काल जरा काम नव्हते म्हणुन झी सिनेमा चॅनल लावल आणि पहातो तर काय मनात घर करुन राहिलेला सिनेमा बनगरवाडी ( १९९५ ) नुकताच सुरु झालेला होता.
१९९५ साली मला या सिनेमात शाळामास्तरची प्रमुख भुमिका करणारा कलावंत नंतर दिग्दर्शक म्हणुन गाजलेला श्री चंद्रकांत कुलकर्णी आहे. त्याचा आवाज आज ऐकताना जाणवल की हा चंद्रकांत कुलकर्णी आहे.
एक चंद्रकांत मांढरे सोडले तर चंद्रकांत कुलकर्णी, किशोर कदम, उपेंद्र लिमये, सुषमा देशपांडे ( मी सावित्रीबाई फुले फेम ) नंदु माधव, नागेश भोसले हे कलाकार फारसे फेमस नव्हते. आजच्या इतका मिडीया सुध्दा पॉवरफुल नव्हता. अश्या कलाकारांना संधीचे सोने करणे इतकाच काय तो पर्याय उपलब्ध होता. या उत्तम कलाकारांना निवडुन अमोल पालेकरांनी या निमीत्तान एक संधी दिली अस म्हणता येईल. नंतर उत्तम एकांकीका दिग्दर्शनातुन चंद्रकांत कुलकर्णी गाजला. त्याला देशपांडे ( वर्हाड निघालय लंडनला ) शिवाय अमोल पालेकरांचा वरदहस्त लाभला असावा हे आज लक्षात येतय.
या सिनेमाची कथा आणि पटकथा व्यंकटेश माडगुळकरांची होती ( १९५५ ) तर दिग्दर्शन अमोल पालेकरांचे होते. हा सिनेमा एन एफ डी सी आणि दुरदर्शनने बनविलेला होता.
सिनेमाच्या कथेकडे जाऊया.
शाळामास्तर बनगरवाडी या गावी जातो आणि कारभारी - चंद्रकांत मांढरे यांच्या मदतीने शाळेत मुले येऊ लागतात. मास्तरला अनेक लोकांची कामे ही करावी लागत असतात. जसे कुणाचे अर्ज लिहुन दे तर कुणाचे - रामा ( किशोर कदम ) राणीच्या छापाचे ( इंग्लडची राणी ) रुपये मोडुन दे. इतकच काय त्याच्या स्वभावामुळे कारभार्याची लेक की नात त्याला तालुक्याच्या गावाला जाऊन तीची चोळी शिउन आणायला सांगते. हे ही मास्तर बिनबोभाट करत असतो या एकाच उद्देशाने की शाळेवर पालकांची मर्जी रहावी. यातुन मास्तरला कारभार्याचा रोष पत्करावा लागतो.
शाळेत एका मुलाची आई येते आणि मुलाला घरी चल म्ह्णु लागते. मास्तराने विचारताच त्याचा मामा आला आहे तो बोलावतो आहे असे म्हणुन ती त्याला बरोबर नेते. घरी गेल्यावर म्ह्शीला चरायला ने नाहीतर दुध कस मिळणार हे सामाजीक वास्तव पुढ येत.
आधीच खेड्यात शिक्षणाला महत्व नव्हत त्यातुन धनगर समाजात तर मुलगा जरा मोठा झाला त्याने एकट्याने लांडगा मारला म्हणुन शिक्षणात गती असलेल्या मुलाला सुध्दा हाती आला म्हनुन त्याचे वडील त्याला शाळेत पाठवत नाहीत अश्या अनेक शालेय संकटांचा सामना मास्तर करत असतो.
एकदा तर शेखु (उपेंद्र लिमये ) मला एकच बैल आहे दुसरा बैल मिळवुन द्या अशी गळ घालतो. शेवटी बैल न मिळाल्याने सुषमा देशपांडे स्वतःला बैलाच्या जागी जुंपुन नांगरणी पुर्ण करते. आपण अपराधी आहोत ही भावना मास्तरला त्या रात्री उपाशी रहाण्यास भाग पाडते.
आनंदा रामोशी ( नंदु माधव ) गावात किरकोळ चोर्या करुन जगणारा व आयबु ( सुनील रानडे ) काहीही काम न करणारा कायम मास्तरच्या सोबत असतात.
एक दिवस भुक लागलेल्या आनंदाला तालुक्याच्या गावाहुन मोडुन आणलेले काही रुपये लागतात. पैसे गायब झाल्याने मास्तर पुन्हा हवालदील होतो. गावी जातो तर वडील असली कामे का करतोस म्हणुन कावतात. अश्यावेळी माझ्या माहेरचे घर विक आणि पैसे भर असा सल्ला आई देते पण आनंदा रामोशी पैसे परत करतो आणि पेचप्रसंग टळतो.
