सिग्नल

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 16 March, 2016 - 05:54

सिग्नल

सुट्टीचा दिवस. रविवारची संध्याकाळ काकांच्या घरी जायला मिळणार म्हणजे सुसाट हाय वे वरची गाड्यांची धावती रेस पाहायला मिळणार म्हणून दोघींची स्वारी खूप खुशीत होती. अस हे नेहमीचच. त्यातच आज त्या दोघींनी ठरवलं होतच... त्या सिग्नलवर ती खेळण्यातल बदक विकणारी असेल तर आज त्या ते विकत घ्यायलाच लावणार होत्या. अर्थात आई-बाबा त्यापासून अनभिज्ञ. फक्त मागच्या वेळेस दोघींनी हट्ट धरला होता आणि आपण तो धुडकावून लावला होता, आणि तिथेच तो विषय संपला होता... पण फक्त आईच्या दृष्टीने... मुलींनी मात्र आपली हार लक्षात ठेवली होती. फक्त त्या वाट पाहत होत्या संधीची.. त्या सिग्नलवर त्यांची गाडी काही मिनिटे तरी उभी राहण्याची आणि त्या मुलीच्या उपस्तिथीची.

गाडीत बसल्या पासूनच त्या दोघींची बडबड चालू होती पण हळू आवाजात.. आईने प्रश्न केलाच,
आई- काय शिजतंय? कसली धुसफूस ?

मोठी- काही नाही.

छोटी- आम्हाला "डक" हवाय.. सिग्नलवरच्या त्या मुलीकडून. (मोठीने "कशाला सांगितलास?" म्हणून डोळे वटारले आणि लहानगीने, "मग त्यात काय एवढ" म्हणून उत्तर दिल..."कळेल" अशा अर्थाने तिने बघितलं)

आई- मागच्या वेळेस झालंय त्यावर बोलून... नाही घेणार तसलं काहीही. तुम्ही मोठ्या झाल्या आहात. चावीवाल्या बदकाने खेळण्या एवढ्या लहान राहिल्या नाहीत. उगाच नुसता कचरा वाढवायचा... टॉय म्हणे.. शाळा, टी.व्ही., सायकल.. जरा तरी वेळ आहे का त्या खेळण्यांशी खेळायला..? अजिबात घेणार नाही. अभ्यासाच्या नावाने शंख..................... (तिची बडबड चालू झाली......) मोठीने "बघ..म्हणून नव्हत सांगायचं " अशा अर्थाने लहान बहिणीकडे बघितलं.. आता आपला मुद्दा कधी बोलायचा ? ह्या विचारांत असताना त्यांच्या आईने, "काय हो?" अस म्हणत सारथी कडे पाहिलं.. तो बापुडा, "घे ना... जाऊ देत... मागे पण म्हणत होत्याच न त्या.. त्यांची हौस म्हणून" आणि पुढे काही बोलणार इतक्यात आईच उत्तरली, "तुम्हाला काही कळत नाही मला आवरावा लागतो पसारा ..." (मग मला कशाला विचारलस..? अस त्या पामराला विचारायचं होत पण तो निमूट बसला...नवरा आणि बाप या दोन्ही भूमिका बजावताना त्याने गप्प राहणंच हिताचं हे गृहीत धरल होत.)

छोटी- आई खूप क्युट आहे ग ते..

आई- असुदेत. नाही घेणार.

मोठी- आई ... पण का? आम्ही नाही करणार पसारा ...

छोटी- हो..हो... ताई आवरेल पसारा .. घे ना ग..

आई- नाही ..नो ..

त्या तिघींचा वाद चालूच होता आणि तितक्यात तो सिग्नल जवळ आला. ती मुलगी पण होती हातात छोटाल्ले चावीचे बदक घेऊन.. ती दिसली आणि शेवटी मोठीने आई विरुद्ध वज्रास्त्र काढल ...

मोठी- आई ती मुलगी बघ ना.. किती गरीब आहे.. तूच शिकवलं आहेस न.. हि मुल अशी मेहनत करून शिकतात, त्यांच्या घरी सगळ्यांना कामात मदत करतात. त्यांच्यावर खूप रीस्पोनसिबिलीटी (जबाबदारी) असते.. मग आपण ते टॉय घेऊन तिला थोडी मदत करूयात ना...प्लीज.. आणि तो फेसबुक वर असाच एक फोटो आपण लाइक पण केला होता ना? मग आज ते “ खरच ” लाइक होईल ना?.. घेऊयात न ग.. प्लीज.

क्षण……….. अगदी एक क्षण आई गांगरली. फेसबुक वरच लाइक खरं होईल आणि एका गरीब मुलीला मदत होईल हा एवढा(च) उद्दात्त हेतू होता .. माझ्या इवल्याशा पिल्लांचा.. ? तिने वेळ न दवडता त्या खेळण्याची किंमत विचारली... " तीस का है ... बीस में ले लो.." त्या आईला त्या मुलीशी बार्गेनिंग करावीशी वाटलीच नाही... मॉल मध्ये कुठे कमी करता येतात किमती? "और एक दो..." नवऱ्यानेपण काहीतरी ठरवलं. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या आई बापांना जास्त सुखावह वाटला.. कारण.... दोघी मुली एकत्रच उद्गारल्या होत्या... " थ्यांक यु सो मच .... " आणि ती; तिसरी... म्हणाली होती... "शुक्रिया साब.. शुक्रिया" ती मुलगी दुसऱ्या गाडीकडे वळली होती आणि इथे पुढचं संभाषण चालू झाल..

छोटी - ताई .. एकंच द्यायचं कि दोन्ही?

मोठी - आता दोन आहेत तर दोघी एक एक देऊयात ...

आई - कोणाला काय देणार आहात आत्ता ?

छोटी - हे डक..आपल्या बाजूच्या बिल्डींगच काम चालू आहे, तिथल्या त्या उघड्या बाळाला खेळायला... आम्ही केव्हा खेळणार या की वाल्या टॉय शी? वेळ कुठाय .. ? अस म्हणत दोघी हसायला लागल्या.

सिग्नल केव्हाच लागला होता आणि गाडीने हाय वे वर वेग पकडला होता.. दोघी धावत्या गाड्यांची गम्मत पाहत केव्हाच हरवल्या होत्या त्यांच्या जगात... सारथी त्याच काम बजावत होता आणि ती धन्य झालेली माउली विचारांत हरवली होती... लहान मुलं... जगण्यातला जिवंतपणा कायम जपतात आणि आपल्यालाही जपायला लावतात. किती ते स्वच्छ - निर्मळ मन, जागृत संवेदनशीलता.. आणि अखळ निरागसपणा.. आपणही असेच होतो ना..? मग आता मोठे झालो तर कुठे गेल ते सगळ... ते निरागस मन ... कुठे गेलय ? आहे इथेच; फक्त लपून बसलय.. या 'दुनियादारी'ला घाबरून....

………. मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

मस्त Happy