन जाई, कधी कुणाची लग्नं, जत्रा- यात्रा इतकाच काय तो प्रवास. पण त्यामुळे त्याचं घरी राहणं एकदम अनियमित झालेलं. लग्न झाल्यावरही बायको सुरुवातीला वैतागायची. कधी दुपारी झोपा काढेल, कधी पहाटे जेवण करेल. शनिवार रविवार तर हमखास फिरती असायची. आता ३-४ वर्षात तिलाही थोडी सवय होऊ लागली होती त्याच्या अनियमित कामाची आणि स्वभावाचीही. ती आता सांभाळून घेऊ लागली होती.
आज त्यांच्या घरात वेगळीच धावपळ सुरु होती. अजितची खूप इच्छा होती की साधी का होईना स्वत;ची गाडी हवी. लोकांच्या भारी भारी गाड्या त्याने चालवलेल्या. गेल्या पंधरा दिवसात त्याने एक जुनी गाडी बघून ठेवली होती. यावेळी हिम्मत करून ती घेतलीच. घरचे नाराज होतेच. घराची डागडुजी करायचं सोडून गाडीत कशाला पैसा घालायचा हे त्यांना कळत नव्हतं. पण त्याच्या हट्टापुढे कोण बोलणार. काल गाडी घरी आली आणि आज त्याने सांगितलं होतं की मी गाडी घेऊन जाणार आहे फिरायला. आई म्हणाली,'अरे देवीला तरी जाऊन ये. पहिलीच गाडी हाय." त्याचा नाईलाज झाला. त्यात आई पुढे म्हणालीच,"हिला बी घेऊन जा. " त्याच्या मनात नव्हतं कुणी त्याच्या आणि त्याच्या गाडीच्या मध्ये यावं. पण देवीला जायचं तर नाही कसं म्हणणार न्यायला. अलकाने सासूकडे पटकन पाहिलं. सासूने मानेनेच होकार दिल्यावर ती पळाली, आवरून घ्यायला. वर डोंगरावर जेवण कुठे मिळायचं म्हणून घाईत चार भाकरी थापल्या, सुकी डाळ केली, लोणचं ठेचा बांधून घेतलं.
अलका बाहेर आली तोवर त्याची गाडी साफ करून झालेली, आतून बाहेरून. त्याने आपल्या आवडत्या गाण्याच्या सीडी आधीच घेऊन ठेवल्या होत्या. गाडीसमोर जरा रागातच उभा होता तो. त्याला आवडायचं नाही आपण उशीरा पोचलेलं आणि लोकांनी लांबड लावलेली. पण त्याचा पेशाच तसा होता, आठला सांगून लोकं साडेनऊ दहा शिवाय तयार व्हायचे नाहीत. मग वेळेत पोचण्यासाठी 'जरा फास्ट घ्या की' म्हणून मागून आवाज तर कधी जेवायची बोंब. आज मात्र त्याला स्वत:च्या गाडीतून आपल्या मर्जीने फिरायचं होतं. तिच्या हातातली भली मोठी पिशवी पाहून तो म्हणाला,'अवो महिनाभर चाल्लाय्सा का गावाला?' . ती घाईघाईने गाडीत बसली आणि गाडीचं दार जरा जोरात ओढलं. तिकडून त्याचा रागाचा एक कटाक्ष तिच्यावर पडला. 'जरा दमानं?' असं म्हणत त्याने गाडी बाहेर काढली. आईला 'येतो गं आये.' म्हणून ते रस्त्याला लागले.
त्याने सकाळ सकाळी गणपतीच्या गाण्यांची सीडी लावली. एरवी त्याला गाणीही आपल्याला हवी तशी लावता यायची नाहीत. तो मग बाकीच्या कोलाहालाकडे दुर्लक्ष करायचा. गाडी तो आणि रस्ता असं वेगळंच संभाषण सुरु व्हायचं. 'गजानना श्री गणराया.....' गाणं चालू होतं. गुणगुणत त्याचा मूड बदलला. आपली गाडी, आपलं गाणं, आपला हवा तो रस्ता……? त्याच्या एकदम लक्षात आलं, "देवीलाच कशाला जायला हवं?". त्याने गाडी सातारा हायवे कडे वळवली. त्याने एकदा बायकोकडे पाहिले. पण तिला थोडीच कळणार होता रस्ता लगेच? आणि कळेल तेव्हा सांगूच म्हणून तो गप्प बसला. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली होती. ती कल्पना त्याला आता गाणीही ऐकू देईना. गाडीचा स्पीड वाढला आपोआप. अलका आपली पहिलीच गाडीत बसायची वेळ असल्याने थोडी अवघडून बसली होती.
