ऑस्कर विजेत्या लिओनार्डोचे भाषण.....

Submitted by अशोक. on 8 March, 2016 - 18:56

LeoOscar1.jpg

यंदाच्या ऑस्कर पारितोषिक वितरण समारंभात जगभरातील सिनेरसिकांना लिओनार्डो डी कॅप्रियो या अत्यंत गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्याला चारपाच वेळी हुलकावणी दिलेले "सर्वोत्कृष्ट अभिनेता" अखेरीस मिळाले. मागील वर्षी ज्युलियाना मूर या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले होते. परंपरेनुसार ती स्टेजवर आली आणि ज्या पाच अभिनेत्यांना ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते त्यांची नावे आणि त्यांच्या संदर्भीय चित्रपटातील त्यांच्या कामाची झलक दाखविण्यात आली. लिओनार्डोच्या भूमिकेने नटलेल्या "रेव्हेनंट" या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची झलक दाखवित असताना जगातील अनेक सिनेशौकिनांनुसार मलाही यंदा मिळावे या अभिनेत्याला ऑस्करची ती लखलखणारी बाहुली हेच वाटू लागले. एक क्षण थांबून ज्युलियाना मूर हिने "....अ‍ॅन्ड ऑस्कर गोज टु....लिओनार्डो डी कॅप्रियो" असे आनंदाने जाहीर केल्यावर लॉस एन्जल्सस्थित डोल्बी थिएटर इथे अतिथी आणि हॉलीवूडशी संबंधित असलेल्या सर्व घटकांनी उत्स्फुर्तपणे उभे राहून टाळ्यांच्या गजरात लिओनार्डो डी कॅप्रियोचा यथोचित गौरव केला...त्या आनंदात लिओ स्टेजवर आला आणि साहजिकच अत्यंत आनंदाने त्याने "ऑस्कर" स्वीकारले. स्वीकृतीनंतर विजेत्याने दोन मिनिटे आभारातून मनोगत व्यक्त कराण्याचा प्रघात आहे. या प्रसंगी लिओनार्डो काय बोलेल याची उत्सुकता थिएटरमधील तसेच जगभर तो प्रत्यक्ष कार्यक्रम टीव्हीवरून पाहाणार्‍या त्याच्या चाहत्यांनाही होती. लिओनार्डो डी कॅप्रियो याने या प्रसंगी जे भाषण केले त्याबद्दलही त्याचे सर्वच माध्यमातून जगभर कौतुक झाले आहे. आपल्या सदस्यांसाठी हे भाषण मराठीतून मी द्यावे अशी विनंती मला येथील दोन-तीन स्नेही सदस्यांनी केली....ती मलाही आवडली. लिओनार्डोच्या भाषणाचा हा स्वैर अनुवाद :

".... आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. ऑस्कर अ‍ॅकेडमी आणि या थिएटरमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. या वर्षी पुरस्काराचे मानांकन मिळालेल्या इतर सर्व गुणी कर्तबगार अभिनेत्यांचेही अभिनंदन करीत आहे. 'रेव्हेनंट' या चित्रपटाची निर्मिती म्हणजे एक अविश्वसनीय असाच उपक्रम होता आणि तो निर्माण करण्यासाठी त्यात गुंतलेले कलाकार, तंत्रज्ञ व अन्य कारागीर यांच्या अथक परिश्रमाचे ते फलित होय. सर्वप्रथम मी नाव घेतो ते चित्रपटातील एक कलाकार टॉम हार्डीचे, तू माझा बंधू आहेस टॉम. तुझी गुणवत्ता अचाटच आहे आणि चित्रपटाबाहेर तुझ्याशी असलेली माझी मैत्री याला मी महत्त्व देत आहे. चित्रनिर्मितीच्या माध्यमातून मित्रसंबंधाचा एक वेगळाच अनुभव तयार करण्याबद्दल धन्यवाद. फॉक्स निर्मिती घटक आणि न्यू रिजन्सी इथे काम करीत असलेल्या सर्वांचे आभार. चित्रपट क्षेत्रात मी आल्यापासून आजपर्यंत ज्यानी ज्यानी मला प्रोत्साहन दिले, मदत केली त्या सर्वांचे आभार मी या क्षणी मानत आहे. माझे आईवडील, ज्यांच्याशिवाय मी इथंपर्यंत येऊच शकलो नसतो, त्यांचेही आभार. सर्व मित्रांनो मला तुमच्याविषयी विलक्षण अशी आत्मियता वाटते, तुम्ही जाणताच की तुम्ही कोण आहात...आभारी आहे.

