प्रतिशोध
तुंगारेश्वरच्या टेकडीवर आज बरीच गर्दी जमली होती. वातावरण तणावाचं होत. पोलीसांची तुकडी एव्हाना घटनास्थळावर पोहचली होती. झालं असं होत की, काल येथे पिकनीकसाठी म्हणुन आलेल्या एका मुलाचा मृत्यु झाला होता. पोलिसांनी परिसराला सील केलं होतं. दोन पोलीस टेकडीच्या कडेला डेडबॉडीच्या आजूबाजूचा परिसर चेक करीत होते. टेकडीवर जिथून कडा सुरु होतो त्याच्या दहा बारा पावला अगोदर एका मोठ्या दगडाच्या बाजुला एका तिशी-पस्तिशीच्या मुलाचं प्रेत पडलं होतं. पोलिसांचा फोटोग्राफर त्या डेडबॉडीचे आणि आजुबाजुच्या सगळ्या गोष्टीचे सटासट फोटोज काढत होता. एक हवालदार तिथे जमलेल्या गर्दीला जमेल तितकं त्या घटनास्थळापासुन लांब ठेवायचा प्रयत्न करत होता. पण जसजसा दिवस वर चढत होता तशी आजूबाजूची बघ्यांची गर्दीही वाढत चालली होती.
"आम्हाला फोन कुणी केलेला?" हवालदार अहिरनी समोर सर्वात पुढे उभे असलेल्या चार पाच माणसांना पाहून विचारलं
"मी साहेब..." त्यातला एकजण पुढे आला आणि हवालदार अहिरांना म्हणाला.
त्या पुढे आलेल्या तरुणाला हवालदार अहिरनी एका नजरेत खालपासुन वरपर्यंत न्याहाळलं. विशेष असं काही नाही पण त्यांची तशी ती एक पध्दतच होती.
"नाव काय आपलं?"
"अभिजीत......अभिजीत गायकवाड" त्या तरुणाने हवालदार अहिरांच्या प्रश्नाला थोड अडखळत उत्तर दिलं.
"तर गायकवाडसाहेब, हा इथे जो झोपलाय त्याला तुम्ही ओळखता का?" अहिरांनी त्या डेडबॉडीकडे बोट दाखवून अभिजीतला विचारलं.
"हो..माझा मित्र आहे तो . .." अभिजीतला खरतर हवालदारांनी अश्या प्रकारे हा प्रश्न विचारल्याच्या राग आला होता.
"आहे नाही.... होता." हवालदार अभिजीतची व्याकरणाची चुक सुधारत म्हणाले.
"बरं....नाव काय होतं तुमच्या मित्राच?"
"पुष्कर .....पुष्कर म्हात्रे"
पुष्कर म्हात्रेचं नावं ऐकताच हवालदार चमकले.
"पुष्कर म्हात्रे ....म्हणजे हा रवी म्हात्रेंचा मुलगा तर नाही" हवालदारांनी साशंक होत अभिजीतला विचारलं.
"हो ......हा अप्पांचाच मुलगा आहे" अभिजित पटकन बोलला.
अप्पांच नाव ऐकताच हवालदार अहीर थोडे गडबडले. कारण आता हे प्रकरण आपल्याला धंद्याला लावणार हे त्यांना कळुन चुकलं. पण त्यांनी तसं चेहरयावर दाखवून न देता परत आपल्या कामाला लागले.
"आणि हा कोण आहे?" अभिजीतसोबत पुढे आलेल्या त्या दाढीवाल्या तरुणाकडे पाहून हवालदार अहिरनी अभिजीतला विचारलं.
"हा आमचा मित्र.. तसदीक शेख"
तस लगेचच तसदीकने हवालदार अहिरांना कुर्निसात केला. हवालदार अहिरांनी त्यालाही अभिजीतसारखचं आपल्या नजरेने वरून खालपर्यंत न्याहाळालं अन पुन्हा आपल्या कामाला लागले.
हवालदार अहिर त्या दोघांची जबानी नोंदवुन घेत असतानाच
"बोला अहिर काही कळलं का?"
पाठिमागुन अचानक आलेल्या त्या आवाजाने सगळेच दचकले. अहिरनीं आवाजाच्या दिशेने पाहिलं तर इंस्पेक्टर अभय राणे डेडबॊडीच्या जवळ उभे राहून तिची पहाणी करत होते आणि ते करीत असतानाच त्यांनी हवालदार अहिरांना हाक मारली होती. त्यांना पाहून हवालदार अहिर लगबगीने पुढे झाले.
इंस्पेक्टर अभय राणे............
एक हुशार आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांची डिपार्टमेंटमधे ओळख होती. त्यांच्याकडे पाहून त्यांच वय त्यांच्या हुददयाला साजेसे वाटत नव्हतं. इंस्पेक्टर अभय राणे नुकतेच वसई तालुक्यात सिनिअर इंस्पेक्टर म्हणुन रुजू झाले होते. त्यांना ड्युटी जोईन करून अजुन आठवड़ाही झाला नव्हता की त्यांच्या एरियातला हा पहिला गुन्हा घडला होता आणि तो ही एक संशयास्पद मृत्यु....
"जयहिंद साहेब....." हवालदार वैभव अहिरनी इंस्पेक्टर अभय राणेना एक कडक सल्युट ठोकला.
"अजुन तरी काही जास्त कळलं नाही साहेब. पण आतापर्यंतच्या चौकशीवरुन मयत तरुण वसईचा रहाणारा आहे आणि त्याच नाव आहे.
पुष्कर म्हात्रे.
काल त्याच्या दोन मित्रांसोबत इथे पिकनीकला आला होता साहेब. त्या मित्रांच्या जबानीनुसार काल रात्री झोपताना सगळे एकत्र होते पण सकाळी उठल्यावर मात्र पुष्कर त्यांच्यासोबत नव्हता. शोधाशोध केल्यावर तो त्यांना ह्या इथे अश्या अवस्थेत सापडला. मग त्यांनी लगोलग आपल्याला फोन करून कळवलं. सध्या बघून तरी असं वाटतयं की हार्टफेलची केस आहे साहेब." हवालदारांनी इंस्पेक्टर साहेबांना आतापर्यंतची सगळी माहीती पुरवली.
"आणि अजुन एक साहेब. मयत हा अप्पा म्हात्रेंचा एकुलता एक मुलगा आहे साहेब" हवालदार अहिरांनी अडखळत इंस्पेक्टर अभयला सांगितलं.
हवालदार अहिरांच्या ह्या बोलण्यावर इंस्पेक्टर अभयनी त्यांच्याकडे तिरक्या नजरेने पहात एक सिगरेट शिलगावली आणि म्हणाले.
"हम्म.....त्याच्या मित्रांना बोलवा इकडे"
हवालदार अहीर लगेच अभिजीत आणि तसदिकला इंस्पेक्टर अभयच्या समोर घेउन आले.
"साहेब हां अभिजीत आणि हा तशरीफ"
"तसदीक" अभिजीत हवालदारची चुक सुधारत बोलला.
"एव्हढी कठिण नावं कशाला ठेवता रे तुम्ही लोक" हवालदार अहीर वैतागत बोलले. पण त्यांचा खरा वैताग हा तसदिकचे नाव विसरल्याचा नसून चारचौघात अभिजीतने त्यांची चुक दाखवून दिल्याबद्दलचा होता.
इंस्पेक्टरनी हात दाखवून अहिरांना आता शांत व्हायला संगितलं.
"हम्म......तू बोल काय झालं" इंस्पेक्टरनी अभिजीतला विचारलं.
"त्याच असं झालं की, आम्ही काल संध्याकाळी इथे आलेलो. आम्ही म्हणजे मी, तसदीक आणि पुष्कर."
"कशाला?" हवालदार अहिरनी मध्येच विचारलं.
"काल पुष्करचा वाढदिवस होता. त्याच निमित्ताने आलेलो इकडे. त्याचाच प्लान होता" तसदीक हळुच बोलला
"बरं मग??" इंस्पेक्टरने अभिजीतला पुढे सांगायची खुण केली
"मग काही नाही थोडा टाईमपास केला, रात्री तसदिकने सोबत आणलेली बिर्यानी खाल्ली आणि मग झोपलो." अभिजीतने तसदिककडे पहात आठवत आठवत सांगायला सुरुवात केली.
"टाईमपास म्हणजे दारुकाम केलेल असणार...?" हवालदार अहीर पुन्हा मधे बोलले.
ह्यावर अभिजीत आणि तसदीक दोघेही शांत राहिले.
"आता सांगताय की तुमचा बार उडवु...." हवालदार अहिरांनी त्या दोघांना आवाज चढवत विचारलं
"हो, तशी थोडीशी घेतली होती" तसदीक अडखळत म्हणाला. हवालदार अहिरांनी पटकन ही गोष्ट त्यांच्या जबानीत नमूद केली.
"मग दारु पिउन भांडण केलं असणार?" अहिर लिहिता लिहिताच विचारत होते.
"नाही साहेब" हवालदार अहिरांच्या ह्या प्रश्नांवर दोघेही एकदम उत्तरले.
तस इंस्पेक्टरांनी अहिरांकडे पहात हलकीशी स्माईल दिली आणि आपली नजर अभिजितवर रोखून विचारलं.
"बरं पुढे????"
"सकाळी उठून पाहिलं तर पुष्कर जागेवर नव्हता. आम्हाला वाटलं की तो इथेच कुठेतरी गेला असेल पण बराच वेळ तो आला नाही तेव्हा थोडा विचित्र वाटलं. त्याला शोधता शोधता इथे आलो. तर आम्हाला पुष्कर इथे असा ह्या अवस्थेत दिसला. पहिलं वाटलं की तो झोपलाय. जवळ जाऊन पाहिलं तर तो छातीवर हात ठेवून आभाळाकडे सताड डोळ्यांनी पहात शांत पडला होता. सुरुवातीला मला वाटलं की, साला नाटक करतोय म्हणुन. मी त्याला हाका मारल्या पण त्याने काही रिस्पोंस दिला नाही. मग त्याला मी गदागदा हलवलं पण काही उपयोग झाला नाही. मग मला थोडं टेन्शन आलं. तसदीकने त्याचा श्वास पाहिला आणि मला म्हणाला की,
"भाई गेला....."
मला तर हे खरच वाटेना काल रात्रीपर्यंत आमच्यासोबत असलेला पुष्कर असा अचानक सकाळी जातो. मला तर काही सुचतच नव्हत. मग मीच तुम्हाला फोन लावला.
काय झालं? कसं झालं? काहीच कळलं नाही" हे सांगताना अभिजीतचा आवाज कातर झाला होता. तसदिकने अभिजीतला सावरलं.
"मलापण हाच प्रश्न पडलाय की काल रात्रीपर्यंत तुमच्यासोबत असलेला पुष्कर असा अचानक सकाळी कसा काय जातो????" हे बोलताना इंस्पेक्टरनी आपली बेरकी नजर अभिजीत आणि तसदिकवर रोखली. तसे अभिजीत आणि तसदीक दोघेही शहारले.
इंस्पेक्टरचा बोलण्याचा रोख नक्की कश्यावर आहे हे लक्ष्यात येताच तसदिक लगेचच म्हणाला.
"आम्ही काय नाय केला साहेब अल्ला कसम....आम्ही कशाला असं करणार. पुष्कर तर आपला दोस्त होता आणि मला तर अगदी भाईजानसारखा"
"ठीक आहे..don't be panic guys. पुष्कर कुणाचा दोस्त होता आणि कोण पुष्करचा दुश्मन हे आम्ही शोधून काढुच......अहीर ह्या जबानीवर दोघांच्याही सह्या घ्या आणि ह्या दोघांना गाडीत बसायला सांगा" इंस्पेक्टर अभय तसदिकच्या गालाला हात लावीत त्याला चुचकारत म्हणाले
इंस्पेक्टर अभयच्या ऑर्डरनुसार हवालदार अहीर त्या दोघांना घेउन गेले. इंस्पेक्टर पुन्हा पुष्करच्या बॉडीजवळ येउन उभे राहिले. पुष्कर सताड डोळ्यांनी आभाळ पहात होता. त्याच्या वयावरुन आणि देहयष्टीवरुन ह्या तरुणाचा मुत्यु हार्टअटेकने झालाय हे कुणाला सांगुनही पटलं नसतं. पण असो वेळ काय कुणावर सांगुन का येते. फ़क्त राहून राहून एकच गोष्ट इंस्पेक्टर अभय राणेंना कळतं नव्हती की, एव्हढ्या सकाळी पुष्कर आपल्या मित्रांना सोडुन इतक्या लांब का आला होता? अन मुख्य म्हणजे पुष्कर तिथून इतक्या लांबवर इथे येउन असं होईपर्यंत त्याच्या मित्रांना काहीच कसं कळलं नाही? आपल्याला हि गोष्ट ज़रा खोलात जाउन शोधायला लागणार आहे असा विचार करून इंस्पेक्टर अभयनी आपल्या हातांनी पुष्करचे सताड उघडे डोळे मिटुन टाकले.
**************************************************************************
पुष्करला जाउन आता दोन दिवस झाले होते. अप्पा आज पोलीस स्टेशनमधे इंस्पेक्टर अभय राण्यांसमोर बसले होते. अप्पा म्हणजे पुष्करचे वडील म्हणजेच रवी म्हात्रे ही वसई-विरार मधली बडी असामी. वसई-विरार मधील राजकारणातलं मोठं प्रस्थ. त्यांनी स्वत: कधी निवडणुक लढवली नसली तरी येथील राजकारणात त्यांचा वचक जबरदस्त होता. पुष्कर हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. म्हात्रे घराण्याचा एकमेव वारसदार. आता आपल्या उतारवयात मुलाच्या ताब्यात सगळा कारभार सोपवून स्वत: मोकळं व्हावं असा विचार करीत असतानाच अप्पांवरती हा बिकट प्रसंग ओढावला होता. पुष्करची आई तर वेडीपिसी झाली होती. अप्पाही अजुन ह्या धक्क्यातून सावरले नसल्याचं त्यांच्या चेहरयावरून स्पष्ट दिसत होत.
इंस्पेक्टरांनी पुष्करच्या मृत्यु संदर्भातल्या सगळ्या गोष्टी अप्पांना सांगितल्या. प्रत्यक्षदर्शीच्या जबान्या आणि परिस्थितीजन्य पुराव्यानुसार पुष्करचा मृत्यु हा प्रथमदर्शनी तरी नैसर्गिकच वाटत होता.
अ कार्डिक अरेस्ट.
लवकरच पोस्टमोर्टचा रिपोर्टही येईल. पण त्यातही काही वेगळ सापडण्याची शंका नव्हती हे ही त्यांनी अप्पांना सांगितलं. अप्पांनी इंस्पेक्टर अभयचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि थंडपणे म्हणाले.
"मला तुमच्या ह्या रिपोर्टशी काहीएक घेणंदेणं नाहिए. माझ्या मुलाचा मृत्यु हा झालेला नसून तर घडवुन आणलेला आहे. तुम्ही तुमच्या तपासाची सूत्र त्या दृष्टीने हलवा"
खरतर इंस्पेक्टरांना अप्पांच्या अश्या बोलण्याचा प्रचंड राग आला होता. पण अप्पांचं वय आणि त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाच भान ठेवून इंस्पेक्टर अप्पांना काहीच बोलले नाहीत.
"ठीक आहे अप्पासाहेब, आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्ही काळजी करू नका. मला एक सांगा अप्पासाहेब, अभिजीतबद्दल आणि त्या तसदिकबद्दल तुमचं काय मत आहे." इंस्पेक्टरांनी अप्पांना विचारलं.
"ती पोरं चांगली आहेत. अगदी शाळेपासुन एकामेकांना ओळखतात. अगदी माझ्यासमोरच लहानाची मोठी झालीत. आम्हाला ती अगदी घरातल्यासारखी आहेत. त्यांच्याबद्दल शंका घ्यायचं काहीच काम नाही. त्या मुलांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यात आपली मेहनत सार्थकी लावा." अप्पा वैतागत बोलले.
आता मात्र इंस्पेक्टरांचा संयम सुटला आणि ते टेबलावर आपला हात जोरात आपटतं अप्पांना म्हणाले.
"आमचं काय काम आहे आणि आम्ही काय केलं पाहिजे, हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही अप्पासाहेब. हे पोलीस स्टेशन आहे तुमच्या भाषणाचा स्टेज नाही. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत पण तुमच्या फ़्रस्टेशनमधे नाही. तुम्ही तुमच्या मुलाच्या मृत्युची रितसर तक्रार नोंदवा. तसचं तुम्हाला कुणावर संशय असेल तर तसं लेखी कळवा. पुढचं आम्ही बघून घेउ. तुम्ही आता येउ शकता."
इंस्पेक्टर अभयचा हा अविर्भाव अप्पांसाठी नवीन होता. आजतागायत कुणीही त्यांच्याशी अश्या पध्दतीने बोललं नव्हतं. ते तड़क उठून निघून गेले. अप्पा गेल्यावर इंस्पेक्टर अभय विचार करीत होते. बाक़ी सगळं ठीक आहे पण पुष्कर आपल्या मित्रांना सोडुन इतक्या लांब एकटाच का गेला होता? तेव्हढ्यात हवालदार अहिरांना समोर पाहून त्यांना त्यांनी विचारलं
"अहिर तुम्हाला काय वाटतं ह्या केसबद्दल."
एक दिर्घ उसासा सोडुन हवालदार म्हणाले
"हेच की अप्पा काही आता शांत बसणार नाहीत आणि आपल्याला हे प्रकरण काही शांत बसु देणार नाही"
**************************************************************************
इंस्पेक्टर अभय आज सकाळीच पोलीस स्टेशनमध्ये आले आणि आल्याआल्याच त्यांनी हवालदार अहिरांना आत केबीनमधे बोलावलं.
"बोला अहिर, त्या मुलांबद्दल काही कळलं का?"
"हो..तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चौकशी केली त्या पुष्कर म्हात्रेची. जितके अप्पा आपल्या विभागात त्यांच्या कार्यामुळे लोकप्रिय होते, तितकाच त्यांचा मुलगा पुष्कर हा त्याच्या कलागुणांमुळे लोकांमधे बदनाम होता. दादागिरी, अरेरावी हयात पुष्कर सगळ्यात पुढे होता. वडिलांच्या जिवावर फार माज करायचा. आतातर राजकारणात उतरले होते साहेब, त्यामुळे हल्ली त्याचा आगाउपणाही ज़रा जास्तच वाढलाच होता. थोडक्यात काय तर धाकटे म्हात्रे साहेबांबद्दल काही चांगलं सांगण्यासारख नाही."
"हम्म.....बर मग त्याच्या मित्रांच काय?"
"पुष्कर, अभिजीत आणि तसदीक हे तिघेही शाळेपासुनचे मित्र होते. तो अभिजीत गायकवाड सिव्हील इंजिनिअर आहे. टेक्नीमोंट आयसीबी नावाच्या एका मल्टीनेशनल कंपनीत कामाला आहे. आई, बाबा आणि हा एव्हढचं कुटुंब. वसईच्या ’SERENIT’ कॉम्प्लेक्समधे रहातो. गेले वर्षभर भारताबाहेर होता. ऑफ़िसने कामानिमित्त इटलीला पाठवलेला. नुकताच गेल्या आठवड्यात परत आलाय".
"हम्म......." इंस्पेक्टर हातातला पेपरवेट फिरवत म्हणाले.
"त्या तशरीफच......."
"तसदीक अहिर.........." इंस्पेक्टर हवालदार अहिरांची चुक सुधारत म्हणाले.
"हो हो तेच तेच......" हवालदार अहिर जीभ चावत बोलले.
"त्या "त स दि क च" गोखिवऱ्याला दोन सायबर केफे आहेत. एक दारुच दूकान आणि तो स्वत: एक इस्टेट एजंट आहे. त्याला हे सगळे धंदे पुष्करनेच उघडून दिले होते. तसदीक पुष्करचा एकदम ख़ास होता. पुष्करने सांगितलेली सगळी कामं करणार हा माणुस. सगळे त्याला पुष्करचा पाळलेला आहे असं म्हणायचे. पुष्करच्या जिवावर ह्याच्या उडया होत्या साहेब. रहातं घरं, गाडी आणि ही सगळी ऐश सगळी पुष्करची मेहेरबानी होती."
"हम्म........" इंस्पेक्टर अजुनही हातातला पेपरवेट टेबलावर गोल गोल फिरवत होते.
"अजुन एक महत्त्वाची गोष्ट साहेब. काही ख़ास माणसांकडुन खबर मिळाली की त्या तसदीकच्या बायकोचं आणि पुष्करच झेंगाट होत आणि ह्याची थोडी कुणकुण त्या तसदीकलाही लागली होती. म्हणुनच तो त्या दोघांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता आणि आठवड्याभरापुर्वी पुष्कर आणि तसदीकमधे पंचमुखी बारमधे बाचाबाची झाली होती."
"कश्यावरुन???" इंस्पेक्टरांनी संशयाने विचारलं.
"त्या वेळेस त्या दोघांसोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनी सांगितलं की पुष्कर त्यारात्री खुप प्यायलेला होता आणि नशेत तो तसदिकच्या बायकोबद्दल फारच कंमेट पास करत होता. पुष्करच्या बोलण्यावरुन तो तसदिकच्या बायकोला खुपच जवळून ओळखत असल्याचं जाणवतं होतं आणि हे सगळं तो तसदिकच्या समोरच बोलत होता. एक दोनदा तसदीकने पुष्करला अप्रत्यक्षरित्या थांबवायचा प्रयत्न केला. पण पुष्कर आउट ऑफ़ कंट्रोल होता. अखेर तसदिकचे पेशन्स संपले. आणि त्याने पुष्करला ताकीद दिली त्यावर पुष्कर त्याची लायकी काढायला लागला. शाब्दिक बाचाबाचीच रुंपातर मारामारीत झालं. लोकांनी मधे पडून दोघांना सोडवलं. त्याच मित्रांच्या सांगण्यावरून कळलं की तसदीक ह्या प्रकरणाने पुष्करवर खुप भडकला होता."
"ओह..... अशी गोम आहे तर." इंस्पेक्टरांनी टेबलावर गोल गोल फ़िरणार्या त्या पेपरवेटला थांबवलं.
"ह्या व्यतिरिक्त ह्या तिघांचा अजुन एक ख़ास मित्र आहे साहेब" हवालदार अहिरांच्या ह्या वाक्यावर इंस्पेक्टर अभयनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं.
"युवामंच संघटनेचा अध्यक्ष
राहुल घोसाळकर.........
तो ही ह्यांचा वर्गमित्र होता साहेब. हे चौघेही एकामेकांचे फार चांगले मित्र होते. त्या पुष्करप्रमाणे राहुलही ह्या एरियातलं ख़ास व्यक्तिमत्त्व आहे साहेब. पूर्वी अप्पांसोबतच होता. धडाडीच्या कार्यकर्ता म्हणुन लवकर वर आलेला. थोड्याच दिवसात म्हात्रे साहेबांच्या खालोखाल राहुलच्या शब्दाला मान होता. फ़क्त कुठलीही राजकीय बेकिंग नव्हती म्हणुन पुढे नाही आला"
"असेल पण त्याचा ह्या केसशी काय सबंध?" इंस्पेक्टरांनी हवालदार अहिरांना विचारलं
"संबध जोडला तर आहे साहेब. गेल्या वर्षीच राहुल घोसाळकरने म्हात्रेच्या विरुध्द पार्टीत म्हणजेच युवामंचमधे प्रवेश केलाय."
"का?"
"माहितगार ह्याला राहुल आणि पुष्कर मधील स्पर्धा जबाबदार मानतात तर काहिजण हयाला अप्पांचा राजकीय स्वार्थही कारणीभुत असल्याच म्हणतात. कारण अप्पांना आपल्या राजकीय साम्राज्याचा वारसदार पुष्कर व्हावासा वाटत होता आणि राहुल त्याच्या मधला मोठा अडसर ठरत होता. राहुलचं संघटनेतलं वाढणारं वजन पहाता अप्पांनी पध्दतशीरपणे राहुलला हळुहळु बाजुला काढलं. राहुलला स्वत:लाही ही गोष्ट जाणवली होती. त्यानेही मग स्वत:हुनच बाजुला होत म्हात्रे गट सोडून युवामंच संघटना जोईन केली "
"अच्छा म्हणजे म्हणुन राहुल आणि......."