हायवेला लागल्यावर मात्र अलकाने विचारलं,"काहो नवीन रस्ता हाये का देवीला जायचा?".
"नायी एक गम्मत हाय. सांगतो तुला नंतर.पन आता चार पाच तास लागतील. उगा घाई करू नका. "
नवऱ्याला असं गमतीनं बोलताना पहिल्यांदाच पाहिलेलं तिनं. तो पुढे बोलला, "नीट पसरून बसा की. मालकीण बाई हाय तुम्ही गाडीच्या." तशी ती लाजली आणि थोडी विसावलीही.
त्याने गाणी बदलली आणि एकदम मूडमध्ये येऊन सांगू लागला,"हिकडं हायवे वरून आतल्या रस्त्याला गेलं की एका भारी भुर्जीचं दुकान हाय. एकदा जाऊ आपन." तिने मान हलवली. कधी असं बाहेर पडायची वेळच आली नव्हती त्यामुळे आपण स्वप्नात तर नाही ना याची खात्री करून घेत होती. आपला नवरा गाडी चालवताना एक वेगळाच व्यक्ती बनतो हे ती अनुभवत होती.
मध्ये मध्ये अजित बोलतच होता,"आपण ना एकदा कोकनात जाऊ या. आई बा ला पन घिऊन. एकदम भारी समुद्र हाय. बघतच बसावं वाटतं. " तिने मान हलवली.
"पन रस्ता लई बिकट. एकदा असाच घाटातून जात होतो तर एकदम समोरून ट्रक आला. वाटलं आजची बारी शेवटचीच. तुझी आठवन झाली हुती." तिच्या काळजात एकदम धस्स झालं. त्याच बारीनंतर उशिरा आल्यावर आपण किती वैतागलो होतो ते तिला आठवलं. पण आज छान वाटत होतं त्याचे अनुभव ऐकताना. त्यालाही सांगायला. आज पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या शेजारच्या सीटवर आपलं माणूस बसलं होतं.
"ते चव्हान आप्पा माहितेय का? थेटर जवळचं. त्यांच्या सोबत गेलो हुतो एकदा मुंबईला. इतका जीव नकोसा झाला. एकतर ही खच्चून गाडी भरली त्यांनी. कलाकला करत हुती घरची मंडळी बी. जेवाय चार वाजलं दुपारचं. ते बी कुटल्या भंगार हाटेलात. लई चिडचिड झाली हुती तवा. म्हनलो यांच्या सोबत परत जायची येळ नको यायला. "ती फक्त ऐकत
होती.
दोनेक तासांनी तिने मागच्या सीटवरून पिशवी पुढे घेतली. त्यातले दोन पेरू काढून त्याला तिखट मीठ लावून एकेक फोड त्याला खायला देऊ लागली. तोही पुढे बघत बघत खाऊ लागला.
"आपण ना एकदा बाह्येर फिरायला जाऊ. बाह्येर म्हंजे गुजरात, केरळ असं." तिला काय सगळं सारखंच. तिने पेरू खाता खाता मान हलवली.
हळू हळू तिच्या पोटलीतून एकेक पदार्थ बाहेर येत होते. मधेच ती त्याला एखादं बिस्कीट देई तर कधी लिमलेटची गोळी. गाडी पुण्याकडे येऊ लागली तसं वातावरण ढगाळ झालं. रिमझिम पाऊस सुरु झाला तशी त्याने गाणीही बदलली. 'रिमझिम करें सावन.....' चालू होतं मागे आणि त्यासोबत त्याची बडबड. तीही गाडीच्या काचांवर पडणारे पावसाचे थेंब आणि बाहेर दिसणारी हिरवाई बघत राहिली. मधेच तिची झोप लागून गेली. त्याने प्रेमाने तिच्यावर एक नजर फिरवली. तिची तिरकी पडलेली मान जरा सरळ केली. चार तासांनी त्याने गाडी हायवेवरून बाहेर काढली.
