शब्दपुष्पांजली-मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक-आम्ही भगीरथाचे पुत्र

Submitted by निर्मल on 27 February, 2016 - 02:09

प्रख्यात लेखक गो. नी. दांडेकर यांच्या अनेक अनेक सुंदर कादंबर्यंआपैकी माझी ही एक अत्यंत आवडती कादंबरी. गोनीदांच्या कादंबर्यांची ओळख झाली ती त्यांच्या बाल कादंबरीकांमुळे. २ री किंवा ३ री त असताना त्यांचे गोपाळांचा मेळा हे पुस्तक बक्षीस म्हणून मिळाले. त्यातील अप्पा आणि बगड्यावर खुश होऊन त्यांचे शिवबाचे शिलेदार हे दुसरे पुस्तक विकत आणले. आणि मग त्यांच्या पुस्तकांचा सिलसिलाच सुरु झाला.

तशा तर गोनीदांच्या सर्वच कादंबर्या खूप छान आहेत. विषय वैविध्य भरपूरच. पण त्यात ही कादंबरी जरा जास्त लाडकी ती तिच्या विषयामुळेही. एखाद्या धरणाच्या बांधकामावर लिहिलेली कादंबरी ही तेव्हा तरी मराठीला नवीनच असेल. ती पहिल्यांदा वाचली ती ५ वी / ६ वी त असताना. आणि नंतर खूप वेळा तिची पारायणं झाली.

आधुनिक भारताचे तीर्थस्थान असे ज्याचे वर्णन करता येईल अशा भाकडा नांगल धरणाच्या जन्मकथेवर लिहिलेली ही कादंबरी आहे. गोनीदा काश्मीर बघून परत येत असताना त्यांना भाकडा नांगल धरण बघायचा योग आला. त्यावेळी ते धरण अर्ध बांधून झालं होतं. सतलजचे ते प्रचंड खोरे, दोन टेकड्याम्मधील सतलजचा चिंचोळा प्रवाह, धरणाच्या भिंतीतून झेपावत असलेलं प्रचंड पाणी हे सगळं पाहताना त्यांना वाटलं कि हा एका मोठ्या कादंबरीचा विषय आहे. अशी जाणीव फक्त त्यांच्यासारख्या प्रतीभावंतालाच होऊ शकते.

एकदा असा निश्चय झाल्यावर गोनीदांनी मग पंजाबचे त्या वेळचे राज्यपाल श्री काकासाहेब गाडगीळ यांच्याशी सम्पर्क साधला. काकासाहेबांनी त्यांना आवश्यक ती सगळी मदत केली. ३ आठवडे गोनीदा त्या सर्व भागात हिंडले. लोकांशी संवाद साधला. तिथल्या लोककथा, लोकगीते अभ्यासली. हवी होती ती सर्व कागदपत्रे अभ्यासली. आणि एवढ्या सगळ्या अभ्यासानंतर आकाराला आली ती भाकडा नांगल धरणासाराखीच भव्य कादंबरी - आम्ही भगीरथाचे पुत्र. सत्य आणि काल्पिताचा अदभुत संगम असलेले एक शब्दशिल्प.

१९५९ साली प्रकाशित झालेल्या ४२० पानांच्या या कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे. धरण बांधण्याच्या कल्पनेचा उगम आणि मग त्या ध्यासाने झपाटलेली माणसे असा हा विषय आहे. कादंबरीची सुरुवात होते ती १०० वर्षांपूर्वीच्या एका जळत्या दुपारच्या वर्णनाने. त्या दुपारी भाकडा गावाला पाण्याखाली बुडून जाण्याचा नागा बैराग्याचा शाप मिळतो. मग आपण येतो ते १८९८ मध्ये. भाकडामधील पंडित गीताराम आणि त्यांची पत्नी विद्यावती यांना वयाच्या ४६ व्या वर्षी पुत्रलाभ होतो. त्यांचा पुत्र जीवन हाच आपला कथानायक. भाकडा ज्या संस्थानाच्या अधिपत्याखाली येते त्या रायपुरचे राजेसाहेब जीवनला आपला मानसपुत्र मानतात. तेच त्याच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था करतात.

भाकडापासून काही अंतरावर असलेले विलासपूर संस्थान. तिथल्या मंदिराचे महंत काशी यात्रा करून परत येत असताना त्यांना राजस्थानात पाण्याअभावी झालेला त्रास यातून त्याच्या मनात सतलज वर धरण बांधायची कल्पना अंकुरते. ही जबाबदारी ते विलासपुराच्या राजेसाहेबांवर आणि आपल्या शिष्यावर देतात. विलास्अपुराच्या महंतांचा जीवनशी परिचय होतो. या वेळेस जीवन मेट्रिकची परीक्षा ५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असतो. रायापुरच्या राजेसाहेबांनी त्याच्या इंजिनीअरइंग च्या शिक्षणाची सोय लाहोर येथे केलेली असते. विलासापुराचे महंत जीवनला धरण बांधण्याचे महत्त्व पटवून देतात आणि मग तो त्याचा ध्यासच होतो.

