डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे (माउली सेवा प्रतिष्ठान- इंद्रधनु प्रकल्प , अहमदनगर) यांची मुलाखत
मी: नमस्कार. बऱ्याच दिवसांपासून भेटायचं चाललं होतं...आज योग आला. चला.......आपल्या आपण गप्पांना सुरुवात करायची का? माझा पहिला प्रश्न असा आहे की हे अश्या प्रकारचं काम करायचं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? किंवा काही विशिष्ठ कारण किंवा घटनेमुळे ही प्रेरणा मिळाली? सुरुवात कशी झाली?
डॉ राजेंद्र : १९९८ साली "माऊली सेवा प्रतिष्ठान" ही संस्था स्थापन झाली. ही संस्था स्थापन करण्यामागे दोन हेतु होते. एक तर माझी आई २२ वर्षांपूर्वी वारली. तेव्हा मी कॉलेजात शिकत होतो. त्यामुळे माझं शिक्षण झाल्यावर तिच्या स्मरणार्थ म्हणून ही संस्था स्थापन केली. आणि संस्थेला नाव "माऊली" दिलं. दुसरं असं की माझ्या जीवनात अध्यात्माचं फ़ार मोठं अधिष्ठान आहे. मी ज्ञानेश्वर माउलींना मानतो.
तेव्हा आम्ही या संस्थेतर्फ़े छोटीमोठी शिबिरं भरवणे, एक मोबाइल क्लिनिक चालवणे असे काही किरकोळ प्रकल्प करत होतो. या मोबाइल क्लिनिकमधून आम्ही गावोगावी जाऊन गोरगरिबांना मोफ़त औषधोपचार करत असू.
औषधांचे मोफ़त वाटप करत असू. तेव्हा खिशातूनच पैसे जात असत. माझी प्रॅक्टिसही नगरला चालू होतीच.
मी: तुम्ही दोघेही प्रॅक्टिस करत होता का तेव्हा?
डॉ. राजेंद्रः नाही. डॉ. सुचेता तेव्हा होमिओपॅथिक कॉलेजात लेक्चरर म्हणून काम करायच्या. त्या BHMS आहेत. आम्ही शिंगव्याहून अप् डाउन करायचो. कारण घर शिंगव्यात होतं. असं ये जा करत असताना आम्हाला रस्त्यावर अनेक बेघर, अनाथ व्यक्ती दिसायच्या. नगरपासून शिर्डी, शनी शिंगणापूर जवळ असल्याने देवाच्या दारी म्हणून घरातल्या वृद्ध, पीडित सदस्यांना आणून सोडलं जायचं. ते आपले इकडे तिकडे फ़िरत रहातात.
असंच एकदा उकिरड्यावर एक वेडसर दिसणारा माणूस खाऊ नये ते खाताना दिसला. आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटलं. आणि तोच "माउली" सुरू करण्यासाठीचा टर्निंग पॉइन्ट ठरला म्हणायला हरकत नाही.
मी: मग सुरवात कशी झाली?
डॉ. राजेंद्र: आम्ही त्या वेड्याला आमचा डबा दिला. त्याने तो खाल्ला. मग आम्ही त्याला रोज डबा द्यायला लागलो.
पण काय असतं....हे लोक काही भिकारी नसतात. भिकारी कसा व्यवस्थित भीक मागून आपली उपजीविका चालवतो. पण यांची तंत्र वेगळंच. हे दिलेलं खातीलच याची काही खात्री देता येत नाही.
डॉ. सुचेता: हं...या सगळ्या अनुभवांमुळे आम्ही दोघे आतून हललो. मग मला वाटलं आपण रोजच घरून डबा आणून जितक्या जमेल तितक्या लोकांना जर खायला घालू शकलो तर? मग आम्ही तसा कार्यक्रम सुरू केला.
घरून जेवण बनवायचं आणि जिथे हे लोक असतात तिथे ते नेऊन द्यायचं. हाच आमचा त्यावेळचा "अन्नपूर्णा" प्रकल्प! पण काय होऊ लागलं....हे लोक जेवायचे आणि निघून जायचे. मग वाटलं की यांना आसरा, आधार देण्याची गरज आहे. नुसतं रोजचं जेवण देऊन यांच्या जीवनात काहीच फ़रक पडणार नाही. तरीही पुढे काही दिवस आम्ही घरून जेवण बनवून, ते पदार्थ सुटसुटीत पाकिटात पॅक करून या निराधार, बेघर लोकांना द्यायचा उपक्रम चालूच ठेवला. जोडीने डॉकटरांची प्रॅक्टिस चालूच होती.
यांना याचवेळी एक अनोखा अनुभव आला. त्यानंतर आमच्या विचारसरणीत आणखीनच बदल झाला. ...
डॉ. राजेंद्र: आम्ही असंच अन्नाचं वाटप करत असताना एकदा एक वयस्कर गृहस्थ भेटले. असेच निराधार, विमनस्क. आम्ही त्यांना खायला घातलं. त्यांचं खाऊन झाल्यावर मी त्यांची चौकशी केली....कुठून आलात, कुठे जाणार वगैरे. तर त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून आम्हा दोघांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.
ते गृहस्थ म्हणाले......."हम हवासे आये है और जमीनमे जायेंगे!
