कविची मुलाखत
= काय हो, मिळाले का तुम्हाला हवे ते?
केला का न्याय तुमच्यावर, जीवनाने?
*जीवन म्हणजे काय, हवे ते मिळणे?
तो प्रवास खडतर, ते ठेचकाळणे,
ती शोधाशोध, रोज नवी चाहूल लागणे,
त्या पाठशिवणीतच, उडाले अवघे जगणे.
अपराध कधी, कोणता नव्हताच केला,
झाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला.
मीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा,
जीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा?
=निदानपक्षी, प्रेम तरी असेल मिळाले?
आनंद,समाधान,थोडेसे वाट्याला आले?
*पाहिलात का कधी कोणी कवि सुखांत?
समाधाने डुम्बताना, म्हशीसारखा डबक्यांत?
खातो मी गटांगळ्या खोल अंधार्या गर्तेंत,
अखंड वेदनांची जालीम मदिरा प्याल्यांत.
प्रीती म्हणाल तर, होय, मिळाली.
त्या क्षणाचा मी, त्या क्षणाची ती,
एकमेकांत उतरलो, हरखलो किती.
मालकीचा नव्हताच, हव्यास स्वार्थी.
चिरन्तन कधी काही, असते का जगांत?
सुख, आनंद, प्रेम, ध्येय, मन:शांत?
फक्त माया चिरंतन, आशा चिरंतन,
बाकी सगळंच भंगूर, माझी कविताहि.
=एक प्रश्न विचारू का, शेवटचा?
नव-कवि तरुणांना संदेश काय तुमचा?
* विचारून संपणारे प्रश्न, नसतातच विचारायचे.
हुलकावणार्या उत्तरांच्या मागे, कविने धावायचे.
मी कवि आहे,
'एस.एस.सी. हिंदी दो दिनोंमे' चा लेखक नाही.
-बापू.