गुन्हा कोणता झाला माझा जाता जाता टाक सांगुनी एवढेच कर
काय मिळाले सांग मलाही..तुला आपला खेळ मोडुनी एवढेच कर...
या दुनियेच्या शर्यतीत जर तुला जिंकणे अगदी अवघड असेल वाटत
तुझ्यासोबतीच्या लोकांना पाड धरेवर पाय घालुनी एवढेच कर...
प्रेमाच्या बदल्यात तुला जर मरण मला द्यायचेच आहे हरकत नाही
हवा तिथे सर्रास सुरा चालव तू माझी पाठ सोडुनी एवढेच कर...
जन्म कुण्या जातीत कुण्या मातीत ,नसू दे छत माझ्या डोक्यावर आई
तुझी कूस दे जन्मोजन्मी ठेव सुरक्षित नाळ बांधुनी एवढेच कर...
प्रिये भेटल्यावरती भीती तुला वाटते जरका माझ्या व्रात्यपणाची
खुले केस मोगरा ओठ अन डोळ्यांना तू ठेव झाकुनी एवढेच कर...
मंदिर मस्जिद गिरिजाघरात गेल्यावर का देव तुला मिळणार माणसा !!!
देव बघाया माणुसकीने वाग जगाशी हात जोडुनी एवढेच कर...
प्रभू नको हा जन्म मानवी भूक गरीबी नकोत वार्या नकोत चोर्या
पोट आमचे जीभ आमची डोळे काळिज टाक कापुनी एवढेच कर...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)