मेकिंग अ मर्डरर आणि क्रिमिनल जस्टीस सिस्टीम

Submitted by अमितव on 18 January, 2016 - 16:37

पोलीस, कोर्ट, डिस्ट्रीक्ट अ‍ॅटर्नी, जज, तुमचा वकील, ज्युरी, फॉरेन्सिक लॅब, शास्त्रीय पुरावा आणि ही सगळी यंत्रणा चालवणारे शासन. प्रत्येक यंत्रणेत जिवंत, हाडामासाची आपल्यासारखीच भावना आणि संवेदना असणारी माणसं, त्यांचे पूर्वग्रह, विचार करण्याची पद्धत, प्रत्येक घटनेला आणि केसला असलेले विविध कंगोरे, त्यातील सगळे कंगोरे उघड 'न' करण्याचे स्वातंत्र्य, सरकारने केलेले आणि पूर्व न्याय-निवाड्यातून झालेले (कॉमन लॉ) कायदे. त्यांचे लावलेले अर्थ. आणि या सगळ्या जडङव्याळ व्यापातून होणारा निवाडा, बा इज्जत बरी किंवा उम्रकैद. मग त्याच कोर्टात किंवा पुढच्या कोर्टात परत पुनर्विचारार्थ याचिका, ती कुठल्या मुद्द्यावर? पहिल्या ट्रायलमध्ये काय चुकलं ज्यावर आता परत न्यायालयाने अपील दाखल करून घ्यावे? आणि हे असंच अनादि अनंत काळ चालू...
हे वाचूनच कोर्टाची पायरी का चढू नये म्हणत असतील याची थोडी फार कल्पना येतेच. एका माणसाच्या आणि पर्यायाने कुटुंबाच्या जीवनात १९८५ पासून आजता गायत हे चक्र चालू आहे. त्याने पहिली १८ वर्षे तुरुंगात घालवली, लैंगिक छळाच्या अपराधाखाली जो त्याने केलाच नाही. हे १८ वर्षांनी सिद्ध झालं. आणि आता? सध्या तो काय करतो?
त्याचं नाव आहे स्टीवन एव्हरी, मुक्काम मॅनोटोवॉक कौंटी, विस्कॉन्सिन, अमेरिका. सध्या वास्तव्य... येईलच पुढे.

यापुढील लेखन 'मेकिंग अ मर्डरर' या नेटफ्लिक्सवर गाजत असलेल्या आणि गेली कित्येक वर्षे मॅनोटोवॉक कौंटी, विस्कॉन्सिन येथे अनेक कारणांनी गाजलेल्या 'स्टीवन एव्हरी विरुद्ध विस्कॉन्सिन स्टेट' या केसबद्दल आणि तदनुषंगाने क्रिमिनल जस्टीस सिस्टीम बद्दल निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आहे. ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. पहिला भाग युट्युबवर ही उपलब्ध आहे. गुगल शोध घेतलात तर पानंच्या-पानं मत-मतांतरं वाचायला मिळतील. काहीही सर्च न करता डॉक्युमेंटरी बघणं शक्य असलं तर जरूर बघा, ही डॉक्युमेंटरी आरोपीच्या बाजूने आहे, असेही प्रवाद आहेत, त्यामुळे क्रिटिकली, सारासार विचार करून अवश्य बघा.

Making A Murderer Title.jpg"Making A Murderer Title" by Source (WP:NFCC#4). Licensed under Fair use of copyrighted material in the context of Making a Murderer">Fair use via Wikipedia.

*******स्पॉयलर अ‍ॅलर्ट ******
तुम्ही ही डॉक्युमेंटरी बघत असाल किंवा बघणार असाल तर इथेच थांबा, मी पूर्ण रहस्यचा उलगडा केलेला नाहीये, पण अनवधानाने काही रहस्यांचा उलगडा होऊ शकतो.
********\स्पॉयलर अ‍ॅलर्ट ******

