वृत्तबद्ध मराठी कविता, सोशल मीडिया आणि मी
आज सोशल मीडियावर बळावलेली वृत्तबद्ध कवितेची लाट स्वानुभवाच्या माध्यमातून अलिकडेच एका लेखातून रडारवर घेतली होती.त्यातच अजून काही जिव्हाळ्याच्या विषयांची भर टाकून आपल्यापुरता या चिंतनाला विराम देत आहे.
प्रथम या लाटेबद्दल.एकीकडे साठोत्तरी,नव्वदोत्तरी,आधुनिकोत्तर असे मराठी कवितेचे निरनिराळे कल्पित कालखंड घेऊन चर्चा वाद संवाद वगैरे झडत आहेत, त्याहून व्यापक अशा विश्वकवितेतही (अर्थात इंग्लिश अनुवादांमधून वाचलेल्या) ‘मीटर’मध्ये लिहिल्या जाणाऱ्या कवितेला गळती लागली आहे असा मुक्त वाचनातून आज हाती येणारा निष्कर्ष .
असं असताना मराठीत मात्र अगदी नव्या दमाने आणि जोमाने आज अनेकजण/जणी चांगल्या मराठी वृत्तबद्ध कविता लिहिताना दिसतात. एकीकडे या कविता ,दुसरीकडे सातत्याने आणि आग्रहाने फोफावलेली मुक्तकविता.या दोन्हींमागील प्रेरणांचा लेखाजोखा मांडावा असं वाटलं.
मात्र त्यासाठी आधी कविता म्हणजे काय? तिचा असा काही आकृतिबंध असतो का ?असावा का ? या मूळ प्रश्नाकडे जावेच लागेल . मुळात कवितेवर निस्सीम निष्ठा व प्रेम असल्याशिवाय ‘कविता म्हणजे काय’ हा प्रश्न पडत नाही आणि ज्याचं/जिचं ते पहिलं प्रेम असेल त्या व्यक्तीला दुसरं काही सुचत नाही !
अशी ही कविता अगदी नेणत्या वयापासून बडबडगीतांच्या स्वरूपात आपल्याला साथ करते. अगदी या उगमस्थानापासून कविता गद्यापासून वेगळी पडत जाते. तिची लय,शब्दांचं,तिच्यामध्ये येणाऱ्या प्रतिमांचं नाविन्य ,नादमयता यातून भाषेचा एक वेगळाच उफाडा ( कवी कै.दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे शब्द ) जाणवतो. ही भाषा व्यवहाराच्या भाषेपेक्षा नुसतीच वेगळी नसते तर शक्तीशाली आणि सूत्रमय असते. ती फार प्रयास न करता स्मरणात सामावते.फार प्रयास न करता मोठा अर्थ सांगते. फार प्रयास न करता अगदी या बाळरूपातही लहानग्या जिवांना मोह घालते , तिच्या तालावर ते हसतात, हातपाय नाचवतात,झोपतात. कवितेशी आपली आद्य ओळखही अशी कोणत्याही संस्कृतीत, भाषेत, ताल आणि नादावर आधारित असते.
आपण वाढतो तशी आपली कविता वाढत जाते.आपल्या आकलनाला पडणारे जीवनाचे,विश्वरहस्याचे अवघड प्रश्न कवितेतून हृदयाला स्पर्शू लागतात.प्रेमाची,स्नेहाची,फक्त मानवीच नव्हे तर सृष्टीतील परस्परसंबंधांची कोडी सुखवू लागतात आणि सतावूही लागतात. आता कविता आपलं तत्त्वज्ञान आणि अध्यात्म बनत जाते. अशा वेळी कवितेला जाचक ,कृत्रिम बंध नकोसे होतात. व्यामिश्र असतात नवनवे अनुभव. ते आकृतिबंध फोडून झेपावत येतात. त्यांची भाषा हरघडीला, हर परिस्थितीत वेगळी असते. कवितेची आजवरची परिचित भाषा, परिचित घाट जुन्या कपड्यांसारखे दाटू लागतात, नकोसे वाटतात.
या टप्प्यावर कवितेत मुक्तच्छ्न्दाचा पुरस्कार केला जातो. इथवर ठीक आहे,हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे. पण हा पुरस्कार करताना कधी वृत्तबद्ध कवितेचा प्रकट तिरस्कार ,कधी मूक तर कधी स्पष्ट असहमतीही व्यक्त होते.
याची महत्वाची दोन कारणे आहेत.
एक:
वृत्तबद्ध कवितेत शब्दांचा साचा- आकृतिबंध इतका कठोर असतो,की त्यात उतरणारे शब्द आवेग हरवून बसलेले असतात.हा आवेग ही तर कवितेची मूळ ओळख, जी कवितेच्या व्याख्येतच सामावलेली आहे. शब्दांच्या वजनामापाला आशयापेक्षा महत्व आल्याने कवितेत जी एक साक्षात्कारासारखी सहजता ,जे विचाराचं नैसर्गिक सौंदर्य असतं ते गमावूनच वृत्तबद्ध कविता जन्माला येते असं कित्येकांना वाटू शकतं.