"नाही, एव्हढं होऊन सुध्दा अजुनही राहुल आणि पुष्करची मैत्री तशी अबाधीत होती. पण लफ़डं तेव्हा झालं जेव्हा नगरपरिषदेच्या निवडणुका आल्या. त्यावेळेस राहुल आणि पुष्कर समोरासमोर उभे राहिले होते. एकीकडे अप्पांची राजकीय प्रतिष्ठा विरुद्ध राहुलची लोकप्रियता असा सरळ सरळ सामना होता. बऱ्याच राजकीय खेळ्या खेळल्या गेल्या पण ह्यावेळेस राहुलच पारडं थोडं जडच वाटत होतं. त्यामुळेच पुष्करची आणि पर्यायानं अप्पांची घालमेल वाढली होती. लोकांचा कल राहुलकडे झुकतोय हे पहाताच पुष्कर नवीनच चाल खेळला. त्याने तसदिकच्या बायकोच्या मदतीने राहुलच्या विरोधात विनयभंगाचा खोटा आरोप केला. तसदिकच्या बायकोनेही तिची भूमिका चोख बजावली आणि उरलेलं काम पुष्करने विकत घेतलेल्या मिडियाने पुर्ण करून टाकलं. ह्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ह्या प्रकरणाचा भरपूर गवगवा झाला आणि जनमत राहुलच्या बाजूने असुनही पुष्कर जिंकला. मित्र असुनही पुष्करने केलेल्या ह्या प्रकारामुळे त्या दोघांच्या मैत्रीला तडा गेला. तेव्हापासून राहुल आणि पुष्करमधून विस्तवही जात नाही." एव्हढं बोलून हवालदार अहिरांनी इंस्पेक्टर अभयकडे हेतुपुरस्पर पाहिलं.
"ह्म्म्म.......interesting" इंस्पेक्टर विचार करीत बोलले.
"ह्या राहुलसाहेबांनाही एकदा भेटायला पाहिजे" इंस्पेक्टर अभयनी तो पेपरवेट पुन्हा एकदा गोल फिरवला.
**************************************************************************
तसदिकला आज सकाळीच उचलून पोलिस स्टेशनवर आणला होता. जवळपास पंधरा एक मिनिट तो एका खोलीत बसला होता. आपल्याला अस अचानक का उचलून आणलय ह्याबाबतीत तसदीक अजुनही साशंक होता. तेव्हढ्यात इंस्पेक्टर अभय त्या खोलीत आले. मागोंमाग हवालदार अहिरही.
"हा तसदीक, खरं खरं सांग त्यादिवशी काय घडलं होतं?"
"त्यादिवशीच मी तुम्हाला सगळ खर खर सांगितलय साहेब. मला बाक़ी काही माहीती नाही." तसदीक बावरुन म्हणाला.
इंस्पेक्टर शांतपणे एकटक तसदीककड़े पहात होते. इंस्पेक्टरच्या अश्या नजरेने तसदीक अजुन कावराबावरा होत होता. एकदोन क्षणाच्या शांततेनंतर अचानक इंस्पेक्टर उठून तसदीकच्या जवळ आले. त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवीत त्याला म्हणाले.
"पुन्हा एकदा सांग....."
तसदिकने घाबरत घाबरत पुन्हा एकदा त्यादिवशी काय काय घडलं ते इंस्पेक्टरांना सांगितलं. तसदिकचं बोलणं संपल्यावर इंस्पेक्टरांनी हवालदार अहिरांकडे पाहिलं. हवालदारांनी होकारार्थी मान हलवीत खुणेनेच तसदीकची जबानी त्या दिवशीच्या जबानीशी जुळत असल्याचं सांगितलं.
"Good..आता सांग की भाभी कश्या आहेत?" इंस्पेक्टर अभयनी आपले दोन्ही हात तसदिकच्या खांद्यावर ठेवत विचारलं.
"ठीक है, लेकिन उसका इस केस क्या ताल्लुख????" तसदीकने वैतागत विचारलं.
"शेखसाब, भाभीजी का ताल्लुख जरी ह्या केसशी नसला तरी पुष्करशी होता की...." तसदिकच्या खांद्यावरची आपली पकड घट्ट करीत इंस्पेक्टर अभयनी तसदिकला विचारलं.
"हे काय..काय....काय बोलताय तुम्ही" तसदीक त त प प करीत बोलत होता.
"हे आम्ही नाही बोलत. लोक बोलताहेत तसदीक साहेब. गेल्या वेळेस इलेक्शनला तुम्ही भाभीजान आणि पुष्कर साहेबांनी जी लांडी लबाडी केलीय ती सगळ्यांना ठावुक आहे. आणि तसही गेल्या आठवड्यात पंचमुखी बार मधे तुम्ही केलेला तमाशा सगळ्यांना अजुनही लक्ष्यात आहे." इंस्पेक्टरच्या ह्या वाक्यावर तसदीक पूर्णच गार झाला.
"ते आपलं ते.......ते आमचं पर्सनल मेटर आहे. आपको कोई हक़ नहीं है हमें ऐसे बेआब्रु करने का?
हा माना के उस दिन बार में पुष्कर भाईजान के साथ थोड़ी अनबन हो गई थी लेकिन थोड़ी बहोत नोकझोक तो हर दोस्तों में होती है. वैसे भी भाईजान पिने के बाद थोडे बहक जाते है. उसदिन थोडे ज्यादाही बहक गए लेकिन बाद में उन्होंने मेरी माफी भी मांगी. एक दिन झगडा क्या हुआ. आप तो ........" तसदीक वैतागत म्हणाला.
"आप तशरीफ ले जा सकते हो शेख भाई. हमें जो इंफ़ोर्मेशन चाहिए थी वोह हमें मिल चुकी है" तसदिकच्या बडबडीला पुर्णपणे दुर्लक्षित करत इंस्पेक्टर तसदिकला दरवाज्याचा रस्ता दाखविला. इंस्पेक्टर अभयच्या अश्या इशारयामुळे तसदीक धुसफुसत केबीन बाहेर पडला.
**************************************************************************
सनसिटी मॉलच्याबाहेर एक स्कॉर्पिओ येउन थांबली. त्यातून इंस्पेक्टर अभय आणि हवालदार अहीर खाली उतरले. समोरच युवामंचच कार्यालय दिसत होत. एका दुकानाच्या गाळ्याला बाहेरून एका किल्ल्याच स्वरुप देऊन त्यावर दिमाखात "युवामंच" असं कोरण्यात आलं होतं. त्या किल्ल्याच्या दिंडी दरवाज्यातून आत येताच इंस्पेक्टर थबकले. एखादया कोर्पोरेट ऑफिसलाही लाजवेल असा थाट होता. सगळीकडे मार्बोनेटच्या लाद्या ,फ़ॉल्स सिलींग, कडक एसी दोन सोफे समोर मध्यभागी एक सेंटर टेबल आणि त्याच्या मागे एका मोठ्या खुर्चीवर एक पस्तिशीचा तरुण बसला होता. त्याच्यासमोर एक मध्यमवयीन जोडपं बसलं होतं. त्या जोडप्याचं म्हणणं ऐकत असतानाच दारात उभ्या असलेल्या पोलीसांकडे त्या तरुणाचं लक्ष गेलं. त्याने हातानेच दोन बोटं दाखवून पोलीसांना नजरेनेच दोन मिनिट थांबा मी ह्याचं आवरतो, तोवर त्यांना त्याने जवळच्या सोफ्यावर बसायची विनंती केली. लगोलग त्याने त्याच्या ऑफिस मधल्या मुलाला त्या पोलिसांना अटेंड करायची खुण केली आणि आता तो परत त्या जोडप्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकू लागला. जवळपास पाचएक मिनिटांनी ते जोडपं उठलं तसं त्या तरुणाने इंस्पेक्टर साहेबांना येण्यास सांगितले.
"सॉरी इंस्पेक्टर साहेब तुम्हाला वाट पहावी लागली" त्या तरुणाने दिलगीरी व्यक्त करीत शेकहेंडसाठी हात पुढे केला.
"Ohh not at all.... first come first.. आणि तसेही आम्ही काय आणि तुम्ही काय दोघेही जनतेचे सेवकच की. त्यामुळे त्यांना नेहमीच प्राधान्य दयाव आपणं. By the way i am inspector अभय राणे " इंस्पेक्टरनी त्या तरुणाशी हस्तांदोलन करीत म्हटलं.
"Nice to meet you inspector. I am राहुल.....राहुल घोसाळकर युवामंच संघटनेचा अध्यक्ष"
"बोला आज कसं येणं केलतं? खरतर मीच येणार होतो तुम्हाला भेटायला. तुम्ही आमच्या विभागाला जोईन केल्यापासुन आपली भेट ही राहिलीच." राहुल इंस्पेक्टरांना आपली दिलगीरी व्यक्त करीत म्हणाला.
"अहो त्यात काय एव्हढसं. आता वरचेवर भेटत जाऊ की, तसही आम्हाला तुमची मदत लागणारच आहे"
"Anytime.....बोला काय मदत हवीय गरिबाकडुन" राहुल तोंडभरुन हसला.
"जास्त काही नाही, एक माहिती हवी होती"
"कश्याबद्दल"
"पुष्कर.......पुष्कर म्हात्रेबद्दल. तुम्हाला तर कल्पना असेलच झाल्या प्रकाराची. त्याचा असा अचानक झालेला मृत्यु. काही प्रश्न मागे ठेवून गेलाय. काहींची उत्तर मिळालीत तर काहिंची शोधायचीयत. त्या निमित्ताने आम्ही तुमच्याकडे आलोय" इंस्पेक्टरनी आपलं येण्याच प्रयोजन राहुलला सांगितलं.
पुष्करच नाव ऐकताच राहुलच्या चेहरा बदलला. अचानक कुणीतरी जुन्या जखमेवरची खपली काढावी अस काहीस राहुलच झाल होत. तरी आपला चेहरा शक्य तितका नॉर्मल ठेवत राहुल म्हणाला.
"मग तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात इंस्पेक्टरसाहेब. कारण पुष्करच्याबाबतीत मला ही तितकीच माहीती आहे, जितकी ह्या भागातल्या कुठल्याही माणसाला अप्पांच्या मुलाबद्दल असेल."
"पण तुम्ही तर दोघे चांगले मित्र होतात अस ऐकलेल. आणि म्हणुनच......."
"आम्ही मित्र होतो......हवालदार साहेब. पण ती आता फार जुनी गोष्ट आहे." राहुल हवालदार अहिरांच बोलणं अर्धवट तोडत मध्येच म्हणाला
"आणि तसही जेव्हापासून मी युवामंचशी संलग्न आहे, त्यानंतर आमच्यात जास्त कधी सबंध आला नाही"
"का?" इंस्पेक्टरांनी राहुलला विचारलं
"राजकारणात अश्या बऱ्याच "का?" ची उत्तर नसतात साहेब" राहुलने इंस्पेक्टरच्या ह्या प्रश्नाला हसत हसत बगल दिली.
"पण त्याने तर तुमच्यावर फार घाणेरडे आरोप केले होते" इंस्पेक्टरांनी राहुलला त्या विनयभंगाच्या प्रकरणावरुन कोंडीत पकडायचा प्रयत्न केला.
"जाउद्या हो राजकारणात ह्या असल्या गोष्टी चालायच्याच. राजकारण म्हणजे पांडवांची मयसभा आहे असं म्हटलं तरी चालेल. कधी कधी जे दिसत तस नसतं आणि कधी कधी जे नसतं ते भासवावं लागतं ह्यालाच तर राजकारणाचं मूलभूत सूत्र म्हणतात."
तेव्हढ्यात एक मुलगा चहा घेउन आला.
"घ्या साहेब....... सध्या तरी एव्हढचं नंतर केव्हातरी निवांत घरी या मस्त झणझणीत जेवणाचा बेत करू." चहाचा कप इंस्पेक्टर अभयच्या हातात देत राहुल म्हणाला.
जवळपास पंधराएक मिनिटं इंस्पेक्टर अभय राहुलकडुन या ना त्या मार्गाने पुष्करबद्दल काही माहीती मिळतेय का ते पहात होते. पण राहुल एका मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे इंस्पेक्टरांच्या प्रश्नांना तोंड देत होता. पोलिसांना नेमक आपल्याकडून काय हवयं हे त्याला बरोबर माहीत होत. अखेर अर्ध्यातासाच्या त्या मिटिंगनंतर इंस्पेक्टर अभय आणि हवालदार अहीर युवामंचच्या कार्यालयातून बाहेर पडले.
"साहेब जाम चेप्टर दिसतोय हा......" हवालदार अहिरांनी गाडीत बसल्या बसल्या इंस्पेक्टर अभयला आपलं मत बोलून दाखवलं.....
"चेप्टर नाही तर खुप हुशार आहे हा राहुल घोसाळकर..... राजकारणात खुप पुढे जाईल हा." एव्हढं बोलून इंस्पेक्टर पुन्हा विचार करू लागले. राहुल सोबत झालेल्या मिटिंगवरून एक गोष्टीची तरी त्यांना खात्री पटली होती की, राहुल वरवरुन जरी ह्या प्रकरणात बेफिकीरी दाखवत असला तरी पुष्करच्या मृत्युने तो आतून कुठेतरी हलला होता.
**************************************************************************
पुष्करला जाउन आता आठवडा होत आला होता. पुष्कर म्हात्रेच्या मृत्युसंदर्भात पोलीसांचा तपास अजुनही सुरूच होता. तसदीक, राहुल आणि अभिजितचीही एकदा रूटीन चौकशी झाली होती पण इंस्पेक्टर अभयनां ह्या सगळ्या चौकशी सत्रातुन पंचमुखीमधल्या त्या मारामारी प्रकरणाशिवाय जास्त काही हाती लागलं नव्हतं. ह्या केसमधे अजुनही म्हणावी तशी गती येत नव्हती. आता सगळं काही पोस्ट मोर्टम रिपोर्टवर अवलंबुन होतं.
पुष्कराच्या मृत्युनंतर विस्कळलेलं वसई शहर आता कुठे निवांत होत होतं. हळुहळु शहरातलं तणावाचं वातावरण आता निवळत होतं. सरणारा काळ हळुहळु सगळ्या गोष्टीची धार बोथट करतो हेच खर. पण बहुतेक काळाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
**************************************************************************
इंस्पेक्टर अभय दिवसभराची डयुटी संपवून नुकतेच घरी गेले होते. आज रात्रपाळीला आलेले हवालदार अहिर नुकतेच जेवून निवांत बसलेले होते की टेबलावरचा फोन खणखणला.
"हेलो.....हवालदार अहिर बोलतोय....."
"......"
"कुठे....."
"..........."
"ठीक आहे पोहचतो"
फोनवरती मिळालेली माहिती ऐकून हवालदार थोडेसे चक्रावले त्यानी लगेच इंस्पेक्टर अभयना फोन लावला.
"जय हिंद साहेब......"
"........."
"साहेब आताच फोन आलेला. हाय-वे वर एक अपघात झालाय. "
**************************************************************************
इंस्पेक्टर आणि हवालदार अहीर तातडीने स्पॉटवर पोहचले होते. हाय-वे वर एका मालवाहू ट्रकने एका i10 ला धडक दिली होती. कार चालवणारा जागीच ठार झाला होता. ज्या ट्रकने धडक दिलेली तो पुढे थोड्याच अंतरावर उभा होता. मागे रोडवर टायर घासल्याच्या खुणा होत्या. पोलिस पंचनामा करत होते. बॉडीच्या खिश्यातुन त्यांनी त्याच पॉकेट मोबाईल सगळ जमा केलं. लायन्सस वरच नाव वाचताच इंस्पेक्टर गडबडले
तसदीक शेख
हवालदार आहिर ज्या ट्रकने तसदिकच्या गाडीला धडक दिली होती त्याच्या ड्रायव्हरला घेउन आले. इंस्पेक्टर अभयनी त्या ड्रायव्हरकडे पाहिलं. तो थरथरत उभा होता.
"असा समोर ये आणि सांग कस घडलं ते?"
"सायब, ह्याच्यात माजी काय बी चुक न्हाय. मी व्यवस्थीत चालवीत हुतो. ह्यो बी माज्या पुढच व्हता. पण अचानक काय झालं त्याला काय बी कळलं न्हाय. ह्यानी अचानक ब्रेक मारला. मी बी मागच व्हुतो. मी काई करायच्या आतच माझ्या गाडीची आणि ह्याची ठोकर लागली बघा. "
इंस्पेक्टरनी हवालदार अहिरांना खुण केली. तसा अहिरांनी ड्राईव्हरच्या तोंडाचा वास घेतला आणी इंस्पेक्टरांकडे पाहून नकाराची मान हलवली.
"हो साहेब हा खरं बोलतोय" तेव्हढ्यात बाजुला उभा असलेला एक माणुस पुढे आला.
"तुम्ही कोण"
"मी चेतन शिंदे C.A. आहे. कामानिमित्त गुजरातला निघालेलो. मी पण त्यावेळेस ड्राईव्ह करत होतो. माझी गाडी राईट लेन मधे होती. हा ट्रकवाला सेंटर लेन मध्ये होता. ह्या ट्रकला ओव्हर टेक करून मी पुढे जात असताना, मला ह्या ट्रकच्या पुढे ती i10 दिसली. मी तिलाही ओव्हर टेक करीतच होतो की अचानक त्या i10 वाल्याने ब्रेक मारला. आणि मागाहुन मोठा आवाज झाला. मी फार दचकलो सावरून गाड़ी बाजुला घेतली. मागे येउन पाहिलं तर हे असं झालेलं."
हवालदार अहिरांनी त्या ड्रायव्हरची आणि चेतन शिंदेची जबानी घेतली. पंचनामा, अपघात झालेली गाडी ताब्यात घेउन पोलीस स्टेशनला पाठवली तसेच तसदिकची डेडबॉडी पोस्टमोर्टमला पाठवली हे सगळं सोपस्कार उरकण्यात सकाळचे चार वाजले.
**************************************************************************
पोलीस स्टेशनमध्ये इंस्पेक्टर तसदीकचा मोबाईल चेक करत होते. त्याच्या कॉललॉगमधे अखेरचे काही कॉल्स अभिजीत आणि राहुल ह्या नावाला केले गेले होते. इंस्पेक्टर विचार करत होते की नक्किच काहीतरी गडबड आहे ह्या चौघांच्या बाबतीत. इंस्पेक्टरांनी ताबडतोब अभिजीत आणि राहुलला पोलीस स्टेशनला बोलावून घेतले.
अभिजित पोलीस स्टेशनला आला तेव्हा तो बराच डिस्टर्ब वाटत होता. सहाजीकच होतं म्हणा आठवड्यापूर्वी झालेला पुष्करचा आकस्मिक मृत्यु आणि काल झालेला तसदिकचा जीवघेणा अपघात ह्या दोन्ही गोष्टी इतक्या कमी कालावधीत घडल्या होत्या की कुणाचीही अवस्था अशीच झाली असती. इंस्पेक्टर अभिजीतची चौकशी सुरु करणार तेव्हढ्यात राहुलही तिथे पोहचला.
"नमस्कार इंस्पेक्टरसाहेब आज कशी काय आमची आठवण काढलीत." राहुलने हस्तांदोलन करीत इंस्पेक्टराना विचारलं.
"हो ज़रा एक माहिती हवी होती. तुमच्या मित्रांचा तसदिकचा मृत्यु झालाय परवा रात्री हाय-वे वर" इंस्पेक्टरांनी राहुलला समोरच्या खुर्चीत बसण्यास सांगितले.
"हो कळलं मला ते, फार वाईट झालं " राहुल म्हणाला.
"त्या अक्सिडेंटबद्दल तुम्हाला कळलं तर असेलच, विचित्र अपघात होता. It's just like a suicide attempt. आम्ही त्याचा मोबाईल चेक केला, तर त्यात लास्ट कॉल तुम्हा दोघांना केले होते. त्याबद्दलच तुम्हाला विचारायच होतं." इंस्पेक्टरने ह्या वाक्यासरशी राहुल आणि अभिजीतकडे पाहिलं. दोघेही गोंधळलेले होते.
राहुल म्हणाला "हो, त्याने कॉल केलेला पण मी तो सकाळी पाहिला." एव्हढं बोलून राहुलने अभिजितकड़े पाहिलं.
"हो, मी पण........" अभिजीत चाचरत म्हणाला.
"पण तुमचा तर डायल कॉल पण आहे तसदिकच्या मोबाईल मधे" इंस्पेक्टरने पटकन अभिजीतला विचारलं. त्याबरोबर अभिजित थोडा गडबडला
"हो.... म्हणजे मी उचलला होता त्याचा फोन, पण समोरून काही आवाजच येत नव्हता. नंतर मी त्याला फोन लावत होतो पण त्याने उचलले नाहीत" हे सांगताना अभिजीत फार घाबरलेला वाटत होता. तो काहीतरी लपवतोय हे स्पष्ट कळत होतं. पोलिसांनी अजुन थोडावेळ त्या दोघांची चौकशी केली. पण जास्त काही हाती लागलं नाही तरीही त्या दोघांच्या हावभावावारून कुठेतरी पाणी मूरत होतं हे मात्र नक्की, खासकरून अभिजीतचं.
**************************************************************************
इंस्पेक्टर अभय पोलीस स्टेशनमधे विचार करीत बसलेले होते. त्यांच्या डोक्यात अजुनही पुष्कर आणि तसदिकच्या मृत्युचे संदर्भ फिरत होते. त्यांना ह्या पोलिस स्टेशन मधे येउन अजुन एक महिनाही उलटला नव्हता की, ह्या छोट्याश्या शहरात दोन व्यक्तींचा मृत्यु झाला होता. भले त्यातल्या एकाचा नैसर्गिक आणी दुसर्याचा अपघाती का असेना. पण इंस्पेक्टरांना मात्र त्यात काहीतरी गडबड असल्यासारखं वाटतं होतं. वरवर पहाता हे दोन्ही अपघात निव्वळ योगायोग जरी वाटत असले तरी ह्या दोन्ही प्रकरणात काहीतरी लिंक असावी. असा त्यांना संशय होता. तेव्हढ्यात हवालदार अहीर आत आले तशी इंस्पेक्टर अभयची तंद्री भंग पावली.
"साहेब तुम्ही तसदिकची चौकशी करायला सांगितली होती ना?" अहिरांच्या ह्या वाक्यासरशी इंस्पेक्टरांनी त्यांच्याकडे चमकून पाहिलं.
"तो दोन दिवस घरातच होता साहेब. आणि अपघात होण्याआधी तो त्यारात्री शेवटचा पंचमुखी बार मधे बसला होता"
"ओह आय सी...त्या पंचमुखी बार मधे चौकशी करून पहा काही कळतय का ते"
"केली साहेब, त्या वेटरला घेउन आलोय ज्याने तसदीकला तिकडे अटेंड केलं होतं"
"व्हेरी गुड अहीर, घेउन या त्याला" इंस्पेक्टर अभयनी कौतुकाने हवालदार अहिरांकडे पाहिलं.
पुढच्याच मिनिटाला अहीर एका माणसाला घेउन इंस्पेक्टर अभयच्या केबीनमधे आले.
वेटरचे टिपिकल कपडे घातलेला एक सावळा कुरळ्या केसाचा तो इसम पोलिस स्टेशनमधे आज बहुतेक पहिल्यांदाच येत असावा अन तेही एका मेलेल्या माणसाबद्दलची जबानी द्यायला. त्यामुळेच की काय तो ज़रा जास्तच गोंधळलेला वाटत होता. त्याचा गोंधळलेला चेहरा पहाता तो नीट काही सांगु शकेल ह्याची इंस्पेक्टर अभयला शाश्वती नव्हती.
"नाव काय तुझं?" इंस्पेक्टर अभयनी त्या माणसाला विचारलं.
"आ....क्या पूछा साब?" त्याने घाबरून इंस्पेक्टरांनाच प्रतिप्रश्न केला.
"नाम क्या है तेरा?" हवालदार अहिरांनी वसकन अंगावर जात विचारलं.
"जी प्रकाश वर्मा" त्याने दचकून उत्तर दिलं
"तो प्रकाश क्या हुआ था उस रात....." इंस्पेक्टर अभयनी प्रकाशला शांतपणे विचारलं.
प्रकाश वर्माने इकडे तिकडे पहात सांगायला सुरुवात केली.
"जी साब उस रात हमेशा की तरह बार चालु था. रात के ग्याराह सवा ग्याराहा बजे होंगे. उस दिन गुरुवार था तो कस्टमर भी कम आए थे तबी तसदीक साब आये. वैसे तो साब हमेशा आते थे. लेकिन उस दिन वो कुछ ठीक नही लग रहे थे."
"मतलब?????" इंस्पेक्टर अभयनी प्रकाशला खुर्चीवर बसायला सांगितले आणि पुढे सांगायचा इशारा केला.
"जी मतलब वो थोडे परेशानसे लग रहे थे. हर कुछ मिनिट बाद दरवाजे के तरफ देखते. बहुत घबराए से लग रहे थे. हर वक्त इधर उधर देख रहे थे. जैसे की किसी को ढुंढ रहे हो."
