शब्दपुष्पांजली - माझे दुर्गभ्रमण - तोरणा ते राजगड

Submitted by इंद्रधनुष्य on 1 March, 2016 - 02:28

गोनीदां म्हणजे भटक्यांचे लाडके आप्पा... 'कुणा एकाची भ्रमणगाथा' हे आप्पांच वाचलेल पहिलं पुस्तक. ही गाथा वाचणारा प्रत्येक जण मनाने वैरागी झाला नसेल तरच नवलं! आमच्या पिढिला आप्पां भेटले ते फक्त पुस्तकांतूनच... त्यांच्या भटकंतीचा सहवास न लाभल्याची खंत आजही असतेच. हा सल थोड्या प्रमाणात का होईना कमी करण्याच काम केलं ते आप्पा परब यांनी..

माझी भटकंतीची आवड ही महाविद्यालयीन काळा पासूनची.. पण त्या 'कॉलेज पिकनिक' मधून नेमका हवा तसा आनंद मिळत नसे.. बर्‍याच गोष्टी खटकायच्या.. नक्की काय हवं ते उमजत नव्हतं. अश्यातच एकदा कॉलेज मित्रा कडून ज्येष्ठ इतिहास संकलक श्री.आप्पा परब यांच्या बद्दल समजलं आणि मग सुरु झाला आप्पांन सोबतचा गिरिभ्रमणाचा प्रवास. पाऊलांसोबत मनही सह्याद्रीच्या रानवाटां मागे धावू लागले. भटकंतीला गडकोटांचे ध्येय लाभले. आप्पांच्याच साथीने पन्हाळा ते विशालगड या पदभ्रमण मोहिमेने ट्रेकिंगचा श्रीगणेशा झाला. २००२ मधे पार पडलेल्या त्या मोहिमे नंतर पुढे दोनच वर्षात आप्पांसोबत राजगड प्रदक्षिणा करण्याचा योग आला. आप्पां सोबत राजगडाचा अवाढव्य पसारा न्याहाळण्यात दोन दिवस चुटकी सरशी निघून गेले. मात्र या प्रदक्षिणे दरम्यान 'राजगड ते तोरणा' या रेंज ट्रेकने मनात घर केले.

राजगडाच्या पश्चिमेला परसलेला 'प्रचंडगड' म्हणजेच तोरणा!! या दोन गडांना जोडणारी अंदाजे ८ कि.मी.ची एक समांतर डोंगररांग आहे. राजगडच्या संजीवनी माची खालून निघालेली ही डोंगररांग तोरण्याच्या बुधला माची पर्यंत आपल्याला घेऊन जाते. या धारे वरुन बरेच धारकरी सात-आठ तासांची पायपीट करून तोरण्याला जातात, ही माहिती त्यावेळी अचंबित करणारी होती. नंतर मायबोलीकर भटक्यांकडून या वाटे बद्दल अधिक माहिती मिळत गेली आणि २०११च्या जानेवारीत 'तोरणा - राजगड पदभ्रमण मोहिमे'चा बेत ठरला. तोरण्याच्या पायथ्याच्या गावापासून म्हणजेच वेल्ह्यातून सुरु करुन दक्षिणेकडील बुधला माची वरुन खाली उतरायचे आणि समोर गेलेल्या डोंगरांगेचा पल्ला पार करुन राजगडाच्या संजीवनी माची खालील अळू दरवाजा गाठून राजगडावर मुक्काम करायचा. दुसर्‍या दिवशी राजगडच्या तिनही माच्या बघून चोर दरवाजाने गुंजवण्यात उतरायचे, असा दोन दिवसाचा तगडा बेत ठरला होता.

