कोलाहल

Submitted by vt220 on 24 March, 2016 - 10:38

निसर्गातील कोलाहल

शहरात आपल्या आजूबाजूला प्रचंड कोलाहल सतत चालू असतो. सुदैवाने आपल्याकडे मेंदूच्या रूपाने एक उत्तम चाळणी आहे. मेंदू बरोबर एवढ्या आवाजातून आपल्या आवश्यकतेपुरते ऐकतो आणि बाकीचे आवाज गाळून टाकतो. खरतर आवाज हा आपल्या मेंदूतच उत्पन्न होतो, बाहेर नुसत्याच हवेच्या तरंगलहरी असतात. ह्या हवेच्या लहरी जेव्हा आपल्या कानाच्या पडद्यावर आदळतात तेव्हा मेंदूच्या विविध भागात संवेदनालहरी तयार होतात. पण अजूनही त्या केवळ लहरीच असतात. आपला मेंदू मग ठरवतो की ह्या लहरी मृदू संगीताच्या आहेत, आईची अंगाई आहे, बॉसने केलेली प्रशंसा आहे, खवचट सहकाऱ्याने मारलेला टोमणा आहे, धडधडत अंगावर येणारी गाडी आहे, पाण्याचा खळखळाट आहे, ढगांचा गडगडाट आहे, 'आता चावतो तुला' असल्या पवित्र्यात भूंकत येणारा कुत्रा आहे की पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट आहे. आता पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट ही सुद्धा आपली कवीकल्पनाच हो! म्हणजे लहानपणापासून वाचलेल्या, ऐकलेल्या कथांमध्ये गावाकडले झाडांनी घेरलेले टुमदार घर आणि सकाळ, संध्याकाळी ऐकू येणारा मंजुळ किलबिलाट हेच आपल्याला माहित असते. माझीसुद्धा बरेच वर्षे अशीच कल्पना होती. पण त्यादिवशी संध्याकाळी फेरफटका मारायला गेले आणि माझ्या कल्पनेला थोडासा धक्का बसला.

ह्या वर्षी मी रोज नव्या रस्त्याने फिरायचे ठरवले. गूगलबाबाच्या दृष्टीने अवलोकन करता बोरिवलीतील एलआयसी वसाहतीत बराच हिरवा पट्टा दिसतो, म्हटलं तिथून जावे. त्याप्रमाणे त्या दिवशी करुणा इस्पितळाच्या बाजूने एलआयसी वसाहतीतून जायचे ठरवले. इस्पितळाच्या कोपऱ्यावर जुने मोठ्ठे वृक्ष आहेत. तिथे पोहोचले तर हा एवढा कलकलाट! वृक्ष इतके डेरेदार, दाट आहेत की आवाज नेमक्या कुठल्या पक्षांचा आहे ह्याचा बिलकुल थांगपत्ता लागला नाही. बहुतेक चिमण्या असाव्यात. थोडं पुढे गेले. तोवर जरा जास्त अंधारायला लागलं होतं. एका पर्जन्यवृक्षाजवळ परत कलकलाट ऐकू आला. हा जरा वेगळा होता. मघाचा चिमण्यांचा आरडाओरडा सुसह्य वाटावा असा! वर बघितलं तर शंभरएक वटवाघळं दिवसभराच्या झोपेतून आळस झटकून उठत होती. त्यांच्या आवाजाने उगीच अशुभ वाटले. तशीच पुढे एका गल्लीत शिरले. बोरिवलीचा तो भाग मी पहिल्यांदाच पाहत होते. मस्त जुनाट, भारतीय झाडांची दाटी होती. बैठी घरे बालपणीच्या गोरेगावच्या बैठ्या चाळीतल्या घरांची आठवण करून देत होती. मनाला एक मस्त शांतता वाटत होती. एका वळणावर वळले आणि अचानक शांतता भंग झाली. जणू अख्ख्या बोरीवली, दहिसर, कांदिवलीतले सगळे कावळे रात्रीच्या मुक्कामाला तिथे येत असावेत. मनात एकदम कथांमध्ये वाचलेला पक्षांचा मंजुळ किलबिलाट आला. म्हटलं हा मंजुळ किलबिलाट?!! तिथे राहणाऱ्या लोकांची कीव वाटली.