"फिर ??????" इंस्पेक्टर सावरून बसले.
"फिर कुछ नहीं साहब. थोडे देर वो ऐसीही बैठे रहे फ़िर अचानक से चिल्ला उठे और बाहर भाग गए. दो मिनिट के लिए किसीको कुछ भी नही समझा. जब तक कुछ पता चलता तब तलक तसदीक साब बार के बाहर चले गए थे. फ़िर उनके पिछे मै भी बाहर भाग आया, लेकिन तब तक तसदीक साब गाडी स्टार्ट करके निकल चुके थे."
"हम्म....." इंस्पेक्टर विचारत पडले. "और कुछ है जो तुम्हे लगता है की हमें बताना चाहिए???"
इंस्पेक्टरांच्या अश्या विचारण्यावर प्रकाश विचारात पडला. अचानक त्याला काहीतरी आठवल आणि तो म्हणाला.
"हा साहब, वो बार बार अपने आप से मंडणगड....मंडणगड जैसा कुछ तो बोल रहे थे"
"मंडणगड?????? आता हे काय नवीन?" प्रकाशच्या ह्या माहितीवर इंस्पेक्टर स्वत:शीच म्हणाले.
**************************************************************************
इंस्पेक्टर पुष्करचा पोस्ट मोर्टमचा रिपोर्ट वाचत होते. त्यांचा अंदाज खरा ठरला होता. रिपोर्टमधे पुष्करच्या मृत्यूचे कारण हार्टफ़ेल असं लिहिलं होत. कसल्यातरी आत्यंतिक भीतीने त्याला धक्का बसला होता आणि त्याच धक्क्याने त्याच हृदय बंद पडलं होतं.
A sudden death
ह्याचाच अर्थ असा होता की पुष्करचा मृत्यु हा मर्डर किंवा अपघात नसून तो एक नैसर्गिक मृत्युच होता.
पुष्करच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमुळे इंस्पेक्टर अभयच्या डोक्यावरच टेंशन आता बर्यापैकी कमी झालं होतं. कारण पुष्करच्या झालेल्या संशयास्पद मृत्युमुळे अप्पांनी अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटची झोप उडवली होती. वरिष्ठांनीही ह्या केसचा तातडीने निकाल लावा अस फर्मानच काढलं होतं. पुष्कर म्हात्रेच प्रकरण ह्या पोस्ट मोर्टमच्या रिपोर्टमुळे आता निकालात निघालं होतं, पण राहून राहून एक गोष्ट इंस्पेक्टर अभय राणेला स्वस्थ बसु देत नव्हती, ती ही की,
त्या रात्री पुष्कर त्याचा जीव जाण्याइतका नेमका कुणाला घाबरला होता?
आणि
का?
"जय हिंद साहेब" हवालदार अहिरांच्या आवाजामुळे इंस्पेक्टर अभय त्यांच्या विचारातून बाहेर आले.
"जयहिंद, बोला हवालदार अहीर....." हातातला पोस्ट मोर्टमचा रिपोर्ट समोर टेबलावर ठेवत इंस्पेक्टर अभयनी हवालदार अहिरांना समोरच्या खुर्चीत बसायची खुण केली.
"साहेब तसदीकच्या मृत्यु संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी कळलीय." हवालदार अहिरांनी असं सांगताच इंस्पेक्टर सावरून बसले आणि तसदीकच्या संदर्भात आता हवालदार अहीर काय सांगताहेत ते लक्ष देऊन ऐकू लागले.
"अपघाताच्या रात्री तसदीक पंचमुखी बारमधुन गेल्यावर जवळपास पंधराएक मिनिटांनी अभिजीत तिथे आला होता साहेब"
अभिजीतच नाव ऐकताच इंस्पेक्टर सावध झाले.
"Are you sure?????"
"हो साहेब कारण बारच्या डोअर किपरने आणि पंचमुखीच्या बाहेर बसणाऱ्या पानवाल्याने ही गोष्ट कन्फर्म केलीय. त्या रात्री अभिजीत तिथे आला होता. अगोदर बारमधे गेला मग बाहेर येउन त्याने तसदीकबद्दल डोअर किपरकडे चौकशी केली त्यावर त्या पानवाल्यानेच अभिजीतला तसदीक आत्ताच पंधराएक मिनिटांपुर्वी तिथून निघून गेल्याचे सांगितलं होतं. तसा अभिजीत तसदिकच्या मागावर गेला होता."
हवालदार अहिरांनी दिलेल्या ह्या खबरीमुळे इंस्पेक्टर राणे विचारात पडले. ह्या अभिजीतच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा त्यांचा सुरुवातीपासून असलेला संशय आता खात्री मधे बदलत होता. आणि ही गडबड नेमकी आहे तरी काय हे आता शोधायलाच हवं होतं.
"चला अहीर...." थोडा विचार करून इंस्पेक्टर हवालदार अहिरांना म्हणाले.
"कुठं?"
"अभिजीत साहेबांना भेटायला, बघू तरी त्यांच्या मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे ते"
**************************************************************************
अभिजीत cafe latte मधे कश्याततरी तंद्री लावून बसला होता.
"नमस्कार अभिजीत साहेब"
अचानक आपल्या नावाचा पुकारा ऐकताच अभिजीत दचकला. त्याने चमकून बाजुला पाहिलं तर इंस्पेक्टर राणे त्याच्या नजरेस पडले.
"अरे वाह..!! आज निवांत आहात तर..."
"हम्म, तस काही नाही. घरी कंटाळा आला होता. म्हणुन इथे येउन बसलो. बाक़ी तुम्ही आज इकडे ???" अभिजित कसनुसं हसत उत्तरला.
"काही ख़ास नाही असच बरेच दिवस झाले तुम्हाला भेटलो नाही. म्हटलं आज ज़रा इंजिनिअर साहेबांना भेटून येउ"
इंस्पेक्टर उगाचच आपल्याला शोधत येणार नाहीत हे कळण्याइतका अभिजीत मुर्ख नव्हता. पण ह्यांनी मला इथवर शोधत यावं एव्हढं काय घडलय ह्याचा अंदाज अभिजीत लावत असतानाच इंस्पेक्टरांनी अभिजीतला विचारलं.
"तुम्हाल़ा मंडणगडबद्दल काही माहिती आहे का?"
मंडणगड्च नाव ऐकताच अभिजीत केव्हढ्यानं तरी दचकला. त्याच्या चेहरयावरचे भाव पटकन बदलले.
"नाही....का हो?" अभिजीत नजर चोरीत म्हणाला.
"नक्की????" अभिजीतच्या मघासच्या प्रतिक्रियेमुळे इंस्पेक्टर अभयच्या डोक्यात संशयाची सुई फिरायला लागली होती.
"हो, पण तुम्ही असं अचानक मला मंडणगडबद्दल का विचारताय?" अभिजीतने इंस्पेक्टरांना विचारलं.
"कारण तुमचा मित्र तसदीक त्या रात्री फ़क्त ते एकच नाव घेत होता."
"नाही, मला खरच काही माहीती नाही" आपला चेहरा शक्य तितका नॉर्मल ठेवत अभिजीतने इंस्पेक्टर राणेंना सांगितलं
थोडा वेळ शांततेत गेला. त्या वेळेत अभिजितची होणारी चलबिचल हवालदार अहिरांच्या अनुभवी डोळ्यांनी अचूक टिपली होती. आणि त्यांनी तशी ती इंस्पेक्टर राणेच्या नजरेसही आणुन दिली. अभिजितला अस गोंधळलेल पाहून इंस्पेक्टर राण्यांनी लगेचच आपला पुढचा प्रश्न विचारला.
"त्यारात्री खरच तुमचा आणी तसदिकचा काही कोण्टेक झाला नव्हता का?" इंस्पेक्टरांच्या ह्या प्रश्नावर अभिजीत कमालीचा गडबडला.
"नाही.....का हो?" हे सांगताना अभिजीत फारच घाबरला होता.
"मग तुम्ही त्यारात्री पंचमुखीमधे बार का गेला होतात?"
इंस्पेक्टरची आपल्यावर रोखलेली नजर पाहून त्यांना बहुतेक आपला संशय आलाय हे अभिजीतला समजलं होते. त्यामुळे त्यांना आता काय सांगावं ह्या विचारात अभिजीत पडला.
"तुम्ही विचार करून मला काहीतरी खोटं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला अगोदरच एक गोष्ट सांगतो की आम्ही पंचमुखी बार च्या वेटरला, डोअर किपरला आणि खासकरून बाहेरच्या पानवाल्याला भेटुन आलोय" इंस्पेक्टरांनी असं सांगताच अभिजित गडबडला. त्याच्या चेहरयावरचा गोंधळ स्पष्ट वाचता येत होता.
"हो........मी पंचमुखीला गेलेलो" अभिजित हलकेच म्हणाला.
आपला वार अचूक लागलाय हे पहातच इंस्पेक्टर खुष झाले. त्यांनी नजरेच्या एका कोपऱ्यातुन हवालदार अहिरांकडे पहात अभिजितला विचारलं.
"कशाला?"
"ते आपलं सहजच"
"खरचं......सहजचं की काही ख़ास कारण होतं?"
इंस्पेक्टरने अस विचारताच आपण आता पुरते अडकलोय ह्याची कल्पना अभिजीतला आली.
"मी तसदीकला शोधायला तिकडे गेलेलो"
"का?"
"म्हटलं इतक्या वेळा त्याचा फोन येउन गेलाय म्हणुन......त्याला भेटायला तिकडे गेलेलो"
"अरे वाह मग तुम्ही बरोबर पंचमुखीलाच कसे काय पोहचलात?" हवालदार अहिरांनी आता अभिजीतला कोर्नर केलं.
"ते आपलं ......तो तिकडेच भेटेल अस वाटलं मला" अभिजीत चाचरत म्हणाला.
"कश्यावरुन????"
"म्हणजे तो आमचा नेहमीचा मिटिंग पोईंट आहे."
"मग भेटला का तो?"
"नाही, मी तिथे पोहचण्या अगोदरच तो तिथून निघून गेला होता. मी त्याच्या मागावर गेलेलो पण तो सापडलाच नाही. आणि मग दुसऱ्या दिवशीच त्याच्या अपघाताची न्यूज आली." अभिजीत हे सांगताना फार भावनाविवश झाला होता.
"हे सगळं तुम्ही खरं सांगताय?" इंस्पेक्टरांनी अभिजीतवर आपली करडी नजर रोखीत विचारलं.
"हो इंस्पेक्टर साहेब अगदी देवाशप्पथ" अभिजीत गळ्याला हात लावून म्हणाला.
"ठीक आहे. सध्यातरी आपण तुम्ही हे सगळं खर बोलताय असं धरून चालु. बाक़ी सत्य काय आहे ते मी शोधून काढेनच. चला येतो मी काही गरज लागली तर तुमची मदत घेईनच" एव्हढं बोलून इंस्पेक्टर अभय तिथून निघणार की, त्यांची नजर टेबलावरच्या स्टाईलीश कि-चेन वर पडली. इंस्पेक्टर त्या की-चेनला हातात घेउन न्याहाळु लागले. त्यावर ROAD STALLION असं ठसठशीतपणे लिहिलं होत.
"अरेच्या!!!!! मस्त आहे की हे.....कुठून घेतलीत?" इंस्पेक्टरनी अभिजीतला विचारलं.
"तो आमचा एक बाईकर क्लब आहे. त्या लोकांनीच दिलाय तो मला" अभिजीत सावधपणे म्हणाला. तोंड भाजलं की लोकं ताकही फ़ुंकुन पितात तशीच काहीशी गत आता अभिजीतची झालेली दिसत होती.
"बरयं....चला मि. गायकवाड आता येतो मी. लवकरच भेटु" इंस्पेक्टर निघुन गेले तसा अभिजीतने सुटकेचा निश्वास टाकला.
इंस्पेक्टर खरच गेलेत हे पाहून अभिजीतने घाईघाईत आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि राहुलला फोन लावला.
"इस रुट की सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर बाद डायल करे."
अभिजीतने पुन्हा एकदा राहुलला ट्राय केला पुन्हा तोच मेसेज ऐकू आला अभिजीतने रागावून फोन कट केला.
**************************************************************************
इकडे वसई पोलीसांनी मंडणगडची माहिती काढायला सुरुवात केली होती. सुरुवातीला जास्त काही कळलं नाही. कुणाला अस ठिकाण अस्तित्वात आहे हेच माहिती नव्हतं. जेव्हा पोलीसांनी गुगलवर सर्च केलं तेव्हा मंडणगड हे कोल्हापुर जिल्हयात गढिंग तालुक्यातलं एक छोटेसं हिलस्टेशन असल्याची माहीती मिळाली. अजुन एक दोन साईटवर सर्च करता त्यांना कळलं की, मंडणगडला हे फ़क्त नावालाच हिलस्टेशन होतं. खरतर मंडणगड म्हणजे समुद्रसपाटीपासून साधारण 1500 फ़ुट उंचीवर वसलेलं एक छोटसं गावं होतं, 100-150 उंबर्याचं. गावात एखाद दुसरं हॉटेल सोडलं दुसरी रहाण्याची काही विशेष सोय नव्हती. सगळीकडे नुसती झाडी आणि डोंगरावर जाणारा वेडावाकडा रस्ता. इथे पर्यटकांची संख्या तशी कमीच अगदी नाही म्हणण्या इतकी. पण तरीही इथे काही लोकं मात्र आवर्जुन येतात, खासकरून फोटोग्राफर्स. मंडणगडमधे पर्यटकांना आकर्षित करणारं काही नसलं तरी इथल्या डोंगर माथ्यावरून फ़ार सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त दिसतो असं म्हणतात. पावसाळ्यात काही ठिकाणी इंद्रधनुश्यही दिसते आणि थंडीच्या दिवसात तर साठलेल्या धुक्यामुळे आकाश्यातल्या ढगांना कुणीतरी इथल्या दऱ्याखोऱ्यात कोंडुन ठेवलय की काय असं वाटते. असे हे मंडणगड फोटोग्राफर्सच्या सोबत अजुनही काही लोकांच आवडीचं ठिकाणं होतं अन ते म्हणजे बाईकर्सच .इथले कच्चे रस्ते आणि अवघड वळणावळणाचा रस्ता हे बाईकर्ससाठी एक पर्वणीच होती. बरेचसे बाईकर्स ह्या ठिकाणी फ़क्त थ्रील अनुभवायला यायचे.
बाईकर्स......
इंस्पेक्टर चमकतात. काहीतरी आठवुन ते गूगल सर्च इंजिनवर टाईप करतात.
Road stallion.......
एका वेबसाईटचा address मिळतो. WWW. ROADSTALLION.COM
त्या साईटवर सर्च केली असता. मुंबईमधल्या काही हौशी बाइकर्सचा हा क्लब होता. त्यांच्या अचिव्हमेंट ह्या सेक्शनमधे चेक केलं असता, ह्या ग्रुपने साधारण वर्षापुर्वी सप्टेंबरमध्ये भर पावसात मंडणगडची एक रोड ट्रिप केली होती.
इंस्पेक्टरनी लगेचच त्या साईटवर दिलेल्या एका नंबरवर फोन लावला.
"हेलो road stallion...."
**************************************************************************
आदित्य अपार्टमेंट, चारकोप, कांदिवली(प.)
B - 210
अमेय शेट्ये
नेमप्लेट वरच नाव वाचुन इंस्पेक्टर अभयनी डोअर बेल वाजवली. पाच दहा सेकंद झाली असतील की एका ३०-३५ च्या तरुणाने दरवाजा उघडला.
"Yes????" त्या तरुणाने आपल्या दारात उभ्या असलेल्या त्या दोन अनोळखी पाहुण्यांना प्रश्न केला.
"अमेय?????" इंस्पेक्टर अभयनी समोर उभा असलेला तो तरुण नेमका आपल्याला हवा असलेला माणुसच आहे की नाही ह्याची खात्री करून घे्ण्यासाठी प्रतिप्रश्न केला.
त्यावर त्या तरुणाने होकारार्थी मान हलवताच.
"मी इंस्पेक्टर अभय राणे आणि हे हवालदार वैभव अहीर. सकाळी मीच तुम्हाला फोन केलेला." इंस्पेक्टर अभयनी आपलं कार्ड पुढे करीत त्याला आपली ओळख सांगितली.
"Ohh !!!!! या ना आत या......"
इंस्पेक्टर राण्यांना आणि हवालदार अहिरांना हॉलमधे बसायला सांगुन अमेय आत गेला. तोवर राणे त्या घरावर नजर फिरवीत होते. घर फार कल्पकरित्या सजविले होते. जास्त काही सामान नव्हतं एक सोफा, सेंटर टेबल, TV युनीट आणि एक कपाट ह्या एव्हढ्याच वस्तु. छताचं डिझाईनही मस्त होतं. मोकळ्या भितींना लावलेले वॉल पेपरर्स अन त्यावर लावलेल्या काही abstract च्या फ़ोटो फ्रेम्स त्या घराच्या रुबाबात अजुन भर घालत होत्या. प्रत्येक वस्तूची निवड आणि रंगसंगती उच्च दर्जाची होती. तेव्हढ्यात अमेय पाणी घेउन आला.
"घराचं इंटेरिअर मस्त आहे." इंस्पेक्टरने त्या घराच्या देखणेपणाला मनापासून दाद दिली.
"ओह धन्यवाद, माझा व्यवसायच आहे तो." अमेयने हसून उत्तर दिलं.
"सॉरी मघाशी मी तुम्हाला ओळखलं नाही. त्याच काय आहे की तुम्ही नॉर्मल ड्रेसमधे आलात म्हणुन गोंधळ झाला" अमेय दिलगीरी व्यक्त करीत म्हणाला.
"अहो त्यात काय एव्हढ, आम्ही युनिफोर्म मधे आमच्या नातेवाईकांकडे जरी गेलो तरी आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे संशयाने बघतात. म्हणुन आम्ही मुद्दामुनच शक्य तितक्या कुणाच्या घरी जाताना युनिफोर्म मधे जात नाही." हवालदार अहिरांच्या ह्या विनोदावर तिघेहीजण मनमुराद हसले.
"तर....मि.अमेय............मला तुमच्याकडून एका केसच्या बाबतीत मदत हवी आहे. काही अपिहार्य कारणास्तव मी तुम्हाला त्या केसचे संदर्भ आणि त्याच्याशी निगडित असलेल्या व्यक्तींची नावं नाही सांगु शकत. पण तत्पूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुमच्या बाईकर्स ग्रुपची रजिस्ट्रेशनची काय प्रोसीजर आहे. म्हणजे मला जर का तुमचा ग्रुप जॉइन करायचा असेल तर मला काय करावं लागेल" इंस्पेक्टरने आता सरळ विषयाला हात घातला.
"आमचे काही विशेष रुल वगैरे नाहीत. आम्ही कुठलीही ट्रिप असल्यावर महिनाभर आधी तस इंन्व्हिटेशन देतो. आमच्या ट्रिपची सगळी माहीती आमच्या वेब पेजवर दिलेली असते. सगळ्या जुन्या मेंबरसना त्या ट्रिपची माहीती वेळोवेळी ऑटो जनरेटेड मेल्सनी दिली जाते दर ट्रीपला काही नवीन लोकंही जोईन होत असतात. ती जर का जुन्या मेंबरर्सच्या रेफ़रेंन्सनी आलेली असतील तर मग आम्ही जास्त चौकशी करत नाही. पण एकदमच नवीन असतील तर मात्र आम्ही त्यांचे गाडीचे पेपर्स आणि त्याचा घराचा पत्ता वगैरे पर्सनली चेक करतो.
प्रत्येक ट्रिपच आयोजन आणि सुरक्षा ही आमची प्राथमीक जबाबदारी असते. प्रत्येक ट्रिपची माहिती आणि त्यावेळी घडलेल्या एकुण एक गोष्टी आमच्याकडे रेकोर्डड असतात."
अमेयने road stallion bikers ग्रुपची नियमावली पोलीसांना थोडक्यात सांगितली.
"मला ते रेकोर्डस पहायला मिळतील? " इंस्पेक्टरनी अमेयला विचारलं
"हो जरुर.....का नाही?" एव्हढं बोलून अमेय आतल्या खोलीत गेला आणि आपला लेपटॉप घेउन आला. तो लेपटॉप मधे त्याचे गेल्या ट्रिपचे डिटेल्स शोधत असतानाच इंस्पेक्टरांनी त्याला स्पेशली मंडणगडचे डिटेल्स दाखवायला सांगितले.
अमेयने लगेचच गेल्यावर्षीच्या मंडणगडच्या ट्रिपचे रेकोर्डस इंस्पेक्टरांना दाखवले. त्या ट्रिपच्या मेंबर्सची लिस्ट चेक करता त्यात इंस्पेक्टरांना हवी असलेली नावं सापडली.
पुष्कर म्हात्रे
अभिजित गायकवाड
तसदीक शेख
आणि
राहुल घोसाळकर
"तर मि अमेय ह्या मंडणगडच्या ट्रीपला काही वेगळ घडलं होत का?" इंस्पेक्टरनी खडा टाकला.
"नाही...... का हो?"
"नाही सहजच, तरीही काही लक्ष्यात राहील अस विशेष काही आठवतय का तुम्हाला ह्या ट्रिपबद्दल" इंस्पेक्टरांनी पुन्हा एकदा अमेयला विचारलं.
"नाही खरच काही घडल नाही. तसं थोड फार चिरीमिरी अस प्रत्येक ट्रीपला काही ना काही घडतंच असतं. पण त्यात काही विशेष नसतं. हो मात्र मंडणगडाहुन येताना एका मुलाची बाईक बिघडली होती. मग त्याच्यासोबत तिघेजण मागे राहिलेले. जे दुसऱ्या दिवशी मुंबईत आले." अमेयने आपल्या स्मरणशक्तीला जोर देऊन इंस्पेक्टरांना हे सांगितलं
"कोण होते ते??." इंस्पेक्टरांनी उत्सुकतेने विचारलं.
अमेयने त्याच्या रिकोर्डमधे चेक करून त्या मुलांची नावं इंस्पेक्टरांना दिली. नावं ऐकून इंस्पेक्टरांचा चेहरा उजळला. इंस्पेक्टरचा संशय खरा ठरला होता. ती नावं त्या चौकडीचीच होती. इंस्पेक्टरांनी अमेयकडुन ह्या रेकोर्डची कॉपी घेतली आणि निघाले.
अमेयच्या बिल्डिंगच्या खाली येताच इंस्पेक्टर अभयनी हवालदार अहिरांना काही सूचना देऊन ताबडतोब मंडणगडला निघायला सांगितलं
**************************************************************************
हवालदार अहिर इंस्पेक्टर अभयच्या ऑर्डरनुसार लगेचच मंडणगडाला रवाना झाले. मुंबईहुन सकाळी 7 ला निघालेले अहीर संध्याकाळी 4 ला मंडणगडला पोहचले. तिथे पोहचेपर्यंत हवालदार अहिरांना कळुन चुकलं होतं की मंडणगड पर्यटकांच नावडतं ठिकाणं का होत ते. सरकारी गाडी घेउन एकसलग प्रवास करुनही इथे पोहचेपर्यंत त्यांना नऊ तास लागले होते. मग ज्या लोकांना इथे येण्यासाठी पहिलं कोल्हापुर मग तिथून दिवसातून फक्त तीन वेळा मंडणगडासाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी पकडुन यावं लागत असेल त्यांच्याबाबतीत विचार न केलेलाच बरा.
हवालदार अहिर तिथे गेल्या गेल्याच आपला कामाला लागले. त्यांनी तिथल्या सगळ्या हॉटेलमधे चौकशी करायला सुरुवात केली. चौकशी करताना त्यांना एका हॉटेलच्या वर्षभरापुर्वीच्या रेकोर्ड मधे तिथे road stallion नावाने बुंकिग सापडलं. त्यांनी लगेचच तिथून इंस्पेक्टर अभयनां फोन लावला. इंस्पेक्टर अभयनी अहिरांना त्या हॉटेलमधे त्या आठवड्यात जेव्हढे जण रहायला होते त्या सगळ्यांची डिटेल्स काढायला सांगितली. त्याचबरोबर त्यांना अजुनही काही सूचना दिल्या. हवालदार अहिर पलीकडून इंस्पेक्टर अभयच्या सूचना लक्षपूर्वक ऐकत होते. इंस्पेक्टर अभयकडून सूचना समजुन घेउन त्यांनी फोन ठेवून दिला आणि आपल्या पुढच्या कामाला लागले
**************************************************************************
इकडे इंस्पेक्टर अभयला ACP नी बोलावून घेतलं होतं.