ठरल्या नुसार २१ जानेवारीच्या रात्री गिरीच्या रथातून यो, रोमा आणि नविनला सोबत घेऊन राजगडच्या पायथ्याकडे म्हणजेच गुंजवणे कडे प्रस्थान केले. परतीच्या वेळेची बचत आणि दगदग कमी व्हावी म्हणून आम्ही गिरीची गाडी गुंजवणे गावात लावून, तोरण्याच्या पायथ्याकडे निघालो. मार्गासनी फाट्या वरुन वेल्हा गावात पोहचलो तेव्हा सुर्य हातभर वर आला होता.

गावातच चहा पोह्यांचा नाष्टा करुन चढाईस प्रारंभ केला. पायथ्या पासून गडाच्या तटबंदी पर्यंतची वाट पुर्ण उजाड होती. कोवळ्या उन्हात तो उभा चढ चढताना धाप लागत होती. तासा भरात आम्ही बिनीच्या दरवाजा पाशी पोहचलो. पुढे कोठी दरवाजाच्या तटबंदी वर sunbath घेणारा साप दिसला. त्यामुळे तटबंदी वरुन फेरी मारण्याचा बेत रद्द करुन झुंझार माची कडे मोर्चा वळवला. गडफेरी उरकून दुपारच्या आत तोरण्याची बुधला माची उतरुन आम्हाला राजगडच्या मार्गाला लागायचे होते. गडावरील मेंगजाई देवीचे दर्शन घेऊन वाटेत दिसलेल्या टाक्यातील पाण्याने बाटल्या भरुन घेतल्या. या पुढिल वाटेत राजगडा खेरीज इतरत्र पाणी मिळण्याची शक्यता फार कमी होती. गडाचा फेरफटका मारत बुधला माचीच्या खाली पोहचायला आम्हाला दुपारचे दोन वाजले.

ज्या डोंगररांगेच्या कुतुहला पोटी इथवर पोहचलो होतो, तो टप्पा आता सुरु झाला होता. ही काही सरळसोट वाट नव्हती... दहा-बारा छोट्यामोठ्या टेकड्यांचे टप्पे पार करायचे होते. कुठे मुरुम मातीचा घसारा तर कुठे कारवीचं काटा कुट्यांनी भरलेल जंगल! दोन दिवसाच्या सामानाने खच्चून भरलेल्या पाठपिवशवीच वजन सांभाळत चालताना आमची पुरती वाट लागली होती. डोक्यावर सुर्य आग ओकत होता आणि घशाला कोरड पडू लागली होती. सावली मिळेल तिथे थांबून सोबत आणलेल्या काकड्या खाण सुरु होतं. पाण्याच रेशनिंग सुरु होतं. Dehydration टाळण्या साठी एक-एक घोट रिचवत मार्गक्रमण सुरू होतं. धूसर वातावरणात हरवलेला राजगड त्यामुळे अजूनच दूर भासत होता. वाटेत एका टेपाडावर पाण्याला निघालालेला एक धनगर दिसला. त्याच्याकडे पाण्याची चौकशी केली असता कळले की बरच खाली उतरून जावं लागतं. तो प्रस्ताव तिथेच सोडून आम्ही पुढे चालते झालो. पिण्या करता पुरेसा साठा आमच्याकडे शिल्लक होता. फक्त चिंता होती ती रात्रीच्या जेवणासाठी लागणार्‍या पाण्याची... त्यासाठी काही केल्या संजिवनी माची गाठणे आवश्यक होते.

तोरणा-राजगडच्या मधून हारपूरला जाणारा एक डांबरी रस्ता 'पाल'खिंडी जवळ भेटतो. संध्याकाळचे पाच वाजत आले.. तरी 'पाल'खिंडीचा पत्ता नव्हता. पाण्याचा कोटा ही एव्हाना अर्ध्या वर आला होता. वाटेत एक गुरांचा वाडा दिसला, पण तोही बंद होता. परिणामी पुढे पाणी मिळण्याची शक्यता ही कमी झाली. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे आमच्या जवळ फक्त एकच तास शिल्लक होता. त्या वेळात कसही करुन खिंड गाठायाची या उद्देशाने सगळे झपाझप चालू लागले.