दोन:
वृत्तबद्ध कविता हा भूतकाळाचा अवशेष, बदलत्या वर्तमानाच्या भाषेला त्यात कोंबणे चुकीचे आहे असा एक मुद्दा. म्हणजे असं की कवितेला व्यापणारा समकालीन अवकाश आरपार बदललाय.वेळापत्रकं ,अंदाजपत्रकं ,दिनमान,आयुष्यमान बदललेत.ज्ञानशाखा अथांग गुंतल्या आहेत.विज्ञानाची सखोल पकड कवीच्या जाणिवेतून कवितेच्या अंत:कोशापर्यंत पोचलीय.देशांची दिवाळखोरी ,युद्धखोरी,दहशतवाद हे जीवनमरणाचे म्हणून कवितेचे विषय होत चालले आहेत.प्रेम ?सहजीवन ? नातेसंबंध ? शहरीकरण ?निसर्ग ? पर्यावरण ? सगळ्यावर प्रश्नचिन्हं उमटली आहेत. संज्ञा व्यामिश्र होताहेत.हे सगळं वृत्तबद्ध कविता पेलू शकेल?
याला उत्तर म्हणून स्वामीजी निश्चलानंद यांनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की वृत्तबद्धता हेच कवितेचं नैसर्गिक स्वरूप आहे,निसर्गात प्रत्येक गोष्टीची एक लय असते तशी ती कवितेतही असतेच.थोडक्यात ,ती लय समजून घेणे,अंगी बाणवणे यात आपण कवी म्हणून ,रसिक म्हणून कमी पडत असलो तर तो वृत्तबद्ध कवितेचा दोष नाही.
स्वामीजी निश्चलानंद हे नाव या लेखाच्या विषयासाठी फार महत्वाचं आहे.हिमालयस्थित स्वामीजी उत्तम वृत्तबद्ध कविता लिहितात,तिचा आग्रहाने पुरस्कार आणि प्रसार करतात.मराठी सोशल मीडियात अत्यंत ठसठशीतपणे कार्यरत असलेल्या स्वामीजींचा अनेक विषयांचा दांडगा व्यासंग असल्याने ( आणि ते स्वत: मुंबई विद्यापीठाचे एम.बी.बी.एस. – डॉक्टर – पदवीधारकही असल्याने ) त्यांच्यावर कालबाह्यतेचा आरोप दुरूनही होऊ शकत नाही ) त्यांच्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वाचा परिणाम होऊन अनेकांनी वृत्तबद्ध लिहायला सुरुवात केली आहे ही वस्तुस्थिती आहे.
वृत्तबद्धतेच्या विरोधी आणि संवादी अशा या दोन्ही बाजू समजून घेताना नवे आशय आणि प्रचलित आकृतिबंधाची एक प्रयोगशाळा आपणच व्हावं असं मी ठरवलं.
आजवर कवितेचं सुंदर पद्यबंधात प्रकट होणं हा माझ्यासाठी निव्वळ थरार होता. कदाचित माझ्या अंतर्मनाताल्या-नेणिवेतल्या- या पद्यबंधांना अधिक समजून घेणं पुढच्या टप्प्यावर मला आवश्यक वाटलं आणि याच टप्प्यावर नेटवर परिचय झालेल्या स्वामीजींशी माझे तुरळक पण महत्वाचे संवाद झाले. त्यातून मला क्रमश: अनेक गोष्टी जाणवायला लागल्या - मराठीची अक्षरलेणी म्हणावी अशी संतकविता अभंगादि छंदातच लिहिली गेलेली म्हणून छंदोबद्धच कविता आहेच, पण नंतर मराठीतल्या प्रयोगशील पूर्वसुरींनी –अगदी केशवसुतांपासून ते मर्ढेकर, करंदीकर ,ग्रेसांपर्यंत अनेकांनी सातत्याने वृत्तबद्ध लेखन केलं आहे पण आपणच या वैशिष्ट्याची त्या अंगाने दखल घेतली नाही.कारण कवितेचा आशय हा आपला अग्रक्रम होता,त्या भरात या सर्व महाकवींनी तिच्या फॉर्मचे जाणता अजाणता किती प्रकार हाताळले आहेत ते पाहणं राहूनच गेलंय की ! अगदी त्यांच्या आधुनिक आणि आधुनिकोत्तर जाणिवांनाही वृत्तबद्धता अस्पृश्य वाटली नाही किंवा जुनाट वाटली नाही. मग मधल्या काही दशकांतच अचानक तिला नाकं का मुरडली जाऊ लागली? दरम्यान समकालीन प्रस्थापित होत चाललेली मराठी कविता मी वाचत होतेच .माझा आक्षेप मुक्तच्छ्न्दाला नव्हता,पण कवितेचं मूलद्रव्यच अनेक कवितांमधून गहाळ झाल्याचं जाणवत होतं. फार तर ललित-गद्य म्हणता येईल अशी मांडणी ,प्रचारकी आवेश आणि कृतक-आधुनिकता -प्रतिमांचे आकर्षक,मुक्त स्फोट.
या सर्वांतून कविता परग्रहनिवासी होत चालल्याचा आभास.