"हे काय चाललय इंस्पेक्टर राणे?? तुमच्या एरियात सध्या बरीच गडबड सुरु आहे." आल्याआल्याच ACP नी इंस्पेक्टर अभयनां धारेवर धरलं.
"हो......" इंस्पेक्टर अभयनां अंदाज आला होता की ACP ना नेमक्या कुठल्या केसमधे इंटरेस्ट होता ते
"त्या पुष्कर म्हात्रेच्या केसच काय झालं?" ACP नी इंस्पेक्टर अभय राणेंना त्यांना अपेक्षित असलेला प्रश्न विचारला.
"परिस्थीतीजन्य पुराव्यानुसार तो अपघात किंवा घातपात वाटत नव्हता, आणि तसही पोस्ट मोर्टमच्या रिपोर्टनुसार त्याचा नैसर्गिक मृत्यु झालाय साहेब. अ सिव्हीअर हार्ट अटेक. केस क्लोज आहे साहेब" इंस्पेक्टर अभयनी आपली बाजू मांडली.
"पण अप्पांना ते मान्य नाहिए ना.. पोस्ट मोर्टम रिपोर्ट बनावट आहेत असं म्हणणं आहे त्याच. त्यानी वरुन प्रेशर आणलय. आणि तसही पुष्कर इतक्या लांब का गेला होता हां प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे" ACP नी चिडून इंस्पेक्टर अभयनां विचारलं
"मी प्रयत्न करतोय सर??"
"बर ते ठीक आहे पण तसदिकच्या केसच काय झाल? ती केस अजुनही तुम्ही क्लोज केलेली नाहीत"
"तिच्यावर अजुन काम चालु आहे सर" इम्स्पेक्टर ओशाळत म्हणाले.
"मला रिझल्टस हवे आहेत इंस्पेक्टर अभय. हे पहा, मी तुम्हाला महिन्याभराची मुदत देतोय. तोवर मला ही सगळी प्रकरणं सुटलेली हवीत. तुम्ही येउ शकता"
इंस्पेक्टर अभय ACPच्या केबीनमधुन चरफ़डत बाहेर पडले.
**************************************************************************
शहराच्या एका कडेला असलेल्या 'वीर सावरकर' उद्यानात अभिजीत राहुलची वाट पहात उभा होता. भेटीची वेळ उलटून अर्धा तास होत आला, तरी अजुन राहुल आला नव्हता. राहुल कधी येतोय अस अभिजीतला झालं होतं. तेव्हढ्यात राहुल त्याला उद्यानाच्या गेटमधुन आत येताना दिसला.
"हम्म....... बोल रे काय झालं. असं तातडीने का बोलावलस?" राहुलने आल्या आल्याच अभिजितला विचारलं.
"आपला पुष्कर वारला. हे कळल असेलच तुला" अभिजीत म्हणाला.
"हो" राहुल चेहर्यावरची रेषही न हलवता म्हणाला.
"तसदिकही गेला"
'हम्म माहितीय, फार वाईट झाल ते."
"बास??? इतकचं??????" राहुलच्या अश्या थंड प्रतिक्रियेमुळे अभिजित वैतागला.
"हो........ मग म्हणजे ह्यावर मी अजुन काय करायला हवं असं वाटतयं तुला"
"हरामखोर, तुझ्यामुळे झालय हे सगळं" अभिजीत राहुलवर आपली नजर रोखीत म्हणाला.
"माझ्यामुळे??? माझा काय संबध?" राहुलही अभिजितच्या नजरेला नजर देत उत्तरला.
"तुझा काय संबध? मंडणगड.......विसरलास?"
अभिजीतने मंडणगडचा विषय काढताच राहुल चपापला. त्याने घाबरून आजुबाजुला पाहिलं आणि अभिजिताच्या जवळ सरकत त्याला म्हणाला.
"हळु बोल. उगीच कुठलीही गोष्ट कुठेही जोडू नकोस."
राहुलने अभिजीतच्या तोंडाचा वास घेतला. त्याची शंका खरी होती.
"तू प्यायलास का? वाटलेलच मला? साल्या झेपत नाय तर पितो कशाला? आणि तू जे काही बरळतोयस त्याला काय पुरावा आहे?"
"पुरावा?" राहुलने विचारलेल्या प्रश्नाला अभिजितने छद्मीपणे हसत प्रतिप्रश्न केला.
"पुष्कर आणि तसदीक दोघेहीजण आता ह्या जगात नाहीत. त्या दोघांच्या डेडबॉडीज मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्यात. फार वाईट अवस्था होती त्यांची. पुष्कर त्यादिवशी कड्यावर वारला तेव्हा त्याचा चेहरा बघायला हवा होतास. एव्हढी भिती मी आजवर कुणाच्याही चेहरयावर पाहीली नाही. तसदीकची डेडबॉडी तर ओळखीच्याही पलिकडे होती.
आणि....."
"अणि काय???" राहुलने वैतागत विचारलं.
"त्या रात्री अपघाताच्या अगोदर मी तसदीकशी फोनवर बोललो होतो" अभिजितच हे बोलणं ऐकून राहुल सरबरला.
अभिजीत पुढे सांगु लागला.
"तसदीक फार घाबरला होता. त्याला नीट बोलताही येत नव्हत. सारखा तोंडाने मंडणगड मंडणगड करत होता. मला काही कळेच ना की हा असा काय करतोय. म्हणुन मग मीच त्याला म्हट्लं की पंचमुखीमधे भेट म्हणुन. पण मी तिकडे पोहचायच्या अगोदरच तो तिथून निघुन गेला होता. मी तिथे आजुबाजुला चौकशी केली. तिथल्या पानवाल्याने सांगितल्यानुसार त्याच्या मागावर गेलो पण तो सापडला नाही. आणि दुसरयाच दिवशी त्याचा अक्सिडेंट झाल्याची खबर आली." हे ऐकत असताना राहुल अविश्वासाने अभिजीतकडे पहात होता.
"मग हे तू त्या दिवशी पोलीसांना का सांगितलं नाहीस?" राहुलने अभिजीतला विचारलं.
"काय सांगणार होतो मी पोलीसांना. त्या फोनच कबूल केलं असतं तर त्याच्यासोबत सगळ सांगायला लागलं असतं. अगदी सगळं.....
समजतय का तुला मी काय म्हणतोय ते?
जी गोष्ट आपण वर्षभर लपवुन ठेवली ती सगळी सांगावी लागली असती. पण मला वाटतय की आता आपल्याला हे सगळं सांगण्यावाचुन दूसरा काही पर्याय नाहिए." अभिजितच्या ह्या व्यक्तव्यानंतर खरतर राहुलही विचारात पडला. एक दोन मिनिट कुणीच कुणाशी काही बोलले नाही. अचानक अभिजित स्वत:शीच काहीतरी ठरवून राहुलला म्हणाला.
"तुला पटो अगर न पटो........पणं मी आता पोलिसांना सगळं खरं खरं सांगणार"
त्यासरशी राहुल एकदम उसळला. त्याने अभिजीतची कॉलर पकडली. आणि गुरकावला.
"काय सांगणार तू?
खबरदार कुठे काही बोललास तर?
नीट लक्ष्यात ठेव त्या प्रकरणात तुही तेव्हढाच भागीदार आहेस, जेव्हढा की मी. मी तरी माझे कॉण्टेक वापरून कसातरी ह्यातून सुटेन पण तुला मात्र नक्कीच लटकवेन."
एव्हढं ताकीद देऊन राहुलने अभिजितला सोडले आणि तिथून निघून गेला. राहुलच्या धमकीने अभिजीत पुरता घाबरला होता. कारण त्याला पुरेपुर माहीती होत की राहुलने मनात आणलं तर तो त्याला त्या प्रकरणात पुरता अडकवु शकत होता.
**************************************************************************
इंस्पेक्टर अभयनी पोलीस स्टेशनला आल्या आल्या तातडीने हवालदार अहिरांना आत बोलावलं.
"बोला अहीर any progress??"
"तुम्ही सांगितल्याप्रमाणे हॉटेलमधुन जी लिस्ट मिळाली होती. त्या सगळ्यांशी कॉण्टेक झाला, फ़क्त एकाशी सोडुन"
"म्हणजे????"
"रजिता पंडीत. पुण्याची रहाणारी आहे. कालपासून तिचा नंबर ट्राय करतोय पण लागत नाहीए." हवालदार अहिरांनी असं सांगताच इंस्पेक्टर अभय विचारात पडले.
"एक काम करा. त्या हॉटेलच्या रजिस्टरमधला तिचा पत्ता आहे ना तुमच्याकडे. किंवा तिच्या मोबाईल नंबरवरुन तिचा पत्ता शोधा आणि तेथील लोकल पोलिस स्टेशनला फोन करा. त्यांना त्या पत्त्यावर जाऊन यायला सांगा. नाहीतर एक काम करा तुम्ही स्वत: तिथे जाऊन चौकशी करा" इंस्पेक्टर अभयनी हवालदार अहिरांना सांगितलं.
"ठीक आहे साहेब. जयहिंद साहेब" इंस्पेक्टर अभयच्या सांगण्याबर हुकुम हवालदार अहीर कामाला लागले.
**************************************************************************
आज सकाळीच सकाळी पोलीस स्टेशनमधे हवालदार अहीर इंस्पेक्टर अभयची वाट पहात होते. दोन दिवस ते पुण्यालाच होते. आज सकाळीच मुंबईत आले होते. तिथुनही घरी न जाता सरळ पोलिस स्टेशनला आले होते. तेव्हढ्यात बाहेर स्कॉर्पिओ येउन उभी राहिली त्यातून इंस्पेक्टर अभय लगबगीने बाहेर पडले.
इंस्पेक्टर अभय केबीनमधे आत आल्या आल्या हवालदार अहिरांना उभे राहून इंस्पेक्टर अभय राणेंना कडक सल्युट ठोकला.
"बोला अहीर.....काय झालं? एव्हढ्या तातडीने का बोलावून घेतलतं? फ़ोनवरही काही बोलला नाहीत" इंस्पेक्टरांनी आल्याआल्या हवालदार अहिरांवर प्रश्नांचा भडिमार केला.
"सांगतो साहेब. ज्या रजिताच्या शोधात मी पुण्याला गेलेलो, ती तिथे नाही आहे." हवालदार शांतपणे इंस्पेक्टर अभयनां म्हणाले.
"म्हणजे??" इंस्पेक्टर अभयनी चमकून विचारलं.
"मंडणगडच्या हॉटेलमधे रजिताने नोंदवलेल्या पत्त्यावर मी गेलेलो पण काही उपयोग झाला नाही. ती भेटली नाही. शेजारी चौकशी केली तर कळलं की तिचा फ्लेट गेल्या वर्षभरापासुन बंद आहे. तिच्या शेजारयांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की तिच्याबद्दल त्यांना जास्त काही माहीती नाही. ती एकटीच रहायची. कुणाशीच बोलायची नाही. कधी यायची कधी जायची कळायचं नाही. स्वभावानंही ती थोडी विचित्रच होती."
"अस कस होईल कुणाला तरी तिची काहीतरी माहीती असेलच की तुम्ही आजुबाजुला नीट विचारल नसणार?" इंस्पेक्टर म्हणाले.
"बास काय साहेब. मी सगळी चौकशी केली. ती रहात असलेला फ्लेट देखील मास्टर की ने उघडून घेतला. त्या फ़्लेटमधे शोधाशोध केली तेव्हा तिच्या ऑफीसचा पत्ता सापडला. ती सासवडला एका कॉल सेंटरमधे कामाला होती. मी तिच्या ऑफिसला जाउन तिची माहीती काढायचा प्रयत्न केला पण तो मेनेजर सुरुवातीला टाळाटाळ करत होता. म्हटलं हा असा ऐकणार नाही. मग तिथून मी तडक तिथल्या पोलीस स्टेशनला गेलो. तिकडे चौकशी केली की, कुणी रजिता पंडितच्या नावाने मिसिंग कंप्लेट केली आहे का? तर तीही सापडली नाही. मग तिथल्या एका पोलीसवाल्याला घेउन पुन्हा रजिताच्या ऑफिसला आलो. परत त्या मेनेजरला गाठला. सोबतची वर्दी बघताच साला पोपटासारखा बोलायला लागला. त्याने सांगितलं की वर्षभरापुर्वीपासून तिने अचानक कामावर यायच बंद केलयं. मी त्याला कारण विचारलं तर म्हणाला की bpo मधे असे frequent flyer भरपूर असतात म्हणे. बाहेर कुठे जास्त पगाराची नोकरी मिळाली की असेच अचानक न सांगता गायब होतात. त्यामुळे कंपनीही अश्या एम्पोईजबद्दल काही जास्त इमोशनल होत नाही."
"मग ठीक आहे की अहीर....त्यात काय एव्हढ विशेष आहे" इंस्पेक्टर
"साहेब, ह्या सगळ्या प्रकरणात हे विशेष आहे की, गेल्या वर्षभरापासून गायब आहे. अगदी सोशल साईटवरूनही" हवालदार अहिरांनी हे सांगताच इंस्पेक्टर अभयना त्यांना हवालदार अहिरांनी त्यांना इथे एव्हढ्या तातडीने का बोलावून घेतल ह्याचा अंदाज आला.
"अजुन एक सर , रजिताच्या ऑफिसमधेही मी तिच्याबद्दल थोडी अवांतर चौकशी केली तेव्हा तिच्या एका कलिग कडून तिच्या संदर्भात काही गोष्टी कळाल्या." हवालदार अहीर पुढे सांगु लागले.
"काय????" इंस्पेक्टरही सरसावून बसले.
"तिथल्या तिच्या एका मैत्रीणीशी बोलल्यावर आम्हाला समजलं की रजिता अनाथ होती. सुरुवातीच्या काळात बरीच हालाखीच्या परिस्थितीतुन आता कुठे स्थावर होत होती. नेहमीच्या मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे थोडीशी विक्षिप्त झाली होती. त्यामुळेच की काय रजीता इतरांना नेहमीच एक रिझर्व्हड मुलगी वाटायची. कुणाशी जास्त बोलायची नाही. नेहमी स्वत:ला कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवुन घ्यायची. एकटेपणात रमायची ती. तिला फ़क्त एकच गोष्ट आवडायची ती म्हणजे फोटोग्राफी. रजिता एक उत्तम फोटोग्राफर होती. ती आणि तिचा केमेरा हे दोघेच होते एकामेकांसाठी. दिसायलाही चांगली होती. तिच्या उजव्या हाताच्या आतल्या बाजुला ॐ अस गोंदवलं होत. अचानक काय झालं माहीती नाही. पण ऑफिसला यायची बंद झाली." एव्हढं सांगुन हवालदार अहिरांनी आपल्या हातातला एका मुलीचा फ़ोटो इंस्पेक्टर अभयच्या हातात दिला. फ़ोटोतली मुलगी दिसायला सुरेख होती. अशी मुलगी खरोखरच जर का कुणालाही न सांगता गेल्या वर्षभरापासुन गायब असेल तर खरच हे काळजीचं कारण होतं.
"ह्या रजिताच्या फोनचं लास्ट् लोकेशन ट्रेस केल का?" इंस्पेक्टर अभयनी हवालदार अहिरांना विचारलं.
"केल साहेब, तीच लास्ट लोकेशन मंडणगड सन-राईज पोंईट मिळालयं" हवालदारांनी इंस्पेक्टर अभयकड़े सुचकपणे पाहिलं.
"मग अहीर, आपण वाट कसली पहातोय? चला गाडी काढा आपण आत्ताच्या आत्ता मंडणगडला निघतोय"
**************************************************************************
अभिजीत आज घरी एकटाच होता. त्याचे आईबाबा गावी गेले होते. त्याच्या दूरच्या नात्यातल्या एका बहिणीच लग्न होतं. किमान तीन दिवस तरी ते काही येणार नव्हते. जाताना ते अभिजीतलाही सोबत येण्यासाठी सांगत होते पण अभिजीतचा मुड नव्हता. खर सांगायच तर पुष्कर आणि तसदिकच्या झालेल्या मृत्युमुळे तो थोडा घाबरला होता. त्यात पुन्हा राहुलने दिलेल्या धमकीमुळे तर तो अजुनच बिथरला होता.
अभिजितने कपाटातुन शिवाज रीगल काढली. पहाता पहाता त्याचेपाच पेग कधी झाले हे त्याच त्यालाच कळलंच नाही. झरझर संपणाऱ्या बॉटलकडे पहाताना त्यालाही जाणवलं की खरच हल्ली आपलं पिणं फारच वाढलयं. जसजशी बॉटलमधली दारु संपत होती तसतशी त्याच्या मनात निराशा भरत चालली होती. त्याला सारखा त्याच्या डोळ्यासमोर पुष्कर आणि तसदिकचा चेहरा येत होता. त्यांच्या सोबत घालवलेले काही जुने क्षण आठवुन तो अस्वस्थ होत होता. पुष्करचा बिनधास्तपणा, तसदिकचे विनोद, राहुलचं सतत काहीतरी नवनवीन एक्साईटमेंटस पण काही दिवसांत होत्याच नव्हतं झालं होतं. पुष्कर आणि तसदीक काळाच्या पडद्याआड निघून गेले होते. राहुल पूर्णत: बदलला होता आणि हे सगळं त्या मंडणगडच्या टूर नंतरच घडलं होतं. आपण साली ती मंडणगडची ट्रीपच करायला नको हवी होती.
मंडणगडच्या टूरची आठवण होताच अभिजितने हातातला ग्लास एका दमात बॉटम अप केला. ग्लासातलं ते रंगीत पाणि छाती जाळत खाली उतरलं.
**************************************************************************
सप्टेंबर महिन्यातले ते पावसाचे दिवस होते. पुष्कर, तसदीक अभिजीत आणि राहुल एका रोड ट्रीपला निघाले होते.
मंडणगडला....
अभिजीतने कुठुनतरी इंटरनेटवरून "ROAD STALLION" नावाचा बाईकर्सचा गृप शोधला होता. त्याच गृप सोबत हे चौघे त्या टूरवर गेले होते. राहुल पुष्कर आणि अभिजीतच्या स्वत:च्या बाईक्स होत्या तर तसदीक पुष्करसोबत पिलियन रायडर होता. चौघेही जण त्यांच्या पहिल्या वहिल्या रोड़ ट्रिपसाठी फार एक्साईट होते. दिवसभराच्या रोमांचक पण तितक्याच थकवणाऱ्या त्या रोड ट्रिपचा अनुभव घेत "ROAD STALLION" ची टिम संध्याकाळी मंडणगडच्या हॉटेल रिजन्सिला पोहचली. टिमलिडरने सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या रूमच्या चाव्या दिल्या. आपापल्या चाव्या ताब्यात घेउन ते सगळे रायडर्स आपल्या आपल्या रुमकडे निघाले. तेव्हढ्यात राहुलला आठवले की आपण आपल्या बाईकची चावी बाईकलाच विसरलो आहोत. तो गडबडीने ती आणायला पार्कींग लॉटमधे गेला. नशिबाने चावी अजुन बाईकलाच होती. राहुल चावी घेउन परत निघतच होता की, त्याला बाहेरच्या रोडवर गडबड जाणवली. त्याने लक्ष देऊन पाहिलं तर त्या हॉटेलच्या मेनगेटवर दोन मुलं एका मुलीची छेड काढत होते. त्या मुलीच्या हावभावावरून ती मुलगी त्या मुलांच्या अश्या वागणुकीमुळे फार वैतागलेली वाटत होती आणि अचानक त्यातल्या एकाने तिचा रस्ता अडवला. आता मात्र आपल्याला काहीतरी केलचं पाहिजे हे ओळखुन राहुल त्या मुलीच्या जवळ पोहचला. समोर उभ्या असलेल्या त्या मुलांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करून राहुलने त्या मुलीच्या खांद्यावर हात टाकला.
"काय ग ए...अग किती उशीर. मी केव्हाची वाट पहात होतो तुझी. चल लवकर आत. बाहेर बरीच थंडी पडलीय. सगळे आतमधे आपली वाट बघताहेत." शेवटचं वाक्य तो मुद्दामून ज़रा मोठ्याने म्हणाला.
राहुलच्या अश्या वागण्यामुळे ती मुलगी अजुनच बावरली. राहुलचा हा आगाउपणा तिला अजिबात आवडला नव्हता. राहुल मात्र तो तिचा बॉयफ़्रेंड असल्यासारखाच वागत होता. त्यामुळे की काय, अपेक्षित असा परिणाम झाला. हि मुलगी इथे एकटी नसून हिच्यासोबत तिचा बॉयफ़्रेंड आणि अजुनही काही लोक आहेत. जेणेकरुन हिला छेडण्यात आता धोका आहे अशी त्या मुलांची खात्री पटली आणि त्यांनी हळूच तिथून काढता पाय घेतला.
ती मुलं निघून गेल्यावर त्या मुलीने राहुलचा हात आपल्या खांद्यावरुन झटकला.
"How dare you..तू स्वत:ला काय समजतोस?" ती मुलगी फार घुश्श्यात होती.
"ए हेलो!!! तुझा प्रॉब्लेम काय आहे. जर का मी हा असा वागलो नसतो ना तर आता त्या मुलांनी तुला इथून उचलून नेली असती. मग त्यांना विचारला असतास का हा प्रश्न????" राहुलही त्या मुलीच्या अश्या अनपेक्षित प्रतिक्रियेवर वैतागला.
राहुलच्या ह्या वाक्याने त्या मुलीला तिची चुक उमगली. थोडं शांत झाल्यावर ती राहूलला सॉरी म्हणाली. त्यावर राहुलने लगेचच शहारुखची पोझ मारत
"It's ok सिनोरिटा... बडे बडे शहरोमे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है" हा डायलॉग चिकटवला.
राहुलच्या ह्या फिल्मीगिरीवर ती मुलगी मनापासून हसली. तिला असं हसताना पाहून राहुलही खुष झाला.
"Hi... i am राहुल....राहुल घोसाळकर" राहुलने आपला हात पुढे करत आपली ओळख करून दिली.
"I am रजिता...रजिता पंडीत" तिनेही आपली ओळख सांगीतली.
आता पुढे काय बोलावं हे दोघानांही सुचत नव्हतं. ते दोघेही हॉटेलच्या दरवाज्यात काही न बोलता उभे होते. राहुल रजिताला पाहून सॉल्लिड इंप्रेस झाला होता. अखेर रजिता राहुलला म्हणाली.
"निघुया????..."
रजिताच्या ह्या बोलण्यावर ओशाळुन राहुलने रजिताला वाट करून दिली आणि राजिता निघून गेली. राहुल अजुनही पाठमोऱ्या रजिताला हॉटेलकडे जाताना पहात तिथेच गेटवरच उभा होता. तेव्हढ्यात त्याच लक्ष हॉटेलच्या दारात उभ्या असलेल्या अभिजीतकडे गेलं. अभिजीत राहुलकडे पाहून गालातल्या गालात हसत होता.
**************************************************************************
मंडणगडच्या लोक्यालिटीनुसार हॉटेल रिजंसी त्यामानाने बरच चांगल होत. बाहेर मस्त थंडी पडली होती. रजिताला रुममधे नुसतं बसून बसून कंटाळा आला होता. संध्याकाळचा प्रसंग सोडला तर तिचा आजचा दिवस बाकी मस्त गेला होता. मनासारखी फोटोग्राफी झाली होती. पण तिला खरी फोटोग्राफी उद्या पहाटे करायची होती. तिला तिच्या केमेरयाने मंडणगडचा सूर्योदय टिपायचा होता. त्यासाठीच तर ती इथे आली होती. नुसतं रुममधे बसून काय करायचं म्हणुन ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने पाहिलं की समोर लॉनमधे काही मुलमुली मधोमध शेकोटी पेटवून बसली होती. ऑफ़ सिझन असल्याने ह्या हॉटेलमधेही जास्त कुणी नव्हतं. रजिता एकटी कंटाळली होती. समोर त्या मुलांची मस्त धमाल चालु होती. बार्बेकोस आणि ड्रिक्स सोबत गाणी आणि मौज मजा चालु होती. त्यांच्यापैकी कुणीतरी गिटारवर गाणी म्हणत होतं. गाणाऱ्याचा आवाज खरच खुप मस्त होता.
"Why don't you join with us?" रजिता आपल्या विचारात असतानाच अचानक कुणीतरी विचारलं.
तिने चमकून पाहिलं तर तिच्या बाजुला तिच्याच वयाची एक मुलगी उभी होती. रजिताने हसून नकार दिला. त्या मुलीने पुन्हा एकदा रजिताला त्यांच्या सोबत जोईन व्हायला सांगितलं. रजिता खरतर एकटी कंटाळली होती. तिलाही तिथे जावसं वाटतं होतं पण तिला अस ओळख नसताना कुणाच्या तरी ग्रुपमधे जाणं थोडसं ऑकवर्ड वाटत होतं. पण रजिता हिच्यासोबत जाऊ की नको जाऊ हा विचार करीत असतानाच त्या मुलीने तिचा हात पकडून तिला त्यांच्यामधे घेउन गेली.