मग त्याच विचारात पुढली पायपीट सुरु झाली. एकदा सकाळी एका भारदस्त आवाजातल्या भांडणाने लक्ष वेधलेले. ह्या त्या खिडकीतून शोधल्यावर दिसले दोन कोकिळा एकमेकींशी भांडत होत्या. आता तुम्ही म्हणाल कोकिळेचा आवाज ही ह्या बयेला आवडत नाही. अहो तो कोकीळ, त्याचा आवाज मस्त सुरेल असतो. पण ह्या बायांचे भांडण अगदी नळावरच्या भांडणासारखे रंगले होते. मैनाबाईंची कथा मी तुम्हाला मागेच सांगितली होती. त्या सुद्धा अशा मस्त कचाकचा भांडतात. पुढले १०-१५ मिनिटे त्या कोकिळांनी काही सुचू दिले नाही. तुम्ही पुलंचे पाळीव प्राणी ऐकले असेलच?! त्यांनी तो पोपटाचा किरर्र आवाज काढलाय नं! अगदी हुबेहूब!! अवघे दोन किवा तीन पोपट संध्याकाळी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर नाचत असतात, पण बरोबरीने त्यांचे ते वेगवेगळ्या सुरात, पट्टीत किरर्र चाललेले असते. एखादे वेळेस अचानक जोरजोरात कलकलाट खिडकीवरून गेला तर समजावे, पोपटांचा थवा उडत गेला असणार. दुपारच्या शांत वातावरणात झोप उडवायला हमखास चकचक करत खारूताई येतील. इतकं अखंड चकचक करण्यामागे त्यांचा काय प्रॉब्लेम असतो कोण जाणे?! त्यावेळेस झोपमोड झाल्यावर त्यांच्या गोंडस रुपाची बिलकुल भुरळ पडत नाही उलट रागच येतो! मागे अमेरिकेत एक नवा अनुभब घेतलेला. तिकडे एक सिकाडा म्हणून किडा असतो. त्यांची पिल्लावळ वर्षानुवर्षे जमिनीखाली वाढत राहते. आणि मग एके वर्षी सगळे सिकाडा एकाच वेळेस जमिनीतून बाहेर येतात आणि झाडांवर चढतात. मग त्यांचे प्रणयाराधन सुरु होते. मादीला आकर्षित करण्यासाठी आपल्या पंखांनी ते एक विशिष्ट आवाज काढतात. कापूसकोंड्याची धनुकली जर न थांबता सतत वाजवत राहिलो तर कसा टणत्कार येईल तसा काहीसा त्यांचा आवाज असतो. आणि हा आवाज लाखो किड्यांकडून एकाच वेळेस होत असतो. अश्या वेळेस घराबाहेर पाच मिनिटे थांबणे देखील अशक्य वाटते. अगदी घरी आल्यावर पण काही क्षण कानात तो आवाज घुमत राहतो.

सध्या आमच्या समोरच्या इमारतीमध्ये गव्हाणी घुबडाची जोडी येते. त्यांना बघायला आवडतं पण कधी रात्री त्यांचा ओरडण्याचा आवाज येतो तेव्हा भीती वाटते. इंग्लिशमध्ये त्यांना स्क्रीचींग आउल म्हणजे ओरडणारे घुबड म्हटले जाते. खराब खडूने फळ्यावर रेघाटल्यावर जसा कर्कश आवाज होतो तसा त्यांचा आवाज असतो. त्यांचा म्हणे प्रणय चाललेला असतो, पण आमच्या झोपेचं खोबरं होतं त्याचं काय? रात्रीच्या आवाजांचे एक वेगळेच विश्व असते. गावाकडे रातकिडे, पाणी जवळपास असल्यास टिटव्या, घुबडाचे घुत्कार, वटवाघळांचे चकचक, पावसाळ्यात बेडकांचे डरावडराव! इतके वैविध्य! बऱ्याच वेळा अपरात्री कधी जाग येते आणि दूर कुठल्यातरी सोसायटीत कुत्र्यांची टोळी जोरजोरात भूंकत असते. कुणा चोरावरती भुंकत असते की त्यांच्यात आपापसात भांडण चाललेलं असतं, कोण जाणे? ते घुबड बरं असा त्या कुत्र्यांचा आवाज रात्रीच्या शांततेत घुमत राहतो. दिडेक किलोमीटर लांबच्या चाळीतल्या कुत्र्यांचा आवाज इतका भयाण वाटत असेल तर ज्यांच्या घराच्या जवळ ते भूंकत असतील त्या लोकांची काय वाट लागत असेल!

हे सगळे वेगवेगळ्या प्राण्यापक्षांचे आवाज आहेत. गावी किंवा जंगलात ह्याहून जास्त अनुभव येत असतील. पण निसर्गात फक्त प्राणी, पक्षीच आवाज नाही करत, तर पंचमहाभूते सुद्धा आपले अस्तित्व दाखवत असतात. पावसाळ्यातला ढगांचा गडगडाट, पुराने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा रौद्र आवाज, वणव्यात कडकड जळणाऱ्या झाडांचा आवाज, खिडकीतल्या पोकळीतून भणभणणाऱ्या वाऱ्याचा आवाज, वादळवाऱ्यात समुद्रात सापडलेल्या बोटीला झोडून काढणाऱ्या लाटांचा आवाज असे कितीक भयकारी, कानठळ्या बसवणारे आवाज निसर्गात अनुभवायला मिळतील. भूकंप होतो किवा ज्वालामुखी फुटतो तेव्हा देखील जीवाचा थरकाप उडवणारे आवाज होतात म्हणे. सुदैवाने असले आवाज ऐकणे आजवर कधी नशिबी आले नाही. नच येवो! कुणाच्याही!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय! या आवाजांचा त्रास ज्यांनी भोगलाय त्यांनाच कळेल. मांजरी भान्ड्तात तोही आवाज कधीकधी सहन होत नाही.

धन्यवाद अन्जुटी! हो आता तुम्ही आठवण करुन दिलेत... काही आवाज अगदि भितीदायक असतात. मांजरांचे भांडणाचे आवाज त्यातलेच!!