जीवनचे मित्र अरजन, गुरुदयाल, जमाल, बेनीपरशाद हे त्याला या प्रवासात मनोभावे साथ देतात. जोगेंद्र हा जीवनचा कॉलेज मधील मित्र क्रांतिकारी असतो. दोघांमधील नाते खूप भावपूर्ण आहे. एकमेकांच्या कार्याबद्दल आदर, पण तरीही निवडलेले मार्ग वेगळे. जोगेंद्रचा धरणाच्या बांधकामाला विरोध असतो. या दोघांना संभाळून घेणारी जीवनची पत्नी विनयवती. भाकडा गावातील इतर रहिवासी – परभूदयाल, जसपाल, हरदेव ही सर्वच कादंबरीतील पात्रे आपल्या मनात घर करून राहतात. त्या बरोबरच हा सगळा परिसर. तो ही त्या कादंबरीत तेवढाच महत्त्वाचा आहे. गोनीदा तिथल्या परिसराचे, निसर्गाचे वर्णन इतके सुरेख करतात की काय सांगावे. प्रसंगी लोकांचा विरोध पत्करून, मग त्यात जवळचे सुर्हूद ही आले, सर् जीवनराम शर्मा धरण आकाराला आणतात. कादंबरी पूर्ण होते ती १९५८ मधे. या सगळ्या लांबावरच्या प्रवासात आपण एवढे तल्लीन होऊन जातो कि कादंबरी संपली की मला नेहमीच रिकामपणा जाणवतो. अर्थात माझं हे नेहमीच होतं.

जीवन आणि त्याचे आई वडील, त्याचे मित्र, त्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय - जीवनचे लग्न शिक्षण संपल्यावर करायचे व त्या आधी आपल्या सुनेला घरी आणायचे, जीवन आणि विनय मधील निष्ठेचे नाते, गावकर्यामचा विश्वास, त्यांचे निरागस स्वभाव आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे धरणाचा ध्यास हे सर्व गोनीदांनी फारच उत्तम रितीने मांडलेले आहे. या सर्वच वातावरणात आणि या कथानकात आपण हरवून जातो.

गोनीदा हे निसर्गाचे लेखक आहेत. कादंबरीतला परिसर ते एवढा सुंदर रंगवतात की तोही त्यातले एक महत्त्वाचे पात्रच होउन जाते. माणसांमधले नाते, भावबंध - एकमेकांशी असलेले आणि परिसराशी असलेले, जीवनचे झपाटलेपण हे सगळं फार प्रत्ययकारीपणे येतं. त्यांच्या निरिक्शण शक्तीने आणि अभ्यासाने खरोखर स्तिमित व्हायला होतं.

अवश्य वाचावी अशी ही माझी लाडकी कादंबरी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय! मला ह्या कादंबरीचे फक्त नाव माहिती होते. विषय आत्ता कळला! आता पुस्तक मिळवून वाचणार Happy धन्यवाद!

छान ओळख करून दिली आहे. रारंग ढांगप्रमाणे एका सर्वस्वी वेगळ्या विषयावरची मराठीतील अनोखी कादंबरी.

खुप छान लिहिलंय. तेव्हा डोक्यात घट्ट बसलेली शतलुज आठवली Happy
जीवनची व्यक्तिरेखा खुप परिणामकारक रेखाटलीये. खुप वर्षं झाली वाचून, पुन्हा वाचायला हवी.

खुप वर्षांनंतर झाडाझडती वाचताना पार्श्वभूमीला मनात आम्ही भगीरथाचे पुत्रही नाचत राहिली. आता नर्मदा आंदोलनाच्या घडामोडी वाचताना दोन्ही कादंब-या आठवत रहातात. एक सकारात्मक सौम्य आणि दुसरी नकारात्मक भडक, दोन्ही काल्पनिकताच, पण सत्याशी सांगड घालत मनाचा लंबक झुलवत ठेवतात.

सर्वांचेच आभार! खरं आहे सई! शतलुज आणि हिमालय तेव्हा एवढे मनात शिरले होते. खरं तर आणखी खूप लिहायचे होते कादंबरीबद्दल आणि गोनीदांच्या भाषेबद्दल. पण एवढं मराठी टाईप करायची सवय नाही. म्हणून मग थोडक्यात आटपलं.

खूप वर्षांपूर्वी वाचलीये - आता सारे अंधुक अंधुक आठवतंय..... आता परत वाचणारे ...

खूप छान ओळख करुन दिलीत तुम्ही .... धन्यवाद ... Happy

पुस्तकाची छान ओळख.
गोनीदा हे निसर्गाचे लेखक आहेत. कादंबरीतला परिसर ते एवढा सुंदर रंगवतात की तोही त्यातले एक महत्त्वाचे पात्रच होउन जाते. >>>शंभर टक्के अनुमोदन .