त्या मुलीने रजिताला एक बिअर ऑफर केली. रजिताचा संकोच आता कमी झाला होता. ती त्या गृप मधे बसून त्या थंड वातावरणात त्या उबदार शेकोटी समोर चिल्ड बिअरचा आस्वाद घेत होती.
तेव्हढ्यात गिटार वर रजिताचं आवडत गाणं चालु झालं.
"पाणि दा ....... रंग वेखके........"
रजिताने उत्सुकतेने त्या गिटार वाजवणाऱ्या त्या मुलाकडे पाहिलं आणि तिचे डोळे चमकले.
तो राहुल होता.
राहुल तिच्याकडेच पहात होता. रजिताच लक्ष त्याच्याकडे जाताच त्याने तिला हलकेच डोळा मारला.
"उफ्फ, पुन्हा फ़िल्मी...." असं मनात म्हणत रजिताने त्याला हसून प्रत्युतर दिलं.
त्या मदहोश वातावरणात राहुलचं ते गाणं आसमंत अजुन नशावत होतं.
"कमली हो गई तेरे बिना.......आजा रांझन मेरे......."
राहुलच्या गाण्यात रजिता अक्षरश: हरवून गेली होती. राहुलही फ़क्त आणि फ़क्त रजिताकडे पाहूनच ते गाणं म्हणत होता. जणु काही तो फ़क्त तिच्यासाठीचाच गात होता. रजितालाही ते जाणवतं होतं. एकीकडे सगळे आपल्याच धुंदीत होते तर दुसरीकडे रजिता आणि राहुलच्या नजरेचा खेळ सुरु होता.
अचानक झालेल्या टाळ्यांच्या आवाजाने रजिता तिच्या तंद्रीतुन बाहेर आली. राहुलच गाणं संपलं होतं. राहुलने आता गिटार अभिजितच्या हातात दिली आणि स्वत: हातात बिअरचा एक टीन घेउन रजिताच्या बाजुला बसला. दोघेही एकामेकांशी काहीही न बोलता एकामेकंचा सहवास अनुभवत होते. इकडे अभिजीतच्या गिटार आणि तो गात असलेल्या गाण्यांनी मौसम अजुन बहरत होता.
नुकतच अभिजीतने एक गाणं संपवलं. सगळ्यांवरती अभिजीतच्या गाण्याची गुंगी अजुन चढत असताना, राहुलने अभिजीतला त्याचं आवडीच एक गाणं गाण्याची फरमाईश केली.
"मेरे रंग में रंगनेवाली......."
अभिजीतला इशारा समजला. अभिजीतने गिटारच्या तारा झंकारल्या. अभिजीत आपल्या मित्राचं आवडीचं गाणं अगदी मनापासून गात होता. कारण त्याला माहीती होतं की राहुलने हे गाणं त्याला कुणासाठी गायला सांगितलं होतं ते. सगळेच धुंदावले होते. एक परफ़ेक्ट माहोल बनला होता. अचानक राहुलने रजिताला त्या गाण्यावर नाचायला आमंत्रण दिलं.
रजितानेही ते आमंत्रण स्विकारलं. फार मस्त कपल वाटत होतं ते. त्या दोघांच्या प्रत्येक मुव्हसला सगळ्यांकडुन दिलखुलास दाद मिळत होती. हा नजारा असाच चालु रहावा असं सगळ्यांना वाटत असतानाच ते गाणं संपलं. सगळ्या जणांनी राहुल आणि रजिताला अप्रिशिएट केल होतं.
गाण्याची मैफ़िल अशीच रात्रभर सुरु होती. अखेर रात्री केव्हातरी हे सगळं थांबलं. सगळेजण आपापल्या रूमवर परतले. पण राहुल आणि रजिता अजुनही लॉनमधेच बसले होते. संध्याकाळी एकामेकांना पहिल्यांदाच भेटलेले राजिता आणि राहुल एव्हाना एकामेकांचे फार चांगले मित्र झाले होते. गप्पा मारता मारता राहुलला रजिताबद्दल बरीच माहीती कळली होती. रजिता पुण्याची रहाणारी होती. पोटापाण्यासाठी ती एका कॉलसेंटरमधे काम करत असली तरी तीची आवड फोटोग्राफी होती. स्वत:च्या लेंडस्केप फोटोग्राफीच प्रदर्शन भरवायचं हे तिचं स्वप्न होतं. अन त्याच निमित्ताने ती इथे आली होती. राहुलनेही मग स्वत:ची जुजबी माहीती देत, तो आणि त्याचे मित्र पहिल्यांदाच इथे बाईक राईड करत आले आहेत असं सांगितलं. इथे रात्र चढत होती तरी त्या दोघांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. रजिताला खरतर थोड़ी चढली होती. अचानक तिने राहुलचा हात धरून त्याला उठवत त्याला म्हणाली.
"चल आपण आत्ताच्या आता सन राईज पोंईटला जाऊ"
"तुला काय जास्त झाली का? आत्ता रात्रीचे दोन वाजताहेत" राहुलने सपशेल नकार दिला.
पण रजिताच्या हटटापुढे राहुलच काही चाललं नाही. राहुलला हे सगळं मुर्खपणाच वाटतं होतं. पण आता ह्या क्षणाला राहुल रजिता जे सांगेल ते सगळं करायला तयार होता.
दोघेही रात्रीच्या अंधारात सन राईज पोईंटकडे निघाले. जंगलातुन चालताना अंधारात पायाखालाच्या वाटेचा अंदाज येत नव्हता. वाटेत एके ठिकाणी एक अवघड चढण होती. राहुल त्यावर पहिला चढला. वर चढून त्याने मागाहून येणाऱ्या रजिताला वरती येण्यासाठी हात दिला. राहुलच्या मदतीने रजिता ती चढण चढून वर आली, पण चढताना तिचा तोल जाउन ती राहुलच्या अंगावर रेलली. राहूलने तिला आपल्या मजबूत मिठीत सावरलं. ह्या सगळ्या गडबडीत रजिता राहुलच्या एकदम जवळ आली. चंद्रप्रकाशात रजिताचा चेहरा उजळुन आला होता. अस्मानीचं सौन्दर्य जणु अलगद त्याच्या मिठीत विसावलं होतं. राहुल त्या मुर्तिमंत सौंदर्याला कितीतरी वेळ असाच निरखत राहिला. अन नकळत राहुलचे ओठ रजिताच्या ओठावंर टेकले.
पुढच्याच क्षणाला एक जोरदार आवाज झाला. रजिताने राहुलच्या खाणकन कानाखाली मारली होती.
"Bastard .....तुही इतरांसारखा निघालास. तुम्हा मुलांचाना हाच प्रॉब्लेम आहे. ज़रा कुठे एखादी मुलगी तुमच्याशी चांगली बोलली की ह्यांना तिला लगेच बेडरुममधे घेउन जायची घाई असते. I hope माझ्या ह्या थप्पडने तुझं डोकं ठिकाणावर आलं असेल." एव्हढं बोलून रजिता तिथून तणतणत निघून गेली.
राहुल रागाने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात गाल चोळत उभा होता. रजिताने राहुलच्या कानाखाली चांगलाच आवाज काढला होता. थप्पड जरी राहुलच्या गालावर बसली असली तरी वार मात्र त्याच्या हृदयावर झाला होता. घडलेली गोष्ट राहुलच्या जिवाला फार लागली होती, आजवर एव्हढा अपमान त्याचा कधीच झाला नव्हता, तरी झालेला प्रकार अजुन कुणी पाहिला नाहीय हीच काय ती राहुलच्या बाबतीत एक जमेची गोष्ट होती. असा विचार करीत राहुलही परत हॉटेलवर निघाला
पण कदाचीत राहुलला हे माहीती नव्हतं की हा घडलेला प्रकार त्या अंधाऱ्या रात्री व्यतिरिक्त अजुनही कुणीतरी पाहिला होता.
**************************************************************************
अगदी भल्या पहाटे रजिता सूर्योदय पहायला बाहेर पडली. अजुनही बाहेर अंधारच होता. जाता जाता तिने पुन्हा एकदा लॉनमधल्या त्या शेकोटीकडे पाहिलं. आता ती पूर्णपणे विझली होती. कालची कुठलीच धग तिच्यात उरली नव्हती. त्या शेकोटीकडे पहाताना तिला कालची रात्र आठवली अन त्याच बरोबर तो प्रसंगही. रजिताला त्या आठवणीने कसतरीच झालं. त्या शेकोटीवरील आपली नजर हटवुन ती सरळ रिसेप्शनच्या दिशेने चालु लागली. तिकडे रजिताने चेक आऊट केलं. तसा तिच्याकडे संध्याकाळ पर्यंतचा वेळ होता. पण तिला पुन्हा त्या हलकट राहुलची भेट नको होती.
सूर्योदय व्हायला अजुन बर्यापैकी वेळ होता. पण परफेक्ट लोकेशन, केमेराचा एंगल वगैरे सेट करायला वेळ जाणार होता. तिला कुठलीही फ्रेम गमवायची नव्हती. त्यासाठीच ती झपझप पावलं टाकतं होती. ती वाटेतल्या त्या चढ़णीकडे आली. काल ह्याच वाटेवर तिच्याबरोबर राहुलने आगाउपणा केला होता. रजिताला तर अजुनही विश्वास बसत नव्हता ह्या गोष्टीवर. अवघ्या काही तासांच्या ओळखीवर राहुलने ते बरच मोठं धाडस केलं होतं. पण दोष एकट्या राहुलाचाच नव्हता. रजितालाही तिची स्वत:ची चुकही उमगली होती. तिनेही स्वत:ला एका अनोळखी व्यक्ती समोर ज़रा जास्तच सैल सोडलं होतं. जे तिच्या मुळ स्वभावाच्या अगदी विरुध्द होतं. पण तिच्या अस वागण्याचं कारण तीच तिलाही कळतं नव्हतं. बहुतेक राहुल तिला आवडला होता. त्यामुळेच तीही मग थोडीशी वहावत गेली होती. पण तरीही, राहुलने असं वागायला नको हवं होतं. आपण त्याला योग्य तीच शिक्षा केली. पण तरीही तिचं एक मन मात्र अजुनही राहुलची बाजू घेत होतं. ते रजिताला सांगत होतं की जाऊ दे ग होतं असं कधी कधी. तू त्याच्या मुस्काटात मारल्यावरही तो काही बोलला नाही. तो जर का खरच वाईट असता तर त्या वेळेस तो काहीही करू शकला असता. रजिताला ही गोष्ट पटली. तिला वाटलं की खरच आपणही ज़रा चूकलोच आपल्याला राहुलची माफी मागायला पाहिजे.
रजिता तिच्याच विचारात चालत असताना अचानक तिच्यासमोर एक आकृती उभी राहिली. असं अचानक कुणितरी समोर आलेलं पाहून रजिता केव्हाढ्याने तरी दचकली. तिने मान वर करून पाहिलं तर.....
तिच्यासमोर राहुल उभा होता.
पहिल्यांदा ती राहुलला तिथे पाहून खुष झाली. ज्या गोष्टीचा आपण विचार करत होतो ती स्वत: हुन इथे आलेली पाहून ती मनातून खुप आनंदली. पण तिचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. ती राहुलला भेटायला एक पाउल पुढे झाली आणि थबकली. राहुल थोडा विचित्र वाटत होता. त्याचे डोळे तांबारलेले होते. त्याच्या शरीरातून दारुचा प्रचंड वास येत होता. काल रात्रीच्या राहुलचा लवलेशही त्याच्यात नव्हता.
राहुल रजिताकडे एकटक पाहत होता. रजिताला राहुलची लक्षण काही ठीक वाटत नव्हती. त्याच्या डोळ्यातला राग तिला स्पष्ट वाचता येत होता. ती उगाच अजुन तमाशा नको म्हणुन त्याच्या बाजूने पुढे निघून जायला पहात होती की, तेव्हढ्यात राहुलने तिचा हात पकडला. रजिताला हा प्रकार अगदी अ्नपेक्षित होता. ती राहुलच्या हातातून आपला हात सोडवायचा प्रयत्न करू लागली. पण राहुलने आपली पकड अजुन घट्ट केली. तिच्या हाताला एक हिसका देत त्याने तिला आपल्या जवळ ओढली.
"आता काय करशील" राहुलने असं विचारताच दारुचा एक उग्र भपकारा आला. रजिताने तोंड फिरवले.
"आता का तोंड लपवतेयेस?" राहुलने तीचा चेहरा आपल्याकडे वळवत विचारलं. राहुलच्या आवाजातली चीड तिला स्पष्ट कळतं होती. एकतर डोक्यात घुसलेली दारु, त्यात रजीताने केलेला त्याचा अपमान आणि भरीस भर म्हणुन काल रात्री घडलेल्या त्या प्रसंगानंतर पुष्कर आणि तसदीकने त्याचा केलेला उपमर्द. ह्या सगळ्यामुळे राहुल आता एकदम चवताळला होता. तो पुन्हापुन्हा रजिताला स्वत:जवळ खेचत होता.
आता मात्र रजिताचा संयम सुटला. तिने जोरात राहुलच्या हाताला हिसडा देऊन स्वत:चा हात सोडवून घेतला. आणि पुढच्याच क्षणाला राहुलच्या अजुन एक सणसणीत कानाखाली लावून दिली.
"एव्हढी पुरे की अजुन एक देऊ." रजिताने राहुलला विचारलं.
राहुलच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. राहुल धडपडत एका बाजुला गेला. राजिता आता तिथून निघायच्याच तयारीत होती की कुणीतरी तिला मागुन येउन धरलं.
"सोडु नकोस त्या सालीला तसदीक.." समोरच्या अंधारातुन एक आवाज आला. रजिताने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर राहुलसारखाच एक तरुण तिच्याकडे येत होता.
तो पुष्कर होता.
रजिता सुटण्याचा अटोकाट प्रयत्न करत होती. पण पाठीमागून तसदीकने तिला मजबूत पकडून ठेवलं होतं. पुष्करने एकवार रजिताच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि एक जोरदार तिला लगावुन दिली. राजिता पुष्करच्या त्या फ़टक्याने पडणारच होती, पण तसदीकने तिला पकडून ठेवल्यामुळे वाचली.
तिचा चेहरा हातात घेत पुष्कर तिला म्हणाला
"फार माज आहे ना तुला. थांब तुझी सगळी गरमी उतरवतो आता. तसदीक उचल हिला." तसा तसदिकने तिला सरळ उचलून खांद्यावर टाकली. तिचा आरडा ओरडा चालुच होता. पुष्करने स्वत: जवळच्या रुमालाने तिचे तोंड बांधले.
"अभी...तू राहुलला घेउन मागोमाग ये" एव्हढ बोलून पुष्कर बाजूच्याच झाडीत घुसला, मागोमाग तसदिकही. तसा अभीजित राहुलला उठवुन स्वत: सोबत घेउन पुष्कर आणि तसदिकच्या मागुन चालु लागला.
थोडे पुढे जंगलात गेल्यावर एक जुनं तुटलेलं गेस्ट हाउस सारखं काहीतरी होतं. पुष्कर आजुबाजुचा अंदाज घेत तिथे थांबला त्याने तसदिकलाही रजिताला घेउन तिथेच थांबायला सांगितलं. पुष्कर आत जाउन बघून आला त्याने आतुनच तसदिकला रजिताला घेउन यायचा इशारा केला. पुष्करच्या इशारयावर तसदीक रजिताला घेउन त्या ओसाड वास्तुत शिरला. मागोमाग अभिजीत आणि राहुलही गेले. रजिता अजुनही प्रतिकार करतच होती. तिला पुष्करच्या सांगण्यावरुन तसदिकने तिथेच खाली ठेवली. तिला पाहून पुष्कर राहुलला म्हणाला.
"हिनेच काल तुझा अपमान केला होता ना? आता हिचा माज उतरवतो. फार शहाणी समजते ना स्वत:ला. आता बघुया काय करते ती?"
एव्हढं बोलून पुष्करने रजिताचे कपडे काढायला सुरुवात केली. रजिता हातपाय झाड़त होती. ती एकट्या पुष्करला ऐकत नाही हे पहाताच अभिजीत आणि राहुलही पुढे झाले. तिघांनी मिळुन तिचे कपडे तिच्या अंगावरुन अक्षरश: ओरबाडून काढले. तर तसदीक हा सगळा प्रसंग स्वत:च्या मोबाईलमधे शूट करत होता. एव्हाना बाहेर पाउस पडायला सुरुवात झाली होती. रजिता शरमेने अर्धमेली झाली होती. ते चौघेही जण तिचे त्यांना हव्या असलेल्या अवस्थेत फोटो घेत होते. तेव्हढ्यात राहुलला काय झाले कळले नाही त्याने आपला बेल्ट काढला आणि त्या बेल्टने तो रजिताला मारायला लागला. राहुलाच्या प्रत्येक फ़टक्यानिशी रजिता कळवळत होती. तिच्या कळवळण्याने ते चौघेहीजण असुरी हसत होते. अखेर राहुल थांबला. त्याने एकवार रजिताकडे पाहिलं. त्याची रजिताकडे पहायची नजर आता बदलली होती. त्याच्या डोळ्यातल्या संतापची जागा आता वासनेने घेतली होती. तो हळुहळु रजितावर झुकू लागला. थोड्याच वेळात त्याची सावली रजिताच्या अंगावर पसरली. आणि पुढच्याच क्षणाला आसमंतात एक असहाय्य विदीर्ण हुंकार घुमला. बाहेर पाउस आता जोराचा पडु लागला होता.
**************************************************************************
बाहेरचा पाउस आता थांबला होता आणि त्या गेस्ट हाउसमधला बिभिस्तपणाही. गेल्या तासाभरात एका पाठोपाठ एक ते चौघेहीजण रजिताच्या देहावर गिधाडांसारखे तुटुन पडले होते. रजिता त्या थंडगार जमिनीवर मुसमुसत पडली होती. तिचे डोळे सुकले होते. शरीरात एक प्रकारचा बधीरपणा आला होता. पुष्कर रजिता जवळ गेला. त्याने तिच्याजवळ उभं राहून आपल्या हातातला बेल्ट तिच्या उघड्या अंगावरुन एखादं मोरपीस फिरवावं तसा फिरवला. रजिता अजुनही थरथरत होती. त्याने तिला मारण्यासाठी हवेत बेल्ट उगारला तसं रजिताने आपलं शरीर घाबरुन आकसुन घेतलं.
"सॉरी डार्लिंग.." पुष्करने हवेत उगारलेला आपला हात तसाच ठेवत राजिताकडे पहात चुकचुकला.
तो खाली बसला. त्याने तिला उठवुन बसवलं. पण ती पुन्हा जमिनीवर पडली. जणु काही ती माणुस नसून एक मांस भरलेली कातड्याची गोणी होती. पुष्करने तिला पुन्हा उठवलं आणि भिंतीच्या आधाराने टेकून बसवलं.
"काय ग मजा आली ना?" पुष्करने रजिताच्या गालावरून हात फिरवीत विचारलं. पुष्करच्या ह्या घाणेरड्या प्रश्नांवर तसदीक जोरदार फसफसला. राहुल खिडकीत उभा राहून सिगरेट पीत होता. त्याला आता रजितामधे काहिएक स्वारस्थ नव्हतं. त्याच्या वतीने त्याने त्याच्या अपमानाचा बदला घेतला होता.
"अग सांग ना......अरे हो तुला बोलता येत नाहिए ना......थांब, मी माझ्या डार्लिंगला थोडसं मोकळं करतो" असं बोलून पुष्करने रजिताच्या तोडांला बांधलेला तो रुमाल काढला.
रजिता अजुनही खाली जमिनीकडे पहात थरथरत होती. पुष्करने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर उचलला. रजिताने धगधगत्या नजरेने समोर पुष्करकडे पाहिलं. पुष्कर अजुनही हसतच होता. रजिताला ह्या सगळ्या गोष्टीची प्रचंड किळस आली. पुढच्याच क्षणाला ती पचकन पुष्करच्या चेहरयावर थुंकली. त्यासरशी पुष्कर हसायचा थांबला. पुष्करने आपला चेहरा पुसला आणि पुन्हा एकदा रजिताकडे पाहिलं. आता हसायची पाळी रजिताची होती. तिला असं हसताना पाहून पुष्करने हातातल्या बेल्टने सरळ रजिताचा गळा आवळला. राजिता हातपाय झाडु लागली. पण पुष्कर आता त्याच्या आवाक्यात राहिला नव्हता. इतकं सगळं होउनही ही अजुनही आपला अपमान करतेय ही भावनाच त्याला असहय्य होत होती. पुष्कर पुर्ण जोर लावून हातातला बेल्ट रजिताच्या गळ्याभोवती आवळत होता. रजिता आता कासावीस होउन हातपाय झाडायला लागली. तिचा श्वास उखडायला लागला होता, गोष्ट हाताबाहेर चाललीय हे पाहून राहुल दुरूनच पुष्करला रजिताला सोडायला सांगु लागला. पुष्कर ऐकत नाही हे पाहून अखेर राहुल मधे पडला. त्याने पुष्करला जोरात बाजुला ढकलीत त्याच्या हातून रजिताला सोडवले.
"xxxx तुला अक्कल आहे काय? अरे अश्याने मरेल ना ती..." राहुल पुष्करच्या ह्या मुर्खपणावर जाम भडकला होता. सगळे झाल्या प्रकाराने एकदम शांत झाले होते. एक दोन क्षण गेले असतील की,
"भाई.... ती खरचं मेली वाटते"
तसदिकच्या त्या वाक्याने सगळ्यांची नजर एकसाथ रजिताकडे वळली. रजिता जमिनीवर निपचीत पडलेली होती. तिने डोळे फिरवले होते. तिच्या गळ्याभवतीची पट्ट्याची आवळ स्पष्ट दिसत होती. पुष्कर सावकाश तिच्या जवळ गेला. त्याने आपल्या पायाने रजिताला शरीराला एक दोनदा हलकासा धक्का दिला. त्या धक्क्यासरशी रजिता एका निर्जीव बाहुलीसारखी जमिनीवर पसरली. रजिताला असं समोर नि्पचित पडलेलं पाहून आता एकजात सगळ्यांची फ़ाफ़लली होती.
अभिजीतने खाली पडलेल्या रजिताला गदागदा हलवले. तिला थपडा मारून उठवायचा प्रयत्न केला पण रजिता तशीच निश्चिल पडून होती.
"आता काय करायच?" अभिजितने सगळ्यांच्या मनात उभ्या राहिलेल्या प्रश्नाला वाचा फोडली.
काही क्षण शांततेत गेले असतील की राहुलने पुष्करची गंचाडी धरली.
"Xxxx तरी सांगत होतो. सोड तिला, मरेल ती, पण नाय ऐकला नाय." राहुल आता सॉल्लिड भडकला होता. कुणालाच काही सुचत नव्हते. सगळेजण एकामेकांच्या तोंडाकडे बघत होते. पुष्करला समोर पाहून तर राहुलची तारच सटकली होती. राहुल पुन्हा पुष्करच्या अंगावर धावून गेला. तो पुष्करला एक वाजवणार की अभिजीतने राहुलला आवरले.
"आपापसात भांडण्यापेक्षा, हे आता निस्तरायच कसं ते बघा अगोदर" अभिजीत राहुलला म्हणाला.
अभिजित बोलत होता त्यात तत्थ्य होतं. एव्हाना आभाळ फ़ाटायला सुरुवात झाली होती. आता जे काही करायचय ते लवकरात लवकर कराव लागणार होतं. वेळ फ़ार कमी होता. जमिनीवर अस्त्यावस्थ पडलेल्या रजिताकड़े एकवार पाहून राहुल विचार करू लागला. सगळेजणाचं लक्ष आता राहुल काय बोलतो ह्यावर लागल होतं. जाणारा एक एक मिनीट त्यांच्या जिवावरच दडपण वाढवत होता. अचानक टाळी वाजवून राहुल पुढे सरसावला. त्याच्या डोक्यात ह्या सगळ्यातुन सुटण्याचा प्लान तयार झाला होता.
"सगळ्यात पहिलं तर हिची ओळख मिटवायला हवी"
"हिच्या डोक्यात दगड घालू काय?" पुष्कर म्हणाला.
"तू गप बस आता...अगोदरच आमची मारून ठेवलीयस......" राहुल पुष्करवर पुन्हा उखडला.
काहीतरी आठवुन त्याने तसदीकला विचारलं
"तेरे पास हमेशा चक्कू रेहता है ना रे ...?"