या क्षणी मी इतकेच विचार प्रकट करू इच्छितो की, 'रेव्हनंट" ची निर्मिती म्हणजे मानवाची निसर्गदुनियेसोबत असलेल्या नात्याची कहाणी होय. त्या दरम्यान एकत्रितरित्या विचार करता असे निदर्शनास आले आहे की २०१५ हे साल मानवी इतिहासाच्या नोंदीतील सर्वाधिक तप्त वर्ष ठरले आहे. आमच्या निर्मिती व्यवस्थापनाला आपल्या ग्रहाच्या अगदी दक्षिण टोकाला जाऊन कथानकासाठी आवश्यक असलेल्या बर्फाचा शोध घ्यावा लागला. हवामानातील हा नजरेला जाणवलेला बदल म्हणजे एक प्रखर वास्तव असून तमाम मानवजातीला ते स्वीकारणे अपरिहार्य आहे. सद्य परिस्थितीतील हा बदल मानव प्रजातीसमोरचा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. ही समस्या पृथ्वीवर असलेल्या सर्व प्राणीजगतासाठी धोकादायक ठरू शकते. यावर उपाय काढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितरित्या येऊन प्रयत्न केले पाहिजेत आणि यामध्ये विलंब होता कामा नये. जगातील सर्व नेतेमंडळीना या संदर्भातील कार्यासाठी आपण पुढे येऊन पाठिंबा द्यायला हवा. मानवी कल्याणासाठी झटणारी, देशीय लोकांच्या हितांचे रक्षण करणारी, विविध कारणांनी जीवनातील अनेक आवश्यक बाबींपासून वंचीत असलेल्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारी नेतेमंडळी असायला हवीत. आपली मुले, त्या मुलांची मुले यांच्यासाठीही तसेच अशा कार्यकर्त्यांसाठीही पाठिंब्याचे कार्य होणे गरजेचे आहे जे अथकपणे कार्यरत आहेत पण अधाशी राजकारणामुळे त्यांचा आवाज दबला जातो आहे, तसे होऊ नये म्हणूनही प्रयत्न होणे आवश्यक आहे.

... अशी विलोभनीय रात्र आणि पारितोषिक प्रदान कार्यक्रमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. शेवटी इतकेच म्हणतो की आपण सर्वांनी हा ग्रह आपणाला असाच प्रदान करण्यात आला आहे असे गृहीत धरायला नको. मी स्वतःही आजची रात्र मला प्रदान केली आहे असे गृहीत धरत नाही. धन्यवाद....."

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा, मस्त झाला आहे हा स्वैरानुवाद !!
लिओ छान च बोलला त्या दिवशी. धन्यवाद इथे त्याच्या भाषणाचा मराठी तर्जुमा दिल्याबद्दल. खरे तर इतके वर्ष हुलकावणी दिल्यानंतर ऑस्कर मिळाल्यानंतर एखाद्या माणसाने फार पाल्हाळ लावले असते, पण तो अतिशय मुद्देसुद बोलला.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. मलाही लिओनार्डोने अगदी उत्स्फुर्तपणे केलेले ते भाषण आवडले होतेस. शिवाय आपल्या खाजगी जीवनात तो अनेक पर्यावरणाविषयी जागरूक असून या क्षेत्रात काम करत असलेल्या संबंधित संस्था आणि कार्यकर्त्यांना त्या अक्षरशः कोट्यावधी रुपयांचा देणग्या (या संदर्भातील कार्यास) दिल्याचेही माहीत होते.