डॉ. सुचेता: या लोकांना स्वता:चं किंवा समाजाचं भान नसल्यामुळे आपण दिलेलं ते खातीलच किंवा जवळ ठेऊन घेतील याचीही खात्री नसते. आमच्या दृष्टीने तोही एक धडाच होता. अनावश्यक साठा करायचा नाही. कशाची आसक्ती बाळगायची नाही.
मी: बरोबर..........असंग्रह आणि अपरिग्रह!
डॉ. राजेंद्र: अगदी बरोबर.... त्या वरवर वेड्य़ा दिसणाऱ्या माणसाने एक वेगळीच अनुभूति दिली आणि जीवनविषयक तत्वज्ञानाचा एक पाठ शिकवला. अश्याच काही प्रसंगातून आपल्याला समाजासाठी काय करायचंय हेही मनात ठसत गेलं हळूहळू. सु्चेता....तू सांग ना त्या महिलेबद्दल........
डॉ. सुचेता: हो. आम्हाला रस्त्यावर एकदा एक महिला दिसली.....अर्थातच निराधार, विमनस्क! आम्ही तिला खाऊ पिऊ घातलं. त्यावेळी आम्ही दोघेही आमच्या आमच्या कामाला निघालो होतो. त्या बाईची आम्ही चौकशी केली तर ती म्हणाली ...माझा भाऊ चहा प्यायला गेलाय, तो आला की मला घेऊन जाईल. तरी आम्ही तिला सांगितलं आम्ही संध्याकाळी येऊ परत तुला भेटायला. पण संध्याकाळी ती तिथे नव्हतीच.
मग माझ्या मनात विचार आला.....कुटुंबाचा सदस्य म्हणून वावरणाऱ्या, समाजाचा घटक म्हणून वावरणाऱ्या सुशिक्षित महिलांची काय परिस्थिती आहे आपण जाणतोच. मग या वाऱ्यावर सोडून दिलेल्या महिलांचं काय?
खूप विचारांती वाटलं.........आपण खूप कमी पडतोय. नुसतं अन्नपूर्णा प्रकल्पाने आपण यांची फ़क्त एकच गरज पूर्ण करतोय. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी वस्त्र निवारा याही गरजा आपण समाजाच्या या पीडित, दुर्बल घटकांच्या...... पूर्ण करू शकू का? यांना आपण घर देऊ शकू का? यांना माणूस म्हणून जगण्यासाठी आपण काय करू शकतो? यांना योग्य त्या औषधोपचाराची गरज आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे.
मग आम्ही ठरवलं की या निराधारांसाठी आपण एक घर बांधण्याची गरज आहे.
मी: तुम्ही सध्या कुठे रहाता?
डॉ. सुचेता: आम्ही शिंगवे गावातच रहातो. पण आत्ता आपण जिथे बसलो आहोत ती "माउली सेवा प्रतिष्ठान" ही वास्तू आम्ही २००८ ते २०१० या कालावधीत बांधली . आम्ही जेव्हा माझ्या सासऱ्यांशी या विषयी बोललो तेव्हा त्यांनी ही सहा गुंठे जमीन आम्हाला दिली. ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती.
मी: अरे वा! म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामाला घरून चांगलाच पाठिंबा होता असं दिसतंय!
डॉ. राजेंद्र: हो... तसं म्हटलं तर फ़क्त अगदी जवळच्यांच पाठिंबा होता. पण बाकीचे नातेवाईक व समाजातले काही परिचित यांनी सुरवातीला ्फ़ार नावं ठेवली आणि त्रासही दिला. पण वडील भक्कमपणे पाठीशी उभे राहिले.
मध्यंतरी आम्ही करत असलेल्या कामाची बातमी पुण्याच्या वृत्तपत्रात छापून आली. मग ती वाचून पुण्याचे
श्री. वाय ए साने हे आमचा माग काढत इथपर्यंत येऊन पोचले. आणि त्यांना पहायाचं होतं की खरंच असं कोणी काम करतंय का? मग त्यांनी ६ लाख रु.ची प्राथमिक मदत केली. आणि या वास्तूचा ग्राउन्ड फ़्लोअर बांधला गेला. इथले मदर तेरेसा वॉर्ड आणि स्वयंपाकाघर झालं आणि काम चालू झालं.
पूर्वी पेशन्ट म्हणून आलेली आणि इथे येऊन संपूर्णपणे सुधारलेली मोनिका आणि सिस्टर
मी: इथे मनोरुग्ण स्त्रिया जेव्हा येतात तेव्हा त्यांना आत घेतल्यानंतर त्यांची स्वच्छता कोण करतं?
डॉ. सुचेता: इथे येणाऱ्या स्त्रिया या बहुतांशी मनोरुग्ण असल्याने अगदी पराकोटीच्या अस्वच्छ असतात. त्यांची दुर्गंधी येत असते. केसांच्या जटा झालेल्या आणि त्यात उवा वगैरे. कधी कधी अंगाभोवती काही गुंडाळलेले असते. त्यामुळे त्या जागी भयंकर स्किन डिसीजचा प्रादुर्भाव झालेला असतो.
तर अगदी सुरवातीला आम्ही दोघंच ही सगळी काम करत असू. पण जसा व्याप वाढत गेला तशी ही जबाबदारी आम्ही इथल्या बऱ्या झालेल्या किंवा सुधारलेल्या महिलांवर टाकली.