तसदिकने लगेच आपले खिसे चपापले आणि एका खिशातून त्याने त्याचा पॉकेट क्नाईफ़ बाहेर काढला. राहुलने लगेचच त्या चाकूने भराभर रजिताचे केस कापले. तिच्या अंगावरचे कपडे त्याने अगोदरच काढुन घेतले होते. केस भादरलेली निर्वस्त्र रजिता आता एखाद्या सोललेल्या कोंबडीसारखी दिसत होती.
आपल्या हातावरचे केस साफ़ करीत राहुलने अभिजीतला म्हणाला "अभिजीत आपण काल रजिताला जिथून उचलल ती जागा तुला आठवते?"
अभिजीतने होकारार्थी मान हलवताच राहुल त्याला म्हणाला.
"गुड, त्या जागेपासुन इथवर रजिताच किंवा आपलं काही सामान तर पडल नाही ना...... ह्याची खात्री करुन ये ...जा पळ लगेच"
अभिजीत तिथून निघताच राहुल तसदिककडे वळुन म्हणाला "तू आणि पुष्कर इथेच थांबा मी आजुबाजुला हिची कुठे विल्हेवाट लावता येते का बघतो. तोवर इथले आपले सगळे पुरावे मिटवा. अगदी हिचेदेखील" उदाहरणादाखल राहुलने स्वत:चं सिगारेटचं थोटुक पुष्कर आणि तसदिकला दाखवलं. ह्या उदाहरणाने तसदीक आणि पुष्करला त्यांच काम समझलं होतं. राहुलने समजावल्याप्रमाणे सगळेजण आपापल्या कामाला लागले.
थोड्याच वेळात राहुल परत आला. तोवर अभिजीतही तिथे पोहचला होता. राहुलने त्याला खुणेनेच काही प्रॉब्लेम असं विचारलं. अभिजितने नकारार्थी मान हलवली. इथे पुष्कर अणि तसदिकनेही आपली कामगीरी चोख बजावली होती. तासाभरापुर्वी ह्या जागेवर इतका भयानक प्रसंग घडुन गेलाय असं अजिबात वाटत नव्हतं. सगळं मनासारखं झालय हे पाहून राहुल थोडा रिलेक्स झाला. तो सगळ्यांकडे पाहून म्हणाला.
"आपलं सगळ्यांच नशीब चांगलय. इथून जवळच एक ओसाड जागा आहे. आपण हिला तिथे नेउन गाडून टाकू."
"अरे पण आपल्याकडे तितका वेळ नाहिए. आणि तसही 10 वाजता आपला गृप ते हॉटेल चेक आउट करेल." अभिजीतने आपली रास्त शंका बोलून दाखवली.
"मला माहितीय. म्हणुनच तुम्ही एक काम करा. तसदीक आणि तु ताबडतोब हॉटेलवर निघा आणि आपण चौघेही जण हॉटेलमधेच आहोत असं भासवा. मी आणि पुष्कर हिला इथेच कुठेतरी लपवतो. हॉटेल चेक आउट करताना आपण काहीतरी कारण काढुन मागे राहु. मग हिची पध्दतशीरपणे विल्हेवाट लावू" राहुल सगळ्यांना म्हणाला.
"पर इसमे बहोत रिस्क है यार...." तसदीक चाचरत म्हणाला.
"लेकिन हमें वो उठानाही पडेगा" राहुल तसदीकच वाक्य अर्धवट तोडत म्हणाला. ह्यावर कुणी काहीच बोललं नाही कारण ह्याशिवाय कुणाकडे दूसरा काही पर्यायही नव्हता.
अभिजित आणि तसदीक हॉटेलच्या दिशेने निघाले. तसे राहुल आणि पुष्कर रजिताकडे वळले.
**************************************************************************
अभिजीत आणि तसदीक अगदी साळसुदपणे हॉटेलमधे शिरले. नशीब खरच आज त्यांच्यासोबत होतं. रिसेप्शनवरचा माणुस अजुनही सकाळच्या साखरझोपेत होता. हॉटेलमधेही अजुन सामसूम होती. बहुतेक कालच जागरणं अजुनही सुस्तावलेलं होतं. हे दोघेहीजण राहुलच्या सांगण्यानुसार तडक रूमवर न जाता पाहिले केंटिनमध्ये गेले. पाच दहा मिनिटं थांबुन त्यांनी तिथल्या पोराला उठवुन चहाची ऑर्डर दिली व पुष्कर आणि राहुलची वाट पाहू लागले. प्रत्येक क्षण त्यांना एक एक युगा एव्हढा वाटत होता. त्यांना तिथे बसून आता अर्धा तास झाला होता. ते सारखे हॉटेलच्या गेटवर पाहात होते. आता हळुहळु सगळ्यांना जाग येत होती. त्यांच्या गृपमधले दोघेजण असेच उठून हॉटेलच्या परिसरात फेऱ्या मारायला आले होते. त्यांनी तसदिक आणि अभिजीतला केंटीनमधे बसलेलं पाहुन अभिवादन केलं. त्यावर त्या दोघांनीही हसुन प्रत्युतर दिलं. राहुल आणि पुष्करबद्दल त्यांनी चौकशी केली असता ते दोघे अजुन रुममधे झोपले असल्याचं त्यांना सांगुन अभिजीतने तेव्हा वेळ मारुन नेली. ते लोक निघुन गेल्यावर तसदीक आणि अभिजीत काळजीत पडले. एव्हाना राहुल आणि पुष्कर यायला हवे होते. कारण अजुन उशीर झाला तर मग लोकांच्या नजरेत त्यांचा बनाव यायला वेळ लागला नसता. तेव्हढ्यात त्या दोघांनाही पुष्कर आणि राहुल हॉटेलच्या गेटमधुन आत येताना दिसले. राहुल आणि पुष्करला पाहून अभिजीत आणि तसदिकच्या जिवात जीव आला. पण तसदिकने समयसूचकता दाखवित राहुल आणि पुष्करला परिसरात फ़िरत असणाऱ्या त्या दोन सहकाऱ्याबद्दल कळवलं. तसे राहुल आणि पुष्कर सावध झाले. ते बाहेरच थांबले. नशिबाने लगेचच ते दोघेहीजण आपल्या खोलीत परत निघून गेले. पण आता एक नवीन प्रॉब्लेम झाला होता. मगासचा तो झोपलेला मेनेजर आता उठला होता. ते पाहून अभिजीत त्या रिसेप्शनजवळ गेला आणि त्या मेनेजर सोबत इकडचं तिकडचं बोलत त्याला गुंतवु लागला. इकडे पुष्कर आणि राहुल त्या मेनेजरची नजर चुकवून हॉटेलमधे घुसले. लगेचच तसदीक जिथे बसला होता त्या केंटिंन मधे येउन पोहचले. एव्हाना अभिजीतही त्यांच्याजवळ पोहचला. अभिजीतने इशारयानेच काय झालं असं विचारताच राहुलनेही नजरेनेच सगळं ऑल वेल असं सांगितलं. चौघेहीजण जणु काही घडलचं नाही अश्या अविर्भावात तिथे वावरत होते. अजुनतरी कुणालाही त्यांच्यावर संशय आला नव्हता.
**************************************************************************
आपली एका दिवसाची ट्रिपची सांगता करून ROAD STALLION ची टिम आता पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना व्हायच्या तयारीत होती. सगळे सेट होते. हॉटेल चेक आउट करून टीम लिडरने बाईकर्सना ग्रीन सिग्नल दिला. त्या इशारतीवर ROAD STALLION चे सगळे घोडे एकसाथ धडाडायला लागले. ह्यावेळेस टेल ची जबाबदारी अभिजितने स्वत:हुन मागुन घेतली. त्याचा पास्ट एक्सपिरिअंस लक्ष्यात घेता लिडरनेही मान्य केलं. ते थोडे दूर गेले असतील की मागाहून अभिजीतने टिम लिडरला गाठलं आणि राहुलची बाईक पंक्चर झाल्याची न्यूज त्याला दिली. वर तुम्ही पुढे व्हा, मी आणि पुष्कर राहुलसोबत थांबतो आणि मागाहून तुम्हाला जोईन होतो असंही सांगितलं. होय नाय करता करता अखेर टिम लिडरनेही सारखे कॉण्टेक मधे रहा असे सांगुन त्यांचा निरोप घेतला.
टिम निघून गेल्यावर त्या चौघांच्याही चेहरयावर समाधानाच हसू उमटलं. इथवर तरी राहुलचा प्लान परफ़ेक्ट वर्क करत होता.
आपल्या गाडया रोडच्या कडेला आडोश्याला लपवुन ,सोबत तिथे अभिजितला पाळतीवर ठेवून बाकीचे तिघे रजिताच्या बॉडीची विल्हेवाट लावायला निघून गेले. मगाशी जेथे त्यांनी पापाची परिसीमा गाठली होती, त्या गेस्ट हाउसला ओलाडुंन ते तिघेजण आता एका चिंचोळ्या रस्त्यावरून जात होते. जाताना त्यांनी त्या गेस्ट हाउसमधे लपवलेली रजिताची बेग सोबत घेतली होती. त्या वाटेवरुन जाताना बाहेरून वाटत नसलं तरी आतमध्ये बऱ्यापैकी दाट झाडी होती. उन्हं वर आली असली तरी त्या भागात अजुन हिरवी सावली दडुन राहिली होती. ते जसजसे आत जात होते तसतसे ते जंगल अजुन घनदाट होत होते. पुष्कर आणि राहुल सावधपणे पुढे चालत होते. पाठीमागुन तसदीक त्यांच्या मागोमाग चालत होता. ती वाट त्या डोंगराच्या उतारावरुन जात होती. तिच्या उजव्या बाजुला काही अंतरावर पसरलेली खुरटी झाडी होती. तसेच उताराच्या खालच्या बाजूने उभी असलेली मोठमोठाली झाडेही होती. तो उतार खरच खुप सरळसोट होता. चालताना फार त्रास होत होता. थोडा वेळ चालल्यावर एके ठिकाणी राहुल थांबला. त्याने एकवार पुष्करकड़े पाहिलं. पुष्करनेही आजुबाजुचा अंदाज घेत राहुलच्या शंकेला होकारार्थी उत्तर दिलं. तिथे गेल्यावर राहुल आणि पुष्कर सावधपणे बाहेरूनच समोरच्या झाडीवर नजर टाकीत होते. तसदीकला समोरचा प्रकार काय चालु आहे काहीच कळत नव्हता.
"अरे हे काय करताय?" तसदीकने न रहावुन त्या दोघांना विचारलं.
तसदिकच्या प्रश्नाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करुन ते दोघेही शांतपणे समोरची झाडी हाताने बाजुला करीत काहीतरी शोधत होते.
"अरे मला सांगाल का? आपण हां कुठला खेळ खेळतोय ते?" आपण मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं ते दोघे अजुनही काही उत्तर देत नाहीत. हे पाहून तसदीकने आता ज़रा त्यांना ज़रा ओरडुनच विचारलं.
तसा राहुलने तसदिकला शांत रहायचा इशारा करीत जवळ बोलावून सांगितले "अरे मगाशी रजिताला ह्या उतरणीवरून नेत असताना माझा तोल गेला आणि त्या गडबडीत ती ह्या खालच्या झाडीत पडली. आम्ही तेव्हाही तिला इथे शोधली पण नाही सापडली. आमच्याकडे तेव्हा वेळ नव्हता. म्हणुन आम्ही तसेच परत आलेलो."
राहुलच हे वाक्य ऐकताच तसदिकही लगेच तिची बॉडी त्या झाडीमधे शोधू लागला. त्याने बाजूच्याच झाडाची एक फांदी तोडून त्या फ़ांदीच्या सहाय्याने ती झाड़ी बाजुला करायला सुरुवात केली. ते तिघेही जण रजिताच्या बॉडिला त्या झाडीत शोधत होते. त्या उतारावर ही कसरत करताना त्याची फार पंचाईत होत होती. आता जवळपास वीस मिनिटं होत आली तरी अजुन रजिता सापडली नव्हती. वैतागुन तसदिकने हातातली काठी जोरात समोरच्या झाडीवर आपटली पण नेहमीप्रमाणे ती त्यावर न थांबता तशीच खाली गेली. त्यामुळे तसदीकचा तोल गेला आणि तो त्या झाड़ीवर पड़ला. पुष्कर जवळ होता म्हणुन ठीक, त्याने लगेचच तसदिकला सावरलं. तसदिकला त्या झाड़ीने चांगलच सोलवटलं होतं. पण अचानक ती काठी अशी खाली कशी गेली ह्याची तपासणी करता त्यांना शॉकच बसला. ते जिथे उभे होते तिथून अजुन चार पाच पावलांनंतर सरळसोट कडा सुरु होत होता. वरच्या ह्या खुरट्या झुडुपांमुळे खाली असलेल्या त्या कड्याचा काही अंदाज येत नव्हता. राहुल लगेच रजिता जिथून हातातून खाली पडली होती त्या जागेवर आला. तिथे ही त्याने सावधपणे समोरची झाडी बाजुला करून पहिलं, तर तिथेही थोड्याच अंतरावरुन कडा सुरु होत होता. त्यांनी त्या जागेच्या आसपास सगळीकडे पाहिलं. सगळीकडे सारखीच परिस्थिती होती. ह्याचाच अर्थ असा होता की मघाशी इथे हातातून गडगडत गेलेली रजिताची बॉडी ह्या झाडीतुन आरपार खाली दरीत पडली होती. तरीच गेल्या तासाभरापासुन एव्हढ शोधुनही रजिताची कुठलीच निशाणी त्यांना सापडत नव्हती. तरी त्यांना अजिबात रिस्क घ्यायची नव्हती. त्यांनी पुन्हा सगळीकडची झाड़ी बाजुला करून जेव्हढं शोधता येईल तेव्हढं शोधायचा प्रयत्न करत होते.
"चल राहुल, निघुया आपण. ती काय सापडणार नाही आपल्याला. मला वाटतय ती ह्या दरीतच पडलीय." पुष्कर हापत हापत राहुलला म्हणाला. राहुल काही बोलणार तेव्हढ्यात तसदिकनेही पुष्करची री ओढली.
"भाई बरोबर बोल रहा है राहुल. वैसे भी वोह वहा निचे है और हम लोगो ने उसके सारे सबुत भी मिटा दिए है. अभी यहाँ ज्यादा देर रुकना सही नहीं है"
तसदिकच्या म्हणण्यात तत्थ्य होतं. अखेर त्या तिघांनी तिथून निघायचा निर्णय घेतला.
**************************************************************************
परतीच्या प्रवासात आता सगळेच शांत होते. कुणीच कुणाशी बोलतं नव्हते. सलग तीन तास चालवूनही बाईक्स थांबायचं नाव घेत नव्हत्या. अखेर राहुलच्या बाईकने साईड लाईट दिली आणि बाकीच्या बाईक्सही त्याच्या मागोमाग रस्त्याच्या कडेला लागल्या. बाकिच्यांना तिकडेच उभं रहायला सांगुन राहुल आणि पुष्कर रजिताची सोबत आणलेली बेग घेउन बाजूच्याच झाडीत शिरले. तिकडे त्यांनी रजिताचा शेवटचा पुरावाही जाळुन टाकला. राहुलच्या प्लानचा अखेरचा टप्पा ही पार पडला होता.
"आपण हे बरोबर नाही केलं." राहुल बाईक चालू करीतच होता की अभिजीत त्याला म्हणाला. अभिजितच्या ह्या व्यक्तव्यावर सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले.
"आपण तिला निदान पुरायला तरी हवं होतं. तेव्हढ तरी अंत्यसंस्कार तिच्यावर झाले असते." अभिजीत हळहळत बोलला. झाल्या प्रकाराची आता त्याला फार भिती वाटत होती.
"तिच्यावर अंत्यसंस्कार करायला ती काय तुझी बायको होती का?" पुष्कर बेदरकारपणे बोलला. ह्यावर तसदीक नेहमीप्रमाणे फसफसला.
"मरू दे तिला, माझ्या माहितीप्रमाणे ती जिथे पडलीय तो कासलेपठार अभयारण्याचा भाग येतो, त्यामुळे ती आता अश्या ठिकाणी आहे जिथे कुणी पुढच्या हजार वर्षात पण येणार नाही. तेव्हढी कासलेपठारच्या जनावरांना आपल्याकडून मेजवानी." पुष्कर पुन्हा एकदा पचकला. अभिजीतला पुष्करचा राग आला होता तो त्याला काही बोलणार इतक्यात.....
"आता जे झालं ते विसरून जा...... त्यातच शहाणपणा आहे.
No regret
No Praising
राहुलच हे बोलणं सगळ्यानाच पटलं. राहुलने बाईकला कीक मारली. त्या आडवाटेवरली ओसाड शांतता चिरत त्या तिन्ही बाईक्स तिथून निघून गेल्या. त्या चौघासाठी रजिताच प्रकरण आता कायमच संपलेलं होतं
**************************************************************************
समोरच्या टेबलावरची शिवाज रिगल आता आपल्या शेवटच्या घटका मोजत होती. तरी अभिजितला म्हणावी तशी अजुन नशा चढत नव्हती. मंडणगडच्या त्या आठवणींमुळे तो पुन्हा बिथरला होता. त्याला स्वत:च स्वत:ची लाज वाटत होती. पण आता त्याच्या ह्या वाटण्याला काहीच अर्थ नव्हता. जे घडायचं होतं ते घडून गेलं होतं. त्याने पुन्हा एक घोट घश्याखाली ढकलला.
कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी अभिजितच्या डोक्यात नुसता तसदीकचा विषय घोळत होता आणि खासकरून त्याचा तो शेवटचा फोन.
तसदीक जे सांगत होता ते खरं असेल का?
नाही, हे कसं शक्य आहे. राहुल बोलतो त्याप्रमाणे त्याने पुष्करच्या मृत्यूचा धसका घेतला असणार.
ओहो बरोबर .....हे सगळे त्याच्या मनाचेच खेळ असणार. अभिजीत स्वत:लाच समजावत होता.
पण जर का त्यात काहीच तत्थ नसेल तर मग तसदीक फोनवर एव्हढा घाबरला का होता. त्याची भिती त्याच्या आवाजातुन स्पष्ट कळत होती. तसदिकला आजवर एव्हढ घाबरलेला कधीच पाहिला नाही. साला आपण इटलीलाच राहिलो असतो तर बरं झालं असतं, उगाच इथे परत आलो. विचार करून करून आता अभिजीतच डोकं दुखायला लागलं होतं
तेव्हढ्यात अचानक त्याच्या पाठीमागे काहीतरी पडल्याचा आवाज आला. अभिजीत अजुनही तसदिकच्याच विचारात होता. त्यामुळे त्याने त्या आवाजाकडे लक्षच दिलं नाही. थोड्या वेळाने पुन्हा एकदा तो आवाज आला.
त्या आवाजासरशी अभिजितची विचारांची श्रुंखला तुटली. तो जागेवरून उठला आणि हा नक्की कशाचा आवाज होता हे पाहण्यासाठी तो मागे वळला. पण मागे सगळ्या गोष्टी जागच्या जागीच होत्या, त्याला काहीच वेगळं वाटलं नाही. आपल्याला बहुतेक भास् झाला असेल अस समजुन अभिजीत पुन्हा निवांत बसला.
"राहुल बोलतो तेच खर. हल्ली आपलं पिणं फार वाढलयं" स्वत:शीच बोलत अभिजीतने समोरची ओल्डमंक आता पुर्ण घश्याखाली उतरवली.
तेव्हढ्यात परत त्याला त्याच्या पाठिमागे कुणाची तरी हालचाल जाणवली. अभिजीतने ह्यावेळेस पटकन मागे वळुन पाहिलं, तर तिथं कुणीच नव्हतं. अभिजित आश्चर्यचकीत झाला. आपल्याला पुन्हा भास् झाला की काय ह्या विचारात अभिजित असतानाच, डाव्या बाजुला असलेल्या हॉलच्या खिडकीत त्याच लक्ष गेलं. नीट निरखून पहाता त्याला पडद्याआड कुणाची तरी सावली दिसली. अभिजीत त्या खिडकीत नीट निरखून पाहु लागला. पण ती सावली आता तिथून गायब झाली होती. अभिजित चक्रावला. तो त्या खिडकीच्या अगदी जवळ जाउन निरखून पाहू लागला की अचानक त्या खिडकीत अगदी हाताच्या अंतरावर ती आकृती पुन्हा प्रकट झाली.
एका माणसाची आकृती......
त्या समोरच्या व्यक्तीला पहाताच अभिजीतची भीतीने बोबडीच वळली. त्याला घाबरून ओरडावस वाटतं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते.
तू .......तू.......
इथे..........
अशक्य आहे हे.......
अभिजीत घाबरून मागे मागे सरकु लागला. तो शक्य तितका त्या व्यक्तीपासुन लांब जाऊ इच्छित होता. तेव्हढ्यात पायात काही तरी आलं आणि तो मागच्या मागे तोल जाऊन पडला. दुर्दैवाने त्याचं डोकं हॉलमधल्या सेंटरटेबलाला धडकलं आणि घाव अगदी वर्मी लागला. अभिजितच्या डोक्यात एक तीव्र सणक उठली आणि पुढच्याच क्षणाला त्याच्या डोळ्यासमोरुन ती आकृती हळुहळु धूसर होत होती.
अभिजीत आता स्वत:च्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि समोरची खिड़की आता रिकामी होती.
प्रतिशोध-८
अभिजीतच्या मृत्युमुळे इंस्पेक्टर अभयची संकट अजुन वाढली होती. गेल्या महीन्याभरातला त्याच्या विभागाताला हां तीसरा मृत्यु होता. पुष्कर म्हात्रे पासून सुरु झालेले हे द्रुष्टचक्र अजुनही चालतच होतं. हे तीनही मृत व्यक्ती एकामेकांशी संलग्न असल्याने ह्या प्रकरणातला पेच अजुन वाढला होता. शहरात तर अफ़वांच पिकच आलं होतं. मिडियानेही आता ह्या गोष्टीची हळुहळु दखल घ्यायला सुरुवात केली होती. हे प्रकरण चिघळायच्या अगोदर काहीतरी करणं आवश्यक होतं. त्यात पुन्हा हेड ओफ़िसवरुन दबाव वाढत होता. भारिसभर म्हणुन अप्पांनीही हे प्रकरणाला राजकीय रंग दिला होता. एकुण काय तर आता ही केस इंन्स्पेक्टर अभय राणेंच्या इभ्रतीचा प्रश्न झालेला होती.
**************************************************************************
आज इंस्पेक्टर राण्यांनी राहुल घोसाळकरला पोलीस स्टेशनमधे चौकशी करीता बोलावलं होतं. दोन आठवड्यापुर्वी तसदिकच्या अक्सिडेंटनंतर पोलीस स्टेशनला आलेला राहुल आणि आज अभिजितच्या मृत्युनंतर पोलीस स्टेशनला आलेला राहुल यात जमीन आस्मानाचा फरक होता. अभिजीतच्या मृत्युमुळे राहुल आतून खचल्यासारखा वाटत होता. अभिजीतच्या मृत्युनंतर इंस्पेक्टरने आपल्याला चौकशीसाठी का बोलावलय हे जरी राहुलला माहीती नसलं तरी आपल्याला चौकशीसाठी बोलावणार ह्याबाबत राहुलला खात्री होती.
"तर घोसाळकरसाहेब, अभिजितच्या मृत्युबद्दल तुम्हाला काय वाटतय?" इंस्पेक्टर अभयंनी सरळ मुद्द्यालाच हात घातला.
"माझ मलाच काही कळत नाहिए की हे सगळं काय चाललय ते. पहिला पुष्कर, मग तसदीक आणि आता माझा अभिजीत... सगळे एका पाठोपाठ एक हे जग सोडुन निघुन गेले. कसली करणी मागे लागलीय काही कळत नाहिए. माझे सोन्यासारखे मित्र माझ्यापासून कुणीतरी हिरावून घेतले. फार एकटा पडलोय मी आता" राहुल हळहळत म्हणाला. बोलताना त्याचा आवाज फार कातर झाला होता. त्याच्या चेहरयावरून त्याच्या मनाची अवस्था स्पष्ट कळत होती. आता समोर बोलत असलेला राहुल हा राजकारणी राहुल नसुन, त्या तिघांचा जुना मित्र राहुल होता. त्याचा राग, त्याचा मनस्ताप सगळ सगळ खरं होतं.