प्रसन्न..... ऑस्कर समितीने विजेत्यांने स्वीकृतीच्या वेळी किती वेळेपर्यंत भाषण केले पाहिजे याबाबत नियम केले आहेतच. ४५ सेकंद इतकीच मर्यादा आहे. ती वेळ संपली की त्याच्या शेजारीच असलेल्य ध्वनीवर्धकावरून एक सूचक संगीत लावले जाते, त्यावरून भाषण करणारा कलाकार वा तंत्रज्ञ "वेळ संपली" हे जाणतो. त्यातूनही एखाद्याने रेटून पुढे भाषण चालू ठेवले तर प्रथम टेलीप्रॉम्प्टरवरून संदेश झळकतो आणि दुस-या क्षणी मायक्रोफोन कट केला जातो. सहसा सारेच हे नियम कटाक्षाने पाळतात.

अशोककाका,
छान लिहीलेत.धन्यवाद!

४५ सेकंदात भाषण संपवणे ही अगदी नविन माहिती आहे.

टण्या....

~ जो पेसीने ऑस्कर स्वीकृती संदर्भात केलेले भाषण (ऑस्कर १९९१) हे नित्याच्या परंपरेतील भाषण नसून ते एक ओळीची "It's my privilege. Thank you" पावती होती हे मान्य. त्यावर नंतर बर्‍याच वेळा (अर्थात साहजिकच) विविध माध्यमातून संदर्भीय चर्चा झडणे साहजिकच होते. ज्या चित्रपटातील भूमिकेबद्दल [गुडफेलाज] त्याला सहाय्यक अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले ती भूमिका होती टॉमी डीव्हिटो ह्या गँगस्टरची, ज्यासाठी अत्यंत शिवीगाळ आणि भडक तसेच विद्रुप भाषेचा त्याने सढळ असा वापर केला होता. चित्रपटच्या त्यावेळेच्या परीक्षणात त्याबद्दल विरोधात टिपण्याही भरपूर येत राहिल्या; पण चित्रपट गाजला. ऑस्करच्या रात्री जर जो ला तो सन्मान मिळाला तर त्याच्याकडून उत्तरादाखल होणार्‍या भाषणात टॉमी डीव्हिटोचीच भाषा वापरेल की काय असे बर्‍याच जणांना भीतीही वाटत होती. हे सर्व टाळण्यासाठी जो ने सुटकेचा मार्ग शोधला. दोन सेकंदाच्या वाक्यात विषय बंद करून टाकला.

१९८३ सालचा ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या कलाकाराच्या भाषणाची लिन्क देत आहे.
त्याने ज्यांची भुमिका केली त्या व्यक्तीबद्दल एखादे वाक्य तरी बोलायला हवे होते असे मला वाटते.

https://www.youtube.com/watch?v=Za3ezKDyats

छान लिहीले आहे ..

जो पेशी ची लिंकही इंटरेस्टींग आणि अशोक ह्यांनीं दिलेली बॅकग्राउंड ही इंटरेस्टींग .. Happy

महेश....

~ मी अनेक कलाकार, तंत्रविभागाकडील लोक तसेच दिग्दर्शक, निर्माते यांची ऑस्कर संदर्भातील भाषणे ऐकली आहेत. दिलेल्या वेळेत ते साकारलेल्या भूमिकेबद्दल बोलले पाहिजे असे जरी आपल्याला वाटत असेल तर प्रामुख्याने ती वेळ ती भूमिका साकारण्यासाठी ज्यानी ज्यानी त्याना मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात व्यतीत करावी असाच उद्देश्य असतो. ही काही सक्ती नसते. तरीही भाषणांचे रुपडे असेच राहिले आहे. त्यातही बेन किंग्जले यांच्या जोडीला नामांकन मिळालेले जे दिग्गज होते....पॉल न्यूमन, जॅक लेमन, डस्टिन हॉफमन आणि सर्वात महत्त्वाचे आणि उपस्थितांचे जणू लाडके - पीटर ओ'टूल....(ही नावे वाचतानाच यांचा अत्युच्च दर्जा लक्षात येतो)... त्यांचा उल्लेख बेन किंग्जले यानी केला....शेवटच्या वाक्यात "शांती" साठी असे म्हटले...मला वाटते इतके पुरेसे असावे.

अशोक,
जो पेसीच्या या भाषणामागची कथा तुम्ही वाचली आहे त्याचा संदर्भ देऊ शकाल का? मलाही माहिती नव्हते याबद्दल व असे वाचण्यातही आले नव्हते आजवर. हा चित्रपट आवडीचा असल्याने याबद्दल जे मिळेल ते वाचत/पाहत असतो.