विस्कॉन्सिन राज्यातील मॅनोटोवॉक कौंटीस्थित भंगारात काढलेल्या गाड्यांच्या धंद्यात ( कार सॅल्व्हेज यार्ड) असलेलं एव्हरी कुटुंब. स्टीव्हन गेली १८ वर्षे तुरुंगात आहे. त्याच्यावर एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. जो अपराध तो पहिल्या पासून नाकारत आलेला आहे, आणि ज्यामुळेच त्याला १८ वर्षांत एकदाही परो(ल) मिळालेला नाही. (विस्कॉन्सिन राज्याच्या नियमाप्रमाणे जर दोषी सिद्ध झालेल्या व्यक्तीने अपराध मान्य केला तरच त्याला परोल मिळतो, अन्यथा नाही). त्याची केस विस्कॉन्सिन निरपराध प्रोजेक्ट खाली परत विचारार्थ घेतली जाते. मूळ केसच्यावेळी उपलब्ध नसलेली आणि नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उपलब्ध झालेल्या डीएनए चाचणी द्वारे केसचा निकाल पूर्णपणे फिरतो, आणि स्टीव्हन एव्हरी निर्दोष सुटतो. १८ वर्षे तुरुंगात राहून स्टीव्हन एव्हरी निर्दोष बाहेर येतो, पण त्याचबरोबर आणखी काही रहस्यांचीही उकल होते. तो इतके दिवस आत होता, तरी त्या छोट्याश्या गावात लैंगिक अत्याचाराचे आणखी प्रकार घडतच होते, इतर दोषी पकडलेही जात होते, त्यातून आणखी माहिती मिळत होती, त्या माहितीचा वापर करून कुणाला चुकीने शिक्षा झाली असेल का? अशा निष्कर्षापर्यंत यंत्रणेतीलच काही लोक आलेही होते, पण हे सगळं गुलदस्त्यात ठेवणे, दाबून ठेवणे, वर येऊ न देणे हे एकूणच यंत्रणेला सोयीस्कर होतं आणि तसंच होत होतं.
भर तारुण्यातील १८ वर्षे आपल्या सहचारी आणि मुलांपासून दूर, बंदिवासात, ते ही अशा आरोपाखाली जो केलाच नाही, आणि आपण खरे आरोपी नाही हे सरकारला समजूनही जवळ जवळ ८ वर्षे ही माहिती दाबून टाकणारे लोक. सगळच बधीर करणारं. स्टीव्हने अर्थातच विस्कॉन्सिन राज्य आणि मॅनोटोवॉक कौंटीवर मल्टी मिलियन डॉलरची फिर्याद नोंदवली. त्याच्या सुनावणीला शेरीफच्या कार्यालयातील दिःगज लोकांना पाचारण करण्यात आलं, आणि काहीच दिवसांत त्या गावातून आणखी एक व्यक्ती गायब झाली. टेरेसा हॉलबॅक. एक तरुण छायाचित्रकार, जी गाड्या विकण्याच्या संकेतस्थळासाठी गाड्यांची प्रकाशचित्रे काढत असे. ती गायब होण्यापूर्वी तीन व्यक्तींना भेटली होती, त्यातील शेवटची व्यक्ती होती... स्टीव्हन एव्हरी.

आता टेरेसाचा पोलिसांनी घेतलेला शोध, पोलिसांना काहीही न सापडल्याने कम्युनिटीने हाती घेतलेली शोध मोहीम, त्यात तिची गाडी अचानक एव्हरी भंगारखान्यात सापडणे. स्टीव्हच्या घराचा, गराजचा अनेक वेळा पुन्हापुन्हा घेतलेला शोध. विविध लोकांच्या घेतलेल्या, न घेतलेल्या मुलाखती त्यातून समजणारे नानाविध कंगोरे. माहिती काढण्यासाठी पोलीस वापरत असलेल्या विविध क्लुप्त्या. त्यात हकनाकरित्या ओढले गेलेले कुटुंबातील इतर सदस्य, शोधमोहिमे अंतर्गत पोलिसांकडून घडलेल्या ढळढळीत चुका, त्रुटी. शेरीफ ऑफिस कॉन्फ्लीक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये असूनही त्यांनी केलेला सुरुवातीचा तपास, कोर्टात दिला जाणारा निवाडा म्हणजे न्याय का केसची कायद्याअंतर्गत दिसणारी एक बाजू? या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील आणि विस्कॉन्सिन राज्यातील क्रिमिनल जस्टीस सिस्टीम, ज्युरी ट्रायल आणि अनेक अनेक गोष्टी म्हणजे या सिरीयलचे उरलेले ९ भाग.

ही डॉक्युमेंटरी Laura Ricciardi आणि Moira Demos यांनी १० वर्षे शूट केल्येय. यात केस चालू असतानाचे कोर्टातील वाद-प्रतिवाद, त्या दिवसाच्या कामकाजानंतर माध्यमांनी दोन्ही बाजूंच्या घेतलेल्या मुलाखती, बातम्या, स्टीव्हनच्या वकिलांची, त्याच्या जवळच्या नातेवाईकांची मतं, टेरेसाच्या भावाची मतं कायद्याच्या जाणकारांची मतं आणि सुत्रधाराची मतं असं बरंच काही आहे. शेवटी सुन्न, हताश व्हायला होतं.

