काय चालले आहे काही समजत नाही

Submitted by बेफ़िकीर on 3 February, 2016 - 12:10

काय चालले आहे काही समजत नाही
आणि समजते जे, ते हल्ली चालत नाही

हरेकजण एकटाच असतो दुनियेमध्ये
ही अडचण कोणी कोणाला सांगत नाही

'तुझे खरे' म्हणण्याला सारे हपापलेले
कबूल करण्याची एकाची हिंमत नाही

उगाच काहीतरी नको ते मनात येते
नशीब! मी ते कोणाशीही बोलत नाही

कसे काय हे शंभरवेळा विचारते ती
एकदा खरे सांगणे मला शोभत नाही

मृत्यू अधीर आहे शरीर कुरवाळाया
अजून आयुष्याचे नटणे उरकत नाही

स्थलांतराचा दोष नसे पक्ष्यांचा केवळ
मीही पूर्वी होतो तेथे राहत नाही

येत्या क्षणावरी दुनियेची झेप न जाई
गेल्या क्षणावरी ही दुनिया फिरकत नाही

माझ्यामधला कुणीतरी हा जुनापुराणा
सभोवताली काय बदलले पाहत नाही

इथे कुणीही कोणालाही सलाम करते
इथे सलामीला काडीची किंमत नाही

'बेफिकीर' लोकांची संख्या वाढत आहे
भले म्हणू की बुरे म्हणू हे उमगत नाही

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृत्यू अधीर आहे शरीर कुरवाळाया
अजून आयुष्याचे नटणे उरकत नाही > व्वाह!

स्थलांतराचा दोष नसे पक्ष्यांचा केवळ
मीही पूर्वी होतो तेथे राहत नाही.....आवडली सर

_/\_