चांदणवेल

Submitted by सुपरमॉम on 13 February, 2009 - 10:29

बंगल्याचं फाटक लावून घेत सुधीर आत वळला. सभोवताली फुललेल्या बागेचं नेहमीसारखंच मनातल्या मनात कौतुक करत, बहरलेल्या फुलांचा गंध छातीत भरून घेत तो मागच्या अंगणात आला.

नेहमीचंच दृश्य होतं तिथे. हिरवळीवर मांडलेल्या दोन खुर्च्या नि टेबलावर ठेवलेला मोगर्‍याचा भरगच्च गजरा.. हवेवर तरंगत येणारा उदबत्तीचा प्रसन्न सुगंध नि या सगळ्यांवर कळस चढवणारा सरांचा खडा आवाज.. पूजेची स्तोत्रं म्हणणारा...

'आवाजही किती सुरेख आहे सरांचा...'

सुधीरच्या मनात आलं. देवघरात न जाताच त्याच्या डोळ्यांसमोर जांभळा कद नेसलेली, उंच, गोरीपान नि वयानुसार किंचित झुकलेली अशी सरांची मूर्ती आली. त्याच्याही नकळत तो सरांच्या पूजेशी तल्लीन झाला. कितीतरी वेळ सरांच्या गोड आवाजाशी नि सगळ्या वातावरणाच्या पावित्र्याशी अगदी एकरूप होऊन गेला.

'आलास सुधीर? अरे आज उशीर झाला तुला थोडा....'

आईंच्या स्निग्ध आवाजानं त्याची भावसमाधी उतरली. हातात वाफाळणार्‍या चहाचा कप नि खाण्याची बशी घेऊन त्या सावकाश येत होत्या.
तत्परतेनं पुढे होऊन त्यानं त्यांच्या हातातलं खायचं घेऊन टेबलावर ठेवलं.

आतून आता मंत्रपुष्पांजलीचे स्वर लहरत येत होते.

'चल घे लवकर... थंड होईल बरं..' त्याला बजावून त्या परत आत गेल्या.

साजुक तुपाचा शिरा नि घरचं गोड लिंबाचं लोणचं बघितलं नि काल रात्री आपण नीट जेवलोच नाहीय याची जाणीव झाली सुधीरला..

भराभर खाणं संपवून त्यानं चहाचा कप तोंडाला लावला. तोच पांढराशुभ्र झब्बा पायजमा घातलेले सर हातात बासरी घेऊन आलेच. गडबडीनं कप नि खाण्याची बशी सुधीर आत ठेवून आला. सरांच्या पावलांना स्पर्श करून, अदबीनं मान झुकवून, पिशवीतून आपली बासरी काढून त्यांच्या समोर बसला.

अन मग रोजच्यासारखीच स्वरांची मैफल रंगली. पुढचा एक दीड तास आपण कुठे आहोत, भोवताली काय चाललं आहे याचं भान विसरल्या गेलं. सरांच्या बासरीतून झिरपणारे ते स्वर्गीय सूर नि ते आत्मसात करायची जिवापाड धडपड करणारा सुधीर.. जणू या जगात त्या गुरुशिष्यांच्या नात्याखेरीज काही नव्हतंच. इतकं देखणं, इतकं हळुवार संगीत नि त्यात न्हाऊन निघणार्‍या दोन जिवांचं ते अद्वैत..

सरांनी बासरी नीट पुसून खाली ठेवली तसा सुधीर या जगात आला. थोडा वेळ त्याला बोलणंही सुचेना.

खरंच, त्या शारंगधरानं उगाच नाही हे वाद्य निवडलं सगळ्या गोपींवर भूल टाकायला..
हे मखमली सूर मनात विरघळल्यावर नि त्यातली आर्तता मनाच्या गाभार्‍यापर्यंत भिडल्यावर गोपीच काय.. सारं गोकुळच वेडावून जात असलं तर नवल नाही...

'छान.. छान वाजवलंस आज सुधीर..'
सर म्हणाले तसा तो भानावर आला. सरांना पुन्हा नमस्कार करून खुर्चीत सावरून बसला.
'तुझ्या त्या नोकरीच्या मुलाखतीचं काय झालं रे..?"

'उद्या आहे सर...अकरा वाजता..'

'मग उद्या हवंतर शिकवणी बंद ठेवूया..'