"तुम्हाला मंडणगडबद्दल काही माहीती आहे?" त्याचा तो भावनावेग ओसरल्यावर इंस्पेक्टरांनी राहुलला विचारलं
मंडणगडाचं नाव ऐकताच राहुल चमकला. त्याच्यातल्या राजकारण्याला इंस्पेक्टरच्या ह्या प्रश्नाचा रोख कळला होता. अभिजीतसोबतच्या भेटितही त्याला तसदिकच्या तोंडातही शेवटच्या क्षणाला हेच नाव होतं हे कळलं होतं आणि आता इंस्पेक्टरही नेमक त्याला त्याचबद्दल विचारत होते. राहुलने इंस्पेक्टरच्या ह्या प्रश्नांच सावधपणे उत्तर दयायचे ठरवले.
राहुलला विचार करताना पाहुन इंस्पेक्टरांनी राहुलला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला.
"घोसाळकर साहेब सांगताय ना?"
"उम्म.... कुठलं मंडणगड? आपल्या कोल्हापुर जवळच का?" राहुल डोक्याला ताण देत आठवायच नाटक करीत म्हणाला.
"हो तेच...." इंस्पेक्टरांना राहुलचा बनाव लक्ष्यात आला होता.
"हो माहितीय मागे एकदा रोड ट्रिपच्या निमित्ताने तिथे गेलेलो. पण त्याच काय?" राहुलने मुद्दामून थोड अजाणतेपणे विचारलं. इंस्पेक्टरांच्या नजरेला राहुलची ही सगळी नाटकं कळतं होती.
"त्याच काय??? एक दीर्घ श्वास सोडीत इंस्पेक्टर म्हणाले.
"Good Question घोसाळकर साहेब. आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. खरतर ह्याच उत्तर ज्यांना माहिती असण्याची शक्यता होती, ते तर आता ह्या जगात नाहीत. पण त्यांचे घनिष्ठ मित्र म्हणुन तुम्हाला काही माहीती असेल म्हणुन आम्ही तुम्हाला विचारलं बाक़ी काही नाही" इंस्पेक्टर छद्मीपणे हसत राहुलला म्हणाले.
"मला काही माहिती नाही" राहुल कसनुसं हसत म्हणाला.
"बरं राहिलं .....मंडणगडबद्दल नाही तर रजिताबद्दल काही सांगु शकाल का?" इंस्पेक्टरने अचानक राहुलला विचारलं
"र जी ता....." राहुल इंस्पेक्टर अभयच्या ह्या प्रश्नाला अजिबात तयार नव्हता. तो एकदम शांत झाला.
राहुलला अस एकदम शांत झालेल पाहून आपला बाण अगदी अचूक लागलाय ह्यांची इंस्पेक्टरांना खात्री पटली.
"नाही ..........
मला तुम्ही जे काही विचारताय ह्याबद्दल काहीही माहीती नाही. ना त्या मंडणगड बद्दल आणि ना त्या रजिता पंडित बद्दल...
प्लीज मला आता जाऊ दया..
प्लीज............."
राहुल घायकुतीला येत म्हणाला.
"ओके......जर तुम्हाला जायच असेल तर तुम्ही येउ शकता मिस्टर राहुल घोसाळकर." इंस्पेक्टरांनी परवानगी देताच राहुल पटकन उभा राहिला आणि निघायच्या तयारीला लागला. राहुल वळलाच होता की
"तुम्ही सध्या फ़क्त ह्या पोलीस स्टेशन मधुनच बाहेर जाऊ शकता. आमच्या परवानगीशिवाय ह्या शहराच्या बाहेरही पाउल ठेवायचं नाही...." इंस्पेक्टर राहुलवर आपली करडी नजर रोखीत म्हणाले.
राहुलला घाईघाईत पोलीस स्टेशनच्या बाहेर जाताना पाहून हवालदार अहीरांनी इंस्पेक्टर अभयकडे नाराजीने पाहिलं. उत्तरादाखल इंस्पेक्टर हवालदार अहिरांकडे पाहून हसले.
"Have a patience mr.Ahir. मासा आतासा कुठे गळाला लागलाय. आताच दोर ओढला तर गळ तुटुन जाईल."
आपल्या खुर्चीत रेलून बसत इंस्पेक्टर विचार करत होते.
राहुल काहीतरी लपवतोय हे धुतल्या तांदळा इतकं स्वच्छ होतं. फ़क्त.....आता तो नेमकं काय लपवतोय हे एकदा शोधलं की आपलं काम संपलं.
अचानक वळुन इंस्पेक्टर हवालदार अहिरांना म्हणाले.
"अहीर चला गाडी काढा"
"ठीक आहे साहेब, पण कुठे जायचय??" अहिरांनी इंस्पेक्टरांना विचारलं
"मंडणगड"
**************************************************************************
रात्री मंडणगडच्या पोलीस स्टेशनबाहेर एक स्कॉर्पिओ येउन थांबली. त्यातून इंस्पेक्टर अभय आणि हवालदार अहीर लगबगीने खाली उतरले. रात्रीची वेळ असल्याने त्या पोलीस स्टेशनमधे फ़क्त दोन हवालदार होते. इंस्पेक्टर अभयनी आपलं कार्ड पुढे करत त्यांना आपली ओळख करून दिली. मुंबईहून कामानिमित्त पोलीस आलेले पाहून चौकीवरल्या हवालदाराने त्यांच्या इंस्पेक्टरला फोन लावला. जवळपास पंधराएक मिनिटातच इंस्पेक्टर धिरज पवार पोलिस स्टेशनला पोहचले.
इंस्पेक्टर राण्यांनी इंस्पेक्टर पवारांना आपले इथे येण्याचे प्रयोजन थोडक्यात सांगितलं.
"वर्षापुर्वी इथे एक रजिता नावाची मुलगी फिरायला आली होती तिच्याबद्दल काही माहीती आहे का?"इंस्पेक्टर राण्यांनी इंस्पेक्टर पवारांना विचारलं.
"नाही रजिता नावाच्या कुठल्याही मुलीबद्दल इथे काहीही नोंद नाही" पवार आठवुन म्हणाले.
तरी संशयला जागा नको म्हणुन त्यांनी आपल्या हवालदाराला जूने रेकोर्डस तपासायला सांगितले. रेकोर्ड तपासणे फारच वेळ खाउ काम होतं. हवालदार अहिरही त्या हवालदाराच्या मदतीला गेले. इंस्पेक्टर राणेंसाठी हा फार निर्णायक क्षण होता. इथे जर का त्यांचा अंदाज चुकला असता तर मग .........
सगळ कठिण होतं. ते फार अस्वस्थ होते.
"सॉरी साहेब. तुमच्या सांगण्यानुसार तशी कुठल्या मुलीची काही नोंद नाहिए" त्या हवालदाराने असं सांगताच इंस्पेक्टर राण्यांनी निराशेने मान खाली घातली.
"पण तुम्ही सांगितलेल्या तारखेच्या दोन दिवसानंतर एक मुलगी इथल्या जंगलात एका फ़ॉरेस्ट ऑफ़ीसरला सापडली होती अशी एक नोंद आहे साहेब" रेकोर्ड चेक करणाऱ्या त्या हवालदारने सांगितलं. हे ऐकताच इंस्पेक्टर राण्यांचे डोळे चमकले.
"गुड........ आता कुठेय ती मुलगी" इंस्पेक्टरांनी एक्साईट होत विचारलं.
"त्यांनी तिला त्यावेळेस इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अडमीट केले होती" हवालदार पुढे म्हणाला.
"मला सविस्तर सांगा. तेव्हा नेमकं काय झालं होतं ते?" इंस्पेक्टर अभयनी त्या हवालदाराला पुर्ण रिपोर्ट वाचायला सांगितला.
त्या रिपोर्टनुसार तो ऑफिसर त्याच्या रुटीन राउंडला होता. त्या वेळेस त्याच्यासोबत स्क़ॉडचा एक कुत्रा पण होता. नेहमीचा रुटीन राउंड पुर्ण करून तो परत जात असताना त्याच्या सोबतचा तो कुत्रा धावत जंगलात घुसला. तो ऑफिसर त्याच्यामागे गेला असता, त्याने पाहिलं की तो कुत्रा एका विशिष्ठ ठिकाणी पाहून भुंकत होता. त्या फ़ॉरेस्ट ओफ़िसरला हे सगळं थोड विचित्र वाटलं म्हणुन तो ज्या ठिकाणी पाहून कुत्रा भुंकत होता त्या ठिकाणी खाली पाहू लागला. सुरुवातीला त्याला काही सापडलं नाही. पण तो कुत्रा तिथून हटायचं नावच घेत नव्हता. तेव्हा त्याला थोडी शंका आली. त्याने त्याच्या टिममधल्या अजुन दोघाना बोलावून त्या ठिकाणी आसपास शोधायला सुरुवात केली. आजूबाजूची थोडी झाडं तोडून त्यांच्याकडच्या स्पेशल केमेर्यांनी खालच्या बाजूची पहाणी करू लागले. तर त्यांना खालच्या भागातल्या एका झाडाच्या बेचक्यात कुणीतरी अडकलॆल दिसल. त्या कड्याच्या वरच्या भागात असलेल्या दाट झाडाझुडुपांमुळे ती व्यक्ती वरुन दिसत नव्हती. डोंगराच्या दुसऱ्या भागाकडुन थोड खाली उतरल्यावर त्यांना एका मुलीची बॉडी नजरेस पडली. मग त्यांनी त्या मुलीला बाहेर काढलं. त्यानी त्या मुलीची प्राथमीक तपासणी केली असता त्यांना त्या मुलीत अजुनही धग असल्याचे जाणवली. मग त्यांनी तिला तातडीने इथल्या सरकारी हॉस्पिटलमधे अडमीट केलं."
"मग पुढे??????" इंस्पेक्टरांनी अपेक्षेने विचारलं
"पुढे काही माहीती नाही साहेब" हवालदाराने हातातलं मस्टर बंद करीत सांगितलं
"चला" इंस्पेक्टर लगबगीने तिथून निघत म्हणाले.
"कुठे?" पवारांनी विचारलं
"हॉस्पिटलला"
"आता रात्र झालीय साहेब" इंस्पेक्टर पवार आळस देत म्हणाले
उत्तरादाखल इंस्पेक्टर अभयनी एक जळजळित कटाक्ष इंस्पेक्टर पवारांकडे टाकला.
**************************************************************************
आज पावसाची चिन्ह दिसतं होती. आभाळ गच्च भरुन आलं होतं. थोड्या थोड्या वेळाने गडगडाटासह विजा चमकत होता. आज संध्याकाळपासुनच राहुल फार अस्वस्थ होता. अभिजितच्या मृत्यूचा त्याला फारच धक्का बसला होता. राहून राहून त्याला त्याची आणि अभिजीतची शेवटची भेट आठवत होती.
त्याने दुखा:वेगाने सोफ्याच्या हेडरेस्टवर आपली मान टेकवली आणि डोळे मिटुन घेतले. तेव्हढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवले. क्षणभर त्याला बरं वाटलं, पण लगेचच त्याला आठवलं की, तो तर घरात एकटा होता मग हे हात. त्याने चमकून डोळे उघडले तर नजरेसमोर कुणीच नव्हत. तो पटकन उठून बसला.
हे कस शक्य आहे. मी स्वत: तो स्पर्श अनुभवलाय. त्याने आजुबाजुला पाहिलं. अगदी मनात शंका नको म्हणुन सोफ्याच्या मागे जाउनही पाहिलं पण कुणीच नव्हतं.
खरच आपल्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवले होते की आपल्याला भास झाला होता. राहुल ह्या विचारातच होता की, पाठिमागुन कुणाच्यातरी खुदकन हसण्याचा आवाज आला. राहुल त्या आवाजाने गरकन मागे वळला. पण ह्यावेळेसही मागे कुणीच नव्हतं. राहुल आता गोंधळला होता. तेव्हाच अचानक खोलीतले सगळे दिवे गेले. राहुलच्या डोळ्यासमोर एकदम निळा काळोख दाटला. बाहेर विजा चमकत होत्या त्याच्याच प्रकाशाने थोडावेळ खोलीत काय तो उजेड होत होता तेव्हढाच, बाकी सगळा तो निळा अंधार. हे आज असं सगळं विचित्र का घडतय राहुलला काहीच समजत नव्हत.
अचानक पुन्हा आपल्या पाठीमागे राहुलला कुणाचीतरी हालचाल जाणवली. कुणीतरी आपल्या पाठीमागे आपल्या फ़ार जवळ उभ आहे अस त्याला वाटत होत. राहुल पुन्हा मागे वळला तर त्याच्या मागे आरश्याव्यतिरिक्त कुणीच नव्हत. त्या आरश्यात स्वत:चेच प्रतिबिंब पाहून राहून केव्हढ्याने तरी दचकला. खरतर आता राहुल खुप घाबरला होता, तरी हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत असं स्वत:च स्वत:ला समजावून तो स्वत:ला धीर देत होता.
अचानक ढग पुन्हा गडगडले, बाहेर वीज चमकली. त्या प्रकाशात त्याला आरश्यात त्याच्या पाठीमागे टेरेस फ़्लेटच्या दारात एका मुलीची आकृती दिसली. त्याने पटकन मागे वळुन पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं. राहुल नखशिखांत शहारला. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. खरंच तिथे कुणी उभं होतं का? राहुलने पुन्हा एकदा तिकडे बघितलं तर तिकडे वार्यावर फ़डफ़डणार्या पडदयाखेरीज दुसरी कसलीच हालचाल नव्हती. काही क्षण गेले असतील की टेरेसवरुन येणारया एका आवाजाने राहुलच लक्ष वेधलं. तो आवाज ऐकून राहुल सरपटलाच.
"This is impossible" राहुल स्वत:शीच म्हणाला.
राहुल आता प्रचंड घाबरला होता तरीही तो त्या आवाजाची शहानिशा करण्यासाठी हळुहळु त्या टेरेसच्या दिशेने निघाला. तो जसजसा टेरेसच्या दिशेने सरकत होता तस तसा तो आवाज अगदी स्पष्ट येत होता. धीर करून राहुलने दारावरचा पडदा बाजुला करून टेरेसच्या दारात आला आणि समोरच दृष्य पाहून तो जागीच थिजला.
समोर टेरेसच्या रेलिंगवर एक मुलगी मान खाली घालून बसली होती. तिच्या हातात राहुलचं गिटार होतं. मन लावून ती ते गिटार वाजवत होती.
मान खाली घालून बसल्या असल्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. अठराव्या मजल्यावर सुटलेल्या वार्यामुळे तिचे केस मागुन पुढे आले होते. त्या निळ्या अंधाराच्या बेकग्रांउडवर ती काळी आकृती विचित्र वाटत होती.
ती वाजवत असलेल्या गाण्याचे सुर ऐकताच राहुलच्या अंगावर काटा उभा राहिला.
"पानी दा रंग वेख के.........."
अविश्वासाने राहुल समोरच्या दृष्याकडे पहात होता.
समोर उभ्या असलेल्या त्या काळ्या सावलीला राहुलची चाहुल लागताच, ती काळी आकृती लगेचच गिटार वाजवायची थांबली. तीने मान वर करून राहुलकडे पाहिलं. चेहरयावरील अस्त्यावस्त केसांमुळे तिचा चेहरा अजुनही दिसत नव्हता.
दोन क्षणाच्या शांततेनंतर तीने पुन्हा राहुलकडे पहात गिटार वाजवायला सुरुवात केली.
"मेरे रंगमे रंगने वाली.........."
मात्र ह्यावेळेस गिटार वाजवताना ती सोबत गुणगुणायलाही लागली.
रात्रीच्या त्या शांततेत तिचा तो आवाज अंगावर शहारे आणत होता.
अचानक पुन्हा गडगडाटासह वीज चमकली अन त्या आकृतीच्या चेहरयावर प्रकाश पडला. तिचा तो चेहरा पहाताच राहुल फ़क्त आता पडायचाच बाकी होता.
"रजिता........." राहुल पुटपुटला.
त्यासरशी रजिता राहुलकडे पाहून दात विचकावुन हसली. तिच्या डोळ्यात आसुरी चमक आली होती.ती उठून उभी राहीली आणि हातातले गिटार राहुलला पाहून अजुन जोरजोरात वाजवू लागली. अचानक तिने गिटार वाजवायचे बंद केले आणि राहुलच्या जवळ येउ लागली.
खरतर तिला असं आपल्या जवळ येताना पाहून राहुल खुप घाबरला होता. तो मनात असुनही तिथून पळुन जाऊ शकला नाही कारण त्याचे पाय जणु भितीने जमिनीलाच चिकटले होते. रजिता आता राहुलच्या अगदी जवळ आली होती. तिचे वाऱ्यावर उडणारे केस राहुलच्या चेहरयावर येत होते. रजिता आता एकटक राहुलच्या डोळ्यात पहात होती. तीने आपल्या उ्जव्या हाताने राहुलचा गळा पकडला. राहुलचा श्वास जवळपास बंद झाला होता. पण अचानक रजिताने आपल्या हाताची पकड सैल केली आणि हसत हसत आपल्या त्याच हाता्ची बोट राहुलच्या छातीवर फ़िरवु लागली. हसताना तिच्या चेहर्यावरचे ते विक्षिप्त भाव् पाहून राहुलची हालत खराब झाली होती. त्याला आता तिथून पळुन जावसं वाटत होतं. तो तिच्यापासून दूर होतच होता की रजिताने त्याला पुन्हा आपल्या जवळ ओढलं. ती त्याला आपल्या कवेत घेउन नाचायला लागली. अगदी तशीच, जशी त्या रात्री मंडणगडला हॊटेल रिजन्सीमधे त्याच्यासोबत नाचत होती. तिचा तो थंडगार स्पर्श त्याला नकोसा वाटत होता. समोर जे घडतय ते खर आहे ह्यावर राहुलचा अजुनही विश्वास बसत नव्हता.
"प्लीज मला माफ़ कर रजिता..माझ्याकडून चुक झाली. मी फार वाईट वागलो तुझ्याशी. पण मला सोड रजिता......मला माफ़ कर प्लीज. हवं तर मी तुझ्या पाया पडतो"
राहुल तिला स्वत:ला सोडण्यासाठी वारंवार विनवणी करत होता. पण रजिताचं त्याच्या ह्या रडगाण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती अजुनही ते गाणं म्हणत राहुलला सोबत घेउन नाचत होती. मधेच काहितरी आठवुन जोरजोरात हसत होती. राहुलला तर आता फ़क्त वेड लागायच बाकी होतं.
राहुल जेव्हढा तिच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होता. रजिता तितकीच त्याला अजुन आपल्या शरीराजवळ ओढत होती. ती एकटक राहुलकडे पहात होती. तिच्या डोळ्यातला तिचा त्याच्याबद्दलचा द्वेष स्पष्ट दिसत होता. तिचे डोळे त्याच्यावरच रोखलेले होते. जणु काही ते त्याला जाबच विचारत होते की,
का?
का? अस वागालात माझ्याशी?
काय वाईट केल होतं मी तुमचं?
राहुलला हे सगळं असहय्य होत होतं.
तिची मिठी
तिचा स्पर्श
तिची खुनशी नजर
अखेर अंगातला सगळा जोर लावून त्याने तिला स्वत:पासून दूर ढकललं. तो दूर झाला तसा रजिता जोरात गुरगुरली. तिचा तो अवतार पाहून तो तिच्यापासून अजुन दूर जायचा प्रयत्न करू लागला. तो एक एक पाउल मागे जात होता. तशी रजिताही त्याच्या एक एक पाउल जवळ सरकत होती. पाठी जाता जाता एका क्षणाला राहुल मागे कशाला तरी टेकला. त्याने चाचपुन बघितलं तर ते टेरेसच रेलिंगला होतं. आपल्या सुटकेचे सगळे मार्ग बंद झाल्याचे जाणवताच राहुल आता धाय मोकलुन रडायला लागला. रजिता आता त्याच्या पासून हाताच्या अंतरावर उभी होती. एकटक त्याच्याकडे बघत. रडता रडता राहुल तिची हात जोडून माफी मागु लागला. उत्तरादाखल ती फ़क्त हसली.
आणि
पुढच्याच क्षणाला अठराव्या माळ्यावरच्या टेरेसफ़्लेटवरुन राहुलच शरीर धाडकन खालच्या कॉंक्रिट पेव्हमेंटवर येउन आधळलं.
खाली राहुलचा मृतदेह शेवटचा आचका देत असताना, वर टेरेसच्या रेलिंगवर बाहेरच्या बाजुला बसलेल्या रजिताने, आकाशाकडे पाहून एक जोरदार आरोळी ठोकली.
अन त्याच क्षणाला इतका वेळ साचलेलं ते आभाळं मोकळं होउ लागलं आणि पाउस पडायला सुरुवात झाली.
**************************************************************************
पोलिसांची जीप हॉस्पिटलच्या मेनगेटवर येउन थांबली. इंस्पेक्टर अभय हवालदार अहीर सोबत मंडणगड पोलीस स्टेशनचे इंस्पेक्टर पवार असे चार पाच जण खाडखाड आपले शुज वाजवत त्या हॉस्पिटलमधे घुसले. गेटवरच्या सिक्युरिटीने त्यातल्या इंस्पेक्टर पवारांना पाहून एक कडक सल्युट ठोकला. तो सल्युट नजरेनेच स्वीकारत इंस्पेक्टर अभय तडक आत शिरले.
समोरच एक नर्स टेबलावर झोपलेली होती. इंस्पेक्टर अभयनी हवालदार अहिरांना खुण केली. हवालदार अहीरांनी हातातल्या काठीने त्या टेबलावर ठोठावलं.
"आम्हाला एका पेशंटला भेटायचय" हवालदार अहिरांनी तिला सांगितलं
"ही काय भेटायची वेळ आहे का?...टाईम संपलाय उद्या या" ती नर्स झोपेतच बरळली.
"इथले ऑन डयूटी डॉक्टर कुठे आहेत?"इंस्पेक्टर अभयनी तिला विचारलं.
"का माझी कंप्लेट करायचीय, का?" ती नर्स अजुनही झोपेतच होती.
आता मात्र इंस्पेक्टर अभयचा पारा चढला.
"नाही, माझ्या लग्नाचं इन्व्हिटेशन दयायचय त्यांना...उठा...."
हॉस्पिटलच्या त्या शांत वातावरणात इंस्पेक्टर अभयचा आवाज जोरात घुमला. तशी ती नर्स दचकून उठली.
"मा... मा... माफ़ करा साहेब.........बोला काय काम होतं?" समोर पोलीसांना पाहताच तिची पाचावर धारण बसली
"मला रजिताला भेटायचय"
"कोण रजिता?" नर्सने गोधंळुन विचारलं.
नर्सला गोधंळलेल पाहून इंस्पेक्टर अभयनां आपली चुक उमगली.
"गेल्या वर्षी तुमच्या इथे एक मुलगी अड्मीट झाली होती. इथल्या फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटनी तिला इथे अड्मीट केली होती. तिलाच भेटायचे आहे मला. आम्हाला तिचे सगळे डिटेल्स हवे आहेत?"
"कोण पाहिजे आहे आपल्याला?" पेसेजच्या डावीकडुन एक आवाज आला.
इंस्पेक्टरांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक वयस्कर इसम त्यांच्याजवळ येत होता. त्यांच्या चेहरया वरूनच तो इथला कुणीतरी महत्त्वाचा व्यक्ती असणार हे जाणवत होतं.
"Hello, i am डॉ. आनंद..आनंद पारकर. मी इथला इनचार्ज आहे. बोला काय काम होतं?" त्यांनी इंस्पेक्टरच्या जवळ येत आपली ओळख करून दिली.
"Hi, i am इंस्पेक्टर अभय राणे, मुंबई पोलिस. आम्हाला एका केसच्या संदर्भात तुमच्या एका पेशंटची माहीती हवी होती."
"कुठला पेशंट??"
"सर ह्यांना अनामिकाला भेटायचयं" नर्सने डॉक्टर आनंदला सांगितलं.
"अनामिका??" नर्सच्या ह्या उत्तरावर इंस्पेक्टरांनी तिच्याकडे चमत्कारी नजरेने पाहिलं.
"होय...अक्च्युली आम्हाला तिचं खरं नाव माहीती नाही साहेब म्हणुन थोडा गोंधळ झाला. आम्ही तिला अनामिका म्हणतो......" इंस्पेक्टर अभयचा उडालेला गोंधळ पाहून त्या नर्सने खुलासा केला.
"ओके, मला भेटायचय त्या मुलीला?" इंस्पेक्टर त्या डॉक्टरांना म्हणाले.
