अष्टमीचा चंद्र

Submitted by संतोष वाटपाडे on 29 January, 2016 - 01:49

अष्टमीचा चंद्र अर्धा रात्र अर्धी ..जवळ ये ना
गंध तुझिया कस्तुरीचा सोसवेना.. सोसवेना..

हा धुक्याचा पदर ओला रेशमी सरकून गेला
केतकीला भार चंदेरी मण्यांचा तोलवेना..

लाजुनी बघतेस हसुनी दूर बसुनी रात्र असुनी
का तुझ्या डोळ्यात तृष्णा, ओढ स्पर्शांची दिसेना..

चंद्र खिडकीतून डोकावेल आधी ओढ पडदा
चांदणे निजले मला छळतो दुरावा जीवघेणा..

प्रहर ओलांडून गेला चंद्रही बहरात आला
सागरी उन्मत्त लाटांना किनारा सापडेना...

रान ओले पान ओले चिंब झाल्या पायवाटा
पाय उचलावा कसा मी धुंद आहे.. चालवेना...

अष्टमीचा चंद्र अर्धा रात्र अर्धी जवळ ये ना
गंध तुझिया कस्तुरीचा सोसवेना सोसवेना..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अष्टमीचा चंद्र अर्धा,रात्र अर्धी..जवळ ये ना
गंध दुरुनी कस्तुरीचा,सोसवेना..सोसवेना..>>>मस्त...मस्तंच!
अगदी Romantic वगैरे म्हणावी अशीच!
यंदाचा वॅलेंटाईन्स गाजवावी अशी!

too good Happy