मग मात्र मी घरातली वडिलांची व्याकरणाची जुनी पुस्तकं झाडून बाहेर काढली.अक्षरगणवृत्त,मात्रावृत्त,छंद म्हणजे काय? महत्वाची वृत्ते कोणती याची उजळणी केली.या विषयावर या लेखात फार लिहीत नाही कारण वाचकांना बऱ्यापैकी कल्पना असेलच.. तरीही सोपं करून सांगायचं तर शब्दोच्चारांच्या लघु व गुरू मात्रा असतात .जेव्हा कवितेतील प्रत्येक चरणातील प्रत्येक अक्षराचे विशिष्ट लघुगुरू क्रमाने नियमन केले असते, तेव्हा ते अक्षरगणवृत्त ( जसे की भुजंगप्रयात , शार्दूलविक्रीडित ) आणि जेव्हा एका ओळीतील एकूण मात्रा सारख्या असतात तेव्हा ते मात्रावृत्त . येथेही अंतर्गत नियम असतात ,एका गुरुऐवजी दोन लघु याप्रकारचीच सूट घेता येते.जेथे प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या समान ते छंद .
या सर्व नियमनातून कवितेत तऱ्हेतऱ्हेची लयबद्धता प्रकटते. ती तिच्या आशयाशी अनुकूल असल्यास कवितेचं सौंदर्य आणि प्रभाव वाढतो. ही प्रक्रिया , ही निवड बहुश: अंत:स्फूर्तीने होते कारण यातल्या अनेक लयी आपल्या नेणीवेत वाचनातून,श्रवणातून ,संस्कारातून आधीच वसत असतात. कवितेचे साकारणे ही एक व्यामिश्र प्रक्रिया आहे, तो एक अभ्यास आहे आणि एक आनंदही. यातला कोणताही घटक कमी महत्वाचा नाही. केवळ अभ्यासातून लिहिलेली कविता कोरडी पांडित्यपूर्ण होईल. केवळ स्वत:च्या आनंदासाठी लिहिलेली कविता इतरांना आनंद देईलच असे नाही !
हा सर्व विचार करतच मी गेल्या दोन-तीन वर्षात जवळजवळ पन्नास ते साठ कविता निरनिराळ्या वृत्तांमध्ये लिहिल्या.मला भावणारे सर्व विषय हाताळले. अधिक अवघड मानली गेलेली अक्षरगणवृत्ते तुलनेने सोप्या मात्रावृत्तांपेक्षा आधी जवळ केली. सुरुवातीचे अवघडलेपण जाऊन लयीत भिनत जाऊन कविता सहजपणे वृत्तात उतरताना अनुभवली.या कवितांमध्ये ‘नभ निळे’ सारखी पृथ्वी वृत्तात लिहिलेली विमानप्रवासावरची कविता होती,’’लीलावती हॉस्पिटल ‘’ सारखा विदारक अपघाताचा अनुभव सुमंदारमाला वृत्तात होता.माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मत्तकोकीळ वृत्तात लिहिलेली ‘’आकांताआधी’’ ही कविता होती.समकालीन वास्तवात आत्मशोधाचा आयाम कोणता यावर लिहिलेली ‘’शोध’’ ही मंदारमाला वृत्तातली रचना होती. ‘’कवितेचे असणे’’ या कवितेत तोटक वृतात The Being of a Poem '- या थेसिसमधील डॉ.अशोक केळकर यांचा तत्त्वविचार, कवितेच्याच शब्दात मांडण्याचा प्रयत्न मी केला . ‘’हायडेग्गरप्रणीत व्हिंसेंट व्हॅन गॉ ‘’ ही जर्मन तत्त्वज्ञ हायडेग्गरचं व्हिंसेंट व्हॅन गॉच्या ‘’Shoes’’ या चित्रावरील रसपूर्ण विवेचन वाचताना स्फुरलेली चित्र-तत्त्व-विचार कविता आणि ‘त्या बाया ‘ ही पिकासोच्या एका प्रसिद्ध चित्रावरील अशा दोन कविता मी विनायास शार्दूलविक्रीडित वृत्तात लिहीत गेले . याही लेखनाची सहजता जुन्या परिचयाचीच वाटली ! मग अभिजात चित्रांवरील अशा सहा –सात तरी वृत्तबद्ध कविता लिहून झाल्या .असे अनेकानेक समकालीन आणि सर्वकालीन विषय आणि प्रयोग करत गेले ..पुन्हा एकीकडे मी मुक्तच्छ्न्द आणि साधं पद्यही लिहीत होतेच. काही अधिक गमतीचे प्रयोगही केले. मूलत: मुक्तच्छ्न्दात लिहिलेली कविता पुन्हा वृत्तात लिहून पाहिली आणि तिचं अर्थसौंदर्य कमी होण्याऐवजी अधिक झळाळलेलं दिसलं. माझ्यासाठी हा कवितेचा एक सफल ऋतू होता.
मला पडलेली अजून एक अनावश्यक चिंताही या ऋतूमध्ये दूर झाली.ती म्हणजे –‘’ मराठी कवितेचं भवितव्य काय ?’’
