खंड्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 March, 2016 - 03:47

आमच्या घराच्या परिसराभोवती असलेली झाडी व पावसाळी सुरू झालेला छोटा ओढा हिवाळ्यापर्यंत सजीव असल्याने आमच्या परिसरात अनेक पक्षी भक्ष्यांच्या, वसाहतीच्या आधारासाठी येतात. त्यातच वेगळे रूप, टोकदार लांब चोच आणि विशिष्ट निळा रंग ह्यामुळे खंड्या पक्षी लक्ष वेधून घेतो. त्याचा किर्रर्र असा गर्जना करणारा आवाज त्याच्या अस्तित्वाची दिशा क्षणात दाखवून देते.

आमच्या घराच्या मागच्या बाजूला मोठे ऐनाचे व करंजाचे झाड आहे. सकाळी खंड्या नेहमी करंजाच्या झाडाच्या एका फांदीवर बसलेला असतो. रोज तिच फांदी आणि तिच जागा ह्याच मला आश्चर्य वाटायचं. नंतर अंदाज लावला तो त्यावेळी येणार ऊन अंगावर घ्यायसाठी येत असावा. नंतर थोड्या वेळाने इकडे बघ, तिकडे बघ करत तो आजूबाजूच्या झाडांवर जातो. ह्यावेळी आपले भक्ष्य शोधत असतो. इंग्लिशमध्ये ह्याला किंगफिशर म्हणतात त्या नावाला जागून हा पक्षी पाणी असलेल्या जागांवर दिसतोच. पाण्यातले मासे, किडे ह्याचे खाद्य ठरलेले आहेच. जेव्हा ओढ्यात पाणी असते तेव्हा ओढ्यालगतच्या झाडावर हा गळ लावूनच जणू बसलेला असतो. भक्ष दिसताच पटकन डुबकी मारून मासा काढून पसार होतो. आमच्या ओढ्यातले पाणी संपले तरी खंड्याची रोज फेरी असतेच झाडावर. आमच्या घराभोवतालच्या इतर झाडांवरही हा मुक्त विहार करत असतो. कदाचित इतर झाडांवरच्या कीटकांच्या शोध घेत असेल. एक दिवस तर त्याची चोच मोठे भक्ष्य पकडून जास्त फाकलेली दिसली. लगेच कॅमेरा झूम करून पाहते तर साहेबांनी खेकडा पकडला होता चोचीत. त्याचे नांगे वगैरेही तोडलेले दिसले. ह्यावरून अगदी पटाईत मासेखाऊ आहे हे सांगायलाच नको.

१)

२)

रोजच त्याला मी दिसते त्यामुळे मला न घाबरता वेगवेगळ्या पोझ मध्ये हा मला फोटो काढून देतो. फोटो काढताना त्याच्या चेहर्‍यावर अनेक हावभाव निरखायला मिळतात. कधी करूण, कधी शोधक नजर असते, कधी क्रोधित तर कधी आनंदी. शेवटी पक्षांनाही असतातच ना भावना.

३) इकडे पण काही दिसत नाही

४) आज उपवास घडतोय की काय?

५) मला इथे भक्ष मिळत नाही आणि हिला फोटो काढायचे सुचतायत.

६) तिकडे काहीतरी दिसतय.

७) नाही काढून घ्यायचा मला फोटो.

८) घे बाई घे किती काढतेस ते काढ फोटो.

९) किती वेळ पोझ देत बसुन राहू? उन खातोय तो पर्यंत घे काढून.

१०) ए हे काय आहे वर??

११) वेलीचा पदर कसा छान दिसतोय बघ मला.

१२) पाण्यात काहीतरी हलतय.

१३) कोणता मासा असेल?

१४) टाटा.

(वरील लिखाण व दोन फोटो महाराष्ट्र टाईम्स च्या ठाणे पुरवणीत ११ मार्च २०१६ रोजी प्रकाशीत झाले आहेत.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्त फोटो जागु Happy
तर साहेबांनी खेकडा पकडला होता चोचीत. त्याचे नांगे वगैरेही तोडलेले दिसले. ह्यावरून अगदी पटाईत मासेखाऊ आहे हे सांगायलाच नको.>>>>>>अजुनही काही खंड्याज/खंडीज उरणच्या अंगणात आलेले ना. त्यांनीही खेकड्याची नांगी वगैरे तोडलेली Proud

माधव, श्री, टण्या Proud

क्युट फोटो. कलरफुल.

चार वर्षापुर्वी एकदाच मला हा आमच्या मागच्या झाडावर दिसला होता, मला नावही माहीती नव्हतं. फार मस्त वाटलं तेव्हा. नंतर परत कधीच दिसला नाही.

छानच ग. तुझे सगळे फोटो माझ्या लहानपणी कोकणात घालवलेल्या सुट्ट्यांची आठवण करून देतात. अजून कोकणात घर आहे पण दर सुट्टीत जाणं होत नाही.

इंद्रा, कृष्णा, भाऊ, दिनेशदा, प्रज्ञा, टण्या, अन्जु, असामी, आर्च, निरू, सशल, मॅगी धन्यवाद.

जिप्स्या, खंड्याज्/खंडीज Lol

जागु किती सुर्रेख टिपलायेस खंड्या आणी त्याचे हावभाव.. तुला पक्ष्यांची भाषा कळते ना खरंच?? Happy

कॅप्शन्स तर एकदम अ‍ॅप्ट!!!!!!!!!!
माधव टिप्पणी छानै.. Happy
जिप्स्या... Lol

Pages