'नाही नाही सर... बासरीत खंड नको पडायला... इकडे येऊन मग जाईन मी..'
त्याचं घाईघाईनं दिलेल्या उत्तरानं सर हसले.

'बरं बरं..ये मग उद्या..'

हातातली बासरीची पिशवी छातीशी घट्ट धरत तो जायला उठला. आत जाणार्‍या सरांच्या आकृतीकडे डोळे भरून बघत...

बसस्टॉप वर बसची वाट बघत उभ्या असलेल्या सुधीरच्या मनात चार वर्षातला स्मृतीगंध दरवळत होता.

गेली चार वर्षं सरांकडे तो शिकत होता. पण त्याचे नि सरांच्या कुटुंबाचे भावबंध अगदी वेगळ्याच पातळीवर जुळले होते.

आईवडिलांविना वाढलेला सुधीर... नातेवाईकांकडे राहून कसंबसं शिक्षण पूर्ण करत शेवटी ग्रॅज्युएट झाला होता. त्याचे वडील उत्तम बासरी वाजवत. लहानपणी वडिलांच्या हाताखाली शिकत होता तो....पण आईवडील गेले अन त्याची बासरी मुकीच झाली. अकरावी ला असतानाच मित्राबरोबर कुठल्याशा घरगुती मैफिलीत सरांची बासरी ऐकली होती त्यानं. नि झपाटूनच गेला होता तो पार. त्या सुरांचा नि सरांचा पाठपुरावाच केला होता त्यानं मग सतत. सर कुठे नि आपण कुठे याचा विचारही शिवला नव्हता तेव्हा त्याच्या मनाला. आधी सरांनी टाळाटाळ केली होती...पण सुधीरची शिकण्याची दुर्दम्य इच्छा नि संगीताची जाण या दोन्ही गोष्टींनी सरांनाही त्याला विद्यादान द्यायला भाग पाडलं होतं.

अन या चार वर्षात नुसती बासरीच नव्हे तर इतरही अनेक गोष्टी शिकत होता तो सरांकडून..

बासरीवादनाच्या क्षेत्रात सरांचं नाव फार आदरानं घेतल्या जात असे. घरची गडगंज श्रीमंती असूनही तो लक्ष्मीपुत्र सरस्वतीच्या साधनेत अगदी लीन होता. त्यांच्या मैफिली मात्र अगदी निवडक ठिकाणी असत. पैसा कमावणं हा उद्देश कधीच नव्हता त्यांचा. त्यामुळे त्यांच्या कलेला एक आगळंच सौंदर्य होतं...ऐकणारा अगदी पार भावविभोर होऊन जाई त्यांच्या वादनानं...

अशा या अद्वितीय शिक्षकाचं मार्गदर्शन लाभल्याबद्दल सुधीर मनातल्या मनात देवाचे वारंवार आभार मानत असे.

सरांच्या पत्नी...त्यांनाही तो आईच म्हणायचा...आई संधिवातानं हैराण असायच्या. पण रोज सकाळी सुधीरसाठी नाश्ता ठेवायला त्या या चार वर्षात कधीही विसरल्या नव्हत्या. सुधीर दूरच्या नातेवाईकांकडे राहतो...पडेल ते कष्ट करून शिक्षण नि बासरी या दोन्ही आघाड्यांवर जिवापाड झगडतो आहे याची पुरेपूर जाणीव त्यांना होती.
सरांची दोन्ही मुलं परदेशीच स्थायिक झाल्यानं मोठ्या बंगल्यात दोघे एकटेच असत. तेव्हा दर दोन दिवसांआड संध्याकाळी येऊन तो त्यांचं हवंनको पाहत असे, औषधं नि भाजी आणून देत असे. तेव्हाही सुधीर कितीही संकोचला तरी भाजीपोळी खाल्ल्याशिवाय आई त्याला जाऊ देत नसत. स्वैपाक करणार्‍या वत्सलाबाई तर गमतीनं सुधीरला सरांचा तिसरा मुलगाच म्हणायच्या.

सरांच्या ओळखीनंच एका ठिकाणी कारकुनाच्या नोकरीची संधी आली होती. कमी पगाराची का होईना.... नोकरी मिळाली की एक छोटीशी खोली भाड्यानं घ्यायची नि नोकरीचा वेळ वगळता सारा दिवस बासरीवादनात नि साधनेत घालवायचा हे स्वप्न केव्हाचं मनात बाळगलं होतं सुधीरनं...