गावच्या मुलांना व्यायामाची सवय लागावी म्हणुन मास्तर तालिंम बांधायचा प्रस्ताव गावकरी मंडळींच्या पुढे ठेवतो आणि राजे म्हणजे पंतप्रतिनीधींना उदघाटनला बोलवायचे आमिश दाखवतो. यथावकाश पंतप्रतिनिधी उदघाटनला येतात आणि त्या नंतरचा धनगरी नाच डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. यातले लाल रंगाचे पटके या नाचात उठुन दिसतात. कलेच्या अंगाने एखादा साधाच सीन कसा खुलवावा याचा हा वस्तुपाठ आहे.
गावातला युवक दुसर्या गावाच्या युवतीला पळवतो. त्यागावचे गावकरी बनगरवाडीवर हल्ला करतात तेव्हा कारभारी येण्यापुर्वीच मास्तर पुढे येऊन त्यांना थाबवतो. आनंदा रामोशी दोघांना हजर करण्याचे आश्वासन देतो. या दोघांचा पाठलाग यात केलेला कॅमेर्याचा वापर अमोल पालेकरांच्या किंवा कॅमेरामन यांच्याही कॅमेरा हाताळण्याचे कौशल्याची ( देबु देवधर ) दाद देऊन जातो.
गावावर दुष्काळ पडतो. उदघाटनाला येणारे पंतप्रतिनीधी मास्तराने लिहलेल्या गावाला मदत द्यावी ह्या पत्राची दखल घेत नाहीत. पाऊस का पडत नाही यासाठी प्रथेप्रमाणे भगत अंगात येऊन काही बाही सांगतो. ज्यात विवाहबाह्य सबंध असलेल्यांना गावाच्या बाहेर हाकला हा सल्ला मास्तरांना पटत नाही. कारण यामुळे पाऊस पडणार नाही किंवा दुष्काळाचा सामना करता येणार नाही हे त्याला चांगले समजत असते. पण त्याचे काही चालत नाही.
एक दिवस कारभारी निवर्ततात. ( हा सिनेमा बहुदा चंद्रकांत मांढरे यांचा अखेरचा सिनेमा होता - जाणकारांनी प्रतिक्रिया द्यावी ) दुष्काळामुळे गाव हळु हळु मोकळा होतो. जो तो जगण्यासाठी गाव सोडतो.
आनंदा साथ सोडतो. जाताना त्याने आणि आयबुनेच कारभार्याच्या मुलाला जायबंदी केला कारण तो मास्तरच्या कामात आडवा येतो अशी कबुली देऊन जातो.
आयबु सुध्दा पोट नेईल तिकडे जातो असे म्हणत गाव सोडतो.
गावात एक म्हातारा काकाबु ( हिरालाल जैन ) ज्याला जगण्यासाठी फारसे काही करावेसे वाटत नाही आणि मास्तर दोघेच उरतात.
--------------------------------------------------------------
धनगर समाजाच आजच वास्तव वेगळ नाही. मेंढर घेऊन फिरणारा शिक्षणापासुन वंचीत असलेला समाज आजही आपल्या प्रथात अडकुन पडलेला आहे. शालाबाह्य विद्यार्थी मोजले तर बीड, नगर किंवा अन्य जिल्ह्यात धनगर समाजाचेच जास्त विद्यार्थी सापडतील. या समाजाच नेमक वास्तव चित्रण करणार लेखन १९५५ साली व्यंकटेश माडगुळकरांनी केल आहे.
-----------------------------------------------------
या सिनेमाला एकुण तीन पुरस्कार लाभले आहेत.
१९९५ चा उत्कुष्ट मराठी सिनेमा
१९९७ फिल्म फेअर अवार्ड दिग्दर्शनासाठी
१९९७ काल निर्णय अवॉर्ड
हा सिनेमा यु ट्युबवर उपलब्ध आहे https://www.youtube.com/watch?v=AwTHmmLuM3k
------------
सिहांसन ची २५ वर्षे झाली त्या निमीत्तने त्या सिनेमाच्या मागच्या कहाणीचा उहापोह झाला स्वतः जब्बार पटेलांनी लिहलेला लेख सकाळ मधे छापुन आला. हा सिनेमा बनविताना त्यांना काय काय करावे लागले यावर त्यांनीच प्रकाश टाकला.
नुकतीच सामन्याची २५ वर्षे झाली त्या निमीत्ताने रामदास फुटाणे, श्रीराम लागु एका ठिकाणी आले आणि आठवणींना उजाळा मिळाला.
आता बनगरवाडी २५ वर्षे पुर्ण करेल. यातली कहाणी अगदी साधी होती. पात्रे पण साधीच. कथेत नाट्य म्हणावे असे फारसे नव्हते. तरी पण हा सिनेमा तीन पुरस्काराचा मानकरी झाला . बनगरवाडी माझ्या मनात घर करुन राहीला पण किती मराठी माणसांना तो भावला हे समजेल का ?