गाडी थांबल्यावर अलकाला जाग आली. ते दोघेही गाडीतून बाहेर पडले. पुणे-मुंबईच्या मध्ये कुठेतरी एका टपरीजवळ गाडी थांबली होती. त्याने दोन वडा-पाव आणि चहा सांगितले आणि टपरीच्या मागे टाकलेल्या बाकड्याकडे तिला घेऊन गेला. म्हणाला,"बस आनी बघ फक्त." सह्याद्री दूरवर पसरला होता. दऱ्यात धुकं साठलं होतं. लांब कुठेतरी उंच धबधबे दिसत होते. तिच्या अंगाला चिकटून जाणाऱ्या ढगांनी हात, चेहरा ओलसर झाले होते. निसर्गाची ती किमया ती पहिल्यांदाच पाहत होती. तो चहा आणि वडापाव घेऊन आला. "घे. भारी असतोय इथला चा आणि वडा पन. मी मागं एकदा आलो होतो असंच लोकास्नी घेऊन तवा थांबवली होती गाडी. त्या लोकांनी सांगितलं हुतं चांगली जागा हाय म्हनून. मी इथं बसूनच म्हनलो हुतो, गाडी घेतली कधी तर तुला घेऊन नक्की यीन हितं. कसं वाटतंय?" त्याने विचारलं. पण ती इथे होतीच कुठे? ती त्याच्या पूर्ण झालेल्या स्वप्नाकडे, त्याच्या खुललेल्या चेहऱ्याकडे आणि सह्याद्रीकडे बघत होती फक्त. तिला आईशी झालेलं बोलणं आठवलं,"गाडी घीन्यापरीस तुजं गळ्यातलं तरी सोडवायचं हुतं. नसते थेर ते. " तिला आज गहाण पडलेल्या मण्यापेक्षा मोठं काहीतरी मिळालं होतं. पाऊस मग भरून येणारच होता मनात आणि डोळ्यांत.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
मन प्रसन्न करणारे लेखन आहे
मन प्रसन्न करणारे लेखन आहे
सुन्दर
सुन्दर
Masta
Masta
धन्यवाद. विद्या.
धन्यवाद.
विद्या.
सहिच ! एक नम्बर...........
सहिच ! एक नम्बर...........
किती गोड!
किती गोड!
काय छान लिहीलयं.. आवडले.
काय छान लिहीलयं.. आवडले.
छान आहे, हलकं फुलकं
छान आहे, हलकं फुलकं
छान लिहिलंय . आवडलं.
छान लिहिलंय . आवडलं.
किती गोड.. छान
किती गोड.. छान
खुपच मस्त ... आवड्ले.
खुपच मस्त ...
आवड्ले.
सर्वान्चे आभार. विद्या.
सर्वान्चे आभार.
विद्या.
>>> तिला आज गहाण पडलेल्या
>>> तिला आज गहाण पडलेल्या मण्यापेक्षा मोठं काहीतरी मिळालं होतं <<< एकदम छान वाटली गोष्ट, पण हे सगळ्यात आवडलं
छान
छान
हायला, लय भारी! अतीशयच आवडलं.
हायला, लय भारी! अतीशयच आवडलं.
खुप आवडली.
खुप आवडली.
खुपच मस्त ...
खुपच मस्त ...
अरे वा!! खुपच आवडली गोष्ट.
अरे वा!! खुपच आवडली गोष्ट. शेवट मस्तच.
पल्स पेक्षा इंपल्स वर जगणे
पल्स पेक्षा इंपल्स वर जगणे खुप आनंद देऊन जाते... मस्त लिखाण!!
अरे वा आज बरेच कमेन्ट्स आहेत.
अरे वा आज बरेच कमेन्ट्स आहेत. सर्वान्चे आभार.
विद्या.
वाह !! छाने.
वाह !! छाने.
मस्त आहे!
मस्त आहे!
सुंदर! तिला आज गहाण पडलेल्या
सुंदर!
तिला आज गहाण पडलेल्या मण्यापेक्षा मोठं काहीतरी मिळालं होतं >>> हे खूप वेगळं आणि मस्त आहे.
Thank you all. Vidya.
Thank you all.
Vidya.
वा, अतिशय सूंदर लिखाण.
वा, अतिशय सूंदर लिखाण.
हलकं फुलकं..!
हलकं फुलकं..!
लय भारी!
लय भारी!
Thank you all. Vidya.
Thank you all.
Vidya.
खूप सुरेख
खूप सुरेख
Chaan.
Chaan.
Pages