'संगीत म्हणजे चांदण्याची वेल असते बघ सुधीर...उंचच उंच...आभाळाला भिडणारी.
या वेलीच्या पायथ्याशी बसून अविरत साधना करावी लागते. पण एकदा का या तपश्चर्येला फळ आलं की ही वेल अगदी लडिवाळ होऊन झुकते खाली... नि मग त्या टपटपणार्‍या चांदण्यांच्या वर्षावात अगदी न्हाऊन निघतो आपण..'
सरांनी त्याला एकदा बोलता बोलता सांगितलं होतं.

'ही चांदणवेल प्रसन्न होईल तेव्हा होईल... पण सध्या सरांच्या नि आईंच्या मायेच्या वर्षावात अगदी मनसोक्त न्हाऊन निघतोय आपण...'
हे असे कृतज्ञतेचे विचार नेहमीच सुधीरच्या मनात येत असत.

दुसर्‍या दिवशी मुलाखत झाल्याबरोबरच नेमणुकीचं पत्र हाती पडलं नि अपेक्षेपेक्षा थोडा जास्तच पगारही ठरला तसा आनंदानं वेडावूनच गेला सुधीर. घाईघाईनं सरांचे आवडते कंदी पेढे खरेदी करून तो बंगल्यावर गेला.

पण आजचं वातावरण थोडं वेगळंच वाटलं त्याला. नेहमीप्रमाणे 'आलास सुधीर... जेवायचं झालंच आहे हं' असं म्हणणार्‍या आईंच्या आवाजात रोजचा उत्फुल्लपणा नव्हता. विचारात गढलेले सर झोपाळ्यावर बसून होते. नेहमी त्यांच्या झोपाळ्याची करकरही कशी आश्वासक, प्रेमळ वाटायची सुधीरला. पण आज तो आवाजही थोडा विचित्रच वाटला त्याला.

पेढे देऊन तो दोघांच्याही पाया पडला....तशी सरांनी त्याला आपल्यामागोमाग दिवाणखान्यात यायची खूण केली. मनाशी आश्चर्य करीतच तो त्यांच्याबरोबर गेला. सर कोचावर बसले तसा अदबीनं कोपर्‍यातल्या खुर्चीत बसला.

'मुलाचं पत्र आलंय अमेरिकेहून....आम्ही दोघांनी आता इथे एकटं राहू नये..तिकडेच कायमचं यावं असं वाटतंय दोघांनाही...'

मोठ्या प्रयासानं दोरीला धरून आभाळात उंच उंच चढावं नि ती दोरीच कुणीतरी निर्दयपणे घाव घालून तोडून टाकावी तसं झालं सुधीरला..

हे काय घडतंय्? आज किती आनंदी होतो आपण.. इतक्या वर्षांचं असहाय, परावलंबी जिणं आज झटकून टाकल्या गेलं, आपण आपल्या पायांवर उभे झालो, मुक्त पक्ष्यासारखं आभाळात विहरायचं स्वप्न अखेर साकार झालं... नि या सगळ्या गोष्टींचा शिल्पकार...आपला आधारवड आपल्या आयुष्यातून दूर होणार?'

'नि आपल्या बासरीचं काय होणार पुन्हा? तिच्या नशिबी परत मुकेपणच लिहिलेलं आहे की काय?...'

विजेच्या लोळासारखे हे सारे तप्त विचार सुधीरच्या मनाला जाळत, रखरखीत करत जात होते.

किती भरभरून शिकवलं या चार वर्षात सरांनी... अन या अन्नपूर्णेनंही किती जीव लावला आपल्याला.. या काळात आईबाबांची असलेली पुसटशी आठवणही कधी डोकावून गेली नाही इतकं प्रेम केलं या उभयतांनी... नि आता आपण पुन्हा एकटेच राहणार...'

सरांच्या बोलण्यानं सुधीरची तंद्री भंगली.

'फार कठीण वाटतंय रे सुधीर... या बंगल्यात, या शहरात सारं आयुष्य गेलं आम्हा दोघांचं..आता संध्यासमयी परका देश, परकी जागा... कसे रुजणार आम्ही तिथे? पार एकटेपणा जाणवेल आम्हाला. नि इथले सारे बंध, सार्‍या आठवणी..'