डॉ. राजेंद्र आणि डॉ. सौ. सुचेता
मी: म्हणजे तुमच्याकडे दाखल झालेल्या पेशन्ट महिला सुधारल्यावर तुम्ही त्यांच्यावर काही तरी जबाबदारी टाकता.
डॉ. राजेंद्र: हो.....आता तर आम्ही एकेका लहान मुलाची केअर टेकर म्हणून एकेका स्त्रीची नेमणूक केली आहे. त्या मुलाचं सगळं तिने पहायचं. त्याला जेवायला घालणे, अंघोळ वगैरे!
मी: एखाद्या पेशन्टविषयी सांगू शकाल का? म्हणजे तिची हिस्टरी, इथे कशी आली वगैरे?
डॉ. राजेंद्र: हो. आमची इथली पहिली रहिवाशी म्हणजे आक्का. जिच्याबद्दल सुरवातीलाच उल्लेख आहे. हिला सख्ख्या भावाने नगरच्या एका चौकात सोडून दिली. आणि ...मी चहा पिऊन येतो....असं सांगून तो भाऊ जो गायब झाला तो आलाच नाही. मग सहा वर्षं याच चौकात कशीबशी जगत राहिली. भावाची वाट पहात!
मग आम्ही तिला घेऊन गेलो. माउली मध्ये ती चार वर्षं आनंदात जगली. पण नंतर मात्र जेव्हा तिचा अंतिम काळ जवळ आला, ती आम्हाला म्हणाली.....भाऊ, वहिनी मला जगायचंय, मला जाऊ देऊ नका!
मी: अरेरे...म्हणजे तुमच्या संस्थेत येऊन बिचारीला जगण्यातली मजा कळायला लागते्, ती सुधारते, तोवर तिची हे जग सोडून जायचीच वेळ येते! क्रूर नियतीचा खेळ! ...बरं....अक्काला मेडिकल हेल्प मिळवताना काही अडचणी आल्या का? किंवा तुमच्या या कार्याकडे बघण्याचा तुमच्या इतर व्यवसाय बंधूंचा काय दृष्टीकोन होता?
बुद्धा हॉल........... सर्व इन्मेट्ससाठीची आनंद साजरा करण्याची जागा.
डॉ. सुचेता: या बाबतीत फ़ारसे चांगले अनुभव नाहीत. अक्काला उत्तम उपचार मिळावेत म्हणून तिला एका खाजगी रुग्णालयात नेले. पण तिथे त्यांनी तिला अॅड्मिट करून घेण्यास नकार दिला आणि तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मग आम्ही तिचे नातेवाईक आहोत, ती बेवारस नाही असं जीव तोडून सांगितल्यावर कुठे तिला ऑक्सिजन वगैरे लावला आणि उपचार सुरू झाले. पण तरीही तिची तब्ब्येत खालावली. तेव्हा तिथल्या मुख्य डॉक्टरांनी तिचा ऑक्सिजन काढला आणि तिला दुसरीकडे सुपर स्पेश्यालिस्ट्कडे हलवायला सांगितलं. तिथे आधी तर अमूक एक रक्कम भरा मगच उपचार करू असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही आमच्या संस्थेबद्दल सांगितलं, पैशांची तजवीज करू, पण लगेच पैसे भरता येणार नाहीत असंही सांगितलं व अक्काला घेऊन निघालो. पण तिचा वाटेतच अंत झाला.
आणि तसंही सुरवातीला समाजाकडून, नातेवाईकांकडून हेटाळणीच वाट्याला आली. खूप त्रास झाला.
पण जसं संस्थेचं काम वाढत गेलं, तसं आता आमच्या या प्रकल्पासाठी बरेच डॉक्टर्स आमच्यासाठी आपली सेवा देतात. आजूबाजूच्या परिसरातून कित्येक सेवाभावी व्यक्ती आमच्या संस्थेशी जोडल्या जाऊ लागल्या. तरीही आर्थिक मदतीची आम्हाला अजूनही नितांत गरज आहेच. सध्या इथे १०० महिला आणि १५ मुलं आहेत. या सर्वांची नीट सोय करायची तर भक्कम आर्थिक पाठबळ हवं.
मी: इथे या सर्वांचं साधारण रूटिन काय असतं? आणि सर्वांच्या जेवणाची काय व्यवस्था आहे?
डॉ. सुचेता: इथे सर्वांचं नॉर्मल रूटिन असते. सकाळ संध्याकाळ प्रार्थना, व्यायाम, जेवण, रात्री थोडं रिक्रिएशन. आणि जेवण इथेच बनवलं जातं. सध्या इथली सर्व कामं साधारणपणे बऱ्या झालेल्या स्त्रीयांकडूनच करून घेतलं जातं. यांना जितकं स्वयंपूर्ण करता येईल तितका त्यांचा स्वता:मधला आत्मविश्वास वाढेल. आणि त्या लवकर नॉर्मल होतील.
आमच्या किचनमधे गहू वगैरे दळण्याची गिरणी आहे आणि पोळ्या बनवण्याचं यंत्रही आहे. यात खूप मोठ्या प्रमाणात पोळ्या होतात. सध्या या मशिनरीत काही बिघाड असल्याने या बायकाच हे काम करतात.
मी: इथे येणाऱ्या मनोरुग्ण महिलांची डिलिव्हरी झाल्यावर त्या मुलांचं पुढे काय भविष्य? या मुलांना दत्तक देण्याची सोय आहे का?