क्रांती साडेकर, रणजीत पराडकर,अमेय पंडित, निलेश पंडित , संतोष वाटपाडे,अनिल आठलेकर,वर्षा बेंडगिरी- कुलकर्णी, विभावरी बिडवे ,भूषण कटककर , सुप्रिया जाधव,प्राजक्ता पटवर्धन ,वैभव कुलकर्णी,सुशांत खुरसाले, शांताराम खामकर ही नेटवर उत्तम वृत्तबद्ध कविता/गझल लिहिणारी काही ठळक नावे,इतरही आहेतच ..महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील व व्यवसायातील अनेक समर्थ कवी-कवयित्रींना नेटवर वाचत गेले ,परिचय झाले,वाढले. हे सर्वजण लक्षणीय कविता /गझलाही अनेक फॉर्म्समध्ये लिहीत आहेत , एकूणच कवितेची त्यांची जाण प्रगल्भ आहे.
याच काळात मायबोलीसारख्या संस्थळावर एकेका कवितेवर दमदार चर्चा वाद विवाद झडताना पाहिले.अशोक पाटील.अविनाश चव्हाण ( ज्यांचा अकालमृत्यू हुरहूर लावून गेला ), बेफिकीर, शलाका माळगावकर,अतुल ठाकूर, भुईकमळ यांसारख्यांच्या एकेका प्रतिसादातून कविता किती समृद्धपणे वाचावी ,अनुभवावी याचं प्रात्यक्षिक मिळालं.एक आत्मीयतेचा वेगळा परिवार मिळाला.
गझलविषयी मला जे वाटतं ते यानिमित्ताने व्यक्त करते..गझलमध्ये मात्रावृत्तांचा वापर अधिक. अक्षरगणवृत्तांपेक्षा मात्रावृत्ते लिहिताना गझलेत एकीकडे थोडी मोकळीक मिळते पण दुसऱ्या बाजूने तिच्या विशिष्ट आकृतिबंधाचं आणि स्व-भावाचं (वृत्तीचं ) गझलला कुंपण असतं . सुंदर गझल वाचणं हा एक थरारक अनुभव , पण कित्येकदा तोचतोचपणा या फॉर्ममध्ये येऊ शकतो . मूलत: गझलची शक्तीस्थानं हीच कविता म्हणून गझलची मर्यादा मला व्यक्तिश: वाटते. अर्थात हे व्यक्तिगत काव्यगत अग्रक्रम आहेत,त्यांची कारणं सूक्ष्म अशा कवीच्या पिंडधर्मात- जनुकातच सामावलेली आहेत. असो.
फेसबुक हे कवितांसाठीही एक उत्कृष्ट व्यासपीठ झाले आहे हे मकससारख्या फेसबुकीय कविता समूहामुळे कळले.तन्मयी नावाच्या एका अशाच कविता-समूहाची आम्ही स्थापनाही केली. आसावरीताई काकडे यांच्या अभ्यास-चिंतनपूर्ण लेखनाचा परिचय इथेच झाला. याच नेटवर परिचित झालेले डॉ.मिलिंद पदकी यांनी इंग्लिश कवितेची आणि विश्वकवितेची माझी समज वाढवली, (पण त्याच वेळी मी वृत्तबद्ध लेखन सोडू नये असा वेळोवेळी आग्रहही धरला ) तर राजीव साने यांच्यासारख्या समकालीन महत्वाच्या विचारवंत-स्तंभ-ब्लॉग-लेखकाकडून प्रचलित आणि त्यांनी स्वत:च बनवलेल्या नवीनही वृत्तात लिहिलेली विचारप्रवण तत्त्वकविता वाचायला मिळाली. कवितेचा हा वाण अत्यंत महत्वाचा, ज्या मराठीत तत्त्वकवितेची उत्तुंग लेणी संतसाहित्यात आहेत त्या मराठीमध्ये नवीन विचारप्रवाहांशीही हस्तांदोलन करत वैचारिक कवितेचं समृद्ध दालन असलं पाहिजे..मार्टिन हायडेग्गर या थोर विचारवंताच्या वैचारिक कविता वाचताना हे जाणवत राहिलं.
राहता राहिले Whatsapp ! तिथेही ‘’एक कविता अनुदिनी’’ या मन्दार फडके यांच्या एका अत्यंत निष्ठेने आणि प्रेमाने चालवलेल्या कविता-ग्रूपमध्ये अनेक थीम्स घेऊन गंभीर कविता चर्चा होत होत्या त्यांमध्ये सहभागी झाले .माझ्या चित्र-कवितांची संकल्पना पुढे नेऊन ‘’Poetry and Paintings ‘’ असा २०१५च्या दिवाळीच्या पंधरवड्यात विशेष उपक्रमही आम्ही – मी,अमेय पंडित,रवींद्र कुलकर्णी,वर्षा हळबे,वैशाली वेलणकर यांनी पार पाडला.येथेही माझ्या सात चित्र -कवितांपैकी पाच निरनिराळ्या अक्षरगणवृत्तात, एक मात्रावृतात आणि एक सैलसर पद्य स्वरूपात होती. अमेयचेही याच स्वरूपाचे योगदान होते.)
ही इतकी नावं आली. कित्येक राहिलीही. यातले कोण कुठे ,कोण कुठे. देशभरात, जगभरात. सोशल मीडियाने भावविश्व आणि काव्यविश्वही आज व्यापलेलं आहे हे खरंच.कवितेला किती नव्या मिती मिळाल्या यातून, विचारांचं आदानप्रदान झालं.कधी वैचारिक शीणही आला
शेवटी हे नमूद केलंच पाहिजे की आजही मला कविता हे एक गूढच वाटतं. कविता अशी असावी आणि तशी नसावी असा कोणताच आग्रह मला या क्षणालाही वाटत नाही.