'वय झालं असलं तरी इथे बरंच काही करायचं होतं रे मला.. अजून तुलाही खूप शिकवायचंय.. तुझ्या मैफिलीला हजर राहायचंय..'

बोलता बोलता सर थांबले. सुधीरच्या डोळ्यातल्या पाण्याला त्यांच्या स्वरातली वेदना जाणवली नि मोत्यांची एक लड त्याच्याही पापण्यांना न जुमानता खाली निसटली.
आई मात्र शांत होत्या. नेहमीचा त्यांचा बोलकेपणा सरांकडे आला होता जणू..

सुधीरला आता मात्र तिथे थांबवेनाच. पेढ्यांचा डबा तसाच टेबलावर ठेवून तो उठला नि सरळ बाहेर पडला.

पाय नेतील तिथे भरकटत जात होता तो. डोक्यातलं विचारांचं काहूर काही शांत व्हायचं नाव घेत नव्हतं.

रात्री बराच वेळ तो जागाच होता. मग मात्र त्याच्या विवेकबुद्धीनंच त्याला भानावर

आणलं.

'तसा विचार केला तर सरांनी नि आईंनी मुलांकडे जाणंच ठीक नाही का? आपण जाणूनबुजून परके. त्यांचं रक्ताचं नातं... त्यातून आयुष्याच्या संध्याकाळी मुला नातवंडांमधेच रमायला हवंय त्यांनी. आपल्या स्वार्थासाठी त्यांनी इथे एकटं कशाला रहायला हवं? आपणच समजावायला हवं त्यांना उद्या....म्हणजे हसत हसत, प्रसन्न मनानं जातील ते परदेशात. आपलं बासरीवादन काय.. होईलच कसंतरी. सरांनी या चार वर्षात भरभरून दिलंय आपल्याला...त्या ठेवीच्या आधारावर सुरू ठेवू आपण आपली साधना..'
'अन आत्ता सरांना न आईंना जावंसं वाटत नाहीय ते उभा जन्म इथे घालवलाय म्हणून...पण मुलांच्या सोबतीत राहायला लागले की आपोआपच आनंदी होतील ते...'

हे नि असे कित्येक विचार-त्याच्या उदास मनाला उसनी का होईना उभारी द्यायला लागले तसा दोन दिवसांनी सुधीर आपणहूनच बंगल्यावर गेला.

'ये सुधीर, बरं नव्हतं का रे?..' आईंनी विचारलं खरं... पण त्यांच्या डोळ्यात सारं काही जाणल्याचे भाव होते.
त्यादिवशीची शिकवणी संपल्यावर सरांनी त्याला मुद्दाम बसवून घेतलं.

'सुधीर, आम्ही जायचं नक्की करतोय, पण सहा महिन्यांनी. या सहा महिन्यात तू संध्याकाळी पण यायचंस. संगीताच्या उपासनेला कितीही वेळ दिला तरी अपुराच...पण या सहा महिन्यात मी जमेल ते..जमेल तसं माझ्याकडचं जास्तीत जास्त तुला द्यायचा प्रयत्न करीन. येशील ना?'
'जरूर येईन सर, पण माझ्याकरता...म्हणजे माझ्यासाठी तुम्ही तिकडे जाणं लांबवू नका ..मी काय...'
त्याचं बोलणं सरांनी अर्ध्यावरच थांबवलं.
'नाही रे, तसेही सहा महिने लागतीलच इथली सारी आवरासावर करायला...इतका मोठा व्याप आहे. तर तू येत जा. अन हो, रात्रीचं जेवणही इथेच बरं का..'

अन त्या दिवशीपासून सुधीरचं बासरीवादन पुन्हा जोमानं सुरू झालं. जणू स्वतःजवळचं सोनं लुटून देत होते सर त्याला... नि तोही आवेगानं ते दान पदरात पाडून घेत होता. ते सहा महिने सुधीरसाठी स्वर्गीय आनंदाचे होते. अनुपम आमोदाच्या लाटांवर विहरत होता तो. किती शिकू नि किती नाही असं होऊन जायचं त्याला..
सोबत रात्रीच्या जेवणानंतर हिरवळीवर रंगणार्‍या त्या तिघांच्या गप्पा..त्यात बर्‍याच घरगुती गोष्टीही सांगायचे सर नि आई त्याला..

यथावकाश बंगलाही विकल्या गेला. नवीन मालकाला ताबा मात्र सहा महिन्यांनीच द्यायचं ठरलं होतं.