डॉ. राजेंद्र: या सर्व स्त्रियांची मुलं इथंच वाढताहेत. यांना आम्ही स्वता:चं नाव आडनाव देतो. उदा. श्रद्धा राजेंद्र धामणे. ही मुलं आम्हा दोघांना आई बाबा म्हणतात. कारण यांच्या आयांना जगाचं, स्वता:चं भानच नाहीये. व या मुलांचा जन्मदाता पिता कोण आहे तेही माहिती नाही... तर या मुलांना कश्या सांभाळणार? पण ही मुलं बेवारस नाहीत. त्यांना आई आहे. त्यामुळे कायदेशीररित्या आम्ही त्यांना दत्तक देऊ शकत नाही. कारण यात दोन तीन मुद्दे आहेत. एक तर आईजवळ मूल असल की आई आणि मूल दोघेही आनंदी असतात. आणि ही आता मनोरुग्ण आई संपूर्णपणे सुधारल्यानंतर आपल्या मुलाविषयी विचारू लागली तर? म्हणूनच आम्ही इथली मुलं दत्तक देऊ शकत नाही. यातली काही मुलं आम्ही जवळच्या शाळेत घातली आहेत.
हे कसं व्हिशस सर्कल आहे पहा......मनोरुग्ण स्त्री, अत्याचाराची बळी, तिला दिवस जातात, कधी एखादीला हे माहितीही नसतं की ती प्रेग्नंट् आहे. अश्या परिस्थितीत बऱ्याच वेळा ती आमच्या संस्थेत दाखल होईपर्यन्त तिची खूप पुढची अवस्था असते. म्हणजे डिलिव्हरी करण्याखेरीज दुसरा उपाय नसतो.
मी: एकंदरीतच या महिलांना कश्या प्रकारचे उपचार दिले जातात?
डॉ.राजेन्द्र: यांना रीतसर सायकिक ट्रीटमेन्ट दिली जाते. व्यवस्थित उपचार दिले जातात. आमची स्वतांची पॅथॉलॉजी लॅब आहे. ब्लड अॅनलायजर आहे.
आणि हा रोग हा मनाशी निगडित असल्याने यांच्या मनाची खूप काळजी घ्यावी लागते.
या सर्व स्त्रियांना कशात ना कशात गुंतवून ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांच्या कुवतीनुसार प्रत्येकीला काही ना काही काम देतो. त्यातलाच एक प्रकल्प म्हणजे उदबत्त्या करण्याचं युनिट. मनोरुग्णांवरील उपचाराचा एक महत्वाचा भाग म्हणजे त्यांचं मन रमवणे. निर्मितीचा आनंद त्यांना घेता यावा हा हे युनिट सुरू करण्यामागचा एक उद्देश आहे.
इथे रोज १० कि. उदबत्ती तयार होते. याच्या विक्रीतून या महिलांवर होणाऱ्या खर्चास थोडा तरी हातभार लागावा हाच उद्देश.
मी: बरोबर.......आपण म्हणतोच ना empty mind is devil's workshop. म्हणूनच तुम्ही या महिलांना काहीतरी सृजानात्मक कार्यात गुंतवता आहात हे खरंच कौतुकास्पद आहे.
डॉ. सुचेता: खरं म्हणजे हा त्यांच्या ट्रीटमेन्टचाच एक महत्वाचा भाग आहे. इथे आम्ही शिवण मशिन्सही घेतली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांच्याकडून आम्ही काही ना काही शिवणकाम करून् घेतो, जे सर्वांनाच उपयुक्त आहे. असो......मलाही एक अनुभव इथे शेअर करायचा आहे. समाजाची स्त्रीयांकडे बघण्याचा किती विकृत दृष्टीकोन आहे याचं हे एक उदाहरण. काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एका नॉर्थ इन्डियन महिलेला घेऊन काही लोक आले. ही महिला त्या गावात बरीच वर्षं विमनस्क अवस्थेत फ़िरायची. ही महिला हिन्दी भाषिक असल्याने वाटतं की ही नॉर्थ इन्डियन असावी. तर नेहेमीप्रमाणेच ही इथे आली तेव्हा भयानक वाईट परिस्थितीत होती. पण जे काही अधून मधून बोलायची त्यावरून काही गोष्टी कळल्या. ती म्हणाली......वो लोग मुझे दारू पिलाके मुझसे गंदे काम करवाते थे.
तिच्यावर उपचार सुरू झाले. हळूहळू थोडी सुधारू लागली. तिला इथे सोडून गेल्यानंतर काही दिवसांनी त्याच लोकांचा फ़ोन आला.......तिला एचआयव्ही आहे का या बद्द्ल आडून आडून चौकशी करणारा! माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आणि आम्ही खोटंच "हो" असं उत्तर दिलं. चौकशी करणारा चांगलाच हादरला. या महिलेवर गावातल्या संभावितांनी वर्षानुवर्षं अत्याचार केलेले होते. त्यातलाच हा एक होता!
डॉ. राजेन्द्र: तिला जगण्याची आजिबातच इच्छा उरलेली नव्ह्ती. तिने तीन वेळा पळून जायचा प्रयत्न केला, तितक्याच वेळा आम्ही तिला परत आणली. एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला, त्यातूनही वाचली.
मी: अरे बाप रे..............सध्या ती आहे का इथे?