वृत्तबद्ध कविताही नि:सत्वपणे, आत्मा हरवून लिहिली असेल,किंवा आशयाच्या त्याचत्याच आवर्तात फिरत असेल ,किंवा नुसतीच शब्दप्रचूर किंवा उपदेशकी थाटातली असेल तर आक्रस्ताळ्या आवेशाने लिहिलेल्या मुक्तकवितेपेक्षा ती केवळ वृत्तात लिहिली आहे म्हणून श्रेष्ठ ठरत नाही. उत्स्फूर्त सौंदर्याने नटलेल्या साध्या पद्य किंवा गद्य कवितेच्या वाचन-मननातून त्यापेक्षा खूप काही मिळून जात असतं. स्वत:शी प्रामाणिक राहून हे अवधान राखलं पाहिजे.
चांगली कविता ही चांगली कविता असते. पण प्रत्येक कलेचं एक शास्त्र असतं.कवितेचं ते नसावं असा विपरीत आग्रहही किती चुकीचा आहे हे एक मात्र या प्रवासात मी शिकले. कवीला जर चांगलं वृत्तबद्ध लिहिता येत नसेल तर त्याने आत्मशोध घेतला पाहिजे ,स्वत:च्या कवीपणाला अधिक अभ्यासाच्या कसोट्यांवर खरं उतरवलं पाहिजे एवढं मात्र नक्की.
त्यासाठी सर्व शुभेच्छा कविता-यात्रींना.
-इत्यलम् !
-भारती बिर्जे डिग्गीकर
अत्यंत सुंदर लेख, आढावा!
अत्यंत सुंदर लेख, आढावा! भारती, तुम्ही मायबोलीवर असणार आहात अशी आशा करतो. अनुदिनी ग्रूप तर सोडलात मनन / चिंतन करण्यासाठी! आम्हा पामरांना तर आम्ही मनन, चिंतन करायला हवे इतकेही समजत नाही.
माझ्या नावाचा (एकदा तखल्लुस
माझ्या नावाचा (एकदा तखल्लुस आणि एकदा मूळनाम असा) दोनवेळा उल्लेख केल्याबद्दल आणि मुठभर मांस चढवल्याबद्दल आभारी आहे.
मस्त लिहीलेय !
मस्त लिहीलेय !
भारतींचे विचार वाचणे आणि
भारतींचे विचार वाचणे आणि त्यांच्या कविता वाचणे माझ्यासाठीच नव्हे तर अनेकांसाठी आनंदाच्या डोहात उतरण्यासारखेच आहे. त्यांच्या कवितावर लुब्ध होणार्यांची संख्या अनेक पदरी आहे तसेच त्या ज्या वेळी कवितेच्या संदर्भात लिहितात त्यावेळी त्यातून प्रकटणारे विचारलालित्य केवळ मन मोहवून टाकत नाही तर त्या अनुषंगाने आपलाही या संदर्भातील किती अभ्यास झाला आहे (वा झालेला नाही...) याचेही ज्ञान होत जाते. शिवाय भारतींच्याबद्दल मनी असलेला आदर द्विगुणीत होत जातो. ही सारी कमाल आहे त्यांच्या बुद्धीची आणि त्याना विलक्षण भावत असलेले काव्य प्रेम.
लेख वाचून झाल्यानंतर साधारण तासभर काही मुद्द्यांचा आढावा घेत राहिलो. समजून येत गेले की वृत्तबद्ध कवितांविषयी (आजच्या) साहित्यप्रेमीमध्ये माहिती असली तरी त्या अनुषंगाने हे प्रेमी त्या धर्तीची कविता करत राहतीलच असे नाही...त्याला कारण म्हणजे मुक्तकवितेने काबीज केलेले साम्राज्य. मर्ढेकरांपासून सुरू झालेली ही परंपरा रेग्यांनी आपल्या प्रयोगवादातून पुढे नेली...करंदीकरांनी तर मुक्तसुनीतांपासून आपला प्रवास गाजविला....या तिघांची जबरदस्त मोहिनी आजच्या कवीवर्गांवर झपाट्याने पसरण्याचे कारणही त्याना भावलेली विलक्षण भाषेची ओढ. चित्र्यांची प्रवृत्ती रेगे करंदीकरांपासून भिन्न असली तरीही त्यानी देखील मुक्तछंदाद्वारेच आपल्या संवेदना मांडल्या. "सत्यकथे" च्या माध्यमातून वृत्तबद्ध कवितेपेक्षा मुक्तछंदावर जोर देत गेल्यानेही ही दरी दुणावत गेली आहे असा साहित्याचा इतिहास सांगत आहे. मला वाटते भारती बिर्जे यानाही हे मान्य असावे.