ही डॉक्युमेंटरी बघत असताना, 'खूप त्रास होतोय पण बघणं सोडवत नाही' अशी परिस्थिती झाली माझी. डॉक्युमेंटरी एकांगी आहे, असं डीए (डीस्ट्रीक्ट अ‍ॅटर्नी) केन क्रॅट्झ यांच आणि मॅनोटोवॉक शेरीफ ऑफिसचं म्हणणं. दिग्दर्शकांनी त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केलेला.
यासगळ्या पार्श्वभूमीवर ज्युरी ट्रायल, पेटी ज्युरी, ग्रॅन्ड ज्युरी, अमेरिकेतील ब्रोकन क्रिमिनल जस्टीस सिस्टीम म्हणजे नक्की काय? ज्युरीनी निर्णय घेतला तो कायम असतो का? ज्युरी कसे आणि कोण निवडतं? ही पद्धत कितपत न्याय्य आहे? न्यायालयापुढे आलेल्या साक्षी पुराव्यांवरून न्यायाधीश फक्त निकाल देऊ शकतात, प्रत्यक्षात 'न्याय' करणं हे किती अप्राप्य असू शकतं? या पार्श्वभूमीवर कोणी कितीही भयानक गुन्हा केला असेल, तरी जोपर्यंत मानवी व्यवहार, भाव-भावना आणि साक्षी पुराव्यांवर निवाडा होणार आहे, तोवर फाशीची शिक्षा ही किती भयानक ठरू शकते? त्या अनुषंगाने सध्या रहातो त्या कॅनडातील, भारतातील न्याय निवाड्याची पद्धत काय आहे? त्याच्या खाचा खोचा काय इ. अनेक विषयांवर शोध घेणं चालू झालं.
ते सगळं वेळ मिळेल तसं लिहितो. तुम्हालाही काही माहिती असेल तर वाचायला आवडेल.

हा बाफ, मेकिंग अ मर्डरर बद्दल चर्चा करायला आणि एकूणच क्रिमिनल जस्टीस सिस्टीमवर चर्चा करायला उघडला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टीव्हन एव्हरीने पहिल्या वेळी सुटल्यावर स्टेटवर मिलिअन्स ऑफ डॉलर्ससाठी खटला भरला हा त्याचा 'गुन्हा' ठरला असावा असं वाटतं. इतकी रक्कम आणि पोईस डिपार्टमेन्टचं रेप्युटेशन अ‍ॅट स्टेक हे एका पारड्यात आणि सोशली इनेप्ट कुटुंबातल्या दोन व्यक्ती दुसर्‍या पारड्यात असेल तर निकाल याहून काय वेगळा होणार?

त्याच्या त्या पुतण्याबद्दलसुद्धा फार वाईट वाटत राहतं.

लेखात पुतण्याचा उल्लेख केला न्हवता, पण त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त वाईट वाटतं. स्वतःची बाजू मांडण्यासाठी नेमलेला वकील, स्टेटच्या बाजूने असल्यासारखा लढतोय. तो बदलायचा, तर का आणि कशासाठी बदलायचा हे न्यायालयाला पटेपर्यंत तोच वकील आपला मानून चालायचं. स्टीव्हनच्या केस मध्ये मांडलेल्या मुद्याच्या विरुद्ध मुद्दे ब्रेंडनच्या (पुतण्याच्या) केस मध्ये स्टेटने मांडणे आणि एकूणच ज्युरी सिस्टीम. :प्रचंड राग:
एका अती-सामान्य बुद्धीमत्तेच्या टीनेजरचा वापर, त्याच्याकडून अपराध वदवून घेणं. तिडीक गेली.