कललेल्या सोनरी सुर्यकिरणांत समोरील राजगड उजळून निघाला होता. मागे वळून बघितले तर तोरण्यानेही मावळतीचा तांबडा शेला चढवला होता. दोन्ही गडांच ते राजबिंड रुपडं... हे या ट्रेक मधिल सर्वोच्च क्षण होते.

खिंडी कडे जाणारी वाट बर्‍या पैकी खाली उतरते. संध्याकाळचा गार वारा अंगावर झेलत पाल खिंडी पर्यंत पोहचलो खरं.. पण ईथून राजगडावर पोहचायला किमान तास-दिड तास लागणार होता. दिवसभराच्या श्रमाने मी कंटाळलो होतो. फक्त तंगडतोड करुन गडाला भोज्जा करणं हे माझ उद्दिष्ट कधिच नसतं. अवतीभवतीचा निसर्ग अनुभवावा, गावकर्‍यांत मिसळावं, त्यांच्या कडून चारगोष्टी शिकाव्यात.. म्हंजी भटकंतीच सार्थक झाल्या सारख वाटतं.

To be or not to be... पुढे जायच की खाली गावात उतरायच या विषयावर खिंडीतच आमची गोलमेज परिषद भरली. शेवटी गिरीच्या मध्यस्थीने ती संपली. वर जाण्यापेक्षा खिंडीच्या मध्यावर एका धनगराच घर होतं.. त्यांच्या कडे आम्ही मुक्कामा साठी विचारणा केली आणि त्यांनीही ती बिनदिक्कत मान्य केली. एव्हाना चांगलच अंधारून आलं होतं. झर्‍याच्या पाण्याने ताजतवान होऊन धनगराच्या अंगणातच आम्ही आमचा संसार थाटला. चुली वरील गरमा गरम सूप पोटात गेल्या वर दिवसभराचा सगळा क्षीण नाहिसा झाला. रोमाने आणलेल्या तिखट शेवने सुपाची चव द्विगुणीत केली. त्याला जोड होती चुलीवर भाजलेले कुरकुरीत पापडांची... अह्हा!! एकीकडे चुलीवर पनीर बटर, दाल मख्खनी, व्हेज बिर्यानीचा असा Ready to Eatचा बेत शिजू लागला.. तर त्या चुलीच्या उबेने बेसुर गळे गरम होऊ लागले. त्याला दाद देणारे प्रेक्षक होते धनगराची मुले राम-लक्ष्मण आणि वेल्ह्या पासून सोबतीला असलेला कुत्रा... वाह!!! क्या दाद है!

वर तारकांनी भरलेलं नभांगण.. अंगाला झोंबणारा गार वारा.. पाठराखणीला जंगलाची भींत.. आणि अंधार्‍या रात्रीत रंगलेल्या भटकंतीच्या गप्पा.. यापेक्षा सुख ते वेगळं काय असतं?

पहाटे जाग आली तीच टोपली खाली झाकलेल्या गजराने.. आदल्या दिवशीच्या निरंतर श्रमाने अगदी गाढ झोप लागली होती. जाग आल्या वर क्षणभर आपण कुठे आहोत याचा विसर पडला होता. धनगर कुटुंबाने आपल्या छोट्याश्या घरात आमची झोपायची व्यवस्था केली होती. वेळ प्रसंगी मिळालेल्या त्या माणुसकीचे मोल शब्दात व्यक्त करणे कठीण...

बाहेर येऊन चुल पेटवली.. चहासाठी आंधण ठेवलं, तो पर्यंत गडाच्या पुर्वेला झुंजूमुंजू होउ लागल होतं. बाकीची मंडळी आळस झटकून तयार झाली. चहा, मॅगीचा नाष्टा उरकून बॅगा पॅक झाल्या. या पुर्वी माझी आणि गिरीची राजगड प्रदक्षिणा झाली होती. तशीच यो आणि नविनची एकत्र प्रदक्षिणा झाली होती. रोमाला मात्र प्रदक्षिणा करायचीच होती. सोबत आणलेल्या जड बॅगांशी सोयरीक तोडून त्या तिथेच धनगराच्या घरात ठेवून दिल्या. गुंजवणेत उतरल्यावर गाडी घेऊन परत इथेच येऊ बॅगा आणायला, असा मनसुबा गिरीने मांडला आणि तो तत्काळ मंजूर झाला.