लेखात एके ठिकाणी त्या म्हणतात..."..‘’ मराठी कवितेचं भवितव्य काय ?’’..." हा प्रश्न तर गेल्या पन्नास वर्षात साहित्याच्या संदर्भात समोर येतो...संमेलनातून यावर दळण दळले जाते. विचार मांडणारे आपले पेपर वाचतात, ठेवून देतात. कविता प्रसृत होत असतातच...कथा कादंबर्या बाजारात येतात...प्रकाशकांच्या अक्कलहुशारीने पुस्तके खपत असतात...(त्याबद्दल कुणाचीही तक्रार अर्थात नसतेच....). साहित्य संमेलनाच्या तीनचार दिवसात पुस्तकांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली अशा बातम्या वाचून एक साहित्यप्रेमी या नात्याने आनंद हा होतोच. कवितांच्या पुस्तकांचीही कुणी खरेदी करताना दिसले की समाधान मिळते. भवितव्य चांगलेच आहे. राहता राहिला प्रश्न तो प्राधान्याचा....वृत्तबद्ध कविता महत्त्वाची की मुक्तछंद...?
तरीही भारतींनी त्या खोलात जाण्यापेक्षा "...कविता अशी असावी आणि तशी नसावी असा कोणताच आग्रह मला या क्षणालाही वाटत नाही...." ~ हेच योग्य आणि विनाअट स्वीकृत वाटावे असेच आहे.
सुंदर आणि अभ्यासू लेखाबद्दल भारती यांचे अभिनंदन आणि हा वाचनानंद दिल्याबद्दल आभारही.
पूर्ण लेख मनात सामावून घेणं
पूर्ण लेख मनात सामावून घेणं शक्य झालं नाही. पुन्हा एकदा वाचावा लागेल. जेव्हढं वाचलं ते खूप सुंदर आहे.
जीए म्हणजे गद्यातले ग्रेस आणि ग्रेस म्हणजे गद्यातले जीए असं कुणीतरी म्हणालं होतं. गद्यातसुद्धा कविता असते, चित्रात असते, गीतात असते, नादामधे असते, लयीत असते... आत्म्यात असते. एक तारी घेऊन स्वतःच्या आनंदात गात जाणारा बंजारा हा स्वतःच एक कविता असतो. कदाचित आपली ओळख आपल्याला होत जाते तसतशी मग आपली कविता गवसते . कविता आधी, पद्य / गद्य हे बहुधा नंतर .
छान लेख.
छान लेख.
अतिशय सुंदर लेख ! बहुधा
अतिशय सुंदर लेख ! बहुधा प्रत्येक अस्वस्थ कवीच्या मनात उमटणारे प्रश्न आणि विचारांचे मंथन यातून अधिक सुस्पष्ठ रितीने मांडले गेलेय . मला वाटत की आताच्या काळातही जे कवी चांगली वृत्तबद्ध कविता लिहित असतील त्यांनी जरुर त्याच पध्दतीने सहज व्यक्त व्हावे आपल्या भाषेचा हा मौलिक ठेवा जतन करावा व पुढच्या पिढीलाही त्याची गोडी लागेल असं काहीतरी लिहीत योग्य ते मार्गदर्शन केल पाहिजे पण माझ्यापुरत म्हणायचं तर ज्या लयबंधात मला सहज उतरता येतेय ज़्यातून जगण्यातील घालमेल अधिक उत्कटपणे उच्चारता येणे शक्य आहे अशी स्वतःशी प्रामाणिक असलेली मुक्तछंदातलीच कविताच यापुढे लिहावीशी वाटतेय . काही कविता अपवाद असतील पण त्यातला आशयाचा आत्मा कुठेतरी लयीच्या आवर्तात हरवण्याचीच जास्त शक्यता वाटतेय. आणि मुळात अशी निर्दोष रचना जमणे प्रत्येकास शक्य नाही म्हणुन तर एखादेच नाव स्मरणात रहाते जसे की , 'भारती बिर्जे डिग्गीकर' .
यातला प्रत्येकच प्रतिसाद
यातला प्रत्येकच प्रतिसाद महत्वाचा ! धन्यवाद
बेफिकीर ,भूषण हे तुमचं मूळ नाव माझ्याकडून क्वचितच येतं ते या लेखात आलंय खरं आणि कदाचित तुमच्या दोन्ही महत्वाच्या भूमिका- कवी आणि गझलकार त्यातून नकळत वेगळेपणाने अधोरेखित झाल्यात. अनुदिनी या आपल्या प्रिय कवितागटातून अल्पविरामच घेतलाय. आणि अन्य जिथे जिथे माझा सातत्याने सहभाग अपेक्षित आहे तिथून बाहेर पडले .. ज्या कारणास्तव ते सफल होवो एवढीच इच्छा.
अशोक, नेहमीप्रमाणे तुम्ही या लेखामागची प्रयोजनं समजून घेतलीत.. त्यांचं सुंदर विश्लेषण केलंत.
अंतिम विधान नाही हीच अंतिमता आणि दुराग्रह नसावेत हाच आग्रह.
कापोछे , भुईकमळ , अगदी बरोबर. आधी स्वत:तल्या कवितेशी प्रामाणिक राहणे..
नासीर , मुक्तेश्वरजी ,आभार..
व्वा...भुईकमळ.... ~ तुमच्या
व्वा...भुईकमळ....
~ तुमच्या "..निर्दोष रचना जमणे प्रत्येकास शक्य नाही म्हणुन तर एखादेच नाव स्मरणात रहाते जसे की , 'भारती बिर्जे डिग्गीकर' ..." या वाक्याचे मलाही इतके समाधान आहे की जणू तुम्ही अनेकांच्या मनातील विचाराला शब्दांत मांडले आहे. सुंदरच.