@ महेश,
बेन किंग्ज्ले यांनी विजन, करेज व पीस हे तीन शब्दात गांधीजींची भुमिका अधोरेखीत केली आहे असे मला वाटते.

टण्या...

~ तुमच्या आवडीच्या यादीत "गुडफ़ेल्लज" आहे हे वाचून मला आनंद झाला. मूळात मार्टिन स्कोरसेसचा मी अगदी "टॅक्सी ड्रायव्हर" पासून चाहता आहे....त्याबरोबरच त्याच्यासोबत काम करणार्‍या कलाकारांविषयीही मिळेत तितके वाचतही असतो. गुडफेलाज तर गॅन्गस्टर मूव्ही....यातील मुख्य कलाकारांसोबत काम करणारे त्यांचे जे साथीदार त्याने निवडले होते ते चक्क गुन्हेगारीबद्दल शिक्षा भोगलेले लोक होते. त्यांच्यासमवेत जो पेसी आणि रॉय लोयेटा याना दिवस काढावे लागले. प्रत्यक्षात चाळीशीला आलेल्या जो पेसीच्या एरव्हीची भाषाही भडकच असते म्हणून तर "होम अलोक" सारख्या कौटुंबिक पातळीवर स्वच्छ शुद्ध भाषेवर आधारीत चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी त्याला इतरांसमवेत वावरताना जिभेवर ताबा ठेवण्याचीही सूचना मिळाली होती. त्या संदर्भातील "होम अलोन" च्या पानावर तुम्हाला एक टिपणी मिळेल....त्याची कॉपी इथे मी देत आहे...

Columbus was flabbergasted that Pesci, a tough guy actor who regularly appeared in Martin Scorsese movies like ‘Raging Bull’ and ‘Goodfellas,’ signed on as the slightly smarter burglar after being sent a copy of the script. Unfortunately, Pesci wasn’t used to acting in family movies. Columbus wanted his cast to improvise as much as they could, but Pesci often had a hard time controlling his language during some of his angrier scenes. Columbus suggested that Pesci use the word “fridge” in place of a certain other F-word to avoid having so many reshoots.

गुडेफेलाजमध्ये तर अशा बहिष्कृत शब्दांचा सढळ वापर केला गेला आहे हे तुम्हालाही माहीत आहेच. त्याबद्दलची ही नोंद :

Among the many things Goodfellas has become famous for over the past quarter-century is its liberal use of the word "f**k." In all, the expletive and its many colorful derivatives are used 300 times, making it the 12th most f-bomb laden film ever released. The script only called for the word to be used 70 times, but much of the dialogue was improvised during shooting, where the expletives piled up. Roughly half of them ended up being spoken by Joe Pesci as Tommy DeVito.

जो पेसीची ही नित्य जीवनातील सवयच बनून गेली होती....त्यामुळे त्याच्या स्नेहपरिवाराला काळजी पडली होती की कोणत्याही पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्यावेळीही हा वाघोबा अशीच भाषा वापरेल की काय ? त्यांची भीती अस्थानी नव्हतीच. यावर तोडगा म्हणूनच की काय जो पेसीने ऑस्कर स्वीकारताना ते दोन सेकंदातच आटोपले असावे असे मानण्यास जागा आहे.

जो पेसीची AFI मधली डी निरो आणि स्कोर्ससीच्या कार्यक्रमातील भाषणे ऐकली तर पेसी शिवीगाळ न करता बोलू शकतो असे दिसते. एखादी भूमिका वठवताना होणारी शिवीगाळ अन प्रत्यक्ष आयुष्यात त्या कलाकाराची भाषा यात भरपूर फरक असू शकतो

ऑस्कर स्विकारतानाचे त्याचे भाषण हे i don't give more importance than this या प्रकारातले वाटते आणि म्हणून मला ते वेगळे अन मस्त वाटले.