सकाळचा पोटभर नाष्टा झाल्या मुळे मावळे एकदम जोशात होते. गडाच्या वाटेवर जाणारा शॉर्टकट दाखवायला सोबतीला राम होता. खिंडीतला काटेरी शॉर्टकट चढताना आमची तारांबळ उडत होती. अर्धा तासात तोरणा-राजगडच्या मुख्य वाटेवर आलो. पुढे अर्धा तासाचा उभा चढ चढून वर आल्यावर संजिवनी माचीचा बलदंड चिलखती बुरूज स्वागताला उभा होता. बुरुजाला डावी मारत अळू दरवाज्या कडे कूच केली. इथून दिसणारं राजगडच भव्य रुप मनाला भुरळ पाडतं.. डावीकडे चिलखती तटबंदी मिरवणारी संजिवनी माची तर उजविकडे लांबवर पसरलेली सुवेळा माची दिसते. सुवेळा माची वरील डुबा, हत्तीची अंबारी, नेढे, आणि कलेश्वरी बुरुज प्रेक्षणिय आहेत. समोर आकाशाला भिडलेला राजगडचा बालेकिल्ला पोटात गोळा आणतो. भान हरपून हा सगळा नजारा मनात साठवत गेलो.

अळू दरवाज्यातून माचीवर प्रवेश केला. संजविनी माची वरुन आमचा कालचा मार्ग पुर्ण नजरेच्या टप्प्यात येत होता. उजवी कडील पाली दरवाजा दिमाखात उभा होता, तर डावीकडील पालखिंडीत रामचे घर दिसत होते. बुरुजावर बसून राजगडचा आसमंत न्याहाळत असताना रामने विकायला आणलेल्या ताकाने तहान भागवली. संजीवनी माची वरुन बालेकिल्ल्या कडे जाणारी वाट थोडी जोखमीची होती. डावीकडील कड्यात मधमाशांची पोळी होती, तर उजवीकडे आ वासलेले दरी... उभा चढ चढून वर गेल्यावर शिवकालीन बांधणीचा उत्कृष्ठ नमुना असलेला बालेकिल्ल्याचा दरवाजा दिसतो. बालेकिल्ल्यावरील राजवाड्याचे भग्न अवशेष, ब्रम्हर्षी मंदिर, ध्वज बुरुज बघून परत दवाजा पाशी आलो. रोमाला सुवे़ळा माची बघायची होती म्हणून नविन आणि यो रोमाच्या सोबतीला गेले. गिरी आणि मी दरीतून येणार्‍या थंड हवेच्या झुळुका घेत दरवाजातच विसावलो.

साधारण तास-दिड तासाने तिघे परत येताना दिसले तोवर आमची एक मस्त डुलकी झाली होती. आळस झटकून खाली पद्मावती माची वर आलो. रविवार असल्याने बरीच वरदळ होती. पद्मावती माची वरील तलावाचे पाणी गडा वर येणारे गावतले गडकरी उन्हाळ्यात पिण्यासाठी वापरतात. तरीही काही उडाणटप्पू त्यात डुंबत होते. आपल्या बेजबादार वर्तनाने निसर्गाचे आणि समाजाचे नुकसान करण्यात धन्यता मानणारी जमात इथेही होतीच.

