नमस्कार मंडळी !
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने आपण मायबोलीकर २०१० सालापासून (गतवर्षीचा अपवाद वगळता) काही ना काही उपक्रम राबवत असतो आणि या उपक्रमांना नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभत असतो. तर याही वर्षी सहर्ष घेऊन येत आहोत असेच काही उपक्रम.
हे वर्ष श्री. गो. नी. दांडेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या वर्षीचा हा उपक्रम-सोहळा गोनीदांना सादर समर्पित करत आहोत.
गो. नी. दांडेकर म्हणजे मराठी सारस्वताला पडलेले भटके स्वप्नच. त्यांचे विपुल साहित्य आणि भ्रमंती पाहता त्यांचे हात आणि पाय सतत चालतच राहिले असावेत, असे वाटते. गोनीदांचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व बेजोड होते. त्यांनी आपल्या साहित्यामध्ये कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळबोली, ठाकरबोली अशा वेगवेगळ्या बोलीभाषा इतक्या बारकाव्यानिशी वापरल्या की कोणालाही वाटेल ते त्याच प्रांतातले असावेत. अशी मुशाफिरी करणारा दुसरा लेखक नाही आणि असे लेखन करणारा दुसरा मुसाफिर नाही.
सध्याच्या काळात गड-किल्ल्यांच्या सैर-भेटी / रानावनातल्या भटकंती फोफावल्या आहेत. गडाकिल्ल्यांवर नेणार्या संस्थांना उर्जितावस्था आली आहे. एकाही गडाकिल्ल्याला भेट न दिलेला मराठी माणूस आजमितीस मिळणे दुर्मीळच. पायी भटकंतीचे वाढलेले प्रमाणदेखील अफाट आहे. जागतिकीकरणाच्या रेट्याने आज मराठी माणूस जगाच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे. जिथे जाईल तिथे त्याची पदभ्रमणाची हौस उफाळून येते आणि मग अशी हौस उफाळून आल्यावर तो भटकंतीला निघतो. मराठी माणसाने पादाक्रांत केलेली नाहीत अशी फार कमी ठिकाणे जगाच्या पाठीवर असतील. ह्या सगळ्याला गोनीदा फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांनी अनेक किल्ल्यांना अक्षरशः शेकडो भेटी दिल्या. किल्ल्यांवर पुस्तके लिहिली.
अशा महान लेखक-मुशाफिराचे, गोनीदांचे, स्मरण करून सादर करत आहोत लेखनविषयक उपक्रम - शब्दपुष्पांजली
विषय पहिला - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक / व्यक्तिरेखा
विषय दुसरा - मला भावलेले श्री. गो. नी. दांडेकर
विषय तिसरा - माझे दुर्गभ्रमण / मी पायी केलेली भटकंती
विषय पहिला - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक किंवा त्यांच्या पुस्तकातील व्यक्तिरेखा
या विषयांतर्गत आपण एका लेखात गो. नी. दांडेकरांच्या आवडलेल्या कोणत्याही एकाच पुस्तकावर लिहायचे आहे. त्या पुस्तकातली सौंदर्यस्थळे, भावलेली संकल्पना, वाचनाने मिळालेला आनंद इत्यादी आमच्याबरोबर वाटून घ्यायचा आहे. तसेच गोनीदांच्या पुस्तकांतील अनेक व्यक्तिरेखा अगदी मनात घर करून बसतात. काहीजणांना 'माचीवरला बुधा' भावतो, तर काहींना 'जैत रे जैत'मधली चिंधी. तर आपल्याला अशाच एखाद्या व्यक्तिरेखेविषयी लिहायचे आहे. त्या व्यक्तिरेखेचे कोणते स्वभावविशेष आपल्याला भावले, त्या व्यक्तिरेखेने आपल्या जीवनावर काही प्रभाव पाडला का, असल्यास कसा पाडला, ती व्यक्तिरेखा का आवडते, यां संदर्भांत मोकळेपणाने लिहावे.
विषय दुसरा - मला भावलेले श्री. गो. नी. दांडेकर
या विषयांतर्गत आपण आपल्याला भावलेल्या गोनीदांच्या स्वरूपाबाबत लिहू शकता. मग ते प्रचंड ताकदीचे लेखक म्हणून असो, छायाचित्रकार म्हणून असो, गडाकिल्ल्यांचे प्रवक्ते म्हणून असो. या व्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवर आपल्याला आलेले अनुभव, सुखद आठवणी, अविस्मरणीय घटना यांबद्दल लिहिले तरी चालेल.