डॉ. सुचेता: हो आहे ना. तिच्या आयुष्याची दोरी बळकट आहे. या सगळ्या पीडित महिलांच्या कहाण्या इतक्या भयंकर आहेत की वाटतं...कधी संपणार हे स्त्रीच्या वाट्याला आलेले भोग? समाजाचा दृष्टीकोन कधी बदलणार? एक अशीच बलात्कारित महिला इथे आली. आम्ही पोलिस स्टेशनवर गेलो तक्रार लिहायला. तर पोलिस म्हणाले........हिच्यावर बलात्कार झाला याचा पुरावा काय?
आता पहा.........बलात्काराच्या स्पष्ट खुणा समोर होत्या आणि अश्या प्रश्नाला तोंड द्यायला लागावं?
मी: खरंय! एकंदरीत कठीण परिस्थिती आहे. तरीही एक प्रश्न पडतो..........एखादी महिला मनोरुग्ण असण्यामागे अत्याचार हेच कारण असते की आणखीही काही कारणं असतात?
डॉ.राजेन्द्र: बऱ्याच वेळा बाळंतपणानंतर POST PARTUM DEPRESSION, किंवा प्रसूतीनंतरचे हार्मोनल चेन्जेस हे एक कारणही असू शकते. अश्या वेळी आधीच त्या महिलेची मन:स्थिती दोलायमान असते...त्यात जर तिच्यावर घरच्यांनीच, समाजाने मेन्टल/शारीरिक टॉर्चर केलं तर अश्या वेळी या मन:स्थितीचा कडेलोट होऊन ती महिला मनोरुग्ण बनू शकते.
पण मानसिक शारीरिक अत्याचार हे एक फ़ार मोठे कारण या मागे आपल्या समाजात आहे.
या मागे फ़ार खोलवर दडलेली सामाजिक कारणं आहेत. या आत्ता मनोरुग्ण दिसणाऱ्या स्त्रीयांचं बालपणही बहुतांशी हलाखीतच गेलेलं असतं. घरी त्यांना इमोशनल सिक्युरिटी कधीच अनुभवायला मिळालेली नसते. आई वडिलांची भांडणं, दारू पिऊन आईला मारणारे, अत्यंत बेजबादार असे वडील....अशी... थोड्या फ़ार फ़रकाने हीच परिस्थिती कारणीभूत ठरू शकते. आणि आपल्याला वाटतं की "ब्रोकन फॅमिलीज" फ़क्त शहरी जीवनशैलीचा परिणाम आहे तर ही समजूत चुकीची आहे. खेड्यापाड्यात सुद्धा पहिली बायको असताना दुसरी करणे, आणि वर उल्लेखलेली कारणं स्पष्टपणे आढळतात. आणि अश्या या मनोरुग्ण तर सोडाच पण सामन्य स्त्रीला काही सपोर्ट सिस्टीमच नाहीये. एक्स्पेश्यली खेड्यात.
डॉ. सुचेता: अगदी बरोबर. आता पहा.......एकदा अशीच एक मनोरुग्ण स्त्री इथे आली. काय कारण असेल बरं? आपलं नेहेमीचंच......आईबापांनी लग्न करून दिलं, काही वर्षांनी नवऱ्याने दुसरी बाई घरात आणली, हिला हाकलून दिली, ही माहेरी आली, हिला भावाने घरात घेतलीच नाही. म्हणाला.......आता तुझं लग्न करून दिलंय, तू नवऱ्याकडेच जा. आली बिचारी रस्त्यावर. काय करणार? अशी का आहे आपली समाज व्यवस्था? कुठे आणि काय आहे आपली सपोर्ट सिस्टीम?
आता इथल्या काही महिलांना नवरे आहेत, कुटुंबं आहेत. पण त्या नवऱ्यांनी यांना टाकून दिलेले आहे. आम्हाला ते कोण आहेत ते माहिती आहे. पण आम्ही सध्या कुठल्याही कायदेशीर कटकटींमधे पडू इच्छित नाही. या लोकांविरुद्ध, समाजाविरुद्ध लढा वगैरे देण्याची आमची आत्ता कुवत नाही. कारण आम्ही हे जे काम हाती घेतलंय तेच आम्हाला व्यवस्थित करायचंय! या महिलांना घर देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवायचंय!
मी: खरंय डॉ. सुचेता! ........तर या तुमच्या अलौकिक कार्याबद्दल समाजाला आता हळूहळू माहिती होऊ लागली आहे. तर आता समाजाचा या कामाकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे तसंच आपणहून मदतीचा हात पुढे करणारे दानशूरही आता तुमच्याबरोबर आहेत. त्यांच्या बद्दल सांगा.
डॉ. राजेन्द्र: आमच्या कामाला सरकारी मदत काही नाही. आमचं सगळं काम देणगीवर अवलंबून. समाजातल्या दानशूर व्यक्तींच्या कृपेनेच आमचं काम चालतं. आमच्या कामाची माहिती कळल्यावर श्री. बलभीम पटारे आणि मेघमालाताई पटारे यांनी आपल्याला ३ एकराचा एक प्लॉट देणगीदाखल विनाअट दिला आहे. तिथे आता आपला नवीन प्रॉजेक्ट "मनगाव" आकार घेत आहे. कारण सध्याची आपली जागा आता आपल्याला पुरत नाही. तिथे मनगावात आपलं एक ५०० बेड्सचं अद्ययावत सोयींनी युकत असं हॉस्पिटल असेल. इथे १०० बेड्सचं ICU युनिटही असेल. जिथे आपण आपल्याकडे अगदी दुरवस्थेत येणाऱ्या पेशंट्सना लगेच अॅड्मिट करू शकू. इथे सेटप सगळा आपला राहील व तद्न्य लोक इथे येऊन त्यांच्या सेवा देतील अशी कल्पना या मागे आहे.