गिरीला पद्मावती माची वरील झुणका भाकरच मोह आवरता आला नाही. मग बाकीचे ही मम म्हणत त्यात सामिल झाले. भरल्या पोटी आम्ही गड उतरायला घेतला. चोर दवाजाच्या छोट्याश्या कमानीतून कसरत करत बाहेर आलो. गड उतरावर मातीचा बराच घसारा आहे. जरी हा राजमार्ग नसला तरी बहुतेक ट्रेकर्स पाली दरवाजा ऐवजी गुंजवणेतून चोर दरवाजाने येणे पसंत करतात. वाटेतील काळ्या मातीशी कुस्ती खेळत तासाभरात गुजंवणेत पोहचलो. पाठीवर ओझ नसल्याने सगळ्यांना मनसोक्त गडफेरीचा आनंद लुटता आला याचे समाधान होते.

गुंजवणेत पार्क केलेल्या गिरीच्या गाडीने राम-लक्ष्मणच्या घरा जवळ पोहचलो. जेवणाची वेळ टळून गेली होती तरी जेवणाचा आग्रह होत होता. तिथून निघताना त्यांना कपडे, औषध जमेल तशी मदत देऊ केली. आम्ही कोण कुठले.. ना ओळख ना पाळख.. रात्रीच्या मुक्कामा साठी छप्पर देणारे, जेवणाचा आग्रह करणारे ही भोळी भाबडी माणसं भेटली की त्यांच्या आपुलकीने श्रीमंत झाल्या सारख वाटतं.. सह्याद्रीतल हे निर्वाज्य प्रेमच आम्हाला नेहमी ट्रेक साठी प्रेरित करतं. कसे पांग फेडावे त्यांचे /\

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लिहिलंय इंद्रा
मला अजून करायचा आहे हा राजगड तोरणा ट्रेक. अनेकदा हुलकावणी दिल्ये ह्याने
कधी होईल तेव्हा होईल पण आज तरी तुझ्या लिखाणातून केला मी हा ट्रेक.

सह्याद्रीतलं निर्वाज्य प्रेम हे खरोखरीच स्वतः अनुभवायचीच गोष्ट आहे.
करी लाभावीण प्रिती अशी ही मंडळी

प्रदक्षिणा राहीलेय पण सिंहगड राजगड तोरणा रायगड असा जंबो झालाय २००० साली..
परत करुया सगळे एकत्र..
ट्रेक सुंदर. मावळे सुंदर. त्यामुळे लेखही सुंदर..!

झकास रे इंद्रा...झ्याक लिहीलयंस.....

कललेल्या सोनरी सुर्यकिरणांत समोरील राजगड उजळून निघाला होता. मागे वळून बघितले तर तोरण्यानेही मावळतीचा तांबडा शेला चढवला होता. दोन्ही गडांच ते राजबिंड रुपडं... हे या ट्रेक मधिल सर्वोच्च क्षण होते. >>>>>>>>>>>> + १०००००

आम्ही हा ट्रेक पावसाळ्याच्या तोंडावर राजगड - तोरणा असा केला होता, त्याची आठवण झाली. प्लॅन पार पुढे रायगडपर्यंत जाण्याचा होता पण तोरणा गाठेपर्यंतच सगळ्यांची हवा गेली होती. त्याची आठवण झाली.

फोटोशिवाय हा लेख टाकल्याचा निषेध....

मस्तच लेख इंद्रा..
सह्याद्रीतल हे निर्वाज्य प्रेमच आम्हाला नेहमी ट्रेक साठी प्रेरित करतं. कसे पांग फेडावे त्यांचे /\>>>> हे मात्र अगदी खरं!

इन्द्रा, सुंदर वर्णन केलंयस..
खूप अनुभव श्रीमंत आहात तुम्ही सर्व ट्रेकर्स!!!

धन्यवाद मंड़ळी Happy

राजगड प्रदक्षिणा केली तेव्हा कॅमेरा नव्हता. तोरणा राजगड केला तेव्हा जुना कॅमेरा बिघडला होता. असे असूनही राजगड कायमचा मेमरीत सेव्ह झालेला आहे. तो नजारा आजही तसाच आठवतो. Happy