सरांना परदेशी जायला पंधरा दिवस उरले तशी दोन्ही मुलंही आली. नातवंडांच्या किलबिलीनं बंगला गजबजून गेला. आता सर सुधीरला देवघराचं दार आतून बंद करून तिथे शिकवीत. त्याच्या शिकवणीत खंड पडू न द्यायची पुरेपूर काळजी आई नि ते घेत असत.

अन एक दिवस सुधीर बंगल्याहून रात्री येत नाही तोच शेजारी फोनवर निरोप आला की लगेच बोलावलंय. त्यादिवशी आईंची तब्येत थोडी बरी नव्हती. सर्दी खोकला जास्त झाल्यानं ताप वाढला नि न्युमोनियाची सुरुवात वाटतेय तेव्हा कदाचित दवाखान्यात दाखल करावं लागेल असं डॉक्टर्रांनी सांगितलं होतंच. तेव्हा धावपळ करत सुधीर बंगल्यावर पोचला.

फाटक उघडतानाच त्याला शेजार पाजारचे लोक जमू लागलेले दिसले तसं त्याचं मन चरकलं. नेहमी समोर येणार्‍या आईही व्हरांड्यात दिसल्या नाहीत तसं अशुभाच्या कल्पनेनं त्याचं काळीज थाड थाड उडू लागलं..

पण दिवाणखान्यात येताच त्याला दिसला सरांचा निष्प्राण देह. अगदी शांत झोपल्यासारखा. जणू तासा दीड तासांपूर्वी त्याला निरोप देतानाचं हसू चेहर्‍यावर कायम होतं. अशी 'अखेरची आवरासावर' करून सर अनपेक्षितपणे दूर देशी निघून गेले होते. कधीही परत न येण्यासाठी.

भोवतालचे लोक 'मेजर हार्ट अटॅक.. डॉक्टरला आणायची संधीच मिळाली नाही' वगैरे बोलत होते. त्यात सुधीरला काही रस नव्हता. त्याचं भावविश्व कायमचं उध्वस्त झालं होतं. ते कशानं याला त्याच्या लेखी अर्थच नव्हता.

नंतरचे दहा बारा दिवस सुधीर एखाद्या वाईट स्वप्नासारखंच आयुष्य जगला. आईंचं सांत्वन करायला त्याच्यापाशी शब्द नव्हतेच. मनावर दगड ठेवून तो रोज बंगल्यावर येत असे. त्या वास्तूतल्या सरांच्या आठवणी, त्यांच्याबरोबर घालवलेले ने सोनेरी क्षण सारंकाही त्याच्या मनावर चरे उमटवत होतं आता. बासरी तर फडताळाच्या एका खणात पडून होती. तिला हातही लावावासा वाटत नव्हता त्याला.

आई नि मुलं निघायच्या दोन दिवस आधी सुधीरला एका दुपारी ऑफिसमधे फोन आला तसा मनाशी नवल करतच तो बंगल्यावर गेला.

सरांनी त्यांच्या मृत्युपत्रात त्याच्यासाठी काहीतरी ठेवलंय असं मोठा मुलगा म्हणाला तसा सुधीर आश्चर्यचकितच झाला. मुला सुनांच्या चेहर्‍यावर कुतूहल होतं. एकट्या आई मात्र सारंकाही माहीत असल्यासारख्या..चेहर्‍यावरच्या वेदनेतूनही किंचित हसल्या.
आत जाऊन त्यांनी एक निमुळती पेटी आणून सुधीरच्या हातात दिली.
आतल्या लाल मखमलीच्या कापडावर 'ती' विसावली होती. सरांची बासरी.

नि शेजारीच मोगर्‍याचा सुकलेला गजरा....

एक क्षणभर काळ तिथेच थांबल्याचा भास झाला सुधीरला...

आषाढमेघ बरसून गेला होता. आपल्याजवळचं सारंकाही उधळून, तरीही रिता न होता गेला होता. आपल्या सुरांचा वारसा सोपवून गेला होता.

ती बासरीची पेटी एखाद्या अमूल्य खजिन्यासारखी छातीशी धरून सुधीर उठला. आईंच्या पायाशी वाकला नि वाहणारे डोळे पुसायचे कष्टही न घेता बाहेर पडला.
बंगल्याबाहेर पडताना आज त्याची पावलं जड नव्हती.