आपल्या मनगावचं काम चालू झालं आहे. त्यासाठी कॅनडाच्या "महाराष्ट्र सेवा सदन" या संस्थेने भरघोस देणगी दिली आहे. पण आता आम्हाला खरी मदतीची गरज आहे.
इथे मुलांसाठी शाळा असेल आणि स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने इथे आम्ही पॉलीहाउससुद्धा करणार आहोत जिथे आपण मनगावपुरता भाजीपालाही उगवू शकू. गोपालन, शेळीपालन असेही काही प्रॉजेक्ट इथे होतील.
आम्ही अमेरिकेतल्या निलूताई गवाणकरांशीही नेहेमी संपर्कात असतो. त्यांनीही आपल्याला भरघोस अशी मदत केलेली आहे.
मी: हे मनगावातले सगळे प्रकल्प या तीन एकरात साकार होतील तर! बरं....इथे सध्या तुम्ही कचरा व्यवस्थापन करू शकता का? सध्याचा अगदी ऐरणीवरचा प्रश्न आहे हा!
डॉ. सुचेता: हो. १ एकरात बांधकाम बाकीच्या २ एकरात हे सगळे प्रोजेक्ट्स करू. सध्या कचरा व्यवस्थापन नाही करू शकत आम्ही. तिथे मनगावात मात्र कचरा व्यवस्थापनाबरोबरच बायोगॅस प्लॅन्ट, रेनवॉटर हार्वेस्टिंग असे सगळे पर्यावरण पूरक प्रकल्प करायचे आहेत.
....इथला सध्याचा आमचा महत्वाचा प्रकल्प म्हणजे आमच्या सर्व रहिवासी महिलांना आधारकार्ड बनवून देणे. जेणेकरून त्यांना स्वता:ची आयडेन्टिटी, स्वता:चं नाव मिळेल. आणि मग राजीव गांधी जीव दया योजना या सारख्या योजनांचा त्यांना लाभ करून देता येईल. आता सगळ्यांची नोंदणी झाली आहे. टप्प्याटप्प्याने कार्डं येताहेत.
मी: मध्यंतरी मी आले होते तेव्हा इथल्या बुद्धा हॉलमधे नगरमधल्या स्त्रीयांच्या एका ग्रुपचा गाण्याचा कार्यक्रम होता. मला आठवतंय इथल्या बर्याच जणींनी उत्स्फूर्तपणे आपापली कला सादर केली होती............गाणी, कविता!
डॉ. सुचेता: या हॉलमधे आम्ही या इन्मेट्ससाठी मेडिटेशन, थेरपी अश्या अॅक्टिविटी व रिक्रिएशनसाठी चित्रपट, किंवा असेच काही कार्यक्रम करतो. थोडक्यात म्हणजे इथे आले की सगळे आनंदी असतात. कारण इथे असे आनंददायी कार्यक्रम होतात.
सर्व गोष्टींचं स्टॅन्डर्डायझेशन करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो आहोत.
मी: हो ते दिसतंच आहे. या हॉलला तुम्ही ए.सी. बसवलाय...........
डॉ.राजेंद्रः . हो..........गरिबांसाठीची अॅक्टिविटी म्हणजे कसंही काहीही करा असं बरोबर नाही ना? आणि असं का करावं? ही माणसंच आहेत ना? सर्व सामान्य माणसाला आपल्या घराबद्दल काही अपेक्षा असतातच ना!
आणि "माउली" हे रीहॅब् सेन्टर नाही किंवा हॉस्पिटल नाही. हे यांचं हक्काचं घर आहे. इथून आता त्यांना कोणी हाकलणार नाही.
मी: अगदी बरोबर. त्यांना इथे त्यांचं घर मिळालंय् ही जाणीव जेव्हा त्यांच्या मनात घर करेल तेव्हा त्यांच्या रिकव्हरीचे चान्सेस नक्कीच आणखी वाढतील. इथे आई, आज्जी अशीच नाती इथे जपली जाताहेत. त्यामुळे इथल्या मुलांमध्येही कसल्याही प्रकारचा न्यूनगंड आढळत नाही. सगळी मुलं अगदी घरच्यासारखीच मुक्तपणे वावरताना दिसतात.
डॉ. सुचेता: हो या महिलांचा माणुस म्हणून जगणाचा हक्क नातेवाईकांनी, समाजाने, जगाने नाकारला असेल पण "माउली" त्यांचा तो हक्क अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करते. आता आमच्या नवीन होणाऱ्या मनगावात सुद्धा सगळी रचना अगदी घरासारखीच असणार आहे. म्हणजे तिथेही त्यांना घर मिळेल....नाती तर आहेतच. तुम्ही पहाताय..........
मी:. मी इथे येऊन गेले की नंतर बरेच दिवस एक प्रकारची खिन्नता मनात कुठेतरी वस्तीला येते. तुम्ही दोघेही आपलं आयुष्य यांच्यासाठी वेचताय. चोवीस तास यांच्यात राहून तुम्हाला कधी डिप्रेशन येत नाही का?