माझे याबाबतीतील मत असे की, "ऑस्कर" हा एक बहुमान आहे जो मिळण्यासाठी प्रत्येक कलाकाराची आणि प्रत्येक तंत्रज्ञाची मनस्वी इच्छा असते...ते छानही आहेच ना. रिचर्ड बर्टन, पीटर ओ'टूल यांच्यासारख्या गुणी कलाकारांना त्यापासून वंचीत राहावे लागले हा तर इतिहास आहे...अगदी पाचसहा नामांकने मिळूनसुद्धा. कदाचित त्यामुळेही ऑस्करच्या बाहुलीचे जास्तच आकर्षण....आणि ते जेव्हा मिळते त्यावेळी दिलेल्या वेळेत त्यापर्यंतच्या प्रवासापर्यंत तुम्हाला कुणाचे सहकार्य लाभले, प्रोत्साहन मिळाले, आशीर्वाद मिळाले....याचा उल्लेख करावा अशी अपेक्षा असते जी रास्तच आहे. शिवाय तुम्ही ते भाषण करीत असताना हॉलमधील उपस्थितांना जितकी उत्सुकता असते तितकीच जगभरातील तुमच्या करोडो चाहत्यांनादेखील....

कलाकारांनी चाहत्यांचे असे प्रेम मिळविणे रास्तच आहे. एका ओळीचे ते भाषण चांगले, वाईट, बरोबर का चुकीचे हा मुद्दा नाहीच....केवळ या निमित्ताने विषयाबाबत चर्चा होत राहते इतकेच.

ज्युली अ‍ॅन्ड्र्यूजची आठवण होते इथे मला या निमित्ताने. गेल्यावर्षी तिच्या "साऊंड ऑफ म्युझिक" ला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ऑस्कर कमिटीने तिच्यासाठी खास लेडी गागा या सध्याच्या आघाडीच्या गायिकेला त्यातील काही गाण्यांची गुंफण करून त्या ऑस्कर नाईट्च्या वेळी सादर करायला लावली....गागाने कमालीच्या तन्मयतेने ज्युलीच्या साऊंड ऑफ म्युझिक गाण्यांना सादर केले....थिएटर टाळ्यांच्या वर्षावात भिजून गेले आणि त्याच हर्षात उजव्या बाजूने आपल्या लाडक्या ज्युली अ‍ॅन्ड्र्यूजने हसतमुखाने प्रवेश केला...तिला पाहून तमाम थिएटर उभे राहिले....अभिवादन करण्यासाठी...टाळ्यांचा आवाज थांबायलाच तयार नाही....किती भारावून गेली होती ज्युली....आणि त्यानंतर ती जे बोलली ते अगदी हृदयात ठेवावे असे. समजा तिने नुसते "आभारी आहे" असे म्हटले असते तर ?

टण्या, जो पेशी च्या "जो पेसीची AFI मधली डी निरो आणि स्कोर्ससीच्या कार्यक्रमातील भाषणे" ह्या भाषणांच्या लिंक्स् आहेत का? थँक्स! Happy

एखादी भूमिका वठवताना होणारी शिवीगाळ अन प्रत्यक्ष आयुष्यात त्या कलाकाराची भाषा यात भरपूर फरक असू शकतो >>>> अनुमोदन! मुळात "टॉमी डीव्हिटोचीच भाषा वापरेल की काय " अशी शंका आली ह्याचच आश्चर्य वाटलं मला. त्या भुमिकेत शिव्या देणं आणि प्रत्यक्ष आयुष्यातली भाषा वेगळी असणारच ना? शिवाय ऑस्करसारख्या स्टेजवर कशी भाषा वापरायची हे कलाकारांना कळत असावं ना ? Happy

पराग....

~ बरोबर आहे तुमचा मुद्दा. म्हणून तर जो याने त्याच्या वाटणीला आलेल्या ४५ सेकंदाचा त्यासाठी उपयोग करणे अत्यंत आवश्यक होते. २५-३० सेकंदातही सर्वांचे आभार मानून होतात आणि तसे झाले असते तर त्या एका वाक्याने आटोपते घेतलेल्या भाषणाबाबत असे पतंगदेखील उडाले वा उडविले गेले नसतील. हा एक मानवी स्वभाव आहे....तसे न होण्याचे काय कारण असेल याचा भुंगा सतत चावा घेत राहिला की मग त्यातून असे हे विकल्प बाहेर पडायला सुरुवात होते.

असो....आपण २०१५ च्या लिओनार्डो बद्दल बोलत असताना १९९० च्या एका घटनेकडे जाण्यात अर्थ नाही.