चांदणवेलीची फुलं अविरत बरसत होती...बरसतच राहणार होती.

-समाप्त

गुलमोहर: 

सुरेख. आवडली.

काय मस्त फुलवलीय कथा! चांदणवेल. चांदण्यांची फुलं. बासरीचे सूर. व्वा.

शरद

माझी फार पूर्वी लिहिलेली एक कविता आठवली. इलाही जमादार आणि मी एकदा एका गायिकेच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांनी एक गाणं म्हटलं होतं. ते सूर माझ्या मनात कोरल्यासारखे राहून गेले. त्यातून एक कविता झाली.

"मैफल सुरू झाली,
रात्र वितळू लागली,
सूर उमटले,
ह्रदयाची तार झंकारली!
तिने आलाप घेतला
अन् ....

कायेच्या पाशातून मन उडालं!
झुलत बसलं सुरांच्या हिंदोळ्यावर!
शब्द खरे की सूर .......
सूर खरे की झंकारलेलं मन?
सगळंच एकरूप!

तान समेवर आली
तसे मनाला पंख फुटले..
उन्मुक्त आकाशात उडालं!

मैफल संपली,
सूर हरपले,
मन अजून आकाशातच!!"

शरद.

छान कथा, सुमॉ.
शलाकाताईंची कथा वाचतांना सारखी तुमच्या कथांची आठवण येत होती.

धन्स सगळ्यांना..
चिनू, दाद ची नि माझी बरोबरी नाही ग बाई. ती फारच छान लिहिते.
अगदी प्रामाणिकपणे सांगतेय.

सुमॉ, सुर्रेख लिहिलीयेस कथा. सुरांचं आपल्यातलं नांदणं, आपलं होणं, रुजणं, फुलणं... किती सुंदर वेचलयस.
चांदणवेल.. ही कल्पनाच इतकी सुरेल, सुगंधी आहे की... जियो!
खरच, खूप आवडली.

एक मात्रं नाही आवडलं. काय ते कळ्ळंच तुला...
एक सांगते... प्रत्येक कलाकार (हो, आयुष्याचे अर्थं लावीत, ते शब्दांत लिहू बघणारे... कलाकारच) हा आपल्या जागी श्रेष्ठच असतो. त्याची त्याच्याशीच तुलना असते... 'आजचा तो' अन 'उद्याचा अधिक समृद्ध तो' ह्या दोघांच्यात अन त्याच दोघांच्यात.
झकीरभाईंचा एखादा तुकडा ऐकला की मला अनिंदोंची आठवण होते... ही त्यांच्यातली तुलना नाही, सुमॉ. देवाच्या दोन वेगवेगळ्या "करणींची" झालेली आठवण! चिन्नूला झालेली आठवण ही अशीच, हो की नई चिन्ने?

तुझी कथा सुंदरच!

शलाका, रागावू नकोस हं...पण खरंच अगदी मोकळेपणानं लिहिलंय मी ते.
खरंच खूप खूप सुरेख लिहितेस ग तू. तुला माहित्येय का ... तुझ्या सगळ्या गोष्टी, लेख न चुकता वाचते मी...पण अनेकदा प्रतिक्रियाच देत नाही. काय लिहावं हेच कळत नाही. मनाला अगदी पार भिडलेलं असतं तुझं लिखाण.

छान कथा सुमॉ.... तुला शीर्षक पण इतकी सुरेख चपखल सुचतं ना, की ते वाचूनच मनात एक कथा उलगडत जाते.

अशी चांदणवेल मनामनात रूजली तर...........
अप्रतिम कथा.
.................................................
http://kautukaachebol.blogspot.com/

सुरेख कथा सुमॉ!! शब्द, मांडणी सर्व सुंदर आणी चांदणवेलीच्या कल्पनेवर तर मी फिदा!!!
दादच्या प्रतिक्रीयेने पुन्हा पटलं की कलाकार जितका विनम्र तितकाच खर्‍या अर्थाने मोठा Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

मनाला अगदी भिडलेलं लिखाण. मी फिदा च . . . . . .

अप्रतिम चांदणवेल...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कितीक हळवे ,कितीक सुंदर,
किती शहाणे, अपुले अंतर.....

मला पण गोष्ट फार आवडली. मुख्य म्हणजे समजली पण. (संदर्भः बा. रा. चे ए. वे. ए. ठि.)

फारच सुंदर कथा आहे, चांदणवेलीची कल्पना तर फारच आवडली.