डॉ. राजेंद्र: प्रश्न अगदी बरोबर आहे. पण त्यावरही उपाय आहे. तुम्हाला आवडणाऱ्या क्रिएटिव्ह गोष्टीसाठी थोडा वेळ द्यायचा. आणि मग पुन्हा ताजंतवानं होऊन कामाला लागायचं.
मी: हो मला माहिती आहे की तुम्ही कथा लिहिता. काल परवाच्याच पेपरमधे वाचलं... एस्. टी. कर्मचाऱ्यांच्या राज्यनाट्य स्पर्धेसाठी तुम्ही लिहिलेल्या नाटकाला पहिलं बक्षिस मिळालं. त्याबद्दल अभिनंदन.
तुम्ही जना नावाची एक शॉर्ट फिल्म केली. तिचं कान् फ़िल्म् फ़ेस्टिवलसाठी नॉमिनेशन झालं. इतकं मल्टीटास्किंग कसं काय जमवता?
डॉ.राजेंद्र: याचं कारण तेच आहे ...की या आमच्या रेग्युलर कामातून वेळ काढून जर असं काही मनाला शांतता देणारं आपलं आवडतं काम केलं नाही तर, खरंच डिप्रेशन येण्याची शक्यता आहे....... ही इथली शापित मानवजात पाहिली की! आणि जमवायचं म्हणजे आवड असली सवड मिळतेच. मी स्वता: सर्व फ़िल्म शूट केली. आणि आमचा एक अद्ययावत असा छोटासा एडिटिंग स्टुडिओ आहे. जिथे माझा मुलगाच मला या सर्व कामात मोलाची मदत करतो.
मी: अरे वा! काय करतो मुलगा?
डॉ. राजेंद्र: आत्ता अकरावी सायन्सला आहे. पुढे मेडीकलला जाऊन इथेच काम करण्याची इच्छा आहे त्याची. आमची msp.org.in नावाची वेब् साइट आहे. तिथे आमची सर्व माहिती आहे.
डॉ. सुचेता: आमची आणखी एक अॅक्टिविटी म्हणजे "माइन्ड रेडिओ". हा इन्टरनेट रेडिओ माऊली परिवाराने सुरू केला आहे. हा रेडिओ जगाच्या पाठीवर कुठेही ऐकता येतो. आमच्या वरील साइटवर किंवा mindredio.in इथेही. लवकरच अॅन्ड्रॉइड/ आय फ़ोनवरही याचं अॅप् येईल.
याचा स्टुडिओ इथेच आहे. आणि तांत्रिक बाजू इथल्याच बऱ्या झालेल्या सुशिक्षित भगिनींच्या सहाय्याने पुऱ्या केल्या जातात. या रेडिओसाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी मदतीची गरज आहेच आम्हाला.
मी: डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचेता खूप छान झाल्या आपल्या गप्पा! धन्यवाद! खरं म्हणजे अजूनही खूप काही राहिलं आहे. पण विस्तारभयामुळे इथेच थांबू.
तुम्हा दोघांना आणि तुमच्या सर्व प्रकल्पांसाठी तुम्हाला शुभेच्छा!
खुप छान वाटलं हि मुलाखत
खुप छान वाटलं हि मुलाखत वाचून. खुप प्रेरणादायी.
खरं तर अशी निराधार माणसे आपणही बघत असतो, कणवही वाटते, पण हातून काही होत नाही, आपल्या.
खरच खुप महान कार्य
खरच खुप महान कार्य
बापरे मानुषी, डॉ. दंपती च्या
बापरे मानुषी, डॉ. दंपती च्या कामाचा आवाका पाहून स्तब्ध व्हायला झालंय. किती मल्टी टास्किंग कपल आहे. नतमस्तक आहे त्यांच्या कार्यासमोर!!
एका लहान प्रसंगावर इतकी मोठी प्रतिक्रिया आणी या प्रतिक्रिये च्या जाणीवेपायी केव्हढ्या मोठ्या कार्याला त्यांनी सुरुवात केलीये.
___/\___
सुंदर मुलाखत. घर
सुंदर मुलाखत.
घर बांधण्याच्या सालाचा मला वाटत टायपो झालाय. 2008-2010असं हव आहे ना ते.
खरंच महान कार्य आहे
खरंच महान कार्य आहे डॉक्टरांच. _/\_
वर्षु + १ खरंच खूप महान कार्य
वर्षु + १
खरंच खूप महान कार्य करत आहे हे दांपत्य!!
मानुषी, त्यांची इथे ओळख करुन दिल्याबद्दल खूप धन्यवाद.
(एक फ्रेंडली सजेशन, सगळे प्रश्न बोल्ड कर आणि प्रश्नोत्तरांच्या सेट मध्ये लाइन्स सोड म्हणजे वाचायला सोपे जाईल)
खरोखरीच महान कार्य _/\_
खरोखरीच महान कार्य _/\_
ग्रेट माणसे आहेत
ग्रेट माणसे आहेत !
अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांचे अनुभव मन विषण्ण करून गेले
उत्तम ओळख करून दिली आहे
उत्तम ओळख करून दिली आहे कामाची. धन्यवाद मानुषी.
ग्रेट, ___/\___ डॉक्टर
ग्रेट, ___/\___ डॉक्टर पती-पत्नी.