भारती ताई, कवितेवर विचार
भारती ताई,
कवितेवर विचार करण्याची तुमची पद्धत मांडता मांडता तुम्ही घेतलेला हा आजच्या कवितेचा मागोवा खूप मस्त ! खास करून वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही लिहिलेल्या कवितांचे संदर्भ देऊन तुम्ही 'आजचे विषयही वृत्तबद्धतेत सामावले जाऊन प्रभावीपणे मांडता येऊ शकतात' हे ज्याप्रकारे सोदाहरण दाखवून दिलंय, ते खूपच महत्वाचं. स्वत:च्या कवितेकडे अश्याप्रकारे त्रयस्थ भूमिकेतून पाहता येणं, ही एक तुमची वेगळीच खासियत इथे दिसली. आपणच आपले टीकाकार असणं, ह्याहून मोठी उपलब्धी ती काय ? तुमच्या संपन्न अभिव्यक्तीची ही 'ट्रेड सीक्रेट' ह्यातून समजली !!
फक्तमुक्तभक्त कविमित्र व मैत्रिणींनी हे मंथन वाचून त्यावर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.
धन्यवाद !!
__/\__
धन्यवाद रसप अशोक _/\_ !
धन्यवाद रसप
अशोक _/\_ !
भारतीताई, खूप सुंदर लेख आहे.
भारतीताई,
खूप सुंदर लेख आहे. अभ्यासपूर्ण! आवडला. तसे तुमचे सर्वच लिखान अभ्यासपूर्ण असते!
चोरीच्या भीतीने मी आंतरजालावर फारशा कविता पोस्ट करत नाही. बरेच कवी असे करत असावेत.
तरीसुद्धा या विषयाशी संबंधित माझी एक कविता आहे. इथे लावायचा मोह आवरत नाही. खूप जुनी आहे.
.......................................................................................
कविते ये!
तू म्हणजे स्त्रीचं खरं खुरं रूप!
कधी प्रेमानं आलाप घेतेस
तर कधी रणचंडिकेचा अवतार!
कधी आलटून पालटून
वेगवेगळ्या साड्या नेसून नटावं थटावं
तशी
नवरसांपैकी प्रत्येक रस लेऊन
बहरून येतेस.
कधी रुसून बसतेस, तर कधी आपसूक जवळ येतेस.
तू म्हणजे नाजूक नारीचा नमुनाच!
पण....
आम्ही कवी तुला सभ्यतेनं वागवत नाही.
कुणी दासी समजतो, कुणी बटीक.
कुणी तुझ्यावर अत्याचार, बलात्कार करतो!
तुझ्यावर
वृत्त, छंद, अक्षरे, मात्रा..
किती किती बंधने घालतो!
जेव्हा तू
लाटांप्रमाणे पदन्यास करत येतेस
तेव्हा आम्ही
तुझी फक्त पावलेच मोजतो!
आणि जेव्हा तू
शालीन स्त्रीप्रमाणे ग़ज़लेचं रूप धारण करतेस
तेव्हा तर
तुझं अंतरंग न पाहता
बाह्यांगाचीच मापे काढतो!
..........................................
तशी होतेस कधी कधी मुक्त.
मग आम्ही म्हणतो,
'ती आता मुक्त आहे,
तरी तिला वळण लावलं पाहिजे!'
वळण लावणे आणि बंधनात ठेवणे
यातला फरकच आम्ही सांगू शकत नाही!
पण मी नाहीय तसा.
तुला वळण लावेन,
पण शृंखलाबद्ध करणार नाही.
तुझ्या रूपावर
आणि तुझ्या अंतरंगावर
निस्सिम प्रेम करेन!
तेव्हा नि:संकोच हो,
ये
आणि माझ्या मनाच्या प्रांगणात
बागडायला लाग!!
........................................................................
प्रतिक्रिया पण मस्त आहेत.
प्रतिक्रिया पण मस्त आहेत.
शरद,>> तुला वळण लावेन, पण
शरद,>> तुला वळण लावेन,
पण शृंखलाबद्ध करणार नाही.>>
हे अगदी पटलं. ही आनंदसाधना आहे, शिक्षा नाही.
मस्त आहे लेख
मस्त आहे लेख
सुधीर मोघे हे असेच
सुधीर मोघे हे असेच प्रतिभावन्त कवि ज्यानी छ्न्दबध्द कविता प्रामुख्याने लिहिली
सखी मन्द झाल्या तारका
आता तरी येशील का
हे कवितेला उद्देशून लिहिलेले गीत आहे असे वाचण्यात आले ; त्याची उगाचच आठवण झाली ; लेख आणी इथले प्रतिसाद वाचताना...
आज हा लेख वाचला. खूप व्यापक
आज हा लेख वाचला. खूप व्यापक असं विश्लेषण केलं आहे.
कवितेविषयी अनेक वर्षे मनात द्वंद्व चालू आहे. प्रत्येकाची कवितेबाबतची निरनिराळी मतं असतील.
असायला पाहीजेत. मतभिन्नता असायला पाहीजे.
यातला आवेग हा मुद्दा खूप महत्वाचा.