ज्युरींचे प्रकार, त्यांचं काम आणि वापर:
गॅन्ड ज्युरी : आजच्या घडीला फक्त अमेरिका आणि लायबेरीआमध्ये ही पद्धत वापरतात.
यात १६ ते २४ सामान्य नागरिक सहभागी होतात. अमेरिकेत बहुतेक ठिकाणी २३ व्यक्ती सहभागी होतात. समोर ठेवलेल्या पुराव्यात, 'आरोपीने गुन्हा केलेला आहे' असं दर्शवणारे पुरेसे पुरावे आहेत का? हे ठरवणं गॅन्ड ज्युरीचे काम असतं. यातील कमीत कमी १२ (निम्याहून अधिक) व्यक्तींनी होकार दर्शवला तर 'ट्रु बिल' ठरून चार्ज लावला जातो. गॅन्ड ज्युरी आरोपांची शहानिशा पुरावे तपासून करतात. इथे फक्त होकाराला महत्त्व असतं. गॅन्ड ज्युरी ही पद्धत, प्रॉसिक्युटरने खोटेनाटे आरोपी ठेवून आरोपीचा छळ करू नये म्हणून अस्तित्वात आहे, जेणे करून सामान्य नागरिकांचा त्यात सहभाग होऊन खटला एकांगी असणार नाही. (ज्याला काळीमा फासला जातो Happy )
गॅन्ड ज्युरीच्या समोर फक्त प्रॉसिक्युटर आणि त्याचे साक्षीदार येतात. आरोपीचा वकील त्यात सहभागी नसतो, आणि तो साक्षीदारांची उलट तपासणीही घेऊ शकत नाही. गॅन्ड ज्युरी समोर आरोपी आपली बाजू मांडू शकतो, पण त्याची उलट तपासणी फक्त प्रॉसिक्युटरच घेऊ शकतो. अन्यथा आरोपीचाही यात फारसा सहभाग नसतो. गॅन्ड ज्युरीची ट्रायल सामान्य नागरिकांसाठी खुली नसते. ती बंद दाराआड होते.

गॅन्ड ज्युरी समोर ट्रायल महिनोंमहिने चालू शकते. जी पेटी ज्युरीच्या बाबतीत काही दिवस/ आठवडे क्वचित हाय प्रोफ़ाईल केस मध्ये १-२ महिने चालू शकते.

पेटी ज्युरी: पेटी ज्युरी समोर दोन्ही बाजूंचे साक्षी पुरावे आणि उलट तपासण्या होतात. यांचं काम आरोपीला दोषी ठरवणं किंवा दोषमुक्त सोडणं. पेटी ज्युरी मध्ये ६ ते १२ व्यक्ती सहभागी होतात. यांना एकमतानेच निर्णय द्यावा लागतो. एकमत नसेल तर न्यायाधीश अनिर्णीत निकाल (हंग ज्युरी) देतो. असं झालं तर प्रोसिक्युटर परत ट्रायल लढण्याचा निर्णय घेऊ शकतो. पेटी ज्युरी ट्रायल सर्वसामान्यांसाठी खुली असते. पेटी ज्युरीची ट्रायल सलग होते तर गॅन्ड ज्युरीची इतर कोर्टाच्या कामकाजामुळे टप्याटप्यात होऊ शकते.
पेटी ज्युरी पद्धत कॉमन लॉ (पूर्वीच्या निकालांचे कायद्यात रुपांतर होणे) मानणाऱ्या अनेक देशांत आहे. अमेरिका स्वतंत्र झाली तेव्हा ब्रिटीश कॉमन लॉ मध्ये गॅन्ड ज्युरी पद्धत होती, जी अमेरिकेत आजही कायम आहे, ब्रिटीश पद्धतीत ती आज कालबाह्य आहे.

गॅन्ड ज्युरी समोर फक्त प्रॉसिक्युटर बाजू मांडतो, त्याने सर्वसमावेशक केस मांडणे जरी अपेक्षित असलं तरी प्रत्यक्षात तसं होत नाही. त्यामुळे अमेरिकेत गॅन्ड ज्युरी हे प्रॉसिक्युटरचे रबर स्टँप मानले जातात. प्रिलिमिनरी हिअरिंग (मराठी ?) न्यायाधीशासमोर होण्यापेक्षा शक्य असेल तर गॅन्ड ज्युरीसमोर करणं हे प्रॉसिक्युटरला कधीही आवडतं, कारण न्यायाधीशासमोर विरुध्द बाजू ही मांडली जाते, आणि खटला सर्वांसमक्ष चालतो. गॅन्ड ज्युरी आधी म्हटल्याप्रमाणे बंद दाराआड होते, आणि फक्त प्रॉसिक्युटरची बाजू ऐकली जाते.

भारतात १९६० मध्ये नानावटी वि. महाराष्ट्र राज्य केस मध्ये ज्युरी पद्धत बंद करण्यात आली.
कॅनडात आरोपीला फक्त न्यायाधीश किंवा न्यायाधीश आणि ज्युरी कुठल्या प्रकारची ट्रायल हवी ते निवडण्याचा हक्क आहे. जर तुमच्या केस मध्ये नागरिकांच्या भावना उद्दीपित होऊन निकाल दिला जाणार असेल तर ज्युरी ट्रायलची निवड होते. खूप किचकट, टेक्निकल गोष्टी असतील तर फक्त न्यायाधीश प्रकारची ट्रायल निवडली जाते. खून इ. प्रकारच्या केस मध्ये ज्युरी ट्रायलच घ्यावी लागते.