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!

खुपच सुरेख कथा...... नेहमी सारखिच हळुवार भावनांना छेडणारि Happy

सुमॉ मस्तच गं.
आणि खरंच तुझ्या आणि दादच्या कथा शैली पूर्ण वेगळी असूनही एकमेकांची आठवण करून देतात.
का असेल बरं असं?
मला वाटतं तुम्ही दोघीही चांगुलपणावर विश्वास असलेली पात्रं उभी करता आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आजच्या जगात (कलयुग चा क्लिशे टाळला तरी तोच इथं चपखल बसतोय) ती खरी आणि कन्विन्सिंग वाटतात वाचणार्‍यांना. (असं असावं)
लिहीत रहा...

'संगीत म्हणजे चांदण्याची वेल असते बघ सुधीर...उंचच उंच...आभाळाला भिडणारी.
या वेलीच्या पायथ्याशी बसून अविरत साधना करावी लागते. पण एकदा का या तपश्चर्येला फळ आलं की ही वेल अगदी लडिवाळ होऊन झुकते खाली... नि मग त्या टपटपणार्‍या चांदण्यांच्या वर्षावात अगदी न्हाऊन निघतो आपण..'>> अहाहा नादमय शब्दांच्या चांदणवेलीमधे अगदी न्हाऊन निघाल्यसारखं वाटतेय... नादमय शब्दरचना आणि सुरेख शब्द्चमत्क्रुतीपुर्ण रुपके ही तर भा. रा. भागवत आणि पु. ल. यांची मक्तेदारी. पण तुम्हालाही खास जमलेय हे...

दाद, दोन कलाकारांची तुलना नाही होऊ शकत कारण प्रत्येक कलाकाराला स्वतःची अशी खास शैली असते (आणि असावी तरच त्याच्या कलेचे वेगळेपण उठून येते) पण तरीही आपल्या गुरूंचा, श्रद्धास्थानाचा, प्रेरणास्थानाचा काहीसा प्रभाव आपल्यावर जाणवतोच ना... आणि त्या प्रेरणास्थानाशी वा महानतेशी आपली बरोबरी केली जावी ही त्या कलेला दिलेली 'दादच' नाही का? आणि हुरूपही मिळतो एवढ्या मोठ्या 'बरोबरी'मुळे... खरं ना?

आषाढमेघ बरसून गेला होता. आपल्याजवळचं सारंकाही उधळून, तरीही रिता न होता गेला होता. आपल्या सुरांचा वारसा सोपवून गेला होता.>> अप्रतिम! आणखी एक उत्कट भावकथा!

सुमॉ मला तुमच्या लेखनांतील उत्कट, हळवे, सहज आणि भावूक नातेसंबंध खुप भावतात (जे हल्ली खुप दुर्मिळ होत चालले आहेत....)

पुढ्च्या कथेची वाट बघतेय... Happy

dreamz_unlimited.jpg

ए मस्त लिहिलंयस सुमॉ. काय हळूवार, नाजुक शब्द! वा!
-----------------------------------
क्या कोई नयी बात नजर आती है मुझमें
आईना मुझे देखके हैरानसा क्यूँ है..

खूपच आवडली. शीर्षक तर फारच.
----------------------
एवढंच ना!

कथा आवडली. पण या कथेला थोडी सांगिक भाषा हवी होती. निदान मारवा पुरिया सारखे, खास बासरीवर खुलणारे राग, त्यांचा मूड. त्या वादनाने होणारे सैरभैर मन. हे सगळे यायला हवे होते.

खुप आवडली कथा.. तुझ्या गोष्टीतल्या कल्पना खुप छान छान असतात , अगदी खाण्याचे - रंगांचे वर्णन पण .. मला लगेच शिरा-लोणचे खावेसे वाटले बघ..

सगळ्यांना मनापासून धन्यवाद..
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर मला संगीतातले फार थोडे समजते. कॉलेजमधे असताना एकदा बाबांनी पं. हरिप्रसाद चौरसियांचे बासरी वादन ऐकायला नेले होते. ते सूर अजूनही मनावर कोरले गेले आहेत.

पण या कथेत मला फक्त गुरुशिष्याचे विलक्षण संबंधच रेखाटायचे होते...

खूपच छान आहे कथा... फारच सुन्दर लिहिली आहे...खूप आवडली. छान...

Pages