मानुषीताई धन्यवाद.
हि तर देवमाणसं. मानुषी, अशा
हि तर देवमाणसं.
मानुषी, अशा लोकांशी ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
सर्वांना
सर्वांना धन्यवाद!
ममो........टायपो दुरुस्त केला गं! धन्यवाद.
मो.........खूप मौलिक सूचना. बदल केलाय.
वरच्या एका फोटोत(मोनिका आणि सिस्टर) जी मोनिका आहे ती सध्या इथलं बरंच काम पहाते. तिचीही अशीच हृदय विदारक कहाणी आहे. तिला इथली मुलं मम्मी म्हणतात. हिच्या विषयी लोकसत्ताच्या चतुरंगमधे आर्टिकल आलं होतं. सापडली की इथे लिंक देईन.
डॉक्टर पती-पत्नी खरोखरीच
डॉक्टर पती-पत्नी खरोखरीच देवमाणसं आहेत .... किती नि:स्वार्थपणे पण आपुलकीने काम करताहेत....
_____/\______
मानुषी, अशा लोकांशी ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! >>> +११११११
बापरे ! केवढी ताकद लागते हे
बापरे ! केवढी ताकद लागते हे सगळ करायला ..
येथे हि मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद..
मानुषी, अशा लोकांशी ओळख करून
मानुषी, अशा लोकांशी ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!+ १
खरं तर अशी निराधार माणसे आपणही बघत असतो, कणवही वाटते, पण हातून काही होत नाही, आपल्या.+ १
मानुषी ताई, खुप सुंदर
मानुषी ताई, खुप सुंदर मुलाखात....
डॉ. दाम्पत्यांना --------- /\------------. खुप महान उपक्रम.
धन्य आहेत अशी लोक _/\_
धन्य आहेत अशी लोक _/\_
खरं तर अशी निराधार माणसे
खरं तर अशी निराधार माणसे आपणही बघत असतो, कणवही वाटते, पण हातून काही होत नाही, आपल्या.+ १
अगदी बरोबर. तरी आपण या प्रकल्पाला आर्थिक मदत नक्कीच करू शकता.
सर्वांना विनन्ती आहे की यांची वेब साइट जरूर पहा. कारण मी कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे.
जी मोनिका आहे ती सध्या इथलं
जी मोनिका आहे ती सध्या इथलं बरंच काम पहाते. तिचीही अशीच हृदय विदारक कहाणी आहे. तिला इथली मुलं मम्मी म्हणतात. हिच्या विषयी लोकसत्ताच्या चतुरंगमधे आर्टिकल आलं होतं. >>> हो, वाचले होते ते.
मानुषी, अशा लोकांशी ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! >>> +११११११
सर्वांना धन्यवाद. हो
सर्वांना धन्यवाद.
हो शब्दाली.....त्या लेखाची लिंक मिळाली तर इथे देईन.
आणि त्यांच्या वेब्साइटवर त्यांचा "जना" हा लघुपटही पहायला मिळेल.
___/\___ फारच
___/\___ फारच प्रेरणादायी!
मानुषी, ही मुलाखत घेतल्याबद्दल आणि ह्या दाम्पत्याची ओळख करून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार!
___/\___ फारच
___/\___ फारच प्रेरणादायी!
मानुषी, ही मुलाखत घेतल्याबद्दल आणि ह्या दाम्पत्याची ओळख करून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार! + १
चांगली मुलाखत मानुषीताई.
चांगली मुलाखत मानुषीताई.
खुप महान
खुप महान कार्य............................-------------------^-------------------
खरे देव ...
प्रणाम या डॉ. दाम्पत्यांना
प्रणाम या डॉ. दाम्पत्यांना ... इथे ओळख करुन दिल्याबद्दल मानुषी, खूप धन्यवाद.
मागच्या वर्षीच्या लोकसत्ता
मागच्या वर्षीच्या लोकसत्ता सर्वकार्येशू सर्वदा मध्ये ह्यांच्या बद्दल वाचल होत. तेव्हा पासून. मदत करत आहोत.
मुलाखत खरच छान !
किती मोठे करत आहेत ही
किती मोठे करत आहेत ही देवमाणसे! _/\_
मानुषी , इथे ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
देवमाणसे >>> अगदी खरं.
देवमाणसे >>> अगदी खरं. धन्यवाद मानुषी.
सर्वांना धन्यवाद! ही
सर्वांना धन्यवाद!
ही मोनिकावरच्या लोकसत्तामधल्या लेखाची लिंक
http://www.loksatta.com/lekh-news/monica-salvi-working-for-mental-patien...
आणि ही डॉ. धामण्यांनी बनवलेल्या नव्या डॉक्युमेन्टरीची लिंक
https://vimeo.com/151766936
सर्वांनी या लिन्कस जरूर पहा.
"माउली" हे रीहॅब् सेन्टर नाही
"माउली" हे रीहॅब् सेन्टर नाही किंवा हॉस्पिटल नाही. हे यांचं हक्काचं घर आहे. इथून आता त्यांना कोणी हाकलणार नाही.>>>>
किती प्रचंड विचाराचं शिवधनुष्य आहे हे! डॉक्टर द्वयांनी ते पेललं आहे! खरी देवमाणसं!
त्यांची ओळख आम्हाला करून दिल्याबद्दल पुनःपुन्हा धन्यवाद मानुषीताई!
Pages