माणसाच्या सहजभावाचं व्यक्तीकरण तो पद्यात करतो कि गद्यात हे त्याच्यावर सोडावं.
ज्याच्या अंगात लय भिनलेली असेल त्याच्या साठी पद्यात कविता करणे सहज असेल.
मात्र मनुष्य जेव्हां एखाद्या भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार होणार्या प्रसंगातून जात असेल, त्या क्षणी तो कविता लिहू शकत नाही. जर त्या क्षणी त्याच्या डोक्यात कविता जन्म घेत असेल तर स्वतःवर, प्रियजनांवर गुदरलेल्या प्रसंगाच्या क्षणी त्याला हा प्रसंग इतरांना कसा "भिडेल" हेच त्याच्या मनात असू शकते. तो प्रियजनांच्या बाबतीत प्रामाणिक नाही असे म्हणावे लागते. त्या क्षणी येणारे दु:खाचे कढ, थोडीशी आशा पल्लवित झाल्यावर होणारा आनंद, आसू हासूचा खेळ हे तत्क्षणी मांडता येणे अशक्य. यातून प्रत्येकाला जायचे आहे. कदाचित काही जणांच्या बाबतीत असे प्रसंग खूप उशिराने येत असतील.
असे अनुभव खोलवर जखमा देतात. त्या कालांतराने भरून निघतात. तीव्रता कमी होते.
त्या वेळी त्या प्रसंगाबद्दल लिहीताना तो आवेग उमटणे शक्य नसते. थोडक्यात आपली अनुभूती शंभर टक्के उतरलेली नसते.
ती अनुभूती फक्त स्वतःशी प्रामाणिक असेल तर ती सुंदर दिसेल का ? तिला सजवावी का ? अलंकार, गेयता असावी का ? हे प्रश्न पडू शकतात.
मुळात तुमच्या दु:खावर लिहीलेल्या कलाकृतीला कुणी छान म्हटलेले चालेल का ?
ते दु:ख सजवून लोकांना रसास्वादासाठी द्यावे का असे अनेक प्रश्न आहेत.
कदाचित काही काळाने शब्दांची अदलाबदल होईल, काही भरजरी शब्दांसाठी काही साधे शब्द आपला बळी देतील. त्यातला भाव पातळ होईल. गेयतेसाठी थोडी तडजोड होईल.
रानात उन्हात राबल्याने अंगाच्या रंगाला राप चढलेली काळी सावळी तरतरीत स्त्री सुद्धा सुंदर दिसते. तिला ब्युटी पार्लर मधे नेऊन रंगसफेती करून , कॉस्मेटिक सौंदर्य थापून ती आणखी सुंदर दिसेल. कुणाला प्रामाणिक रूप भावेल कुणाला सजवलेलं. तेच कवितेचं आहे.
इथे जर्नेलिझम करणार्या कवितेबद्दल पास.
जोपर्यंत आपल्याकडे अनुभूती नाही तोपर्यंत कविता लिहीणारे आजच्या काळात दुर्मिळच. म्हणूनच कविताच सुचत नाही या आपल्या अनुभूतीवरच " मधुघट" लिहीणारे भा रा तांबे विलक्षण कवी वाटतात. या अवस्थेचं इतकं सुंदर प्रकटीकरण करणारा कवी हाडाचाच म्हणायला हवा. अशा अनुभूतीवर लिहायला अर्थातच अपराधबोच असण्याची गरज नाही...
सोशल मिडीया हा आणखी स्वतंत्र
सोशल मिडीया हा आणखी स्वतंत्र विषय.
कवितेच्या संदर्भात तर आणखीच नाजूक. कारण आपली अभिव्यक्ती प्रकाशित करणारा प्लॅटफॉर्म हाताशी असणे हा शापही आहे आणि वरदानही.
कविता लिहून त्यावर महिना महिना चिंतन करणारे कवी पाहिलेत. तर कविता लिहील्यानंतर त्यात एका शब्दाचाही बदल करू नये असे मत असणारेही. दोन्हींमधे जेव्हां ही कविता प्रसिद्ध होईल कि नाही याबद्दल साशंकता असते तेव्हां ती स्वतःशी प्रामाणिक असण्याची शक्यता जास्त असते.
मीडीया हाताशी असल्यावर चटदिशी लोकांना आवडेल असे काहीतर काय लिहावे बरं ? असा विचार बळावणे सहजशक्य आहे.
सोशल मिडीयात वाह वाह मिळवण्यासाठी निमित्त शोधणार्यांनी लेखक/ कवी आणि वाचक / रसिक हे नातेच बिघडून टाकलेले आहे.
ताणतणाव हलका करण्यासाठी सोशल मीडीयाचा वापर करता आला तर त्यासारखं दुसरं काहीच नाही. अर्थात ज्यांना करीयर म्हणून सोशल मीडीयाचा वापर करावा लागतो त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. सातत्याने ब्रं दिसावं असं व्यक्त होणं सोपं नाही. ताण कमी होण्याऐवजी वाढतच असावा ...
मस्त लिहीलेय !
मस्त लिहीलेय !
"सलाम"!
"सलाम"!
सध्या मुले Kg घेतात.(पुल?)
सध्या मुले Kg घेतात.(पुल?)
आणि कविता मीटर मध्ये मोजतात. (मी)