विषय तिसरा - माझे दुर्गभ्रमण किंवा मी पायी केलेली भटकंती
या विषयावर लिहिताना आपण वेळोवेळी केलेल्या वेगेवेगळ्या गडाकिल्ल्यांच्या भटकंतीचा मागोवा / आढावा घ्यायचा आहे. गडाकिल्ल्यांवर जाण्याची आवड आपल्यामध्ये कशी आणि कधी निर्माण झाली, आजवर कोणकोणत्या गडांवर गेलात, काय अनुभव मिळाले ते लिहावे. रोमहर्षक प्रसंग, केलेली साहसे यांबद्दलही लिहावे कधी क्वचित झाली असेल(च) तर त्या फजितीबद्दलदेखील लिहावयास हरकत नाही.
आपण सगळेच अनेकविध कारणांनी पायी भटकत असतो. पण काही भटकंतींमध्ये अगदी अविस्मरणीय असे अनुभव येतात. वाहन चुकले म्हणून सक्तीने तुडवलेला रस्ता असो वा आदिवासी भागात स्वयंसेवक म्हणून गेलेले असताना केलेली पायपीट असो, नर्मदा परिक्रमा किंवा पंढरपूरची वारी असो, किंवा देशविदेशात केलेले ट्रेकिंग,असे अनुभव आपल्याला समृद्ध करतात. या विषयांतर्गत तुम्ही लिहू शकता तुमच्या कुठल्याही पायी केलेल्या भटकंतीबाबत. मात्र ती अगदीच घर ते स्टेशन अशी केलेली नित्य पायपीट नसेल, एवढीच अपेक्षा आहे.
नियम –
१. ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१६' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
२. लिखाण स्वलिखित असावे.
३. या उपक्रमातील धागे २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०१६ या चार दिवसांतच काढावेत. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
शब्दपुष्पांजली - विषयाचे नाव
सूचना -
हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
या लेखनाला शब्दमर्यादेचे बंधन नाही.
हा आपल्या मराठीचा आपल्या मायबोलीवर साजरा करत असलेला सोहळा आहे. त्याला साजेसे लेखन असेल, याची खबरदारी आपण घ्यालच.
मायबोलीच्या इतर उपक्रमांप्रमाणेच या उपक्रमालादेखील सर्व मायबोलीकर भरभरून प्रतिसाद देतील, अशी खात्री आहे. तर मंडळी सुसज्ज व्हा, या सोहळ्यात सहभागी व्हायला.
लवकरच भेटू पुढच्या उपक्रमाच्या माहितीसह.
मस्तच हर्षल आणि अमेय नक्की
मस्तच हर्षल आणि अमेय
नक्की जमवा ! (ल) याची खात्री आहे.
छान उपक्रम. बराच काय काय
छान उपक्रम. बराच काय काय वाचायला मिळेल गो नि दाच्या पुस्तकांबद्दल
संयोजक/शुगोल : तुम्ही आधी
संयोजक/शुगोल : तुम्ही आधी लिहिलेल्या त्या लेखाची लिंक मिळेल का, प्लीज?
हर्षल, हि घ्या
हर्षल, हि घ्या लिंक:
http://www.maayboli.com/node/41388
धन्यवाद मॅगी
धन्यवाद मॅगी
गोनिदा अन त्यांची पुस्तक
गोनिदा अन त्यांची पुस्तक मोबोकरच नव्हे तर त्यांच्या आप्त , मित्रमंडळीनादेखिल लिहितं करतील. त्याना ही सहभागी होता येइल मायबोली च सदस्य बनण सोप्प आहे.
"अशी मुशाफिरी करणारा दुसरा
"अशी मुशाफिरी करणारा दुसरा लेखक नाही आणि असे लेखन करणारा दुसरा मुसाफिर नाही." >>>> कसलं मस्तं वाक्य आहे!
गोनींच्या प्रत्यक्ष आठवणी देखील वाचायला मिळणार ! मेजवानीच आहे!
स्विट टॉकर , वाचायलाच नाही तर
स्विट टॉकर , वाचायलाच नाही तर लिहायला पण मिळणार आहे.
लिहा पाहू. लेखन विषय पाहिलेत ना?
मुग्धटली तुझ्या आठवणी वाचायला
मुग्धटली तुझ्या आठवणी वाचायला अतिशय उत्सुक आहे.
छान उपक्रम.. आता पुस्तक वाचणे
छान उपक्रम.. आता पुस्तक वाचणे आले..
(No subject)
कोंबडा मस्त.
कोंबडा मस्त.
मराठी भाषादिन उपक्रम
मराठी भाषादिन उपक्रम सुरेखरित्या पार पाडल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन, बरेच वाचनीय लेखन यानिमित्ताने समोर आले. गोनीदांच्या जन्मशताब्दीचे औचित्यही साधले गेले.
खास लोकाग्रहास्तव या
खास लोकाग्रहास्तव या उपक्रमाची मुदत शनिवार, ५ मार्च २०१६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Pages