**************************************************************************
हॉस्पिटलचा तो रोगट पिवळ्या दिव्याच्या लांबलचक कॉरीडॉर पार करून सगळेजण हॉस्पिटलच्या एका टोकाला असलेल्या एका खोलीच्या समोर येउन थांबले. नर्सने त्या खोलीचा दरवाजा उघडला. तो उघडत असताना इतक्या जोराचा करकरला की, इतक्या रात्री इथे कशाला कोण कडमडतय ह्याचा जणु तो निषेधच नोंदवत होता. दरवाजा उघडल्यावर बाहेरच्या पेसेजमधला प्रकाश आतल्या अंधारावर बळजबरी करीत त्या खोलीत घुसला.
इंस्पेक्टर आत आले. त्यांनी आपली नजर एकवार त्या संपुर्ण खोलीवरुन फिरवली. हॉस्पिटलची ही खोली नॉर्मल वॉर्ड सारखी वाटत नव्हती. तिच्या सदयस्थितीकडे पाहून पूर्वी ही खोली जुनं सामान ठेवण्यासाठी वापरात असावी असं वाटत होतं. रजिताला इथे ठेवण्यासाठी इथली अडगळ तात्पुरती बाजुला केली असावी. सरकारी इस्पितळातला हा नजारा पहाताच इंस्पेक्टरांना सरकारी सुविधांवर अवलंबून असलेल्या सामान्य जनतेची प्रचंड कीव आली. त्या खोलीच्या एका कोपरयात एक बेड ठेवला होता. त्यावर एक मुलगी निश्चिल पडली होती. इंस्पेक्टरांनी प्रश्नार्थक नजरेने बाजुला उभ्या असलेल्या डॉक्टरांकडे पाहिलं.
"तुम्हाला हवा असलेला पेशंट" डॉक्टरांनी शांतपणे सांगितले.
समोर त्या जुन्या खॉटवर एका चादरीखाली दडलेल्या त्या मांसाच्या गोळ्याला पहाताना इंस्पेक्टर अभयला कसतरीच होत होतं. बाजुच्या मशीनच्या होत असलेल्या आवाजावर, तिच्या छातीवर मंदपणे वरखाली होणारया चादरीवरून ही व्यक्ति अजुनही ह्या जगात अस्तित्वात आहे असं म्हणायला हरकत नव्हती. त्या ऑक्सीजन मास्क खाली तिची श्वास घ्यायची धडपड पहाताना तिच्याकडे पहावतही नव्हतं. समोर बेडवर पडलेला तो हाडाचा पिंजरा रजिता नसावी ही भीती मनात बाळगुन एक शेवटची खात्री करून घेण्यासाठी इंस्पेक्टर अभयनी तिचा उजवा हात पाहिला आणि उद्वेगाने मान खाली टाकली. दुर्दैवाने त्यांची शंका खरी ठरली होती.
त्या मुलीच्या हातावर ॐ लिहिलेल होतं.
रजिताची ही अवस्था पाहून इंस्पेक्टर अभयला कससंच झालं.
"ही कधीपासून आहे इथे....?"
"साधारण गेल्या वर्षभरापासून....." डॉक्टर म्हणाले.
"काय झालयं हिला?" इंस्पेक्टरांनी डॉक्टरांना विचारलं.
"तिच्यावर रेप झालाय. तो ही अत्यंत त्रासदायक. ज्याने कुणी हे केलय त्याने तिला ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास होईल ह्याची पुरेपुर काळजी घेतली आहे. आणि त्याचमुळे राईट नाऊ शी इज इन कोमा" डॉक्टर शांतपणे उत्तरले.
"डॉक्टर हिच्या ठीक होण्याचे किती चान्सेस आहेत" इंस्पेक्टर अभयनी डॉक्टरांना विचारलं.
"खर सांगायच तर 99% नाही. तुम्हाला मुंबईच्या अरुणा शानबागची केस माहीतीय. हिची पण सेम केस आहे. तिच्या गळ्याची नस दबली गेल्याने ती कोमात गेलीय. फक्त तिच हृदय चालु आहे म्हणुन तिला जिवंत मानायच." डॉक्टरांच हे उत्तर ऐकताच इंस्पेक्टर शहारले. समोर रजिताची हि अवस्था त्यांना बघवत नव्हती. त्यांच्या डोळ्यासमोर सारखा पूर्वीच्या रजिताचा हसरा चेहरा येत होता. ते घाईगडबडीत बाहेर आले. त्यांच्या मागोमाग मग इतरही सगळे बाहेर आले.
"पण ही खोली नॉर्मल पेशंटची वाटत नाही?" बाहेर आल्या आल्या इंस्पेक्टरनी डॉक्टरांना इतक्या वेळची त्यांची खदखद बोलून दाखवली.
"हो. तुमचा अंदाज बरोबर आहे पण काय करणार अश्या पेशंटना किती दिवस सांभाळणार. अखेर आमच्याही काही लिमिटेशन्स आहेत. तिच्या उपचाराची जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नसल्याने अखेर हॉस्पिटलला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला" डॉक्टर ओशाळत म्हणाले.
"म्हणून काय तिला असं अडगळीच्या खोलीत ठेवायचं?" इंस्पेक्टरांना अजुनही डॉक्टरांच रजिताबद्दलच स्पष्टीकरण पटलं नव्हतं.
"आता त्याला आम्ही तरी काय करणार? सुरुवातीला इथल्या काही लोकांनी हिच्यासाठी मदत केली, पण नंतर कुणी लक्ष दिलं नाही. त्यानंतर थोडे दिवसांनी जेव्हा तिची जबाबदारी कुणी येणार नाही ह्याची खात्री पटली तेव्हा मग हॉस्पिटलनेही आपला हात काढुन घेतला आणि हिची रवानगी इथे करण्यात आली. तेव्हापासून अशीच आहे. हिची हि अशी हालत बघता, इथला स्टाफ़ आपल्या पगारातुन हिच्या औषधाचा खर्च करतो. आता ह्या पलिकडे आम्ही अजुन काय करू शकतो तुम्हीच सांगा. खरतर हिची अवस्था फार बिकट आहे. बाकीच्या पेशंटच निदान ठीक असतं. होणारा त्रास निदान त्यांना सांगता तरी येतो. ह्या बिचारीला तर तेव्हढीही सोय नाही. देव पण अश्या लोकांना का जिवंत ठेवतो काय माहिती? कधीकधी अस वाटत की आपल्या देशात मर्सी किलींग हवं. निदान हिच्यासाठीतरी" डॉक्टरांच्या बोलण्यात प्रचंड हतबलता जाणवत होती.
"आपण हिला प्राईव्हेट हॉस्पिटलमधे हलवलं तर. तिथे तिच्यावर चांगले उपचार तरी होतील. अगदीच काही नाही तर निदान तिच्यावर देखरेख तरी राहील. इथे तर तशीही ती अडगळीत पडलीय. आज आपण इथे आलोत म्हणुन इथे कुणितरी आलय तरी, नाहीतर इतर दिवशी इथे डॉक्टरांच्या व्हिजिटनंतर कुणी फिरकत असेल ह्याची शंकाच वाटते" इंस्पेक्टर अभयच्या बोलण्याचा रोख नक्की कुणाकडे आहे हे इतरांनाच काय तर त्या नर्सलाही समजल होतं.
"सॉरी साहेब, मला मान्य आहे की माझ्याकडून आज चुक झालीय. पण मलाच नाही, तर इथे डयूटी वर असलेल्या सगळ्याच स्टाफ़ला गेल्या एक दोन महिन्यांपासुन इथे रजिताच्या रूममधे रात्रीचं यायला भीती वाटते." मगासची नर्स मान खाली घालत उत्तरली
"का?" इंस्पेक्टरांना नर्सच्या ह्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं.
"कसं सांगु?.......
आजकाल मध्येच तिच्या पल्स जातात. अगदी अर्ध्या अर्ध्या तासासाठी जातात. हार्टरेट झिरो होतो. शरीर थंडगार पडतं. अगदी मेल्यासारखी असते.
अगदी निर्जीव.................
मग एकाएकी अचानक सगळं पूर्ववत व्हायला होतं. तिचे पल्स नॉर्मल होतात. हार्टरेट नॉर्मल होतो. जणु काही कुणीतरी पळवुन नेलेल्या हिच्या जिवाला परत आणुन हिच्या शरीरात सोडलयं आणि ही परत ह्या जगात आलिय. अन सगळ्यात कहर म्हणजे सगळ पूर्ववत झाल्यावर हि विचित्र हसते. फार भिती वाटते तेव्हा"
नर्स हे सगळं इंस्पेक्टरांना सांगतच असतानाच आतून रजिताच्या विव्हळण्याचा आवाज आला.
त्यासरशी सगळे आत पळाले. आतला नजारा पाहताच इंस्पेक्टरांना नर्सच्या बोलण्यातला खरेपणा पटला. रजिताच्या एकुण परिस्थिती पहाता ती बहुतेक आता जाणार असच वाटतं होतं. तिचे पल्स कमी होत होते. हार्टरेट ऑलमोस्ट झिरोच झाले होते. डॉक्टरांनी व्हेंटिलेटर मागवला. पण थोड्याच वेळात सगळं शांत झालं. समोरच्या मॉनीटरवर रजिताची आतापर्यंतची विस्कटलेली लाईफ़लाईन सरळ रेषेत बदललेली होती. डॉक्टर रजिताला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पण रजिताकडुन काहीच रिस्पोंस मिळत नव्हता. समोरच्या मॉनीटरवर रजिताची लाईफ लाईन गेल्या पंधरा मिनिटापासून एका सरळ रेषेतच धावत होती. तरी डॉक्टर अजुन प्रयत्न करतच होते. इंस्पेक्टरसकट डॉक्टरांनीही आता रजिताची आशा सोडली होती. त्या खोलीत आता फ़क्त एक निर्जीव शांतता साचून राहिली होती.....रजिता सारखी
की अचानक
मॉनिटरवरची रजिताचा कार्डिओग्राम पुन्हा हलायला लागला. रजिता त्या ऑक्सीजन मास्कखाली जोरजोरात श्वास घेउ लागली. पाच दहा मिनिटात तिचे पल्स तिचा हार्टरेट पूर्ववत झाला. डॉक्टरांसकट सगळ्यांच्याच जिवात जीव आला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं. इंस्पेक्टर सुन्नपणे रजिताची हि जगण्यासाठीची चाललेली धडपड हताशपणे पहात होते. जेव्हा त्यांची नजर तिच्या चेहरयावर गेली तेव्हा त्यांना तिच्या निस्तेज चेहरयावर हास्याची एक लकेर दिसत होती.
रजिताची ही अवस्था पाहून इंस्पेक्टर अभय खरच फार हळहळले होते. तिच्या ह्या पुढच्या सगळ्या उपचाराची व्यवस्था लावून इंस्पेक्टर पुन्हा मुंबईसाठी निघाले.
**************************************************************************
रात्री 2.00 वाजले होते. इंस्पेक्टर स्वत:च्या घरी घडलेल्या सगळ्या गोष्टिचा विचार करत बसले होते. मंडणगडावरुन निघता निघताच इंस्पेक्टरांना राहुलच्या आत्महत्येची बातमी कळली होती. एक एक करून ते चारही मित्र ह्या एका महिन्याच्या आत ह्या जगातून नाहीसे झाले होते. पण जे गुढं पुष्करच्या आकस्मिक मृत्युच्या वेळेस निर्माण झालं होतं ते राहुलच्या आत्महत्येपर्यंत कायम होतं.
हा सगळा नक्की काय प्रकार आहे हे इंस्पेक्टर अभयला कळत नव्हतं, पण का कुणास ठावुक त्यांच्या मनात राहून राहून एक गोष्ट फ़िरत होती की बहुतेक ह्या सगळ्या गोष्टींचा रजिताशी काहीतरी सबंध होता. पण इंस्पेक्टरच्या ह्या वाटण्याला काहीच बेसीस नव्हता.
पण काय?
इंस्पेक्टरांच डोक विचार करून करून बधीर झालं होतं. त्यांनी हातातला व्हिस्कीचा ग्लास एका दमात संपवला. रिकामी झालेला ग्लास पुन्हा भरुन तोंडाला लावणार इतक्यात त्यांच समोर लक्ष गेलं आणि ते सरपटलेच.
समोरच्या खुर्चीवर रजिता बसलेली होती.
एकटक त्यांच्याकडे पहात.
तिचे ते निर्जीव डोळे त्यांच्यावर खिळलेले होते.
इंस्पेक्टर अभयनी अविश्वासाने स्वत:चे डोळे चोळले. पण आपण ह्या क्षणाला आपल्या समोर जे काही पहातोय ते सगळं खरं आहे हा त्यांचा संशय सरणारया प्रत्येक क्षणासोबत खात्रीमधे बदलत होता. समोर रजिता एकटक त्यांच्याकडे पहात बसली होती. अचानक तिने आपले हात पुढे केले आणि इंस्पेक्टरांनाही त्यांचे हात पुढे करण्यास विनवले. तिच्या नजरेतली ती आर्जवे पहाता इंस्पेक्टरांनीही आपला हात यंत्र्वतपणे पुढे केला. तिने तो आपल्या हातात घेतला. तिच्या हातांच्या त्या बर्फासारख्या थंडगार स्पर्शाने इंस्पेक्टर भानावर आले. ते आपला हात तिच्या हातातून सोडवून घ्यायचा प्रयत्न करू लागले. पण समोर बसलेल्या रजिताच्या कृश हातांची पकड फारच घट्ट होती. एकाच वेळी बऱ्याच इंगळ्या हाताला डसाव्यात आणि तो हात बधीर व्हावा अशीच काहिशी अवस्था इंस्पेक्टर अभयची झाली होती. आता त्यांना समोरची रजिता हळुहळु धूसर दिसू लागली. त्यांच सगळं शरीर पिसासारख हलकं होउ लागलं. आपले हात कुणीतरी घट्ट पकडून ठेवले आहेत फ़क्त ही एकच जाणिव त्यांच्यात शिल्लक उरली होती. अचानक त्यांना त्यांच्या डोळ्यांसमोरच्या त्या पांढरा धूसर पडद्यावर हालचाल जाणवू लागली. इंस्पेक्टर लक्ष देऊन पाहू लागले.
त्यांना त्या पडद्यावर आता पूर्वीची जुनी रजिता दिसत होती.
तिचं ते मंडणगडला येणं.
तिची राहुलशी झालेली ओळख
हॉटेलमधला रात्रीचा प्रसंग
राहुलशी झालेली बाचाबाची
दुसरया दिवशी तिच्यावर त्या चौघांनी केलेला अत्याचार.
त्यानंतर तिची केलेली विटंबना......
आजवर तिची झालेली अवहेलना..
आणि
अखेरीस तिने एक एक करुन ह्या सगळ्याचा तिच्यापरीने घेतलेला तिचा "प्रतिशोध".
हे सारं काही इंस्पेक्टरांना स्पष्ट दिसत होतं. सगळे प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर एका चित्रपटासारखे उलघडत होते.
अचानक पुन्हा त्यांच्या हाताला इंगळ्या डसल्याच्या जाणिवा झाल्या आणि इंस्पेक्टर भानावर आले. समोर राजिता अजुनही त्यांचे हात हातात घेउन बसली होती. तिच्या नजरेतली तिची असाहय्यता पाहून इंस्पेक्टरांना गदगदून आले. तिने आजवर भोगलेल्या यातनांची तुलना जगातल्या कुठल्याच दू:खाशी होउ शकत नाही ह्याची त्यांना जाणिव झाली. त्यांना रहावलं नाही. तिच्यावर गुदरलेला प्रसंग आठवुन इंस्पेक्टरांचे डोळे त्यांच्याही नकळत भरुन आले. त्यांनी मान खाली घातली. अचानक त्यांना जाणवलं की त्यांच्या हातावरची पकड आता सैल होते आहे. त्यांनी लगेच समोर पाहिलं तर रजिता त्यांच्याकडे पाहून खिन्नपणे हसत होती आणि हळुहळु त्यांच्या नजरेसमोरून विरळ होउ लागली.
हा भास् होता की हे सगळं खर घडलयं, ह्या संभ्रमात इंस्पेक्टर असताना, त्यांनी खात्रीसाठी आपल्या हातांकडे पाहिलं तर त्यांचे हातावर लाल वळ होते. जणु बराच वेळ कुणीतरी त्यांचे हात घट्ट पकडले असल्यामुळे त्यांच्या हातावर ते वळ उठले होते. त्यामुळे मगासचा तो सगळा प्रकार आपल्याबाबतीत प्रत्यक्षात घडलाय ह्याची इंस्पेक्टरांना खात्री पटली होती. पण जर का हे सगळं खर असेल तर मग रजिताच्या बाबतीत घडलेल्या त्या साऱ्या गोष्टीही खऱ्या असल्या पाहिजेत. इंस्पेक्टर अभयला ह्या विचारानेच कसतरी झालं आणि रजिताची अवस्था पुन्हा त्यांच्या नजरेसमोर आली.
तिचे ते भकास डोळे.
तिचा तो निर्जीव चेहरा.
मध्येच ते तिचं कासावीस होणं.
तिची ती जगण्याची धडपड
पुन्हा मग कधीतरी सगळं सुरळीत होणं.
त्यानंतर तिच्या चेहरयावर उमटणारी
ती एक निर्जीव हास्याची लकेर....
ह्याला जर का जीवन म्हणत असतील....
तर मग त्या हलकटांना ह्याहीपेक्षाही अजुन बत्तर जिंदगी वाट्याला यायला हवी होती. कायद्यातली कठोरातली कठोर शिक्षा त्यांना व्हायला हवी होती.
पण खरच कायद्याने त्यांना शिक्षा केली असती का?
परिस्थितीजन्य पुराव्याच्या अभावी बहुतेक कायद्याच्या चौकटीतुन हरामखोर सुटलेही असते. आजवर रजितासारख्या कितीतरीजणी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरुध्द न्याय मिळवण्यासाठी कायद्याच्या वेशीवर स्वत:ची लक्तरं पुन्हा पुन्हा टांगुन घेतातच आहेत की. ह्या विचारासरशी इंस्पेक्टरांना आपणही त्या कायद्याच्याच एक भाग आहोत तरी आपण ह्याच्या विरोधात काही करू शकत नाही हे जाणवल्यामुळे त्यांना आता स्वत:चाच राग येत होता.
थोड शांत झाल्यावर ते स्वत:शीच विचार करू लागले, जे झालं ते योग्यच झालं. त्या चौघांचा अंत हा त्यांच्या लायकीप्रमाणेच झाला. रजिताने ह्या पुचाट कायद्यावर विसंबून रहाण्यापेक्षा तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तिचा न्याय, तिचा प्रतिशोध स्वत:च मिळवला होता. पण तरीही ते हरामखोर त्यामानाने फार स्वस्तात सुटले आणि बिचारी रजिता मात्र आजही मरणयातना भोगतेय.
पुन्हा रजिताच्या आठवणीने इंस्पेक्टरांना गलबलुन आलं. त्यांनी त्याच तिरमितीत हातातला व्हिस्कीचा ग्लास एका दमात रिकामी केला.
**************************************************************************
सकाळी उठल्या उठल्या इंस्पेक्टर अभयनी मंडणगडच्या हॉस्पिटलला फोन लावला. त्यांनी रजिताला तिथून इथे मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला होता. ह्यापुढची तिची सगळी जबाबदारी त्यांनी स्वत: घ्यायची ठरवली होती.
हॉस्पिटलमधे फ़ोनवरती रजिताची चौकशी करताच समोरून मिळालेल्या उत्तराने त्यांच्या हातातून रिसिव्हर खाली पडला. इंस्पेक्टरांना आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ते तिथेच बसून ओक्साबोक्सी रडायला लागले.
कारण...........
मंडणगड हॉस्पिटलच्या रेकोर्डनुसार आदल्या रात्री 2.00 वाजताच रजिता हे जग सोडून कायमची निघून गेली होती.
समाप्त
अमोल सुरुवात तर मस्तच
अमोल सुरुवात तर मस्तच आहे...
आज संध्याकाळी निवांत पैकी वाचून काढणार..
बाकी तुझ्या कथा म्हणजे वाचकाला मेजवानीच असते...
धन्यवाद मालक आपल्या
धन्यवाद मालक
आपल्या प्रतिसादाची वाट पाहिन.......
एका दमात वाचुन काढली कथा..
एका दमात वाचुन काढली कथा.. क्रमशः नाही लिहिलीस ते उत्तम...
हां हां हां सहीय
हां हां हां
सहीय
<< एका दमात वाचुन काढली कथा..
<< एका दमात वाचुन काढली कथा.. क्रमशः नाही लिहिलीस ते उत्तम... >> +१
कथा उत्तम जमली आहे.
खूप मस्त कथा ...शेवट पर्यंत
खूप मस्त कथा ...शेवट पर्यंत खिळवून ठेवणारी ..... keep it up
मला माहीतीय की कथेची लांबी
मला माहीतीय की कथेची लांबी ज़रा जास्त आहे.
पण अश्या कथा तुकड्या तुकड्यां मधे टाकणं लेखक म्हणुन मला योग्य नाही वाटत.
तसाही आता विक एण्ड सुरु होतोय.
निवांत वाचा
आवडली तर अभिप्राय दया..
नाही आवडली तरी सांगा....
मस्त कथा.
मस्त कथा.
जबरदस्त , थोडी प्रेडिक्टेबल
जबरदस्त , थोडी प्रेडिक्टेबल वाटली तरी खूप उत्तम रंगवलीये.
मस्तच अमोल..... एका दमात
मस्तच अमोल..... एका दमात वाचून काढली...
जबरदस्त कथा!
जबरदस्त कथा!
मस्त आहे आवडली
मस्त आहे
आवडली
मस्त !! कथा आवडली
मस्त !!
कथा आवडली
जबरदस्त , थोडी प्रेडिक्टेबल
जबरदस्त , थोडी प्रेडिक्टेबल वाटली तरी खूप उत्तम रंगवलीये. >>> + १००
अमोल परब, Hat's off to you
अमोल परब, Hat's off to you मित्रा, एका दमात वाचून काढली, अगदी डोळ्याची पापणी हि न लवता.
अप्रतिम…. खरच खूप दिवसांनतर अशी कथा मिळाली वाचायला….
Talaash movie chi athvan zali
Talaash movie chi athvan zali
प्रेडिक्टेबल होती पन मस्त
प्रेडिक्टेबल होती पन मस्त होती..एकसलग वाचली
लिहित राहा..
अरुणा शानबाग, ज्योती(निर्भया) सगळ्या एका दमात आठवून गेल्या..
काश अस सार्यांच्याच आरोपींसोबत होवो..
प्रेडिक्टेबल वाटली तरी खूप
प्रेडिक्टेबल वाटली तरी खूप उत्तम रंगवलीये>> +१ कदाचित शीर्षक बदललं कथेचं तर सस्पेन्स थोडा टिकेल.
आवडली.
तलाश चित्रपट - बरोबर, याचीच
तलाश चित्रपट - बरोबर, याचीच आठवण होतीये....
जबरदस्त , थोडी प्रेडिक्टेबल वाटली तरी खूप उत्तम रंगवलीये. >>> + १०० >>>+११११११
अमोल परब, Hat's off to you
अमोल परब, Hat's off to you मित्रा, एका दमात वाचून काढली, अगदी डोळ्याची पापणी हि न लवता.
अप्रतिम…. खरच खूप दिवसांनतर अशी कथा मिळाली वाच+१
जबरदस्त आहे.
जबरदस्त आहे.
जबरदस्त , थोडी प्रेडिक्टेबल
जबरदस्त , थोडी प्रेडिक्टेबल वाटली तरी खूप उत्तम रंगवलीये. >>> + १००
फक्त तो अभिजीत शिवाज रिगल पिताना मधेच ओल्ड मंक प्यायला लागलाय ते बदला.
Jabardast
Jabardast
आवडली.प्रेडिक्टेबल असली तरी
आवडली.प्रेडिक्टेबल असली तरी छान रंगवली आहे.
Danger ahe
Danger ahe
आवडली.प्रेडिक्टेबल असली तरी
आवडली.प्रेडिक्टेबल असली तरी छान रंगवली आहे.
>>>>>>> +१
मस्त जमलीय कथा!!
मस्त जमलीय कथा!!
जबरदस्त , थोडी प्रेडिक्टेबल
जबरदस्त , थोडी प्रेडिक्टेबल वाटली तरी खूप उत्तम रंगवलीये. >>> + १००
कथा कितिही प्रेडीक्टेबल असली
कथा कितिही प्रेडीक्टेबल असली तरीही शेवटपर्यंत वाचकाला खिळवुन ठेवणे हेच लेखकाचे खरे यश
पण अश्या कथा तुकड्या तुकड्यां
पण अश्या कथा तुकड्या तुकड्यां मधे टाकणं लेखक म्हणुन मला योग्य नाही वाटत. >>> शाब्बास खरच आहे उगाच तुम्हालाही कंटाळवाण होत मग असा खंड पडला की.. बरोबर ना?
Pages